डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळीला महात्मा गांधींचे योगदान

गांधींचे वैशिष्ट्य हे की- राजकीय स्वातंत्र्य, भारतीय कारागिरांची स्वदेशी उत्पादनव्यवस्था, स्त्रीस्वातंत्र्य आणि अस्पृश्यता निर्मूलन या चळवळींची कार्यक्षेत्रे अलग-अलग न मानता या सर्व प्रश्नांची सांगड घालून गांधींनी मांडणी केली. स्वदेशी व अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे नेतृत्व करण्यास स्त्रिया अधिक योग्य आहेत, अशी त्यांची भूमिका होती. देशातील पारंपरिक उत्पादनव्यवस्था ब्रिटिशांनी उद्‌ध्वस्त केल्यामुळे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर बेकार झाल्या होत्या. त्यामुळे स्वदेशीची चळवळ स्त्रियांचा मान, रोजगार व राजकीय सहभाग यांचे प्रतीक होती.  

म.गांधींचा भारतीय राजकारणात प्रवेश 1915 मध्ये झाला, तेव्हा स्त्रियांचा सहभाग तुरळक व प्रतीकात्मक स्वरूपात होता. स्त्रीशिक्षण, कुटुंबांतर्गत अत्याचार व दुष्ट रूढींना विरोध या प्राथमिक पातळीच्या पुढे सुधारकांच्या चळवळीतील स्त्रीस्वातंत्र्याचा विषय सरकलेला नव्हता. काँग्रेसच्या त्या वेळच्या टिळकांसारख्या ब्राह्मणी नेतृत्वाने या विषयावर अत्यंत बोटचेपी व प्रतिगामी भूमिका घेतलेली होती; मग घराबाहेरच्या क्षेत्रात, स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्त्रियांच्या सहभागाचा मुद्दा तर फारच दूर होता. गांधी आल्याबरोबर हे चित्र एकदम पालटले. काँग्रेसच्या चळवळीत सर्व समाजघटकांचा सहभाग नाही; ती फक्त शहरी उच्चभ्रूंचे प्रतिनिधित्व करते, अशी गांधींची खंत होती आणि सर्वसामान्य शेतकरी, कारागीर, खेड्या-पाड्यांतील स्त्री-पुरुषांचा व्यापक सहभाग यायला पाहिजे, असे त्यांना वाटत होते. या त्यांच्या भूमिकेचा रेटा 1915 नंतरच्या काँग्रेसच्या चळवळीला मिळाला परिणाम स्त्रिया काँग्रेसच्या चळवळीत दाखल झालेल्या दिसतात.

गांधींचे वैशिष्ट्य असे की, तोपर्यंत केवळ वरिष्ठ सामाजिक वर्तुळात व समाजधुरीणांमध्ये साधक-बाधक चर्चेचा राहिलेला विषय त्यांनी थेट जनसमुदायामध्ये नेऊन ठेवला. तोपर्यंत अत्याचाराचा विरोध या सुधारणेच्या टप्प्यावर राहिलेला विचार त्यांनी स्त्रियांच्या मूलभूत मानवी अधिकारापर्यंतच्या समग्र स्त्रीस्वातंत्र्याच्या भूमिकेवर अत्यंत निःसंदिग्धपणे नेला. गांधींचे वैशिष्ट्य असे की, ते थेट महिलांशीच या विषयावर बोलू लागले. आश्रमवासीय स्त्रिया, काँग्रेसजनांच्या घरातील स्त्रिया, विद्यार्थिनी, महिला मंडळे, जाहीर सभांना आलेल्या स्त्रिया आदींशी भाषणे, पत्रव्यवहार, वर्तमानपत्रांतील लिखाण अशा अक्षरशः अगणित मार्गांनी त्यांनी संवाद केला.

अगदी मुस्लिम स्त्रियांशीसुद्धा त्यांचा थेट संवाद होत असे. खिलाफत चळवळ ऐन भरात असताना अली बंधूंना मुस्लिम स्त्रियांशी पडद्याशिवाय भाषण करता येत नव्हते; परंतु गांधींनी अनेक वेळा मुस्लिम स्त्रियांशी पडद्याशिवाय भाषणे केलेली आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा की- सर्व स्तरांतील जनसमूहांशी नाजूक प्रश्नांसकट सर्व प्रश्नांवर मनमोकळी परखड चर्चा व अनेक वेळा कठोर टीका गांधी करत असत. अशा अमर्याद संवादामुळे जनतेची नाडी त्यांना नीट कळत असे. गांधींचा संवाद हा फक्त शाब्दिक वा बौद्धिक चर्चेपुरता नव्हता. त्यांच्या लिखाणाचे - भाषणाचे उद्दिष्ट नेहमी ‘कृती’ हेच राहिलेले आहे. यातील लोकशाहीच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा निर्णयप्रक्रियेतील सहभागाचा आहे. ज्यांच्यासाठी सुधारणा, त्या स्त्रियांनी स्वत:ला काय पाहिजे  याचा निर्णय स्वत: करावा. त्यांनी अबला (म्हणजे object) राहू नये, त्यांनी सबला (म्हणजे कर्ता) बनावे. अशा लोकशाही निर्णयप्रक्रियेतून योग्य निर्णयाकडे जाता येते, ही गांधीजींची धारणा आहे.

गांधींची भाषा व धार्मिक संकल्पना

लोकशाही व समतेच्या मूल्यांना छेद देणाऱ्या रूढी व शास्त्रप्रामाण्य गांधींनी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत असतानाही नाकारले. ‘‘मुलगी वयात येण्यापूर्वी तिचे लग्न करून द्यावे, असे हिंदूंचे शास्त्र सांगत असले; तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, असेच मी म्हणेन.’’ सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनपद्धतीतील दुष्ट व अमानुष रूढी नाकारत असताना त्यातील स्वीकारार्ह व बहुमोल वैशिष्ट्यांचा जोरदार आग्रह धरला. कारण त्यांच्या मते, धार्मिक रूढींमधील शोषण व अन्याय जितके नुकसानकारक होते, त्याज्य होते, तितकेच मानवी जीवनातील प्रेम, नि:स्वार्थ सेवा, त्यागमय जीवन, साधी राहणी अशा बहुमोल मानवी गुणांची शिकवण धर्म देत असतो. व्रते व रूढींमुळे हे गुण मनुष्याला सहज साध्य होतात.

‘‘ज्या क्षणी हिंदू स्त्री विधवा होते, त्याच क्षणी ती आपली छानछोकी सोडते आणि सापाने कात टाकावी त्याप्रमाणे आपले सारे जडजवाहिर व दागिने बाजूस सारते. रूढीने सहज साध्य होणार नाही, अशी कोणती तरी गोष्ट आहे काय?’’ परंतु, आधुनिकतावाद्यांनी धर्माची ही चांगली बाजू सरसकट नाकारली व भारतीय समाजाचे नुकसान केले, असे त्यांचे मत होते. म्हणून सुधारणेच्या नावाखाली सरसकट पाश्चात्त्य जीवनशैलीचा स्वीकार करणारी ब्राह्मणी अभिजनप्रवृत्ती (गांधी त्याला शहरी उच्चभ्रू म्हणतात) त्यांना मान्य नव्हती. सुधारणासुद्धा साध्या-सुध्या देशी माणसाच्या जीवनसरणीनुसार व सर्वसामान्य श्रद्धाळू माणसाच्या धार्मिक अस्मितांना ठेच न लागता आली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

धार्मिक परिभाषेत धर्म-रूढींची चिकित्सा

गांधींनी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेतले आणि धर्म, नीती, पाप, पुण्य, पावित्र्य या लोकांना परिचित धार्मिक परिभाषेत रूढींची चिकित्सा सतत केली. परंतु या धार्मिक संकल्पनांचेसुद्धा पारंपरिक ब्राह्मणी अर्थ गांधींना मान्य नव्हते. ‘‘बालपणी लग्न झालेल्या व वैधव्य आलेल्या मुलीचे जीवन हे पुण्य नसून पाप आहे.’’ अशी ब्राह्मणी शास्त्र-पुराणांतील पाप व पुण्य या शब्दांची विवेकनिष्ठ आचार-विचारांवर आधारित व्याख्या ते करतात. पुढे जाऊन स्वदेशप्रेम, देशबांधवांप्रति कर्तव्य अशा धर्माच्या विश्वाबाहेरील मानवतावादी प्रेरणांची सांगड ते या पारंपरिक शब्दांशी घालतात. ‘‘परदेशी कापड वापरून तुमच्यापैकी बहुसंख्य भगिनी  आपले शरीर अपवित्र करत आहेत, असे माझे मत आहे.’’ ‘‘चरखा चालविणे व खादी वापरणे हे स्त्रियांनी आपले धार्मिक कर्तव्य मानले पाहिजे.’’ अशा रीतीने दांभिक रूढींच्या समर्थनार्थ वापरात आलेल्या पाप, पुण्य, पावित्र्य, शुद्धता या संकल्पनांना काळाच्या संदर्भात नवा राजकीय-सामाजिक आशय देण्याचा प्रयत्न गांधी करतात. गांधी फक्त हिंदू धर्माच्या संदर्भात ही भूमिका घेतात असे नाही, इस्लामबद्दलही त्यांची हीच भूमिका आहे. ‘‘मुसलमानांवर असा आरोप केला जातो की, ते आपल्या स्त्रियांबाबत बेपर्वा असतात; यापेक्षा अब्रुनुकसानकारक शब्द कोणी उच्चारले नसतील. इस्लामने स्त्रियांना समान हक्क दिले आहेत.’’

वस्तूकरणास विरोध

स्त्रीच्या देहाला दिलेले वावगे महत्त्व व त्यातून तिचे झालेले वस्तूकरण तिच्या आत्मिक उन्नतीला मारक ठरले आणि तिच्या पायांतील बेड्या झाले, असे गांधींना वाटते. म्हणूनच ते वस्तूकरणाबद्दलची तात्त्विक चर्चा व ते दूर करण्याचा कृती कार्यक्रम याबद्दल सतत संवाद करतात.

‘‘पुरुषांनी कामवासनेने स्त्रियांचा अध:पात केला आहे. शरीरातील आत्म्याची पूजा करण्याऐवजी तो तिच्या देहाची पूजा करू लागला आहे. पुरुषाने आपल्या कावेबाजीत एवढे यश मिळविले आहे की, स्त्रियांना आपण आपल्या शारीरिक भूषणांना मिठ्या मारत आहोत हे कळतच नाही. ती शारीरिक भूषणे तिच्या गुलामगिरीची चिन्हे आहेत.’’

‘‘जर तिला पुरुषाच्या बरोबरीने समान भागीदारी हवी असेल, तर तिने आपल्या नवऱ्याकरतादेखील शृंगार करण्यास नकार दिला पाहिजे.’’ स्वत:च्या नवऱ्याकरिताही शृंगार न करणे, हा नवऱ्याला नकार देण्याचा अधिकार आणि स्वत:च्या नटण्या-मुरडण्याच्या व दागिन्यांच्या आवडीस दिलेला नकार आहे. पुरुषांच्या गुलामगिरीतून मुक्ती हवी असेल, तर स्वत:चे बाहुलीपण नष्ट करण्यासाठीचा कार्यक्रम गांधी देतात.

1) स्वत:चे दागिने स्वदेशीच्या चळवळीला दान करा व परत दागिने करू नका. 2) परदेशी तलम वस्त्रे वापरणे सोडून द्या. 3) हिंदुस्थानाच्या गरीब माणसाला रोजगार देणारी जाडी-भरडी खादी वापरा. 4) एका पुरुषाची सेवा करण्यापेक्षा सर्व समाजाची श्रद्धेने सेवा करा. भारतातील प्रचंड दारिद्य्र, अज्ञान, अंधरूढी, अस्पृश्यता याविरोधी व स्वदेशीच्या कार्यात वाहून घ्या. 5) स्वत:च्या योग्य कारणासाठी नकार देण्याचे धैर्य दाखवा. स्त्रियांच्या गुलामगिरीस कारणीभूत असलेला एक अत्यंत मूलभूत मुद्दा ‘वस्तूकरणाचा मुद्दा आहे.’ या मुद्याला गांधींनी अत्यंत गंभीरपणे व थेट हात घातला आहे. या मुद्याला राष्ट्रीय चळवळीतील स्वदेशीच्या आंदोलनाशी जोडून एक उदात्त उद्दिष्ट तर दिलेच, परंतु तो एक जनचळवळीचा कार्यक्रम बनविला.

स्त्रियांच्या वस्तूकरणातून होणाऱ्या गुलामीबद्दल कोणतीच जागृती नसल्यामुळे आज ह्या समस्येने उग्र रूप धारण केल्याचे आपण पाहतो. शिक्षण, पैसा व कायद्याची समानता मिळूनही स्त्रियांची बौद्धिक-आत्मिक उन्नती वा सामाजिक बांधिलकी वाढली नाही; उलट समाजाच्या खालच्या स्तरापासून जे वरच्या स्तरापर्यंत चंगळवाद वाढलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर गांधीजींचे द्रष्टेपण अधिकच महत्त्वाचे आहे. गांधींनी स्त्रियांना दिलेला हा कार्यक्रम जहाल व क्रांतिकारक आहे. स्त्रीने पुरुषाच्या आज्ञेत राहावे, पतीचे घर हेच तिचे विश्व, पतीच्या सुखासाठी सजणे-धजणे हा पत्नीचा धर्म- ही पुरुषप्रधान मूल्ये गांधीजी नाकारायला शिकवीत आहेत.

पतीच्या घराबाहेरच्या क्षेत्रात गांधींच्या मते, स्त्रीची आवश्यकता आहे; तिला भूमिका आहे. परंतु, ‘‘मुलांचे संगोपन व तरुणपिढी घडविण्याचे काम ही स्त्रीची निसर्गदत्त जबाबदारी आहे; पुरुषांनी तिच्यावर लादलेले ते ओझे नाही.’’ ह्या गांधीच्या भूमिकेवर गांधीजींनी ‘चूल व मूल’ हे स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले, अशी ढोबळ टीका अनेक आधुनिक स्त्रीवाद्यांनी केली. गांधींची समग्र भूमिका लक्षात घेतली, तर ही टीका चुकीची आहे. कारण गांधींनी पिढी घडविणे हेही सामाजिक काम मानलेले आहे. गांधींच्या संपूर्ण राजकारणात व समाजकारणात माणूस घडवण्याला अतिशय महत्त्व दिलेले आहे. सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने समाजाला जायचे असेल; तर प्रेम, त्याग, बंधू व भगिनीभाव अशा मूल्यांवर श्रद्धा असणारा माणूस घडविण्याचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. गांधीजींनी चळवळीच्या माध्यमातून हे काम सातत्याने केले. फक्त एका पुरुषाची चूल व मूल सांभाळत बसू नका आणि नवविवाहितांना मूल होऊ नये, असा आशीर्वाद गांधीजी देतात तेव्हा गांधीजी चूल व मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र मानत होते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.

ब्रह्मचर्य

स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवेशाला मदतकारक  असा स्त्रीच्या ब्रह्मचर्याच्या अधिकाराचा मुद्दा गांधीजींनी मांडला. त्यामुळे संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपून गेलेल्या स्त्रीला घराबाहेर सार्वजनिक जीवनात येण्यास वाव मिळाला. दुसरे म्हणजे, ब्राह्मणी धर्माने स्त्रीला ‘ब्रह्मचर्य’ नाकारलेले आहे. ब्रह्मचर्य नाकारण्याचे कारण म्हणजे, ‘नैतिक आचरण करण्यास स्त्री सक्षम नाही. स्त्रिया स्वभावतःच चंचल, लोभी व कामातूर असतात. तिची लैंगिकता नियंत्रितच करावी लागते,’ अशी ब्राह्मणी धर्माची भूमिका आहे. स्त्रीच्या नैतिक शक्तीबद्दल शंका घेऊन ‘न स्त्री स्वातंत्र्यम्‌ अर्हति’ असे सांगणाऱ्या ब्राह्मणी मूल्यव्यवस्थेला ब्रह्मचर्याच्या मुद्याने आव्हान दिले.

स्त्रीशक्तीच्या आविष्कारातील मूलभूत मुद्दे

‘शक्ती’, ‘सामर्थ्य’, ‘ताकद’, ‘बल’ हे शब्द जेव्हा गांधी वापरतात, तेव्हा शारीरिक शक्ती किंवा आक्रमकता त्यांना अभिप्रेत नाही; तर प्रेम, त्याग, सेवा करण्याची मानसिक- शारीरिक शक्ती, भोगलालसा, वासना नियंत्रित करण्याचा मनोनिग्रह व अनिष्टांचा विरोध करण्याची प्रतिकारशक्ती या माणसाच्या शक्ती आहेत, असे गांधींना वाटते. व यांच्या आधारे जगातील कोणत्याही अत्याचारी व दुष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य माणसाला मिळते, असे गांधींचे आकलन आहे. या सर्व शक्ती स्त्रीकडे पुरुषापेक्षा निसर्गतःच अधिक आहेत आणि म्हणून ती अबला नसून सबला आहे. फक्त हे तिने ओळखण्याची आवश्यकता आहे.

स्त्रीच्या या शक्तीची ओळख त्यांना स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्यातून झाली होती. त्यांनी कस्तुरबांच्या इच्छेविरुद्ध काहीही लादायचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा कस्तुरबांनी त्यांना शांततापूर्ण, अत्यंत ठाम प्रतिकार केला. सीता, द्रौपदी व दमयंती या भारतीय स्त्रियांनी अशी शक्ती दाखविल्यामुळेच त्या संकटातून मुक्त झाल्या. सीतेच्या अंत:करणातील पावित्र्यासमोर रावणासारख्या शक्तिमान दुष्ट प्रवृत्तीचा टिकाव लागला नाही. द्रौपदीच्या रांगड्या, धडपड्या वृत्तीमागेही शुद्ध व सहनशील अंत:करण आहे आणि त्या बळावर तिने भीमासारख्या महापराक्रमी पुरुषाचे मन वळविले, भर सभेत बेभान वागणाऱ्या दु:शासनापासून स्वत:च्या शीलाचे रक्षण केले. सर्वसाधारण हिंदू स्त्रियांना परिचित असलेल्या सीता, द्रौपदी व दमयंती या पुराण-इतिहासातील प्रतीकांचा अन्वयार्थ लावून गांधीजी स्त्रियांशी चर्चा करतात.

‘झाशीची राणी लक्ष्मीबार्इं’चे प्रतीक गांधी कधीही मांडत नाहीत, कारण ते शारीरिक बल व युद्धातील पराक्रमाचे प्रतीक होते. युद्ध, शस्त्र आणि हिंसेच्या मार्गाने दमनकारी सत्तेशी लढता येत नाही आणि हिंसेला मानवी जीवनात स्थान असता कामा नये, ही त्यांची भूमिका आहे.

स्त्री-सुधारणांच्या सूत्रधार स्त्रिया

बळी ठरलेल्या माणसाला गांधी सुधारणांचे सूत्रधार मानतात. संघर्षदेखील स्वत:शी- स्वत:च्या आतील चुकीच्या दुष्ट प्रवृत्ती, सवयी व समजूती, राग, भीती, द्वेष या भावनांशी असला पाहिजे; पुढाकार त्याचाच असला पाहिजे, अशी गांधींची भूमिका आहे. सत्याग्रहाच्या आधारे जगातील सर्व अन्यायांचे निराकरण होऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे आणि सत्याग्रहासाठी आवश्यक असलेले त्याग, सहनशीलता, कष्टाळू वृत्ती हे गुण नैसर्गिकत: स्त्रियांकडे अधिक असतात; म्हणून स्त्रिया सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यास अधिक योग्य असतात, अशी गांधींची भूमिका आहे. या स्त्रीने नवऱ्याची गुलाम राहू नये, अन्याय-अत्याचाराला दबू नये. अन्याय सोसणाऱ्याने नकार दिला तर अन्याय टिकूच शकत नाही, अशी त्यांची धारणा आहे.

स्त्रीला ते दुर्बल मानत नाहीत. स्वत:च्या मानसिक व आत्मिक सामर्थ्याची जाणीव स्त्रीने करून घेतली पाहिजे. प्रत्येक मनुष्याकडे प्रचंड नैतिक सामर्थ्य असते आणि म्हणून प्रत्येक माणूस सत्याग्रही झाला पाहिजे. जग बदलण्यास एक सत्याग्रही पुरेसा असतो, ही गांधींची भूमिका आहे.

सामाजिक विषमता व स्त्रीचे पारतंत्र्य

गांधींनी समाजव्यवस्थेतील उच्च-नीचतेमुळे निर्माण झालेली गरिबी, बेकारी, अस्पृश्यता, व्यसनाधीनता या इतर दुखण्यांशी स्त्रीप्रश्नांचे नाते लक्षात घेऊन त्याचा विचार केला व कार्यक्रम दिला. त्यामुळे गांधींना सर्वसामान्य स्त्रियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. भारतातल्या स्त्रीचळवळीने इतर सामाजिक प्रश्नांशी स्त्रियांच्या प्रश्नांचे नाते जोडण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळ उच्चवर्णीय-उच्चभ्रू स्त्रियांची अराजकीय चळवळ बनली आणि पाश्चात्त्य प्रभावाखालील व्यक्तिवादी विचारांची राहिली.

महात्मा गांधींचा भारतातील सर्व स्तरांतील लोकांशी, विरोधकांशीसुद्धा संपर्क होता. तसा तो स्त्रीमुक्ती विचारांच्या स्त्री कार्यकर्त्यांशीही होता. मद्रासच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मुथुलक्ष्मी रेड्डी यांना गांधीजींनी लिहिले, ‘हिंदुस्थानाच्या ज्या थोड्या उच्चशिक्षित स्त्रिया आहेत, त्यांनी पाश्चात्त्य संस्कृतीच्या उंचीवरून भारतभूमीच्या सपाट मैदानावर उतरणे आवश्यक  आहे.’

‘बहुतेक स्त्रिया या विवाहित असतात व कायदा त्यांच्या विरुद्ध असूनही त्या आपल्या पतीची सत्ता व विशेषाधिकार यात सहभागी असतात. विशिष्ट बड्या गृहस्थाची पत्नी म्हणूनच त्यांना आनंद वाटतो. म्हणून विषमतेवरील तात्त्विक चर्चेत जरी त्यांनी पुरोगामी सुधारणांच्या बाजूने मत दिले, तरी आपल्या मताप्रमाणे वागण्याचा जेव्हा प्रसंग येतो; तेव्हा त्या स्वत:चे विशेषाधिकार सोडून देण्यात नाखूष असल्याचे दिसून येईल.’ 

काँग्रेसपासून ते स्त्रीमुक्ती चळवळीपर्यंत सर्व चळवळींत शहरी उच्चभ्रूंचे वर्चस्व असता कामा नये, अशी गांधींची स्पष्ट भूमिका दिसते. या चळवळींमध्ये भारतातील दरिद्रनारायण, गरीब, कष्टकरी स्त्री-पुरुष बहुजनवर्गाचा प्रमुख सहभाग असला पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न व आग्रह राहिला आहे. गांधींच्या संपूर्ण विचारसरणीमध्ये असलेल्या लोकशाही व समतेच्या प्रभावामुळे हे घडले. गांधींना भारतातील उच्च-नीचतेच्या समाजरचनेने केलेले भीषण शोषण व अत्याचाराची जाण आहे आणि या समाजव्यवस्थेचे बळी असलेल्या सर्वसामान्य माणसाबद्दल अपार पोटतिडीक आहे. परंतु या सर्व रंगच्छटांतील ब्राह्मण्याचे एक सूत्र आणि भारतीय संदर्भात ब्राह्मणी वर्चस्वाच्या प्रश्नांची गहनता व भीषणता यांचे निदान करण्यात ते कमी पडले, असे वाटते. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारसदारांच्या ब्राह्मण्यानेच त्यांचा संपूर्ण वैचारिक व नैतिक वारसा धुळीला मिळवला.

स्त्रियांचे नैतिक श्रेष्ठत्व व सामर्थ्याची संकल्पना मांडून स्त्रीच्या वस्तूकरणास ठाम विरोध करणाऱ्या गांधींनंतर काँग्रेसच्या पक्ष यंत्रणेत व एकूणच राजकारणात स्त्रियांचे वस्तूकरण व शोषण झाले; त्यामुळे सर्वसामान्य स्त्रिया काँग्रेसपासून व राजकारणापासून दूर गेल्या. गांधींचे वैशिष्ट्य हे की- राजकीय स्वातंत्र्य, भारतीय कारागिरांची स्वदेशी उत्पादनव्यवस्था, स्त्रीस्वातंत्र्य आणि अस्पृश्यता निर्मूलन या चळवळींची कार्यक्षेत्रे अलग-अलग न मानता या सर्व प्रश्नांची सांगड घालून गांधींनी मांडणी केली. स्वदेशी व अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे नेतृत्व करण्यास स्त्रिया अधिक योग्य आहेत, अशी त्यांची भूमिका होती. देशातील पारंपरिक उत्पादनव्यवस्था ब्रिटिशांनी उद्‌ध्वस्त केल्यामुळे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर बेकार झाल्या होत्या. त्यामुळे स्वदेशीची चळवळ ही स्त्रियांचा मान, रोजगार आणि राजकीय सहभाग यांचे प्रतीक होती.

भारतीय स्त्री चळवळीने गांधींच्या विचारांची व कार्याची फारशी दखल घेतलेली दिसून येत नाही. वस्तुत: भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवनामध्ये स्थान निर्माण करण्याचे काम प्रथम गांधींनी केले. सर्वसामान्य पारंपरिक स्त्रीला समाजकारणात उतरविण्याची कठीण कामगिरी गांधींनी केली. बहुसंख्य स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा गरिबी व बेकारीचा प्रश्न आहे, असे गांधींचे म्हणणे होते. ‘‘विधवा व बालविवाह या 15 टक्के उच्चभ्रू समाजाच्या समस्या आहेत; 85 टक्के बहुजन समाजाच्या नाहीत; त्यांचे प्रश्न वेगळे आहेत.’’ असे गांधींचे आकलन होते. 

त्यांनी महिलांना राजकारणात उतरविले, तेही बहुजनांना देशोधडीला लावणाऱ्या प्रश्नांवर- बेकारी व उत्पादनव्यवस्थेशी संबंधित स्वदेशी आंदोलन, दारूबंदी आंदोलन व अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतून. स्त्री-अत्याचार व दुष्ट रूढींच्या संदर्भात कायद्यांच्या उपाययोजनेला गांधींनी विरोध केला नाही; परंतु तो परिणामकारक उपाय नाही, असे त्यांचे मत होते. अधिकाधिक स्त्री-पुरुषांनी स्वातंत्र्य व समतेच्या मूल्यांचा मनापासून केलेला स्वीकार व त्या दृष्टीने या मूल्यांचा प्रसार करणारी चळवळ त्यांना महत्त्वाची वाटते. ‘‘म्हणून मी सर्व कायदेशीर अपात्रता रद्द करण्याचा पुरस्कार करीत असलो, तरी हिंदुस्थानातील प्रबुद्ध महिलांनी मूळ कारणात शिरावे, असे मला वाटते. स्त्री ही त्यागाची व क्लेशाची मूर्ती आहे आणि तिच्या सार्वजनिक जीवनातील प्रवेशाचा परिणाम ते जीवन शुद्ध होण्यात, अनिर्बंध मत्ता संचय व महत्त्वाकांक्षा यांना पायबंद घालण्यात व्हावा. लाखो माणसांना पुढील पिढीला देण्यासाठी मालमत्ता नाही, हे त्यांना कळू द्या.’’

वारसा हक्कासारखे कायदे लाखो महिलांच्या दृष्टीने गैरलागू आहेत, असे गांधींना वाटते आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांनी सार्वजनिक जीवनात येण्यामुळे जो सामाजिक परिणाम होतो- परिवर्तन साध्य होते, ते कायद्याच्या सुधारणांपेक्षा कैकपटींनी परिणामकारक आणि उपयुक्त आहे, असे त्यांचे मत आहे. म्हणून स्त्रियांना ग्रासणाऱ्या विविध मुद्यांवर स्त्रियांना सार्वजनिक जीवनात आणण्याचे काम गांधींनी केले.

Tags: स्त्रीस्वातंत्र्य स्त्री स्त्रीवाद काँग्रेस महात्मा गांधी रेखा ठाकूर Rekha Thakur Women Strivad Feminism Congress : Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रेखा ठाकूर
obcrekha@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके