डिजिटल अर्काईव्ह

गांधींचा मित्रपरिवार : जॅन ख्रिश्चन स्मट्स् (18 सप्टेंबर 2004)

चळवळ कशी चालवायची यामागील प्रत्येक छोटया-मोठया गोष्टीकडे गांधींचे लक्ष होते. तडजोडीचे प्रयत्न चालू असताना लोकमत तयार करणे महत्त्वाचे आहे, याची गांधींना कल्पना होती. आपण काही महत्त्वाचे करतो आहोत या भावनेने हिंदी लोकांच्या मनाची उभारी वाढवण्यासाठी सतत प्रयत्न चालू होते. चळवळीची प्रत्यक्ष सूत्रे गांधींच्या हातांत असली तरी स्थानिक लोकांना पुढे ठेवले जात होते. एसप मियाँ, रामसुंदर पंडित, अब्दुल घनी, हाजी हबीब ही सारी मंडळी उत्साहाने काम करत होती. ट्रान्सवालमधील युरोपियन लोकही हिंदी लोकांची बाजू समजावून घेत होते. ह्या लोकांनी दाखविलेले धैर्य, निःस्वार्थी वृत्ती यामुळे त्यांच्याविषयीचे मत बदलत होते. स्थानिक पत्रांतील लेखांतही हळूहळू बदल दिसत होता. इंग्लंडमध्येही गांधींनी अनेकांना गुंतवले होते. तेथील काम ढेपाळू नये म्हणून त्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण केली होती.

नवीन कायदा 1 जुलै 1907ला अंमलात आला. त्या कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत आशियाई रहिवाशांनी नोंदणी करणे बंधनकारक होते. हिंदी लोक कायद्यानुसार वागणारे ते आता का कायदा मोडतील, असे नवीन कायदा खिजवीत होता. ह्या कायद्याखाली नोंदणी का करायची नाही, ते गांधी 'इंडियन ओपिनियन' मधून आणि इतरत्रही पटवून देत होते. प्रिटोरिया इंडियन मॅहोमेडन कम्युनिटीचे नेते 10 जुलैपर्यंत तडजोडीचे प्रयत्न करीत होते. तुरुंगवास पत्करणे ही फारच टोकाची पायरी आहे असे त्यांना वाटत होते. जॅन स्मट्सनी 15 जुलैला पाठविलेल्या उत्तरात त्यांचे काहीच मान्य केले नव्हते. तडजोडीचे सर्वतो प्रयत्न करायचे हे तत्त्व गांधी शर्थीने पाळत होते. परंतु प्रत्येक योग्य सूचनेचा अव्हेर हे त्यांना सहन करणे कठीण जात होते. 'इंडियन ओपिनियन’ मध्ये लिहिताना त्यांना काहीशी कडक भाषा वापरावी लागली. "जॅन स्मट्स् यांच्या उत्तराचा सारांश देताना माझे रक्त उसळत आहे.'जर आपण नीट वागलो तर ते आपल्यावर आणखी काहीच निर्बंध लादणार नाहीत’, या त्यांच्या वाक्याचा अर्थ काय? ह्या काळ्याकुट्ट कायद्याने जिवंत मरण लादल्यावर आणखी काही निर्बंध शक्य आहेत का? मेलेल्याला आणखी लाथा काय मारणार? लक्षात घेतले पाहिजे की एकाही मुद्यावर जॅन स्मट्स् आपला दुराग्रह सोडायला तयार नाहीत."

"आपल्याला सिल्कच्या आच्छादनात गुंडाळलेल्या काठीने मारण्यात आले. यामुळे एक बरे झाले, की आता हिंदी लोक अधिक ठामपणे लढतील. त्यांच्या कायद्यातील क्रूर नियमांमुळे हिंदी लोक चवताळले आहेत. त्यांच्या ह्या अखेरच्या उत्तरातील क्रूर वृत्तीने ते अधिक ठाम झाले आहेत. ह्या कायद्याला विरोध करण्याची शपथ आपण ईश्वराच्या साक्षीने घेतली आहे. त्याच ईश्वराच्या साक्षीने आपण आपले धैर्य दाखवू या." 31 जुलैपर्यंत फारच थोड्या जणांनी नोंदणी केल्यामुळे कालमर्यादा वाढविण्यात आली होती. तडजोडीच्या प्रयत्नांत गांधींनी काही सुधारणा सुचविल्या, तर आता जॅन स्मट्स् स्वतः उत्तर द्यायलाही तयार नव्हते. ठिकठिकाणच्या हिंदी समाजांचा चळवळीला पाठिंबा मिळत होता. जर्मिस्टन गावातील हिंदी लोकांचे पुढारी रामसुंदर पंडित हे पुजारी होते. पीटर्सबर्ग गावातील हिंदी पुढाऱ्यांनी आपण नोंदणी करणार नाही हे स्पष्ट केले होते. गांधींनी त्यांचे अभिनंदन केले, मुळात दिलेली 31 जुलैची मुदत संपून नऊ दिवस झाले तरी कोणी नोंदणी केली नाही. ब्रिटिश व्यापाऱ्यांना काळजी पडली की हिंदी व्यापारी खरोखरच तुरुंगात गेले तर आपली वसुली बुडणार. 

जॅन स्मट्सला हा विषय लवकर संपवायचा होता. तो आता पाशवी अत्याचारांकडे झुकू लागला होता. नोंदणी न करणाऱ्यांना नाताळमार्गे हिंदुस्थानात जबरीने पाठवून द्यावे असा त्याचा इरादा असल्याची भूमका उठली होती. कायद्यात तशी तरतूद नव्हती. नाहीतर जॅन स्मट्सची तेवढी हिंमत असती. तर त्याने नोंदणीची मर्यादा म्हणता म्हणता नोव्हेंबरपर्यंत वाढवली नसती. गांधींना हद्दपार करण्यात येईल असेही उठवण्यात आले. परंतु हत्तीने मुंगीवर पाय ठेवण्यापूर्वी शंभरदा विचार करायला हवा, याचे इशारे ट्रान्सवाल शासनाला लंडनहून येत असणार. हिंदुस्थानशी संबंधित असे काही पाऊल टाकल्यास हिंदुस्थानातील प्रजाच नव्हे तर ब्रिटिश राज्यकर्तेही खवळून उठतील याची लंडनला कल्पना होती. आफ्रिका हा गोऱ्यांचा देश व्हायला हवा, ही श्रद्धा आणि आपल्या हातांतील सत्ता वापरून दडपशाहीने ते साध्य करता येईल, ही भावना ही जॅन स्मट्सची शस्त्रे होती. ट्रान्सवालमधील संपूर्ण हिंदी समाज आणि चिनी नेतेदेखील आपल्याबरोबर आहेत; आणि ईश्वरसाक्ष शपथ घेतल्याने सर्वांची तुरुंगात जायची तयारी आहे, याची खात्री हे गांधींच्या हातांतील शस्त्र होते. ही चळवळ स्वार्थावर आधारित असती तर मधाचे बोट लावून चळवळीतल्या लोकांना विचलित करता आले असते. परंतु सन्मानासाठी कटिबद्ध असलेल्या लोकांना कसे हाताळावे हे जॅन स्मट्सच्या लक्षात येत नव्हते. 

चळवळ कशी चालवायची यामागील प्रत्येक छोटया-मोठया गोष्टीकडे गांधींचे लक्ष होते. तडजोडीचे प्रयत्न चालू असताना लोकमत तयार करणे महत्त्वाचे आहे, याची गांधींना कल्पना होती. आपण काही महत्त्वाचे करतो आहोत या भावनेने हिंदी लोकांच्या मनाची उभारी वाढवण्यासाठी सतत प्रयत्न चालू होते. चळवळीची प्रत्यक्ष सूत्रे गांधींच्या हातांत असली तरी स्थानिक लोकांना पुढे ठेवले जात होते. एसप मियाँ, रामसुंदर पंडित, अब्दुल घनी, हाजी हबीब ही सारी मंडळी उत्साहाने काम करत होती. ट्रान्सवालमधील युरोपियन लोकही हिंदी लोकांची बाजू समजावून घेत होते. ह्या लोकांनी दाखविलेले धैर्य, निःस्वार्थी वृत्ती यामुळे त्यांच्याविषयीचे मत बदलत होते. स्थानिक पत्रांतील लेखांतही हळूहळू बदल दिसत होता. इंग्लंडमध्येही गांधींनी अनेकांना गुंतवले होते. तेथील काम ढेपाळू नये म्हणून त्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण केली होती. लॉर्ड ॲम्प्टहीलसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे ती सोपविली होती. सर मंचरजी भावनगरीसारखे एकेकाळचे हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद, हिंदुस्थानात गोखले, फिरोजशहा मेहतांसारखे धुरंधर, ह्या सर्वांना वेळोवेळी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीची कल्पना देण्याचे काम चालूच होते. यासाठी लागणाऱ्या पैशाची आणि साहित्याची तरतूद करण्याकडे बारीक लक्ष होते. 

'इंडियन ओपिनियन' ह्या सर्व बाबतीत महत्त्वाची कामगिरी बजावत होते. रामसुंदर पंडित हा जाणीवपूर्वक कायदा तोडून तुरुंगवास पत्करणारा पहिला सत्याग्रही ठरला. त्याला शिक्षा झाली तर घाबरून नोंदणीला जोर येईल असे जैन स्मट्सना वाटले होते. प्रत्यक्षात कोणीच नोंदणीसाठी पुढे येईनात. उलट वर्तमानपत्रांतून जॅन स्मट्सवर उघड टीका येऊ लागली. रामसुंदर पंडित यांनी स्वातंत्र्याचा दरवाजा उघडला आहे. त्यातून आपण प्रवेश करू शकतो, असे गांधींनी आवर्जून सांगितले. सर्वत्र हरताळ होऊ लागले. एसप मियाँच्या अध्यक्षतेखाली रामसुंदरचे कौतुक करणारी सभा झाली. चिनी लोकांनीही सभा घेतली. अध्यक्ष क्विन्न यांनी गांधींना आमंत्रण दिले. जॅन स्मट्सने सर्व प्रयत्न करूनही तेरा हजार हिंदी रहिवाशांपैकी जेमतेम 511 जणांनी नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केली होती. हिंदी-चिनी तर एकत्र आलेच होते. परंतु गोऱ्यांनी अलग राहू नये म्हणूनही प्रयत्न चालले होते. ट्रान्सवाल लीडर या पत्राचे संपादक आल्बर्ट कार्टराईट हे सभांना उपस्थित असत. सभा चालू असताना नमाजाची वेळ झाली तर मुसलमान नमाज पढत, इतर साथ देत आणि नमाजानंतर सभेचे कामकाज पुढे चालू राही. भिन्न वंशाचे, धर्माचे लोक एका आदर्शने प्रेरित झाले होते. लंडनमधील प्रतिनिधी लुई रीच यांनी पंतप्रधान कॅम्पबॅल व्हनिरमन यांना वृत्तांत दिला. गांधींनी त्यांना देण्यासाठी पत्र पाठविले होते. पत्रात गांधींनी पुन्हा स्पष्ट केले, की हिंदी रहिवाशी स्वेच्छेने नोंदणी करायला तयार आहेत, परंतु जबरदस्तीने नाही. ट्रान्सवाल शासनाने सत्याग्रहींना पकडल्यावर काय करायचे, याविषयी एक तोडगा काढला. 

आरोपी कोर्टासमोर आला की त्याला देश सोडून जा, अशी शिक्षा होत असे. त्याऐवजी त्याला नोंदणी करायला वेळ देऊन सोडून द्यायचे. ह्या जाळ्यात फसू नका आणि कोणतेही आश्वासन देऊ नका, असे गांधींनी सांगितल्यामुळे ह्या युक्तीचाही फायदा होईना. काही ज्येष्ठ गोऱ्या कार्यकर्त्यांनी जॅन स्मट्सना सल्ला द्यायचा प्रयत्न केला. रिचर्ड सॉलोमन म्हणाले, की हा कायदा पुस्तकी थाटात करण्यात आला आहे. ह्या सनदी अधिकाऱ्यांना माणसे समजत नाहीत. कायद्यांचे मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेऊनही हा कायदा स्वीकारार्ह करणे शक्य आहे. केपचे मेरिमन हे स्वतः साम्राज्यवादी, तरीही त्यांना अनेक देशात ज्यूंचा छळ होत असे, त्याची आठवण झाली. ह्या प्रकारांमुळे इंग्लंडमध्ये आणि हिंदुस्थानात होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना काळजी होती. वेगवेगळ्या कारणांसाठी हितचिंतकांनी केलेला असा उपदेश ऐकण्याची स्मट्सची तयारी नव्हती. हे पेल्यातले वादळ आहे आणि हे आशियाई लोक आपल्याला बघतील याची त्यांना खात्री वाटत होती. निव्वळ धमक्यांचा काही उपयोग होत नाही हे पाहून त्यांनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली. हिंदी लोकांचा छळ करायला त्यांच्या हाती अनेक शस्त्रे होती. पीस प्रिझर्वेशन अॅक्ट खाली त्यांनी अनेकांची अटक करवली. बॅरिस्टर गांधी यांनी यांपैकी अनेकांचे खटले चालविले. महमद इसाक आणि इतर 37 जणांना त्यांनी सोडविले. 

स्थानिक पत्रकारांनी शासनाची बाजू लंगडी असल्याची टीका केली आणि शासनाला बेजबाबदार ठरविले. कायद्याची अंमलबजावणी अधिक नेटाने केली जाईल, असे जॅन स्मट्स् म्हणतात हे खरे पण मुळात कायद्याचे स्वरूपच शासनाला कळले नाही, असे दिसून येते. वर्षभर चाललेल्या गांधींच्या प्रचाराचा परिणाम आणि जॅन स्मट्सची अरेरावी पाडून गोरे पत्रकारही जैन स्मट्स् विरोधी भूमिका घेऊ लागले. गांधींनी जाहीर सभेत सांगितले, "जॅन स्मट्सचे म्हणणे आहे की आशियाई लोकांना ह्या देशाचा कायदा पाळायचा नसेल तर त्यांनी हा देश सोडून जावे. ज्यावेळी इथे बोअर राजवट होती तेव्हा त्यांनी 'उईटलॅंडर्स’ ना किंवा परक्या ब्रिटिशांनाही असेच सांगितले होते, परंतु ते गेले नाहीत. त्याचप्रमाणे हिंदी लोकही जाणार नाहीत. त्यांना बळजबरीने हुसकवून लावले तरच. आपल्यावर काढलेल्या कायद्याचे आंधळेपणाने पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य नव्हे; आणि माझ्या देशबांधवांचा देवावर आणि आत्म्यावर विश्वास असेल तर मग त्यांच्या शरीरावर जरी राज्यसंस्थेने अधिकार गाजवला, त्यांना तुरुंगात टाकले किंवा हद्दपार केले तरी त्यांची मने, त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांचा आत्मा हवेत मोकळेपणाने उडणाऱ्या पक्षाप्रमाणे स्वतंत्र आहेत. 

जनरल जॅन स्मट्स यांचा ह्या आततायी कायद्यांवर विश्वास आहे. त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेटने मान्यताही दिली आहे. परंतु आपण आशियाई आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून लढत आहोत ते केवळ पाशवी सामर्थ्यावर चालणाऱ्या शक्तीपुढे मान तुकवण्यासाठी नाही." ह्या काळात जॅन स्मट्सला एक विजय मिळाला होता, पहिले सत्याग्रही रामसुंदर पंडित तुरुंगातून बाहेर येऊन पाहतात तो त्यांचे देऊळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या छळ होत होता. तो टाळण्यासाठी ते ट्रान्सवाल सोडून नाताळमध्ये गेले. जॅन स्मट्सच्या हत्ती-घोडयांनी एक प्यादे खाल्ले होते. असा भ्याडपणा सत्याग्रह्याने दाखवू नये असे आवाहन गांधींनी केले. ह्या सभेत हेन्री पोलक आणि गांधींची सेक्रेटरी सोन्जा श्लेसिन यांनीही भाग घेतला. जनरल जॅन स्मट्स् यांनी हा विषय धसाला लावण्याचे ठरविले. त्यांना सत्तेवर येऊन वर्ष झाले होते आणि इंग्लंडमधील साम्राज्यसत्ता मधे पडणार नाही असा त्यांना विश्वास वाटत होता. त्यांनी 4 जानेवारीला आशियाई राहिवाशांना खडसावून सांगितले. “1885 पासून ह्या कायद्याला हिंदी लोकांनी संमती दिली आहे. यापूर्वी ट्रान्सवालमध्ये आलेले हिंदी कोण हे नक्की कळण्यासाठी हा कायदा आहे. ज्यांना हा कायदा पसंत नसेल त्यांनी परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी. 

1. त्यांच्या व्यापारावर बंदी येऊ शकेल, 2. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सोसावी लागेल. 3. त्यांना ट्रान्सवालमधून हद्दपार केले जाईल. तुमच्या नेत्यांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळे तुम्हांला तुरुंगात जावे लागत आहे. हिंदी लोक एकत्रित रीत्या नोंदणी करायला पुढे आले, तर त्यांना अजून तशी संधी देण्यात येईल. पण तशी तयारी नसेल तर शासन कायदा बाजूला ठेवू शकणार नाही. हा कायदा अन्याय्य आहे असे मानले, तर उद्या काफर लोकही गोऱ्या-काळ्यांसाठी असलेले वेगळे कायदे मानणार नाहीत. अनेक दिवस ब्रिटिश शासन तुमच्या बाजूने उभे राहिले तसे ते राहणार नाही." थोडक्यात जॅन स्मट्सचे म्हणणे असे की इतके दिवस केले तसे गुलामगिरीचे पाश हिंदी लोकांनी मुकाट सोसावेत. गांधींच्या मते हिंदी लोकांनी स्वातंत्र्य, अभिमान आणि खुदा-ईश्वराचा दरारा यांच्या सुवासाची माळ धारण करावी. विनापरवाना व्यापार करावा लागेल किंवा नोंदणीशिवाय राहावे लागेल, याची भीती त्यांनी बाळगू नये. तुरुंगवास किंवा हद्दपारी यांचा त्यांनी आनंदाने स्वीकार करावा.

6 जानेवारीला 'स्टार' ह्या वर्तमानपत्रात गांधींची मुलाखत आली. त्यात गांधी म्हणाले, “1885 चा कायदा क्रमांक तीन, यात ट्रान्सवालमध्ये प्रवेश करण्यावर बंदी नव्हती. प्रेसिडेंट क्रूगर हे हिंदी लोकांच्या या देशात येण्याविरुद्ध नव्हते; तर त्यांना समानता देण्याविरुद्ध होते. हा नवीन कायदा वेगळ्या तत्त्वावर आधारलेला आहे. त्याचा हेतू हिंदी लोकांनी देशात येऊच नये हा आहे. ते साधण्यासाठी हिंदी रहिवाशांना गुन्हेगारांसारखे वागविण्यात येत आहे. स्मट्स् यांच्या सांगण्याप्रमाणे पाच हजार हिंदी लोक नोंदणी करण्याऐवजी देश सोडून गेले. त्यांना इथे राहण्याचा पूर्ण अधिकार होता. परंतु छळ सोसायची त्यांची तयारी नव्हती. हिंदी लोक बेकायदेशीररीत्या देशात येतात असा आरोप स्मट्सनी केला आहे. त्यासंबंधी ही चळवळ आहे. हा प्रश्न आत्मसन्मानाचा आहे.” हिंदी लोकांना फसवे मानण्यावर हा कायदा आधारलेला आहे. स्मट्स् म्हणतात की ते सर्वांना न्याय्य पद्धतीने वागवणार आहेत. परंतु नुसत्या म्हणण्यापेक्षा ते कसे वागतात यावर सगळे ठरणार आहे. 

आम्ही स्वेच्छेने जे दयायला तयार आहोत, त्याचा स्वीकार न करता ते बळजबरीने, जणू गुलामांकडून ते हिसकावून घ्यावे तसे, हे कृत्य करून घेऊ इच्छितात. मी जर माझ्या माणसांना चुकीचा सल्ला देणारा नेता असेन तर माझ्यावर फिर्याद करून मला बाजूला सारणे हे योग्यच आहे. तरीही आमचे लोक स्वाभिमानाने लढा चालू ठेवतात की नाही, ते कळून चुकेल. 10 जानेवारीला गांधींवर फिर्याद करण्यात आली. त्यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. हिंदी लोक खरोखर आत्मसन्मानासाठीच लढायला तयार झाले, तर गोरेदेखील त्यांचा सन्मान करू लागतील असे गांधींनी म्हटले होते. तसेच होऊ लागले. काही तडजोड होऊन हा छळ थांबावा असे वाटणाऱ्यांत 'ट्रान्सवाल लीडर'चे संपादक आल्बर्ट कार्टराईट होते. ते स्मट्सना भेटले. त्यांच्या सूचनेवरून स्मट्स् तुरुंगाबाहेरील हिंदी पुढाऱ्यांना भेटले. त्यांनी आपल्या कानावर हात ठेवले. आपल्याला कायद्याचे ज्ञान नाही, तेव्हा गांधींना भेटल्याशिवाय आपण काहीच ठरवू शकत नाही असे त्यांनी सांगितले. स्मट्स् यांच्या सांगण्यावरून कार्टराईट गांधींना तुरुंगात भेटले. कार्टराईटनी गांधींना एक तडजोडीचा मसुदा दाखविला. हिंदी रहिवाशांनी आपणहून नोंदणी करावी. त्यांच्यावर सक्ती करणारा कायदा मागे घेण्यास पार्लमेंटच्या अधिवेशनाची जरूरी आहे. पुढील अधिवेशनात हा कायदा मागे घेण्यात येईल असे त्यात सुचविले होते. 

हा मसुदा स्मट्सना मान्य आहे असे गृहीत धरण्यात आले होते. ह्या मसुद्यातील त्रुटी गांधीनी कार्टराईटच्या लक्षात आणून दिल्या. ही तडजोड फक्त हिंदी लोकांपुरती नसून त्यात इतर आशियाई रहिवाशांचा उल्लेख आवश्यक होता. नोंदणी करणाऱ्यांना ह्या कायद्यानुसार होणारा दंड माफ करण्यात येईल असा उल्लेख होता. पण जर हा कायदाच रद्द होणार आहे तर असा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. शिवाय ट्रान्सवालचे पूर्वीचे रहिवाशी आता बाहेर गेले असतील तर ते आणि 16 वर्षांखालील मुले यांच्या नोंदणीची सोय होणे आवश्यक होते. कार्टराईट म्हणाले की स्मट्स् हा मसुदा अंतिम मानतात, त्यात काही बदल ते स्वीकारणार नाहीत. गांधी म्हणाले, “शासनाने स्वतःच्या इभ्रतीसाठी काही विशिष्ट शब्दरचना पसंत करणे मी समजू शकतो. पण समझोता म्हटले की दोन्ही पक्षांनी बदलाची तयारी दाखविणे आलेच. कपाळावर पिस्तुल रोखून केलेली तडजोड काय कामाची? ह्या मसुद्यात बदल शक्य नसेल तर आम्ही तुरुंगात राहणेच पसंत करू.” गांधींनी मसुद्यात बदल केले. चिनी नेते क्विन हेही तुरुंगात होते. ते आणि थंबी नायडू यांना हे बदल दाखविण्यात आले. 

28 जानेवारीला गांधींचे पत्र घेऊन कार्टराईट पुन्हा स्मट्सकडे गेले. स्मट्सने अटी मान्य केल्याचा फोन संध्याकाळी आला. कायद्यातील बदल येत्या अधिवेशनात पार्लमेंटपुढे ठेवण्यात येतील असे स्मट्सच्या सेक्रेटरींनी पत्रातून कळविले. दोन दिवसांनी स्मट्सनी गांधींना जोहान्सबर्गच्या तुरुंगातून प्रिटोरियाला बोलावून घेतले. स्मट्स् म्हणाले, "हिंदी समाजाबद्दल माझा काही दूषित ग्रह नाही. तुम्ही मागितलेल्या सवलती काहीशा अवास्तव आहेत. तरीही शासन ह्या स्वीकारेल. स्वेच्छानोंदणी ही नवीन कायद्याच्या बाहेर राहील. त्यासंबंधीचे तपशील ठरविता येतील. ह्या गोष्टींची वाच्यता झाली तर माझ्याविरुद्ध आमचे लोक उठतील, आणि मग तुमचेच नुकसान होईल." कडवे गोरे हे ह्या सवलतींच्या विरुद्ध आहेत याची स्मट्स्ना कल्पना होती. बोअर शेतकऱ्यांपेक्षा इंग्रज व्यापाऱ्यांचा ह्या सवलतींना विरोध होता. ह्या भेटीत बोटांच्या ठशांचा प्रश्न बाजूला ठेवला. ज्या थोड्या लोकांनी कायद्याखाली नोंदणी केली होती त्यांना गांधींच्या अनुयायांनी त्रास देऊ नये अशी स्मट्सनी विनंती केली. गांधी म्हणाले की काही हिंदी रहिवाशांनी चूक केली असली, तरी ते आमचेच भाईबंद आहेत, त्यांना त्रास द्यावा असे आमच्या मनातही येणार नाही. गांधींना लगेच आझाद करण्यात आले.
(क्रमशः)

Tags: Peace Preservation Act Ramsundar Pandit Phirojshaha Mehata Transwal Pritoria Indian Opinion Mahatma Gandhi Ramdas Bhatkal John Stamos पीस प्रिझर्वेशन अॅक्ट रामसुंदर पंडित फिरोजशहा मेहता ट्रान्सवाल प्रिटोरिया 'इंडियन ओपिनियन महात्मा गांधी रामदास भटकळ जॅन ख्रिश्चन स्मट्स् weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ ( 71 लेख )

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी