डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधी, विनोबा आणि स्त्रीशक्ती : स्त्रीमुक्ती ?

गांधीजींच्या जीवनाची बैठक आध्यात्मिक होती. तत्कालीन परिस्थितीची गरज म्हणून त्यांनी राजकारण केले. त्या क्षेत्रालाही आध्यात्मिक वळण दिले. स्वतंत्र भारताचे प्रारूप ते मांडत होते. स्वतंत्र भारतात स्त्रीचे स्थान काय असेल हे त्यांचे सूत्रमय वाक्य सांगून गेले. ‘भंग्याची मुलगी राष्ट्रपतिपदावर विराजमान होऊ शकेल.’ हे त्यांचे वाक्य स्त्रीशक्तीच्या पुरस्कर्त्याच्या (आणि दलितांच्या उत्थानाच्या) कार्याला प्रेरक व दिशा देणारे ठरले.

आधुनिक भारतात स्त्रीशक्तीसाठी पावले टाकणाऱ्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्यांची नामावली करायला घेतली तर गांधी आणि विनोबांचे नाव लगेच आठवते. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या दोघांनी स्त्रियांच्या समस्येला मुळातून हात घातल्याने त्यांचे विचार आणि कार्य मौलिक ठरते.

महर्षी अण्णासाहेब कर्व्यांनी अखिल भारतात सर्वप्रथम (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या नावाने) महिला विद्यापीठ स्थापन करून स्त्रियांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रापर्यंत नेण्याचे महान कार्य केले. अण्णा एकदा म्हणाले, ‘‘आमचे काम मंद गतीने चालले होते; पण गांधी नावाच्या झंझावाताने देश व्यापला आणि त्याने आमच्या कितीतरी पट कार्य महिलांसाठी करून टाकले. विझलेल्या समाजमनावर एकच प्रचंड शक्तिशाली घाव घालून त्यांनी ‘सौ सुनार की एक लुहार की’ ही हिंदीतील म्हण सार्थ ठरविली. समाजाच्या सर्व स्तरांतील महिला गांधीप्रणीत स्वातंत्र्यलढ्यात उतरल्या. आमच्या उच्च शिक्षणाने त्यांच्यामध्ये इतकी निर्भयता आली असती, असे खात्रीलायकपणे म्हणता येत नाही.’’ गांधी, विनोबा यांनी स्त्री-शिक्षणाचे जे कार्य केले, त्याचा पुरस्कार अनेकांनी केला. त्यांपैकी आचार्य दादा धर्माधिकारी यांनी आपल्या विशिष्ट शैलीत त्या विचाराला दुजोरा देऊन बळ दिले. दादा म्हणाले, ‘‘स्त्रिया जोपर्यंत सौभाग्याकांक्षेचा त्याग करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा सामाजिक दर्जा दुय्यमच राहील.’’ विवाह आणि अपत्यप्राप्ती (तोही मुलगा) हीच जीवनाची सार्थकर्ता मानण्याची स्त्रियांची मानसिकता बदलणे अपरिहार्य आहे, हे त्यात आलेच. थोर व्यक्तींची काही वाक्ये मंत्रासारखी काम करून जातात.

समाजाला प्रेरक ठरतात. गांधीजींच्या जीवनाची बैठक आध्यात्मिक होती. तत्कालीन परिस्थितीची गरज म्हणून त्यांनी राजकारण केले. त्या क्षेत्रालाही आध्यात्मिक वळण दिले. स्वतंत्र भारताचे प्रारूप ते मांडत होते. स्वतंत्र भारतात स्त्रीचे स्थान काय असेल हे त्यांचे सूत्रमय वाक्य सांगून गेले. ‘भंग्याची मुलगी राष्ट्रपतिपदावर विराजमान होऊ शकेल.’ हे त्यांचे वाक्य स्त्रीशक्तीच्या पुरस्कर्त्याच्या (आणि दलितांच्या उत्थानाच्या) कार्याला प्रेरक व दिशा देणारे ठरले. गांधीजींच्या आश्रमात विनोबारचित एकादशव्रताचा पाठ रोज केला जातो. सत्याग्रही अनुशासनाचा तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सत्याग्रहींची ती जीवनसाधना मानली जाते. या एकादशवृतात ब्रह्मचर्य हे व्रत समाविष्ट केलेले आहे. ब्रह्मचर्याचा व्यापक आणि खोल अर्थ तेथे अभिप्रेत असला, तरी सार्वजनिक जीवनात स्त्रियांना निर्धोकपणे, निर्भयपणे आणि मोकळेपणाने सहभागी होता यावे, हाही त्यामध्ये एक उद्देश आहेच. आचार्य विनोबाजींच्या जीवनात अध्यात्माला प्राथमिकता होती. गांधींचे स्त्रीला राष्ट्रपतिपदावर विराजमान करण्याचे स्वप्न होते, तर स्त्रीला शंकराचार्यांच्या समकक्ष स्थान प्राप्त व्हावे हे विनोबांचे स्वप्न होते. दोघांनाही स्त्रीची आजची दु:स्थिती बदलायची होती; पण केवळ पुरुषांच्या बरोबरीला तिला आणणे एवढा मर्यादित अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता.

त्यामुळे विनोबांच्या आश्रमात मुलींना मुलग्यांच्या बरोबरीने स्थान फार पूर्वीपासून असूनही ते तेवढ्यावर संतुष्ट नव्हते. स्त्रीचे आत्मभान जागृत करून त्यांना स्त्रीशक्तीचा विकास साधावयाचा होता. म्हणून मार्च 1959 मध्ये विनोबांनी पवनार येथे ब्रह्मविद्या मंदिराची स्थापना केली. विनोबांचा जीवनमंत्र होता. ‘ब्रह्म सत्यः, जगत् स्फूर्तिः (जगन्मिथ्यः नव्हे), जीवनं सत्यशोधनं.’ आणि म्हणून केवळ प्राचीन परंपरा सांभाळत बसण्याचा मर्यादित मार्ग या मंदिराने धरला नाही. विनोबांनी स्त्रीला ब्रह्मविद्येचा अधिकार असल्याचा केवळ पुरस्कार केला नाही, तर स्त्रियांच्या आध्यात्मिक साधनेसाठी ब्रह्मविद्या मंदिर सुरू केले व गांधींच्याही पुढे पाऊल टाकले. उत्पादक श्रमांच्या क्षेत्रात ब्रह्मविद्या आणण्याचा सामूहिक प्रयोग आपल्या साधनेद्वारा आजही तेथील ब्रह्मवादिनी भगिनी करीत आहेत. जन्मल्यापासून स्त्रीला देहपरायण बनविणाऱ्या सामाजिक परंपरेच्या विपरीत तिला देहभावनेच्या वर उचलण्याची साधना आजही तेथे सुरू आहे. (तेथेच विनोबांच्या शवाला भगिनींनी खांदा देऊन अग्नीसुद्धा एका स्त्रीने - विधवेने दिला.)स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाली की ‘ती देह आहे, उपभोग्य वस्तू आहे’, या साऱ्या विचारांपासून तिची (आणि समाजाचीही) मुक्ती होईल. स्त्री-समस्यांचा गुंता सुटेल.
 

Tags: म.गांधी व विनोबा भावे यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन feminist approach by gandhi & vinoba bhave weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके