डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बांगलादेश मुक्तिसंग्राम झाला त्या युद्धभूमीवर

25 मार्चपासून आजपर्यंत बांगला देशात काय घडले हे मला जाणून घ्यावयाचे होते. 1947 मध्ये धर्मवेडाने घातलेले थैमान आणि नोआखली, राजशाही इत्यादी ठिकाणी झालेल्या कत्तली मला आठवत होत्या. दोन तपांच्या काळात लोकांच्या मनांत ‘का’ व ‘कसा’ फरक पडला हे समजण्याची मला उत्सुकता होती. भारतापासून फुटून निघण्यासाठी मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली लढायला सिद्ध झालेली जनता 24 वर्षांनी लष्करी राजवटीच्या विरोधी प्रचंड चळवळ उभारते आणि भारताचे साह्य घेऊन पाकिस्तानपासून फुटून स्वतंत्र बांगलादेशचा झेंडा फडकवते, ही एक अपूर्व घटना होती. हे घडले कसे, हे युद्धाच्या काळात समजणे शक्य नव्हते. म्हणूनच युद्ध संपल्यावर केवळ 12-13 दिवसांनी मी चाललो होतो. काय पाहायला मिळेल, कोण भेटेल, हे अनिश्चित होते. 

प्रयाण

बारासात, दत्तमुकुठ, हावडा... अशी गावे मागे टाकीत आमची मोटर बोनगावच्या दिशेने धावत होती. वाटेत तीन जागी शरणार्थीच्या वसाहती लागल्या. बंगालीत निर्वासित हा शब्द ‘हद्दपार’ या अर्थाने वापरतात आणि आपत्तीमुळे घरदार सोडून आश्रयाला आलेल्यांना ‘शरणार्थी’ म्हणतात. उद्‌ध्वस्त जीवनाचे हे दृश्य मला अपरिचित नव्हते. दीनवाण्या चेहऱ्याने फिरणारी निस्तेज माणसे, कशासाठी तरी लागलेल्या लांबच लांब रांगा, उसने अवसान तोंडावर आणून काहीतरी धडपड करणारे कार्यकर्ते, त्रासलेले, वैतागलेले सरकारी अधिकारी, जागोजाग पसरलेली घाण, आभाळ फाटल्यावरही त्याला ठिगळ लावण्याचा एक प्रयत्न म्हणून आसऱ्यासाठी उभारलेले मांडव आणि तंबू- हे सारे पाहताना मला गेल्या मार्चपासून बांगला देशात घडलेल्या घटना आठवत होत्या.

लष्करी राजवटीच्या वरवंट्याखाली लक्षावधी लोक चिरडले गेले होते आणि सुमारे एक कोटी नागरिक शरणार्थी म्हणून भारतात आले होते. आसाम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल- मुख्यत: या राज्यांतून या शरणार्थीना आसरा देण्यात आला होता. हुकूमशहाने मारले होते, पळताना पावसाने झोडपले होते, आणि आता थंडीचा भयाण कडाका सुरू झाला होता... शरणार्थी आजपर्यंत आला दिवस कसा तरी ढकलत होते. भविष्यात काय लिहिले आहे, याची अंधुकही कल्पना त्यांना कुणाला नव्हती. भविष्याचा विचार करण्याइतकी ताकदही या दुर्दैवी जीवांत उरली नव्हती. ह्यांचे काही आप्त-स्वकीय मारले गेले होते. काही मागे राहिले होते. त्यांची वार्तादेखील यांना कळत नव्हती. हे सर्व कमी म्हणून की काय काही आप्त तर येथे आल्यावर कसल्या तरी रोगाला बळी पडले होते आणि आता जो तो माणूस केवळ जीव जगवण्याची केविलवाणी धडपड करत होता.

‘तुम्हाला परत घरी जाता येईल’- असे आश्वासन अनेक दिवस अनेक पुढारी देत होते; पण शरणार्थीच्या त्या जगात त्या शब्दांना अर्थ उरलेला नव्हता...

आणि 3 डिसेंबर 1971 रोजी युद्ध सुरू झाले. विमाने घरघरत होती, रणगाडे रस्त्यावरून सुसाट वेगाने निघाले होते. भारतीय सेनेच्या त्या जबरदस्त हालचालींमुळे अनेक शरणार्थीच्या मनात नवी आशा पल्लवित झाली. 16 डिसेंबरला पाकसेना शरण आली. भारताच्या विजयाच्या तुताऱ्यांनी आकाश निनादून गेले. ज्यांनी आपल्याला चिरडले, देशोधडीस लावले त्यांच्या पराभवाच्या वार्तेने शरणार्थीच्या करपलेल्या मनालाही टवटवी येऊ लागली आणि पुन्हा त्यांना ‘आपले गाव’, ‘आपले घर’ डोळ्यांसमोर दिसू लागले. आता एकेक दिवसही जड वाटू लागला होता. नऊ महिन्यांत दैवगतीचा एक फेरा संपला होता आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होत होते.

माना कॅम्पमधील काही शरणार्थी रायपूरला गाडीत मला भेटले होते, त्याची मला आठवण झाली. ढाक्क्यात जर्दा-सुपारीचे दुकान असलेला विरेंद्रकुमार खूप मोकळेपणाने बोलला होता. तो मूळचा नोआखली जिल्ह्यात राहणारा. 1947 च्या कत्तलीत त्याचा बाप मारला गेला होता, तरीही हे कुटुंब तेथेच राहिले होते. आपली कर्मकहाणी सांगितल्यावर शेवटी तो म्हणाला, ‘बांगला मुसलमान भालो!’ (पण बंगाली मुसलमान चांगले आहेत.) विरेंद्रकुमारनेच काही जणांची माहिती सांगितली. खुलना जिल्ह्यातली कालिदासी राय खाली मान घालून बसली होती. तिचा नवरा माना कॅम्पमध्ये मेला होता आणि चार मुलांना घेऊन तिला पुन्हा संसार करायचा होता. मोठा 18-19 वर्षांचा मुलगा हाच तिचा आधार होता. वीरेन्द्रकुमारमार्फत मी तिला विचारले, ‘पुढं कसं काय  बघायचं, मुसलमानांचा काही भरोसा नाही’, खिन्नपणे ती म्हणाली. थोड्या वेळाने सुकुमार राय हा सुशिक्षित तरुण भेटला. तो म्हणाला, ‘तीन महिने मुक्तिवाहिनीत काम केलं, पण पुढं मला झेपेना. म्हणून भारतात पळालो!’

त्याची सरस्वती नावाची इंटर सायन्सच्या वर्गात असलेली बहीण बेपत्ता होती. मुक्तिवाहिनीत काम करणारे त्याचे बरेच मुसलमान मित्र मारले गेले होते. मी त्याला विचारले, ‘परत गेल्यावर हिंदू सुरक्षित राहतील का?’  ‘अवामी लीगचं राज्य आलं तर आम्हाला भीती नाही, पण जमाते इस्लामवर मात्र बंदी घातली पाहिजे.’ तो म्हणाला.

त्याच्यानंतर भेटला तो बाबुल बैरागी. हा फरिदपूरचा मुजिबुर रहमान यांच्या गावचा. मी ढाक्क्याला जाणार, हे त्याला सांगितल्यावर एकदम उत्साहाने उठून त्याने मला जवळजवळ मिठीच मारली. ढाक्यात दूध, बटाटे, कोबी स्वस्त आहेत,  तो सांगू लागला. तो माझ्याशी बोलत होता, पण त्याला त्याचे शेत डोळ्यांसमोर दिसत होते.

माझे विचारचक्र एकदम थांबले. कारण बोनगावची हद्द संपल्यावर चेकपोस्टजवळ आमची मोटर थांबली होती. भारतीय अधिकारी आमचे परवाने तपासत होते. शिरुभाऊ लिमये, देवदत्त दाभोलकर, दत्तोबा जगताप आणि मी असे चौघे भारतीय होतो आणि आमच्या मोटारीत मकसूद अहमद मुजुमदार या मुक्तिवाहिनीत काम करणाऱ्या बांगला देशातील विद्यार्थ्यालाही आम्ही घेतले होते. ढाक्क्याच्या जगन्नाथ कॉलेजमध्ये बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षात शिकणारा हा विद्यार्थी राजकीय दृष्ट्या चांगलाच जागृत होता. गेले कित्येक महिने मुक्तिवाहिनीत काम करत असताना त्याला घरची काहीच हकीकत कळली नव्हती. नोआखली जिल्ह्यात फेणी या गावात त्याचे घर होते. आपला भाऊ भेटेल, या आशेने त्याने कलकत्त्यातून आमच्याबरोबर निघताना त्या भावासाठी नवे कपडे विकत घेतले होते. तो फारसा बोलत नव्हता. कारण त्याच्या मनात खूप कालवाकालव चालली होती. त्याला त्याचा भाऊ भेटला नाही तर त्याचे मन कसे दुभंगून जाईल, या कल्पनेने माझेही मन क्षुब्ध झाले होते. दोन वेळा आमचे परवाने तपासले गेले आणि 29 डिसेंबरला दुपारी बरोबर 3 वाजून 10 मिनिटांनी आम्ही भारतीय सरहद्द ओलांडून बेनापूरजवळ बांगला देशामध्ये प्रवेश केला.

25 मार्चपासून आजपर्यंत बांगला देशात काय घडले हे मला जाणून घ्यावयाचे होते. 1947 मध्ये धर्मवेडाने घातलेले थैमान आणि नोआखली, राजशाही इत्यादी ठिकाणी झालेल्या कत्तली मला आठवत होत्या. दोन तपांच्या काळात लोकांच्या मनांत ‘का’ व ‘कसा’ फरक पडला हे समजण्याची मला उत्सुकता होती. भारतापासून फुटून निघण्यासाठी मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली लढायला सिद्ध झालेली जनता 24 वर्षांनी लष्करी राजवटीच्या विरोधी प्रचंड चळवळ उभारते आणि भारताचे साह्य घेऊन पाकिस्तानपासून फुटून स्वतंत्र बांगला देशचा झेंडा फडकवते, ही एक अपूर्व घटना होती. हे घडले कसे, हे युद्धाच्या काळात समजणे शक्य नव्हते. म्हणूनच युद्ध संपल्यावर केवळ 12-13 दिवसांनी मी चाललो होतो. काय पाहायला मिळेल, कोण भेटेल, हे अनिश्चित होते. मोठ्या पुढाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात मला फारसा रस नव्हता. बड्या लष्करी अधिकाऱ्यांकडून लप्करी डावपेच समजून घ्यावयाचे नव्हते. सर्वसामान्य माणसांच्या मनांत मला डोकावायचे होते.

मनासारखे फिरायला मिळावे म्हणून आम्ही स्वतंत्र छोटी मोटर कलकत्याहून भाड्याने घेऊन निघालो होतो. माझ्या मनात उत्कंठा ओसंडून चालली होती. बांगला देशामधील पाण्याच्या विपुलतेबद्दल ऐकले होते. आता आम्ही चाललेल्या रस्त्याला दोन्ही बाजूला असलेल्या कालव्यांतून पाणी होते. लहान मुलेही अनेक ठिकाणी मासे पकडत होती. डिसेंबर महिना असल्याने वाऱ्यावर डोलणारी पिके दिसणे शक्य नव्हते. पण तरीही सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि नारळी-पोफळींची झाडे नजरेला सुखावत होती. वाटेत एकसारख्या नद्या लागल्या.

नावारून गाव गेले आणि वेत्रवती नदी लागली. वेतासारखीच ही नदी लवली होती आणि तिच्यावर एके ठिकाणी वाकणावर नव्याने बांधलेला तात्पुरता पूल होता. तेथे उभ्या असलेल्या भारतीय जवानांकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातला एकजण मला म्हणाला, ‘पाकिस्तानी सेनेनं शरण येण्यापूर्वी इथला पूल उडवला होता; पण आम्ही त्या जागी एका दिवसात नवा पूल बांधला!’
थोडे पुढे गेल्यावर चिगरकासा गावाजवळ दोन मोठे पूल उडवले होते, त्यामुळे आडवळण घेऊन आमची मोटर थांबली. येथे महाराष्ट्रातले सैनिक भेटले. काळे-सावळे, मध्यम बांध्याचे हे कणखर मराठे वीर इतक्या दूरदेशी अचानक भेटल्याने मला अतिशय आनंद झाला. पाथर्डीचा नवनाथ शेटे, शिरूर तालुक्यातला पोपट ढोगले, कोल्हापूरचा नाईक, मसूरचा घाटगे, बावधनचा पिसाळ- सारेजण उत्साहाने बोलत होते. 67 फिल्ड रेजिमेंटमधील या वीरांनी पाकिस्तानी लष्कराशी दोन हात केले होते. त्यांचे काही सहकारी मारले गेले होते. खुलन्याचे उपनगर दौलतपूर येथे झालेल्या हातघाईच्या लढाईत पोपट ढोगले नगरच्या कॅप्टन कुलकर्णीच्या बरोबर होता. तो सांगत होता,  ‘कुलकर्णीसाहेब जोशात पुढं जात होते आणि त्याच वेळी त्यांच्या पोटाला गोळी लागली. ते खाली कोसळले आणि लागलीच मरण पावले.’

माझ्या डोळ्यांसमोर कॅप्टन कुलकर्णीचा वर्तमान-पत्रातला फोटो उभा राहिला. आमच्या मधु दंडवतेंचे ते मेव्हणे. काही दिवसांपूर्वीच घरी लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले होते, ‘इथं लढाई जोरात सुरू आहे, मी घरी परत येऊ शकेन असं वाटत नाही’ आणि तेच खरे झाले होते. काहीशा विषण्ण मनाने मी पोपट ढोगलेचा निरोप घेतला.

अभयनगरहून आम्ही नोआपारा या गावी आलो. तेथे अवामी लीगच्या कचेरीची पाटी पाहून आम्ही थांबलो. लोक चटकन आमच्याभोवती जमले. बहुतेक मुसलमान वस्ती असलेल्या या गावात जवळजवळ तीनशे लोक मारले गेले होते. पाक सैनिकांनी खूप लुटालूट केली होती. आम्ही जेथे थांबलो होतो, ते होते एक औषधाचे दुकान. त्या दुकानचा मालक म्हणाला, ‘हेही दुकान लुटलं होतं. पुन्हा कशीबशी सुरुवात करत आहे.’

लोकांना खूप सांगायचे होते. त्यांच्या दुःखांची कहाणी कोणी ऐकलीच नव्हती. त्यांची भाषा बंगाली- आम्हाला पूर्णपणे कळत नव्हती. म्हणून महमद इशाक मोडक्या-तोडक्या हिंदीत काही सांगत होता. पण तो सांगत आहे ते अपुरे वाटले की कोणी तरी भराभरा बंगाली बोलू लागे. आम्ही त्याला थांबवत नव्हतो. कारण त्याचे शब्द समजले नाही तरी त्याच्या हृदयाचे कढ आम्हाला समजत होते. थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो.

पाच वाजताच सूर्य मावळताना दिसला तेव्हा दाभोलकर म्हणाले, ‘पाकिस्तानचा सूर्यास्त आपण पाहिला!’

खुलना जेसोर -

रात्री साडेसात वाजता खुलन्याच्या मुक्तिवाहिनीच्या कचेरीत जाऊन पोहोचलो. ही कचेरी तेथील आझमगढ कॉमर्स कॉलेजमध्ये होती. दारावर पहारा करणाऱ्या बंदूकधारी तरुण सैनिकाने आम्हांला अडवले आणि आमच्या बरोबर असलेले ओळखपत्र पाहिले. थोड्या वेळाने आतून निरोप आल्यावरच त्या सैनिकाने मला आत सोडले. मी त्याची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला,
‘माझं नाव सुरेश भट्टाचार्य. मी दौलतपूरला कॉमर्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकतो. मी मुक्तिवाहिनीचा सैनिक आहे.’ या काळ्या-सावळ्या शेलाट्या मुलाची निर्भयता पाहून मला कौतुक वाटले.

मी आत गेलो तेव्हा कचेरी प्रमुखाच्या भोवती पाच-सातजण बसले होते. अनेक तरुण माणसांची धावपळ चालली होती. चार-पाच जणांजवळ बंदुका होत्या. वेगवेगळ्या तऱ्हेची कामे चालली होती, पण नेमके काय चालले आहे, ते समजत नव्हते. तरुण मुलांचा उत्साह ओसंडून चालला होता. नवा आत्मविश्वास त्यांना गवसला होता. ‘आम्ही काही तरी केले आणि अद्यापही खूप काही करायचे आहे’, हे त्यांच्या भाषणातून कळत होते. एकाच वेळी राजकीय पक्षांच्या कचेरीत आढळून येणारी धावपळ आणि अधिकारी आल्याबरोबर उठून लष्करी पद्धतीने त्याला सलाम करणे हे चालू होते.

खुलन्याच्या कचेरीतील सारी मुले तरुण होती. त्यांनी भूमिगत चळवळीत कामे केलेली होती. कोणी प्रत्यक्ष शस्त्र घेऊन पाक सेनेबरोबर सामना दिलेला होता. कोणी भारतीय सेनेला माहिती पुरवली होती. कोणी दारूगोळा एका ठिकाणाहून दुसरीकडे नेला होता. या गटातील काही उमदे तरुण मारले गेले होते. काहीजण पाक सेनेच्या हातात सापडल्यावर त्यांचा अनन्वित झालेला होता. बांगला देश स्वतंत्र झाल्याने या सर्व तरुण मुलांना अतिशय आनंद झाला होता. पण ज्या पाक सेनेने आणि त्यांच्या हस्तकांनी बंगाली जनतेला चिरडून टाकण्यासाठी अनन्वित अत्याचार केले त्यांना शासन करण्यासाठी या मुक्तिसैनिकांचे हात शिवशिवत होते.

या सैनिकांत अझीझ अहमद, सुरेश भट्टाचार्यच्याबरोबर काम करत होता. देशभक्तीने पेटलेल्या या मुलांच्या अंतःकरणात धर्मभेदाला स्थान नव्हते. शस्त्राच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला होता आणि तरुण वयामुळे हे सामर्थ्य संयमाने वापरले पाहिजे, हे समजत नव्हते. उत्साह शिगेला पोहोचला होता आणि ह्या नव्या शक्तीला कोणत्या कामात गुंतवायचे, हा प्रश्न नेत्यांसमोर हळूहळू उभा राहात होता. युद्ध संपले होते तरी या तरुण मुलांची मने त्या वातावरणातच रेंगाळत होती. एखादे लहानसे काम सांगितले की ते करायला चार पाचजण पुढे सरसावत होते. कोणी भूमिगत नेता कोठे जायचा असला की त्याच्यासाठी कोठेही, कितीही वेळ ताटकळत उभे राहायला हे तरुण तयार होते. गस्त घालण्याची आवश्यकता नसूनही गस्त चालू होती. येथे विफलतेला स्थान नव्हते. कठोर वास्तव अनुभवल्यामुळे या मनांना धार आली होती. ही मने स्वप्नाळू नव्हती, पण तारुण्यसुलभ प्रवृत्तीमुळे भविष्यकाळातही काही रोमहर्षक घडावे असे त्यांना वाटत होते. या नवजागृत शक्तीचे आव्हान स्वीकारताना बांगला देशच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. आमची राहण्याची सोय करण्यासाठी या मुक्ती सैनिकांपैकी दोघे-तिघेजण आमच्याबरोबर मासळी निर्यात करणाऱ्या एका कंपनीच्या कचेरीत आले.

तेथील इंजिनियरशी बोलताना आमचा तरुण मित्र हुकमतीच्या स्वरातच बोलत होता. मी थोड्या समजावणीच्या सुरात बोललो. पण त्याचा सूर चढतच होता. ‘आम्ही देशासाठी काम केलं. आमचे मित्र आले असताना त्यांची सोय झालीच पाहिजे’, असा हक्क तो तरुण मुक्तिसैनिक बजावू पाहात होता. 1944-45 मध्ये कासेगाव-इस्लामपूर- चाळवे- चिकुरडे या भागात मी फिरत असताना अशीच रंगेल तरुण मुले मला भेटली होती; त्यांची मला आठवण झाली. आम्ही ज्या ऑफिसमध्ये होतो तेथील इंजिनियरला ही अरेरावी वाटत होती, पण नाराजीने का होईना त्याने आम्हांला झोपायला जागा दिली.

नंतर आम्ही गप्पा मारायला बोलावल्यावर मात्र तो इंजिनियर आणि त्या छोट्याशा फॅक्टरीचा मॅनेजर आमच्याशी खूप वेळ बोलत बसले. त्या फॅक्टरीचे नाव होते, ‘सीझनल फॅक्टरी फिश एक्स्पोर्टस्‌ लिमिटेड’ तेथून बेडूक, कासव व अन्य तऱ्हेची मासळी लंडनला निर्यात केली जात असे. फॅक्टरीचा मालक कराचीलाच होता. इंजिनियर टफझल हुसेन व मॅनेजर अमिनुल हक्क हे दोघेही पूर्वी पाकिस्तान एअर फोर्समध्ये होते. हे दोघेजण सर्वसामान्य बंगाली माणसाप्रमाणेच चणीने लहान होते. त्यांनी धार्मिक मुसलमान घालतात तशी पांढरी टोपी घातली होती. टफझल हुसेन हा जरा आतल्या गाठीचा, पण हुशार होता. त्याने अवामी लीगचा थोडा इतिहास सांगितला व तो म्हणाला, ‘‘बांगला देशमधील सर्वसामान्य माणूस हिंदूंचा द्वेष करत नाही. इथल्या राजकीय चळवळीने धर्मवेड वाढवले नाही, पण पश्चिम पाकिस्तानातील राज्यकर्त्यांनी ‘फोडा आणि झोडा’ हे धोरण अवलंबून हिंदूंच्या विरोधी भावना चेतवण्याचा प्रयत्न केला. 1954 च्या अवामी लीगच्या मंत्रिमंडळातही हिंदू मंत्री होते, परंतु अयूबखानांच्या राजवटीत बिहारी मुसलमानांचं फार प्रस्थ माजलं. बिहारमधून शरणार्थी म्हणून पाकिस्तानात आलेले मुसलमान कट्टर हिंदू विरोधी आहेत. आम्हा बंगाली लोकांबद्दलही त्यांच्या मनात तिटकाऱ्याची भावना आहे. पंजाबी व बिहारी मुसलमानांनी आमच्यावर उर्दू लादण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तो यशस्वी होऊ दिला नाही. सैन्यात, हवाई दलातही आम्हा बंगाली लोकांना योग्य ते प्रमोशन मिळालं नाही. एअर फोर्समधील मेकॅनिकल इंजिनियरची नोकरी आपण का सोडली, हे त्याने अशा सूचकतेने सांगितले.’

फॅक्टरी मॅनेजर अमीनुल हक्क म्हणाला, ‘लष्करी राजवटीनं आम्हांला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून आमची चळवळ फोफावत गेली आणि हालअपेष्टा सोसल्यामुळेच मुजीबना पुढारीपण मिळालं.’ हक्क पुढे म्हणाला, ‘आयूबनं आगरताळा कटाचा आरोप ठेवून मुजीबना तुरुंगात टाकलं आणि त्यामुळं ते अवामी लीगचे पुढारी झाले. याह्याखाननं मुजीबना तुरुंगात टाकलं आणि ते राष्ट्रपिता झाले.’ या दोघाही इंजिनियरांना आम्ही मुसलमान समाजात सुधारणा होण्यासंबंधी प्रश्न विचारले आणि हमीद दलवार्इंच्या चळवळीची माहिती सांगितली. या विषयावर बोलताना टफजल हुसेन म्हणाला, ‘प्रत्येक माणसाला दोन तऱ्हेची कर्तव्ये करायची असतात. एक- परमेश्वराबद्दलचं कर्तव्य आणि दुसरं- समाजाबद्दलचं कर्तव्य. सामाजिक कर्तव्य काय आहे हे आधुनिक शिक्षणातून समजू शकेल. पण परमेश्वराचं स्वरूप, त्याच्याबद्दलची निष्ठा ही कुराणात सांगितली आहे आणि या कुराणाबाबतचा मौलवींचा अधिकार मी मानतो.’ यावर मी विचारले, ‘पण मौलवी शरियतचा अर्थ चुकीचा कशावरून लावणार नाहीत?’ 

यावर तो पुन्हा म्हणाला, ‘मी इंजिनियर आहे. माझ्या क्षेत्रात मी एक्स्पर्ट आहे. तसेच धर्माच्या क्षेत्रात मौलवी एक्स्पर्ट असतात. त्यांनी लावलेला अर्थ मी मान्य करीन.’ यावर बोलणेच खुंटले.

मग दुसरा विषय काढून मी त्याला विचारले, ‘भारताशी बांगला देशचे संबंध मैत्रीचे असल्यामुळे तुमच्या मासे-निर्यातीच्या व्यवसायाला उर्जितावस्था नाही का येणार?’

यावर अमिनुल हक म्हणाला, ‘काही प्रमाणात येईल, पण आम्ही निर्यात करतो त्या तऱ्हेच्या मासळीला मुख्य गिऱ्हाईक इंग्लंड, फ्रान्ससारख्या देशांत आहे. नाही म्हणायला आमच्या पद्मा नदीतील ‘हिलशा मासा तुमच्याकडच्या बंगाली लोकांना फार आवडतो. तो येथून पाठवता येईल.’

कलकत्त्याला दोन दिवसांपूर्वी प्रा.दिलीप चक्रवर्तीच्या घरी जेवायला गेलो असताना ते म्हणाले, आज हिलशा मासा केला आहे. मोठा चवदार असतो. पण पद्मा नदीतील हिलशाची चव न्यारीच! आता बांगला देश झाल्यामुळे आम्हांला तो खायला मिळेल. हे मत्स्यपुराण मी ऐकले तरी कमी काटेरी मासा खायला चांगला, इतकेच समजणाऱ्या माझ्यासारख्या देशावरच्या माणसाला त्याची महती पटणे कठीणच होते.

महंमद इलाया या तरुण वकिलाशी त्या रात्री फारसे बोलायला मिळाले नाही. पण दुसऱ्या दिवशी ते बराच वेळ आमच्याबरोबर होते. खुलना जिल्ह्यातील सुंदरवन विभागात राहणाऱ्या इलायांनी कॉलेजमध्ये असतानाच चळवळीत थोडाबहुत भाग घेतला होता. ते अवामी लीगचे कट्टे पुरस्कर्ते होते. ते म्हणाले, ‘श्रेणीहीन, शोषणहीन समाजव्यवस्था हे आमचं ध्येय आहे.’ हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल ते म्हणाले, ‘भी ज्या घरात राहतो तेथील मालक हिंदू आहेत आणि आमचे संबंध नेहमीच स्नेहाचे राहिले आहेत.’ ते पुढे म्हणाले, ‘खुलन्यात दोनशे वकिलांपैकी फार तर दहा वकील हिंदू आहेत, पण वॉररुमचे अध्यक्ष प्रचंद्र गुप्त हे मात्र हिंदू आहेत. एकूण वकील वर्ग राजकारणाबद्दल उदासीन आहे हे त्यांनी मान्य केले, पण खुलन्यातील पन्नास टक्के तरी वकील अवामी लीगच्या मताचे आहेत, असे त्यांनी सांगितले. 1971 च्या मार्चपासून झालेल्या अत्याचारांबद्दल बोलताना महंमद इलाया म्हणाले, ‘लष्करानं बंगाली जनतेला चिरडून टाकताना या जनतेचा बुद्धिभेद व्हावा म्हणून काही दिवस हिंदूंच्यावर अधिक अत्याचार केले. त्या वेळी जिवाच्या भीतीनं काही हिंदू म्हणाले, ‘आम्ही मुसलमान होतो’, परंतु खुलन्यात आम्ही त्यांना सांगितले, ‘तुम्ही मुसलमान होऊ नका. तुम्हांला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. भारताच्या मदतीमुळेच बांगला देश स्वतंत्र होऊ शकला हे मान्य करून ते म्हणाले, ‘कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे मला समजत नाही. तुमच्या भेटीनं मला भारतीय मित्र मिळाले, याचं माझ्या मनाला समाधान वाटतं.’

सकाळी खुलना शहरातून फेरफटका मारताना एका मशिदीत शरणार्थी असावेत असे वाटले. ती माणसे मुसलमान दिसत होती. म्हणून आम्ही चौकशी केली, त्या वेळी आम्हांला कळले की, बिहारी मुसलमानांनी तेथे आश्रय घेतला आहे. या कॅम्पमध्ये कसे जाता येईल म्हणून आम्ही विचारत असताना एकाने आम्हांला हफीज अबदुल करीम यांच्याकडे नेले. ते नमाज पढत होते, म्हणून थोडा वेळ थांबलो...

(1971 मध्ये बांगला देश स्वतंत्र झाल्यावर तेथील युद्धभूमीवर जाऊन सैनिक व नागरिक यांच्याशी चर्चा करून  ग. प्र. प्रधान यांनी दैनिक ‘सकाळ’मध्ये लेखमाला लिहिली. नंतर त्याचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून ‘सोनार बांगला’ या नावाने आले, त्यातील हा सुरुवातीचा भाग.)

Tags: प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके