'श्यामची आई' आणि 'श्याम’चे तीन खंड मिळून एक सलग ‘श्यामकथा’ तयार होते. या समग्र भानातूनच 'श्यामची आई' काय किंवा ‘श्याम’चे तीन खंड काय, यांचे अर्थपूर्ण आकलन होऊ शकते. श्यामकथेचा हा आकृतिबंध तत्कालीन ऐतिहासिक संदर्भात तर अपूर्व होता. एवढेच नव्हे तर साठोत्तरी कालखंडातील ‘बलुतं’सारख्या दलित स्वकथनांचे मूळ त्या आकृतिबंधात असल्याचे जाणवते. श्यामकथेची प्रेरकता व थोरवी या सलग कथनातून आलेल्या गुरुजींच्या सुमारे चोवीस वर्षांच्या आत्मदर्शनापुरतीच मर्यादित नाही, तर ती त्यांच्या उर्वरित, पण न लिहिलेल्या आयुष्याने खराखुरा श्याम जगून दाखविला, या वस्तुस्थितीच्या जाणिवेत आहे.
गुरुजींच्या जीवनकार्याच्या व वाङ्मयाच्या अभ्यासाचा, प्रस्तुततेचा व प्रेरकत्वाच्या नवा विचारव्यूह समाजापुढे ठेवता यावा या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजापुढे ठेवता यावा कल्पनेतून संपादनाची जबाबदारी मी स्वीकारली. जनता हेच मानवी कर्तृत्वाचे शेवटचे न्यायासन असते, हे डॉ. केतकरांचे म्हणणे योग्य आहे. त्या आधीचे न्यायासन म्हणून या विशेषांकाची योजना आहे, असे आम्ही मानतो. जनतापीठ व शारदापीठ या दोहोंकडून साने गुरुजींना त्यांच्या हयातीत व हयातीनंतरच्या अर्धशतकात योग्य न्याय मिळाला नाही, असे आम्हांस वाटते. साने गुरुजी नावाची एक वस्तुस्थिती तिच्या विशेषागांनी समजून घेतली व दिली, तर न्यायनिवाड्याची प्रक्रिया सुलभपणे गती घेईल व यासाठी जन्मशताब्दी ही महत्त्वाची संधी आहे, असेही आम्हांस वाटते. या विशेषांकाचा रोख या दिशेकडे आहे. त्या दिशेने प्रत्यक्षात हा अंक कितपत वाटचाल करतो आहे. हे अर्थातच वाचकांनी ठरवायचे आहे.
या विसाव्या शतकाच्या तीन चतुर्थांश कालखंडातील एक सांस्कृतिक प्रभाव-स्रोत म्हणजे साने गुरुजी. त्यामुळे गुरुजी-प्रभावीत वर्तुळात अनेक थोर नेते, कार्यकर्ते, संपादक स्वाभाविकपणेच समाविष्ट होतात. मात्र प्रस्तुत विशेषांक मुख्यतः प्रभाववर्णनाऐवजी प्रभावचिकित्सेवर भर देणारा असावा, ही भूमिका आहे. या दृष्टीने अनेक मान्यवर विचारवंत, लेखक, कवी, समीक्षक यांचे लेखन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपेक्षित प्रतिसाद समाधानकारक असला, तरी परिपूर्ण नाही, हे नमूद केले पाहिजे. मिळाल्या तेवढ्या स्नेहाची ही पणती लावून ठेवली आहे. या ज्योतीने ज्योती पेटत जाव्यात, पेटत जातील अशी अपेक्षा आहे. माता-मूल नात्याचा आदिबंध हा गुरुजींच्या जीवनाचा मूळ आकृतिबंध आहे. 'श्यामची आई' ही अक्षर निर्मिती याचेच अपत्य होय. विद्यमान काळातील नवे श्याम व त्यांच्या आया यांचे या संदर्भातील मनोगत जाणून घेण्याचाही प्रयत्न एका लेखनस्पर्धेद्वारा करण्यात आला. कालोचित अशा सद्य:कालीन विकल्पांची प्रश्नचिन्हे या स्पर्धालेखांतून उभी केलेली असली, तरी एकंदरीत 'श्यामची आई' ही मराठी समाजाच्या मातृस्थानीच आहे हे दिसून आले. पण म्हणूनच या साहित्यकृतीचे अर्थपूर्ण वाङ्मयीन, सांस्कृतिक विश्लेषण सखोलपणे करण्याची गरजही उघड झाली आहे.
'श्यामची आई' आणि 'श्याम’चे तीन खंड मिळून एक सलग ‘श्यामकथा’ तयार होते. या समग्र भानातूनच 'श्यामची आई' काय किंवा ‘श्याम’चे तीन खंड काय, यांचे अर्थपूर्ण आकलन होऊ शकते. श्यामकथेचा हा आकृतिबंध तत्कालीन ऐतिहासिक संदर्भात तर अपूर्व होता. एवढेच नव्हे तर साठोत्तरी कालखंडातील ‘बलुतं’सारख्या दलित स्वकथनांचे मूळ त्या आकृतिबंधात असल्याचे जाणवते. श्यामकथेची प्रेरकता व थोरवी या सलग कथनातून आलेल्या गुरुजींच्या सुमारे चोवीस वर्षांच्या आत्मदर्शनापुरतीच मर्यादित नाही, तर ती त्यांच्या उर्वरित, पण न लिहिलेल्या आयुष्याने खराखुरा श्याम जगून दाखविला, या वस्तुस्थितीच्या जाणिवेत आहे. गुरुजींच्या आयुष्यातील पूर्वार्धाने जे संस्कार श्यामरूपाने स्वीकारले, ते संस्कार त्यांच्या उत्तरार्धाने आचरून दाखविले म्हणून गुरुजींची श्यामकथा माता-मूल या संबंधातील सच्च्या व सफल आदानप्रदानाचा आकृतिबंध आहे. ते केवळ मातेचे महन्मंगल स्तोत्र नाही. तर ते माता-मुलाच्या संवादी स्वरांची एक मेलडी आहे. अनेकांनी मातास्तवन केले, पण श्यामची थोरवी व प्रेरकता त्यात नाही. याचे साधे कारण एवढेच की, त्यातून साने गुरुजींच्या श्यामसारखा एक पूर्णाकृती श्याम घडलेला दिसत नाही.
'भारतीय संस्कृती' हा गुरुजींचा दुसरा महत्त्वाचा आकृतिबंध. भारतीय संस्कृतीलाही गुरुजींनी एका विशिष्ट मातृरूपातच पाहिले. मातृहृदयाची मृदुता व कठोरता यांचा जो विवेक श्यामच्या आईत करतात; तसाच विवेक ते भारतीय संस्कृतीच्या संदर्भातही करतात. भारतीय व विशेषतः हिंदू संस्कृती, आधुनिकतेच्या विचारधारांनी गेल्या शतकापासूनच कमी-अधिक तीव्र आरोपांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्यात आली हे आपण जाणतोच व आपापल्या परीने समजावूनही घेत असतो. गुरुजींनी त्यांच्या मातृवाच्या दृष्टीने तिला या पिंजऱ्यातून बाहेर काढले. पण म्हणजे त्यांनी नेमके काय केले, हे विशद करण्याची जबाबदारी आपणांवर आहे. आधुनिक मराठीतील संस्कृतिविचाराच्या परंपरेत गुरुजींना क्वचितच योग्य त्या गांभीर्याने स्थान दिले जाते. एका जाणत्या, कर्मयोगी व देशीवादी मानसोत्तमाचा हा संस्कृतिविचार योग्य व चिकित्सक मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत आहे.
गुरुजींचे वाङ्मय व वाङ्मयविचार यांना साठोत्तरी कालखंडात विस्तृत झालेल्या मराठी वाङ्मयीन संस्कृतीत खूपच अभ्यसनीयता, प्रस्तुतता व प्रेरकता आहे, हे सांगण्याची गरज नाही. मात्र याची मांडणी व्यवस्थितपणे होणे अगत्याचे आहे. बहुजनवादी, स्त्रीवादी देशीवादी, नवनैतिकतावादी अशा नव्या प्रभावी प्रणालींना पूर्वाधार म्हणून गुरुजींचे वाङ्मय मोलाचे ठरणार आहे. या विशेषांकातील काही लेखांतून हे स्पष्ट होईल, याची खात्री वाटते. या विशेषांकाच्या रूपाने वा आधाराने वा निमित्ताने गुरुजींची एखादी नवीन प्रतिमा रूपास येईल काय किंवा आणता येईल काय, अशी एक धडपड नकळतपणे मनोमन चालू होती. प्रेमधर्माचा पुरस्कर्ता, मातृधर्माचा प्रेषित, अश्रुनारायणाचा समर्थक, फुलामुलांचा सवंगडी, आत्मशुद्धीचा साधक, दुःखितांचा कैवारी, भावसंस्कृतीचा उद्गाता, महापुरुषांचा पाईक, कुमारांचा गांधी, मनस्वी कर्मयोगी, मराठी भाषासाहित्याचा अभिमानी, आंतरभारतीचा द्रष्टा, भारतीय संस्कृतीचा भाष्यकार, मृत्युदेवतेचा मित्र इ.इ. गुरुजींच्या या कितीतरी प्रतिमा डोळ्यांपुढून सरसर सरकत जातात आणि तरीही या सगळ्या प्रतिमांची प्रतिमा साकारतच नाही. तशी ती साकारली जाणे वा साकार करणे हे या अंकामागील एक सुप्त प्रयोजन आहेच. गुरुजींच्या धक्कादायक प्राणार्पणाने त्यांच्या अवघ्या अस्तित्वालाच एका वेगळ्या शोकात्मिकेचा आकार लाभला. मराठी प्रतिभावंतांनी हाही आकृतिबंध उपेक्षित ठेवला. गुरुजींच्या संपण्यामध्ये बरेच काही मोलाचे संपून गेले. त्या हरपलेल्या मूल्याचे सर्जनशील आत्मभान इथे अंकुरत नाही. विदेशी शोकात्मिकेवर आपले केवढे प्रेम! मात्र देशी शोकात्मिकेबद्दल आपली केवढी बधिरता? या बधिरतेचे संसूचनही इथे अभिप्रेत आहे.
या विशेषांकाने कोणत्या देवाच्या आळंदीकडे जाण्याचे प्रस्थान ठेवले होते, ते कसेबसे सांगण्याचा हा प्रयत्न! या प्रयत्नात लेखनरूपाने साहाय्य करणाऱ्या सर्वच लेखकांना मी साधनातर्फे व व्यक्तिशः धन्यवाद देतो. माझे काम हे लेखक व वाचक यांची गाठ घालून देणे एवढेच मामुली आहे. या अंकासाठी साधनाचे संपादक मित्रवर्य नरेंद्र दाभोलकर यांनी उपक्रमशीलता दाखवून सर्वतोपरी परिश्रम घेतले. त्यांचे ऋण मान्य करतो. आदरणीय प्रधान सरांनी या अंकाबाबत प्रथमपासून खूपच मार्गदर्शन केले. या अंकातील चांगलेपणाचे सर्व श्रेय लेखक व हे दोघे मान्यवर यांनाच आहे. उणिवा व दोष माझे! या विशेषांकाचे मन गुंतवून ठेवणारे मुखपृष्ठ, आखणी व सजावट यांचे श्रेय शेखर गोडबोले व राजू देशपांडे यांना आहे. त्यांनाही धन्यवाद. या विशेषांकाच्या निमित्ताने पूज्य गुरुजींना मनःपूर्वक अभिवादन करून थांबतो.
Tags: मनोगत intentअतिथी संपादक guest editor weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या