डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आणि महाराष्ट्रात काही वेगळीच हवा निर्माण झाली. चळवळ सुरू झाली की मनाला एकदम उभारी येते. गेल्या काही महिन्यांत माझा आत्मविश्वास काहीसा डळमळू लागला होता. शरीरही कुरकूर करू लागले होते. परंतु भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनास श्री. अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे जसजशी धार येऊ लागली तसतशी मनःस्थिती पालटत गेली आणि आंदोलनात पडण्याचा निर्णय घेतल्यावर मनावरील मळभ एकदम दूर झाले. नवा उत्साह अंगात संचारला.

8 तारखेस पुण्याला हमाल भवनात कार्यकर्त्यांची बैठक तीन तासांहून अधिक चालली. अनेक जिल्ह्यांतून लोक आले होते. उत्साह अमाप होता. सूचनाही पुष्कळ आल्या. त्या सर्व सूचनांच्या आधारे चळवळीसाठी संघटना उभी केली पाहिजे, हे करण्यासाठी केवळ ढोबळ विचार करून चालणार नाही, कार्यक्रम निश्चित करून शिस्तबद्ध रीतीने कार्यवाही करावयास हवी. याची जाणीव या बैठकीमुळे माझ्या मनात तीव्र झाली.

संध्याकाळी शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणावर सभा झाली. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या आंदोलनातील ही पहिली जाहीर सभा होती. अण्णांच्या भाषणात संयम आणि उत्कटता या दोहोंचाही प्रत्यय आला. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे व्यापक, नैतिक स्वरूप स्पष्ट केले याचे मला फार समाधान वाटले. 

9 तारखेस सकाळी दहा वाजता आम्ही पुण्यातून बाहेर पडलो. भोसरी, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव आदी ठिकाणी लोकांनी अण्णांचे उत्स्फूर्त स्वागत केले. बाबा आढाव यांची कामाची एक खास शैली आहे. चाकणला स्वागताच्या वेळी तेथील प्रमुख ग्रामस्थ अण्णांना हार घालायला सरसावताच बाबांनी त्यांना थांबविले आणि ते म्हणाले, "येथे जमलेल्या श्रोत्यांमधील एका प्रामाणिक व्यक्तीला अण्णा प्रथम हार घालतील." पुढारी मंडळी या घोषणेने गडबडली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात कोणाला तरी सुचले आणि ते म्हणाले, 'इथले आत्ताचे फोटो घेणारा तरुण अपंग आहे, तो प्रामाणिक आहे आणि सामाजिक कामही करतो.' यानंतर अण्णा हजारे यांनी त्याला हार घातला आणि सभा सुरू झाली. बाबांनी हाच प्रयोग सिन्नर येथील कॉलेजात केला आणि ते म्हणाले, 'इथे बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्याने कॉपी केली नसेल त्याने पुढे यावे आणि अण्णांच्या हातून फूल घ्यावे.' एक मिनिटभर कोणीच पुढे आले नाही. नंतर बारावीतला एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने पुढे येऊन अण्णांच्या हातून फूल घेतले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची ही सुरुवात श्रोत्यांना पसंत पडली. 

संगमनेर येथील सभा दुपारी चारला झाली. सभा खूप मोठी होती आणि सभेला विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने आले होते. सिन्नरला कॉलेजमधील विद्यार्थी मेळाव्यात बोलताना मला फार समाधान वाटले. नंतर गावात वाचनालयात सभा झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल एक तासभर आधी लागले होते. गावात मिरवणुका सुरू होत्या आणि तरीही वाचनालयाचा मोठा हॉल श्रोत्यांनी तुडुंब भरला होता. सभांमध्ये मुख्य भाषण अण्णांचे होई. बाबा आढाव, अविनाश धर्माधिकारी काही वेळ बोलत. मी संबंध दिवसात दोन वेळा थोडेसे बोललो. विद्यार्थ्यांशी बोलण्यात आनंद वाटतो, त्या मानाने जाहीर सभेत बोलणे मला जमत नाही. रात्री नाशिकला पोहोचलो. नाशिकला अण्णांची पत्रकारपरिषद चांगली झाली. कार्यकर्त्यांची बैठक मात्र विस्कळित झाली. सभा मोठी होती, पण उशिरा सुरू झाली. सभेतील अविनाश धर्माधिकारी यांच्या भाषणातील किस्से लोकांना (व मलाही) आवडले.

दुसऱ्या दिवशी निफाडची सभा सकाळी साडे अकराला झाली. सभेला शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. एरंडगाव येथे सतीश कानडे यांच्या शाळेत मी मुलांना गोष्ट सांगितली आणि अण्णांनी छोटेसे भाषण केले.

येवला येथे पोहोचायला ठरल्या वेळेपेक्षा बराच उशीर झाला पण लोक थांबले होते. भास्कर बोरावके, मामा गवारे आणि अनेक जुने मित्र भेटले. सभा चांगलीच रंगली. बाबांनी विनोद करीत भ्रष्टाचारावर कोरडे ओढले.

संध्याकाळी औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरला पोहोचलो. वैजापूरच्या अलीकडे गोविंदभाई श्रॉफ, पटवारी वकील, प्रा. ढोबळे आणि अनेक कार्यकर्ते स्वागताला आले होते. वैजापूरची सभा खूप मोठी होती. अण्णांचे भाषण परिणामकारक झाले. रात्री औरंगाबादला पोचलो.

औरंगाबादला सकाळी निवडक दहा-बारा कार्यकर्त्यांशी चर्चा होती. नाशिकच्या अनुभवामुळे बैठक कशी होणार याबद्दल मी साशंक होतो. परंतु चर्चा फार उद्बोधक झाली. कार्यकर्ते परिपक्व आणि जाणकार होते. आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित करण्यापूर्वी या व अशा मित्रांशी दोन दिवस तरी चर्चा केली पाहिजे. मराठवाड्यातील अनेक आंदोलनांत आघाडीवर असलेल्या या तरुण मित्रांशी चर्चा केल्यावर माझ्या मनाचा हुरूप एकदम वाढला.

पत्रकार परिषद अण्णा हजारे यांनी कौशल्याने हाताळली. त्यांनी संयमाने उत्तरे देऊन खोचक प्रश्न विचारणाऱ्यांचा मारा बोथट केला. संध्याकाळी सरस्वती भुवनच्या मैदानावर खूपच मोठी सभा झाली. सभेतील वसुधा सरदार यांचे भाषणही फार प्रभावी झाले. सभेसाठी व एकूण कार्यक्रमासाठी निशिकांत भालेराव, अ‍ॅड. विष्णू ढोबळे आणि त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनत घेतली. असे कार्यकर्ते हाच या आंदोलनाचा मुख्य आधार आहे.

Tags: पुणे शनिवारवाडा शेतकरी महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलन नाशिक औरंगाबाद बाबा आढाव अण्णा हजारे Pune Shaniwarwada Farmers Maharashtra Anti-Corruption Movement Nashik Aurangabad Baba Adhav Anna Hazare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके