डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारत-पाक युद्धभूमीवर गेलो तेव्हा...

20 सप्टेंबरला पहाटे पाकिस्तानी विमाने अंबाल्यावर आली. साडेचार वाजता विमानहल्ल्याचा इशारा देण्यात आला आणि चाळीस मिनिटांनी ही विमाने परत निघून गेली. या वेळात त्या विमानांनी चर्चवर बाँब टाकून ते उद्‌ध्वस्त केले. चर्चच्या परिसरातील एक गृहस्थ भेटले. ते म्हणाले, ‘प्रार्थनामंदिर हे मनाला समाधान देण्यासाठी असते. हे चर्च नष्ट झाले, पण अंबाल्याचा विमानतळ वाचला ही केवढी समाधानाची गोष्ट आहे!’ त्यांचे हे अनपेक्षित उद्‌गार ऐकून मी अगदी स्तिमित झालो. संध्याकाळच्या त्या कातर वेळी, एक दीर्घ काल उभी असलेली वास्तू अशी उद्‌ध्वस्त झालेली पाहताना मनाला मोठी खिन्नता वाटत होती. परंतु त्या चर्चमध्ये नियमाने येणाऱ्या त्या गृहस्थांच्या शब्दांनी ही खिन्नता क्षणात नाहीशी करून टाकली.

वाटचालीची सुरुवात

1965च्या ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात वार्ता आल्या आणि काश्मीर सरहद्दीवर काही धुमसत आहे याची तीव्रपणे जाणीव झाली. पाकिस्तानच्या नेहमीच्या कुरापतीपेक्षा काही वेगळेच आत शिजत असावे असे नऊ ऑगस्टनंतरच्या दोन-तीन दिवसांत प्रकर्षाने लागले. सोळा-सतरा ऑगस्टला तर भीषण रणकंदन सुरू होणार हे अगदी स्पष्टं झाले; आणि अखेर एक सप्टेंबरनंतर तर प्रत्यक्ष युद्धाचा वणवाच भडकला. नंतरचे तीन आठवडे कसे गेले ते कळलेदेखील नाही. सगळी वर्तमानपत्रे अधाशीपणाने वाचून काढावीत, रेडिओवरील वृत्त जिवाचा कान करून ऐकावे, जाणत्या मित्रांच्या मदतीने कधी नकाशे समजून घ्यावेत, कधी अफवांनी संत्रस्त व्हावे, तर कधी भोवतालचा उत्साह पाहून बेभान व्हावे अशा दोलायमान मानसिक अवस्थेत दिवस चालले होते. हाजीपीर, केरन, टिथवाल, छांब, जौरिअन, अखनूर, बर्की, डोप्राई, पसरूर, छाविंडा ही अपरिचित नावे रोज कानांवर पडत होती आणि त्या न पाहिलेल्या शहरा-खेड्यांत काय घडत असेल याचा विचार करताना पूर्वी रेमार्कच्या कादंबऱ्यांत वाचलेली अनेक रोमांचकारी दृश्ये नजरेसमोर जिवंत होऊन नाचत होती. विमानहल्ल्याच्या भीतीने घरातले, रस्त्यावरचे सगळीकडचेच दिवे मंद झाले होते, परंतु लोकांच्या अंतःकरणामधली देशप्रीतीची ज्योत मात्र प्रखर तेजाने तळपू लागली होती. भारतीय जवानांच्या, सेनाधिकाऱ्यांच्या मृत्यूच्या बातम्या कानांवर पडत आणि धारातीर्थी त्यांना आलेला तो मृत्यू सर्वांना संजीवन देई.

तोफा धडाडत होत्या, विमाने घरघरत होती, वाटाघाटींची गुऱ्हाळेही सतत चालूच होती. काय घडते आहे, कसे घडते आहे हे जाणण्यासाठी मन उत्सुक होते, पण वृत्तपत्रांतील आणि रेडिओवरील बातम्यांवर संतुष्ट राहण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. अखेर 23 सप्टेंबरला शस्त्रसंधी झाली आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे शस्त्रे म्यान करावी लागली. तरी पण सरहद्द मात्र धुमसतच राहिली. काय घडले असेल ते एकदा पाहून तरी यावे, अशी ऊर्मी मनात उसळून आली आणि अखेर 26 सप्टेंबरला पंजाबला जाण्याचे मी ठरवले.

धारातीर्थ दर्शन

1938 पासून आपल्या राष्ट्राच्या जीवनात जे जे मोठे समर प्रसंग घडले त्यांपैकी बहुतेक मी अगदी जवळून पाहिले आहेत. त्यामुळे या आताच्या समरप्रसंगात जे वीर लढले त्यांना एकदा भेटावे अशी ओढ तीव्रतेने वाटू लागली; आणि जायचे ठरल्यावर बरोबर येण्यासाठी कोणी मित्र मिळतो का हे मी पाहू लागलो. शिरूभाऊ लिमयांची दोनच दिवसांनी गाठ पडली. सरहद्दीकडे जाण्याची कल्पना त्यांच्याही मनात बरेच दिवस घोळत होती. त्यामुळे आमच्या दोघांच्या बेताला लागलीच निश्चिती आली. ‘केसरी’चे संपादक जयंतराव टिळक यांनी केसरीचा प्रतिनिधी म्हणून मला ओळखपत्र दिले आणि शिरूभाऊ ‘साधना’चे प्रतिनिधी झाले. काकासाहेब गाडगीळ यांनी पंजाबचे मुख्यमंत्री रामकिशन यांना व पंजाबमधील आणखी दोन-तीन मित्रांना, ‘आम्हांला सर्व सवलती द्याव्यात’, असे सांगणारी पत्रे लिहिली आणि सोत्कण्ठ मनाने दि.2 ऑक्टोबरला आम्ही मुंबई सोडली.

जय जवान

मुंबईपासून प्रत्येक महत्त्वाच्या स्टेशनवर जवानांसाठी कॅन्टीन होतेच. परंतु जवानांबद्दल लोकांच्या मनात किती गाढ प्रेम आहे, याची कल्पना मध्य प्रदेशात प्रवेश केल्यापासून अधिकाधिक येऊ लागली. खांडवा स्टेशनवर जवान चहा पीत असताना त्यांना कुंकुमतिलक लावून निरांजने ओवाळण्यासाठी कितीतरी भगिनी आल्या होत्या. विदिशा स्टेशनवर गाडी थांबली आणि अनेक छोटी छोटी मुले खाऊचे पुडे घेऊन भराभर डब्यात शिरली. त्यांनी ते पुढे जवानांना दिले. गंजबसोदा या छोट्या स्टेशनवर तर गाडी कशीबशी दोन मिनिटेच उभी होती. पण तेवढ्या त्या वेळेतही जवानप्रेमाची झलक पाहावयाला मिळाली. या गावचे लोक मोठे रसिक दिसले. ते गटागटाने भराभर सगळ्या डब्यांत चढले आणि प्रत्येक जवानाला त्यांनी अत्तर लावले, फूल दिले. दिल्लीपासून तर ही आत्मीयता लोकांच्या शब्दांतून-डोळ्यांतून आणि प्रत्येक कृतीतून विलक्षण उत्कटतेने व्यक्त होताना दिसली. जवानांना जेवायला घालताना, त्यांचे कपडे धुण्याची व्यवस्था करताना लोकांना किती आनंद वाटत होता, किती तत्परतेने ते सर्व गोष्टी करत होते, हे पाहताना माझे मन भारावून गेले. सैनिक आणि नागरिक यांच्यामध्ये पूर्वी कधी न दिसलेला हा भावबंध किती बळकट आहे, हे पुढे पंजाबात पाहायला मिळाले.

आमच्या हिंडण्याच्या कार्यक्रमाबाबत साह्य मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये आम्ही काही मित्रांना भेटलो. प्रजा समाजवादी पक्षाचे साथी प्रेम भसीन यांनी कितीतरी उपयुक्त सूचना केल्या. दिल्लीला यापूर्वी मी तीन-चार वेळा तरी गेलो होतो आणि तिथल्या त्या नबाबी वातावरणाने दर वेळी माझे मन अगदी बुजून गेले होते. या वेळी मात्र जे कोणी भेटले ते सर्व भारत-पाक युद्धासंबंधी बोलत होते. शास्त्रीजींनी आदल्याच दिवशी गुरुद्वाराला भेट दिली होती. भाषणाच्या सुरुवातीस त्यांनी  ‘जो बोले सो निहाल’ हे शब्द उच्चारल्यावर ‘सत्‌ श्री अकाल!’  ही घोषणा करून गुरुद्वारात जमलेले सर्व शीख उभे कसे राहिले, त्याचे वर्णन एका मित्राने इतके हुबेहूब केले की मनश्चक्षूंसमोर त्या मेळाव्याचे चित्र उभे राहिले.

आघाडीवर जाण्यापूर्वी

दिल्लीमध्ये पंजाबी लोकांची खूप वस्ती आहे. भारत-पाक संग्राम सुरू झाल्यावर त्यांनी स्वाभाविकपणेच अमृतसर, फिरोजपूर, अंबाला इत्यादी ठिकाणच्या आपल्या नातलगांना दिल्लीला बोलावले. पण कोणी आपले गाव सोडून दिल्लीला आले नाही, ही हकिकत अनेकांनी मोठ्या अभिमानाने सांगितली. दिल्लीच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये कितीतरी जखमी जवान आले होते. त्या वीरांच्या अनेक कथा ऐकल्या. सर्व कथांचे धृपद एकच होते, ते म्हणजे हे जखमी झालेले वीर परत रणांगणावर जाण्यास उत्सुक आहेत. दोन्ही पाय निकामी झालेल्या एका जवानाला वेदना थांबवणारे इंजेक्शन दिले. त्यामुळे आपण किती जखमी झालो आहोत याची कल्पना नव्हती. ‘‘मला दोन दिवसांत परत जाऊ द्या’’ असे तो डॉक्टरांना विनवीत होता. पण ज्या क्षणी त्याला आपण पुन्हा पायावर उभे राहू शकणार नाही हे समजले, त्या क्षणी मात्र आपण लढायला निकामी झालो हे लक्षात येऊन त्याला भोवळ आली. जखमी जवानांचे नातेवाईक साहजिकच काळजीत होते, पण त्याचबरोबर आपली कुटुंबीय व्यक्ती मृत्यूवर मात करणारी आहे या अभिमानाने प्रत्येकाचे ऊर भरून आलेले होते.

आघाडीवरच्या भागात- फॉरवर्ड एरियामध्ये फिरावयाचे असल्यास संरक्षण खात्याकडून खास परवानगी काढावी लागते. ज्या दिवशी आम्ही दिल्लीत होतो, त्या दिवशी आपले संरक्षणमंत्री इकडे महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र इन्फर्मेशन सेंटरचे प्रमुख श्री. केळकर यांच्यामार्फत आमचे अर्ज दिले आणि परवानगी मिळेपर्यंत पंजाबमध्ये नागरिकांच्यात फिरावयाचे, असे ठरवून शिरूभाऊ व मी प्रथम चंदीगडला गेलो.

जाण्यापूर्वी चंदीगडला मुख्यमंत्री आहेत याची प्रथम खात्री करून घेतली होती. परंतु उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री श्रीमती सुचेता कृपलानी यांच्याबरोबर त्यांना जावे लागल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. प्रथम काही अधिकारी कामात असल्यामुळे थोडा वेळ थांबावे लागले. परंतु तेथील जनता संपर्क अधिकारी फारच उत्साही दिसले. त्यांनी ‘खालसा सेवक’ या दैनिकाचे संपादक गुरुदेवसिंग वासी आणि अन्य काही वार्ताहर व संपादक यांच्याशी आमची ओळख करून दिली. गुरुदेवसिंग वासी म्हणाले, की वृत्तपत्रात बातमी देताना नेहमी थोडे काही घडले असेल, तर ते सजवून द्यावे लागते. पण आघाडीवर आणि पंजाबमध्ये सप्टेंबर महिन्यात इतके काही घडले की, त्याचे साधे वृत्त देण्यातही आम्ही अगदी अपुरे पडलो. 

नंतर आम्ही डेप्युटी डायरेक्टर ऑफ पब्लिसिटी यांच्याकडे गेलो. मराठीतील थोर कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या पंजाबी पत्नी तेथे असलेल्या पाहून आम्हांला अतिशय आनंद वाटला. श्रीमती मर्ढेकर या अतिशय सौजन्यशील आणि कर्तबगार अधिकारी वाटल्या. मर्ढेकरांबद्दल प्रेम बाळगणारे दोन मराठी वार्ताहर म्हणून आमच्याबद्दल त्यांनी विशेष आस्था दाखवली. आम्ही पंजाबात कोठे जावे, कसे फिरावे या संबंधी कितीतरी सूचना त्यांनी दिल्या. संरक्षण प्रयत्नात पंजाबने कशी आघाडी मारली आहे, हे सांगताना त्या म्हणाल्या की, आमच्यावर मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख रुपये युद्धनिधी जमवण्याचा आदेश दिला आणि काही दिवसांतच लोकांचा अमाप उत्साह पाहून एक कोटी रुपये हे टार्गेट ठरवण्यात आले. तेहतीस लाख रुपये केवळ हिस्सार जिल्ह्यातच गोळा झाले आहेत. सैनिकांना उपयोगी असणाऱ्या वस्तूंचा तर एकसारखा ओघ सुरू आहे. नागरी सुरक्षा प्रयत्नासाठी ज्या छोट्या पुस्तिका आणि जी पोस्टर्स तयार केली होती ती सर्व श्रीमती मर्ढेकर यांनी आम्हांला दिली. त्याचप्रमाणे 1962 मध्ये चीनशी लढताना सैन्यातील ज्या पंजाबी वीरांनी पराक्रम गाजवला होता, त्यांच्या फोटोंचा एक संग्रहही दिला. आम्ही त्यांना विचारले, की या युद्धात जे काही घडले त्या संबंधी तुम्ही काही लिहिणार आहात का? यावर त्या म्हणाल्या : ‘‘अनेक रोमहर्षक घटनांची वर्णने आधीच वृत्तपत्रांत येऊन गेली आहेत.

पण अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यापूर्वी कोठेही सत्याचा विपर्यास होऊ नये, कोठे अतिशयोक्ती होऊ नये, म्हणून मी प्रत्येक हकिकतीची सत्यासत्यता प्रथम पारखून घेते आहे, आणि नंतरच मी पुस्तिका तयार करणार आहे.’’ नंतर त्या म्हणाल्या, ‘‘या युद्धात नवा पंजाब जन्माला आला आहे. तुम्ही लुधियाना, जालंदर, अमृतसर, फिरोजपूर येथील सामान्य माणसांशी नुसते बोललात तरी या चैतन्याचे तुम्हांला दर्शन होईल.’’ त्यांचा मुलगा राघव याची मी चौकशी केली तेव्हा त्या म्हणाल्या : ‘‘तो आता हायस्कूलमध्ये आहे. त्याला मराठी यावे अशी माझी इच्छा आहे. पण शिकवण्याची इथे काही सोय नाही.’’ ‘‘त्याला सुटीत जरूर पुण्याला पाठवून द्या,’’ असे सांगून  आम्ही त्यांचा निरोप घेतला. असे निमंत्रण देऊन सरकारी बड़े अधिकारी कसे वागतात याचा जो काही अल्पसा पूर्वी अनुभव मला होता, त्यावरून काहीही घडले तरी त्यांच्यात उत्साह म्हणून निर्माण होणार नाही, असा माझा ग्रह झाला होता. परंतु पंजाब सेक्रेटरीएटमधील अधिकाऱ्यांतील मनमोकळेपणा आणि उत्साह मोठा सुखद वाटला. ‘‘तुम्ही आमचा पंजाब पाहाच’’ असे ते आवर्जून सांगत होते आणि लागेल ते साह्य करण्याचे अभिवचन देत होते.

ते भग्न प्रार्थनामंदिर

चंदिगडहून अंबाल्याला आलो आणि बाँबहल्ल्यामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या भागाचे प्रथम दर्शन झाले. आम्ही अंबाल्याच्या सुप्रसिद्ध सेंट पॉल्स चर्चच्या आवारात पोहोचलो. ती वेळ संध्याकाळची होती. आवार विस्तीर्ण होते. काही येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक विषण्णतेची छटा दिसत होती. चर्च पडलेल्या अवस्थेत असूनही त्याची भव्यता चटकन मनाला जाणवत होती. ज्या प्रशस्त हॉलमध्ये एका वेळी प्रार्थनेला लोक जमत, त्या हॉलच्या दोन बाजूंच्या भिंती पडल्या होत्या. त्यामुळे आता त्याला भकासपणा आला होता. चर्चच्या मागल्या भागाची फारच पडझड झाली होती. तिथल्या परिसरातल्या एकदोघांशी बोललो. नेमका चर्चवर बाँबहल्ला का झाला, ते मला माहीत नव्हते. बोलताना कळले ते असे की, अंबाल्याचा विमानतळ अगदी लगत, चर्चच्या पलीकडेच सुरू होतो. हा विमानतळ हे पाकिस्तानी विमानांचे लक्ष्य होते.

20 सप्टेंबरला पहाटे पाकिस्तानी विमाने अंबाल्यावर आली. साडेचार वाजता विमानहल्ल्याचा इशारा देण्यात आला आणि चाळीस मिनिटांनी ही विमाने परत निघून गेली. या वेळात त्या विमानांनी चर्चवर बाँब टाकून ते उद्‌ध्वस्त केले. चर्चच्या परिसरातील एक गृहस्थ भेटले. ते म्हणाले की, प्रार्थनामंदिर हे मनाला समाधान देण्यासाठी असते. हे चर्च नष्ट झाले पण अंबाल्याचा विमानतळ वाचला ही केवढी समाधानाची गोष्ट आहे! त्यांचे हे अनपेक्षित उद्‌गार ऐकून मी अगदी स्तिमित झालो. संध्याकाळच्या त्या कातर वेळी, एक दीर्घ काल उभी असलेली वास्तू अशी उद्‌ध्वस्त झालेली पाहताना मनाला मोठी खिन्नता वाटत होती. परंतु त्या चर्चमध्ये नियमाने येणाऱ्या त्या गृहस्थांच्या शब्दांनी ही खिन्नता क्षणात नाहीशी करून टाकली.

20 सप्टेंबरला चर्चवर हल्ला होण्यापूर्वी अंबाल्यावर अनेकदा पाकिस्तानी विमाने येऊन गेली होती. 18 सप्टेंबरला तर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून पहाटे अडीच वाजेपर्यंत चांगला सात वेळा विमानहल्ल्याचा इशारा दिला गेला होता. या प्रत्येक वेळी आपल्या विमानहल्ला प्रतिबंधक तोफा धडाडत होत्या, आणि या भडिमारामुळेच अंबाल्याचा विमानतळ अगदी सुरक्षित राहिला. मात्र अडीच वाजता या विमानांनी मॉडेल टाउन, सरहिंद क्लब आणि मिलिटरी हॉस्पिटल या तीन ठिकाणी बाँब टाकले.

रुग्णालय आणि बड्यांचा क्लब

मिलिटरी हॉस्पिटलच्या एका बाजूवर हल्ला झाला होता आणि त्यामुळे त्या बाजूच्या 10-12 खोल्या कोसळलेल्या होत्या. नेमकी किती प्राणहानी झाली ते मात्र समजले नाही. परंतु नुकताच बरा होऊन हिंडणारा सहारनपूरचा ग्यानसिंग नावाचा एक सैनिक भेटला. ज्या बाजूवर बाँब पडला त्याच्या शेजारच्या खोलीत हा ग्यानसिंग होता. लाहोर सेक्टरमध्ये काम करीत असताना तो जखमी झाला होता आणि म्हणून उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. हल्ल्याच्या वेळी प्रचंड स्फोटाचा आवाज झाला आणि नंतर मी बेशुद्ध झालो. यापेक्षा अधिक काही त्याला आठवले नाही. पण त्या आपत्तीच्या वेळी अनेक नागरिकांनी मदत केली हे सांगताना तो म्हणाला की, लोक अडचणीत असले की आम्ही फौजी लोक त्यांच्या मदतीला धाऊन जातो. या वेळी आमच्या हॉस्पिटलवर बाँब पडला तेव्हा मात्र आम्हांला मदत करण्यासाठी सामान्य नागरिक धावून आले. 

सरहिंद क्लब हा एक बड्या लोकांचा क्लब आहे. सैन्यातील अधिकारी येथे येतात म्हणूनच कदाचित या क्लबवर हल्ला झाला असेल. मात्र येथे हल्ला करणाऱ्यांचा नेम चुकला होता. क्लबच्या इमारतीवर बाँब न पडता तो आवारातच पडला होता. इमारतीवर तो बाँब पडता तर ती खासच जमीनदोस्त झाली असती. ही कल्पना बाँबमुळे निर्माण झालेल्या प्रचंड खड्‌ड्यावरून आली. सरहिंद क्लबच्या इमारतीस मोठा हादरा बसल्यामुळे भिंतींना भेगा मात्र पडल्या आहेत. या क्लबच्या आवारात ‘अन्नपूर्णा’ म्हणून एक छोटे हॉटेल आहे. हल्ला झाला तेव्हा तेथील दोन नोकर हॉटेलसमोरच चौपाईवर झोपले होते. पण त्यांना काहीच इजा झाली नव्हती!

अंबाला गावात जे लोक भेटले त्यांच्यापैकी दोघा-तिघांनी अभिमानाने सांगितले की पाकिस्तानने अनेकदा बाँबहल्ले केले. पण अंबाला सोडून कोणीही पळून गेले नाही, आणि व्यवहार सुरळीत चालू होते.

पाकिस्तानी छत्रीधारी

लुधियाना व जालंदर या भागात हिंडत असताना पाकिस्तानच्या छत्रीधारी सैनिकांसंबंधी माहिती मिळाली. हे छत्रीधारी सैनिक जालंदर जिल्ह्यातील आदमपूर द्वाबा या गावी आणि लुधियाना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गटागटाने उतरले होते. रेवाडी या गुरुगाव जिल्ह्यातील गावातही हे छत्रीधारी सैनिक घुसले होते. रेवाडी हे सरहद्दीवरचे गाव आहे आणि तेथून चार मैलांवर असलेल्या पाकिस्तानातील हसनपूर गावचे ते छत्रीधारी रहिवासी होते. त्यांना जेव्हा पकडण्यात आले त्या वेळी हे समजून आले की पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांनी त्यांना धाक दाखवला होता आणि या धाकामुळे त्यांनी घातपाती कृत्य करण्याचे काम स्वीकारले होते. हे छत्रीधारी सैनिक ठिकठिकाणी चकमकी होऊन पकडले गेले तेव्हा असे आढळले की, त्या प्रत्येक गटात एक जण चाळिशीच्या सुमाराचा असे. साधारणपणे छत्रीधारी सैनिक म्हटला की अधिक तरुण असावा लागतो. परंतु या सैनिक जवानांना नंतर समजून आले की, फाळणीच्या वेळी जे लोक 18 ते 25 वर्षे वयाचे होते आणि ज्यांची पूर्वीची गावे जालंदर वा लुधियाना जिल्ह्यात होती त्यांनाच हे छत्रीधारी सैनिकांच्या गटाचे मार्गदर्शन करण्याचे काम देण्यात आले होते.

आपल्या पूर्वीच्या गावाजवळील पूल कोठे आहेत, रेल्वे कोठे आहे यांची नेमकी माहिती असल्यामुळे या सैनिकांना घातपाती कृत्ये करणे सोपे जाईल, अशी पाकिस्तानी अधिकाऱ्यांची समजूत होती. परंतु त्यांच्यापैकी कोणाचाही बेत सिद्धीस गेला नाही. बहुतेक सर्व छत्रीधारी सैनिक भारतीय जवानांनी वा होमगार्डनी आधीच पकडले, तर काही ठिकाणी पंजाबी शेतकऱ्यांनी त्यांना गिरफदार केले. त्यांना पकडताना झालेल्या चकमकींमध्ये आपले काही नागरिकही जखमी वा ठार झाले. पण हे छत्रीधारी कोठेही घातपात करण्यात वा दहशत निर्माण करण्यात यशस्वी झाले नाहीत. पंजाबमधील शेतकऱ्यांनी ज्या रीतीने हे छत्रीधारी पकडले, त्याच्या अनेक कथा ऐकल्या. आदमपूर द्वावाजवळच्या खेड्यात एका उसाच्या शेतात हे छत्रीधारी उतरले. तेथील शेतकरी प्रथम भांबावून गेले. या छत्रीधारी सैनिकांच्या जवळ हॅण्डग्रेनेड्‌स असणार हे माहीत असल्यामुळे एकट्या-दुकट्या शेतकऱ्यास पुढे जाण्याचा धीर होईना. पण शत्रुसैनिकांना भिऊन पळून जाण्याची कल्पनाही त्यांना सहन होईना. अशा स्थितीत त्या शेतकऱ्यांनी एका बाजूचे सबंध शेतच पेटवले.

दुसऱ्या बाजूने बुलडोझर घेऊन दोघे जण शेतात शिरले आणि ज्या वेळी छत्रीधारी धडपडत बाहेर येऊ लागले, तेव्हा आसपासच्या शेतकऱ्यांनी त्यांच्याशी सामना करून त्यांना ठार मारले, किंवा पकडून तरी ठेवले. या शेतकऱ्यांनी जो ऊस घाम गाळून वाढवला होता त्याचा क्षणाचाही विचार न करता त्यांनी नाश केला होता. या शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले, असा प्रश्न मी विचारला तेव्हा माझा पंजाबी मित्र उसळून म्हणाला- ‘‘आमच्या मनगटात वाटेल तितकी पिकं काढण्याची धमक आहे. ऊस काय पुन्हा आणखी लावता येईल पण गनीम घुसला तर त्याला मुळासकट उपटून काढला पाहिजे.’’ पंजाबमधील शूर शेतकरी छत्रीधारी शत्रू दिसताच संतापाने धावून जात. हातात जे साधन असेल त्याने शत्रुसैनिकांवर हल्ला चढवीत. कोणी कृपाण वापरले, तर कोणी हातातली बादली फेकून मारली, अनेक जण जखमी झाले. काही तर मारलेही गेले. पण पळून मात्र कोणीही गेला नाही. नुकसान झाले म्हणून रडणारा आम्हांला कोणत्याही गावात भेटला नाही; उलट देशाच्या इभ्रतीसाठी आपण अल्पसे का होईना, काही करू शकलो याच अभिमानाने सर्व जण फुलून गेले.

भीषण आठवण

अमृतसर शहरावर आणि आसपास पाकिस्तानी विमानांनी किती तरी वेळा हल्ले केले होते, हे मी आधी वाचलेलेच होते; आणि प्रत्यक्ष त्या भागात फिरत असताना या वार्तांमध्ये अतिशयोक्ती मुळीच नव्हती असे मला आढळून आले. अमृतसरपासून दोन मैलांवरील मेहलान या खेड्यावर 9 सप्टेंबरला हल्ला करून एक हजार पौंडी चार बाँब पाकिस्तानी विमानांनी टाकले. तेथे पिकांची फार हानी झाली होती. पंधरा-सोळा घरांचे खूपच नुकसान झाले होते. चाळीस गुरेढोरे आणि दोन माणसे ठार झाली. दहा तारखेस अमृतसरवर पाकिस्तानी विमाने आली होती. त्यातल्या एका विमानावर गोळ्या झाडून ते पाडण्यात आले. ते विमान पुतलीघर भागातील एका इमारतीवर पडले. त्या ठिकाणी दोन इमारतींचे खूपच नुकसान झालेले दिसले. पण सर्वांत भीषण हल्ला झाला होता तो चेहर्टा या भागामध्ये रात्री बारापासून शस्त्रसंधी अमलात येण्यापूर्वी काही तासच आधी पाकिस्तानने अमृतसरच्या या उपनगरावर हल्ला केला होता. आम्ही तेथे गेलो तेव्हा तेथील उद्‌ध्वस्त भागात फिरलो. या भागात चडुराम नावाचा एक होमगार्ड आम्हांला भेटला.

हल्ला दुपारी चार वाजता झाला होता आणि नंतर वीसेक मिनिटांतच चड्डुराम तेथे येऊन पोहोचला होता. त्याला मी विचारले, ‘‘तुम्हांला त्या त्या वेळचं काय काय आठवतं?’’  त्यावर तो उत्तरला, ‘‘जे आठवते ते इतकं भीषण आहे की, ते विसरता आलं असतं तर फार बरं झालं असतं.’’ चड्डुराम ज्या वेळी धावत आला, त्या वेळी कोणाच्या किंकाळ्या तर कोणाचे विव्हळणे ऐकू येत होते. धुळीचे लोटच्या लोट उठले होते. एकाचा तर नुसता पायच बाजूला उडून पडला होता. दुसरे एक शरीर अगदी छिन्नभिन्न झाले होते. कोणी सैरावैरा धावत होते, तर कोणी हतबुद्ध होऊन बसले होते. आम्ही तेथे गेलो तेव्हा त्यांनी वर्णन केलेली घटना घडून जवळजवळ पंधरा दिवस तरी उलटले होते. परंतु त्या भीषण घटनेचे सावट अद्यापही तेथील घरांवर पडलेले दिसत होते. जी घरे पडली त्यांमध्ये हरबनसिंग यांचे घर व घड्याळाचे एक दुकान होते. त्यांच्या घरातील तर तीन पिढ्यांतील पुरुष माणसे मारली गेली. त्यांचे म्हातारे वडील, ते स्वतः आणि त्यांचा एकुलता एक मुलगा. आम्ही फिरत होतो त्या वेळी हरबनसिंगांच्या घरातील बायका तेथेच विटांच्या ढिगाऱ्याजवळ बसलेल्या होत्या. घरातील एक आठ-नऊ वर्षांची मुलगी जवळच खेळत होती आणि सांत्वनाला आलेली एक प्रौढा त्या मुलीच्या अंगावरून हात फिरविताना तोंड बाजूला वळवून अश्रू ढाळीत होती. मृतांच्या आप्तांचे सांत्वन हा प्रसंग नेहमीच मोठा करुण असतो. घराच्या भिंतीआड तो घडत असेल तर इतरांना त्यातली वेदना फारशी जाणवत नाही. पण उद्‌ध्वस्त घराच्या विटा-मातीवर बसून चाललेले हे हृदयद्रावक सांत्वन आयुष्यात मला कधीच विसरता येणार नाही.

बाँबहल्ले

नंतर मी जवळच्या एका चहावाल्याशी बोलत बसलो. त्याचा थोरला भाऊ बाँबहल्ल्यात ठार झाला होता. त्या गरीब कुटुंबातील एक कर्तासवरता पुरुष असा अचानक गेल्यामुळे मोठीच आपत्ती ओढवली होती. सरकार पैसे देणार आहे का? असे मी त्याला विचारल्या वर तो म्हणाला,  ‘‘रामकिशनजी इथं आले होते आणि त्यांनी व इंदिरा गांधींनी काही पैसे मंजूर केलेत; पण सरकार तरी किती देणार आणि कुणाकुणाला देणार?’’ त्याच्या त्या बोलण्यात थोडासाही कडवटपणा नव्हता की ध्येयवादाचे प्रदर्शन नव्हते. खास भारतीय पद्धतीने त्याने आपले दुःख स्वीकारले होते. त्याला मी विचारले : ‘‘तुझी मुलंबाळं खुशाल आहेत ना?’’ त्यावर जवळ बसलेल्या एका मुलीकडे प्रेमळपणे पाहत आकाशाकडे बोट दाखवून तो म्हणाला, ‘‘....की कृपा.’’ भगवान थोडे पुढे चालून गेल्यावर मला दर्शनलाल नावाचा एक तरुण भेटला. त्याने बाँबहल्ला कसा झाला त्याचे वर्णन केले. त्याचे वडील हल्ल्यात जखमी झाले होते आणि नवीनच बांधलेल्या त्याच्या घराचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या वृद्ध वडिलांना मी भेटलो. त्यांच्या हाताच्या पंजाला व गुडघ्याला लागलेले होते. घराचा पायाच हादरला होता त्यामुळे एक भिंत खचली होती. पण दर्शनलालची हिंमत मात्र खचलेली नव्हती.
 

(1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धरेषेवर जाऊन तेथील जवानांशी व स्थानिक जनतेशी संवाद करून ग. प्र. प्रधान लिहिलेली लेखमाला ‘केसरी’मधून प्रसिद्ध झाली, नंतर त्याचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले, त्यातील हा सुरुवातीचा भाग.)

Tags: ग. प्र. प्रधान प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके