डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गर्विताने Why Waste? (वाया का घालवायचे?) या नावाने एक संस्था स्थापन केली, तेव्हा तिचे वय होते 15 वर्षे. तेव्हा तिने दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती. नंतरच्या चार वर्षांत तिने बरीच मोठी मजल मारली आहे, उत्तुंग म्हणावी अशी झेप घेतली आहे. जवळपास 200 हॉटेल्समध्ये ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही मोहीम यशस्वी झालेली आहे. हॉटेलचालकांनी ती स्वीकारली आणि ग्राहकांनीही.   

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याकडे शांत, सुखी व समृद्ध राज्य म्हणून पाहिले जाते. त्याची राजधानी असलेले बंगळुरू हे शहर तर अधिक चांगल्या कारणांसाठी ओळखले जाते. त्यातही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आल्हाददायक हवामानासाठी बंगळुरू शहराचा अव्वल नंबर आहे. दुसरे म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृती यांची उत्तम अभिरुची असलेल्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना या शहरात आहेत. या शहराला पूर्वी गार्डन सिटी म्हणजे बगीचांचे शहर असे म्हटले जात असे. गेल्या काही वर्षांत मात्र बंगळुरूला आयटी हब असे संबोधले जाते, म्हणजे भारतातील माहिती- तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू. या सर्व पार्श्वभूमीमुळे या शहरात, नव्या कल्पना घेऊन प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, अनेक लहान-मोठ्या व्यक्ती व संस्था पुढे येत असतात.

तर अशा या बंगळुरू शहरात राहणारी गर्विता गुल्हाटी नावाची 19 वर्षांची एक मुलगी आहे. आता ती बी.टेक.चे शिक्षण घेत आहे. पुढच्या वर्षी ती इंजिनिअर होणार आहे. तिने कथ्थक या नृत्यकलेत विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तिला वाचनाची चांगली आवड आहे, पत्रलेखनाची आवड आहे आणि कॅलिग्राफी म्हणजे सुलेखनकलेवरही तिचे प्रभुत्व आहे. 
या गर्विताचे आई-वडील नोकरी-व्यवसाय करतात. एक भाऊ आहे, तो शिकतोय. चौघांचे हे कुटुंब सुखी-समाधानी आहे. सर्वांचे आरोग्य उत्तम आहे. कमतरता अशी कशाचीच नाही. गर्विता शाळेत असतानाही अभ्यासात हुशार होती, कला-क्रीडा क्षेत्रांतही रमत होती. तिच्यात एक संवेदनशील मन आकाराला आले होते. त्यामुळे सभोवतालची परिस्थिती तिला अधिक कळू लागली होती. चर्चा-संवाद, बातम्या यांद्वारे अनेक चांगल्यावाईट गोष्टी तिच्या कानांवर आदळत होत्या, पाहायला मिळत होत्या. पण त्यातही विशेष लक्षात राहणारा प्रसंग तिच्याबाबत घडला, ती सहावीत असताना. एका वृत्तपत्रातील असे एक व्यंगचित्र तिने पाहिले, जे तिच्या मनात रुतूनच बसले. काय होते त्यात?
 
‘एका गाडीचा ड्रायव्हर काही पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळं दाखवतो आहे. त्यात एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे मोठे झाड आणि ते पाहायला आलेल्या पर्यटकांच्या पाठीवर ऑक्सिजनच्या बॅगा होत्या.’ आता व्यंगचित्रच होते ते, त्यामुळे त्यात कमी-अधिक अतिशयोक्ती असणार, हे उघड होते. पण त्याचा भावार्थ मात्र एका स्वतंत्र लेखातूनही मांडता येणार नाही इतका मोठा होता. पर्यावरणाची आपण किती हानी करीत चाललो आहोत, हे सांगणारे आणि पर्यावरणाचा ऱ्हास खूप टोकाला गेला तर काय होऊ शकते, हे सूचित करणारे ते व्यंगचित्र होते.
 
ते व्यंगचित्र बरेच दिवस गर्विताच्या मनात घोळत होते किंवा मानगुटीवर बसले होते असेच म्हणा ना! त्यामुळे झाले काय- तर पर्यावरणाच्या संदर्भातील बातम्या, लेख, भाषणे यांकडे तिचे अधिक लक्ष जाऊ लागले. त्यानंतर दोन-तीन वर्षे गेली. ती चौदा-पंधरा वर्षांची असताना म्हणजे 2014 मध्ये देशातील अनेक भागांत दुष्काळ पडला होता, त्याची झळ कर्नाटकातील काही भागांना बसली होती. त्याचा परिणाम बंगळुरू शहरावरही काही प्रमाणात झाला होता. दुष्काळाच्या त्या बातम्यांनी गर्विता अस्वस्थ होऊ लागली... आणि तशात आणखी एक प्रसंग घडला.
 
तिचे दहावीचे वर्ष नुकतेच सुरू झाले होते. तिच्या शाळेत Reap Benefit या संस्थेचे कुलदीप दंतेवाडिया यांचे एक व्याख्यान झाले. विषय होता- पर्यावरण आणि पाण्याचा वापर. त्यांनी बऱ्याच स्लाईड्‌स दाखवल्या, चित्रे-आलेख दाखवले, आकडेवारी दिली, पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे सांगितली आणि उपाययोजना काय असू शकतात याविषयीही सांगितले. त्यांच्या त्या व्याख्यानातील एका साध्या वाटणाऱ्या आकड्याने गर्विताच्या मनाचा कब्जाच घेतला.
 
कुलदीप यांनी सांगितले होते की, भारतभरात लहान- मोठी अशी लक्षावधी हॉटेल्स आहेत; त्या सर्व ठिकाणी ग्राहकांना जेवण, चहा-नाश्ता घेताना जे पाणी दिले जाते आणि त्यातून जे उरते व उष्टे म्हणून वाया घालवले जाते, ते सर्व पाणी एकत्रित मोजले तर रोजचा आकडा 1 कोटी 40 लाख लिटर इतका आहे. हा आकडा ऐकून गर्विता अचंबित झाली, हिशोब करू लागली. एका लिटरमध्ये साधारणत: तीन ग्लास पाणी असते. याचाच अर्थ, चार कोटींपेक्षा जास्त पिण्याचे ग्लास इतके पाणी रोज वाया घालवले जाते. भले त्यातील काही स्वच्छतेसाठी किंवा सांडपाणी म्हणून वापरले जात असेल आणि काही पाण्याचा पुनर्वापरही केला जात असेल, पण तरीही पिण्याचे म्हणावे असे बरेच स्वच्छ पाणी वाया घालवले जातेच!
 
त्या व्याख्यानानंतर घरी आलेली गर्विता नेहमीपेक्षा जास्तच अस्वस्थ होती. आई-वडिलांशी बोलली. दुसऱ्या दिवशी पर्यावरण विषय शिकवणाऱ्या  शिक्षकांशी बोलली. त्यांनी सांगितले, ‘‘हो, खरे आहे. पण हे थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या मुलांनी- तरुणांनी, नव्या पिढीनेच पुढाकार घेतला पाहिजे.’’
 
त्यानंतर गर्विताने सुरू केला रिसर्च. पाण्याची उपलब्धता, पाण्याचे स्रोत, पाण्याचा वापर, पाण्याचे प्रदूषण, पाण्याचे वाटप- असे बरेच काही. त्याही पुढे जाऊन ती या सर्वांचा समाजाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतोय, याचाही शोध घेऊ लागली. वृत्तपत्रे व पुस्तकांचे वाचन करून, टीव्ही व इंटरनेटवरून माहिती मिळवून आणि शिक्षक व अन्य काही जाणकारांशी/तज्ज्ञांशी बोलून तिच्या हाती जे तपशील आले, ते प्रचंड धक्कादायक होते. त्यातून आपल्या देशाचे जे चित्र उभे राहत होते, ते थरारून टाकणारे होते! आणि हे असेच चालू राहिले तर, पुढे काय-काय होऊ शकते याची कल्पना तर भयकंपित करणारी होती...
 
या सर्व प्रक्रियेमुळे गर्विताला पाणीप्रश्नाने झपाटून टाकले. काही तरी केले पाहिजे असे तिला वाटू लागले, स्वस्थ बसणे अवघड जाऊ लागले. मग ती अनेक मित्र-मैत्रिणींशी बोलू लागली. काहींनी तिला ‘इतका विचार का करतीयेस?’ असे म्हणून वेड्यात काढले. काहींनी तिला हसत-हसत उडवून लावले. काही मित्र- मैत्रिणींनी मात्र ‘आपण काही तरी केले पाहिजे’ असे बोलून दाखवले. मग ‘आपण काय केले पाहिजे?’ यावर त्यांच्यात चर्चा रंगू लागल्या. ‘आपण लहान आहोत, संख्येने थोडे आहोत, आपली ताकद कमी आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपण शालेय विद्यार्थी आहोत’; हे सर्व माहीत असल्याने, येणाऱ्या मर्यादांची त्यांना जाणीव होतीच. ‘पण तरीही आपण शक्य असेल ते केलेच पाहिजे’, यावर त्यांचे एकमत झाले.
 
मग त्यांनी एक कृतिकार्यक्रम आखला. शाळा सुटल्यानंतर रोज तास-दोन तास आणि सुट्टी असेल तेव्हा अधिक वेळ, बंगळुरू शहरातील हॉटेलांमध्ये जायचे आणि ‘पाणी वाया घालवू नका’, अशी विनंती हॉटेलचालकांना वा व्यवस्थापकांना, तेथील नोकरांना आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांनाही करायची. जवळपास  40 मुले-मुली या मोहिमेसाठी तयार झाली. म्हणून चार-पाच जणांचे गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटासाठी हॉटेल्सचे वाटप केले गेले, कोणत्या रस्त्यावर कधी जायचे आणि कोणत्या वेळी जायचे, याचे नियोजन करण्यात आले.

मग गर्विता व तिच्या मित्र- मैत्रिणींना बरेच वेगवेगळे अनुभव यायला लागले. ‘पाणी वाया घालवू नका, हा संदेश देण्यासाठी आम्ही आलोय’ असे सांगितल्यावर हॉटेलमधील बहुतेक सर्व जण ‘हो, ते आम्हाला मान्य आहे’ असे म्हणायचे. ‘पण तुम्ही हे असले उद्योग कशाला करता? स्वत:ची शाळा व अभ्यास नीट करायचे सोडून, इतरांना शहाणपण शिकवायला कशाला जाता?’ अशाच सर्वसाधारण प्रतिक्रिया असायच्या. ‘वेटर्स व ग्राहक यांच्याशी आम्ही बोलू का?’ असे विचारले, तर बहुतांश हॉटेलमालक किंवा त्यांचे व्यवस्थापक नकार द्यायचे. जवळपास 60 हॉटेल्सला त्यांनी भेट दिली, तेव्हा केवळ चार हॉटेल्समध्ये त्यांना जरा बरा प्रतिसाद मिळाला. 

गर्विता हे निराशेचे अनुभव आई-वडिलांना व शिक्षकांना सांगायला जात असे, तेव्हा ‘अधिक चिकाटीने व अधिक कल्पकतेने काम केले, तरच यश मिळेल’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळत असे. त्यानंतर गर्विता व तिचे मित्र-मैत्रिणी यांनी अनेक पोस्टर्स व बॅनर्स तयार केले, व्यंगचित्रे काढली, घोषणा असलेल्या पट्ट्या तयार केल्या. या सर्व कामात चमकदार शब्द वापरून, मार्मिक निरीक्षणे नोंदवून माणसांच्या वर्तनातील विसंगती ते दाखवू लागले. त्यासाठी नर्मविनोदांचा वापर करू लागले. त्यातून त्यांना मोहिमेचे सोपे सूत्र सापडले. ‘अर्धाच ग्लास, प्लीज!’ असे ते सूत्र. 

‘वेटर्सनी ग्राहकांना पाणी देताना अर्धाच ग्लास द्यावा, नंतर लागेल तसे पाणी द्यावे. मागितल्याशिवाय पूर्ण ग्लास देऊ नये’ असे विनंतीवजा आवाहन एकीकडे. त्याच वेळी ग्राहकांनाही विनंतीवजा आवाहन की, ‘अर्धाच ग्लास पाणी भरायला वेटरला सांगा, नंतर लागेल तसे घ्या.’ यापुढे जाऊन, प्रत्येक टेबलावर जग किंवा बाटली ठेवली तर ग्राहक आपल्याला हवे तेव्हाच व हवे तेवढेच पाणी घेण्याची शक्यता वाढते, हे लक्षात घेऊन तसे करण्याबाबत हॉटेलमालकांना विनंती करणे सुरू झाले. आणखी पुढे जाऊन, ‘शक्य असेल त्यांनी पाण्यासाठी मोठे ग्लास न वापरता, लहान किंवा मध्यम आकाराचे ग्लास ठेवावेत’ अशी विनंती सुरू झाली. 

हे सर्व करताना त्यांनी ठरवले : छोट्या-छोट्या गटाने जायचे, गोड बोलून, हसत मुद्दा समजावून सांगायचा. नकार आला तर वाद न घालता, न रागावता, निराश न होता बाहेर पडायचे आणि पुढच्या हॉटेलच्या दिशेने चालायचे. घेतलीच त्यांनी पत्रके किंवा भित्तिपत्रके तर ठीक, नाही तर त्याबाबतही आग्रही सूर ठेवायचा नाही. अशी ही मोहीम गर्विता व तिच्या मित्र-मैत्रिणींनी सातत्याने राबवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. काही हॉटेलचालक काही सूचनांचा अवलंब करायला तयार होऊ लागले. ग्राहकांच्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत म्हणून, काही हॉटेलचालक ‘तुमच्या सूचना सध्या तरी आम्ही स्वीकारू शकत नाही, पण असे व्हायला हवे, करायला हवे’ असे म्हणू लागले. ही मुले आली तर लगेच हिडीस-फिडीस करून बाहेर घालवण्याचा विचार करणारे पूर्वीचे हॉटेल चालक-मालक, मुलांचे ऐकून घ्यायला तयार होऊ लागले. मग या छोट्याशा कृतिकार्यक्रमाची बंगळुरु शहरातील प्रसारमाध्यमांकडून दखल घेतली जाऊ लागली. वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या, रेडिओ-टीव्ही यांनी वृत्तांत दिले. काही सुजाण नागरिकांनी प्रोत्साहन दिले. काही स्वयंसेवी संस्थांनी मुलांना पाठिंबा दिला, आर्थिक मदत देऊ केली. आणि मग ‘गर्विता हे सर्व प्रसिद्धीसाठी करते आहे’ असे म्हणणारे इतर मित्र-मैत्रिणींही तिला सामील होऊ लागले. 

या सर्व प्रक्रियेत पूजा ही एक मैत्रीण गर्विताला सुरुवातीपासून उत्तम साथ देत होती. मग दोघींनी पुढाकार घेऊन Why Waste? (वाया का घालवायचे?) या नावाने एक संस्था स्थापन केली. तेव्हा गर्विताचे वय होते 15 वर्षे. तेव्हा तिने दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती. नंतरच्या चार वर्षांत तिने बरीच मोठी मजल मारली  आहे, उत्तुंग म्हणावी अशी झेप घेतली आहे. जवळपास 200 हॉटेल्समध्ये ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही मोहीम यशस्वी झालेली आहे. हॉटेलचालकांनी ती स्वीकारली आणि ग्राहकांनीही. त्यामुळे तेथील पाण्याची गरजही थोडी कमी झाली आहे.
Why Waste? या संस्थेत आता 20 वर्षांपेक्षा कमी वयाची अनेक मुले-मुली आहेत. ते स्वयंसेवी पद्धतीने काम करतात. पत्रके, भित्तिपत्रके अशा पारंपरिक माध्यमांचा वापर तर ते करतातच, पण सोशल मीडियाचा वापरही चांगला करतात. त्यांनी स्वतंत्र वेबसाईटही केली आहे. काही ऑडिओ, व्हिडिओ केले आहेत. त्यांचे हे काम पाहून अशोका या संस्थेने Why Waste? ला आर्थिक व तांत्रिक मदत केली. Lead Younge Initiative या प्रकल्पाच्या अंतर्गत Why Waste? ने बंगळुरू, नागपूर, मुंबई, चेन्नई अशा काही मोठ्या शहरांतही असेच काम सुरू केले आहे. त्यात 600 पेक्षा अधिक शाळांमधील मुला-मुलींनी सहभाग नोंदवला आहे.
 
गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये स्वित्झर्लंड येथे ‘ग्लोबल चेंजमेकर’ची एक परिषद भरवण्यात आली होती. त्या परिषदेत सहभागी होण्यासाठी 185 देशांतून अर्ज मागवण्यात आले होते. त्या हजारो अर्जांची तीन राऊंडमधून छाननी करून, फक्त 60 मुला-मुलींची निवड होणार होती. ही सर्व मुले-मुली 18 ते 23 वर्षे या वयोगटातील असणार होती. तर त्या 60 जणांमध्ये गर्विताची निवड झाली होती. त्या परिषदेला जगातील 42 देशांमधून आलेले जे युवा होते, त्यात गर्विता ही एकमेव भारतीय होती. त्याचे मुख्य कारण खूप लहान किंबहुना क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींची ताकद तिने ओळखली होती, त्यासाठी चिकाटीने व सातत्याने कृती केली होती, अनेकांचा सहभाग मिळवण्यात ती यशस्वी झाली होती आणि मोठ्या समस्येला हात घालून मोठ्या बदलासाठीची दिशा तिने दाखवली होती. तिची ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही कल्पना आता जगातील प्रत्येक देशात राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
 
स्वित्झर्लंडच्या परिषदेसाठी निवड झाल्याचे कळल्यावर गर्विताला प्रचंड आनंद झाला, पण तो व्यक्त करतानाच्या तिच्या भावना मात्र ती किती जमिनीवर आहे, हेच सूचित करणाऱ्या होत्या. ‘‘जगभरातून आलेल्या मुला-मुलींशी संवाद साधून, त्यांच्यासोबत एक आठवडा घालवून, मला खूप शिकायला मिळणार आहे. खूप नव्या कल्पना मी तिथून घेऊन येईन आणि भारतातील तरुण नेतृत्व विकसित होण्यासाठी त्यांचा वापर करीन’’ असे ती म्हणाली.
 
त्या परिषदेत कोणत्याही मोहिमेचा प्रचार-प्रसार कसा करायचा, त्यासाठी आर्थिक निधी कसा उभा करायचा, प्रकल्प व्यवस्थापन कसे करायचे, नेतृत्व विकसित कसे करायचे आणि जनतेशी संपर्क-संवाद कसा ठेवायचा, इत्यादी अनेक गोष्टी (वेगवेगळ्या देशांतून आलेल्या 60 जणांकडून) तिला शिकायला मिळाल्या.
 
त्या परिषदेहून भारतात आल्यावर गर्विताने कमी वेळात, कमी श्रमात, कमीत कमी साधने वापरून व कमीत कमी खर्च करून अधिक परिणामकारक काम कसे होईल यावर लक्ष केंद्रित केले. सामाजिक उद्योजकता आणि इनोव्हेशन्स या माध्यमातून मूलगामी व मोठे बदल घडवण्यासाठी ती आता काम करते आहे. मार्च 2019 मध्ये तिच्या या प्रयत्नांना खूपच मोठे यश  मिळाले आहे. राष्ट्रीय हॉटेलचालक संघटनेचे (NRAI) अध्यक्ष राहुल सिंग यांनी गर्विताची संस्था Why Waste? बरोबर भागीदारी केली आहे. ती भागीदारी कशासाठी? तर गर्विताला अभिप्रेत पाण्याची बचत करणे व वाया न घालवणे यासाठी. म्हणजे Why Waste? चा कृतिकार्यक्रम NRAIने स्वीकारला आहे. NRAI या संघटनेत एक लाखांपेक्षा अधिक हॉटेल्सचा समावेश आहे. लवकरच त्या संघटनेच्या अध्यक्षांकडून सर्व एक लाख हॉटेल्सना अशी नोटीस जाणार आहे की, ‘Why Waste? ने सुचवलेल्या पर्यायांचा अवलंब करावा.’ 

गर्विता व तिची संस्था आपर्यंत प्रामुख्याने पाणी- वापराबाबत जनजागृती करीत आली आहे. परंतु त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतही काम चालू आहे. घरोघरी तयार होणारा ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्र साठवणे, स्वतंत्र कुंड्यामध्ये टाकणे, स्वतंत्र गाड्यांनी तो वाहून नेणे यासाठी लोकांचे प्रबोधन करीत आहेत. घरातील लोकांचे, हॉटेलात काम करणारांचे व तो कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या कामगारांचे ही इतके साधे काम जरी सातत्याने व मोठ्या प्रमाणात होत राहिले, तरी आपल्या पर्यावरणाचे प्रदूषण कितीतरी कमी होईल, असे गर्विता व पूजा मोठ्या पोटतिडकीने व कल्पकतेने पटवून देत आहेत.
 
गर्विताचे हे यश पाहूनच बीबीसी वर्ल्ड या वृत्तवाहिनीने तिचा उल्लेख भारताची ग्रेटा थुनबर्ग असा केला आहे. तर ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही आता घोषणा म्हणून सार्वत्रिक व्हायला हवी. हॉटेल्समध्ये, घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि शाळा- कॉलेजांमध्येही! 

गर्विता म्हणते, ‘‘आपल्याकडे अर्धा ग्लास भरलेला आहे असे म्हणणाऱ्यांना आशावादी तर अर्धा ग्लास रिकामा आहे असे म्हणणाऱ्यांना निराशावादी असे संबोधले जाते. मी मात्र आशावादी नाही आणि निराशावादीही नाही, मी संवर्धनवादी आहे.’’ म्हणजे आपल्याजवळ काय आहे आणि काय नाही, यांवर वाद-चर्चा करण्यापेक्षा जे काही आहे ते जपून वापरणे, त्याचा गैरवापर थांबवणे आणि ते सर्वांना मिळेल असे पाहणे हे आता गर्विताचे जीवनध्येय झाले आहे. या वर्षीच्या जागतिक जलदिनाची थीम होती, ‘कोणालाही मागे सोडू नका’ (Leave no one behind). त्यासाठी गर्विताने हाती घेतलेले काम कोणाही भारतीयाला गर्व वाटावा असे आहे!
 
ताजा कलम : 
महात्मा गांधींचे एक अनुयायी जी.रामचंद्रन यांनी सेवाग्राम आश्रमातील एक आठवण नोंदवून ठेवली आहे. एका भल्या दुपारी कडक उन्हाळ्यात गांधीजी त्यांच्या कुटीत बसले आहेत, लोक भेटायला येत आहेत. एकाशी बोलणे होईपर्यंत इतर मागे शांतपणे बसून आहेत. बराच वेळ बसून असलेल्या, पण नंबर अद्याप आलेला नाही असा एक माणूस उठतो, खिडकीत ठेवलेल्या माठातून ग्लासने पाणी घेतो, पितो आणि उरलेले खिडकीच्या बाहेर असलेल्या छोट्या झाडावर ओतून देतो. तत्क्षणी, गांधीजी समोरच्याशी चालू असलेले बोलणे थांबवून त्या गृहस्थाला पुढे बोलावतात. विचारतात, ‘तुमचे वय किती आहे?’ तो गृहस्थ गडबडून जातो, हा प्रश्न बापू का विचारताहेत हे त्याला कळेनासे होते. तरीही तो घाबरत का होईन सांगतो, ‘बावन्न वर्षे’. गांधीजी पुढे विचारतात, ‘तुम्ही स्वत:च्या हाताने घेऊन पाणी कधीपासून पिता?’ तो पुन्हा गोंधळून जातो आणि उत्तरतो, ‘पाच-सहा वर्षांचा असेन तेव्हापासून.’ गांधी विचारतात, ‘याचा अर्थ, तुम्ही मागील 47 वर्षे स्वत:च्या हाताने घेऊन पाणी पिता?’ 
‘हो’ तो गृहस्थ उत्तरतो. 
गांधीजी पुढे प्रश्न विचारतात, ‘आणि तरीही, आपल्याला एका वेळी तहान लागल्यावर किती पाणी लागते याचा अंदाज तुम्हाला येत नाही?’ 

Tags: बालकुमार विनोद शिरसाठ गर्विता गुल्हाटी Vinod Shirsath Balkumar Garvita Gulhati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके