डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्यार्थ्यांना विचार करायला लावता येईल…

राखीव जागांच्या विरोधात युक्तिवाद करताना बऱ्याच वेळा असे म्हटले जाते की, टक्केवारीने कमी गुण मिळविणाऱ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्यावा लागतो म्हणून गुणवत्ता घसरते, परंतु माझ्यामते विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्याची नैसर्गिक क्षमता नसणारे विद्यार्थी जेव्हा आपण त्या विषयाला घेत राह तेव्हा दर्जामध्ये घसरण आपल्याला नक्की दिसेल. (शालांत परीक्षेत मिळणाऱ्या गुणांमध्ये अशी नैसर्गिक क्षमता प्रतिबिंबित निश्चितपणे होत नाही.) आपण फक्त एका विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केले तरी आपणाला असे जाणवेल की त्या विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता, बुद्धिमत्ता आणि मानसिकता हे तीनच घटक तो विद्यार्थी निवडलेल्या शाखेच्या चौकटीत विश्लेषण कौशल्य, तर्कशुद्ध विचारसरणी आणि संवादकौशल्य विकसित करण्यात यशस्वी होईल अथवा नाही. असे यश त्याने महाविद्यालयात सामान्य वर्गातून किंवा राखीव जागातून प्रवेश मिळवला यावर ती अवलंबून नाही.

पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी अलीकडे असे जाहीर केले की, भारतातील 28 राज्यांत प्रत्येकी एक केंद्रीय विद्यापीठ असावे आणि 600च्या आसपास असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यांत एक महाविद्यालय असावे. तथापि उच्चशिक्षण प्रवेशाच्या कक्षा रुंदावण्याच्या व त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या मुद्यांची (दर्जाविषयी) विद्वान व रोजगार पुरविणारे उद्योजक यांनी व्यक्त केलेल्या काळजी वा धास्तीबरोबर क्वचितच सांगड घातली जाते. ही चिंता उच्चशिक्षणाचा दर्जा उंचावण्याशी संबंधित आहे, कारण उच्च गुणवत्ताच ज्ञानाधिष्ठित समाजाच्या व सळसळणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.

भारतात पदवी शिक्षणाचे लक्ष्य कोणते? किंवा ते काय असावे?

सहजपणे विचार केला तरी आपणाला जाणवेल की भारतातील पदवी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विकसित राष्ट्रे ज्या तन्हेने उच्चशिक्षणाकडे पाहतात त्यापेक्षा वेगळा असला पाहिजे. भारतात पदवी शिक्षण हे मूठभर अभिजनांची मक्तेदारी होता कामा नये. बरेचदा असे आढळते की, पदवी संपादन करणे हे सामान्य जनांसाठी अभिजन वर्गाबरोबर समानता साधण्याचे एक साधन आहे. पदवी शिक्षणासाठी शासन निधी पुरविते त्यामुळे देशात पदवी शिक्षण देणाऱ्या संस्थांची कमतरता खरोखरच जाणवते, म्हणून देशातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाच्या गरजा व आकांक्षा पूर्ण करण्यास ती कमी पडते.

संस्थांची कमतरता मान्य करूनदेखील असे आढळते की, ज्या संस्था उच्च शिक्षण प्रदान करतात, त्यांना एका दुहेरी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. तो असा- देशातील सर्व थरातील लोकांना प्रवेश उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर शिक्षणाचा विशिष्ट दर्जा टिकवणे. या दोन उद्दिष्टांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची अनेक कारणे असतील, पण त्यामध्ये चांगल्या शालेय शिक्षणाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. याचा अर्थ असा होत नाही की खाजगी शाळेमधील विद्यार्थी सहजपणे इतर शालेय विद्यार्थ्यांपेक्षा गुणवत्तेच्या बाबतीत सरस असतात. शालेय शिक्षणाचा दर्जा का ढासळतोय, त्याची कारणमीमांसा अशी- शालेय शिक्षणाची वाटचाल अशा मार्गाने होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर मोजली जाते. ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्याला विचार करण्याची क्षमता किती आहे हे तपासत नाही, ती केवळ त्याने शिकलेल्या गोष्टींची परीक्षेत अचूक पुनरावृत्ती करण्याची क्षमता तपासते. (दुर्दैवाने विद्यापीठे देखील याच पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पातळीवरील परीक्षा घेतात.)

अशा परीक्षा सर्वसामान्य होतात तेव्हा आपोआपच परीक्षेत जास्त गुण मिळवून देणारी साधनसामग्री प्राप्त करून, ती इमानदारीने वापरून परीक्षेत जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी सहज मिळतात. सध्या अशाप्रकारे जास्त गुण मिळवून उज्वल यश संपादन करणे, हा प्रवाह शालेय स्तरावर स्थिर झाल्याचे दिसते. दिल्ली विद्यापीठातील काही विषयांच्या बाबतीतदेखील हा प्रकार आढळतो. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थी शिकवणी वर्गाचा सर्रास आश्रय

घेतात. या सर्व धडपडीमध्ये एकच उद्देश असतो. शालांत परीक्षेत उत्तम यश मिळविणे (हा प्रयोग विद्यापीठ परीक्षेसाठीदेखील अनुसरला जातो.) या सर्व प्रकारात एकाच गोष्टीचे वाईट वाटते, ती म्हणजे या मार्गाने जाणारे बहुतेक विद्यार्थी परीक्षेत पाठांतर करून यश संपादन करतात. परिणाम स्वरूप आपणाला आज असेही विद्यार्थी भेटतात, ज्यांना गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत, परंतु ज्यांना गणितामधील प्रश्नावर विचार करावयाचा असतो हेच नीट कळलेले नसते.

व्यवस्थेचे अपयश :

सध्याच्या शैक्षणिक वातावरणाकडे व परीक्षा पद्धतीकडे वरवर पाहिले तर त्याबद्दल चिंता का करावी, हे आपणाला लगेचच जाणवणार नाही. कारण सध्या जी शालेयप्रणाली आपल्याकडे आहे, त्यामधून दरवर्षी पदवी पातळीपर्यंत जेवढी प्रवेशक्षमता आहे, त्यापेक्षा अधिक संख्येने उत्तीर्ण होणारे शालेय विद्यार्थी सहज आढळतात. त्यांना यथावकाश महाविद्यालयात प्रवेश मिळतो. ते पदवी प्राप्त करून विद्यापीठातून बाहेर पडतात देखील.

त्यांच्यापैकी अनेकांनी विद्यापीठ परीक्षेत उच्चगुण प्राप्त केलेले असतात. मात्र त्यांच्यापाशी किमान विचार करायला लावणारे प्रश्न सोडविण्याची किंवा तसा प्रयत्न करण्याचीही क्षमता नसते. मग अशी किमान विचार करण्याची क्षमता विकसित न झालेले अनेकजण पदव्युत्तर शिक्षणाकडे वळतात किंवा काहीजण नोकरीसाठी उमेदवार बनतात. या सर्व प्रकारात भविष्यातील प्रशासक, शिक्षक किंवा व्याख्याते दडलेले असतात, कारण या सर्वांनी आयुष्याची तीन वर्षे पदवी परीक्षेत उत्तम यश कसे मिळवावे एवढेच शिकण्यासाठी खर्च केलेली असतात, पण विचार कसा करावा हे शिकलेले नसते. ही परिस्थिती पदव्युत्तर पातळीवर आणखीच खराब होत असते.

ही सर्व परिस्थिती प्रत्यक्षात असली तरी वरवर पाहता, आपल्याकडे कार्यरत असणाऱ्या शैक्षणिक व्यवस्थेमधूनच आपण उच्चगुण मिळविणारे एस.एस.सी.धारक मोठ्या संख्येने निर्माण करतो. त्याचबरोबर याच शिक्षण पद्धतीतून दरवर्षी उत्तम कामगिरी बजावलेले पदवीधर मोठ्या प्रमाणावर विद्यापीठे व महाविद्यालयातून निर्माण करतो.

ही जमेची बाजू मान्य केल्यावर अशा विद्यार्थ्यांजवळ विचार करण्याची क्षमता नसणे, किंवा एखाद्या प्रश्नावर तर्कसंगत विचार मांडण्याची क्षमता नसणे याची किंमत आपणाला मोजावी लागते. या क्षमतांच्या अभावाचे दुष्परिणाम कुठेतरी दृश्य होतातच. आपण कोणत्याही ज्ञानशाखेत होणाऱ्या संशोधन प्रकल्पाकडे नजर टाकली तर आपणासमोर उभे राहणारे दृश्य अत्यंत खराब असते. या बाबतीत आपण जर व्यापार व उद्योगक्षेत्राचे मत लक्षात घेतले तर समोर येणारे चित्र उत्साहवर्धक नाही. त्यांच्यामते साधारणपणे शंभर पदवीधारकांत फक्त पंचवीसच बऱ्यापैकी प्रशिक्षण दिल्यावर नोकरी देण्याच्या लायकीचे ठरतात.

भारत कसा शायनिंग, इमरजिंग व आर्थिक क्षेत्रात भरारी मारणारा देश आहे. तो जगात सुपर पॉवर म्हणून कसे स्थान प्राप्त करील, त्यासंबंधी बरेच लेख प्रसिद्ध होत आहेत. त्याचबरोबर पुढारी व विचारवंतदेखील अशा प्रकारचा आशावाद जाहीर भाषणांतून व्यक्त करीत आहेत, हे आपण अनुभवीत आहोत. परंतु हा दावा सूक्ष्म पातळीवर काळजीपूर्वक तपासला तर भारत चमकणारा देश आहे, हा दावा अगदी कमीत कमी वाईट बोलायचे ठरवले तरी हास्यास्पद दिसू लागतो. जो कोणी उच्च शिक्षणासाठी जोडलेला आहे त्याने जर पदवी शिक्षणाचे वास्तव नीट न्याहाळले तर त्याला सत्य परिस्थिती किती खराब आहे हे कळून येईल व त्याला जागे होऊन त्याचे अवलोकन करण्याचा संकेत मिळेल. याच्याही पलीकडे ज्यांना उच्च शिक्षणाचा आशय व दिशा यामध्ये रस आहे त्यांनासुद्धाही परिस्थिती जागे होऊन विचार करायला लावणारी ठरेल.

शालेय शिक्षणासंबंधी चर्चा किंवा वाद होतो, तसा वाद वा चर्चा महाविद्यालयीन शिक्षणाबाबत होणे ही असामान्य घटना म्हटली पाहिजे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण परस्परांशी अतूटपणे जोडले गेले आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्या सर्वांनी शालेय शिक्षण पूर्ण केलेले असते.

शाळेत शिकवणारे शिक्षकदेखील विद्यापीठाने निर्माण केलेल्या पदवीधरांपैकीच असतात. महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याने बारा वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण केलेला असतो, त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षणाचा अंतर्भाव असतो.

अशा प्रकारे तीन स्तरावर शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी पदवी शिक्षणासाठी महाविद्यालयात येतात, तेव्हा त्यांची विचार करण्याची किंवा प्रश्न न विचारण्याची मानसिकता पक्की तयार झालेली असते. अशी मानसिकता तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात बदलणे हे सोपे कार्य नाही आणि यातच पदवी शिक्षणाच्या अपयशाची गोम दडलेली आहे. जर तीन वर्षांच्या शिक्षणानंतर विचार करणारे पदवीधर, ज्यांना संवादकौशल्य बऱ्यापैकी अवगत झाले आहे आणि ज्यांना आपण निवडलेल्या विषयात खरोखरच रस आहे, असे विद्यार्थी तयार करण्यात यश आले नाही तर या व्यवस्थेतून जे शिक्षक तरुण मनाच्या नवीन पिढीला आकार देणारे म्हणून कार्यरत होतील. त्यांच्याकडे सध्याची शालेय स्तरावरील किंवा विद्यापीठ स्तरावरील शिक्षण प्रणाली बदलण्याची क्षमता नसेल.

या परिस्थितीमध्ये सुधारणा सुचवायच्या असतील तर आपणाला शालेय शिक्षण पद्धती व विद्यापीठीय शिक्षण पद्धतीचा एकाचवेळी विचार करावा लागेल. शालेय शिक्षणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षांत चांगल्या गोष्टी घडलेल्या आढळतात, त्यामध्ये या दोन गोष्टी प्रमुख आहेत.

1. राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रमांची पुनर्रचना, 2 आवडीने वाचण्यासारखी, सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीच्या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती. (शालेय मुलांसाठी) शालेय स्तरावर अलीकडे जो सुधारणा कार्यक्रम राबवला जात आहे, त्यामागे एक विशिष्ट तत्त्वज्ञान किंवा तत्त्वप्रणाली आहे. ती म्हणजे या सुधारणा प्रक्रियेतून प्रश्न विचारण्यास न घाबरणारे व विचारलेल्या प्रश्न विषयी सखोल विचार करून नावीन्यपूर्ण उत्तर देणारे विद्यार्थी घडवायचे आहेत.

या सुधारणांना व्यावहारिक स्वरूप देण्यासाठी काही उपक्रम सुरू झाले आहेत. उदा. प्रकल्प तयार करणे, प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, वाद-विवाद व चर्चेसाठी वेगवेगळे विषय ठेवणे या गोष्टी येतात, हे उपक्रम अभ्यासक्रमांचा एक भाग म्हणून स्वीकारण्यात आले आहते व त्यांचा समावेशदेखील पाठ्यपुस्तकात झाला आहे. या सर्व नवीन प्रयत्नांचा उद्देश एवढाच आहे की त्यामुळे विचारक्षम व समर्थ विद्यार्थी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना उत्तेजन मिळेल.

शालेय स्तरावरील हे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत, त्यांना उत्तेजन मिळाले पाहिजे हेही खरे आहे, मात्र ही प्रक्रिया सातत्याने चालू राहणारी असावी. पाच वर्षातून एकदा घडणारी नसावी. या प्रयत्नांना यश कितपत मिळते ते पाहण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. कारण सध्याची विचारक्षम विद्यार्थ्यांचा बळी घेणारी माध्यमिक स्तरावरील परीक्षापद्धती प्रभावी ठरेल, तसेच जर घडले तर या सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना मृत्यूकडे वाटचाल करावी लागेल.

परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या प्रश्नामध्ये अनेक अनुत्तरित मुद्दे आहेत. बोर्ड परीक्षेमध्ये सुधारणा करण्याचा सध्याचा जो प्रवाह आहे. त्याचा हेतू विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण व परीक्षेची धास्ती कमी करणे असा आहे. एक किंवा अर्धा मार्क जास्त मिळवण्याकरता जी खेदजनक धडपड करावी लागते ती कमी व्हावी म्हणून मार्काच्याऐवजी ग्रेड देण्याची कल्पना पुढे येत आहे. तसेच बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्याला मिळणाऱ्या गुणांपैकी काही टक्के गुण शाळेतर्फे अंतर्गत मूल्यमापनातून मिळावेत ही कल्पना मांडली जात आहे.

सध्याची माध्यमिक शालांत परीक्षा अशाप्रकारे घेतली जाते की त्यामधून एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य व्हावीत ती अशी, किमान गुणवत्ता तपासणे आणि विद्यार्थ्यांची ज्ञान मिळविण्याची नैसर्गिक क्षमतासुद्धा तपासणे. परंतु ही दोन्ही उद्दिष्टे परस्परांपासून इतकी भिन्न आहेत की, त्यांचे मूल्यमापन एकाच परीक्षेद्वारे करणे अवघड आहे. यावर पुढील काळात एक वेगळा मार्ग पुढे येऊ शकतो तो असा, बोर्डाने किमान दर्जा ठरविणारी परीक्षा घ्यावी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ज्ञान मिळविण्याच्या नैसर्गिक क्षमतेची परीक्षा घ्यावी. यासाठी विद्यापीठाला परीक्षेचे वेगळे प्रारूप तयार करावे लागेल. हे जर मान्य झाले तर महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागेल आणि हाच मुद्दा असा आहे की, ज्यावर अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक चर्चा/वाद होणे आवश्यक आहे.

शिक्षकांचे नियमन शालेय शिक्षणाच्या संदर्भात अध्यापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून बरीच चर्चा वाद-विवाद झालेले आपण पाहिलेले आहेत, त्याचबरोबर त्यात सुधारणा करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही झालेली आपण पाहतो. उच्चशिक्षण कसे सुधारावे हे सुचविण्यासाठी सरकारतर्फे आयोगांची नेमणूक झालेली आहे हे आपणाला ज्ञात आहे. परंतु या सर्व प्रयत्नांमध्ये पदवी पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता कशी सुधारावी, यावर पुरेसे लक्ष केंद्रित झालेले आढळत नाही.

पदवी स्तरावरील शिक्षणात सुधारणा करण्याचा कोणताही कार्यक्रम हाती घ्यावयाचा असेल तर त्यांची सांगड पुढील प्रश्नांच्या उत्तराशी घातली पाहिजे.

1. शिक्षकांना नोकरीची पुरेशी सुरक्षितता प्रदान करून त्यांच्यावर आपण शैक्षणिक दायित्व कसे निश्चित करू शकतो?

2. आपल्याकडील बुद्धिमान लोकांना या क्षेत्रात कसे आकर्षित करू शकतो व त्यांना शिक्षणक्षेत्रात राहण्यास कसे प्रवृत्त करू शकतो.

3. पदवी पातळीवर आज जे प्राध्यापक कार्यरत आहेत, त्यांच्या गुणवत्तेमध्ये व कौशल्यात आपण सुधारणा कशी करणार?

(तांत्रिकदृष्ट्या पदवी वर्गांना शिकविण्यासाठी प्राध्यापकांकडे पदव्युत्तर पदवी असणे पुरेसे आहे. त्यापेक्षा अधिकाची गरज नाही.)

4. सध्या सेवेत असणाऱ्या प्राध्यापकाने आपले ज्ञान सुधारावे व अद्ययावत ठेवावे, यासाठी आपण कोणते उत्तेजनात्मक उपाय योजणार आहोत? याचबरोबर त्यांनी त्याविरुद्ध वागू नये म्हणून कोणते प्रतिबंध लादणार आहोत?

5. सध्याची परीक्षापद्धती परिश्रमपूर्वक पाठ केलेली उत्तरे परीक्षेत अचूक लिहिण्याच्या क्षमतेला बक्षीस देते, त्याऐवजी ही परीक्षा विचारक्षम व बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरी बजावण्यास मदत करणारी कशी होईल, याचा विचार आपण करणार आहोत का?

सध्याची शैक्षणिक व्यवस्था वर उल्लेख केलेल्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याचा तोंडदेखला प्रयत्नही करत नाही. शिक्षकांच्यावर शैक्षणिक दायित्व नाहीच, उलट त्यांना समयबद्ध पद्धतीने आपोआप बढती मिळण्याची व्यवस्था आहे.

अगदी सौम्य शब्द वापरायचे झाले तरी या बढतीलाच गुणवत्तेवर आधारित बढती संबोधले जाते. अशी बढती मिळविण्यासाठी शिक्षकांना तीन आठवड्याच्या प्रशिक्षणात सहभाग नोंदवावा लागतो. यामागे गृहीत एवढेच आहे की, असा प्रशिक्षण वर्ग केला की शिक्षकाचे ज्ञान विस्तारते आणि गुणवत्तेची पातळी उंचावते.

अनेक शिक्षकांना (गणित शिक्षकसुद्धा गृहीत धरून) वाचनालयाला भेट देऊन आपल्या विषयातील उत्तम पुस्तके शोधावीशी वाटत नाही. त्याचबरोबर ज्या पदवीच्या आधारे शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळविला, त्या ज्ञानात स्वप्रयत्नाने वाढ करून आपली गुणवत्ता वाढवावी असेही वाटत नाही.

याही परिस्थितीमध्ये पदवी पातळीपर्यंतच्या एखाद्या शिक्षकाला आपण उत्तम कामगिरी करावी असे वाटले व त्याने अध्यापन शास्त्रातील संकल्पनेप्रमाणे काही प्रयोग केले. उदा. स्वतः संशोधन करणे, परीक्षेत न विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा विचार करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, त्यांना स्वत:च्या विषयावरील व्याख्यानांना जाण्यासाठी उत्तेजन देणे, घटक परीक्षेसाठी विचार करायला लावणारे प्रश्न काढणे, जर शक्य असेल तर विद्यापीठाच्या परीक्षेत तसे प्रश्न विचारणे असे उपक्रम त्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये राबविण्याचा प्रयत्न केला तर त्याला बऱ्याच धोक्यांना सामोरे जावे लागेल.

सध्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयोग सुरू असला तरी आपण पदवी अभ्यासक्रमातील उणीवा दूर केल्या नाहीत तर त्याचे नकारात्मक परिणाम शालेय पद्धतीमध्ये अनुभवास येतील. देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या कक्षेत आणण्याच्या प्रयत्नात सुधारणा कशी करता येईल व शालेय अभ्यासक्रम पूर्ण करून उच्च शिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांपैकी बहुसंख्य मुलांना महाविद्यालयात प्रवेश कसा मिळेल, याकडे आपण नीट लक्ष पुरविले नाही तर भविष्यकाळात आपला सर्वनाश होऊ शकेल. परंतु याच्याही पुढे जाऊन जवळपास कोणतेही कौशल्य नसणारे व ज्यांना विचार करणे, विश्लेषण करणे, अभिव्यक्त होणे या संकल्पना परकीय वाटतात असे पदवीधर जर आपण निर्माण करीत राहिलो तर आपला सर्वनाश दुप्पट वेगाने होईल, म्हणून सरकारने शिक्षणाबद्दल कोणतेही धोरण ठरवून ते राबवण्याचा विचार केला तर त्यामध्ये या दोन्ही प्रश्नावर उपाययोजना एकाचवेळी असली पाहिजे. (ते दोन प्रश्न म्हणजे संख्यात्मकवाढ व दर्जा उंचावणे) यापैकी एका प्रश्नाचा दुसऱ्या शिवाय विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

शिक्षण प्रवाहामध्ये अधिकाधिक लोकांना प्रवेश कसा मिळेल या मुद्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सरकारी धोरणावर बरीच जाहीर चर्चा होताना आपणाला दिसते. हे खरे असले तरी शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढवता येईल, यासंबंधी चर्चा किंवा वाद-विवाद होताना सहसा दिसत नाहीत. गुणवत्ता कशी वाढवता येईल.

विशेषत: महाविद्यालयातील शिक्षणाची यावर जाहीर चर्चा व्हावी असे वाटत असेल तर, त्याची पूर्वअट अशी आहे की सध्या कार्यरत असणाऱ्या विद्यापीठाने व महाविद्यालयाने देत असलेल्या शिक्षणाच्या दर्जाविषयी समस्या किंवा प्रश्नचिन्ह आहे, हे एकदा जाहीरपणे मान्य केले पाहिजे.

राखीव जागांच्या विरोधात युक्तिवाद करताना बऱ्याच वेळा असे म्हटले जाते की, टक्केवारीने कमी गुण मिळविणाऱ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्यावा लागतो म्हणून गुणवत्ता घसरते, परंतु माझ्यामते विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्याची नैसर्गिक क्षमता नसणारे विद्यार्थी जेव्हा आपण त्या विषयाला घेत राह तेव्हा दर्जामध्ये घसरण आपल्याला नक्की दिसेल. (शालांत परीक्षेत मिळणाऱ्या गुणांमध्ये अशी नैसर्गिक क्षमता प्रतिबिंबित निश्चितपणे होत नाही.) आपण फक्त एका विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केले तरी आपणाला असे जाणवेल की त्या विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता, बुद्धिमत्ता आणि मानसिकता हे तीनच घटक तो विद्यार्थी निवडलेल्या शाखेच्या चौकटीत विश्लेषण कौशल्य, तर्कशुद्ध विचारसरणी आणि संवादकौशल्य विकसित करण्यात यशस्वी होईल अथवा नाही. असे यश त्याने महाविद्यालयात सामान्य वर्गातून किंवा राखीव जागातून प्रवेश मिळवला यावर ती अवलंबून नाही.

जर पदवीपर्यंत विद्यार्थ्याला त्यांनी निवडलेला विद्याशाखेच्या अभ्यासाचा विशाल दृष्टिकोन न देता आपण अर्थहीन परीक्षेत उत्तम कामगिरी कशी बजावता येईल, यावर लक्ष केंद्रित करणारी संकुचित पद्धती राबविली तर शैक्षणिक परिस्थिती आणखीनच बिघडेल. अशी बिघडलेली परिस्थिती सामान्य किंवा राखीव स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सारखीच असेल,

आता वेळ अशी आली आहे की, जेव्हा लोकांचे लक्ष्य भारतातील शिक्षण व्यवस्था ग्रासणाऱ्या दिखाऊ समस्येवरून खऱ्या समस्येकडे वेधले पाहिजे, त्यावर जाहीर चर्चा वाद-विवाद झाला पाहिजे. अशा चर्चेची सुरुवात करण्यासाठी पदवी महाविद्यालयाशिवाय दुसरी योग्य जागा नाही. शिक्षणात सुधारणा करण्याचे सर्व मार्ग शेवटी पदवी शिक्षणाकडे वळतात. सध्याच्या परिस्थितीचे खरेखुरे व मोकळे मूल्यमापन केले तर असे दिसते की, पुढचा रस्ता आपणाला कोठेच पोहोचवत नाही.

(इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली'च्या 25 ते 31 ऑगस्ट 2007च्या अंकात "Teaching students to think" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखाचा स्वैर अनुवाद...) 

अनुवाद : प्रा. वि. म. पटवर्धन (निवृत्त) 
5, यश अपार्टमेंट, समर्थनगर, नाशिक.

Tags: गीता व्यंकटरमण शिक्षण इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली वि. म. पटवर्धन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके