डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधीजींचे उत्तराधिकारी : लोहिया, जयप्रकाश , जॉर्ज फर्नांडिस

माझे वडील, तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतके चांगले होते. पं. नेहरू संत होते. इंदिराजी म्हणतात, 'महात्मा गांधींविषयी मात्र अनेक  'काल्पनिक गोष्टी' आहेत'. गांधीजींविषयी मार्टिन ल्युथर किंग मात्र म्हणाले, 'येशूने आम्हाला ध्येय दाखविले. त्या ध्येयाप्रत जाण्याचा रस्ता दाखविला – गांधीजींनी! इतिहासावर प्रभाव अनेक राजकारणी लोकांनी पाडला. परंतु अनेकांगी चिरंतन ठसा उमटविला तो गांधीजींनीच.' गांधी-विचार कृतीत परिवर्तित करण्याचे श्रेय डॉ. लोहियांचे, जयप्रकाशजींचे. गांधीजींच्या एकाच नाण्याच्या या दोन बाजू होत ..... जॉर्ज फर्नांडिस यांचा विचार.  एक मनोज्ञ अनुवाद.

ओरियाना फाची या इटलीच्या एक ख्यातनाम पत्रकार आहेत. जगातल्या प्रसिद्ध राजकारणी व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची त्यांची विशेष ख्याती आहे. लेखक व कादंबरीकार असल्या तरी 'मुलाखती' हा त्यांचा हातखंडा विषय. त्यांनी घेतलेल्या मुलाखती आपल्या वृत्तपत्रात छापायला मिळाव्यात, म्हणून वृत्तपत्र इतर अनेकांपेक्षा त्यांना जास्त पैसे द्यायला तयार असतात.

या ओरियाना बाईंनी फेब्रुवारी 1972 मध्ये जगातील वृत्तपत्रांसाठी इंदिरा गांधींची मुलाखत घेतली. 'इतिहाससे मुलाखत' या त्यांच्या पुस्तकातही ती छापली आहे.

‘तुमचे जीवन व कार्य यांवर सर्वात जास्त प्रभाव कोणत्या व्यक्तीचा आहे?'  या ओरियाना बाईच्या प्रश्नाला इंदिराजींनी जरा लांबलचक उत्तर दिले आहे. त्या म्हणतात, 'माझे वडील संत होते. व्यक्ती म्हणून ते फार चांगले होते कल्पनेची पराकाष्ठा करून आपण व्यक्तीच्या चांगुलपणासंबंधी जे म्हणू त्यापलीकडे ते चांगले होते. कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले, तरी ते राजनीतिज्ञ नव्हते. आम्ही परस्परांना पूर्ण जाणून होतो.

हे उत्तर मध्येच थांबवून ओरियाना बाईंनी विचारले.

'आणि महात्मा गांधी?’

इंदिरा गांधींनी दिलेले उत्तर वाचा. 'त्यांच्या मृत्यूनंतर अनेक काल्पनिक गोष्टी तयार केल्या गेल्या. हे खरं आहे की त्यांचं व्यक्तिमत्व विशेष होतं. ते बुद्धिमान होते. लोकांची नस त्यांना कळली होती. ते फार समजदार होते. माझे आई-वडील कॉंग्रेस कार्यकारणीचे सदस्य असताना तेही सदस्य होते. तेव्हा ते आमच्याकडे येत. तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आले. पण आम्ही युवक, त्यांच्या अनेक गोष्टींशी सहमत होत नसू.' 

या मुलाखतीची इथे चर्चा करण्याचे एक विशेष कारण आहे. गेल्या 40 वर्षात आपल्या देशात गांधी विचार प्रभावहीन करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहेत. या पूर्वनियोजित कटात इंदिराजींचा हात मोठा आहे. 'जवाहरलाल नेहरू चांगले, गांधीजी हुशार, आणि गांधीजींच्या मृत्यूनंतर काल्पनिक कथा तयार केल्या गेल्या!' हे सांगणे लक्षात घेण्यासारखे आहे.

गांधीजींच्या मृत्यूनंतर देशातील अनेक महापुरुषांनी त्यांना आपापल्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. जगातील सर्वांत मोठे वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले, “खरोखरच, अशा माणसाने जगात जन्म घेतला होता का, हा प्रश्न लोक हजार वर्षांनंटर विचारतील - गांधीजींनी भारत स्वतंत्र होण्यासाठी आंदोलन चालवले. फक्त तेवढ्यापुरती महानता आईनस्टाईनना अभिप्रेत नाही. स्वतःच्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. चीनचे माओ, तुर्कस्तानचे कमाल अतातुर्क, युरोपातील अनेक राष्ट्रपुरुष यांनी इतिहासावर आपला ठसा उमटवला. पण गांधीजींप्रमाणे त्यांचा दूरगामी प्रभाव पडला नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्याशिवायही त्यांना इतिहासात स्थान आहे. सत्य व अहिंसा ही दोन सूत्र त्यांनी जगाला दिली. संघर्षाची, शस्त्रांपेक्षाही परिणामकारी अस्त्र म्हणून त्यांनी ती लोकांपुढे मांडली. विशेष म्हणजे या अस्त्रांचा वापर कमजोर व्यक्ती करू शकतात. गांधी जी असत्यावर आधारित शोषणपूर्ण व्यवस्थेला आव्हान देऊन थांबले नाहीत. या शक्तीचे मानदंडच त्यांनी बदलून टाकले. राष्ट्र असो किंवा व्यक्ती; दोन्हींकरिता संपत्ती आणि शस्त्र या जीवनातील उपलब्धीच्या कसोटया मानल्या गेल्या होत्या. पण गांधीजींनी कमजोर व्यक्ती वा समूहाच्या हातात दिलेले शस्त्र संपूर्ण जगाकरिता नवे आहे. त्याचा पुरेसा उपयोग मात्र अजून व्हायचा आहे. 

गांधीजींनी संपूर्ण जगासमोर सभ्यतेची एक नवीन रूपरेषा ठेवली. त्या रूपरेषेचे अनेक बिंदू आहेत. त्यांतला एक, विकेंद्रीकरणाचा, यामध्ये सत्ता व विकासाचे विकेंद्रीकरणही अंतर्भूत आहे. स्वत:च्या भविष्याचा निर्णय सामान्य माणसाला घेता यावा असा मार्ग त्यांनी दाखवला, पूंजीवादी किंवा मार्क्सवादी विचारधारेतून आधुनिकीकरण व यांत्रिकीकरणाच्या नावावर साऱ्या जगाला सभ्यतेचे जे दर्शन घडते आहे, त्यातून ते कोणत्या दिशेला जात आहेत ते स्पष्ट झाले आहे. आपल्या देशात तर यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण, ही सत्ताधारी आणि संपत्तिधारी लोकांच्या हातात केंद्रित झालेली आहेत. हे मूठभर लोक देशाचे आर्थिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. स्वातंत्र्याच्या चाळीस वर्षांनंतरही अजून दहा कोटी लोकांना रोजगार नाही. आज देशात अराजक माजू पहात आहे. गेल्या तीन वर्षांत पोलिसाच्या संख्येत व सैन्यात पाच लाखांची वाढ झाली. ‘टेररिस्ट लॉ' सारखे लोकशाही विरोधी कायदे झाले, करावे लागले. ही सत्ता व अधिकार बळकावण्याचीच उदाहरणे होत.

जगातील इतर देशांमध्ये याहून वेगळी स्थिती नाही. जागतिक अर्थव्यवस्था युद्धाच्या तयारीवर आधारलेली आहे. जगात रोज तीन हजार कोटी रुपये युद्धसामग्री तयार करण्यासाठी खर्च होत आहेत, कोटयवधी तरुण सैन्यात जात आहेत. मानवाची हत्या करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. याचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात पडतो आहे.

अशा मानवताविरोधी आणि क्रूरतेवर आधारित व्यवस्थेला एकच पर्याय होऊ शकतो, तो म्हणजे महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान, त्यावर आधारित कार्यक्रम, असा कार्यक्रम यश मिळवेल याला साक्षी इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अहिंसात्मक सत्याग्रहालाच यश मिळाले. तिकडे अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रातही अशा सत्याग्रहामार्फत काळ्या लोकांनी आपले नागरिकत्वाचे हक्क मिळवले. इतकेच नव्हे तर काळयांच्या या लढाईत गोरे नागरिकसुद्धा सहभागी झाले. मार्टिन लूथर किंग म्हणाले होते, येशूने आम्हाला आमचं ध्येय दाखवलं, तर त्या ध्येयाप्रत जाण्याचा रस्ता गांधीजींनी दाखवला. रशियामध्ये लोकाधिकारासाठी संघर्ष करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक साखारोव अनेक वर्षांनंतर जेलमधून मुक्त झाले. अमेरिकेप्रमाणेच, दुसऱ्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राला साखारोव यांच्या आत्मबलापुढे हार पत्करावी लागली. पुन्हा एकदा महात्मा गांधीच साखारोवच्या माध्यमातून विजयी झाले.

भारतामध्ये डॉ. राममनोहर लोहिया व जयप्रकाश यांनी गांधीजींच्या कार्यक्रमाचा विकास करण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला. चरखा हे त्यांनी एक प्रतीक मानले. काँग्रेसने देशात मोठे उद्योग व यांत्रिकीकरण यांच्या नीतीचा अवलंब केला. याविरुद्ध लढताना डॉ. लोहिया गांधीजींच्या एक पाऊल पुढे गेले. त्यांनी अल्पप्रमाण यंत्राची कल्पना मांडली. पण आमच्या देशात संपन्न लोकांमध्ये गुलामी वृत्ती आहे. आज जेव्हा युरोपात विकेन्द्रीकरण स्वीकारले जाऊ लागले, गोरे लोक त्याचा पुरस्कार करू लागले, तेव्हा आमच्याकडचे लोक त्याचा विचार करू लागले. गांधी व लोहिया पॅरिस व बॉनला जाऊन आमच्याकडे परत येत आहेत ! 

विकेंद्रीकरणापासून सत्याग्रहापर्यंत सर्व विचारांना भारताच्या नवनिर्मितीच्या कार्यक्रमांमध्ये परिवर्तित करण्याचे सारे श्रेय डॉ. लोहियांचे आहे. गंधीजींच्या नावावर स्वार्थ साधून त्यांचे विचार निष्प्रभ करणे ही गांधीजींची विटंबना, गांधींचे अनुयायी म्हणवणारेच तर करीत आहेत. डॉ. लोहियांच्या अनुयायांबाबतही तेच झाले. लोहियांच्या कार्यक्रमाचे तत्त्वज्ञान समजून घेऊन त्याकरिता कोणी वाहून घेतले नाही. सत्ता व सत्ताकारणात अडकलेले लोहियांचे अनुयायीच खरे तर त्यांच्या कार्यक्रमाचे सर्वांत मोठे शत्रू झाले.

भारताच्या समाजवादी आंदोलनाला लोहिया व जयप्रकाशांचे संयुक्त नेतृत्व लाभले असते, तर इतिहास वेगळा घडला असता. पण जयप्रकाशजींनी सत्तेच्या राजकारणापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेऊन सर्वोदय चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समाजवादी आंदोलन विखुरले गेले. ती प्रक्रिया आजही सुरू आहे. लोकांचे व्यक्तिगत हेवेदावे वगळता समाजवादी नीतीत व कार्यक्रमांत एका वाक्याचीही भर पडली नाही. डॉ. लोहियांना विश्वास होता की, देशातील सर्वसामान्य माणसाला जागे करण्याचे काम जयप्रकाशाइतके यशस्वी रितीने कोणीही करू शकणार नाही, म्हणूनच समाजवाद्यांच्या एकत्रीकरणाचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाशजींनी करावी, अशी त्यांची अतीव इच्छा होती. मृत्युसमयी इस्पितळात सुद्धा ते पुन्हा पुन्हा म्हणत, 'जयप्रकाशांना आणा. तेच देश हलवू शकतात.’

डॉ. लोहियांच्या मृत्यूनंतर काही वर्षानी जयप्रकाशांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. गुजरात व बिहारच्या तरुणांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या नव्या परिस्थितीत जयप्रकाशजींनी पुन्हा राजकारणात उडी घेतली. विशेष म्हणजे तीन पिढयांचे नेतृत्व करून पिढ्यांतले अंतर त्यांनी संपवले. ते वारंवार म्हणत, 'मी अंधारात होतो, गुजरातच्या तरुणांनी मला प्रकाश दाखवला.’

या आंदोलनातून “संपूर्ण क्रांती”ची नवीन संकल्पना उदयाला आली. पण तिची पूर्ण व्याख्या त्यांनी कधी केली नाही. अनेक व्याख्या शक्य आहेत, पण डॉ. लोहियांच्या कार्यक्रमापेक्षा संपूर्ण क्रांतीची कल्पना काही वेगळी नाही हे निश्चित....

गांधीजींचे उत्तराधिकारी म्हणून लोहिया व जयप्रकाश, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परिवर्तनाचा कार्यक्रम हातात घ्यायचा तर ‘गांधी-लोहिया-जयप्रकाश’ यांच्या तत्त्वज्ञानाचाच आधार घ्यावा लागणार!

Tags: इंदिरा गांधी संपूर्ण क्रांति आंदोलन जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया महात्मा गांधी Indira Gandhi Sampurna kranti andolan Jayprakash Narayan Ram Manohar Lohiya Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके