डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

15 ऑगस्ट 1955 ला सामुदायिक सत्याग्रह करण्याचा निर्णय गोवा विमोचन सहायक समितीने घेतला. मुंबईच्या तुकडीचे नेतृत्व मधु दंडवते यांच्याकडे होते. त्यांच्या समवेत बंडू मोरे, दिनकर साक्रीकर, प्रभाकर कुंटे, विनायक भावे आदी झुंजार सहकारीही होते. ही तुकडी बेळगावला येऊन पोहोचली आणि बेळगावहून सावंतवाडीस जाण्यास निघाली.

प्रा. मधु दंडवते यांनी 21 जानेवारीस सत्तरी ओलांडली. सध्या ते परिचित आहेत ते ज्येष्ठ समाजवादी नेते, सिद्धहस्त लेखक, उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ते आणि निष्कलंक चारित्र्याचे नेते म्हणून. हा गुणसमुच्चय त्यांच्या ठिकाणी आहेच, परंतु आम्हां जुन्या मित्रांच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे ते गोवा मुक्तिसंग्रामात आत्मसमर्पण भावनेने त्यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. 15 ऑगस्ट 1955 ला सामुदायिक सत्याग्रह करण्याचा निर्णय गोवा विमोचन सहायक समितीने घेतला. मुंबईच्या तुकडीचे नेतृत्व मधु दंडवते यांच्याकडे होते. त्यांच्या समवेत बंडू मोरे, दिनकर साक्रीकर, प्रभाकर कुंटे, विनायक भावे आदी झुंजार सहकारीही होते. ही तुकडी बेळगावला येऊन पोहोचली आणि बेळगावहून सावंतवाडीस जाण्यास निघाली. तेव्हा त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सत्याग्रहींना नेणाऱ्या वाहनांवर बंदी घातली. परंतु दंडवते आणि त्यांचे सहकारी यत्किंचितही डगमगले नाहीत. त्यांनी सावंतवाडीस पायी जाऊन नंतर सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. पंधरा ऑगस्टला पोर्तुगीजांनी सत्याग्रहींवर गोळीबार केला हिरवे गुरुजी , कर्नालसिंग, महांकाळ चौधरी आदी हुतात्मे झाले. भाई चितळे, वसंतराव ओक आदी जखमी झाले. सहोदरा देवी निर्भयपणे राष्ट्रध्वज येऊन पुढे सरसावली. सत्याग्रहीच्यावरील गोळीबारानंतर गोवा विमोचन सहायक समितीने सत्याग्रह मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु दंडवते हटून बसले. 'आम्ही पंधरा ऑगस्टलाच सत्याग्रह करणार होतो. आमचा सत्याग्रहाचा हक्क हिरावून घेऊ नका.' अखेर अपवाद म्हणून दंडवत्यांच्या तुकडीस परवानगी देण्यात आली आणि धुवाधार पावसात हे सत्याग्रही सावंतवाडीकडे निघाले. चिखल तुडवीत, पायावर चढणाऱ्य जळवांना झटकीत पावसाने गारठून जात असताना चहा पिऊन ऊब आणण्याचा प्रयत्न करीत दंडवते आणि त्यांचे सहकारी सत्तर मैल अंतर तोडून चौथ्या दिवशी सावंतवाडीस पोहोचले आणि बांदामार्गे गोव्याकडे निघाले. दंडवते यांचे नुकतेच लग्न झाले होते. सरहद्द ओलांडण्यापूर्वी प्रमिलाने त्यांना निरोप दिला त्या वेळी सर्वांचीच मने हेलावून गेली. गोव्यात सत्याग्रह करणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करणे होते. सुदैवाने गोळीबार झाला नाही. सत्याग्रहींना बेदम मारपीट करून पोर्तुगीज सरकारच्या शिपायांनी दंडवते आणि त्यांचे सहकारी यांना भारतीय हद्दीत ढकलून दिले. दंडवते परत आले त्या वेळी आम्हां मित्रांना काय वाटले ते मला शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही. या संदर्भात आणखीही एक आठवण आहे. दंडवते है सिद्धार्थ काॅलेजमध्ये फिजिक्सचे प्राध्यापक होते. सत्याग्रह करण्यासाठी त्यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला, तेव्हा त्या वेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तो स्वीकाराला नाही. ते म्हणाले, राजकीय काम करतानाच फिजिक्स उत्तम शिकविणाराही प्राध्यापक मला हवा आहे.. तू राजीनामा देण्याचे कारण नाही.

'दंडवते परत आले आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कामात हिरीरीने सामील झाले. ते समितीचे एक सचिव होते. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे होणाऱ्या सत्याग्रहाचे नियोजन, प्रचार मोहीम आणि अन्य जबाबदाऱ्या त्यांनी उत्तम सांभाळल्या. प्रतापगडावर पं. नेहरूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या समारंभाच्या वेळी निदर्शने करण्याच्या एस. एम. जोशींच्या निर्णयास त्यांनी पाठिंबा तर दिलाच आणि मुंबईची निदर्शकांची मोठी तुकडी घेऊन महाडमार्गे ते निघाले. एका बाजूस वाईजवळ पंडित नेहरू प्रतापगडाकडे जात असताना 'मुंबई बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा हजारो निदर्शकांनी दिल्या. तेथे एसेम, डांगे, प्रभूती सर्व नेते होते. दुसरीकडे महाड-प्रतापगड रस्त्यावर दंडवते यांच्या नेतृत्वाखाली हजारो निदर्शकांनी त्याच गगनभेदी घोषणा दिल्या, निदर्शन यशस्वी झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मधु दंडवते यांची संघटनाकुशलता, त्यांचा निःस्वार्थी स्वभाव आणि अपार कष्ट करण्याची त्यांची वृत्ती यांचा प्रत्यय लोकांना झाला. 1967 च्या निवडणुकीच्या वेळी प्रजासमाजवादी पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये नव्हता तरी देखील दंडवते यांना निवडणुकीत पाठिंबा द्यावा असे आचार्य अत्रे यांना वाटत होते. 1970 साली मुंबई पदवीघर मतदार संघातून दंडवते विधान परिषदेवर निवडून गेले. 1971 मध्ये बॅ. नाथ पै यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्या वेळी त्यांच्या जागी समाजवादी पक्षाने दंडवते यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. दंडवते हे मूळचे अहमदनगरचे. मुंबईत त्यांची अनेक वर्षे गेली, तरी कोकणाने त्यांना स्वीकारले आणि तेही कोकणशी एकरूप होऊन गेले. संसदेत निवडून गेल्यानंतर अल्प काळातच त्यांनी संसदपटू म्हणून आपले वैशिष्ट्य प्रस्थापित केले. आणीबाणीमध्ये एकोणीस महिने कारावास भोगून सुटल्यावर ते पुन्हा प्रचंड बहुमताने राजापूर मतदार संघातून निवडून आले आणि जनता पक्षाच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले. कोकण रेल्वे हे बॅ नाथ पै यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल दंडवते यांनी टाकले. रेल्वेच्या अखिल भारतीय संपात बडतर्फ झालेल्या हजारो कामगारांना कामावर घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परवाच मी त्यांच्या समवेत लोकलमधून प्रवास करीत असताना, एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांच्याजवळ आला आणि लवून नमस्कार करीत म्हणाला, 'सर, तुम्ही मला कॉलेजमध्ये शिकवलंय, आणि रेल्वेमधली माझी गेलेली नोकरी तुम्हीच मला परत मिळवून दिलीत. रेल्वेमंत्री म्हणून मधू दंडवते यांनी केलेले काम अविस्मरणीय होते. पुढे विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना ते अर्थमंत्री झाले. परंतु त्यांना अल्पकाळच ते काम करावयास मिळाले. संसदेत विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून काम करताना प्रा. दंडवतेंची कुशाग्र बुद्धिमत्ता, असामान्य स्मरणशक्ती, तरल विनोदबुद्धी  आणि हजरजबाबीपणा यांमुळे त्यांची भाषणे अत्यंत प्रभावी होत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकदा चुकीने दंडवत्यांच्या इंग्रजी ज्ञानाबाबत शेरा मारला, त्या वेळी दंडवते चटकन् म्हणाले, 'नामवंत प्राध्यापकांकडून मी इंग्रजी शिकलो आहे. हवाई सुंदरीकडून नाही. 1971 ते 1991 इतका दीर्घ काल दंडवते संसद सदस्य होते.

प्रांजळपणा हा मधु दंडवते यांचा मोठा गुण आहे. ते आपली चूक मोठ्या मनाने कबूल करतात. 1968 साली मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर केलेली युती ही राजकीय घोडचूक होती हे  त्यांनी मान्य केले. दंडवते यांची आणखी एक अपूर्णता म्हणजे त्यांचा काहीसा भाबडा वाटणारा आशावाद. दंडवते बुद्धिमान आहेत. राजकीय प्रवांंहाचे विश्लेषणही ते मार्मिकपणे करतात. असे असूनही ते जे अनुमान काढतात ते कठोर वास्तवाशी अनेकदा सुसंगत नसते त्यांचा हा आशावाद अनुयायांचा हुरूप टिकविण्यासाठी असतो की खरोखरच त्यांना तसे वाटते हे कोडे मला अद्याप उलगडलेले नाही.

मधु दंडवते हे उदार मनाचे आहेत. दारी आणि घरीही. काहीजण बाहेर तुकारामबुवा आणि घरात मुंबाजीबुवा असतात.' दंडवते मात्र सगळीकडे तुकारामासारखेच वागतात. प्रमिलाच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा त्यांना अभिमान आहे. मतभेद झाले तर ते तिच्या मताला मान देतात. दंडवते यांना सर्व पक्षांत मित्र आहेत, ते त्यांच्या उदारमनस्कतेमुळे. विसराळूपणा आणि खादाडपणा ही त्यांची दोन वैशिष्टये. याबद्दल त्यांची अनेकजण थट्टा करतात आणि तेही स्वत:बद्दल अनेक विनोद सांगतात. दंडवते आता लोकसभेत नाहीत याचे अनेकांना आम्हां मित्रांप्रमाणेच दुःख होते. दंडवते अलीकडे विपुल लेखन करतात. त्यांचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांवर उत्तम प्रभुत्व आहे. त्यामुळे सर्व भाषांतून त्यांचे लेख प्रसिद्ध होतात दंडवते यांचे विज्ञानविषयक वाचनही अदयावत असते. अवकाशविषयक आधुनिक संशोधनासंबंधीची त्यांची भाषणे अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांनाही फार आवडली. दंडवते यांच्या लोकसभेतील भाषणांचा संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.

मधु दंडवते हे सामाजिक व आर्थिक समतेच्या दिंडीतील आघाडीचे वारकरी. संतांची विठ्ठलावर जशी उत्कट भक्ती होती त्याचप्रमाणे सामाजिक न्याय व समता यांवर दंडवत्यांची उत्कट निष्ठा आहे ते सत्तेवर असोत, नसोत, लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि तेही जनसामान्यांवर तसेच प्रेम करतात. आमच्या या मित्राला दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो आणि प्रमिलासमवेत त्यांचा उत्साह असाच अक्षय राहो हीच शुभेच्छा!

Tags: राष्ट्र सेवा दल साधना g. प्र. प्रधान मधु दंडवते Socialism G. P. Pradhan Social Work Rashtra Seva Dal Madhu Dandavate #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके