डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भेदक विश्लेषण आणि हृद्य रसग्रहण यांचा आगळा मिलाफ

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर पुंडलिकांचे जीवन भग्न कसे झाले, लेखनासाठी स्वतःच्या मनाच्या कोशात जाणारे पुंडलिक, आता सर्वापासून दूर जाऊन स्वतःच्या दुःखाच्या कोषात कसे हरपले हे हर्डीकरांनी विलक्षण सहृदयतेने सांगितले आहे. शंकर गुहा नियोगी हा एक क्रांतिकारी कामगार नेता. मूळचा बंगालमधील पण छत्तीसगडातील आदिवासींच्या जीवनाशी एकरूप झालेला. त्यांना न्याय मिळावा म्हणून सतत संघर्ष करणारा आणि या संघर्षातच आत्मबलिदान केलेला.

(संवेदनाशील लेखकाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना वाहिलेली 'श्रद्धांजली')

आयुष्यातील वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला अनेक माणसे भेटतात, परंतु त्यातील काही मोजक्याच व्यक्ती आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवतात. त्यांच्या मृत्यूनंतरही आपल्या मनात त्यांचे व्यक्तिमत्त्व रेंगाळत राहते. विनय हर्डीकर यांना विविध क्षेत्रांत वावरताना, काही क्षेत्रांत  काम करताना काही अविस्मरणीय माणसे भेटली. काही जणांना ते भेटले नाहीत, त्यांनी त्यांच्या जीवनाचे वैभव दुरूनच पाहिले, पण त्या व्यक्तींच्या भोवती हर्डीकरांच्या मनाने किती तरी काल रुंजी घातली. अशा व्यक्तींना अर्पण केलेली ही 'श्रद्धांजली'. या 'श्रद्धांजली'त उत्कट भावना असल्या तरी भावविवशता नाही. किंबहुना ज्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या अंतरंगाचे जे दर्शन हर्डीकरांना घडले ते उकलून दाखविण्यासाठी त्यांनी हे ललित लेख लिहिले आहेत.

या संग्रहातील दोन लेख मला फार आवडले. एक ‘भग्नमूर्ती आणि भग्नमंदिर', हा विद्याधर पुंडलिकांवरचा आणि दुसरा 'शोषण के दुष्मन, मुक्ति के मित्र' हा शंकर गुहा नियोगी यांच्यावरचा. विद्याधर पुंडलिक आणि हर्डीकर यांच्यामध्ये वयाचे खूप - पंचवीस वर्षांचे - अंतर. पुंडलिकांना प्रथम एका सभेत हर्डीकरांनी पाहिले त्या वेळी ते त्यांना मुळीच आवडले नाहीत. परंतु पुंडलिकांच्या कथांतून जो मनस्वी कलावंत प्रकट झाला त्या पुंडलिकांच्या लेखनावर हर्डीकर लुब्ध झाले. या लेखात पुंडलिकांच्या काही कथांचे मोजक्या शब्दांत फार मार्मिक विश्लेषण आहे. ‘सती' या सावरकरांच्या जीवनाच्या एका अपरिचित पैलूवर लिहिलेल्या कथेमुळे उठलेल्या वादळाचे आणि त्या कथेमागच्या पुंडलिकांच्या मनोभूमिकेचे वर्णन हर्डीकरांनी अत्यंत जाणतेपणे आणि स्पष्टपणे केले आहे. पुंडलिक यांचे सर्वच लेखन ही एक साधना होती हे हर्डीकरांनी फार चांगल्या रीतीने, कोठेही अतिशयोक्ती न करता सांगितले आहे. लेखक पुंडलिक आणि पुंडलिक एक माणूस, त्यांच्यातील विसंवाद आणि सुसंवाद, हा या लेखाचा केंद्रबिंदू आहे. 

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर पुंडलिकांचे जीवन भग्न कसे झाले, लेखनासाठी स्वतःच्या मनाच्या कोशात जाणारे पुंडलिक, आता सर्वापासून दूर जाऊन स्वतःच्या दुःखाच्या कोषात कसे हरपले हे हर्डीकरांनी विलक्षण सहृदयतेने सांगितले आहे. शंकर गुहा नियोगी हा एक क्रांतिकारी कामगार नेता. मूळचा बंगालमधील पण छत्तीसगडातील आदिवासींच्या जीवनाशी एकरूप झालेला. त्यांना न्याय मिळावा म्हणून सतत संघर्ष करणारा आणि या संघर्षातच आत्मबलिदान केलेला. शंकर गुहा नियोगीच्या क्रांतिकारक जीवनाची जी धग हर्डीकरांना जाणवली ती वाचकांच्या मनालाही चटका देते, हर्डीकर पत्रकार म्हणून भिलाईला गेले. या कारखान्यात इतर इंधन काहीही असो, येथील मुख्य इंधन इथला आदिवासी मजूर होता. जंगलातून विस्थापित झालेला, शोषणामुळे होरपळलेला. या आदिवासींचे दुःख पाहून हर्डीकर विव्हल झाले. शंकर गुहा नियोगींनी या शोषित-पीडित आदिवासी कामगारांना केवळ पगारवाढ मिळवून दिली नाही, तर आदिवासी मजुरांच्या जीवनाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून ते झगडले आणि त्यासाठीच मेले. 'हमारा सपनों का छत्तीसगड,' या जाहीरनाम्यातून दिसणारा वास्तववादी नेता, कवितावजा चिंतन लिहिणारा कविमनाचा कार्यकर्ता, आपल्या मुलांच्यात रमणारा कुटुंबवत्सल पिता, बलिदानाची भीती न वाटणारा पण हौतात्म्याचं अवाजवी आकर्षण नसलेला क्रांतिकारक... शंकर गुहा नियोगींच्या व्यक्तिचित्रात हे एक वेगळेच 'कांपोजिशन' झालेले आहे.

स्वयंसेवी चळवळीचे दोन कारभारी या लेखामध्ये मधुकर देवल आणि व्ही. डी. देशपांडे अशा प्रकृतीने एकमेकांहून अगदी भिन्न असलेल्या परंतु विधायक चळवळीत दीर्घकाल वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या दोन प्रभावी कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर ग्रामायन या चळवळीच्या स्वरूपाचीही ओळख होते. शांतपणाने पण पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या निष्ठेने 'नोट्स’ काढणारे व्ही. डी. आणि रोखठोक शब्दांत प्रचितीचे बोलणारे देवल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा वाचकांच्या मनावर स्पष्टपणे उमटेल असे हर्डीकरांचे हे लेखन आहे.

शिवपुत्र आणि शिवयोगी हा याहून अगदी वेगळा लेख. कार्यकर्त्यांच्या जीवनातील संघर्षावर लिहिणाऱ्या हर्डीकर यांनी दोन गानतपस्व्यांना या लेखात श्रद्धांजली वाहिली आहे. कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या गायकीचे रसिले वर्णन करतानाच हर्डीकरांनी या दोन थोर कलाकारांची जी वैशिष्टये त्यांना भावली, त्यांच्यापुढे ते नतमस्तक कसे झाले ते सांगितले आहे.

'तरीही तो एक विद्वान होता म्हणून...' हा मृत्युलेख अन्य सर्व लेखांपेक्षा अगदी वेगळा आहे. जी माणसे आपल्याला प्रिय असतात त्यांच्यावर लिहिणे सोपे असते. परंतु ज्याच्याबद्दल एका वेळी खूप आदर होता, प्रेमही होते अशा व्यक्तीच्या जीवनाचा अधःपात होताना दिसल्यानंतर मनाला आलेला उद्वेग व्यक्त करीत असतानाच, त्याच्यातील जे सामर्थ्य त्याने आपणहूनच नष्ट केले त्याबद्दल लिहिणे फार कठीण असते. विनय हर्डीकर यांनी स. शि. भावे यांच्यावरील या लेखामध्ये त्यांच्या आवडत्या भावे सरांचे अध्यापनातील आणि समीक्षेतील असामान्यत्व सांगत असतानाच भावे यांच्या विकारवशतेमुळे आणि अवाजवी महत्त्वाकांक्षेमुळे त्यांचे सारे गुण मातीमोल कसे झाले हे विलक्षण कौशल्याने सांगितले आहे. या लेखाच्या अखेरीस या 'हेवी फ्यूनरल' या मार्लोच्या विदारक शब्दांनी स. शि. भावे यांच्या उत्तरायुष्याचे नेमके वर्णन केले आहे. हा लेख वाचताना भावे यांच्या आठवणीने मी अत्यंत खिन्न झालो. आणि त्याचवेळी विनय हर्डीकर यांनी स. शि. भावे यांच्या जीवनाचे जे भेदक विश्लेषण केले त्यामुळे स्तिमितही झालो.

विनय हर्डीकर यांनी ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या व्यक्तींच्या जीवनावर एक अनोखा प्रकाश टाकणाऱ्या या लेखांतून हर्डीकरांचीही वाचकाला ओळख पटते. समाजजीवनाची सूक्ष्म ओळख व्हावी म्हणून विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे हर्डीकर, रसिक कलाप्रेमी हर्डीकर, ध्येयासाठी सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवनातील उदारतेने भारावून जाणारे हर्डीकर, सत्य काही वेळा अप्रिय वाटले तरी त्याला निर्भयपणे सामोरे जाणारे हर्डीकर, मानवी मनातील गुंतागुंतीचे चिकित्सक विश्लेषण करणारे हर्डीकर या हर्डीकरांच्या स्वभाववैशिष्ट्यांच्या आविष्कारामुळेच हा ललितलेखसंग्रह वाचकाला खिळवून ठेवील.

श्रद्धांजली
लेखक : विनय हर्डीकर
प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे 30 
पृष्ठे : 288 
किंमत : 175 रुपये

Tags: व्ही. डी. देशपांडे मधुकर देवल स. शि. भावे  विनय हर्डीकर मल्लिकार्जुन मन्सूर कुमार गंधर्व ग. प्र. प्रधान V.D. Deshapande S.S. Bhave Vinay Hardikar Mallikarjun Mansur Kumar Gandharv G.P. Pradhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके