डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘माझा रिझल्ट कळल्यावर माझ्या पत्नीला, घरच्या सगळ्यांना आनंद झाला. मी मात्र कमालीचा दुःखी झालो. सर तो थिसीस माझा नाही, त्याच्यातले अनेक भाग मॅनिप्युलेट केलेले आहेत. त्या निष्कर्षांना प्रयोगांचा आधार नाही. माझा थिसीस साफ खोटा आहे. अशा खोट्या संशोधनावर माझे भावी आयुष्य उभारले तर मी दरोडेखोर ठरेन. मी बोर्डीला साने गुरुजींची बौद्धिके ऐकली. मी कधी खोटे बोललो नाही. लबाडी केली नाही आणि आता या खोट्या पीएच.डी.च्या आधाराने मी जगायला लागलो तर आज माझा नर्व्हस ब्रेकडाऊन झालाय. सहा महिन्यात मी वेडा होईन. मी ती पीएच.डी घेणार नाही.’ प्रभाकर पुन्हा रडू लागला.

माझा जुना वर्गमित्र चंदू कोष्टी मला भेटायला आला होता आणि नेहमीप्रमाणेच चहा पीत आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्याला म्हणालो, ‘तुझ्या पुतण्याला प्रभाकरला रसायनशास्त्रात पीएच.डी. मिळाली हे काही दिवसांपूर्वी कळले म्हणून तुमच्या पुण्यातल्या घरी त्याचे अभिनंदन करायला गेलो, परंतु प्रभाकर ठाण्याला आहे आणि आजारी आहे असं समजलं, काय झालंय त्याला?’ चंदू म्हणाला, ‘आज तेच तुला सांगायला आलोय. डॉक्टरांच्या मते ‘नर्व्हस ब्रेकडाऊन’ आहे. मानसिक ताण असह्य झाल्यामुळे हे झालं असावं असं डॉक्टर म्हणतात.’

‘म्हणजे काळजीच आहे की रे, पण मानसिक ताण येण्याचं कारणच काय?’ मी विचारले. चंदू म्हणाला, ‘तो कोणाशी घड बोलत नाही. तो इथं फर्ग्युसन कॉलेजमध्ये एफ.वाय.ला शिकायला आला तेव्हापासून तू त्याला ओळखतोस. त्याला तुझ्याबद्दल फार आदर वाटतो आणि विश्वासही वाटतो. मला तुझी मदत पाहिजे. तो तुझ्याशीच त्याच्या मनातलं बोलेल. चार- पाच दिवसांनी माझा भाऊ त्याला इथं घेऊन येईल, नंतर मी तुला घरी घेऊन जाईन. तूच बोल आमच्या प्रभाकरशी.’ ‘बोलेन की, मला जे करणं शक्य आहे ते करीन. प्रभाकर काही करून बरा झाला पाहिजे.’

चंदू माझ्याकडून गेल्यावर मी विचार करू लागलो. मला कितीतरी जुन्या आठवणी आल्या. कोष्टी हे भिवंडीचे सधन कुटुंब. ते व्यापारी होते. चंदू हा मॅट्रिक झाल्यावर पुण्याला शिकायला आला. त्याची हायस्कूलमध्ये शिकणारी दोन धाकटी भावंडेही त्याच्याबरोबर आली. त्यांची एक काकी त्यांच्याजवळ राहिली आणि कोष्टी मंडळींनी पुण्यात बिऱ्हाडच केलं. प्रभाकर हा चंदूच्या सर्वांत थोरल्या भावाचा मुलगा. त्याच्या वडिलांनी त्याला ठाणे जिल्ह्यातच बोर्डीला वसतिगृहात शिकायला ठेवलं होतं. चंदू आणि मी एफ.वाय.आर्टस् पासून बरोबर होतो. बी.ए. झाल्यावर तो घरचा व्यापारी व्यवसाय करू लागला. मी एम.ए. झाल्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्येच शिकवू लागलो. चंदू पुण्याला आला की माझ्या घरी येई. आमच्या आयुष्याचे प्रवाह वेगळे झाले होते, पण मैत्री मात्र कायमच राहिली. चंदूचा पुतण्या बोर्डीच्या हायस्कूलमधून मॅट्रिक झाला आणि एफ.वाय. सायन्सला आमच्याच कॉलेजात शिकू लागला. चंदू त्याला घेऊन माझ्याकडे आला. ‘हा माझा पुतण्या प्रभाकर. बोर्डीला शिकायला होता तो. तुमच्या सेवादलात जातो. साने गुरुजी बोर्डीला त्यांच्या भावाकडे जात असत. तो त्यांचा भाऊ हायस्कूलमध्येच शिक्षक होता. त्यामुळे साने गुरुजी बोर्डीला गेले की शाळेतील विद्यार्थ्यांना गोष्टी सांगत, आमच्या प्रभाकरने साने गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या आहेत. साने गुरुजींचे साहित्यही त्याने वाचले आहे. पण त्याला विज्ञानाची आवड आहे म्हणून फर्ग्युसनला एफ.वाय. सायन्समध्ये नाव घालायला मी सांगितले. तू तिथे शिकवतोस. आमच्या प्रभाकरवर लक्ष ठेव, त्याला फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे इंटरसायन्सला.’

प्रभाकर नंतरही मला भेटला. तो अभ्यासू होता. पण मी फिजिक्स शिकवणाऱ्या माझ्या सहकाऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘कोष्टी अभ्यासू आहे, बुद्धिमान आहे पण फर्स्टक्लास विद्यार्थी नाही, प्रभाकरला इंटरसायन्सला सेकंड क्लास मिळाला. त्याला मेडिकलला प्रवेश न मिळाल्यामुळे तो बी.एस्सी.ला बॅाटनी झुऑलजी घेऊन शिकू लागला. त्याला प्राध्यापक व्हायचे होते, परंतु एम.एस्सीला त्याला दुसरा वर्गही मिळाला नाही. तो फार निराश झाला. तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘तुमची परिस्थिती चांगली आहे. आत्ताच नोकरी करण्याची तुला जरूरी नाही, तू पीएच.डी हो म्हणजे तुला नंतर लेक्चररशिप मिळेल.’ मी माझा मित्र चंदू यालाही हेच सांगितले. चंदू म्हणाला, ‘आमच्या घरी सगळेजण घरचा व्यवसायच पाहतात. प्रभाकरला खुशाल आणखी दोन-तीन वर्षे शिकू दे. मात्र आम्ही आता त्याचे लग्न करून टाकणार आहोत.’ कोष्टी कुटुंब जुन्या वळणाचे होते. प्रभाकरचे लग्न मॅट्रिक झालेल्या एका साध्या, सरळ मुलीशी झाले. ती काही दिवस भिवंडीस राहिली आणि नंतर पुण्यालाच आली. पुण्यात बिऱ्हाड असल्यामुळे चंदूच्या दुसऱ्या भावांची मुले पुण्यात शिकायला आली होती.

प्रभाकर काही दिवसांनी माझ्याकडे आला होता, तो फार निराश दिसला. तो मला म्हणाला, ‘सर मला पीएच.डीला गाईडच मिळत नाही. लेक्चररशिपही मिळत नाही. मी आता काय करू?’ मी म्हणालो, ‘ बॉटनी हा माझा विषय नाही, त्यामुळे तुझ्या प्रबंधाचा काय विषय असावा हे मला सांगता येणार नाही, पण पुणे विद्यापीठातील बॉटनीचे विभागप्रमुख डॉ.महाबळ माझ्या ओळखीचे आहेत. मी पाहतो तुला काही मदत करता येते का ते. त्यानंतर तीन-चार महिने काही जमले नाही. नंतर डॉ.महाबळांना मी पुन्हा भेटलो. ते म्हणाले, ‘पुण्याच्याच अग्रिकल्चर कॉलेजमधील एका प्राध्यापकाला नुकताच पीएच.डीचे गाईड म्हणून मान्यता मिळाली आहे. तुमच्या त्या एम.एस्सी झालेल्या विद्यार्थ्याला त्यांना भेटायला सांगा.’ प्रभाकरला मी हा निरोप दिला. काही दिवसांनी तो माझ्याकडे आला, खुषीत दिसत होता. ‘सर अॅग्रिकल्चर कॉलेजमधील प्रा.ओझा माझे गाईड व्हायला तयार आहेत. अॅग्रिकल्चरच्या संदर्भातील बॅाटनीतील एका विषयाचे मला त्यांनी वाचन करायला सांगितले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी अभ्यासाला सुरुवात केली आहे. चार-सहा महिन्यांत मी सिनॉपसिस लिहिले की मला पीएच. डीचा विद्यार्थी म्हणून ओझा सर मला स्वीकारतील.’ प्रभाकर पुढे म्हणाला, ‘डॉ.ओझा अगदी साधे गृहस्थ आहेत. मला ते म्हणाले, ‘भिवंडीचा कोलम तांदूळ फार चांगला असतो. तू मला आणून देशील का? तुम्हाला माहिती आहे की व्यापाराप्रमाणेच भिवंडीजवळ किन्हवलीला आमची शेती आहे. मी त्यांना आमच्या घरचे भात आणून दिले.’ मला हे थोडेसे चमत्कारिक वाटले, पण मी काही बोललो नाही. सहा महिन्यांनी डॉ.ओझांनी प्रभाकरला पीएच.डी.चा विद्यार्थी म्हणून स्वीकारले.

प्रभाकर पूर्वीप्रमाणे अलीकडे येत नसे. मध्यंतरी तो रस्त्यात भेटला तेव्हा मी त्याला घरी घेऊन गेलो. प्रभाकरने त्याला मुलगी झाल्याचे सांगितले आणि तो म्हणाला, ‘तसं घरचे कोणी काही म्हणत नाहीत, पण मी आता एका कोचींग क्लासमध्ये तीन तास शिकवतो.’ मी म्हणालो, ‘हे ठीक आहे, पण पीएच.डी.चे कुठवर आलंय.’ प्रभाकर खिन्नपणे म्हणाला, ‘नाही सर फारशी प्रगती नाही.’ मी विचारले, ‘गाईड मार्गदर्शन करीत नाहीत का?’ प्रभाकर म्हणाला, ‘ते त्यांच्याच अनेक कामात असतात. मधूनमधून दौऱ्यावरही जातात. मी चाचपडतोय.’ मी फारसं काहीच बोललो नाही. मी इतकेच म्हणालो, ‘पीएच.डी. लवकर संपव. त्याच्याशिवाय लेक्चरर नाही होता येणार?’ प्रभाकरच्या डोळ्यातून पाणी यायला लागले, तो म्हणाला, ‘सर काय करावं मला सुचत नाही. डॉ.ओझा काही सांगत नाहीत. फक्त मधूनमधून माझ्याकडे काही मागत असतात. मी वर्षाचे तांदूळ त्यांना देतोच. परवाच त्यांना टी.व्ही. घेऊन दिला. मात्र ते म्हणतात, तू पीएच.डी.ची काळजी करू नकोस. मी त्यांच्या कचाट्यात सापडलोय. काय करावं मला सुचत नाही.’ मलाही काही सुचत नव्हते. मात्र मी त्याला म्हणालो, ‘डॉ.ओझांचं  वागणं बरोबर नाही.’ प्रभाकर काहीच न बोलता निघून गेला. चंदू मध्यंतरी आला, त्यालाही काय करावे ते समजत नव्हते. तो मला इतकेच म्हणाला, ‘पीएच.डी.ला नाव नोंदवून आता चार वर्षे होतील, पण आमच्या प्रभाकरचं गाडं कुठं अडलंय समजत नाही. मध्यंतरी त्याने गाईड लिहून काही पैसे मिळविले, पण त्यात काय मिळणार?’ मी म्हणालो, ‘जूनमध्ये पाहू काय ते’ आणि अनपेक्षितपणे प्रभाकरला पीएच.डी. मिळाल्याचे समजले. मला हायसे वाटले. पण तितक्यात चंदू आला आणि प्रभाकर आजारी असल्याचे समजले.

चार-पाच दिवसांनी चंदूचा मुलगा आला तो म्हणाला, ‘प्रभाकरदादाला इथं आणलंय. तो आजारीच आहे. तुम्ही त्याला पहायला याल का?’ ‘मी येईन आज संध्याकाळी.’ मी सांगितले. संध्याकाळी मी गेलो तर प्रभाकर झोपला होता. मी त्याच्याजवळ गेलो, म्हणालो, ‘प्रभाकर उठ पाहू, मी अभिनंदन करायला आलोय, तू पीएच.डी. झालास म्हणून.’ प्रभाकर एकदम उठला आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकून रडायला लागला. मी म्हणालो, ‘तू शांतपणे मला सगळं सांग पाहू आधी’ मी त्याच्या बायकोला, चंदूलाही दुसऱ्या खोलीत जायला सांगितले. पाच मिनिटांनी प्रभाकर थोडा शांत झाला. मी त्याला म्हणालो, ‘सगळं नीट सांग पाहू मला.’ प्रभाकर एकदम म्हणाला, ‘सर माझी पीएच.डी. खोटी आहे. फ्रॉड आहे. त्या पीएच.डी.च्या आधारानं मी लेक्चरर होणं म्हणजे आयुष्यभर खोटेपणानं जगणं, मला वेड लागेल अशानं.’ मला त्याच्या बोलण्याचा नीट अर्थ कळत नव्हता. तो पुढे म्हणाला, ‘सर मी फार दुर्दैवी आहे’ आणि पुन्हा रडायला लागला. मीही फार अस्वस्थ झालो. पण मी त्याला म्हटले, ‘प्रभाकर रडण्यानं तुझा प्रॉब्लेम सुटणार नाही. तू मला सगळं नीट सांग नंतर त्याने जे सांगितले, त्यामुळे मीही चक्रावून गेलो.’ प्रभाकर सांगू लागला. ‘चार वर्षांपूर्वी डॉ.ओझा सरांनी मला पीएच.डी.साठी विद्यार्थी म्हणून घ्यावयाचे कबूल केल्यावर ते मला म्हणाले, ‘तू आधी इंग्रजी टायपिंग आणि शॉर्टहँड शिकून घे.’ मला काही समजेना. मी त्यांना म्हणालो, ‘सर आपण मी लिहिलेले सिनॉपसिस तपासून दिल्यावर मी आपल्या सांगण्याप्रमाणे काही प्रयोग करून संशोधनाला सुरुवात करायची असे मला वाटले होते.’

सर एकदम रागावले आणि म्हणाले, ‘माझ्या हाताखाली काम करायचं असेल तर मी सांगतो तसं ऐकलं पाहिजे.’ मी मुकाट्याने टायपिंगच्या क्लासमध्ये नाव घातले. चार महिन्यांनी टायपिंग आणि शॉर्टहँडच्या परीक्षेत मी पास झालो. त्यानंतर मी ओझासरांच्याकडे गेलो आणि त्यांना टायपिंग आणि शॉर्टहँडचा कोर्स पुरा केल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘आता एक इंग्लिश टाइपरायटर घे आणि रोज सकाळी दोन तास माझ्याकडे येत जा.’ मी जाऊ लागलो. ओझासर त्यांच्या कामाची पत्रे मला डिक्टेट करीत. मी ती शॉर्टहँडमध्ये घेत असे आणि घरी येऊन नव्याने विकत घेतलेल्या टाइपरायटरवर ती टाइप करून दुसऱ्या दिवशी सरांना देत असे. आणि एखादा दिवस सरांची लहर लागली की ते माझ्या प्रबंधाच्या विषयावर पंधरा-वीस मिनिटे बोलत आणि मला काय वाचायचे ते सांगत. अशीच दोन वर्षे गेली. मी एकदा धीर करून सरांना म्हणालो, ‘सर मला आता प्लॅण्ट पॅथॉलॉजी हा विषय बराच समजला आहे. पण मी लॅबोरेटरीत प्रयोग करायला केव्हा सुरुवात करू.’ डॉ.ओझा म्हणाले, ‘तुला अद्याप बरेच वाचन केले पाहिजे, मग मी तुला तू कोणते प्रयोग कर ते सांगेन.’ अशी तीन-साडेतीन वर्षे गेली. 

डॉ.ओझा त्यांच्या विषयाच्या परिषदांमधील निबंध मला डिक्टेट करीत. मी त्यांना निबंध टाईप करून दिल्यावर त्यात दुरुस्त्या करून पुन्हा टाईप करायला लावीत. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. संशोधनाबाबत मी नुसता चाचपडत होतो. डॉ.ओझा काही मार्गदर्शन करीत नव्हते. मधून मधून माझ्याकडून काही वस्तू मागत. पैसे मागत आणि मी ते त्यांना देत राहिलो. शेवटी चार महिन्यांपूर्वी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले, ‘मी आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेणार आहे’ हे ऐकून मात्र ते धास्तावले. ते मला म्हणाले, ‘तुला पीएच. डी. व्हायचंय ना? काही काळजी करू नकोस उद्या तुझे सिनॉपसिस आण.’ मी ते घेऊन गेलो. त्यांनी ते फाडून टाकले आणि मला म्हणाले, ‘मी तुला डिक्टेट करतो ते लिही. मग त्यांनी मला नवीनच सिनॉपसिस डिक्टेट करून ते टाईप करायला लावले. ते म्हणाले, ‘हे माझ्याकडे ठेव आणि महिन्यानंतर माझ्याकडे ये. तुला पीएच.डी.चा थिसीसच डिक्टेट करीन. मात्र पंधरा दिवसांनी पाच हजार रुपये घेऊन ये. मी जुगार खेळायचे ठरविले होते. बायकोला न कळवता माझ्या ताब्यात असलेले तिचे दागिने गहाण टाकले आणि तीन हजार रुपये आणले. त्या सावकाराने मला आणखी दोन हजार रुपये मी प्रॉमिसरी नोट लिहून दिल्यावर दिले. मी ते डॉ.ओझांना नेऊन दिले. ते म्हणाले, ‘आता काळजी करू नको. उद्यापासून रोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास येत जा. मी तुला डिक्टेट करीन ते लिहून घे.’ आणि ते मला रोज थिसीस डिक्टेट करू लागले. मी त्यांना म्हणालो, ‘यात लिहिलेले प्रयोग मी केले नाहीत. मला ओरलमध्ये काही विचारलं तर माझी फजिती होईल.’ ओझा माझ्यावर भडकले, ‘तुला पीएच.डी. व्हायचंय ना? मी सांगतो ते लिहन घे. नंतर महिनाभर ते घरी घोकून ठेव, त्यानंतर तुझी ओरल होईल. महिन्याभरात प्रबंधाचे डिक्टेशन संपले. मी तो थिसीस टाईप करून आणला. सरांनी तो तपासला.

त्यात बऱ्याच दुरुस्त्या केल्या. मला त्याच्या पुन्हा दोन प्रती टाईप करून आणायला सांगितल्या. टायपिंगचे पैसे मी काकांच्याकडून घेतले. त्यानंतर मी महिनाभर त्या थिसीसचा अभ्यास करीत होतो. काही अडले तर सरांच्याकडे जाई. ते मला काहीतरी समजून सांगत. एक महिन्याने माझा प्रबंध स्वीकारला गेल्याचे डॉ.ओझांनी मला सांगितले. नंतर काही दिवसांनी माझी ओरल होती. डॉ.ओझा मला म्हणाले, ‘या ओरल घेणाऱ्यांची मला सरबराई करावी लागेल. तू दोन हजार रुपये आण.’ मी पुन्हा कोणालाही न कळवता कर्ज काढले. ओरल बरी झाली आणि महिन्याभरात माझा रिझल्ट लागला. माझा पीएच.डी.चा प्रबंध परीक्षकांनी मान्य करून मला पीच.डी. द्यावी असे माझे गाईड डॉ.ओझा यांच्यामार्फत पुणे विद्यापीठाला कळवले. माझा रिझल्ट कळल्यावर माझ्या पत्नीला, घरच्या सगळ्यांना आनंद झाला. मी मात्र कमालीचा दुःखी झालो. सर तो थिसीस माझा नाही, त्याच्यातले अनेक भाग मॅनिप्युलेट केलेले आहेत. त्या निष्कर्षांना प्रयोगांचा आधार नाही. माझा थिसीस साफ खोटा आहे. अशा खोट्या संशोधनावर माझे भावी आयुष्य उभारले तर मी दरोडेखोर ठरेन.  मी बोर्डीला साने गुरुजींची बौद्धिके ऐकली. मी कधी खोटे बोललो नाही. लबाडी केली नाही आणि आता या खोट्या पीएच.डी.च्या आधाराने मी जगायला लागलो तर आज माझा नर्व्हस ब्रेकडाऊन झालाय. सहा महिन्यात मी वेडा होईन. मी ती पीएच.डी घेणार नाही.’ प्रभाकर पुन्हा रडू लागला. 

मला प्रभाकरच्या पीएच.डी.ची ही दुर्दशा माहीत नव्हती. मी त्याला म्हणालो, ‘प्रभाकर तू आता माझे ऐक. तू पीएच.डी घेऊ नकोस. तू एम.एस्सी परीक्षा पास झाला आहेस. तू एम.एस्सी आहेस. तुला बी.एससी.ला सेकंड क्लास आहेच. एक-दोन वर्षांनी ‘क्लास इम्प्रुव्हमेंट’ स्कीमखाली तू पुन्हा एम.एस्सीला बसून सेकंड क्लास मिळव मग तुला लेक्चरर होता येईल. सध्या ग्रामीण भागात नव्याने जी कॉलेजे निघत आहेत, त्याच्यामध्ये कोठेतरी तुला डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी मी सहज मिळवून देईन.’ माझे हे बोलणे ऐकून प्रभाकर बराच शांत झाला. मी त्याला म्हणालो, ‘मी उद्या पुन्हा येईन. तू मी आणि तुझा चंदूकाका एकत्र बसू आणि काय ते ठरवू.’ त्याप्रमाणे आम्ही बसलो, मी सांगेन तिथे डेमॉन्स्ट्रेटरच्या जागेसाठी अर्ज करण्याचे प्रभाकरने मान्य केले. त्याचबरोबर त्याला जेथे डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी मिळेल तिथे तो पीएच.डी. आहे हे सांगायचे नाही हे मी कबूल केले. 

या दिवशी प्रभाकर जेव्हा माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला तेव्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवीत मी म्हणालो, ‘वेडा रे वेडा’. पण आज मात्र त्याच्या वेडेपणापुढे माझे शहाणपण बुजून गेले होते. त्याच्या मनाची ही जगावेगळी वेदना पाहून मी चकित झालो होतो. ‘असत्यावर आयुष्य उभे करणार नाही,’ या त्याच्या निर्धाराच्या तेजामुळे व्यवहारी जगाला सरावलेले माझे डोळे दिपून गेले होते.

Tags: फर्ग्युसन कॉलेज प्रभाकर ललित साहित्य मराठी साहित्य साहित्य अनुभव ग प्र प्रधान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके