जीवनात जी विसंगती पाहून आपल्याला हसू येते, पण असे हसताना आपण ज्यांची थट्टा करतो तेही हसण्यात सामील होतील अशा रीतीने आपण विनोद केला पाहिजे. यासाठी माणसाने सहृदय असावे लागते. जीवनातील विसंगतीकडे स्नेहार्द्र मनाने पाहत जो विनोद केला जातो तोच खरा सात्त्विक विनोद.
माणसाला हसता येते, हसावेसे वाटते ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. जी माणसे सतत गंभीर वा दुर्मुखलेली असतात ती दुःखी असतात. आयुष्यात दुःख असतेच पण ज्यांच्याजवळ विनोदबुद्धी असते त्यांना काळ्या ढगाचीही रुपेरी कड दिसते.
लहान मुलाचे निरागस हास्य हे अतिशय सुंदर असते हे आपणा सर्वांना नेहमी अनुभवायला मिळते. दत्त कवींनी एका सुंदर कवितेत लहान मुलीला उद्देशून,
हास बाई हास ग, माझ्या अंगणी माणिकाची रास ग...
असे म्हटले आहे. तीच आपली सर्वांची भावना असते. शाळेत जाणारी बहुतेक मुले मुली हसतमुख असतात. अगदी क्षुल्लक कारणानेही ती खळखळून हसतात. त्यांच्या खट्याळ, खोडकर हसण्यामुळे मला जणू गुलाबपाण्याचा शिडकावा झाल्यासारखा वाटतो.
काही जणांच्या मनाचा आणि त्यामुळे त्यांच्या हसण्याचा निर्मळपणा मोठेपणीही टिकतो. पण बहुतेक साऱ्या जणांचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्यांच्या हसण्याचे रूपही पालटत जाते. दुसऱ्याची फजिती झालेली दिसली - उदाहरणार्थ, लठ्ठ माणूस केळीच्या सालावरून घसरून पडला की काहीजण खो- खो हसतात. अशा हसण्यात खोडकरपणा असला तरी दुष्टपणा नसतो. परंतु काही जण मात्र उपरोधाने, तिरस्काराने इतरांना हसतात. त्या हसण्यात अहंकार असतो आणि दुष्ट भावही असतो.
जोनाथन स्विफ्ट या इंग्रज लेखकाला सगळ्यांबद्दल तुच्छता वाटत असे. त्याला माणसांचा तिटकारा वाटे. उपरोधिक विनोद करून, खवचटपणे हसून दुसऱ्याच्या मर्मावर घाव घालण्यात त्याला आसुरी आनंद वाटे. तो म्हणत असे, 'जगाला रडवावे म्हणून मी हसतो.' त्याचे मूळ इंग्रजी शब्द आहेत, "आयू लाफ सो अॅजू टु मेक दि वर्ल्ड वीप".
अहंकारातून निर्माण झालेले, दुसऱ्याला दुखविणारे असले हास्य मला निंद्य वाटते.
याच्या उलट चार्लस् लॅम्ब हा लेखक होता. त्याच्या वाट्याला आयुष्यात अपार दुःख आले. वेड लागलेल्या बहिणीची शुश्रूषा त्याला अनेक वर्षे करावी लागली. पण तरीही त्याच्या लेखनात विनोदाचा एक अंतःप्रवाह आहे. मात्र त्याच्या विनोदाचे स्वरूप अगदी आगळे आहे. त्याच्या विनोदाला कारुण्याची झालर आहे. आसू आणि हासू एकत्र असलेल्या लॅम्बच्या विनोदाचे वर्णन इंद्रधनुष्यी विनोद असे करतात. लॅम्ब संभाषणातही मिस्किल विनोद करी.
त्याच्यावर एकदा त्याच्यावरचा अधिकारी रागावला आणि म्हणाला, "लॅम्ब, तू ऑफिसात नेहमी उशीरा येतोस." लॅम्ब शांतपणे उत्तरला, "पण याची भरपाई करण्याकरिता मी रोज लवकर घरी जातो की." लॅम्बला एकदा त्याचा मित्र ली हंट याने विचारले, "तुझ्या आयुष्यात इतकं दुःख असताना तू नेहमी हसतोस कसा?"
लॅम्ब म्हणाला, "मला रडू येऊ नये म्हणून मी हसतो." (आय लाफ् बिकॉज आय मस्ट नॉट वीप.)
लोकमान्य टिळकांवर 1908 साली राजद्रोहाचा खटला चालू असताना, न्या. दावर यांनी ज्यूरीला उद्देशून जो आढावा घेतला त्यावरून लोकमान्यांना कठोर शिक्षा होणार हे उघड झाले. कोर्टात हजर असलेले तात्यासाहेब केळकर आणि दादासाहेब खापर्डे हे लोकमान्यांचे सहकारी अतिशय गंभीर झाले होते. त्या वेळी ज्यूरी व जस्टिस दावर आत निघून गेल्यावर लो. टिळक आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर आले आणि सर्वजण चहा घेण्याकरिता एकत्र जमले तेव्हा टिळक खापर्ड्यांना म्हणाले, "दादासाहेब, आजचा रंग काही वेगळाच दिसतो. बहुतेक काळ्या पाण्याची तयारी दिसते. हा आजचा आपला बहुतेक शेवटचाच एकत्र चहा समजा." असे म्हणून लोकमान्य मोठ्याने हसले. आपल्या शिक्षेमुळे इतरांच्या डोळ्यांना पाणी येऊ नये म्हणून ते हसले. एका लेखकाने या संदर्भात लिहिले आहे, 'टिळक लाफ्ड्, सो दॅट अदर्स मस्ट नॉट वीप.'
हसणाऱ्यांचे किती तरी वेगवेगळे नमुने असतात. आपल्यापैकी बहुतेकांना दुसऱ्याच्या डोळ्यांतले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही. काही थोडी माणसे मात्र स्वतःकडे बघूनही हसतात. स्वतःच्या वैगुण्यावरही विनोद करतात. मराठीमध्ये चिं. वि. जोशी यांच्या विनोदात असे अनेक मजेदार प्रसंग आहेत. मी अशा विनोदाला उच्च प्रकारचा विनोद मानतो.
जीवनात जी विसंगती पाहून आपल्याला हसू येते, पण असे हसताना आपण ज्यांची थट्टा करतो तेही हसण्यात सामील होतील अशा रीतीने आपण विनोद केला पाहिजे. यासाठी माणसाने सहृदय असावे लागते. जीवनातील विसंगतीकडे स्नेहार्द्र मनाने पाहत जो विनोद केला जातो तोच खरा सात्त्विक विनोद. असा विनोद करणारी माणसे इतरांना हसत नाहीत, इतरांबरोबर हसतात. अशा निर्मळ विनोदामुळे काही गोष्टींतील हास्यास्पदता लक्षात येत असतानाच एक अनोखा सुखद स्पर्श सर्वांच्याच मनाला होतो.
Tags: दादासाहेब खापर्डे तात्यासाहेब केळकर लोकमान्य टिळक चार्लस् लॅम्ब जोनाथन स्विफ्ट दत्त कवी Dadasaheb Khaparde Tatyasaheb Kelkar Lokmanya Tilak Charles Lamb Jonathan Swift Datta Kavi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या