डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजकारणातील भाषेचे वैभव आणि अलंकार

वर्षभरापूर्वी प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांच्याशी भाषा, साहित्य व संस्कृती या विषयांवर अनौपचारिक गप्पा चालल्या होत्या. तेव्हा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, ‘‘ग.प्र. प्रधानसरांचा ‘राजकारणी लोकांची भाषा’ हा एक अफलातून लेख ‘भाषा आणि जीवन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. तो आम्ही दहा वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या एस.वाय.बी.एस्सी.च्या व्यावहारिक  मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात लावला होता; आणि आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या साहित्यभूषण परीक्षेसाठीच्या पुस्तकातही घेतला आहे.’’ तेव्हा प्रस्तुत संपादकाचे कुतूहल बरेच जागृत झाले. कारण प्रधानसरांच्या कोणत्याही पुस्तकात तो लेख समाविष्ट नाही आणि त्यांच्याशी शेवटच्या सहा वर्षांत जवळून संबंध आला तेव्हाही त्यांच्याकडून त्या लेखाचा संदर्भ कधी ऐकला नव्हता. त्यामुळे तो लेख डॉ.धोंडगे यांच्याकडून मिळवून इथे प्रसिद्ध करीत आहोत.
- संपादक, साधना
 

प्रत्येक क्षेत्रातील भाषेची काही खास वैशिष्ट्ये असतात आणि त्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भाषेचा उपयोग कसा केला जातो, हे पाहणे मोठे उद्‌बोधक आहे! भाषा हे एक महत्त्वाचे साधन आहे आणि म्हणून साध्याच्या पूर्ततेसाठी राजकीय क्षेत्रात जाणते नेते भाषेचा उपयोग प्रभावीपणे करतात. राजकीय क्षेत्रातील ध्येयवादी नेत्यांना समाजाचे परिर्वतन घडवून आणायचे असते आणि त्या ध्येयाबद्दलच्या तळमळीतून त्यांची भाषा घडत असते. त्याचप्रमाणे नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचाही त्याच्या भाषेशी निकटचा संबंध असतो. 

लोकमान्य टिळकांना सरकारला खडे तात्त्विक बोल सुनवावयाचे असत. त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी ते सुस्पष्ट व आशयघन शैलीत लिहीत. सरकारवर घणाघाती हल्ला करताना ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे मथळे ते अग्रलेखांना देत. शिवराम महादेव परांजपे यांची शैली याहून अगदी वेगळी होती. तिच्यात वक्रोक्ती, उपरोध ही शस्त्रे वापरलेली असत. त्याचबरोबर त्यांच्या लेखात अनेकदा भाषेचा फुलोराही असे. महात्मा गांधींच्या इंग्रजी शैलीचे बायबलच्या शैलीशी साम्य होते. याचे कारण लोकांना सुलभतेने समजेल अशा रीतीने, नैतिक आशय असलेली राजकीय भूमिका मांडणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. 

राजकीय क्षेत्रात नेत्यांना सतत भाषणे करावी लागतात आणि वक्तृत्वाला महत्त्व असतेच; परंतु वक्तृत्वपूर्ण शैलीमुळे सभा अनेकदा जिंकल्या गेल्या, तरी लोकांच्या मनाची पकड घेऊन त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी नुसते वक्तृत्व पुरे पडत नाही. राजकारणातील कसोटीच्या क्षणी भाषण कसे केले जाते, यापेक्षा काय बोलले जाते व कोण बोलतो, याचेच महत्त्व अधिक असते. 

एस.एम.जोशी यांचे भाषण वक्तृत्वाच्या अलंकारांनी नटलेले नसते, आणि मोठे बांधेसूदही नसते. असे असूनही लोकांच्या मनावर त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडतो. याचे कारण त्यांचे शब्द हे सुस्पष्ट विचार आणि त्याहीपेक्षा त्यांच्या अंत:करणातील तळमळ यांचा आविष्कार करीत असतात. 

1942 मध्ये ‘चले जाव’ ठरावावर बोलताना गांधीजींनी केलेल्या भाषणात शब्दांची यत्किंचित आतषबाजी नव्हती, आणि तरीही हजारो लोकांच्या अंत:करणात बंडाची ज्वाला पेटविण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दांत होते. साने गुरुजींची भाषाशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच अविभाज्य घटक होती. त्या भाषेतील तीव्रता आणि आर्तता गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातूनच निर्माण होत असे. त्यांच्या शैलीचे अनुकरण करू पाहणाऱ्यांचे भाषण व लेखन हास्यास्पद आणि अनेकदा असह्यही वाटत असे. 

सेनापती बापट यांचा पोशाख साधा असे. शब्दही साधे असत. परंतु त्यांचे शब्द श्रोत्यांच्या मनाला भिडत. एकदा भाषण करण्याऐवजी ते स्वत:ची कविताच म्हणाले. त्या कवितेचे शब्दही साधेच होते. सेनापती म्हणाले,
    ‘‘आई स्वतंत्र नाही, आम्ही मुले कशाला?
    आईस सोडवाया येणार कोण बोला!’’
हे शब्द ऐकताना आपण स्वातंत्र्यलढ्यात गेलेच पाहिजे, असे मला उत्कटतेने वाटले. 

राजकारणात भावनेप्रमाणेच विचारही महत्त्वाचे असतात आणि वैचारिक भूमिका जाहीर सभांतून मांडण्यासाठी शैली अतिशय रेखीव असावी लागते. सध्याच्या पुढाऱ्यांपैकी नानासाहेब गोरे यांच्या मराठी शैलीचे सामर्थ्य आणि पालखीवाला यांच्या इंग्रजी शैलीचे सामर्थ्य प्रगल्भ व चोखंदळ श्रोत्यांनाही अंकित करून टाकणारे आहे. राजकारणात श्रोत्यांना जिंकायचे असते आणि म्हणून नेत्यांना भाषा हे शस्त्र लखलखीत ठेवावे लागते.

सत्तेचा संघर्ष हा राजकारणातील महत्त्वाचा भाग आहे. अशा सत्तासंघर्षात भाषा ही विविध तऱ्हेने वापरली जाते. जेथे संघर्ष समोरासमोर असतो, तेथे राजकीय नेते आपली शक्ती आक्रमक भाषा वापरून व्यक्त करतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे विरोधकांवर जेव्हा तुटून पडत असत, तेव्हा त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीचे स्वरूप धारण करीत असे. स्वातंत्र्यलढ्यात नाना पाटील यांची भाषणे खास ग्रामीण शैलीतील आणि विलक्षण त्वेषाने भरलेली असत. निवडणुकांच्या प्रचारसभांतून या आक्रमक भाषाशैलीचे अनेक बहारीचे नमुने आढळून येतात.

राजकीय डावपेचांची भाषा

चळवळीच्या व निवडणुकीच्या काळातील संघर्षापेक्षा शांततेच्या काळातील सत्तासंघर्षाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे असते आणि त्यामध्ये राजकीय डावपेचांना फार महत्त्वाचे स्थान असते. या डावपेचांना अनुरूप असलेल्या भाषेचे स्वरूपही डावपेचातून घडलेले असते. मुरब्बी राजकीय मुत्सद्दी स्वत:च्या मनाचा थांग लागणार नाही, अशा रीतीने भाषेचा कौशल्याने वापर करतात. 

राजकीय डावपेच खेळताना भाषा हे मनोगताच्या आविष्कारापेक्षा मनातील कपट दडविण्याचे साधन बनते. या संदर्भात एका विनोदी लेखकाने स्त्रियांची शब्द वापरण्याची रीत व राजकारण्यांची शब्द वापरण्याची रीत यांची मोठी मनोरंजक तुलना केलेली आहे. तो लेखक म्हणतो, ‘‘स्त्री ज्या वेळी ‘नाही’ म्हणते. त्या वेळी तिच्या मनात असते- ‘कदाचित’. ती ज्या वेळी ‘कदाचित’ म्हणते, त्या वेळी तिच्या मनात होकार असतो; आणि तिने सरळ होकार दिला, तर ती शालीन स्त्रीच नव्हे- असे म्हटले पाहिजे.’’ 

राजकारण्यांची रीत याच्या बरोबर उलट असते! राजकीय मुत्सद्दी ज्या वेळी ‘हो’ म्हणतो, त्या वेळी त्याच्या मनात असते ‘कदाचित’; तो ज्या वेळी ‘कदाचित’ म्हणतो, त्या वेळी त्याच्या मनात नकार असतो आणि त्याने जर नकार दिला तर तो मुत्सद्दीच नव्हे. स्त्री व राजकीय मुत्सद्दी यांच्यातील फरक या लेखकाने मांडला असला तरी त्यामधून स्त्री व मुत्सद्दी यांच्यातील महत्त्वाचे साम्यही लक्षात येते. ते म्हणजे दोघेही मनात जे आहे, ते दडवून त्याच्या उलट बोलत असतात. 

चिरस्मृत द. पां. खांबेटे यांनी लिहिलेल्या लेखात (भाषा आणि जीवन 2 : 4 दिवाळी 1984) स्त्रिया भाषेचा उपयोग कसा खोचकपणे, खवचटपणे आणि बोचरेपणाने करतात, हे अतिशय सुंदर रीतीने दाखवले आहे. राजकारणातील बनेल पुढारी आणि धूर्त मुत्सद्दी हे भाषेचा उपयोग कसा करीत असतात, हे पाहणेही मनोरंजक ठरेल.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज प्रत्येकास ‘परकलम’- असे होकारार्थी उत्तर देत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक हे विरोधकांनी कोणतीही सूचना मांडली, तरी आपण त्याला अनुकूल आहोत असे दाखवीत. ‘असं आहे म्हणता? मग बघितलंच पाहिजे नीट!’ असं म्हणून सफाईने ती सूचना उडवून लावीत. वेगवेगळ्या नेत्यांची ‘हो’ म्हणण्याची शैली वेगळी असते. काही जण तो वरकरणी उत्साहाने देतात. तर काही नेत्यांच्या शब्दांतील सावधपणा जाणत्या विरोधकांच्या चटकन लक्षात येतो.

राजकारणात वाटाघाटींचे गुऱ्हाळ नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर चालू असते. वाटाघाटींमध्ये तरबेज असणाऱ्या मुत्सद्यांची एक खास लकब असते! प्रथम ते फारसे काही बोलणारच नाहीत आणि मध्येच विषयांतर करून भलत्याच गोष्टींसंबंधी बोलू लागतात. वाटाघाटीतल्या भाषेत प्रतिपक्षाला दुखावणारा शब्द कधीच येत नाही! 

ज्या वेळी आघाडीचे राजकारण चालते, त्या वेळी ‘आपल्याला एकत्र आलेच पाहिजे’... ‘आम्ही तर ऐक्याला सदैव उत्सुक आहोत.’ अशी साखरपेरणी एका बाजूला करीत दुसरीकडे आडमुठी भूमिका सोडायची नसते आणि अत्यंत व्यावहारिक पातळीवर देवाणघेवाण चालू असताही ‘हा शेवटी तत्त्वाचा प्रश्न आहे’ असे मधूनच गंभीरपणे बोलायचे असते. 

राजकारणात वाटाघाटी करणारे मुत्सद्दी आणि लग्नात देण्याघेण्याचे ठरवणारी वरपक्षाची लुच्ची वडीलधारी मंडळी यांच्यात फार मोठे साम्य असते! वेगवेगळ्या पक्षांमध्ये आघाडीच्या बोलण्याच्या सुरुवातीस एखाद्या दुबळ्या पक्षाचा पुढारी सामर्थ्याचा आव आणीत, ‘आम्ही स्वबळावरच लढणार आहोत’- असे जेव्हा ठामपणे म्हणतो, त्या वेळी गडकऱ्यांच्या ‘ठकीच्या लग्ना’तील ‘या जन्मी आम्हांस कर्तव्य नाही’- असे म्हणणाऱ्या बापाची आठवण होते. 

राजकीय वाटाघाटीत सरळ अर्थ घेणाऱ्या पुढाऱ्यांची पुरी फटफजिती होते. बनेल पुढारी ज्या वेळी 25 जागा हव्यात असे म्हणतो, त्या वेळी त्या 25 चा अर्थ पाचही असू शकतो, हे न समजणारा पुढारी बरोबर चुकतो. 

वाटाघाटींमध्ये जोडायच्या वेळी तोडण्याचा आव आणणारे शब्द वापरायचे असतात आणि वाटाघाटी मांडायच्या वेळी ऐक्याचा उमाळा आला आहे, असे शब्द प्रतिपक्षावर फेकायचे असतात. वाटाघाटी फिसकटतात, त्या वेळी वृत्तपत्रांतही ‘वाटाघाटी स्नेहपूर्ण झाल्या व पुन्हा जमायचे ठरले’ असे वृत्त येते.

राजकीय पुढारी ज्याप्रमाणे बनवाबनवी करीत असतात, त्याचप्रमाणे मुरब्बी नोकरशहा हे नम्रतेचा आव आणीत मंत्र्यांवर मात करीत असतात. ‘येस, मिनिस्टर’- या टेलिव्हिजनवर झालेल्या मालिकेत अशा भाषेचे अनेक मार्मिक नमुने आढळून आले. 

विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या विविध खात्यांच्या सचिवांची तपासणी करीत असतात, त्या वेळी समितीचे सदस्य, विशेषत: विरोधी पक्षांचे आमदार सचिवांना ‘लपवाछपवी करून चालणार नाही’ असे खडसावतात आणि यावर सचिव ‘साहेब, आपल्याला हव्या त्या फायली आता आपल्यासमोर ठेवतो. आपल्यापासून आम्हांला काय दडवायचे आहे?’ असे कमालीच्या आर्जवी स्वरात धूर्तपणे म्हणत, प्रश्नाला बगल देतात.

राजकारण्यांच्या भाषेचे प्रादेशिक वळण

भाषावर प्रांतरचनेमुळे सर्व राज्यांच्या विधिमंडळांमध्ये प्रादेशिक भाषेतून काम चालते. त्यामुळे तेथील वादविवादात रोखठोकपणा व चैतन्य आलेले आहे. विशेषत: शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ग्रामीण भाषेचा अतिशय प्रभावी उपयोग करताना आढळून येतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा चालली असता, एका कल्याणकारी योजनेच्या खर्चात काटछाट करून दुसऱ्या कल्याणकारी योजनेवर शासन खर्च करते हे सांगताना एक आमदार म्हणाले, ‘‘चिम्याला नटवताना सोम्याला नागवण्याचा हा धंदा बंद करा!’’ दुसरे एक आमदार दुसऱ्या संदर्भात म्हणाले, ‘‘सरकारनं गरिबांच्या अंगावरी घोंगडी टाकली; पण ती इतकी अपुरी आहे, की डोके झाकू लागले की पाय उघडे पडतात आणि पाय झाकू लागताच डोके उघडे राहते!’’ तिसरे आमदार, सरकार भलतीकडे पैशांची उधळमाधळ करीत आहे, असे सांगताना म्हणाले- ‘‘रोग रेड्याला आणि औषध पखाल्याला- असे सरकारचे चालू आहे!’’ एकदा एका शेतकऱ्याच्या घरावर जप्ती नेण्यात आली आणि जप्तीच्या खर्चाचे पैसेही शेतकऱ्याकडून वसूल करण्यात आले. यावर संतापून बोलताना विरोधी पक्षाचे एक आमदार म्हणाले, ‘‘बकरं तर कापायचं आणि खाटकाची कापणावळ बकऱ्याकडून वसूल करायची- असा हा प्रकार आहे!’’ 

एका बाजूस प्रादेशिक भाषेचे हे वैभव प्रकट होत असले, तरी दुसरीकडे इंग्रजी वळणाचे काही शब्दप्रयोगही महाराष्ट्राच्या विधिमंडळात रूढ झाले आहेत. ‘माझं असं म्हणणं आहे’ असा मराठी वळणाचा शब्दप्रयोग करण्याऐवजी ‘मी सांगू इच्छितो’ हे ‘आय विश टु से’ या इंग्रजी वाक्याचे भाषांतर सर्रास वापरले जाते. 

प्रत्येक आमदाराच्या भाषेमध्ये तो ज्या वर्गातून आलेला असतो, त्याचे प्रतिबिंब पडते. शहरातील एक मध्यमवर्गीय आमदार अर्थव्यवस्था कुंठित झाली आहे, हे सांगताना- ‘‘आपल्या अर्थव्यवस्थेचे विमान रन-वेवरच फिरतेय. या सरकारच्या हयातीत टेक-ऑफ स्टेज येण्याची शक्यता दिसत नाही.’’ असे म्हणाले; तर हाच आशय व्यक्त करताना ग्रामीण भागातले दुसरे आमदार म्हणाले, ‘‘आपल्या अर्थसंकल्पाचा गाडा चिखलात रुतून पडला आहे आणि दिवसेंदिवस तो अधिकच खोलात चालला आहे!’’

जाहीर सभा आणि बंदिस्त सभागृहातील भाषा

राजकीय पुढाऱ्यांची जाहीर सभांतील भाषणे आणि बंदिस्त सभागृहातील भाषणे यांच्या शैलीत फार मोठे अंतर असते. बंदिस्त सभागृहात बोलताना मध्यमवर्गीय बुद्धिवादी पुढारी ‘मंत्र्यांनी अशी भाषा वापरणे इष्ट नाही’ असे मिळमिळीत उद्गार काढतो. तर  जाहीर सभेत खरा आक्रमक पुढारी ‘हा फडतूस मंत्री असं बोलताना शासन म्हणजे स्वत:च्या बापाची इस्टेट समजतो’, असा जबरदस्त तडाखा ठेवून देतो. 

व्यासपीठावरील भाषणात ग्रामीण भागातले काही इरसाल कार्यकर्ते बावळटपणाचा आव आणीत द्वयर्थी शब्द वापरून अश्लील आशय बरोबर प्रकट करतात. निवडणुकीच्या प्रत्येक सभेत असा एखादा वक्ता असतोच. तो स्थानिक लोकांना माहीत असलेल्या लफड्या-कुलंगड्यांचा सफाईने उल्लेख करतो. श्रोते त्याच्या इब्लिसपणावर खूश होतात व मनसोक्त हसून त्याला प्रतिसाद देतात. 

एका भित्र्या पुढाऱ्याला पैसे घेण्याचा मोह होई; पण लोकांच्या टीकेला तो फार घाबरत असे. त्या पुढाऱ्याचे वर्णन करताना ग्रामीण भागातले एक कार्यकर्ते सभेत म्हणाले, ‘‘हे माडी तर चढणार, पण तिथे पान खाऊनच परतणार आणि तेवढ्यानंदेखील गरमी होणार, अशी भीती वाटून तळमळत बसणार! असे हे नामर्द पुढारी.’’

साहित्यात ज्याप्रमाणे मोठ्या लेखकांचे अनुकरण छोटे लेखक करतात; तसेच राजकारणातही मुख्यमंत्र्यांच्या शैलीचे अनुकरण सत्ताधारी पक्षाचे बरेच आमदार करतात. यशवंतराव चव्हाणांप्रमाणे काँग्रेसमधील अनेक जण ‘पायजेल आहे’ हा शब्दप्रयोग करतात. तसेच वसंतराव नाईकांचे ‘आम्ही हे करून राहिलो आहोत’ हे वऱ्हाडी वळणाचे वाक्य कोकणातले आमदारही वापरीत असत.

राजकारणात फालतू माणसांना कटवणे आवश्यक असते आणि त्याकरिता त्याच्याकडे लक्षच नाही, असे दाखवीत दुसरेच काही बोलावयाचे असते. शेक्सपिअरच्या नाटकातील तिसऱ्या रिचर्डकडे त्याच्या सांगण्यावरून खून करणारा एक जण जहागीर मिळावी, अशी मागणी करतो; त्या वेळी रिचर्ड त्याच्याकडे न बघता ‘काय, किती वाजले? (व्हॉट ओ क्लॉक इज इट नाउ?)’ असा असंबद्ध प्रश्न विचारतो. नको असलेल्या माणसांना कटवण्यासाठी असे असंबद्ध प्रश्न विचारणे वा विधाने करणे हा राजकारणातील भाषेचा एक भाग असतो.

एके काळी राजकारणात पल्लेदार भाषणे केली जात. आता मात्र मोजके, पण स्पष्ट बोलणारा पुढारी लोकांना अधिक आवडतो. आधुनिक काळात जीवनाला जी गती आली आहे, तिच्यामुळे शब्दबंबाळापेक्षा रोखठोक सत्यकथन, विधानाला पुष्टी देणारी नेमकी आकडेवारी यांचे महत्त्व वाढले आहे. यामुळे राजकारणातील भाषेचे स्वरूप काहीसे रूक्ष होत आहे; पण तरीही राजकारणातील संघर्षात आक्रमक शैली आणि खोचक विनोद यांना स्थान आहेच. 

तसेच कसोटीच्या क्षणी ध्येयवादी नेत्यांच्या अंत:करणापासून आलेल्या आणि अंत:करणाला जाऊन भिडणाऱ्या शब्दांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. शैलीच्या मर्यादा ओलांडणारे असे शब्द हेच राजकारणातील भाषेचे वैभव आहे. त्याचबरोबर सत्तासंघर्षात वापरावयाचे घणाघाती शब्द आणि वाटाघाटीत बोलण्याची गुळगुळीत फसवी विधाने हेही राजकरणातील भाषेचे ठसठशीत अलंकार आहेत. 

Tags: प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ ग. प्र. प्रधान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके