डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

फक्त गांधींबद्दल लिहून, वाचून त्यांच्या विचारांचा समाजावर स्त्रियांवर काय परिणाम झाला याचा अंदाज येणार नाही. विदेशी स्त्रियांत गर्भश्रीमंत, उच्च शिक्षित, चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रिया या क्रांतिकारक विचार-आचाराने प्रभावित होऊन आपले सर्वस्व भारतातील कामासाठी वेचायला सिद्ध झाल्या होत्या. त्यातील प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक पार्श्व भूमी वेगवेगळी होती. पण एक मात्र खरं कीसाऱ् या जणी गांधींच्या विचारांनी, त्यांच्या कामाने भारावल्या होत्या. घरदार, आपला सांस्कृतिक परिवेश सोडून, आपलं सर्वस्व पणाला लावून भारतात आल्या. त्यातील अनेक जणी तर गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या. त्यांच्याकरता वाटेल ते करायला सज्ज होत्या.  

गांधी हा माणूस समजावून घ्यायचा म्हटलं तर महाकर्मकठीण, म्हटलं तर अगदी सोपा. काय होतं तरी काय त्याच्यात? ना 56 इंच छाती, ना महागडी वस्त्रप्रावरणं, ना देखणं व्यक्तिमत्त्व, ना कुठलं पद, ना घोडंगाड्यांचा रुबाब, ना कुठलंही सत्तेचं वलय, ना थोर परिवाराचं पाठबळ. एक सामान्यसा दिसणारा, हाडकुळा, छातीच्या फासळ्या मोजता येतील अशी अंगकाठी. चार पोरं पदरी असलेला. साधी दिसणारी, गुजराती साडीतली बायको. असा त्याचा ‘सीव्ही’. पण प्रचंड चुंबकीय शक्ती असलेला माणूस. जो-जो त्याच्या सहवासात येई, त्याचे विचार ऐके, त्याच्याबद्दल वाचे तो त्याच्याकडे खेचला जाई. गरीब ते गर्भश्रीमंत, स्त्री-पुरुष, तरुण, वयस्क, देशी- विदेशी- कुणीही त्याच्या कचाट्यातून सुटत नसे.

आज दिडशे वर्षे झाली. अक्षरश: शेकडो पुस्तकं त्याच्यावर त्याला समजून घ्यायला देश-विदेशात लिहिली गेली. हातात सापडतो-सापडतो असं वाटला, तरी तो बराचसा सुटलेलाच असतो. कुणी भारावलेला, कुणी भक्त, कुणी चिकित्सक, कुणी अनुयायी, कुणी प्रेमात आकंठ बुडलेला/ली व्यक्ती, कुणी अभ्यासू, कुणी प्रचंड द्वेष्टा नि खुनशी, कुणी गोरा, कुणी काळा, कुणी देशी, कुणी विदेशी. सगळ्यांकडे मिस्किलपणे हसत बघणारा. सगळ्यांना मोहनदास करमचंद गांधी या तद्दन ग्लॅमर नसलेल्या नावाची, त्याच्या कामाची बाधा झालेली दिसतेय. काय गारूड केलं त्याने की, महासत्ता त्याच्या सत्याग्रहापुढे हतबल झाली? तो उपाशी राहिला, तर अख्ख्या देशाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. इतरांचे क्लेष कमी व्हावेत म्हणून हा माणूस स्वत:ला क्लेष करून घेत होता. तो हट्टी होता, पण व्यवहारी होता. तो गरिबांचा कैवारी होता, श्रीमंतांचा मित्र होता. शत्रूंचाही हितचिंतक होता. कुणाशीही पंगा (आजचा शब्द) घ्यायला तो मागेपुढे पाहत नसे. कुठल्याही क्षणी तुरुंगात जावे लागेल असे काम तो करीत होता!

आजच्या भाषेत ‘भाई’ होता. कारण लोकांचे प्रश्न सोडवायला तो मदत करत होता. लोकांच्या मनातून भीती घालवायला मदत करत होता. तो शक्तिशाली  होता, कारण तो शस्त्रच वापरत नव्हता. त्याचे शस्त्र होते सेवा, नैतिकता नि निर्भयता. याला समजायचे म्हणजे कुठल्या अंगाने? कोणते काम जाणायचे? एकेक समजायला एकेक जन्म जाईल. केवळ अस्पृश्यतानिवारण घ्या, खादी घ्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न घ्या, देशाचे राजकारण घ्या, वा समाजकारण, खेडी-सुधार, आहार-विहार, आचारशुद्धता घ्या, धार्मिक शिक्षण घ्या- प्रत्येक बाबतीत या माणसाचे विचार जगावेगळे होते. तसं म्हटलं तर वेगळे नव्हतेही, पण ते प्रत्यक्षात आणायची जिद्द त्याच्यात होती. सत्यनिष्ठा, निसर्गप्रेम, अहिंसेचे पालन... कोणत्या कामाबद्दल समजून घ्यायचे? त्याच्या एका शब्दाखातर स्त्रिया, पुरुष घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घ्यायला सज्ज होत. त्याचे निर्मळ हसणे एखाद्या लहान मुलासारखे होते.

लक्षाधीश घरच्या पडदानशीन स्त्रिया जाड्याभरड्या खादीच्या साड्या नेसून समाजसेवेत उतरू लागल्या. ओटीवरही न येणाऱ्या स्त्रिया चुलीपुढून उठून थेट राजकारणाच्या व्यासपीठावर जाऊ लागल्या. काय ही जादू घडत होती? हा जादूगार काही त्यांना सुखासीन, चकचकीत जीवनाची स्वप्नं दाखवत नव्हता. चैनीची चटक लावत नव्हता. उलट तो त्यांना सदाचार, साधी राहणी, साधं अन्न घेण्याचं माहात्म्य सांगत होता. पण एक अलौकिक नि कधीही कुणाही नेत्याने न दाखवलेलं स्वप्न तो दाखवत होता. त्यासाठी ह्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या, अशिक्षित-अल्पवस्त्रांकित स्त्रियांचाही सहभाग त्या स्वप्नपूर्तीत मागत होता. पारतंत्र्याच्या बेडीतला गरीब माणूस नव्या उमेदीने त्याच्याबरोबर लढ्याला उभं राहण्याचं धैर्य एकवटून तुरुंगवास भोगायला तयार झाला. ह्या लढ्यात सामान्य माणूस कुणा उद्धारकर्त्याची वाट पाहत नव्हता, तर त्यात तो स्वत:ही कर्ता होऊ पाहत होता. हेच अकल्पित स्वप्न त्याला खुणावत होतं.

हे सामर्थ्य होतं गांधीनामक मंत्राचं. जो साऱ्यांचेच जीवन एका भव्य स्वप्नाच्या दिशने नेऊ पाहत होता. परिपूर्तीचं कुठलंही आमिष नव्हतं, आयतं काही मिळणार नव्हतं. स्वत:च्या मनाचा निग्रह, सत्यनिष्ठा, स्वार्थत्यागाची तयारी एवढ्याच सामग्रीवर ही नि:शस्त्रांची सेना पाहता-पाहता रणात उतरत गेली. केवळ ब्रिटिशांपासून मुक्तता हे ध्येय नव्हतं, तर आपल्या समाजजीवनातील आपणच करीत असलेले अन्याय दूर केल्याखेरीज ह्या मुक्तीला पूर्तता नाही, हे त्याचे समजावणे होते. या माणसाने आपली ही अन्यायाविरुद्धची लढाई दक्षिण आफ्रिकेतून सुरू केली. तेथील भारतीयांवरील अन्यायाची कल्पना येऊन त्याविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा देण्याचा अनोखा प्रयोग त्याने सुरू केला. अशा नि:शस्त्रांचा सामना करायची रक्तपिपासू सत्ताधाऱ्यांना सवयच नव्हती. त्यातून तो सत्तेच्या विवेकाला साद घालत होता. ‘शत्रूवरही प्रेम करू’ ही ख्रिस्ती लोकांना परिचित पंक्ती तो आळवत होता. तिथे भारतीय स्त्रियांच्या मंगळसूत्रालाच सरकारने हात घातला होता.

त्यावर गांधींनी भारतीय स्त्रियांना सांगितले की, याचा प्रतिकार तुम्हीच तुमच्या पद्धतीने करा. ‘‘आम्ही काय करणार? आम्ही अबला, जगाचा शून्य अनुभव!’’ त्यातूनच अबलांचे शस्त्र धारदार बनत गेले. ख्रिस्तीपद्धतीने न झालेले विवाह हे वैध नाहीत, त्यामुळे त्या स्त्रियांना पत्नी म्हणून मान्यता नाही, त्या ठेवलेल्या स्त्रिया नि त्यांची मुलं ही अनौरस!! हे सारे कल्पनेच्या पलीकडचे भीषण सत्य समोर आले. नि साऱ्या भारतीय स्त्रिया- हिंदू, मुस्लिम, पारशी- आपला विवाह, धर्मसंस्कार याच्या समर्थनार्थ एकत्र आल्या. आणि दुसरी एक शक्तिशाली गांधी (कस्तुरबा) उभी राहिली. एक नवी स्त्रीशक्ती झळाळून तळपू लागली. पतीच्या मागे चालणारी, लाजाळू; फक्त मुलंबाळं, स्वयंपाकपाणी नि सेवा करणारी स्त्री सामर्थ्यवान राजकीय सत्तेला आव्हान द्यायला पेटून पुढे आली. जगाने आजवर कधीच न पाहिलेल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने सरकारविरोधात बंड करून आपले म्हणणे पटवून देण्याचा हा अजब मार्ग तेथील स्त्रियांनी दाखवला. त्यासाठी कायद्याच्या विरोधात निदर्शनं केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगला.

कस्तुरबा ही जगातील पहिली सत्याग्रही महिला ठरली. तेथील निकृष्ट अन्न, राहण्याची वाईट व्यवस्था नि कठोर श्रम याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला; ज्यामुळे पुढे जन्मभर त्रास सोसावा लागला, पण नीतिधैर्य कणभरही उणावले नाही. स्त्रियांमधील असीम ताकदीची कल्पना गांधींना होतीच. सत्याग्रह आणि असहकार या दोन गोष्टी कस्तुरबांकडून शिकल्याचे गांधींनी नमूद केले आहे. स्त्रियांत आत्मबल, त्यागाची शक्ती भरपूर असते. ती जर राष्ट्रकार्याला वापरली तर चमत्कार होईल, अशी त्यांना खात्री होती. त्यांचे लोकांना आवाहन असे ते त्यांच्यातील नैतिकतेला, तारतम्याला, सहृदयतेला, विवेकाला! ते जे बोलत ते  लोकांना पटे, कारण सर्वसामान्यांना कष्टानेच पैसा मिळवायचा असे, सदाचारानेच जीवन कंठायचे असे. गांधींना द.आफ्रिकेत स्त्री सहकारी मिळाल्या. युरोपात गेल्यावर तिथे त्यांच्या विचाराने भारून त्यांच्या आश्रमात यायला सज्ज झालेल्या अनेक जणी आहेत.

ब्रिटनमध्ये स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी चालवलेल्या लढ्याने ते भारावून गेले होते. सुशिक्षित, उच्च घराण्यातल्या तरुण स्त्रिया तेथील संसदेत आपल्या हक्कासाठी ज्या प्रखरपणे लढत होत्या, तशाच प्रकारे आपल्याकडील स्त्रियांनी घराबाहेर पडून सत्तेच्या डोळ्याला डोळा भिडवला पाहिजे, असे त्यांना तीव्रतेने वाटले. पुढे भारतात तर अनेक स्त्रियांनी आपले जीवनच गांधीविचाराने घालवायचे व्रत घेतले. फक्त गांधींबद्दल लिहून, वाचून त्यांच्या विचारांचा समाजावर स्त्रियांवर काय परिणाम झाला याचा अंदाज येणार नाही.

विदेशी स्त्रियांत गर्भश्रीमंत, उच्च शिक्षित, चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रिया या क्रांतिकारक विचार-आचाराने प्रभावित होऊन आपले सर्वस्व भारतातील कामासाठी वेचायला सिद्ध झाल्या होत्या. त्यातील प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक पार्श्वभूमी वेगवेगळी होती. पण एक मात्र खरं की- साऱ्या जणी गांधींच्या विचारांनी, त्यांच्या कामाने भारावल्या होत्या. घरदार, आपला सांस्कृतिक परिवेश सोडून, आपलं सर्वस्व पणाला लावून भारतात आल्या. त्यातील अनेक जणी तर गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या. त्यांच्याकरता वाटेल ते करायला सज्ज होत्या. या सर्व जणींना गांधींनी कसे वागवले, क्वचित स्वत:ला कसे वाचवले हे जाणून घेणे- एखाद्या सनसनाटी  कादंबरीचा भाग होईल. अविश्वसनीय वाटाव्यात अशा या घटना नि त्यातील खऱ्या अर्थाने महानायकाने या साऱ्या अक्षरश: हजारो राजकीय व्यक्तींना, घटनांच्या केंद्रस्थानी असताना कसे विधायकतेकडे वळवले, हे जाणून घेणे जरुरीचे आहे.

विशेषत: स्त्रियांना आपल्या अत्यंत खासगी गोष्टीही सांगायला गांधी ही व्यक्ती का विश्वसनीय वाटत होती? कुणाला ही व्यक्ती येशूसारखी वाटे, करुणासागर, तर कुणाला नि:संग फकीर वाटे, कुणाला आपली आई वाटे तर कुणाला बापू! तर कुणाला तो परधार्जिणा वाटो, कुणाला काही वाटो, तो होता निव्वळ असंभव-संभव करणारा सामान्यांचा गांधीबाबा. त्यांच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या विदेशी-देशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते! -सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मार्गारेट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मार्गारेट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने, काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या.

काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली. ह्या सर्वांचा धांडोळा घेताना वेगळेच, आज स्वप्नवत्‌ वाटावे असे विेश मनासमोर साकारत गेले. खूप आव्हान वाटले. आज दिडशे वर्षे उलटली तरी हा माणूस का वाचावासा वाटतो?

जग खूप बदलले आहे, वैज्ञानिक प्रगतीने जगण्याचा वेग खूप वाढला आहे. सारेच स्वकेंद्रित झाले आहेत. तोही वेगळ्या अर्थाने स्वकेंद्रित होता, पण ते केंद्र त्याने बहुजन सुखाय वाढवत नेले. त्याचे प्रभावक्षेत्र अकल्पनीय दिशांनी पसरले. आज सुखाच्या कल्पना अफाट झाल्यात. निसर्गावर विजय मिळवण्याच्या ध्यासापायी साऱ्या सृष्टीचे संतुलनच बिघडलेय. म्हणूनच आज त्याचा अपरिग्रहाचा (असंग्रहाचा) विचार, गरजेपुरतेच निसर्गातून घ्या- हे सांगणे जगातील अनेक तरुणांना आकर्षित करतंय (त्यांनी ‘मिलिमलॅस्टिक’ चळवळ सुरू करून तसे जीवन अंगीकारलेय).

गांधींनी मांडलेले वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेबद्दलचे विचार आज अधिकच खरे वाटू लागले आहेत, आचरायला अवघड वाटू लागलेत; कारण दरम्यानच्या काळात आपण सुखसोर्इंना चटावलो आहोत. मागे जाणं शक्य नाही, पण मागे वळून पाहता तर येईल? म्हटलं, पाहू या, त्या काळातल्या स्त्रियांनी ही विचारांची सुनामी कशी झेलली? तेव्हाच्या समाजाचा उभा-आडवा छेद घेतला, तर काय दिसते? एकीकडे मध्यमवर्गातली स्त्री निर्भय बनली, तर दुसरीकडे गर्भश्रीमंत स्त्री धडाडीने रस्त्यावर उतरून घोषणा देऊन तुरुंगात जाण्यात गौरव मानू लागली. काय होता हा जादूटोण्याचा प्रभाव? राजकुमारी अमृतकौर, रेहाना तय्यबजी, प्रेमा कंटक, निर्मला देशपांडे, सरोजिनी नायडू अशा देशी ललना या वादळात उतरल्या.

एक ना अनेक जणींचे आयुष्य ह्या माणसाच्या विचारांनी पार बदलले. साऱ्या जणींना त्यांचे सर्वच विचार वा आचार पटत होते असे नाही. बहुतेकींनी कडाडून विरोध केला, चक्क भांडण केलं; पण त्यांची साथ सोडली नाही. त्यातला जो विचार आचरणात आणता येणं जमेल, पटेल ते मात्र निष्ठेने केलं. त्या साऱ्या जणींनी अनेक विधायक कार्ये इथे नि विदेशात उभी केली.

गांधीजी आणि त्यांच्या संपर्कात, सहवासात आलेल्या स्त्रिया ही मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून हे लिहिले जाणारे सदर पुढील दहा महिने (महिन्यातून दोन वेळा) प्रसिद्ध होत राहील.- संपादक    

Tags: sanjeevani kher Gandhi and woman Gandhi संजीवनी खेर गांधी आणि स्त्रिया गांधी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके