डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तांबडं फुटायच्या आधीच माझी आई उठली होती. तिनं मलाही उठवलं. काळ्या पाण्याचा चहा दिला. जागून काढलेल्या रात्रीत मी कित्येक वेळा त्या गाभण मेंढीसाठी, तिला होणाऱ्या पिलासाठी उशीवर आसवं गाळली होती; मी तिच्यासाठी अर्पण केलेली ती माझी स्वत:ची अबोल श्रद्धांजलीच होती! थळोबा,मसोबा, रांगीतली आई, ‘करेवा’ हे सगळं थोतांड आहे, त्यांची जत्रा करून आपलं भलं होणार नाही. आपण शिक्षण घेतलं पाहिजे. प्रयत्न करून जिद्दीने चार पैसे मिळविले पाहिजेत. बाबासाहेबांनी आमच्या प्रगतीसाठी स्वत: एवढे कष्टाचे पर्वत चिरडले त्या बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करायचे सोडूनही माझ्या भावकीतली माणसं कोणत्या वाटेनं चालली आहेत...मी त्यांना हे सगळं कोणत्या तोंडानं सांगणार होतो? आणि प्रयत्न करून सांगितलंही, तर ते माझ्यावर विश्वास दाखवतील? माझाच माझ्यावरचा ताबा आता सुटू लागला होता. माझ्या भोवतीनं गोळा झालेला अंधार मला गिळण्यासाठी अंगावर येत होता.

एस.टी.च्या प्रवासाने मी जाम वैतागलो होतो. स्टँडवरती उतरलो. समोर दिसणाऱ्या उडप्याच्या हॉटेलात चहा घेतला. आता थोडं बरं वाटायला लागलं. तंबाखू मळली आणि घराच्या दिशेने चालायला लागलो. एवढ्यात मला कुणीतरी हाक दिली. आवाज ओळखीचा वाटला. थांबलो. माझ्या भावकीतला बबन सोनावणे घाईघाईनं माझ्याकडंच येताना दिसला. हातात गावाकडून आणलेली पिशवी बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. बहुतेक याचं नाहीतर भावकीतल्या कुणाचं तरी माझ्याकडं काही महत्त्वाचं काम असलं पाहिजे; त्या शिवाय हा गडी माझ्यागावापासून इथपर्यंत येणार नाही.

‘तू अचानक इकडे कसा?’

‘मास्तर, काम तसं घाईचंच हाय, तू भेटतोस का नाही याचीच पंचाईत व्हती. म्हटलं टाकावी एक फेरी तुझ्याकडं. आदमास काढून मगच आलो तुझ्याकडं... बरं बायको-पोरं बरी हाईत न्हवं? म्हटलं, आईची काळजी तू अज्या बात करूनगं, मी खवण्या हाय तिकडं... असं बरंच कायबाय बबन सांगू सांगला. मी त्याला थांबवत आधी चहा-पाण्याचं विचारलं. पुन्हा एकदा तोंडातली तंबाखू थुंकून आम्ही दोघंही चहाला गेलो.

घरी पोचायला किमान कानगोष्टी अर्धा तास लागणार होता. मी रिक्षा करू या म्हटलं तर बबनराव ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, ‘मास्तर, ढेंगभर जाग्याला रिक्षा कशाला? जाऊ की चालत-बोलत!’ चालण्या च्या ओघात बबनरावांनी माझ्या बदललेल्या गावाकडचं बरंच काहीबाही सांगायला सुरुवात केली, ‘मास्तर, पयल्यासारखं गाव आता राह्यलं नाही, सगळंच इपरीत झालंय. कुणाचा ताळमेळ कुणाला नाही. तुझ्या  वक्ताला गावातचार पाटर्या व्हत्या. त्यातली आता एकबी धड नाही. डेरीतबी तसंच झालंय. उचापत्या करणाऱ्या पोरांनी गळ्यात माळा घातल्या त्या पास्नं गावात भांडणं न्हाई का मारामाऱ्या नाहीत...

आम्ही आता घराजवळ आलो होतो. मी बबनला म्हणालो, ‘आता आपण घरी जाऊ, निवांत बोलू!’ त्याचा आवाज बारीक झाला. थोडावेळ असा-तसाच गेला. माझ्या बायकोनं विचारलं,‘चहा ठेवते.’ मी मध्येच तोंड घातलं, ‘चहा नको आता जेवायलाच वाढ. ‘दरम्यानच्या काळात बबन बरंच काही सांगत होता.‘...मास्तर, आता मुद्याचं बोलतो. गेल्या पस्तीस वर्षात आपल्या भावकीत ‘करेवा’ झाल्याली नाही. सगळ्यांनी मिळून ‘करेवा’करायचं ठरीवलंय. तवा तुझाई च्यार काम हाय त्यो आमास्नी कळावा म्हणून भाऊबंदांनी मला तुझ्याकडं

पाठिवलंम...’ त्याचं ऐकल्या नंतर मी काहीच बोललो नाही. माझ्या आतून भयंकर कालवाकालव सुरू झाली.

दरम्यान आमचं जेवण आटोपलं होतं. त्याला गावाकडं वस्तीच्या गाडीनं जाण्याची घाई झाली होती; हे मला त्याच्या बोलण्यावरून कळत होतं. मी त्याला माझ्याकडं मुक्काम करण्याचा आग्रह केला. तरीही त्याला ते पटलं नाही. जाताजाता तो राहून गेलेली महत्त्वाची गोष्ट बोलला, ‘मास्तर ह्यो खर्च मायंदाळा व्हनार, त्यासाठी भावकीतल्या घरपती पाचश्याची वर्गणी काढायचं ठरलंय, आणि लागलीच तुझी वर्गणी बी मला घेऊन यायला सांगिटलंय...!!’

माझ्या भावकीतला दगडू मास्तर मरून बरीच वर्षे झालीत. त्यानं एकट्यानं कधी एकदा ही ‘करेवा’ केली होती. ती मान्य झाली नाही. त्यानंतर इतक्या वर्षानंतर हा घाट जुळून आला होता. दगडू मास्तरचा थोरला मुलगा मिलिंद आणि धाकटा विद्यानंद हे त्यांच्या जन्या पासूनच मुंबईत वास्तव्याला आहेत. धाकट्याला रोजीरोटी भागेल एवढ्या पगाराची नोकरी आहे. थोरला मात्र शहरात रिक्षा चालवून आपला संसार सांभाळतो. त्याच्या लग्नाला सोळा वर्षे झालीत. मात्र अद्याप त्याला मुलबाळं झालेलं नाही. संसारातल्या सुखासाठी त्यांना मुंबईतला कोणी ज्योतिष्य एकदिवस सल्ला देतो, ‘‘तुमच्या भावकीतली कुळस्वामी तुमच्यावरती नाराज आहे. त्यामुळे तुमच्या संसारात अशा अडचणी, संघर्ष चालू आहेत, त्या कुळस्वामीला प्रसन्न करण्यासाठी त्याची जत्रा करावी लागते. ती केली तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल.’’

संध्याकाळ माझ्या दाराशी आली होती. बबनरावानं गावाकडून आणलेल्या पिशवीत आईनं हाडकं भेंड्या, भाजलेला बांगडा, भुईमुगाच्या शेंगा, भोपळीची पानं असं बरंच काय-बाय दिलं होतं. माझी बायको संध्या काळच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. ‘वयनी, आता निघतो आमी. जत्रंला सगळी या.’ बबनला पाठवण्यासाठी मी स्टँडकडे निघालो. जाताना वाटेत मी नुसताच त्याच्या बरोबर चालत होतो. बोलत काहीच नव्हतो! भावकीनं ठरवलेली घरपती पाचशे रुपयांची वर्गणी मी त्याच्या हातात घालून मोकळा झालो...

मनात नसतानाही जावं लागत होतं. गरजेपुरते कपडे आणि थोडंसं सामान बरोबर घेतलं, एवढ्यात स्वयंपाक घरातून माझ्या बायकोचा सल्ला... ‘माळावर उभं राहून बोंबलायला गावच्या पाटलाची परवानगी लागत नाही, तेव्हा सांभाळून! तुमचे विचार, तुमचं तत्त्वज्ञान तुमच्या जवळच असू द्या! भाऊबंदात उगाच तेढ नको...’ मी काहीच बोललो नाही. निमूटपणे बॅग काखेला मारली, आणि थेट गाव गाठलं! दिवे लागणीला गावात पोचलो. भावकीतली सगळी जुनी-जाणती माणसं बोलत बसली होती. ‘कवा आला मास्तर?’ भावकीतल्या एकानं विचारणा केली.

‘हे काम आत्ताच आलो.’ मी.

घरी चहा घेतला. माणसं भेटायला आली. बायको-पोरं का आली न्हाईत? एकमेकांची विचारपूस आणि बोलण्यात बराच वेळ गेला. भावकीतला बापू मात्र मी आल्यापासून माझ्याबरोबर बोलण्याची टाळाटाळ करीत होता. त्याच्या अशा वागण्याचा मला अर्थच कळेना. तो आता गावाजवळच्या ठिकाणी ‘गुरुजी’ म्हणून नोकरीला होता. याआधीच्या वर्षात तो माझ्याबरोबर असं कधीच फटकून वागल्याचं मला आठवत नव्हतं. आणि आजच तो असा का वागतो आहे? याचा मला उलगडा होईना. कदाचित त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी गैरसमज झाला असावा; म्हणून मी त्याचे वागणे फारसे मनावर घेतले नाही. पुढे कधी तो आपणहून मला विचारेल त्या वेळी त्याला समजावता येईल या विचाराने मी गप्प राहिलो.

काळाच्या ओघात सगळंच बदलतं, माझी भावकीही त्याला अपवाद नव्हती. बोलता-बोलता जुन्या माणसांच्या आठवणी निघाल्या. त्यापैकी बरीचजणं हे जग सोडून गेली होती. त्यांची पोरं-बाळं, नातवंड आपापला संसार सांभाळण्यात पिचून गेलेली मी जवळून बघत होतो. यातलीच काही तरणीताठी पोरं गावसोडून शहरात पोट भरण्यासाठी निघून गेली. चार खुटान्यातला सामाईक कार्मक्रम म्हणून मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होतो. शेवटी त्या बहुतेकांचं म्हणणं असं पडलं, ‘तात्या, तुम्हीच काम ते व्यवस्थित करा. आम्हाला एवढा गाडीखर्च घालून गावी यायला झेपणार नाही.’ एका अर्थी त्यांचं बोलणं रास्तही होतं. त्यांना तरी कसा बोल लावायचा?

कोण आलं? कोण राह्यलं? याविषयी प्रचंड कौतुक असणाऱ्या भावकीतल्या चार-पाच बाया गंभीर चेहरा करून एकमेकीत बोलत होत्या , ‘अगं, लई शिकलं सवरलं म्हणून माणसाला सगळीच अक्कल येती असं नाही. लई न्हाई थोडं देवाधर्माचं बीबगाया पाह्यजे. देवाला इसरून कसं चालंल? ह्येंच्या आज्या-पणज्या पासून चालत आलेली रीत हाय ही...!’ असं बरंच काही.

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मांड पूजेला सुरुवात होते. बामा-बापडी घरात देवीच्या नैवेद्याच्या तयारीला लागतात. सगळ्यांचीच लगबग चालू असते. थोड्या वेळानं शेजारची कमळाबाई तिथल्या गडीमाणसांना करेवाच्या पूजेची आगाऊ माहिती सांगायला पुढे येते , ‘करेवाचं देवस्थान लई वंगाळ हाय. तवा तिचा निवद करताना काम एक इसरू नका. पानं, खारका, काळं लुगडं-चोळी, बईदवार मांडा. आठखुरी मेंढीचा बळी दिल्यावर तिच्या पोटातलं मेंढरू गोठ्यातल्या खड्‌ड्यात व्यवस्थित घाला.’

माझ्या भावकीत ‘करेवा’ करण्याची पद्धत वेगळीच आहे. काही ठिकाणी तिच्या पूजेला कोंबड्यांचं पिल्लूही चालतं. मात्र माझ्याच भावकीत तिला ‘आठखुरी मेंढीचा बळी’ दिल्याशिवाय ती आम्हाला प्रसन्न का होत नाही? हा मला सारखा छळणारा प्रश्न. आत्तापर्यंत वाण्या -ब्राह्मणांच्या भावकीत कधी कुणी करेवाकेल्याचं मला आजपर्यंत तरी कळालेलं नाही. तरीही त्यांना आजपर्यंत कधीही ‘करेवा’ करण्याची गरज पडली नाही. तरीही ‘आठखुरी मेंढीचाच बळी लागणाऱ्या करेवा’ची गरज माझ्याच भावकीला का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. एखाद्या निष्पाप प्राण्याची हत्या करणं हा कायद्यानं गुन्हा आहे, हे मला कळूनही तिचा जीव वाचवण्यासाठी मी मात्र काहीच करू शकत नव्हतो.

देवीच्या पूजेचे विधी मांडायला सुरुवात होते. बहुतेक पुरुष मंडळीच हे सोपस्कार करण्यात गुंतलेले असतात. काळ्या घोंगड्यावर मांड पूजला जातो. देवीच्या प्रातिनिधिक रूपात ठेवलेल्या नारळाच्या खाली काळं लुगडं, काळी चोळी व्यवस्थित ठेवली जाते. हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत असतानाच माझ्याशेजारी बसलेला सुदाम तात्या आणखी काही गोष्टी सांगायला सुरुवात करतो, ‘मास्तर, देवीच्या पूजेला बाईच्या काकणाचा आवाज जरी आला तरी तिला आवडत नाही. कोण बाई शिवाशिवीची झाली आसंल तर तिची सावलीसुद्धा तिला खपत नाही. नाहीतर एवढं केल्यालं सगळं पाण्यात. जेवल्यानंतर हात धुवामला गोठ्याच्या बाहेर परवानगी नाही, हे सगळं ध्यानात ठेवा; आम्ही गेल्यावर हे सगळं तुम्हास्नीच करावं लागंल...फगाभण मेंढीचा बळी दिला जाणं हा प्रसंगच भयंकर होता.

अंधाराचा तवंग आता गावभर पसरला होता. वाड्यातल्या कुत्र्यांना जत्रेच्या आधीच वास लागला होता. घडत असलेल्या प्रकारामुळं माझं मन थाऱ्यावर नव्हतं. थोडा वेळ या सगळ्या गोंगाटातून मी बाजूला गेलो. जेवणाच्या पंगतीची मांडामांड सुरू झाली आणि थोड्याच वेळात माझा पुतण्या श्रीपती मला शोधत आला. त्याला माझी मानसिकता कळलेली होती. त्यानं मला जेवणाविषयी खूप आग्रह केला, विनंती केली. मला समजावलं, ‘भावकीत असं वागून चालणार नाही. ते लोकांना वेगळं वाटतं. मनात नसलं तरी असं चार-चौघात दाखवून चालत नाही बाबा! मनातलं मनातच ठेवायला शिक.’ नाईलाजानं मी त्याच्या मागून चालत राहिलो... त्याच्या सोबत जाताना माझी अवस्था मात्र वधस्तंभाकडे जाणाऱ्या कैद्यासारखी झाली होती!!

भावकीतली सगळी माणसं हरकली होती. इतक्या वर्षानं सगळे भाऊबंद, भावकी एकत्र आली होती. नाहीतरी इतर वेळी प्रत्येकजणं भावकीतल्या प्रत्येक घराविषयी अढी बाळगूनच जगत होता. एखाद्याला नोकरी लागली, एखाद्यानं शेत घेतलं तरीही यांच्यातल्या कुणाच्या ही मनाला यायचं नाही, मी हे सगळं वातावरण लहानपणापासून बघत आलो होतो. यांची आपल्याच माणसांवरती ईर्षा... मात्र आज करेवाच्या जत्रेला हजारो भुईनळे एकदम फुटावेत आणि त्याचा लख्ख उजेड उजळावा एवढ्या आनंदात सगळीजणं आनंदाच्या धुंदीत बेपर्वा झाली होती.

मात्रा आटोपली. इच्छा नसतानाही मी कसेतरी दोन घासांचं जेवण केलं होतं. थोडा वेळ गेला असेल-नसेल एवढ्यात हाक आली, ‘मास्तर, चला बाहीर या; एवढ्यात निजल्यासा? जत्रंचा हिशेब सांगाय पायजे, कुठं खर्च वाढला ते बईदवार भावकीला कळाय पाह्यजे. नाहीतर आम्हीच पैसं खां आसं व्हईल.’ हिशेबाची आकडेमोड सुरू झाली होती. जमलेला प्रत्येकजण समोरच्याला दयात घेऊन बोलाय लागला. आता मात्र प्रसंग बाका होता. करेवाचं काळं लुगडं आणि चोळी भावकीतल्याच विधवा असणाऱ्या स्त्रीनं घेण्याची प्रथा. त्याची पडेल ती किंमत देऊन भावकीतल्याच विधवा स्त्रीनं घेण्याची चालत आलेली परंपरा. पण त्याची किंमत देण्या इतपतही त्यांची ऐपत नव्हती. त्या कारणानं त्या बिचाऱ्या रंजीस झाल्या होत्या. एवढ्यात नानू आबा उठला, म्हणाला, ‘देवीचं लुगडं आणि चोळी विकायची नसती. तिची सूप-दुरडी, चोळी-लुगडं तिच्याच जवळ ठेवा.’ यावर कुणीच काही बोललं नाही. चालू झालेल्या चर्चेचा एखादासा घोळ मिटला. कुणाच्या मनात कशाचीच शंका उरली नव्हती. सगळेजणं आपापल्या घराकडे निघून गेले.

रात्र वाढतच होती. काही केल्या मला झोप येईना. एकसारखीती गाभण मेंढी, तिचे पाणावलेले घारे डोळे, देवीचं चोळी-लुगडं काही केल्या मनातून जाता जात नव्हतं. मी झोपलो की नाही हे पाहण्यासाठी आई पुन्हा आली. माझ्या उघड्या डोळ्याआड बघून म्हणाली, ‘लेका, रात लय झाली. नीज की आता. सकाळ उठून कामावर जाया पायजे!’ अंगावर वाकळ ओढून मी नुसता झोपल्याचं सोंग करतो. अशावेळी माझ्या डोळ्यांत दीक्षाभूमीवर जीव तोडून कळकळीने भाषण देणारे बाबासाहेब आठवत आठवू लागतात!

तांबडं फुटायच्या आधीच माझी आई उठली होती. तिनं मलाही उठवलं. काळ्या पाण्याचा चहा दिला. जागून काढलेल्या रात्रीत मी कित्येक वेळा त्या गाभण मेंढीसाठी, तिला होणाऱ्या पिलासाठी उशीवर आसवं गाळली होती; मी तिच्यासाठी अर्पण केलेली ती माझी स्वत:ची अबोल श्रद्धांजलीच होती! थळोबा,मसोबा, रांगीतली आई, ‘करेवा’ हे सगळं थोतांड आहे, त्यांची जत्रा करून आपलं भलं होणार नाही. आपण शिक्षण घेतलं पाहिजे. प्रयत्न करून जिद्दीने चार पैसे मिळविले पाहिजेत. बाबासाहेबांनी आमच्या प्रगतीसाठी स्वत: एवढे कष्टाचे पर्वत चिरडले त्या बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करायचे सोडूनही माझ्या भावकीतली माणसं कोणत्या वाटेनं चालली आहेत...मी त्यांना हे सगळं कोणत्या तोंडानं सांगणार होतो? आणि प्रयत्न करून सांगितलंही, तर ते माझ्यावर विश्वास दाखवतील? माझाच माझ्यावरचा ताबा आता सुटू लागला होता. माझ्या भोवतीनं गोळा झालेला अंधार मला गिळण्यासाठी अंगावर येत होता.

आता मी ठरवलं होतं, काही झालं तरी इथून पुढं भावकीच्या फंदात पडायचं नाही. जी गोष्ट आपल्या विचारांना पटते तीच करायची, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल! असा विचार करतच मी घरी आलो. बायकोने विचारलं,‘कशी झाली जत्रा?’

मी आता तिच्याशी काहीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतो...

Tags: आठखुरी मेंढी gautam kambale गौतम कांबळे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके