डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराष्ट्र : भारताचा खड्ग-हस्त

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महाराष्ट्राने भारताचा खड्गहस्त या भूमिकेतून कार्य केले. ब्रिटिश साम्राज्याबरोबर झुंज घेताना महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींनी हौतात्म्य पत्करले. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांसारख्या असामान्य कर्तृत्वाच्या नेत्याने अखिल भारताचे नेतृत्व करून स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी करण्यासाठी जन-आंदोलनच केले पाहिजे याची जाणीव लोकांमध्ये निर्माण केली. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' अशी ब्रिटिश राज्यकर्त्यांचा थरकाप उडविणारी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रातील देशभक्तांच्या या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी एक ग्रंथच लिहावा लागेल. या महान कार्याचे ओझरते दर्शन घडविण्याचा माझा हा अल्प प्रयत्न.

उमाजी नाईकाची बहाद्दरी

ब्रिटिशांना विरोध करणारा पहिला वीर, उमाजी नाईक हा होता. रामोशी कुटुंबात 1791 मध्ये पुणे जिल्ह्यात जन्म झालेला उमाजी नाईक हा बेडर वृत्तीचा आणि शूर होता. तो एक चांगला संघटक होता. 1824 च्या फेब्रुवारी महिन्यात उमाजीने भांबुदर्याचा सरकारी खजिना लुटला. 1827 मध्ये उमाजी नाईक आपल्या साथी रामोशांसह कोकणात, कुलाबा जिल्ह्यात - म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यात - उतरला.   25 डिसेंबर 1827 ला त्याने पुढील जाहीरनामा काढला : 'ह्या भागातील पाटील मामलेदार वगैरेंनी इंग्रजांच्या अधिकाऱ्यांकडे महसूल भरू नये, तो आम्ही घेणार आहोत.’  प्रतिसरकार स्थापण्याचा उमाजीचा मनसुबा होता व त्यासाठी कुलाबा जिल्ह्यातले 'आंग्रे व कोल्हापूरचे छत्रपती यांच्याशी संधान बांधण्याचा त्याने प्रयत्न केला.. ब्रिटिशांनी उमाजीस पकडले, पण 16 डिसेंबर 1830 ला त्याने तुरुंगातून पलायन केले. 

तो कऱ्हे पठारावर जेजुरीजवळ प्रगट झाला. उमाजीने 16 फेब्रुवारीला आपल्या सरकारचा जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्याचे मॅकिटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने केलेले इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे. हा जाहीरनामा संपूर्ण हिंदुस्थानच्या रहिवाशांना उद्देशून काढलेला असून, इंग्रजांना हाकलले पाहिजे असे त्यात म्हटले आहे. इंग्रजांचे राज्य संपले पाहिजे व नवे न्यायाधिष्ठित राज्य आले पाहिजे असे जाहीरनामा सांगतो. पुढे ब्रिटिशांनी उमाजीला पकडण्यासाठी सापळा रचला आणि फितुरीमुळे तो सापडला. दीड महिना तुरुंगात ठेवल्यावर त्याला अनेक आरोपांबद्दल फाशीची शिक्षा देण्यात येऊन 1 फेब्रुवारी 1932 रोजी फाशी देण्यात आले. ताठ मानेने जगलेला उमाजी नाईक ताठ मानेनेच फाशीच्या तख्तावर चढला.

1857 चे स्वातंत्र्यसमर

1857 मध्ये स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लक्ष्याचा फार मोठा उठाव झाला. या स्वातंत्र्य समरामध्ये दिल्लीचा मोगल बादशहा बहादुरशहा याच्या बरोबरच नानासाहेब पेशवे होते. या स्वातंत्र्यसंग्रामात तात्या टोपे हे एक प्रमुख सेनानी होते. त्यांनी ब्रिटिशांबरोबर प्रखर झुंज दिली. ग्वाल्हेरचा किल्ला सर केल्यावर तात्या टोपे यांनी विद्युत् वेगाने नर्मदा ओलांडून उत्तरेकडील बंडाची आग दक्षिणेत नेण्याचा प्रयत्न केला. तात्या टोपे यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु गनिमी काव्यात वाकबगार असलेल्या तात्या टोपे यांनी नऊ महिने ब्रिटिश फौजांना हुलकावणी दिली. अखेर 7 एप्रिल 1858 ला तात्या दोपे यांना ब्रिटिशांनी अटक केली. 18 एप्रिलला धीरोदात्तपणे चालत फासाच्या तख्तावर चढून त्यांनी मरणाचा स्वीकार केला. 

1857 च्या स्वातंत्र्यसमरात झाशीची राणी लक्ष्मीबाई विजेप्रमाणे चमकून गेली. लक्ष्मीबाई वृत्तीने स्वाभिमानी होत्या आणि त्यांनी ब्रिटिशांना शरण जाण्यास नकार दिला. हाती तलवार घेऊन आणि पुरुष वेष धारण करून त्या समरांगणात उतरल्या आणि लढता लढता त्यांना मरण आले. नानासाहेब पेशवे, बंड अयशस्वी झाल्यावर नेपाळमध्ये गेले आणि अज्ञातवासातच मृत्यू पावले. 1857 मध्ये वहाबी पंथियांचे पश्चिम भारतातील मुख्य लष्करात उठाव करण्यासाठी त्याने आपली माणसे बेळगाव येथे पाठवली. मुनही महम्मद हुसेन हा बेळगावला पकडला गेला. त्याला कोर्टमार्शल करून तोफेच्या तोंडी देण्यात आले नंतर मौलवी नुसल हसन याला अटक झाली व दीर्घ मुदतीची शिक्षा देऊन त्याला ठाणे तुरुंगात पाठवण्यात आले.

वासुदेव बळवंत फडके यांचे बंड

सशस्त्र बंडाचा यानंतरचा प्रयत्न वासुदेव वळवंत फडके यांनी केला. 1872 च्या दुष्काळात फडके हे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये फिरले आणि उपासमारीने लोक मरताना पाहून या दुर्घटनांना कारणीभूत असलेल्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र बंड करण्याचा त्यांनी निर्धार केला. पांढरपेशा मित्रांचा पाठिंबा मिळाला नाही तरी निराश न होता, वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी तरुणांची संघटना बांधली. दौलतराव हा त्यांचा अत्यंत विश्वासू तरुण सहकारी योद्धा होता. शस्त्रे विकत घेण्यासाठी पैसे हवे होते म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनी काही सावकारांच्या घरांवर दरोडे घातले. त्याच वेळी त्यांनी या सावकारांचे कर्जरोखे ताब्यात घेऊन, गावकऱ्यांसमोर त्या कागदपत्रांची होळी केली आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. 

वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र बंडामुळे ब्रिटिश सरकार हादरले आणि बंडाच्या बातम्या ठळकपणे लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकल्या. ब्रिटिश सरकारने वासुदेव वळवंत फडके यांचे बंड मोडून काढण्यासाठी डॅनिअल या अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याच्या मदतीस फौजफाटा दिला. डॅनिअलबरोबरच्या चकमकीत दौलतराव मारला गेला पुढे वासुदेव बळवंत फडके यांना विजापूर जिल्ह्यात एका खेड्यात ते बुद्ध विहारात झोपले असताना अटक झाली. वासुदेव वळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका यांनी निर्भयपणे घेतले. वासुदेव बळवंतांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा झाल्यावर ते आपल्या रामोशी सहकाऱ्यांना म्हणाले, 'आपल्याला या कठोर शिक्षाबद्दल आनंदच वाटला पाहिजे. शेकडो लोकांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जयजयकार केला. फडके यांना एडनला पाठविण्यात आले. तेथे त्यांचे फार हाल करण्यात आले. एडनलाच वासुदेव बळवंत फडके मरण पावले.

प्रबोधनाचे प्रयत्न

भारताचे स्वातंत्र्य नष्ट होऊन येथे ज्या वेळी ब्रिटिश राजवट सुरू झाली त्या वेळी ब्रिटिशांनी सरकारी कारभार चालविण्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारीवर्ग उपलब्ध व्हावा म्हणून शाळा, काही महत्त्वाच्या शहरांतून कॉलेजे आणि मुंबई, कलकत्ता, मद्रास अशी विद्यापीठे सुरू केली. कॉलेजांतून लावलेल्या पाठ्यपुस्तकांतून येथील नवसुशिक्षितांना अनेक नवे विचार समजले आणि आपल्या समाजाचे प्रबोधन केले पाहिजे असे वाटू लागले. या प्रबोधनाच्या प्रयत्नांमुळेच येथील राजकीय चळवळीचा पाया घातला गेला. अशा प्रयत्नांमध्ये वृत्तपत्र सुरू करण्यास फार महत्व होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832  साली 'दर्पण' हे वृत्तपत्र सुख करून मराठी पत्रकारितेचा प्रारंभ केला. पुढे "प्रभाकर' हे वृत्तपत्र निघाले. 

प्रबोधन करताना आपल्या समाजातील उणिवांची जाणीव निर्माण करणाऱ्या समाजसुधारकांना असे वाटत होते की स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रथम आपण आपल्या समाजातील दोष दूर केले पाहिजेत. लोकहितवादींनी 'प्रभाकर' या वर्तमानपत्रात 'शतपत्रे’ लिहून हे कार्य केले. महात्मा फुले यांनी, जातिभेदाने आपल्या समाजाच्या चिरफळ्या झाल्यामुळे आपण परकीय आक्रमणास तोंड देऊ शकलो नाही हे सांगताना उच्चनीचतेवर आधारलेल्या जातिव्यवस्येवर कठोर प्रहार केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर हेही आघाडीचे पत्रकार: मात्र त्यांची भूमिका वेगळी होती. लोकांचा स्वाभिमान जागृत झाला म्हणजे ते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करू लागतील असे विष्णुशास्त्रींना वाटत होते आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी भारताच्या उज्ज्वल भूतकालाकडे त्यांचे लक्ष वेधले पाहिजे असे त्यांचे मत होते. ‘निबंधमाला' सुरू करून त्यांनी हे कार्य केले. 

प्रबोधनाचे कार्य विविध संस्था स्थापन करून नवनवीन उपक्रमांतून केले पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधून न्या. महादेव गोविंद रानडे यांनी विविध क्षेत्रांत काम केले. वसंतव्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा, अनेक ग्रंथालये अशा विविध कामांतून न्या. रानडे यांनी समाजजीवनात चैतन्य आणले. रानडे हे प्रबोधनाचे आद्य आचार्य, उदारमतवादी विचारवंत, स्वदेशीचे पुरस्कर्ते आणि सार्वजनिक सभेचे संस्थापक. विविध मार्गांनी लोक-जागृती करून त्यांनी स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे बीजारोपण केले. मुंबईस दादाभाई नौरोजी यांनी स्टुडंट्स लिटररी असोसिएशन काढली. भारताच्या दारिद्र्यास ब्रिटिश राज्यकर्तेच कारणीभूत आहेत हे दादाभाईंनी सडेतोडपणे मांडले. इंग्लंडमध्ये जाऊन ते तेथील पार्लमेंटमध्ये निवडून गेले आणि त्यांनी ब्रिटिश साम्राज्याकडून भारताची आर्थिक पिळवणूक कशी होत आहे ते प्रभावीपणे मांडले.

काँग्रेसची स्थापना

भारतातील उदारमतवादी विचारवंत आणि जनहितदक्ष नेत्यांना, भारतीय जनतेच्या आकांक्षा व्यक्त करण्यासाठी एक देशव्यापी व्यासपीठ असावे असे वाटू लागले. या विचारांना आलेले फळ म्हणजे, 1885 मध्ये झालेली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा या मुंबईच्या नेत्यांनी व न्या. म. गो. रानडे यांनी काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेऊन स्वातंत्र्य चळवळीस आवश्यक असलेले व्यासपीठ निर्माण केले. काँग्रेसच्या कार्यात सुरुवातीपासून गोपाळ कृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक यांनी भाग घेतला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1896 साली इंग्लंडमध्ये जाऊन बेल्बी कमिशनसमोर साक्ष दिली आणि भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. 

गोखले हे रानड्यांचे अनुयायी. त्यांनी विधायक भूमिकेतून आणि नेमस्त पद्धतीने जे राजकीय कार्य केले त्याला भारताच्या स्वातंत्र्यलढयात फार महत्त्वाचे स्थान आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर मुख्यतः मध्यमवर्गाच्या समस्या मांडल्या जात. देशातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे जनतेचे लक्ष महात्मा फुले, भालेकर आदींनी वेधले. पुण्यात काँग्रेसचे अधिवेशन भरले असताना, सभामंडपासमोर भालेकर यांनी शेतकऱ्याचा पुतळा उभा करून स्वातंत्र्यलढ्यात शेतकऱ्यांच्या अन्नास स्थान मिळाले पाहिजे याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना दिली.

टिळक व आगरकर यांनी विष्णुशास्त्रींच्या समवेत एकत्र येऊन तरुण पिढीवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार करण्यासाठी पुण्यामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे या तिघांनी ‘केसरी’ व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरीमध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींची बाजू मांडणारे लेखन केल्याबद्दल आगरकर व टिळक यांना चार महिन्यांची शिक्षा झाली. राजकीय कारणासाठी शिक्षा भोगणाऱ्या या दोन तरुण पत्रकारांचा समाजाने गौरव केला. 'केसरी' व 'मराठा' या दोन वृत्तपत्रांतून आगरकर व टिळक यांनी राजकीय जागृती केली. या दोघांचे मतभेद झाल्यावर आगरकरांनी 'सुधारक’ हे वर्तमानपत्र काढले आणि स्वातंत्र्याचा विचार मांडतानाच सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला पाहिजे या मताचा आग्रह धरला आणि आपल्या समाजातील अनेक दोषांवर कडक टीका केली.

राजकारणातील ताण-तणाव

1896 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना टिळकांनी केवळ अर्ज-विनंत्या न करता शेतकऱ्यांना संघटित करून सरकारने फॅमिन कोडची अंमलबजावणी केली पाहिजे. असा दबाव राज्यकर्त्यांवर आणला. अखेर सरकारला ते मान्य करावे लागले.. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली असताना रँड या लष्करी अधिकाऱ्याने लोकांवर अनेक अत्याचार केले व प्रचंड जुलूम केला. यामुळे चिंचवडचे चापेकर बंधू संतप्त झाले आणि त्यांनी या अत्याचाराचा बदला घेण्याचे ठरवले. 22 जून 1897 ला गणेशखिंडीतील मेजवानी संपल्यावर रँड घोडागाडीतून परत जात असताना दामोदर चापेकरने त्याला गोळी घातली आणि जबर जखमी झालेला रँड दुसऱ्या दिवशी मरण पावला. ब्रिटिश सरकार या घटनेने हादरून गेले आणि आरोपींना पकडण्यासाठी सरकारने जबरदस्त दडपशाही सुरू केली. 

टिळकांनी केसरीच्या अग्रलेखातून रँडच्या खुनाचा निषेध करताना, या अतिरेकी मार्गाकडे लोक वळतात ते सरकारच्या जुलमामुळे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच दडपशाहीच्या धोरणावर टीका करताना ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा खरमरीत अग्रलेख लिहिला. सरकारला खुनाच्या खटल्यात टिळकांना गोवायचे होते, परंतु टिळकांचा व चापेकर बंधूंचा संबंध नसल्यामुळे टिळकांच्या विरुद्ध सरकारला पुरावा मिळू शकला नाही. तरी देखील सरकारने टिळकांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तिघाही चापेकर बंधूंना अटक झाली आणि खटला चालून त्यांना देहान्ताची शिक्षा देण्यात आली. 

दामोदर हा भगवद्गीता हातात घेऊन शांतपणे फासाच्या तख्तावर चढला. बाळकृष्ण व वासुदेव हेही धैर्याने मृत्यूला सामोरे गेले. चापेकर बंधूंच्या अतुलनीय त्यागामुळे असंख्य तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित झाली. टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळकांनी या सर्व प्रकरणी जी निर्भयता दाखविली त्यामुळे त्यांना लोकमान्यता लाभली. सुटून आल्यावर लो. टिळकांनी 'पुनश्च हरिः' असा अग्रलेख लिहून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पुन्हा निर्धाराने प्रयत्न सुरू केले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर

दामोदर चापेकर हे ज्या दिवशी फाशी गेले त्या दिवशी त्यांच्या स्मृतीला साक्ष ठेवून नाशिकला विनायक दामोदर सावरकर या तरुणाने मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवन समर्पण करण्याची शपथ घेतली. विनायक आणि त्यांचे बंधू गणेश ऊर्फ बाबाराव यांनी 'अभिनव भारत' ही क्रांतिकारक तरुणांची संघटना उभी केली. विनायकराव सावरकर हे उत्तम वक्ते व तेजस्वी लेखक होते. पुण्यात परदेशी कापडावरील बहिष्काराच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. पुढे सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. त्यांना लंडनमध्ये वकिली करणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मा या देशभक्ताने सुरू केलेली शिष्यवृत्ती मिळाली होती. सावरकर लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मानी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या 'इंडिया हाऊस' या वसतिगृहात राहत. त्यांनी तेथेही अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. 

लंडनला आलेल्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये पांडुरंग महादेव बापट हे गणितामध्ये पहिला वर्ग मिळवून इंजिनियरिंगच्या अभ्यासासाठी आले होते. बापट यांनी पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकण्याचे ठरविले. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बापट व अन्य दोन क्रांतिकारक तरुणांना परिसला पाठविले. तेथे बॉम्ब तयार करण्याची कृती सांगणारी रशियन भाषेतील पुस्तिका बापट यांनी इंग्रजीत भाषांतरित करून घेतली, सरकारने त्यांची शिष्यवृत्ती रद्द केल्यावर बापट भारतात आले आणि त्यांनी आपल्या जवळील पुस्तिका बंगालमधील क्रांतिकारक बारिन्द्रकुमार घोष यांच्याकडे पाठवली. 

सरकारने नाशिकला बाबाराव सावरकरांना अटक केली व त्यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानला पाठविले. याच वेळी नाशिकमध्ये कर्वे, कान्हेरे, देशपांडे आदी क्रान्तिकारक तरुणांचा गट काम करीत होता. सरकारला दहशत बसावी अशी कृती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन हा नाट्यगृहात मराठी नाटक पाहण्यासाठी आला असताना कान्हेरे याने जॅक्सनला गोळ्या घालून ठार केले. पुढे खटला चालून कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना फाशी देण्यात आले. या खटल्याच्या चौकशीत पोलिसांना असे आवळून आले की सावरकरांनी गुप्तपणे जी 21 पिस्तुले भारतात पाठवली, त्यापैकीच एका पिस्तुलाने कान्हेरे याने जॅक्सनला गोळी घातली होती. म्हणून त्यांनी सावरकरांवर अटकेचे वॉरंट काढले. 

सावरकर या वेळी परिसला होते. आपल्या कुटुंबीय मंडळींचा सरकार छळ करीत आहे ही वार्ता त्यांना समजली. या संदर्भात कायदेशीर साहाय्य मिळवण्यासाठी सावरकर लंडनला गेले असताना त्यांना अटक करण्यात आली. बोटीने त्यांना हिंदुस्थानकडे आणण्यात येत असताना मार्सेल्सजवळ सावरकर यांनी पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली आणि पोहून जाऊन त्यांनी फ्रान्सचा किनारा गाठला. ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना एका फ्रेन्च पोलिसाने त्यांना अडवून ब्रिटिश पोलिसांच्या हवाली केले आणि सावरकरांना बोटीने हिंदुस्थानात आणण्यात आले. त्यांच्यावर खटला भरण्यात येऊन त्यांना जन्मठेपेच्या दोन शिक्षा देण्यात आल्या. 

सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर झालेल्या अटकेबाबतचा खटला हेग येथील आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनलपुढे चालला. परंतु निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला. सावरकरांना अंदमानला पाठविण्यात आले. त्यांना तुरुंगाच्या गजाआड घेताना तेथील अधिकारी कुत्सितपणे म्हणाला. 'तरुण माणसा, ही 50 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगण्याइतका काळ तू जगशील असं वाटतं का तुला?' स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्काळ प्रतिप्रश्न केला, 'ब्रिटिशांचे जुलमी राज्य हिंदुस्यानात 50  वर्षे टिकेल असे तुला वाटते काय? 

राजकारणातील टिळक युग

व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली तेव्हा लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. ही चळवळ बंगालपुरती मर्यादित न राहू देता तिला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे कार्य लो. टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल यांनी केले. लो. टिळकांनी स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य असा चतुःसूत्रीचा कार्यक्रम देशापुढे ठेवला आणि तो स्वीकारल्यामुळेच बंगालच्या फाळणीविरुद्धच्या आंदोलनास व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्रप्त झाले. अखेर 1905 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. 1905 नंतर काँग्रेसमधील मवाळ व जहाल यांच्यातील मतभेदांची दरी वाढू लागली. मवाळांचे नेते होते गोपाळ कृष्ण गोखले आणि फिरोजशाहा मेहता. जहालांचे नेते होते लो. टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल. 

1908 मध्ये सुरत येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद विकोपास जाऊन काँग्रेसमध्ये फूट पहली. लो. टिळक, त्यांचे महाराष्ट्रातील अनुयायी हे काँग्रेसबाहेर पडले. महाराष्ट्र व बंगाल येथील तरुण एकत्र होते आणि अरविंद घोष हे क्रांतिकारक नेते हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते. 1908 साली खुदिराम बोसने हिंदुस्थानात पहिला बॉम्बस्फोट केला. खुदिराम बोस यास फाशी देण्यात आले. त्या वेळी केसरीमध्ये अग्रलेख लिहून लो. टिळकांनी त्या हिंसक कृत्याचा निषेध करतानाच ब्रिटिश सरकारच्या जुलमी धोरणामुळेच तरुण हिंसेकडे वळतात असे प्रतिपादन केले. या विषयावर 'बॉम्बगोळ्याचे रहस्य' आणि अन्य पाच अग्रलेख केसरीत प्रसिद्ध झाले. यानंतर लो. टिळकांना अटक करून सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाबद्दल खटला केला. 

या खटल्यात लो. टिळकांना ज्यूरीने जेव्हा दोषी ठरवले तेव्हा लोकमान्य एकदम उभे राहिले आणि म्हणाले, 'ज्यूरीने मला दोषी ठरविले असले तरी मी निर्दोषी आहे. लौकिक गोष्टीचे नियंत्रण करणारी अशी एक शक्ती न्यायपीठाहूनही श्रेष्ठ आहे. कदाचित नियतीचीच अशी इच्छा असेल की मला शिक्षा व्हावी आणि मी मुक्त राहण्यापेक्षा माझ्या शिक्षा भोगण्यामुळेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जितावस्था यावी! न्यायाधीशांनी लो. टिळकांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांना ब्रह्मदेशात मंडाले येथील तुरुंगात पाठविण्यात आले. कारावासात असताना टिळकांनी 'गीतारहस्य' हा अपूर्व ग्रंथ लिहिला. भारतातून जे तरुण अमेरिकेत शिकण्यास गेले, त्यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तळेगाव (तमढेरे) येथील विष्णु गणेश पिंगळे व वर्धा येथील खानखोजे हे दोन तरुण होते. 

अमेरिकेत गेल्यावर हे दोघेही तरुण लाला हरदयाळ यांच्या क्रांतिकारी संघटनेत सामील झाले आणि त्यांनी गदर पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. 1914 साली गदर पक्षाने पिंगळे यांना हिंदुस्थानात पाठवले. त्यांनी सैन्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. फितुरीमुळे पिंगळे हे पकडले गेले आणि त्यांना लाहोर येथे फाशी देण्यात आले. 1914 साली सुटून आल्यावर काही काळाने लो. टिळकांनी होमरूल लीगची स्थापना केली. लोकमान्य टिळकांना सतत साहाय्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अमरावतीचे दादासाहेब खापर्डे अग्रभागी होते. त्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील बापूजी अणे आणि बेळगावचे गंगाधरराव देशपांडे हे जहाल तरुण कार्यकर्तेही टिळकांचे अनुयायी होते. 1916 च्या लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात कॉंग्रेसमधील फूट सांधली गेली. 

लो. टिळकांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पुढाकार घेऊन हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी लखनौ करार केला. या वेळी बॅ. जीना यांनी लोकमान्यांना साथ दिली. 1916 ते 1918 या काळात लोकमान्य टिळकांनी देशभर आणि विशेषतः महाराष्ट्रात झंझावाती दौरा करून अनेक भाषणे केली आणि लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचे आवाहन केले. याच वेळी त्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक आहे आणि तो मी मिळविणारच' ही चैतन्यदायी घोषणा केली. 1920 च्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचे निधन झाले.

गांधीयुगाचा प्रारंभ

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले आणि भारतातील राजकीय क्षितिजावर ते चमकू छागले. ब्रिटिश सरकारने नागरी स्वातंत्र्यावर याला घालणारा रौलट अ‍ॅक्ट 1919 मध्ये पास केल्यावर गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने त्याला विरोध करण्याचे ठरवले. त्या वेळी लो. टिळक इंग्लंडमध्ये होते. त्यांनी 'मी भारतात असतो तर तुमच्या सत्याग्रहात सामील झालो असतो', अशा आशयाची तार गांधींना केली. पंजाबमधील गव्हर्नरने रौलट अॅक्ट विरोधी चळवळ चिरडून टाकण्यासाठी जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या लोकांवर भीषण गोळीबार करून एक हजाराहून अधिक लोकांची कत्तल केली. या हत्याकांडानंतर गांधीजींनी असहकाराची चळवळ करण्याचे जाहीर केले. दरम्यान लो. टिळकांचे निधन झाले. 

गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीला देशभरातून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला, परंतु महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व करणारे तात्यासाहेब केळकर यांना ही चळवळ मान्य नव्हती. तात्यासाहेब हे लोकमान्यांचे अनुयायी असूनही वृत्तीने व मताने मवाळ होते. त्यामुळे ते चळवळीपासून अलिप्त राहिले. तेव्हा शंकरराव देव यांनी धडाडीने गांधीजींच्या विचारांचा व चळवळीचा प्रचार करून महाराष्ट्रात असहकाराच्या चळवळीस पाठिंबा मिळवून दिला. केळकर गांधीजींच्या चळवळीपासून दूर राहिले. परंतु खाडिलकर, शिवरामपंत परांजपे आदींनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यामुळे 1920 च्या असहकाराच्या चळवळीतही अनेक तरुणांनी उत्साहाने स्वतःला झोकून दिले. देवांना सहकार्य देणाऱ्यांमध्ये देवगिरीकर आणि दास्ताने, तसेच लागू, वि. प्र. लिमये आणि बुवा गोसावी ही तरुण मंडळी होती. 

रत्नागिरीचे आप्पा पटवर्धन यांनी एल्फिन्स्टन कॉलेजातील नोकरी सोडून असहकार आंदोलनात भाग घेतला. विदर्भामध्ये बॅ. अभ्यंकर यांच्या तडफदार नेतृत्वाखाली असहकाराच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. लोकमान्य टिळकांचे एकनिष्ठ अनुयायी बापूजी अणे यांनीही चळवळीत हिरिरीने भाग घेतला. नागपूरचा झेंडा सत्याग्रह या वेळी फार गाजला. या आंदोलनानंतर महाराष्ट्रात मुळशी धरणाविरोधी सत्याग्रह आंदोलन झाले. एका वेळी क्रांतिकारक चळवळीत भाग घेणारे पां. म. बापट यांनी दीर्घकाळ कारावास सोसल्यानंतर पुनश्च राजकारणात उडी घेतली. बापटांनी मुळशी धरणाच्या परिसरातील मावळ्यांना संघटित करून मुळशी धरणाविरुद्ध आणि टाटांविरुद्ध शेतकऱ्यांसह लढा दिला. मुळशी सत्याग्रहापासून ते सेनापती बापट म्हणून ओळखले जाऊ लागले. 

या लढ्यात बाळूकाका कानिटकर, विनायकराव भुस्कुटे आदींनी धैर्याने व निष्ठेने कार्य केले. पुढे शंकरराव देव यांच्या हातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्रे आली. त्या वेळी केळकर हे कौन्सिल प्रवेशवादी असल्यामुळे मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य पक्षात गेले 1926 पासून काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे जहाल भूमिका घेऊन तरुणांचे नेतृत्व करू लागले. त्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्रात यूथ लीग स्थापन झाली. मुंबईचे युसूफ मेहेरअली, तसेच पुण्याचे एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, र. के. खाडिलकर हे तरुण यूथ- लीगचे नेतृत्व धडाडीने करू लागले.

नवे क्रांतिकारी प्रवाह

याच वेळी उत्तर हिंदुस्थानात भगतसिंगांनी क्रांतिकारकांची 'हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन' अशी संस्था स्थापन केली. त्यांना साथ देणाऱ्या तरुणांमध्ये महाराष्ट्रातील शिवराम राजगुरू, सावरगावकर आणि वैशंपायन हे तरुण होते. लाहोरमध्ये साँडर्स या अधिकाऱ्यास राजगुरू यांनीच गोळी घालून ठार मारले. पुढे लाहोर कटाच्या खटल्यात ते प्रमुख आरोपी होते आणि आणि भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बरोबर त्यांनाही फाशी देण्यात आले. भगतसिंग, राजगुरू व त्यांचे सहकारी यांच्या अपूर्व त्यागामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना सशस्त्र क्रांतीचे आकर्षण वाटू लागले. 1920 सालापासून भारतामध्ये रशियातून साहित्य येऊ लागले. मानवेन्द्रनाथ रॉय हे साहित्य पाठवीत. मुंबईमध्ये गिरणी कामगारांची संघटना करणाऱ्या श्रीपाद अमृत डांगे, निंबकर आदींकडे हे साहित्य येऊ लागले. डांगे, मिरजकर आदींनी येथे गुप्तपणे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. 

या चळवळीत डॉ. गंगाधर अधिकारी, बी. टी. रणदिवे आदी तरुणही सामील झाले. सरकारला या हालचालींची खबर मिळताच त्यांनी ही चळवळ चिरडून टाकण्याचा निर्णय घेतला. 20 मार्च 1929 ला वेगवेगळ्या औद्योगिक केन्द्रांतील ट्रेड युनियनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यांच्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, निंबकर, जोगळेकर, मिरजकर, डॉ. अधिकारी आदी कार्यकर्ते होते. सरकारने या सर्वांना मीरत कटाच्या खटल्यात आरोपी केले. हा खटला खूपच गाजला आणि तरुणांना साम्यवादी विचारांबद्दल आकर्षण वाटू लागले. या खटल्यात डांगे, मिरजकर आदींना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. कारावासाच्या सरकारने नवीन सुधारणा कायदा पास करण्यापूर्वी लोकमत अजमावण्याकरिता सायमन कमिशन नेमले. काँग्रेसने या कमिशनवर बहिष्कार टाकून त्याविरुद्ध निदर्शने केली. 'सायमन गो बॅक’ या घोषणांनी देश दुमदुमून गेला. 

मुंबईला सायमन कमिशन आले असताना युसूफ मेहेरजलींच्या नेतृत्वाखाली प्रचंड निदर्शने झाली. यात पुण्याचे यूथ लीग कार्यकर्तेही सामील झाले. पुढे 1929 साली पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव 31 डिसेंबर 1929 ला पास झाला आणि 26 जानेवारी हा स्वातंत्र्यदिन पाळण्याचे आवाहन पंडित नेहरूंनी केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा, ध्वजवंदन हे कार्यक्रम करून 26 जानेवारीस स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. लाठीमार, धरपकड याला लोकांनी जुमानले नाही व स्वातंत्र्याची जागोजाग शपथ घेतली. पुढे 1930 सालचे कार्यदेभंग आंदोलन गांधीजींनी सुरू केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो सत्याग्रही सामील झाले. 

शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह, मुंबईतील वडाळा येथील मिठाचा सत्याग्रह, सातारा जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील जंगल सत्याग्रह यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबईला महिला सत्याग्रहींवर आझाद मैदानात निष्ठुर लाठीमार करण्यात आला. परंतु स्त्री सत्याग्रहींनी तिरंगी झेंडा खाली पडू दिला नाही. हंसा मेहता, अवंतिकाबाई गोखले, पेरिनवेन् कॅप्टन, प्रेमाताई कंटक, मीनाक्षीचाई सरदेसाई, दुर्गा भागवत आदी शेकडो स्त्रीयांनी सत्याग्रहात भाग घेऊन कारावास सोसला. एस. एम. जोशी, गोरे, खाडिलकर यांच्या बरोबरच नगरचे रावसाहेब पटवर्धन तसेच खानदेशात साने गुरुजी यांच्यासमवेत असंख्य तरुणांनी महाराष्ट्रात सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास भोगला. विदर्भामध्ये दादा धर्माधिकारी, वीर वामनराव जोशी, प्रमिलाताई ओक यांच्या तडफदार नेतृत्वामुळे अनेक तरुणांनी कायदेभंग करून कारावास आनंदाने स्वीकारला. 

मराठवाड्यातील रामानंद तीर्थ आणि त्यांचे सहकारी यांनीही या सत्याग्रह-आंदोलनात कारावास भोगला आणि त्यामुळे हैद्राबाद संस्थानातील मराठवाड्यात नव्या पिढीत मोठीच राजकीय जागृती झाली. 1930 चे आंदोलन हे अहिंसक होते, तरीही काही स्वातंत्र्यवीरांना हौतात्म्य स्वीकारावे लागले. 1931 साली सोलापूर येथे ब्रिटिश सरकारने मार्शल लॉ पुकारला असताना, अनंतराव काळे व अन्य तिघांनी 'छातीवर गोळी घेण्यास आम्ही तयार आहोत' असे सांगून मार्शल लॉचा भंग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश सरकारने अनेकांवर खटले भरून मल्लाप्पा धनशेट्टी सारडा, शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावली व येरवडा तुरुंगात या चौघांना फाशी दिले.

मुंबईत विदेशी कापडावरील बहिष्काराच्या कार्यक्रमामध्ये बाबू गेनू हा शूर गिरणीकामगार परदेशी कापड नेणाऱ्या ट्रकसमोर जाऊन खाली पडून राहिला आणि त्याने ट्रक चालवली. तेथील ब्रिटिश सोल्जरने दिलेल्या धमकीस त्याने जुमानले नाही. त्या वेळी त्याच्या अंगावर ट्रक घालण्यात आला. बाबू गेनूच्या बरगड्या मोडल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्याला वीरमरण आले, लोकमान्य टिळकांच्या काळात स्वातंत्र्याची चळवळ मध्यमवर्गात रुजली परंतु ती बहुजनसमाजापर्यंत पोहोचली नव्हती. गांधीजींनी सामाजिक बाबतीत पुरोगामी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रातील बहुजनसमाज स्वातंत्र्य आंदोलनाकडे आकृष्ट होऊ लागला. 

विठ्ठल रामजी हे तपस्वी वृत्तीचे समाजसुधारक होते. त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आंदोलनात भाग घेतला. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन केशवराव जेधे हे घडाडीने चळवळीत पडले. पुढे जवळकर यांनीही कायदेभंग चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगला. महाराष्ट्रातील बहुजनसमाजाला स्वातंत्र्यआंदोलनात आणण्याचे फार मोठे श्रेय तात्यासाहेब जेधे व काकासाहेब गाडगीळ या नेत्यांनाच दिले पाहिजे. विदर्भात ब्राह्मणब्राद्मणेतर वाद फारसा नसल्यामुळे तेथील बहुजनसमाजातील कार्यकर्ते चळवळीत सामील झालेलेच होते. 1932 साली ब्रिटिश सरकारने दलितांना विभक्त मतदार संघ देणारा जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केल्यावर गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. त्या वेळी डॉ. आंबेडकरांनी गांधीजींच्या या प्रश्नावरील भूमिकेशी मतभेद व्यक्त करून 'दलितांना न्याय हवा, दया नको, सहानुभूती नको', ही भूमिका स्पष्टपणे मांडली. 

या वेळी झालेल्या विचारमंथनामध्ये महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी 'अस्पृश्यता’ हा आपल्या समाजावरील कलंक असून तो दूर न झाल्यास स्वातंत्र्याची चळवळ व्यापक अनि समाजाच्या मनाच्या साखळ्या तोडू शकणार नाही', या गांधीजींच्या मताला दुजोरा दिला. स्वातंत्र्यचळवळीमध्ये भाग घेणाऱ्या अनेकांना सामाजिक समतेच्या आवश्यकतेचे महत्त्व समजलेही नव्हते. या दोषाची स्पष्ट जाणीव तथाकथित उच्चवर्णीयांना देऊन डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाचे कार्य केले त्याचप्रमाणे त्यांनी दलित समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्यांना 'अन्यायापुढे मान न तुकवता माणूस म्हणून जगा' अशी शिकवण दिली. जेथे समाजाचा भाग असलेला एखादा गट वा वर्ग लाचार राहील आणि मानवी जीवनाची प्रतिष्ठा त्याला नाकारण्यात येईल त्या समाजातील स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठी उणीव आहे हे आंबेडकरांनी रोखठोकपणे मांडले. हे एक महान कार्य होते. 

1932 साली जयप्रकाश नारायण हे बिहारचे तरुण नेते नाशिक तुरुंगात होते. त्यांच्या प्रभावामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मार्क्स आणि एंगल्स यांच्या ग्रंथांचे वाचन केले आणि त्यांना समाजवादाबद्दल आकर्षण वाटू लागले. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रभागी राहून लढ्याला जहाल वळण देणे आणि शेतकरी व कामगारांच्या संघटना करणे यासाठी काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय नाशिक तुरुंगातच घेण्यात आला आणि 1934 साली मुंबई येथे या पक्षाची स्थापना करण्यात आली. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांमध्ये महाराष्ट्रातील युसूफ मेहेरअली, मिनू मसानी, अशोक मेहता, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आदी नव्या दमाचे तरुण कार्यकर्ते होते. 1936 साली काँग्रेसने आपले अधिवेशन ग्रामीण भागात येण्याचे ठरवले आणि महाराष्ट्राने पुढाकार घेऊन खानदेशात फैजपूर येथे हे अधिवेशन घेतले. 

या निमित्ताने खानदेशात सर्वत्र दौरा काढून आणि भाषणे करून साने गुरुजींनी मोठी राजकीय जागृती घडवून आणली. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे अधिवेशन यशस्वी करून दाखवले. 1935 च्या सुधारणा कायद्यानुसार हिंदुस्थानला प्रांतिक स्वायत्तता मिळाली. या कायद्यानुसार देशात असेंब्लीच्या निवडणुका झाल्या. 'काँग्रेसला मत म्हणजे स्वातंत्र्याला मत' या सूत्राच्या आधारे पंडित नेहरूनी देशभर दौरा केला आणि सात प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले. महाराष्ट्रातही कांग्रेसला भरघोस बहुमत लाभले आणि बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मंत्रिमंडळ स्थापन झाले. 

स्वातंत्र्यलढ्याचे अखेरचे पर्व 

पुढे 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्या वेळचे व्हाइसरॉय विलिंग्डन यांनी इंग्लंडच्या बाजूने हिंदुस्थान युद्धात सामील झाला आहे असे जाहीर केले. त्या वेळी काँग्रेसने युद्धविरोधी भूमिका घेऊन सातही प्रांतांतील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. पुढे महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. या वेळी महाराष्ट्रातील सत्याग्रह आंदोलनाचे संघटन शंकरराव देव यांनी कौशल्याने केले. गांधीजींनी आचार्य विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून निवडले आणि विनोबाजींनी सत्याग्रह केल्यावर त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा झाली. युद्धविरोधी भूमिकेबद्दल अनेक समाजवादी व साम्यवादी पुढाऱ्यांना महाराष्ट्रात अटक झाली. पुढे वातावरण तापत चालले आणि महात्मा गांधींनी 'हरिजन' मधून ब्रिटिशांनी येथून चालते व्हावे अशी घोषणा केल्यावर महाराष्ट्रात तरुणांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. 

1941 साली जयप्रकाश नारायण हे राजस्थानमधील तुरुंगात असताना त्यांनी समाजवादी पक्षातील आपल्या सहकाऱ्यांना एक गुप्त पत्रक पाठवले. या पत्रकात या पुढील चळवळ केवळ सत्याग्रहाची वा कायदेभंगाची करून चालणार नाही. भूमिगत चळवळ करून सरकार खिळखिळे करावे लागेल' असे त्यांनी कळवले होते आणि अशा चळवळीत साबोटेजिंग (घातपाती कृत्ये) कसे व कोणत्या पद्धतीचे करावयाचे याच्या सूचना होत्या. महाराष्ट्रातील काँग्रेस समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 1942 च्या जानेवारीपासूनच भूमिगत चढवळीची तयारी करण्यास सुरुवात केली. पुण्याचे शिरुभाऊ लिमये यांनी गुप्त चळवळीची यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली. 1942  च्या जून महिन्यात पुण्यात एक गुप्त शिबिर झाले. या शिबिरात कार्यकर्त्यांना भूमिगत चळवळीबाबत  सूचना देण्यात आल्या. 

सरकारच्या विशेषतः सैन्याच्या दळणवळणात अडथळे आणण्यासाठी तारा तोडणे, पूल उडवणे आदी कार्यक्रम कसे पार पाडावयाचे, तसेच गुप्त पत्रके छापून त्यांचे वाटप कसे करावयाचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सात व आठ ऑगस्ट 1942  ला मुंबईत गवालिया टैंक मैदानावर अ.भा. काँग्रेस कमिटीचे अधिवेशन भरून 'किट इंडिया' हा ठराव एकमताने मंजूर झाला. देशातील स्वातंत्र्यसंग्रामाचे अखेरचे पर्व मुंबईत या अधिवेशनाने सुरू झाले. गांधीजींनी “करेंगे या मरेंगे" असा संदेश भारतीय जनतेला दिला. 9 ऑगस्टला पहाटे गांधीजी आणि अन्य नेत्यांना अटक झाल्याची बातमी समजताच मुंबईत अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या. पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधूर सोडला परंतु लोक हटले नाहीत. 

काही ठिकाणी गोळीबार करण्यात आला आणि निदर्शकांतील काही जण मृत्युमुखी पडले. विदर्भात वर्धा जिल्ह्यात चिमूर येथे गोळीबार करणाऱ्या पोलिसांवर जमावाने प्रतिहल्ला केल्यामुळे काही पोलीस मारले गेले सरकारने लष्कर आणले व भीषण अत्याचार केले. अनेक स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली. गावातील सर्व तरुणांना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यापैकी अनेकांच्यावर खटले भरण्यात येऊन काही जणांना फाशी अनेकांना जन्मठेप व दीर्घमुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. अनसूयाबाई काळे या कार्यकर्त्या बाईनी प्री-व्ही कौन्सिलपर्यंत या तरुण आरोपींची केस लावली व फाशीची शिक्षा झालेल्या सर्वांचे प्राण वाचवले. 

नागपूरला हिंदुस्थान रेड आर्मी म्हणून क्रांतिकारक संघटनेने मुख्यतः भूमिगत चळवळ चालवली. मगनलाल बागडी, श्यामनारायण काश्मिरी हे त्यांचे नेते होते. आबाजी दांडेकर, बारलिंगे आदींनीही भूमिगत चळवळ सतत चालू ठेवली. या सर्वांचा अच्युतराव पटवर्धन यांच्याशी निकटचा संबंध होता. विदर्भामध्ये मधुसूदन वैराळे, तिडके आदी विद्यार्थी नेत्यांनी चळवळीत भरीव कामगिरी केली. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरुवातीस तीव्र निदर्शने झाली. सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक कार्यकर्त्यांना पकडून स्थानबद्ध करण्यात आले. अनेक ठिकाणी लोकांनी सरकारी कचेऱ्यांवर मोर्चे काढले. यामध्ये सातारा जिल्ह्यात वडूज येथे परशुराम पैलवान महाड येथील मोर्चाचे नेतृत्व करताना पुण्याचा वसंत दाते व अन्य तीन तरुण पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडले. 

नंदुरबारला शिरीषकुमार व त्याच्या बरोबरीचे तीन शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी गुप्त पत्रके (बुलेटिन्स) नियमाने सायक्लोस्टाइल केली जात व जिल्हयातील प्रमुख ठिकाणी ती वाटली जात. पुणे, मुंबई, नागपूर येथून विशेष पत्रके निघत. ज्या वेळी देशातील प्रमुख नेत्यांना अटक झाली त्या वेळी पूर्वीच ठरल्याप्रमाणे अनेक समाजवादी नेते भूमिगत झाले. या नेत्यांची बैठक मुंबईत होऊन अच्युतराव पटवर्धन यांनी भूमिगत चळवळीचे प्रमुख म्हणून सूत्र-संचालन करावे असा निर्णय घेण्यात आला. अरुणा असफअली, डॉ. लोहिया व एस. एम. जोशी यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन तेथे भूमिगत चळवळ संघटित करण्याचे ठरले. मुंबईत विठ्ठल जव्हेरी आणि उषा महेता आदी विद्यार्थ्यांनी डॉ. लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तपणे स्वतंत्र भारताचे रेडिओ केन्द्र सुरू केले. 

महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीचे प्रमुख शिरुभाऊ लिमये हे होते. मिरवणुका व निदर्शने यांचा जोर पहिल्या तीन महिन्यांनंतर काहीसा कमी झाल्यावर भूमिगत चळवळ अधिक संघटितपणे सुरू झाली. ज्या ठिकाणी सरकार दुबळे असेल या दुबळे झाले असेल अशा भागात प्रतिसरकार उभे करण्याची योजना महाराष्ट्रात आखण्यात आली. माथेरानचे भाई कोतवाल यांनी ठाकूर व अन्य आदिवासींच्या मदतीने सिद्धगड विभागात आपले प्रबल केन्द्र उभे केले. काही दिवसांनी या केन्द्राचा बीमोड करण्यासाठी ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांनी सिद्धगडास वेढा दिला. त्या वेळी कोतवाल आणि हिराजी हा त्यांचा सहकारी यांनी निकराने प्रतिकार केला आणि लढता लढता ते मारले गेले. सातारा जिल्ह्यात नाना पाटील व त्यांचे अनेक सहकारी यांनी भक्कम संघटना उभी करून प्रति-सरकार स्थापन केले. त्यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त केला. 

गरीब शेतकऱ्यांना पिळणाऱ्या सावकारांची सावकारी नष्ट केली आणि स्वतंत्र न्यायदान व्यवस्थाही सुरू केली. हे प्रतिसरकार उखडण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. 1945 पर्यंत गनिमी काव्याने हे बहाद्दर स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश सरकारशी निकराने लढले. भूमिगत असताना एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये, साने गुरुजी हे मुंबईत 'मूषक महाल’ या त्यांच्या जागेत पकडले गेले. पुण्यात कॅपिटॉल सिनेमात बॉम्बस्फोट होऊन पाच ब्रिटिश सोल्जर ठार झाले. या नंतर सरकार फार खवळले. पुण्याजवळील खडकी येथील अॅम्युनिशन फॅक्टरीतून आणि देहू रोड डेपोतून दारुगोळा बाहेर पळविण्यात येतो व तो भूमिगतांना मिळतो हेही सरकारला कळले. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. अनेकांचा पोलीस लॉकअपमध्ये भयंकर छळ करण्यात आला. यानंतर कॅपिटॉल बॉम्बकेस व महाराष्ट्र कटाचा खटला असे दोन खटले भरण्यात आले. 

कॅपिटॉल बॉम्बकेसमध्ये शिरुभाऊ लिमये, बापू साळवी, बाबुराव चव्हाण, रामसिंग परदेशी, हैद्राबादचा कुलकर्णी, हरि लिमये, दत्ता जोशी, भाल वायाळ, बापू डोंगरे आदी तरुण कार्यकर्ते आरोपी होते. महाराष्ट्र कटाच्या खटल्यात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आदी सव्वीसजण आरोपी होते. परंतु पुराव्याअभावी दोनही खटल्यांत कोणासही शिक्षा झाली नाही. मात्र सरकारने सर्वांना स्थानबद्ध करून तुरुंगात डांबले. मराठवाड्यातील अनेक कार्यकर्ते पुण्या-मुंबईकडे वा नागपूरकडे. गेले आणि त्यांनी चळवळीत भाग घेतला. विजयेन्द्र काब्रा या साहसी तरुणाने खूपच मर्दुमकी गाजविली. भारतात चलेजाव चळवळीत उत्तरप्रदेशात बालिया, बंगालमध्ये मिदनापूर या ठिकाणीही काही काळ प्रतिसरकार होते. 

परंतु भारतात सर्वात अधिक काळ प्रतिसरकार टिकले ते सातारा जिल्ह्यातील नाना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे. गनिमी काव्याने लढून महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा उज्ज्वल वारसा चालविला! नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला अपूर्व लढा हा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील परमोच्च बिंदू, आझाद हिंद सेना उभारून आणि आझाद हिंद सरकार स्थापन करून सुभाषबाबूंनी ब्रिटिश साम्राज्याचा पायाच उखडला. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांनी अतुल कामगिरी केली. जपानने अटक केलेल्या ब्रिटिश सेनेतील भारतीय अधिकारी व सैनिक यांना सुभाषबाबूंनी स्वातंत्र्यासाठी बलिदान करण्याचे आवाहन केल्यावर जगन्नाथराव भोसले आणि अन्य अधिकाऱ्यांनी सेना उभारण्याची जबाबदारी घेतली. सुभाषबाबूंनी भोसले यांच्याकडे लष्करी कारवाईची सर्व जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती असामान्य कार्यक्षमतेने पार पाडली. 

सुभाषबाबूंचा 'चलो दिल्ली' हा आदेश पाळण्यासाठी मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांनी सेनेची उभारणी केली आणि इम्फाळ मोहिमेची आखणी करून सर्व लष्करी डावपेच लढवले. या त्यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त आहे हे पुनक्ष सिद्ध झाले. आझाद हिंद सेना जरी दिल्ली जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकली नाही, तरी सेनादल नौदल आणि वायुदल यांमधील भारतीय जवानांवर त्याचा विलक्षण प्रभाव पडला. आझाद हिंद सेनेच्या शहानवाज, सहगल व धनु या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश लष्करी कोर्टामध्ये खटला सुरू झाला तेव्हा मराठा लाइट इन्फन्ट्रीतील जवानांनी आपसात वर्गणी गोळा करून पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीस, 'आम्ही ही रक्कम आझाद हिंद सेनेतील वीरांवरील खटल्यात आमचा अल्पसा निधी म्हणून आपल्या समितीकडे पाठवीत आहोत. त्याचा स्वीकार व्हावा', असे कळवले. 

परंतु निधी देऊन जवानांचे समाधान होत नव्हते. अखेर 18 फेब्रुवारी 1946 ला नौदलातील नाविकांनी (रटिंग्जनी) मुंबई, कलकत्ता आणि कराची येथील युद्धनौकांवर उठाव केला. मुंबई नौसैनिकांचे बंड अत्यंत तीव्र होते. या नौसैनिकांमध्ये अनेक मराठी तरुण होते. नौसैनिक 'इन्किलाब जिंदाबाद' म्हणत मुंबईच्या रस्त्यांवर आले तेव्हा मुंबईच्या शूर कामगारांनी व अन्य नागरिकांनी त्यांना मोठी साथ दिली. ब्रिटिशांनी हा उठाव चिरडण्यासाठी लष्कर व रणगाडे आणले. परंतु मुंबईतील जनता हटली नाही. लष्कराच्या गोळीबारात कमल दोन्दे या कम्युनिस्ट कार्यकर्त्या आणि अन्य दोनशे अट्ठवीस जण ठार झाले. मुंबईतील मराठी जनता नौसेनेतील बंडखोर जवानांच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली. 23 फेब्रुवारीला सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने समेट झाला. 18 फेब्रुवारीस नौदाचे बंड झाले, 19 मार्चला ब्रिटनचे पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला.

हैद्राबादचा स्वातंत्र्य लढा

स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात सरदार पटेल यांच्या मुत्सद्दीपणामुळे जवळ जवळ सर्व संस्थाने भारतात विलीन झाली तरी हैद्राबादच्या निजामाच्या दुष्ट कारवाया 15  ऑगस्ट 1947 नंतरही चालू होत्या. निझामाच्या पाठींब्यामुळे 'रझाकार’ ही अतिरेकी संघटना निर्माण होऊन रझाकारांनी अनन्वित अत्याचार सुरू केले. परंतु तरीही हैद्राबाद संस्थानातील जनता अन्यायाविरुद्ध लढत राहिली. याचे कारण हैद्राबादची स्वातंत्र्यचळवळ भारताच्या अन्य भागांतील स्वातंत्र्य चळवळीबरोबर अनेक वर्षे यापूर्वीही चालली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद स्टेट पीपल्स काँग्रेस स्थापन करून सत्याग्रह केला होता. आर्य समाजाने दीर्घ काळ निर्भयपणे राजकीय जागृती करून सत्याग्रहही केला होता. 1939 साली हिंदु महासभेच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातून अनेक सत्याग्रहींनी निझामी तुरुंगात अनन्वित हाल सहन केले. 

स्वामी रामानंद तीर्थाच्या समवेत मराठवाड्यातील आनंदराव वाघमारे, बाबासाहेव परांजपे यांच्यापासून प्रेरणा घेऊन तयार झालेले अनेक कार्यकर्ते हैद्राबाद लढ्याच्या अखेरच्या पर्वात समर्पणभावनेने सामील झाले. यांच्यामध्ये काही जणांवर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता तर काही जण गांधीवादी होते. 1946 मध्ये गोविंदराव पानसरे हे गांधीवादी कार्यकर्ते मारले गेले. हैद्राबादचा लढा हे एक अग्निदिव्य होते. भूमिगत कार्यकर्त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर हैद्राबादच्या बाहेरही आपल्या छावण्या नेल्या. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात मनमाड व अकोला जिल्ह्यात वाशीम येथे अशा छावण्या होत्या. तेथून शस्त्रे घेऊन क्रांतिकारक कार्यकर्ते आत जात. 

अनंतराव भालेराव, विनायकराव चारठाणकर, अँड. देशपांडे, चंद्रगुप्त चौधरी, शामराव बोधनकर, अॅड. चपळगावकर, कोटेचा बंधू यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांनी प्राणपणाने काम करीत हैद्राबाद संस्थानातील मराठवाड्यात स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवला. तेलंगण व कर्नाटकात लढा चालू होताच. अखेर सरदार पटेलांनी 'पोलीस अॅक्शन' चा निर्णय घेतला, 13 सप्टेंबर 1948  ला भारतीय सेना हैद्राबादमध्ये कूच करून आल्या. 18 सप्टेंबर 1948 ला निझामाने शरणागती पत्करली आणि हैद्राबादमधील जनता स्वतंत्र झाली. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ व मराठवाड्यातील त्यांचे शूर सहकारी यांची कामगिरी अमोल होती.

गोवा मुक्तिसंग्राम

ब्रिटिशांनी 1947 साली भारत सोडला तेव्हाच फ्रान्सने येथील फ्रेंच वसाहतींना स्वातंत्र्य दिले, परंतु पोर्तुगीजांनी मात्र गोवा, दमण, दीव या प्रदेशावर आपले राज्य चालू ठेवले. यांपैकी गोवा हा मराठी भाषिक विभाग मुक्त व्हावा ही आकांक्षा केवळ तेथील जनतेचीच नव्हे तर महाराष्ट्राचीही होती. गोव्यातील जनतेने पूर्वी स्वतंत्र होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये सत्तरीचे राणे यांनी केलेला उठाव हा महत्त्वाचा होता. पोर्तुगीजांचा जुलूम सोसताना गोव्याच्या जनतेने मराठी भाषा व संस्कृती टिकवली. हा स्वातंत्र्य-प्रयत्नाचाच एक भाग होता. 1946 साली डॉ. लोहिया गोव्यात गेले आणि त्यांनी गोवा स्वतंत्र झाला पाहिजे ही घोषणा केली. त्या वेळी त्यांना गोव्यातील अनेकांनी साथ दिली. 

महाराष्ट्रातूनही या मागणीस पाठिंबा मिळाला. परंतु चळवळ सुरू होताच पोर्तुगीजांनी पुरुषोत्तम काकोडकर, ब्रॅगांझा कुन्हा, लक्ष्मीकांत भेंद्रे, शिरोडकर, डॉ. गायतोंडे आदी नेत्यांना अटक करून दीर्घ मुदतीच्या शिक्षा दिल्या व पोर्तुगालला पाठवून दिले. गोवा नॅशनल काँग्रेसचे पीटर अल्वारीस व त्यांचे सहकारी यांनी 1953 पासून लढा सुरू केला. गोव्यात भूमिगत चळवळ उभी राहिली. विश्वनाथ लवंदे हे एक प्रमुख भूमिगत कार्यकर्ते. त्या वेळी पोर्तुगीजांनी पुन्हा जबरदस्त जुलूम करून सत्याग्रहींना मारहाण करणे व कठोर शिक्षा देणे हे सत्र सुरू केले. पुण्यामध्ये नानासाहेब गोरे आणि जयंतराव टिळक यांनी 1954 मध्ये 'गोवा मुक्तिसंग्राम सहायक समिती' स्थापन केली. केशवराव जेधे या समितीचे अध्यक्ष होते. 

समितीने सत्याग्रही तुकड्या पाठविण्याचे ठरवले. पहिल्या सत्याग्रही तुकडीचे नेते नानासाहेब गोरे होते. त्यांच्या बरोबर वयोवृद्ध नेते सेनापती बापटही होते. त्यांना व सर्व सत्याग्रही तुकड्यांना पोर्तुगीज पोलिसांनी भीषण मारहाण केली. तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये शिरुभाऊ लिमये, जगन्नाथराव जोशी, वि. घ. देशपांडे, मधू लिमये आदी मराठी नेते होते. त्या सर्वांना लष्करी कोर्टाने बारा वर्षांची शिक्षा देऊन आग्वाद किल्लयात बंदिस्त केले. 15  ऑगस्ट 1955 रोजी भाई विष्णुपंत चितळे यांच्या नेतृत्वाखाली दहा हजारांहून अधिक सत्याग्रहींनी सामुदायिक सत्याग्रह केला. त्यांच्यावर पोर्तुगीजांनी गोळीबार केला. तेव्हा हिरवे गुरुजी, कर्नलसिंग, महांकाळ, चौधरी, थोरात आदी शूर सत्याग्रही हुतात्मे झाले. मधू दंडवते यांच्या नेतृत्वाखालची तुकडी बेळगाकडून चालत सावंतवाडीमार्गे गोव्यात गेली. त्यांनाही पुष्कळ मारहाण झाली. 

गोव्याच्या या स्वातंत्र्यसंग्रामात महादेवशास्त्री जोशी यांच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी अपूर्व कामगिरी केली. गोवा नेशनल काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले. अधिवेशनावर बंदी असताना त्यांनी गुप्तपणे गोवा हद्दीत प्रवेश केला आणि म्हापसे येथे ठरल्याप्रमाणे कार्यकर्ते जमताच त्यांनी अध्यक्षीय भाषण सुरू केले. पोर्तुगीज पोलीस धावत सभास्थानी आले त्यांनी सुधाताईंना छडीने मारले व अटक केली. सुधाताई जोशी यांना सात वर्षाथी कारावासाची शिक्षा देण्यात आली. गोव्याच्या मुक्तिसंग्रामात मीना काकोडकर, कुमुदिनी पैंगणकर, शशिकला होडारकर, सिंधुताई देशपांडे आदी स्त्री कार्यकर्त्यांनी मोठी मर्दुमकी गाजवली. हेमंत सोमण आणि मोहन रानडे यांनीही अपार कष्ट सोसले. 

या मुक्तिसंग्रामात राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके आदींनी ठाणे जिल्ह्यात दमणजवळ असलेल्या नगरहवेली या भागावर हल्ला केला. पोर्तुगीजांना हे अपेक्षित नसल्यामुळे तेथे बंदोबस्तही नव्हता. या स्वातंत्र्यसैनिकांनी तेथे राष्ट्रध्वज फडकवला. 15 ऑगस्ट 1955 रोजी सामुदायिक सत्याग्रहानंतर सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात आले. 18 डिसेंबर 1961 ला गोव्यात भारतीय सेना घुसली आणि पोर्तुगीजांची राजवट पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्षांनी गोवा दमण-दीव हा पोर्तुगीजांनी व्यापलेला भाग स्वतंत्र झाला. 1857 ला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाची सांगता गोवा मुक्तिसंग्रामात सुधाताई जोशी या रणरागिणीने केली.

Tags: तात्या टोपे पंडित नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस गोवा मुक्तिसंग्राम हैद्राबाद स्वातंत्र्य लढा विनायक सावरकर चाफेकर बंधू डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधी स्वातंत्र्यसमर साने गुरुजी   ग. प्र. प्रधान Tatya Tope Pandit Nehru Subhashchandra Bos Goa Liberation struggle Haidrabad Independence War Vinayak Savarkar Chafekar Brother Babasaheb Ambedkar Dr Gandhi War of Independence Sane Guruji G.P. Pradhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके