डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काळ कसा भराभर धावत असतो. शिरुभाऊ गेल्याला एक वर्ष झाले. मात्र आम्हा मित्रांच्या मनातील त्यांच्या चैतन्यशील व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी अद्याप ताज्याच आहेत.

शिरुभाऊंशी माझी प्रथम भेट झाली ती 1938 साली. त्या वेळी शिरुभाऊ शनिवार पेठेत सध्याच्या अहिल्यादेवी हायस्कूलसमोर राहत असत आणि त्यांची एक स्वतंत्र खोली शनिवारातच चंद्रचूड वाड्यात होती. त्या खोलीत एसेम, नानासाहेब, विनायकराव कुलकर्णी, बंडू गोरे, माधव लिमये, अण्णा साने, मधू लिमये आदींच्या सतत चर्चा चालत. मी नव्यानेच तेथे जाऊ लागलो होतो, त्यामुळे केवळ श्रोत्याचीच भूमिका करीत असे. विनायकरावांचा आणि बंडूचा अभिनिवेश आणि गंभीर चर्चेत मनापासून भाग घेतानाही मध्येच शिरुभाऊंचे खट्याळ शेरे यांच्यामुळे चर्चेला फार रंगत येत असे. शिरुभाऊंचे हे वैशिष्ट्य अखेरपर्यंत टिकून होते. समर्पण वृत्तीने काम करताना, स्वातंत्र्यलढयात साहसी कृत्ये करतानाही शिरुभाऊ कधी अकारण गंभीर झाले नाहीत. त्यांच्यातील व्रात्य खोडकर मुलगा सतत जागा असे आणि त्यामुळे त्यांच्या बरोबर काम करण्यात मजा वाटत असे. मात्र या खेळकर वृत्तीबरोबरच त्यांच्या मनातील उत्कट भावना आणि काळजीपूर्वक विचार करून त्यांनी आखलेल्या विविध योजना यांचाही सतत येत असे. 

1938  साली 6 एप्रिल ते 13 एप्रिल या राष्ट्रीय सप्ताहात शिरुभाऊंनी आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्या वेळी भगतसिंगांचे एके काळचे सहकारी अजय घोष, कानपूरचे ट्रेड युनियन नेते कॉ. भारद्वाज रॉयवादी विचारांचे व्ही.बी. कर्णिक, समाजवादी पक्षाचे यूसुफ मेहेरअली अशा मान्यवरांची भाषणे मला ऐकायला मिळाली. या वक्त्यांचे शिरुभाऊंच्या बरोबर किती निकटचे संबंध होते हे मला त्या वेळी पाहायला मिळाले. स्वातंत्र्य चळवळीतील विविध प्रवाहांचे कार्यकर्त्यांना ज्ञान व्हावे आणि त्याचबरोबर काही क्रांतिकारकांशी आमची जवळून ओळख व्हावी, हे सारे शिरुभाऊंनी काळजीपूर्वक योजिले होते. त्या वेळी कचरेपाटलांच्या विहिरीजवळ - आत्ताच्या प्रभात रोडच्या सातव्या गल्लीत - एक पडळ आणि छोटे मैदान होते. तेथे आमचे झेंडावंदन होत असे शिरुभाऊंच्या बरोबर तेथे होणाऱ्या गप्पांमधून किती तरी नव्या गोष्टी मला समजत. 

एका संध्याकाळी ज्या क्रांतिकारकांनी भारताबाहेर जाऊन सशस्त्र क्रांतीची तयारी चालविली होती, त्यांच्या संबंधी शिरुभाऊ बोलत होते. श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा, स्वा. सावरकर, सेनापती बापट, महेंद्र प्रताप, वीरेन्द्र चट्टोपाध्याय, विष्णू गणेश पिंगळे, शौकत उस्मानी आदींच्या किती तरी रोमहर्षक गोष्टी शिरुभाऊंनी सांगितल्या. त्याच वेळी त्यांनी मला 'भारत में अंग्रेजी राज' आणि 'देशत्यागाचा इतिहास ही सरकारने जप्त केलेली पुस्तके आणि सेडीशन कमिटी रिपोर्ट वाचावयास दिला. शिरुभाऊंच्या मनात स्वातंत्र्यलढ्याचाच विचार सतत चाललेला असे. यामुळेच त्यांनी 1942 च्या चले जाव आंदोलनात महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले. शिरुभाऊंनी कॅपिटॉल बॉम्ब केसबद्दल विस्ताराने लिहिले असल्यामुळे मी त्याची येथे पुनरुक्ती करीत नाही. भूमिगत काम करतानाही शिरुभाऊंची विनोदबुद्धी सतत जागरूक असे. 

सेवादलात नेहमी तांबडा कोट घालणाऱ्या वामन कुलकर्णीस त्यांनी लालजी हे नाव ठेवले आणि तेच पुढे सन झाले. भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांना वेगवेगळी नावे देताना शिरुभाऊंची कल्पकता सतत दिसून येई. स्वातंत्र्य चळवळीत कारागृहात शिरुभाऊंना केवळ राजबंदीच नव्हे तर जे अन्य बंदी भेटले, त्यांच्यापैकी काही जणांची फार बहारीची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. शिरुभाऊंनी लिहिलेले, 'निवडुंगाची बोंडे ' हे एक असामान्य पुस्तक आहे. मराठी साहित्यात या पुस्तकाची नीट दखल घेतली गेली नाही याची मला खंत वाटते. शिरुभाऊंची सहानुभूती किती व्यापक होती, मानवी जीवनातील लोकविलक्षण अनुभव त्यांच्या मनाने कसे अचूक टिपले होते ‘निवडुंगाची बोंडे' या त्यांच्या ललित लेख-संग्रहातून फार सुंदर रीतीने प्रत्ययाला येते. शिरुभाऊंनी लिहिलेली ही व्यक्तिचित्रे वाचल्याशिवाय शिरुभाऊंची खरीखुरी ओळखच होऊ शकणार नाही असे मला वाटते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिरुभाऊ हे राजकारणापेक्षा विधायक कामातच अधिक रमले. 

शिरुभाऊंना राजकीय चर्चाचा काथ्याकूट आवडत नसे. ते कट्टर समाजवादी होते. आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष करण्यास ते सतत उत्सुक असायचे. आपल्या देशात दलितांना, आदिवासींना, स्त्रियांना आजवर फार मोठे अन्याय सहन करावे लागले असून या अन्यायांच्या निर्मूलनासाठी ठोस कृती व्हावी असे शिरुभाऊंना सतत वाटत असे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे कंकण बांधलेल्या डाव्या पक्षांमध्येच नव्हे तर समाजवादी पक्षातही एकजूट होऊ शकली नाही याबद्दल शिरुभाऊंना फार उद्योग येत असे. ते म्हणत, 'आपला खरा शत्रू कोण आहे हे विसरून आपण आपापसात भांडतो हा करंटेपणा आहे.' शिरुभाऊचे विचार अगदी स्पष्ट होते. समतेचे निशाण खांद्यावर घेऊनच त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. जातिभेद, धर्मभेद यांचे निर्मूलन व्हावे यासाठी खूप धडपड केली. व्यापक चळवळ व्हावी असे त्यांना वाटे. परंतु अशी चळवळ होत नाही म्हणून ते निराश वा निष्क्रिय झाले नाहीत. जे सहकारी त्यांना मिळाले, त्यांना प्रोत्साहन देत शिरुभाऊंनी आपली समतेची लहानशी दिंडी अखेरपर्यंत चालवली. 

रचनात्मक कामात शिरुभाऊंना समाधान वाटत असे. खेड्यापाड्यांतील गरीब माणसांच्या कर्तृत्वावर शिरुभाऊंचा मोठा विश्वास होता. या उपेक्षितांना योग्य मार्गदर्शन आणि थोडे तरी आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून शिरुभाऊंची अखंड धडपड, पायपीट चालू असे. महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार होते त्या वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष असताना अल्पकाळात शिरुभाऊंनी भरघोस काम केले अखेरच्या काही वर्षांत ते रत्नागिरी जिल्ह्यात सतत जात असत. आप्पासाहेब पटवर्धनांच्या गोपुरीत त्यांचे मन रमत असे. घोंगड्या विणणारे धनगर, मध गोळा करणारे आदिवासी यांच्यात वावरताना शिरुभाऊ प्रसन्न, आनंदी असत. त्यांचे भारतातील भूमिपुत्रांवर खरेखुरे प्रेम होते. शिरुभाऊ फार मोठी संघटना विधायक क्षेत्रात बांधू शकले नाहीत पण सर्व विधायक कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. जातिनिर्मुलनाचे आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम त्यांनी ज्या तडफेने आणि सातत्याने केले त्याला तोड नाही. शिरुभाऊंना त्यांच्या अपूर्णतेची जाणीव होती आणि त्याबद्दल ते प्रांजळपणे बोलत. त्यांनी काही वर्षांपूर्वी बांधलेल्या एका छोट्या घरकुलास खटपटघर हे नाव दिले होते. 

मला वाटते की शिरुभाऊंचे जीवन हे 'खटपटघर' च होते. या घरात अनुताईंनी टापटीप, व्यवस्थितपणा आणला. परंतु शिरुभाऊंचा अवखळ स्वभाव सतत या व्यवस्थेवर मात करीत असे. ते खऱ्या अर्थाने भटक्या व विमुक्त समाजातले होते. घरकुलात ते राहत पण त्यांच्या मनातील 'जिप्सी हा सतत जागा असे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी त्यांना अनेक वर्षे तुरुंगात ठेवले. पोर्तुगीजांनी गोवा सत्याग्रहात त्यांना दीर्घकाल आग्वाद किल्ल्यात जखडून ठेवले. परंतु शिरुभाऊंच्या मनाला कारागृहाच्या भिंतींच्या उंचीची क्षिती कधीच वाटली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी काही वर्षे समाजवादी पक्षात काम केले आणि नंतर अनेक संस्था संघटनांचे व्याप सांभाळले. परंतु परवशता अगर संघटनावशता यांचा पाश त्यांच्या जीवाला कधी बांधू शकला नाही. अनुताईनी त्यांना सतत समजून घेतले, सांभाळले त्यामुळे शिरुभाऊंच्या संसाराचा पाश न होता रेशमी धाग्याची एक सुंदर गुंफण झाली होती. असे असूनही शिरुभाऊंमधील खोडकर मुलगा कोणत्याच बंधनात कधी अडकला नाही. शिरुभाऊ हा खऱ्या अर्थाने मुक्तात्मा होता. त्यांच्या स्नेहनिर्भर स्मृतीस विनम्र प्रणाम.

Tags: महेंद्र प्रताप  सेनापती बापट स्वा. सावरकर मॅडम कामा श्यामजी कृष्ण वर्मा बंडू गोरे विनायकराव कुलकर्णी नानासाहेब एसेम ग. प्र. प्रधान Mahendr Pratap Senapati Bapat Swa. Sawarkar Madam Kama Shyamaji Krushn Warma Bandu Gore Vinayakrao Kulkarni S.M Nanasaheb G.P. Pradhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके