डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महात्मा गांधी आणि मानवेंद्रनाथ यांचे विचारविश्व

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या स्मृतीनिमित्त दि. 25 जानेवारी रोजी पुणे येथे मराठवाडा मित्रमंडळाच्या आवारात एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. विषय होता 'महात्मा गांधी व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारधारांची समीक्षा'. प्रा. ग. प्र. प्रधान त्या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी विषयास न्याय देणारे आपले सविस्तर टिपण पाठविले होते. वाचकांना ते विचारप्रवर्तक वाटेल.

दोन महान कलाकृतींची ज्याप्रमाणे तुलना करता येत नाही, त्याचप्रमाणे दोन थोर नेत्यांची तुलना करणेही फार कठीण असते. याचे कारण प्रत्येक थोर नेत्याच्या जीवनाची घडण. त्याच्यावर प्रभाव टाकणाऱ्या विचारधारा, त्याला आलेले अनुभव, त्याने स्वीकारलेला मार्ग व कार्यपद्धती आणि त्याचा लोकजीवनावरील प्रभाव. या सर्वांमधून एक स्वयंपूर्ण व्यक्तिमत्त्व घडलेले असते. त्याच्यापेक्षा अगदी वेगळी वैचारिक भूमिका घेऊन राजकीय क्षेत्रात काम केलेल्या नेत्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. म. गांधी आणि मानवेंद्रनाथ रॉय या दोन नेत्यांचे व्यक्तिमत्त्व असेच एकमेकांहून अगदी भिन्न स्वरूपाचे होते. असे असूनही भारतीय जनतेसमवेत काम करताना या दोघांनी काही बाबतींत सारखे विचार मांडल्यामुळे या दोघांची तुलना न करता त्यांच्या विचारविश्वाचा एकत्र अभ्यास करणे उद्बोधक ठरते. ते करण्याचा अल्प प्रयत्न मी करीत आहे.

मानवेंद्रनाथ रॉय हे संस्कारक्षम वयामध्ये ज्या वेळी ते नरेंद्र भट्टाचार्य म्हणून ओळखले जात, तेव्हा श्री. जतीन मुखर्जी या थोर त्यागी क्रांतिकारकाच्या सहवासात आले आणि सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना वाटू लागले. जतीनदांच्या क्रांतिकार्यात ते काही काळ सहभागीही झाले. परंतु मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यावर जनआंदोलनाची जोड नसेल तर शस्त्रांचा उपयोग करून क्रांती करता येणार नाही अशा निर्णयाप्रत ते आले. मेक्सिकोमध्ये त्यांनी श्रमिकांना संघटित करण्याचे जे कार्य केले आणि लेनिनचे सहकारी म्हणून रशियन राज्यक्रांतीत जो भाग घेतला त्यामुळे क्रांतीबाबतच्या त्यांच्या कल्पना अधिक ठाम आणि आग्रही बनल्या. या कालखंडात साध्य उदात्त असेल तर कोणतीही साधने वापरणे न्याय्य ठरते. End justifies the means हा मार्क्सवादी विचारच त्यांना योग्य वाटत होता. भारतातील वीरेंद्र चट्टोपाध्याय, तारकनाथ बोस, राजा महेंद्रप्रताप आणि प्रा. बरकतुल्ला हे ज्या वेळी रॉय यांना 1918-19 साली ताश्कंद येथे भेटले, त्या वेळी कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या आशियायी विभागाचे प्रमुख म्हणून रॉय यांनी त्यांना सांगितले की भारताची स्वातंत्र्य चळवळ ही जागतिक कम्युनिस्ट चळवळीचा एक भाग म्हणून चालविली तरच रशियाकडून त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य मिळू शकेल.भारतीय क्रांतिकारकांच्या त्या शिष्टमंडळाने ही भूमिका स्वीकारली नाही. त्या वेळी रॉय यांनी त्यांच्याशी संबंधही ठेवण्याचे नाकारले. 

पुढे लेनिनच्या मृत्यूनंतर स्टालिनने रशियन कम्युनिस्ट पक्ष हाच आंतरराष्ट्रीय चळवळीचा केंद्रबिंदू केला. त्यामुळे ट्रॉट्‌स्कीस परागंदा व्हावे लागले आणि रॉय हे भारतात परत आले. येथील कम्युनिस्ट पक्षाला मार्क्सचे साहित्य प्रथम रॉय यांनीच पुरविले. मार्क्सचे ग्रंथ वाचूनच डांगे, मिरजकर, घाटे, मुजफ्फर अहमद आदी तरुण कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाकडे वळले. परंतु स्टालिनने जागतिक कम्युनिस्ट चळवळीची सर्व सूत्रे हातात घेतल्यावर मानवेंद्रनाथ यांनी ज्याप्रमाणे मार्क्सवादी राहूनही स्वतंत्र मार्ग चोखाळण्याचे ठरविले, त्याप्रमाणे येथील अन्य कम्युनिस्ट नेत्यांनी केले नाही. इतकेच नव्हे तर रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालीच आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे रॉय हे त्यांच्या मताने क्रांतीशी द्रोह करणारे (रेनेगेड) ठरले. भारतात आल्यावर सय्यद महमूद हे नाव धारण करून रॉय यांनी काँग्रेसमध्येही काही काळ काम केले. परंतु ते 1930 साली पकडले गेले आणि त्यांना ब्रिटिश सरकारने सात वर्षांची शिक्षा दिली. ही शिक्षा भोगत असताना रॉय यांनी केवळ राज्यशास्त्र, अर्थशास्त्र नव्हे तर आधुनिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला.

मानवेंद्रनाथ रॉय हे 1936 साली तुरुंगातून सुटले त्या वेळी त्यांच्या भोवतीचे क्रांतिकारकाचे वलय, त्यांची असामान्य बुद्धिमत्ता, त्यांचा विविध विषयांचा व्यासंग आणि त्यांचे गतिमान व्यक्तिमत्त्व यांमुळे त्यांच्याभोवती अनेक बुद्धिमान आणि ध्येयवादी कार्यकर्ते गोळा झाले. वसंतराव कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भाऊसाहेब तारकुंडे, जी.डी.पारीख. ए.बी.शहा ही महाराष्ट्रातील त्यांच्यापैकी काही ठळक नावे. रॉय यांनी ज्या वेळी आंतरराष्ट्रीय चळवळीत काम करण्यास सुरुवात केली त्या वेळी त्यांनी गांधीजींवर ठोकळेबाज मार्क्सवादी पद्धतीने टीका केली. पुढे ते स्वतंत्रपणे भारतातील डाव्या चळवळीचे एक नेते म्हणून मान्यता पावल्यावरही त्यांनी गांधीजी हे भांडवलदारांचे हस्तक आहेत, अशाच आशयाची टीका केली.

रॉय हे जे विचार 1935 ते 1940 या काळात मांडत होते त्या विचारांवर मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचीच छाप होती. भारतातील कामगार हाच त्यांना क्रांतीचा अग्रदूत वाटत होता. कम्युनिस्ट पक्षात नसलेले परंतु कम्युनिस्ट विचार मांडणारे नेते अशी रॉय यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली. असे असले तरी रॉय हे गतिशील विचारवंत असल्यामुळे कम्युनिस्टांच्या 'डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलिटेरिएट' हा विचार अमान्य करून, जगात लोकशाही टिकणे आणि व्यापक होणे आवश्यक आहे; अशी भूमिका त्यांनी घेतली. हिटलरच्या उदयानंतर फॅसिझमच्या भीषण स्वरूपाची त्यांना कल्पना आली आणि फॅसिझम हे मानवजातीला ग्रासणारे विक्राळ संकट असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लोकशाही राष्ट्रांची जगात एकजूट झाली पाहिजे आणि भारताने या लोकशाही आघाडीतच राहिले पाहिजे असा विचार ते आग्रहाने मांडू लागले.

रॉय यांनी साम्राज्यशाहीचे आर्थिक आणि राजकीय स्वरूप बदलत आहे हे ओळखून तो विचार आपल्या सहकाऱ्यांसमोर आणि भारतासमोर मांडला. 1939 च्या एप्रिल महिन्यात श्री. व्ही.बी. कर्णिक यांनी पुण्यातील एका भाषणात साम्राज्यशाही आणि वसाहतींचे (कलोनिअल कंट्रीजचे) आर्थिक शोषण याबाबतचा रॉय यांचा विचार मांडला. मी त्या भाषणाच्या श्रोत्यांपैकी एक होतो. मला आजही त्यांचे मूळ इंग्रजी शब्द आठवतात. 'There is a cessation or at least a minimisation of the exploitation of the Indian Bourgeoisie by the British Empire' असे ते शब्द होते.

भाषणानंतर मी श्री. कर्णिक यांना पुढील शंका विचारली. "एम.एन.रॉय आणि आपल्यासारखे त्यांचे सहकारी आजवर गांधीजींना भांडवलदारांचे हस्तक म्हणत होतात. आता येथील भांडवलदारांचे शोषण कमी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्याने घेतल्यावर आपल्या पूर्वीच्या विचाराप्रमाणे भांडवलदारांचे पक्षपाती असलेल्या गांधींनी या भूमिकेचे स्वागत करून ब्रिटिश साम्राज्याला पाठिंबा द्यावयास हवा होता. परंतु ते तर प्रखर साम्राज्यविरोधी चळवळ करण्याच्या विचारात आहेत. मग आपली गांधीजींवरील आजवरची टीका चुकीची होती असे म्हणावयाचे की काय?" कर्णिकांनी मला दिलेले उत्तर फार असमाधानकारक होते. ते इतकेच म्हणाले, 'Gandhi is an irrational, unpredictable leader.' या संदर्भात असे वाटते की श्री. व्ही. बी. कर्णिक यांनी मला असे उत्तर द्यावयास हवे होते की, साम्राज्यशाहीच्या स्वरूपात जे आर्थिक बदल होत आहेत आणि त्यातून जे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे त्याच्या आधारे एम.एन.रॉय आणि आम्ही आमची राजकीय भूमिका बनवितो.

गांधीजींचे आकलन या स्वरूपाचे नाही. अशा स्पष्ट रीतीने हा विचार मांडला न गेल्यामुळे रॉय यांच्या आणि रॉयवाद्यांच्या भूमिकेवर टीका करणे त्यांच्या विरोधकांना सुलभ झाले. 'दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यशाही कालबाह्य होईल आणि एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर राजसत्ता गाजविल्यामुळे 19 व्या शतकात इंग्लंडला मिळालेले फायदे विसाव्या शतकाच्या चार दशकांनंतर मिळणार नाहीत.

साम्राज्याच्या Diminishing returnsमुळे इंग्लंडला भारतावर राज्य करण्यात अर्थ वाटेनासा होईल,' हे भारतात एम.एन.रॉय यांनीच फक्त सांगितले हे त्यांच्या टीकाकारांनाही आता मान्य आहे. मात्र असे असूनही स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी केलेली चळवळ अकारण केलेली Superfluous ठरत नाही, हे गांधीजींची विचारसरणी आणि उद्दिष्टे लक्षात घेतल्यास मान्य करावे लागेल. म्हणूनच गांधीजींच्या विचारांचा मागोवा घेऊ या. आता गांधीजींच्या मनाची घडण एका धर्मपरायण कुटुंबात झाली. नैतिक मूल्यांचा संस्कार माता-पित्यांमुळे त्यांच्या मनावर इंग्लंडमधील विद्यार्थिदशेत त्यांनी बायबल वाचले आणि येशू ख्रिस्ताच्या प्रेमाच्या शिकवणुकीमुळे ते प्रभावीत झाले. व्हेजिटेरियन सोसायटीचे ते सदस्य झाले. बॅरिस्टर होऊन परत आल्यानंतर त्यांच्या जीवनाला काही दिवसांनी एक व्यावहारिक कलाटणी मिळाली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय व्यापाऱ्यांचे वकील होण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले. या वेळी रस्किन यांचे Unto this last हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्यांच्या विचारांवर श्रमप्रतिष्ठा आणि अंत्योदय या संकल्पनांचा खोलवर परिणाम झाला.

टॉलस्टॉय यांच्या साहित्यातून निसर्गाची लय आणि माणसाच्या जीवनाची लय यांमध्ये सुसंवाद असावा, हा विचार गांधीजींना मनोमन पटला. त्याचप्रमाणे साधेपणाने शारीरिक श्रम करीत आणि कोणाचेही शोषण न करता जगण्यातील जी उदात्तता टॉलस्टॉय यांच्या जीवनात व्यक्त झाली, त्यामुळे प्रभावीत होऊन तसे प्रयोग आपल्या आयुष्यात करावेत असे त्यांना वाटू लागले. याच वेळी प्रवास करताना वर्णभेदामुळे त्यांचा जो अपमान झाला त्या वेळी त्यांनी केलेल्या चिंतनामुळे त्यांच्या जीवनाला एक नैतिक कलाटणी मिळाली.

अन्यायाचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने केला पाहिजे हा विचार त्यांच्या मनात स्फुरला. यातूनच वर्णभेदाविरुद्ध त्यांनी सत्याग्रह केला. कारावासात असताना थोरोचा Passive Resistance हा विचार मांडणारा ग्रंथ त्यांनी वाचला आणि सत्याग्रह हा जो विचार त्यांना स्फुरला होता आणि ज्या विचाराचे ते निर्धाराने आचरण करीत होते, त्या विचाराला जणू तत्त्वज्ञानात्मक बैठक लाभली. गांधीजी हे रॉय यांच्यासारखे बुद्धिमान नव्हते, परंतु त्यांच्या मनाची संवेदनशीलता विलक्षण तीव्र आणि तरल होती. अन्याय हा जरी काही माणसे करीत असली तरी त्यामागे वर्णभेदासारखा दुष्ट विचार असतो आणि विशिष्ट त-हेची राजकीय वा सामाजिक चौकट तयार करून काही व्यक्ती वा मानवसमूह इतरांवर अन्याय करतात, येथून गांधीजींचा विचार सुरू झाला, याचीच पुढली पायरी म्हणजे अन्यायाविरुद्ध संघर्ष करावयाचा म्हणजे दुष्ट सामाजिक, आर्थिक वा राजकीय रचनेविरुद्ध लढावयाचे असते आणि म्हणून आपण व्यक्तीचा देष न करता अन्यायमूलक रचनेविरुद्ध शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने अंतिम त्याग करण्याची तयारी ठेवून लढले पाहिजे, हा विचार गांधीजींच्या मनात रुजला. । am the greatest enemy of the British Empire, but the greatest friend of the British या गांधीजींनी पुढे काही वर्षांनी उच्चारलेल्या वाक्यातून हाच विचार उत्तम रीतीने व्यक्त झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाची चळवळ चालवतानाच गांधीजींनी ‘टॉलस्टॉय फार्म’ काढून टॉलस्टॉय यांच्या विचारानुसार जगण्याचा - सर्वांनी आळीपाळीने स्वयंपाक करणे, सफाई करणे या त-हेने जगण्याचा - प्रयोग सुरू केला. एम.एन.रॉय यांची बुद्धी चतुरस्र वाचनामुळे आणि व्यासंगामुळे प्रखर झाली होती आणि ते स्वतंत्रपणे विचार करून जीवनाविषयी मूलभूत तात्त्विक विचार मांडू लागले. याउलट गांधीजींनी जे सत्याचे प्रयोग केले त्यामधून त्यांचे विचार स्पष्ट होत गेले. जगातील दुष्टपणा, अन्याय यांचे निर्मूलन झाले पाहिजे, या उद्दिष्टासाठी सत्याग्रह आंदोलन चालवताना गांधीजी Means must be in keeping with and... ‘उदात्त ध्येयाची साधना शुद्ध साधनांनीच केली पाहिजे,’ या निर्णयाप्रत आले. त्यांची ही भूमिका मार्क्सवादी विचारांनी प्रभावीत झालेल्या एम.एन.रॉय यांच्या साध्य-साधनविषयक भूमिकेपेक्षा मूलभूतरीत्या भिन्न होती.

वैचारिक क्षितिजावरील हे दोन ध्रुव होते. आपल्याला शत्रूला नेस्तनाबूत करावयाचे नसून, अन्यायाविरुद्ध संघर्ष करावयाचा आहे आणि आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबिला तर शत्रूच्या मनाचेही आपण परिवर्तन करू शकू, अशी श्रद्धा गांधीजींच्या मनात बळावत होती. याउलट मार्क्सच्या सिद्धांताच्या आधारे विचार करणारे एम. एन.रॉय संस्थात्मक बदल केला तरच अन्याय नाहीसा होईल अशी भूमिका मांडीत होते. 'चेंज ऑफ दी इन्स्टिट्यूशन' हेच सामाजिक जीवनाचे गतिसूत्र मानणारे भौतिक विचारसरणीचे मानवेंद्रनाथ रॉय आणि अन्यायाच्या निर्मूलनासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने केवळ मतपरिवर्तन नव्हे तर हृदयपरिवर्तन करावयाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी नैतिक आचरणालाच अग्रस्थान देणारे गांधीजी हे वैचारिक विश्वातील दोन ध्रुव होते. पारतंत्र्याचे विश्लेषण करताना ब्रिटिश साम्राज्याकडून भारताच्या होणाऱ्या आर्थिक शोषणाचा विचार अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, आदींच्या आधारे एम.एन.रॉय हे करीत असत.

गांधीजींना या भौतिक विचारापेक्षा एका राष्ट्राने परतंत्र असणे, गुलाम राहणे आणि दुसऱ्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याची पिळवणूक करणे, या दोन्ही अवस्था अनैतिक, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, हा नैतिक भूमिकेवरील विचार अधिक महत्त्वाचा वाटत होता. भारताने पारतंत्र्याविरुद्ध संघर्ष करताना सत्याग्रहाच्या, आत्मबलिदानाच्या मार्गाने आपले नैतिक उद्दिष्ट साध्य केले पाहिजे आणि हे करतानाच जुलमी साम्राज्यवाद्यांना त्यांचे साम्राज्य विलयाला जाण्यातच मानवतेची प्रतिष्ठा प्रस्थापित होईल हे प्रत्ययास आणून दिले पाहिजे हे गांधीजींच्या विचारांचे व कृतीचे मुख्य सूत्र होते. त्यामुळे साम्राज्यवाद कालबाह्य कसा आहे याचे एम.एन.रॉय यांनी केलेले आर्थिक, राजकीय विवेचन गांधीजींच्या मनाला स्पर्शही करीत नव्हते.

पारतंत्र्य या अनैतिक अवस्थेविरुद्ध सत्याग्रह करून आपल्याला नवा भारत निर्माण करावयाचा आहे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी 1942 साली 'चले जाव' आंदोलन सुरू केले. ब्रिटिश साम्राज्यवादी जोपर्यंत शस्त्रबळाच्या आधारे भारतावरील पारतंत्र्याचे जोखड कायम ठेवतात तोपर्यंत इंग्लंडला लोकशाहीबद्दल बोलण्याचाही नैतिक अधिकार नाही, हे गांधीजी ‘हरिजन’मधून सतत लिहीत होते. 'जपानचा हल्ला झाला तर तुम्ही काय कराल?' या प्रश्नाला उत्तर देताना गांधीजी म्हणाले, ‘‘स्वतंत्र भारतच स्वतःचे रक्षण करू शकेल. पारतंत्र्य ही मानवी जीवनातील विकृती आहे आणि भारत परतंत्र राहिला तर येथील नागरिकांच्या मनाची अवस्था अधिक विकृत होऊन ते इंग्रजांच्या द्वेषापोटी हिटलरच्या आणि जपानच्या विजयात आनंद मानू लागतील. मला हे घडावयास नको आहे कारण हिटलरला माझा विरोध आहे आणि म्हणूनच भारताला आत्ताच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि स्वतंत्र भारताने जगातील उदात्त विचारांना पाठिंबा दिला पाहिजे हा माझा आग्रह आहे.’’ येथे 'हिंद स्वराज' या गांधीजींच्या मौलिक पुस्तकाचा उल्लेख करून मी गांधीजींच्या विचारविश्वाची ओळख संपवितो. 

हिंद स्वराज या पुस्तकामध्ये गांधीजींनी हे स्पष्ट केले आहे की केवळ राजकीय स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय नसून भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या ध्येयाचा एक भाग म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीकडे ते पाहत होते. अस्पृश्यता हा भारताच्या जीवनावरील कलंक नष्ट झाला पाहिजे, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झाली पाहिजे आणि ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार होऊन सामान्य माणसाला आत्मनिर्भरतेने जगता आले पाहिजे, हे विचार गांधीजींनी हिंद स्वराजमध्ये मांडले. ते असे म्हणत की सत्याग्रहाच्या चळवळीत ज्या वेळी लक्षावधी माणसे सहभागी होतील त्या वेळी भारताच्या सामाजिक जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल. गांधीजी स्वातंत्र्य चळवळ हे समाजपरिवर्तनाचे साधन मानत असत आणि म्हणूनच सत्याग्रह या नैतिक मार्गाचा त्यांनी अवलंब केला. एका अर्थाने गांधीजी हे धर्मपरिवर्तनाचे अग्रदूत होते आणि त्यासाठी मानवाच्या मनावर संस्कार करण्यासाठी प्रार्थना, शारीरिक श्रम, सत्याग्रह आंदोलन आदी साधनांचा त्यांनी उपयोग केला. 

मानवेंद्रनाथ रॉय हे बुद्धिवादी होते आणि आपले विचार बुद्धीच्या माध्यमातून ज्ञानाच्या आधारे प्रसृत करावयाचे ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळेच विचारांना त्यांच्या जीवनात अग्रस्थान व प्राधान्य होते. गांधीजी हे नैतिक प्रेरणांना आवाहन करून त्यांचा जनमानसावर संस्कार करण्यासाठी विचारांपेक्षा आचाराला अग्रस्थान व प्राधान्य देत होते. हे दोन थोर नेते दोन भिन्न मार्गाने वाटचाल करीत होते. परंतु दोघांनीही त्यांना पटलेल्या उदात्त ध्येयाला आपापले जीवन समर्पण केले. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात तीव्र मतभेद असूनही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र राष्ट्रनिर्मितीच्या प्रश्नावर दोघांच्या विचारात अनेक बाबतींत साम्य आढळून येते.

गांधीजी हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघे साडेपाच महिनेच जगले. परंतु त्या काळात त्यांनी दोन महत्त्वाचे विचार मांडले. स्वतंत्र भारतात ग्राम स्वराज्य प्रस्थापित झाले पाहिजे, त्यासाठी सत्तेचे आणि राज्यकारभाराचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आणि जनसामान्यांना राष्ट्रनिर्मितीत सहभागी करून घेतले पाहिजे- हा पहिला विचार. काँग्रेसचे लोकसेवक संघात रूपांतर करून राष्ट्रनिर्मितीचे साधन म्हणून काँग्रेसने काम करावे, राजकीय पक्ष म्हणून सत्तेच्या राजकारणात गुंतून पडू नये हा गांधीजींचा दुसरा विचार. त्या वेळी पं. नेहरू आणि सरदार पटेल या दोघांच्या हातात राजकीय सत्तेची सूत्रे होती. त्यांनी गांधीजींच्या या दोनही विचारांपेक्षा वेगळा मार्ग अनुसरला. त्या काळातील परिस्थितीच्या संदर्भात  पं. नेहरूंनी विज्ञानाच्या आधारे भारताचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता असे माझे मत आहे. त्याचप्रमाणे अस्थिर राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे विसर्जन करणे देशाला हितकारक ठरणार नाही, ही सरदार पटेलांची भूमिकाही योग्य होती. आता आपण 1947 नंतर मानवेंद्रनाय रॉय यांच्या विचारांचा जो आविष्कार झाला त्याचा थोडक्यात मागोवा घेऊ या. 

भारताचे भविष्य कसे घडावे या संबंधीच्या विचारांचे दिग्दर्शन एम. एन. रॉय यांच्या प्रेरणेने जी.डी.पारीख आदी त्यांच्या अनुयायांनी सादर केलेल्या ‘पीपल्स प्लॅन’मधून झालेले आहे. रॉय हे विज्ञाननिष्ठ होते. परंतु विज्ञाननिष्ठा म्हणजे सांकेतिक रीतीने केलेले औद्योगिकीकरण हे समीकरण त्यांना मान्य नव्हते. भारताच्या विकासात शेतीला अग्रक्रम दिला पाहिजे, हा विचार पीपल्स प्लॅनमध्ये आग्रहाने मांडला आहे. गांधीजींनी हाच विचार स्वातंत्र्यपूर्व कालात आणि नंतरही सतत मांडला होता. पीपल्स प्लॅनमध्ये रोजगाराची समस्या सोडविली पाहिजे हे सांगताना छोट्या उद्योगांना प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. गांधीजींनी खादी व ग्रामोद्योग यांच्याद्वारेच जास्तीतजास्त लोकांना शेतीला पूरक असे काम मिळू शकेल, हा विचार आयुष्यभर मांडला. म्हणजे पूर्वार्धात या दोन थोर नेत्यांचा दोन ध्रुव असा मी उल्लेख केला असला तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या विचारांची क्षितिजे एकमेकांना स्पर्श करू लागली होती असे आढळून येते.

गांधीजी हे राजकीय विचारांनी जवळजवळ अराज्यवादी (अनार्किस्ट) होते. ते ‘शासनसंस्था ही एक न टाळता येण्यासारखी दुष्ट संस्था आहे,’ असे म्हणत असत. त्यामुळेच सत्तास्पर्धेत गुंतून पडणारे राजकीय पक्ष हे समाजपरिवर्तन करू शकणार नाहीत असे त्यांना वाटत असे. म्हणूनच काँग्रेसने आपले रूपांतर लोकसेवक संघात करून भारतातील जीवनाचे संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नांचे साधन बनावे असा गांधीजींनी आग्रह धरला. मानवेंद्रनाथ रॉय यांचाही शासनसंस्थेवरील विश्वास कमी होत, जवळपास नष्ट झाला आणि म्हणून राजकीय पक्ष हे समाजपरिवर्तन करू शकणार नाहीत अशी त्यांची मनोमन खात्री पटली. आणि म्हणून रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र गांधीजींच्या लोकसेवक संघापेक्षा वेगळा असा विचार त्यांनी मांडला आहे. मानवेंद्रनाथ रॉय हे थोर ज्ञानोपासक होते. त्यांच्या बुद्धीची झेप विलक्षण होती. ते असामान्य प्रतिभेचे विचारवंत होते. त्यांना विचाराधिष्ठित कार्य हाच परिवर्तनाचा मार्ग आहे असे वाटत असे. त्या त-हेचे काम आपल्या सहकाऱ्यांनी करावे अशी रॉय यांची अपेक्षा होती. त्यांनी आपल्या सर्व विचारांची अत्यंत तर्कशुद्ध मांडणी करून 'नवमानवतावाद' या त्यांच्या विचारधारेचे समग्र दर्शन घडविले.

एम.एन.रॉय यांचे हे सिद्धांतवजा निरूपण वाचल्यावर बौद्धिक क्षेत्रातील अत्युच्च शिखराचे आपल्याला दर्शन होते. हा विचार केवळ मूठभरांपुरताच मर्यादित न राहता तो समाजजीवनात प्रसूत व्हावा, मात्र त्याच्यासाठी राजकीय पक्षांची अभिनिवेशपूर्ण प्रचारकी भूमिका न घेता तो विचार आत्मसात केलेल्या कार्यकर्त्यांच्या लहानलहान गटांनी समाजजीवनातील विविध क्षेत्रांत काम करून लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी रॉय यांची कल्पना होती. प्रत्यक्षात एका बाजूला राजकीय पक्षांचे पडघम चालू राहिल्यामुळे हा विचार त्या भाऊगर्दीत मूठभरांपुरताच मर्यादित राहिला. त्याचबरोबर या विचारांचे कृतीत रूपांतर कसे करावयाचे याबद्दल निर्णय न झाल्यामुळे तो मूठभर विचारशील कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित राहिला. हे कटू सत्य आहे. गांधीजी हे त्यांचे विचार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवीत असत.

एम.एन.रॉय यांनी केवळ बुद्धीचेच माध्यम वापरल्यामुळे त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत गेले नाहीत. असे असले तरी या विचारांचे महत्त्व कमी होत नाही. कारण विचारमंथनातूनच प्रगतीचा मार्ग दिसू शकतो. एम.एन.रॉय यांचा दृष्टिकोन भौतिकवादी होता, तर गांधीजी हे अध्यात्मवादी होते. असे असूनही या दोघांच्या विचारांमध्ये एका टप्प्यानंतर एक महत्त्वाचे साम्य आढळून येते . गांधीजी अध्यात्मवादी होते आणि परमेश्वरावर त्यांची श्रद्धा होती. परंतु वैयक्तिक मोक्षसाधनेत त्यांना मुळीच रस नव्हता. मृत्यूनंतर परलोकात काय मिळेल याचा त्यांनी कधी विचार केला नाही. ते इहवादीच होते. मानवामानवांतील संबंध प्रेमाचे असावेत आणि ते तसे स्नेहपूर्ण होण्यासाठी समताधिष्ठित समाजात सर्वांना‌ विकासाची संधी आणि न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका होती. या अर्थाने गांधीजींना मी इहवादी मानवहितपरायण नेते मानतो. त्यांनी अहिंसा ही व्यक्तीपुरती मर्यादित न ठेवता सत्याग्रहाच्या मार्गाने तिथे सामाजिक आचरण करण्याचा प्रयोग केला. या अर्थाने बौद्धधर्मीय वा जैनधर्मीयांच्या अहिंसेंपेक्षा गांधीजींच्या अहिंसेचे स्वरूप व्यापक होते. ते स्वतःला धर्मनिष्ठ म्हणवीत असताना धर्माचा विचार सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील नीती म्हणूनच करीत. या अर्थानेच मी गांधीजींना इहवादी मानतो. एम.एन.रॉय हे कम्यूनिस्ट असताना मटीरिअ‍ॅलिस्ट म्हणजे भौतिकवादी होते. परंतु त्यांचे उत्तरायुष्यातील विचार लिहिताना आणि त्यांच्या सर्व जीवनाचा विचार करताना ते कधीही भोगवादी वा चंगळवादी झाले नाहीत हे स्पष्टपणे कळून येते. मात्र ते आध्यात्मवादी कधीच नव्हते.

मानवी समाजाची उभारणी करताना न्याय व समता यांचा आग्रह रॉय यांनी सतत धरला. त्यांच्या उत्तरायुष्यातील विचारांमध्ये मानवावरील प्रेमाचा अंतःप्रवाह सतत झुळझुळ वाहताना दिसतो. ते कधीही रूक्ष झाले नाहीत. त्यांच्या सहानुभूतीची कक्षा विशाल होती. म्हणून रॉय यांना भौतिकवादी न म्हणता आपण मानवतावादी म्हणतो. ऐहिक जीवनातील समस्यांचा बुद्धिनिष्ठ रितीने विचार करणारे महान विचारवंत हेच रॉय यांचे यथार्थ वर्णन आहे. म. गांधी आणि मानवेंद्रनाथ हे दोन भिन्न मार्गांनी वाटचाल करणारे सत्यशोधक होते. उदात्त जीवनमूल्यांच्या संगमावर मानवतेचे मंगल मंदिर उभारण्यासाठी या दोन थोर नेत्यांनी आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे काम केले. म. गांधी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांची जीवने हे अक्षय्य प्रेरणेचे स्रोत आहेत.

Tags: मानवतावादी-कम्युनिस्ट एम.एन. रॉय इहवादी-अध्यात्मवादी म. गांधी थोर व्यक्तिमत्त्वे humanist-communist m. n. roy non-violent-spiritualist gandhi great personalities weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके