डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘तुमचे मालक घरी लक्ष देत नाहीत?’ चळवळीत काम करणारा माझा मित्र कॉ. शिवाजी गुरव याचा नेमका प्रश्न. त्याच्या टोकदार प्रश्नानं काहीसं भानावर येऊन पुन्हा एकवार आठवल्यागत ती बोलाय लागली, ‘दादा, कशाचं लक्ष आणि कसलं काम! माझं लग्न झाल्यावर कसातरी दोन महिन्यांचा संसार झाला असेल माझा. पंचमीच्या सणाला गावी आले ती कायमचीच. गावाकडे पंचांच्या बैठकी झाल्या, मध्यस्ती झाली. शेवटी कशाचाच उपयोग झाला नाही. माझ्यावरच आळ घेऊन, ‘मी तिला नांदवणार न्हाई’ असं भरल्या बैठकीत सगळ्या म्होरं जे सांगून गेला, त्याला आज दहा वर्षं पूर्ण झाली, त्याचा पत्ता नाही. माझं कुणी विचारणारं असतं, तर माझ्या आयुष्माचा असा खेळखंडोबा झाला नसता!” ती आमच्यासमोर हमसून-हमसून रडायला लागली. दाराला पाठ करून बसलेल्या म्हातारीच्या डोळ्यांत आता वळवाचा घनघोर पाऊस उतरला होता.

हळदपूर. तालुक्याच्या वीसेक मैलांच्या अंतरावर असलेलं गाव. डांबरी सडकेपासून गावात पोचायला एकुलती एक पायवाट. भोवतीने रान-झुडपांची घनघोर तटबंदी. आलेल्या प्रसंगात पायाखालची वाट तुडवता-तुडवता आम्ही हैराण झालो होतो. चिखल-दगडाची पायवाट चालण्याची माझी सवय गेल्या कित्येक वर्षांत मोडून पडलेली. कशीतरी कसरत करत-करत आम्ही हळदपूर गाठलं. ईळभर शेता-रानात राबणारी माणसं झांजर वेळी आपापल्या घराकडे लगबगीने येत होती. काल-परवा वर्तमानपत्रात छापून आलेल्या, त्यांच्याच गावातल्या बातमीचा मात्र या माणसांना जरादेखील थांगपत्ता लागलेला नव्हता; असेच एकूण वातावरण. जो-तो आपापल्या कामधंद्यात विरघळून गेलेला. ‘आपलं काम भलं आणि आपण’ हेच इथल्या कष्टकऱ्यांच्या जगण्याचं साधं सूत्र; त्यांनाववर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीशी काहीही देणं-घेणं नव्हतं.

शेवंता बेलसरे वरती केलेला अन्याय, गावच्या सरपंचाने केलेली जबर मारहाण, घालवलेली अब्रू असं बरंच काहीतरी ऐकायला मिळालं होतं. वस्तुस्थिती समजून घ्यावी म्हणून माझ्या चळवळीतील काही कार्यकर्त्या मित्रांना घेऊन बेलसरेंच्या घरी आलो होतो. ती दारातच बसून होती. आम्हांला ओळखून तिने ‘आत या’ म्हणत,बसायला सांगितलं. थोड्या वेळानं चहा आला. चहा घेता-घेता आम्ही मूळ विषयाला सुरुवात केली. आमच्या समोर बोलताना शेवंताचा चेहरा उदास वाटत होता. तिच्या डोळ्यांत, आपल्यावर झालेल्या अन्यायाची टोकदार सल धगधगताना मला स्पष्ट जाणवत होती. मघापासून अनावर झालेला हुंदका गळ्यातच दाबून तिनं सांगायला सुरुवात केली: ‘‘मंगळवारचा दिवस. गावातल्या संघाच्या दुकानात रॉकेल (घासलेट), राशन आलं होतं. म्हणून मी आईला पाठवलं. संघाचं दुकान सरपंचाच्या मालकीचं. सकाळी गेलेली आई दुपारपर्यंत घरी आली नव्हती. तिला बघण्यासाठी म्हणून मी थेट संघाच्या दुकानाकडं गेले. गोळा झालेल्या माणसांची पांगापांग होताना बघून मनात भलत्याच विचाराची कळ उठली. धीरानं पुढं जाऊन बघितलं, तर आईबरोबर सरपंच आणि त्याची मालकीण हुज्जत घालत होते. मोठ्यानं, ‘हितनं चालती हो थेरडे’ असं बरंच काही बोलत होते. मी मध्ये गेले. ‘म्हातारीनं काय केलं? तिला कशापायी शिव्या देता?’ एवढं विचारल्यानंतर त्या दोघांनी मला मारायला सुरुवात केली. माराच्या असह्य वेदनेनं मी किंचाळत होते. ओरडत होते. माझी सोडवणूक करण्यासाठी मात्र पुढं कुणीही येत नव्हतं. माझा मार वाचावा म्हणून आई पुढं आली. भाड्यानी तिलाही मारलं..’ सांगता-सांगता तिचा श्वास गुदमरत होता. बोलायची इच्छा असूनही तिला बोलवत नव्हतं. आम्ही तिलामध्येच थांबवून शांत व्हायला सांगितलं.

थोडा वेळ तसाच गेला. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. कर्त्या-सवरत्या लेकीचं ऐकून सोप्यात बसलेल्या म्हातारीच्या जिवाची घालमेल सुरू झाली. तिला किती सांगू आणि किती नको असं झालेलं. अखेर तिच्या मनाचा बांध फुटला,‘‘पोरांनू, तुम्ही काय आम्हांला परकी न्हाईसा. एवढ्या घोरानं आम्हासाठी तुम्ही तालुक्यास्नं हितवर आल्यासा. तुम्हांला ह्यातली काय गोम हाय ते सांगितल्याबिगार कळायची न्हाई...”

आमची उत्सुकता आता शिगेला पोचलेली. कुठल्या कारणासाठी एवढं सगळं रामायण घडलं? मार खावा लागला?त्याचा आता उलगडा होणार होता. एवढ्यात बाहेर दारासमोरून कुणीतरी खाकरा काढत निघून गेले. दचकलेली शेवंता बाहेर डोकावून आली. विषयाला पुन्हा सुरुवात, ‘भाड्या, गावचा सरपंच झाला, गाव सुदरायचं सोडून आम्हा गरीबास्नी माराय बसलाय. घिरण्यानं कोळ साधला आमचा. गावच्या नावानं आमची जागा लाटाय बसलाय...’ म्हातारीच्या बोलण्याचा थेट अर्थ मला कळाला नाही म्हणून मी विचारलं, ‘तुमच्या जागेचा आणि भांडणाचा संबंध काय?’ तशी म्हातारी उसळून म्हणाली, ‘आरं लेका, माझ्या दारामागल्या जाग्यावर त्यो गावासाठी पाण्याची टाकी बांधणार हाय म्हणं, सरकारच्या हुकमानं. किती वर्सं झाली, त्या जाग्याचा कज्जा चालू हाय कोर्टात. मालक व्हता तवर आम्हांला काय एक घोर नव्हता. आता तो बी मरून सर्गाला गेला. माझ्या पोरीच्या डोक्याला ताप झालाय सगळा. नुसत्या काळजीनं पोर पालीसारखी झालीया. आणि आमची जागा मागाय बसलाय मुडदा. मला सांग पोरा, सगळा गाव सोडून त्येला माझीच जागा मोकळी दिसली? चीड ईल का न्हाई माणसाला?’

म्हातारीच्या बोलण्यावर मी निरुत्तर झालो होतो. घडल्या प्रकाराचा अंदाज येत होता. सरपंचानं ‘त्याच’ जागेसाठी हटून बसावं याचंही आश्चर्य वाटत होतं. गुंता अधिकच वाढत होता. आमच्याशी सुरू असलेलं बोलणं मध्येच टाकून म्हातारी आतल्या सोप्यात उठून गेली. तिने चुलीतला जाळ मागे ओढला. कढ आलेल्या आमटीच्या भांड्याला पदराने उचलून वायलावर ठेवले. म्हणाली, ‘लेकानू जेवाण केलंय. हाडकं भेड्यांची आमटी हाय. दोन घास खाऊन जावा.’ अशा बिकट प्रसंगातही म्हातारीच्या बोलण्यातला जिव्हाळा मात्र मला श्रीमंत वाटला! बराच वेळ प्रयत्न करून तिची समजूत घातली आणि जेवायला नकार देऊन मोकळा झालो. शेवंताला दिवा लावायची आठवण झाली. देवळीत ठेवलेल्या दिव्याच्या वातीला तिनं आगपेटीतली काडी पेटवली.

‘दोन महिने झाले. पैसे भरून देखील अजून वीज आलेली नाही. भाऊबंदांनी आमच्या विरोधात अर्ज केला. आधी घराची वाटणी नंतर वीज. रोजच्या मढ्याला रडायचं तरी किती? मी शाळा मास्तरीन. घरातलं बघू का शाळेत लक्ष घालू? हिकडं आड आणि तिकडं विहीर...’

शेवंता हे सगळे सांगत असताना मात्र माझं मन कशाचा तरी आदमास घेत होते. तिचे वडील अपघातात जाऊन बरीच वर्षं झाली. त्यानंतर घरी तिचा नवरा, एखादा भाऊ यांपैकी कोणीतरी घर सांभाळत असावं, हा माझा सुरुवातीचा अंदाज होता. पण मघापासून इथे एकही पुरुष व्यक्ती माझ्या नजरेत आलेली नव्हती. थोडा वेळ गेल्यानंतर माझ्या मनात चालू असलेलं शंकेचं वारूळ तिने सपशेल उद्‌ध्वस्त केलं!

‘बाप होता तोपर्यंत आमच्या घराकडं कुणी वाकड्या नजरेनं बघायची हिंमत करत नव्हतं. बाप जाऊन आता पंधरा वर्षं झालीत. मी घरात एकुलती एक असल्याने लाडात वाढलेली. बाप अडाणी शेतकरी होता; तरीही त्याने माझा हट्ट पुरवलाच. आता कुठे बरे दिवस आले होते, आणि तो मात्र निघून गेला. त्यानंतर माझं लग्न झालं, नोकरी मिळवली. मागे कुणाचंच पाठबळ नव्हतं, कौतुक तरी कोण करणार? एखादा भाऊ, एखादी बहीण जरी असती, तरी मी डगमगले नसते. आईच्या जिवाचा घोर तरी मिटला असता. देवाच्या दारालाच शिरं मारलं त्याला कोण काय करणार?’ घराच्या आढ्याकडं एकटक बघत कुठंतरी हरवल्यासारखी शेवंता थोडा वेळ शांत बसली.

‘तुमचे मालक घरी लक्ष देत नाहीत?’ चळवळीत काम करणारा माझा मित्र कॉ. शिवाजी गुरव याचा नेमका प्रश्न. त्याच्या टोकदार प्रश्नानं काहीसं भानावर येऊन पुन्हा एकवार आठवल्यागत ती बोलाय लागली, ‘दादा, कशाचं लक्ष आणि कसलं काम! माझं लग्न झाल्यावर कसातरी दोन महिन्यांचा संसार झाला असेल माझा. पंचमीच्या सणाला गावी आले ती कायमचीच. गावाकडे पंचांच्या बैठकी झाल्या, मध्यस्ती झाली. शेवटी कशाचाच उपयोग झाला नाही. माझ्यावरच आळ घेऊन, ‘मी तिला नांदवणार न्हाई’ असं भरल्या बैठकीत सगळ्या म्होरं जे सांगून गेला, त्याला आज दहा वर्षं पूर्ण झाली, त्याचा पत्ता नाही. माझं कुणी विचारणारं असतं, तर माझ्या आयुष्माचा असा खेळखंडोबा झाला नसता!” ती आमच्यासमोर हमसून-हमसून रडायला लागली. दाराला पाठ करून बसलेल्या म्हातारीच्या डोळ्यांत आता वळवाचा घनघोर पाऊस उतरला होता.

भोवतालचा सगळा अंधार जडभार झाला. वेळही बराच झालेला. आम्ही उठलो. म्हातारीचा, तिच्या लेकीचा पुन्हा पुन्हा तोच आग्रह, ‘दादा, जेवणवेळ झालीया, दोन घास खाऊन मगच जावा.’ मघापासून सगळं ऐकून आमची अन्नावरची वासनाच मरून गेली होती. ‘मावशी, पुन्हा येतो कधीतरी’, असं म्हणत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. चालताना वाटेत हजार विचारांचे दंश मनाला भोवळ आणू लागलेले...

गावातून आम्हांला कळलेली माहिती धक्कादायक होती. सरपंचाच्या बाजूने कुणीही चांगलं बोलत नव्हतं. जो तो खासगीत त्याच्या पिढ्यांचा उद्धार करत होता. घडल्या प्रकाराबद्दल सरपंचावरती ‘अँट्रॉसिटी अँक्ट’चा गुन्हा नोंद होऊनही तो मात्र खुलेआम, उजळ माथ्याने गावातून फिरत होता. त्याच्या दहशतीपुढे गावात कुणीच विरोधात बोलायला तयार नव्हतं. एका बाजूला गावातली कळती-सवरती, शहाणी माणसं शेवंताच्या न्यायनिवाड्यात पुढे येताना दिसत नव्हती. दुसऱ्या बाजूला इतकं सगळं घडूनही तालुक्यातील नेते मंडळी, पुढारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून बसले आहेत.

शाळेत शिक्षिका असणारी शेवंता बेलसरे, तिच्यावर केला गेलेला अन्याय, गावासमोर तिला झालेली मारहाण, तिनं न्यायव्यवस्थेकडे मागितलीय दाद. तिला न्याय मिळेल?

Tags: दहशत गावगुंडी न्यायाची प्रतीक्षा न्यायाची अपेक्षा ग्रामीण राजकारण अन्याय अत्याचार सत्यघटना गौतम कांबळे शेवंता physical abuse Resident teacher Injustice for teacher rural politics Demand for Justice True Incident Gautam Kamble weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके