डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पुढच्या मे महिन्यात मी आजोळी येणार आहे. तोपर्यंत चिंध्या रोज शाळेत जाणार आहे. माझं इंग्लिश पुस्तकसुद्धा वाचायला त्याला शिकायचंय नं!

 

​​​​​​​

 

आजीच्या घरी आल्याशिवाय मे महिन्याची सुट्टी सुट्टीसारखी वाटतच नाही. मोठ्याच मोठ्या अंगणावर पसरलेला वाळलेल्या पानांचा मांडव... अंधार आणि उजेड असं दोन्ही एकात एक मिसळलेल्या गारगार मोठ्या खोल्या. मागच्या बाजूला ‘कुर्र कुर्र’ आवाज करणाऱ्या रहाटाची विहीर आणि पलीकडे आंब्याची राईच राई...

आजी, आजोबा, मामा सगळे भोवतीभोवती... डोळे बारीक करून चूल फुकणारी मुक्ताबाई... मनाशीच काहीतरी बोलत घर झाडणारा बापू... धुणं-भांडं, सडा सारवण करणारी पारूबाई आणि चिंध्या. चिंध्या म्हणजे माझा एकदम दोस्त. ‘व्हय खोतीन’ ‘जी खोतीन’ म्हणत मी सांगीन ते ऐकणारा. मी म्हणेन ते करणारा.

एकदमच राजकन्येसारखं वाटायला लागतं! चिंध्याला काहीही करायला सांगितलं, तरी येतं करता. ‘झाडाला झोका बांधून दे’, की झोका बांधला जातो. ‘पाडाची कैरी पाडून दे’ की कैरी हातात मिळते. तो गायीचं दूध काढतो. शेरडं राखायला जातो. कुरकुरणाऱ्या कोंबडीच्या पंखाखालून हळूच अंडही काढतो आणि अंधारमिट्ट झाला. तरी रात्री न घाबरता बिनचपलेचा घरीसुद्धा जातो.

पारूबाई म्हणते, “सोन्याच्या तुकड्यावानी नतू गल्यांत घालून पोर गेली मरून...” ती रडायला लागली. की कसंतरीच होतं...

चिंध्याला हे सांगितलं, तर तो पांढरेपांढरे दात. दाखवत लखकन् हसतो. का हसतो? काकांनी कॅनडाहून आणलेल्या गुळगुळीत पुस्तकातला ढेरपोट्या राक्षस दाखवल्यावर तो असाच हसला. डोळे बारीक करून.

मग मी त्याला एक गोष्ट वाचून दाखवली. आधी इंग्लिशमध्ये, आणि नंतर सांगितली ती मराठीत. मला वाटलं, की त्याला पुस्तकाला हात लावायचा होता. पण त्याचे हात किती मळकट होते. मी दिलंच नाही त्याच्या हातात... तो नुसता बघत राहिला... पुस्तकाकडे.

रात्र झाली. हळूहळू अंधार उघड्या खिडक्यादारांतून आत घुसला. बापूनं ओसरीत पणती आणि ओठाणात कंदील लावला. अशावेळी ‘शुभं करोति’ मोठ्यानं म्हणावंसं वाटतं. म्हणजे अंधाराला की कशाला घाबरून होणारी छातीतील धडधड ऐकू येत नाही. सगळ्यांच्या पाया पडल्यानंतर आजीचा स्वयंपाक होईपर्यंत पाहावं म्हटलं पुस्तक...

कंदीलाच्या उजेडात राजकन्या कशी स्वप्नातल्यासारखी वाटेल... जंगल हिरव्याचं निळसर होईल...

पुस्तकातही रात्र कशी धुरकट राखाडी होऊन उतरेल... म्हणून माझी बॅग उघडली. पुस्तकच नाही. शोधलं.... वर, खाली. मोठ्या कपड्यांच्या बॅगेत, बापूकडून कंदील घेऊन खिडकीच्या ओट्यावर... कपाटातसुद्धा. पण इथेच तर होतं दुपारी! मला रडू यायला लागलं. आजी म्हणाली, “उद्या दिवसा उजेडी बघू. असेल तिथेच कुठेतरी!” तसं उठल्या-उठल्यासुद्धा शोधलं. नाहीच मिळालं कुठे.

“पण पारूबाई, दुपारी मी चिंध्याला गोष्ट वाचून दाखवून इथेच बॅगेत ठेवलेलं...” मी रडायला लागले. पारूबाईनं पटकन् आजीकडे पाहिलं. जेवल्यानंतर जमीन सारवून घेऊन ती घरी गेली. येताना तिच्या एका हाताशी होता चिंध्या... फरपटत... आणि दुसऱ्या हातात माझं पुस्तक. चिंध्या पाय मुळी उचलतच नव्हता. पारूबाई त्याला ओढत होती. घरात आणून तिनं त्याला आजीसमोर आदळलं. भरलेलं पोतं टाकावं तसं. चिंध्या धडपडला. पारूबाईनं हातात लाकडाचं फाटं घेतलं. चिंध्याच्या अंगावर, पायावर मारत सुटली. मारताना काहीतरी बडबडत होती.

“साळंत जायला नगं मेल्याला... उनाड कार्ट…” चिंध्या रडत ओरडत होता. आजी मध्ये पडली.

“पोराची जात...” असं काहीतरी म्हणत तिनं चिंध्याला बाजूला नेलं. संध्याकाळभर पारुबाई काही बोललीच नाही. एकदोनदाच चुलीतल्या जाळाकडे एकटक पाहताना मी तिला बघितलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं, की मला तसं वाटलं?

रात्री मला रडणारा, ओरडणारा चिंध्या सारखा आठवत होता.

पुस्तक चोरलं म्हणून रागही आला त्याचा, पण मनात कसंतरीच झालं. दोन्ही एकदमच. दुसऱ्या दिवशी पारुबाई कामाला आली. पण चिंध्या आलाच नाही. दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्याही नाही. मी परत घरी जायला निघेपर्यंत नाही... खरं सांगायचं तर सुट्टी नेहमीसारखी गेलीच नाही. घरी जायला निघाले. मामाबरोबर बसची वाट पाहत थांबले. सहज लक्ष गेलं तर वर देवळाच्या उंचवट्यावर हातातली काठी जमिनीत रोवून चिंध्या डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघत होता. चोरून चोरून. मी त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं मान वळवली. उगीचच खालच्या दगडावर उडी मारली. हातातली काठी ‘झुब्’ दिशी हवेत फिरवली आणि आपलं लक्षच नाही असं दाखवत चरणार्‍या गायीवर उगीचच ओरडला, “चंच्च्... चंच्च्... ओs...” मला हसूच आलं... आणि वाईटपण वाटलं. दोन्ही एकदमच. मी हाक मारली... “चिंध्या!” त्यानं ऐकूनसुद्धा न ऐकल्यासारखं केलं.

मीच चार पायऱ्या चढून वर गेले. असं काय वाटलं कुणास ठाऊक! माझ्या गळ्यातल्या बॅगमधून माझं पुस्तक काढलं आणि चिंध्याच्या हातात दिलं. तो जरा घाबरला. मी परत तसंच त्याच्या हातात कोंबलं. तो लाजला... की रडायला आला? वर पाहिलंच नाही त्यानं....

पुढच्या मे महिन्यात मी आजोळी येणार आहे. तोपर्यंत चिंध्या रोज शाळेत जाणार आहे. माझं इंग्लिश पुस्तकसुद्धा वाचायला त्याला शिकायचंय नं!

Tags: शाळा इंग्रजी स्वाती जयदीप राजे चिंध्या मे कॅनडा कोंबडी आजोळ आंबा सुट्टी School English Swati Jaydeep Raje Chindhya Summer Season May Month Mango #Canada weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स्वाती राजे,  पुणे
swatijraje@gmail.com

साहित्यिक, संशोधक, लेखिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके