डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या ‘हंस’ या हिंदीतील मासिकाचे कार्यकारी संपादक असलेले संजीव, कोल्हापूर येथे झालेल्या तिसऱ्या साधना साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक होते. त्यांची व त्यांच्या कथेची ओळख करून देणारा हा लेख... पुढील अंकात संजीव यांनी संमेलनाचे उद्‌घाटन करताना केलेले भाषण प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक   

 

हिंदी कथा साहित्यामध्ये मुन्शी प्रेमचंद यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रेमचंदांची कथा ज्या जनवादी परंपरेचा सूत्रपात करते त्या परंपरेला उत्कर्षापर्यंत पोहोचविते. प्रेमचंदांनी आपल्या लेखनाबरोबर ‘हंस’ नियतकालिकाच्या माध्यमातून हिंदी जनवादी साहित्यास समृध्द केले. प्रेमचंदोत्तर काळात हिंदी कथा विविध अंगांनी विकसित झाली, अनेक आंदोलनांद्वारे संपन्न झाली. मोहन राकेश, कमलेश्वर, राजेंद्र यादव या त्रयीने ‘नई कहानी’ आंदोलनाद्वारे कथेस नवी ओळख दिली. साठ-सत्तरच्या दशकात जी पिढी लिहिती झाली त्या पिढीने कथेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. कथा साहित्यास नवे संदर्भ दिले. या पिढीतील संजीव यांनी प्रेमचंद परंपरेस समृध्द केले आणि काळानुरूप नवी अर्थवत्ताही दिली. कथा व कादंबरी लेखनातून त्यांनी हिंदी साहित्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संजीव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील बाँगरकला गावचा. त्यांचे कुटुंब अत्यंत सामान्य शेतकरी, कष्टकरी. शिक्षणासाठी काकांनी त्यांना पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे आणले. त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर कुल्टी हीच त्यांची कर्मभूमी बनली. पण सुलतानपूरच्या मातीशी आजही त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. कुल्टी म्हणजे कोळश्याच्या खाणींचा प्रदेश. बिहार, उत्तर प्रदेश, प.बंगाल येथील गरीब मजूर व आदिवासी यांचे जीवन येथील रोजगारावरच अवलंबून आहे. संजीव हिंदी साहित्यामध्ये या सामान्य लोकांचे प्रतिनिधी म्हणूनच समोर येतात.

कोळसा खाणीच्या प्रदेशातील या लोकांचे जीवन साहित्यातून यापूर्वी कधीच आलेले नाही. संजीव यांनी ‘सावधान नीचे आग है’ व ‘धार’ या कादंबऱ्यांधून प्रथमतः या जीवनाचे सूक्ष्म व व्यापक चित्रण केले. संजीव संपूर्ण जीवन याच प्रदेशात जगले, येथेच त्यांच्या संवेदनशील मनावर अमिट संस्कार झाले. किंबहुना यामुळेच त्यांनी कधी लेखक म्हणून स्वतःला वेगळे मानले नाही. पद, प्रतिष्ठा व पुरस्कार यांपासून सदैव दूर राहणेच त्यांनी पसंत केले. त्यांनी ‘एकला चलो रे’ हे व्रत घेऊन साहित्यात पदार्पण केले, अन्‌ आजही ते त्याच वाटेवरून चालत आहेत. जीवनाच्या अगदी सुरुवातीपासून ते अभावग्रस्त जीवनाशी सामना करत आले आणि आजही करत आहेत. मात्र चाळीस वर्षांच्या लेखनकालात ते आपल्या वैचारिक भूमिकेपासून तसूभरही ढळले नाहीत. जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. मादाम क्यूरी, भगतसिंह, गोगोल, प्रेमचंद हे संजीव यांचे प्रेरणास्रोत आहेत. लेखन प्रक्रियेमध्ये ते प्रतिसृष्टी निर्माण करण्याची इच्छा ठेवणाऱ्या विश्वामित्राला आपली पे्ररणा मानतात. संजीव एक बेचैन कथाकार आहेत. त्यांचे लेखन सामाजिक बांधिलकीतून समोर येते. त्यांनी आपल्या कथांमधून अनेक उपेक्षित संदर्भ प्रस्तुत केले आहेत. संजीव यांची कथादृष्टी समाजशास्त्रीय आहे, ते सामाजिक समस्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रस्तुत करतात. लोकजीवन आणि लोकसंस्कृती यांचा ते आपल्या कथांमधून समर्थ आणि सार्थक उपयोग करताना दिसतात. संजीव यांच्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली, परंतु त्यांच्यातील जनधर्मी कथाकाराला कवितेतून व्यक्त होणे तितकेसे भावले नाही आणि मग ते कथेकडे वळले. 1976 मध्ये ‘सारिका’ या नियतकालिकामधून त्यांची ‘किस्सा एक बीमा कंपनी की एजेन्सी का’ ही कथा प्रसिध्द झाली. संजीव त्या वेळी ज्या बीमा कंपनीमध्ये नोकरी करत हेाते. त्यातील घोटाळे त्यांनी पाहिले व त्यावरच कथा लिहिली. परिणामतः त्यांना ती नोकरी गमवावी लागली. पण त्यांनी हे व्रत न सोडता अधिक निष्ठेने त्याचे पालन केले.

त्यानंतर 1980 मध्ये संजीव यांची ‘अपराध’ नावाची कथा प्रसिध्द झाली. या कथेस अखिल भारतीय कथा प्रतियोगिता प्रथम पुरस्कार मिळाला. या कथेने संजीव यांना हिंदी साहित्यामध्ये एक वेगळी ओळख दिली. यानंतर संजीवमधील कथाकाराने कधी मागे वळून पाहिलेच नाही. ते निरंतर उपेक्षित संदर्भांना आपल्या कथांधून समर्थपणे प्रस्तुत करत आले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर अगदी अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते म्हणतात, ‘न रुका, न चुका हूँ’. संजीव यांच्या कथांचे अकरा संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘तीस साल का सफरनामा’, ‘आप यहाँ है’, ‘भूमिका और अन्य कहानियाँ’, ‘दुनिया की सबसे हसीन औरत’, ‘पे्रतमुक्ति’, ‘प्रेरणास्रोत और अन्य कहानियाँ’, ‘ब्लैकहोल’, ‘डायन और अन्य कहानियाँ’, ‘खोज’, ‘गली के मोड पर सूना-सा कोई दरवाजा’ व ‘गुफा का आदमी’. वाणी प्रकाशनाने त्यांच्या सर्व कथा ‘पडाव’ शीर्षकाअंतर्गत तीन खंडांत प्रसिध्द केल्या आहेत. त्यांनी ‘किसनगढ के अहेरी’, ‘सर्कस’, ‘सावधान नीचे आग है’, ‘धार’, ‘पाँव तले की डूब’, ‘जंगल जहाँ शुरू होता है’, ‘सूत्रधार’ व ‘आकाशचंपा’ यांसारख्या आठस्तरीय कादंबऱ्यांचेही लेखन केले आहे. संजीव यांच्या अकरा कथासंग्रहांमधून जवळपास दीडशे कथा आहेत. त्यांच्या कथा फक्त संख्येने जास्त नाहीत तर गुणात्मकदृष्ट्याही उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कथा लेखनामध्ये ज्या प्रकारची निरंतरता, निष्ठा आणि बहुलता मिळते ती दुर्लभ आहे.

संजीवांच्या कथा भारतीय ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रस्तुत करतात. त्यांच्या ‘अपराध’, ‘शिनाख्त’, ‘तिरबेनी का तडबन्ना’ व ‘ऑपरेशन जोनाकी’ या कथा नक्षलवादी पृष्ठभूीवर भ्रष्ट व्यवस्थेचा पंचनामा करतात. ‘अपराध’ ही कथा नक्षलवादी अपराधी असतात, या मान्यतेला छेद देते व खरे अपराधी समोर आणते. कथेमध्ये काय ताकद असू शकते याचे अत्यंत समर्पक उदाहरण म्हणजे या कथा. या कथा प्रसिध्द झाल्यानंतर अनेक दिवस पोलिस संजीव यांना शोधत होते, पण त्यांचे टोपणनाव आणि कुल्टीतील लोकांचा त्यांच्यावर असणारा अगाध स्नेह यामुळे ते पोलिसाच्या हाती लागले नाहीत. ‘धनुषटंकार’, ‘भूखे रीछ’, ‘लांग साईट’, ‘चुनौती’, ‘नेता’, ‘मक्तल’, ‘कन्फेशन’ या कथा मजूरवर्ग, युनियन व कारखान्याचे यथार्थ संदर्भ प्रस्तुत करतात. मजूरवर्गाच्या शोषणाची अनेक रूपे त्यांच्या कथांमधून समोर येतात. जातिवाद, सामंतवाद हेही त्यांच्या काही कथांचे विषय आहेत. या संदर्भात त्यांची ‘पूत-पूत! पूत-पूत!’ कथा तर उल्लेखनीय मानावी लागेल. ‘माँ’, ‘घर लौट चलो दुलारीबाई’, ‘अंतराल’ या कथा क्षरण होणाऱ्या मानवीय संवेदनेविषयी चिंता प्रकट करतात. ‘आप यहाँ है’, ‘भूमिका’ व ‘टीस’ या कथांमधून आदिवासी जीवनाचे चित्रण झााले आहे. ‘हिमरेखा’ व ‘आरोहण’ या कथांमधून पर्वतीय जीवनाचे वास्तव चित्रण झाले आहे. दुसरीकडे ‘ब्लैकहोल’, ‘नस्ल’, ‘काउंट डाउन’, ‘हलफनामा’ या कथांधून बाजारवादाने निर्माण झालेल्या संकटाचा आलेख ते मूर्त करतात. ‘मानपत्र’ एका वास्तव संदर्भावर बेतलेली कथा आहे. पंडित रविशंकरांनी पत्नीच्या केलेल्या शोषणाचा भयानक संदर्भ ही कथा समोर ठेवते. त्यांची ‘प्रेरणास्रोत’ कथा जंगलीबहू या पात्राच्या माध्यमातून चिंतनीय संदर्भ समोर ठेवते. लेखक हा पात्रांना जन्म देत असतो पण या कथेत पात्रच लेखकाला नवा जन्म, नवी दृष्टी देऊन प्रभावित करते. म्हणूनच या कथेच्या शेवटी जंगलीबहूविषयी ते म्हणतात, ‘पता नहीं मैंने उसे जन्म दिया या उसने मुझे जन्म दिया.’ असा संदर्भ समोर ठेवणारी ही भारतीय साहित्यातील एकमात्र कथा असेल. ‘दुनिया की सबसे हसीन औरत’ ही कथा एक पूर्णतः नवी सौंदर्यदृष्टी समोर ठेवते.

संजीव यांच्या मते विरोध व संघर्ष करणारी स्त्री हीच जगातील सर्वांत सुंदर स्त्री आहे. ही कथा म्हणजे प्रेमचंदांच्या ‘दुनिया का सबसे अनमोल रत्न’ या कथेची पुढची कडी आहे. अशीच एक उल्लेखनीय कथा आहे ‘सागर सीमांत’, जी हिंदी कथा साहित्यात एक महान पे्रमगाथा बनली आहे. कथानायिका नसीबनची ही कथा म्हणजे उदात्त व पवित्र प्रेमाची दर्दनाक व्यथा आहे. ‘आरोहण’मध्ये पर्वतीय संघर्षय जीवन जगणारा भूपसिंह आपली अमिट ओळख बनवितो. संजीव यांनी आपल्या कथांमधून अशा अनेक स्मरणीय चरित्रांना जन्म दिला आहे. ‘अपराध’, ‘ऑपरेशन जोनाकी’, ‘मानपत्र’, ‘सागर सीमांत’, ‘आरोहण’, ‘माँ’, ‘दुनिया की सबसे हसीन औरत’, ‘टीस’, ‘प्रेतमुक्ति’, ‘ट्रैफिक जाम’, ‘आप यहाँ है’, ‘डेढ सौ साल की तनहाई’, ‘बाघ’ सारख्या एक डझनभर कालजयी कथा संजीव यांच्या नावे आहेत. संजीव हे कथा या साहित्य प्रकाराकडे अत्यंत गंभीरतेने पाहतात. त्यांच्या कथांचा फलक अत्यंत व्यापक आहे. त्यांच्या मते ‘कहानी जहाँ खत्म होती है वहीं उसकी शुरुआत होती है.’ त्यांचे कथालेखन म्हणजे एअरकंडिशनमध्ये बसून लिहिले जाणारे लेखन नाही. आपल्या कथांच्या शोधात त्यांनी मोठी पायपीट केली आहे. या कथा म्हणजे भारतीय सामान्य माणसांच्या व्यथा आहेत, अनुभवांचे बोल आहेत. त्यांचे कथालेखन हे श्रम आणि शोध यांतून आकार ग्रहण करते. ते ज्या प्रदेशांची, लोकांची कथा लिहितात त्यांच्यामध्ये जाऊन राहतात, त्यांची भाषा व वेदना आत्मसात करतात. त्यामुळेच त्यांच्या कथाचे विषयही वेगळे आहेत.

संजीव यांची कथा समाजामधून हरवत चाललेल्या शौर्याचा शोध घेते. रुग्ण परंपरा व भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात प्रतिरोध व संघर्ष करण्याची ऊर्जा बहाल करते. त्यांची पात्रे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे महत्त्वपूर्ण मानतात. ती जय-पराजयाचा विचार करत नाहीत. या कथा त्यांच्या विचारांच्या संदेशवाहक आहेत. त्यामध्ये कलात्मकता कमी, वास्तव अधिक आहे. यांच्या कथांची भाषा व शैली अत्यंत तरल व यथार्थसापेक्ष आहे. त्यांच्या भाषेवर बोलींचा प्रभाव आहे. भाषा संयत, संतुलित व संयमित आहे. संजीव यांच्या कथेचा मोठा वाचक वर्ग आहे. त्यांनी गंभीर कथा वाचनाची सवय वाचकांना लावली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही पुरस्कारांनीही त्यांच्या कथेची दखल घेतली आहे. प्रथम कथाक्रम सन्मान (1997), इंदू शर्मा आंतरराष्ट्रीय कथा सन्मान (2001), पहल कथा सन्मान (2005), सुधा कथा सन्मान (2008) इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. श्याम बेनेगल यांचा ‘वेल डन अब्बा’ चित्रपट संजीव यांच्या कथेवरून बनविला आहे. प्रकाश झा प्रॉडक्शनही त्यांच्या एका कथेवर चित्रपट तयार करीत आहे, संजीव प्रेमचंदांप्राणे सामान्य माणसाची न्याय्य  लडाई लढत आले आहेत. ते आपले साहित्य सामान्य माणसापर्यंत, (ज्यांच्या जीवनाशी ते निगडित आहे) पोहचावे म्हणून प्रयत्न करतात. आपण रॉयल्टीसाठी भांडणारे अनेक लेखक पाहिले आहेत, पण संजीव हे एका प्रकाशकाने पुस्तकाची किंमत जास्त ठेवली म्हणून त्याच्याशी भांडलेले लेखक आहेत. ‘कथनी व करनी’मध्ये असलेल्या या इमानदारीमुळेच ते श्रेष्ठ ठरतात.

सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या वयातही ते प्रेमचंदाच्या ‘हंस’ मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. संजीव लेखक म्हणून जसे श्रेष्ठ आहेत तसेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला लेखकाचे लेखन प्रभावित करते, पण माणूस म्हणून त्याच्याकडून अपेक्षाभंग होतो. संजीव याला अपवाद आहेत, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांचा आणि माझा परिचय झाला त्यालाही जवळपास दहा वर्षे झाली. मी माझे पीएच.डी.चे शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर ‘कथाकार संजीव’ या पुस्तकाचे काम करत असताना त्यांची प्रथम भेट झाली. पत्रसंवाद त्याहीपूर्वी पाच वर्षे चालू होता. भेट झाली तेव्हा मी सुशिक्षित बेकार होतो. त्यांना जेव्हा हे समजले तेव्हा ते म्हणाले, ‘पहिल्यांदा नोकरी मिळवा, पुस्तकाचे काम नंतर झाले तरी चालेल, येथे नोकरी मिळत नसेल तर कुल्टीला चला.’ पण योगायोग असा की पुस्तकाचे काम पूर्ण झाले आणि नोकरी मिळाली. ते 2005 साल होतं. ‘कथाकार संजीव’ हे संजीवच्या साहित्यावर प्रसिद्ध होणारे पहिले पुस्तक होते. त्याच वर्षी प्रतिष्ठेचा ‘पहल कथा सम्मान’ संजीव यांना घोषित झाला होता. त्या वेळी ज्ञानरंजन यांच्याशी चर्चेदरम्यान या पुस्तकाचा उल्लेख झाला आणि ते म्हणाले होते की, ‘वह कौन बच्चा है मैं देखना चाहता हूँ, जिसने पहल कथा सम्मान देने से पहले संजीव की दखल ली.’

त्या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहिलो. त्या वेळी संजीव यांच्या साहित्यिक उंचीचा खरा प्रत्यय आला आणि मला हिंदीतील एका महान कथाकारावर पहिले पुस्तक तयार करण्याचे सार्थक वाटले. ‘साधना’ ट्रस्टने सन 2010चे साहित्य संमेलन कथेवर केंद्रित केल्यानंतर डॉ. सुनीलकुमार लवटे सरांचा फोन आला की संजीव यांना संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून बोलवायचे आहे, पण त्यांना साधनाची आचारसंहिताही सांग. मी संजीव यांना फोन करून याविषयी बोललो तेव्हा ते तुरंत म्हणाले, ‘मैं साने गुरुजी एवं साधना का कार्य जानता हूँ, मैं जरूर आऊँगा’ आणि संजीव आजारी असताना देखील विमानाच्या तिकीटाचा हट्ट न करता रेल्वेने या संमेलनास उपस्थित राहिले. अशी बांधिलकी आज दुर्लभ होते आहे. प्रेमचंदाची विरासत सांभाळणाऱ्या कथाकाराने साने गुरुजींच्या ‘साधना’ला केलेला हा सलामच म्हणावा लागेल.

Tags: संजीव साहित्यीकार हिंदी साहित्य कथा साहित्य मुन्शी प्रेमचंद गिरीश काशिद कथाकार संजीव आणि त्यांची कथा sanjiv sahityakar hindi sahitya katha sahitya munshi premchand girish kashid Kathakar sanjiv ani tyanchi katha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गिरीश काशिद,  बार्शी, जि. सोलापूर, 413 401
gr.kashid@rediffmail.com

प्रमुख, हिंदी विभाग, 
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, 
 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके