डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तरुण सुशिक्षितांस विज्ञापना

गोपाळ गणेश आगरकर (1856 -1895)  यांना जेमतेम 39 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील शेवटची 14 वर्षे त्यांच्या सार्वजनिक कार्याची म्हणता येतील. त्यांपैकी सुरुवातीची सात वर्षे ‘केसरी’ तर नंतरची सात वर्षे ‘सुधारक’ या साप्ताहिक वृत्तपत्रांचे ते संपादक होते.  या दोन्ही पत्रांतून त्यांनी तत्कालीन समाजाच्या स्थितीगतीवर सव्वाशेहून अधिक निबंध लिहिले. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या संदर्भातील विशेष महत्त्वाचे वैचारिक लेखन अभ्यासायचे असेल तर आगरकरांचे निबंध त्यात येतातच येतात. त्यांच्या भूमिकेचा मध्यवर्ती भाग किंवा गाभा एकाच निबंधातून समजून घ्यायचा असेल आणि सव्वाशे वर्षांनंतरही तो जसाच्या तसा लागू होतो हे दाखवायचे असेल तर, तरुण सुशिक्षितांस विज्ञापना हा निबंध वाचायला हवा. हा निबंध ‘सुधारक’च्या तीन अंकांतून क्रमशः प्रसिद्ध झाला होता. प्रसिद्धीच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत, पण 1890 दरम्यानचा तो आहे. जुन्या वळणाची भाषा व पल्लेदार वाक्ये, यामुळे वाचताना तो काहीसा कठीण वाटेल, पण कमालीचा बौद्धिक आनंद देईल यात शंका नाही.

- 1 –

तरुण सुशिक्षित देशबांधवहो, हा सुधारक अत्यंत प्रेमपूर्वक जी विज्ञापना तुम्हा पुढे करीत आहे, तिकडे लक्ष द्याल आणि तिची सार्थकता करण्याविषयी प्रयत्न कराल, अशी आशा आहे.

असे म्हणतात की- ज्या देशांतील लोकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य स्थापिले आहे, ज्या देशांतील लोकांनी राजांचा जुलूम नाहीसा करून प्रजासत्ताक राज्यपद्धती स्थापिल्या आहेत- ज्या देशांतील लोक, सामाजिक व धार्मिक गोष्टींची सुधारणा करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता, ती आपली आपण करू लागले आहेत आणि ज्या देशांतील लोकांस सर्व प्रकारच्या क्रांतीस लागणाऱ्या साधनांची अनुकूलता साध्य झाली आहे; त्या देशांतील युनिव्हर्सिट्यांतले शिक्षक आणि शिष्य पूर्वसंप्रदायप्रिय असतात. कोणतीही जुनी पद्धत टाकणे, नवीचा अंगीकार करणे वगैरे गोष्टी त्यास आवडेनाशा होतात. सारांश, जे चालत आले आहे तेच बरे आहे, त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याने नवी लचांडे उद्भवण्याचा संभव आहे आणि त्यांचा परिहार कसा करावा हे ठाऊक नसल्यामुळे त्यापासून हित न होता उलट नुकसान होण्याची भीती आहे. सबब- जे चालू आहे त्याचेच संरक्षण करावे आणि त्यापासून होईल तितके सुख उपभोगावे, असे त्यास वाटत असते. काही अंशी असे होणे फार स्वाभाविक आहे. 

ज्याप्रमाणे जलोदधीचा अत्यंत क्षोभ करणारा प्रचंड प्रभंजन काही वेळ मोठ्या जोराने वाहिल्यावर आणि समुद्रावर व जमिनीवर त्याने अनेक उत्पात करून सोडल्यावर, जणू काय विगलितवीर्य होत्साता शांत होतो आणि वातावरणात पराकाष्ठेची निश्चलता उत्पन्न होऊन सर्व सचेतन-अचेतन वस्तू जागच्याजागी निश्चेष्ट झाल्यासारख्या भासू लागतात; त्याप्रमाणे ज्या देशात मोठमोठ्या राज्यक्रांत्या झाल्या आहेत, ज्यातील लोकांनी राज्यस्वातंत्र्यासाठी व विचारस्वातंत्र्यासाठी अनेक तुंबळ युद्धे केली आहेत; जो देश अनेक वर्षांनी शांतिसुखाचा अनुभव घेऊ लागला आहे आणि ज्यातील लोकांस विशेष गुरुत्त्वाचा कोणताही अन्याय दूर करणे राहिले नाही अशा देशांतील लोकांस थोडीशी स्तिमितता यावी- विशेषतः राज्यक्रांती म्हणजे काय, ती घडवून आणण्यास केवढे प्रयास पडतात, ती होऊ लागली म्हणजे प्रजेस किती हाल सोसावे लागतात, वगैरे गोष्टी ज्यास नीटपणे समजतात- अशा त्या देशांतील सुशिक्षित लोकांस तरी ती यावी, हे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा इंग्लंडसारख्या देशातील युनिव्हर्सिट्यांच्या प्रोफेसरांनी व कॉलेजातील विद्यार्थ्यांनी ग्लॅडस्टनसारख्या मंत्रिगण-शिरोमणीस विरुद्ध होऊन हार्टिंग्टनसारख्या संकुचित दर्शनाच्या व मर्यादित औदार्याच्या लोकाग्रणीचे प्रोत्साहन करावे आणि तदनुषंगाने वागण्याविषयी तत्परता दाखवावी, यात काही आश्चर्य नाही. पण ज्या देशांतील लोकांस राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता, अज्ञान आणि अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे किंवा परवशता प्राप्त झाली आहे- ज्या देशांतील सामान्य लोकांस गूढ अज्ञानाने व्यापले आहे- ज्या देशातील लोकांस विपत्तीपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत, पण त्यांच्या परिहारार्थ काय करावे हे समजत नाही; सारांश- ज्या देशांत राजकीय समता नाही, विद्या नाही, वित्त नाही, शारीरिक-मानसिक सामर्थ्य म्हणण्यासारखे नाही, अशा देशांतील युनिव्हर्सिट्यात आणि कॉलेजांत इतर ठिकाणापेक्षा थोडीशी अधिक चळवळ नसेल तर त्या देशाची अखेर गती काय होईल, हे सांगता येणे फार कठीण आहे. 

विचार करणे, सुख-दुःखाचा अनुभव घेणे व क्रिया करणे या तीन गोष्टींपैकी पहिलीत, दुसरीत किंवा तिसरीत प्रत्येक मनुष्य चूर होऊन गेलेला असतो. मोठमोठ्या ग्रंथांची पारायणे करावीत, रात्रीच्या रात्री चिंतनात घालवाव्यात, विचार व्यवस्थित झाला की तो पुस्तकद्वाराने किंवा दुसऱ्या कोणत्या तरी साधनाने लोकांपुढे आणावा- अशा रीतीने कित्येक आपली आयुष्ये कंठत असतात. अशास बाह्य सुखांचा फार उपभोग सापडत नाही, व बाह्य क्रिया करता येत नाही. वाचनापासून होणारा जो आनंद तोच यांचे स्थायी व आवडते सुख आणि विचार करण्यास व लिहिण्यास लागणारी जी शारीरिक हालचाल तीच यांची बाह्य क्रिया. दुसरा वर्ग सुखाभिलाषी लोकांचा. यास मानसिक सुखापेक्षा शरीरसुखाची चाड विशेष असते. वारुळात जशी एक खुशालचेंडू राणी मुंगी असते म्हणून सांगतात, तीसारखे हे सुखपरायण लोक होत.

सुखोपभोगासाठी सर्व प्राणिमात्र धडपडत असतात आणि ज्यास जो प्राप्त होईल त्याने त्यापासून आनंद करून घ्यावा, हे योग्य आहे. पण ज्या सुखोपभोगामुळे निरंतर तो घेता येण्याची शक्यता नाहीशी होते, बुद्धीस मांद्य येते, गात्रे निःशक्त होतात, उत्साह नाहीसा होतो आणि कुटुंबास व राष्ट्रीय कोणत्याही प्रकारचा फायदा न होता उलट नुकसान किंवा त्रास सोसावा लागतो; अशा सुखोपभोगात निमग्न असण्यात काय फायदा आहे बरे? पण असे लोक कोणत्याही देशांत थोडेथोडके नसतात. ज्या ठिकाणी अविद्या आणि वित्त यांचा संयोग दृष्टीस पडतो, त्या ठिकाणी व्यसनासक्ती दृष्टीस पडत नाही असे सहसा होत नाही. सुदैवाने ज्यांना सुखोपभोग करून घेता येत असेल, त्यांनी सुखाची निवड करताना ती आपणास व इतरांस शेवटपर्यंत हितावह होतील किंवा नाही, एवढे पाहत जावे म्हणजे झाले.

 या सुखपरायण वर्गाशिवाय लोकांचा आणखी एक तिसरा वर्ग असतो. या वर्गातील लोकांची क्रियाप्रवृत्ती फार जबरदस्त असते. एका दृष्टीने यास समाजाचे आधारस्तंभ म्हणता येईल. यांनी काबाडकष्ट करून आवश्यकतेचे व चैनीचे पदार्थ उत्पन्न करावेत आणि त्यांचा उपभोग वरील दोन वर्गांतील किंवा मधल्या वर्गातील लोकांनी घ्यावा, असे आजपर्यंत बऱ्याच अंशी होत आले आहे. पुढेही अल्प काळात या स्थितीत विशेष फेरबदल करता येईल असे वाटत नाही. तथापि, निरपेक्ष बुद्धीने व आस्थापूर्वक परिश्रम केले असता, ही असमता थोड्या वर्षांत बरीच दूर करता येण्यासारखी आहे. ज्या देशात ही असमता वाढत जाऊ लागली असेल, त्या देशाच्या ऱ्हासास आरंभ झाला आहे, असे समजावे. जेव्हा या असमतेची परमावधी होते, तेव्हा घनघोर राज्यक्रांती होऊन समाजचे समाज लयास जातात, धुळीस मिळतात किंवा त्यात अपूर्व स्थित्यंतरे होतात, निरंतर कष्ट साहण्यास खालच्या प्रतीचे प्राणीसुद्धा तयार असत नाहीत; तर मनुष्य कसा असेल? कष्ट साहणे म्हणजे जीविततत्त्व क्षीण करून घेणे होय आणि तसे करून घेण्यास बहुतेक मनुष्ये तयार होतील तर हळूहळू सारी मनुष्यजात नाहीशी होईल! परंतु मनुष्य अस्तित्वात आले आहेत व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे, यावरूनच त्यांच्या नाशास अनुकूल अशा कारणांपेक्षा त्यांच्या अस्तित्वास व वृद्धीस अनुकूल अशी कारणे या पृथ्वीतील परमाणुसंघात निगूढ आहेत, असे सिद्ध होते. तेव्हा काय दिसून येते की विचार करणारे, उपभोग घेणारे व काम करणारे असे जे सांप्रतकाली प्रत्येक देशात तीन ठळक वर्ग दृष्टीस पडतात, ते कायमचे नव्हेत. 

प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम हे हळूहळू समप्रमाणाने करावे लागून, साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे. जो-जो ती तशी होत जाईल तो-तो खरी उन्नती होऊ लागली, असे म्हणता येऊ लागेल. एवढे खरे आहे की, काही झाले तरी सर्वांची बुद्धी सारखी तीव्र होतील आणि पाहिजे त्या कामात पाहिजे त्याला पडता येऊन ते उत्तम रीतीने वठविता येईल, असे पूर्णपणे होण्याचा संभव फार थोडा आहे. तथापि, प्रस्तुतकाली निरनिराळ्या वर्गांतील लोकांत व स्त्री-पुरुषांत जे विलक्षण अंतर दृष्टीस पडत आहे ते पुष्कळच संकुचित करता येणार आहे आणि ज्या देशात तसे करण्याचा प्रयत्न झपाट्याने चालत राहील, तेच देश अखेरीस तगतील. सर्वत्र जो जीवनार्थ कलह मोठ्या निकराने चालला आहे, त्यात भांडता-भांडता बाकीचे नाहीसे होतील. यासाठी ज्यांना हे अस्तित्वतत्त्व स्पष्टपणे कळून आले असेल आणि ज्यांच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपापल्या देशाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने रात्रंदिवस झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असूनही जे स्तब्ध राहतील, त्यांच्या माथ्यावर देशास विपद्दशा आणल्याची आणि त्याचा नाश अपरिहार्य केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित देशबांधवहो, जर तुम्हास इतर देशांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावयाचे असेल- तुमची आज जी स्थिती आहे, तीहून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल; तर ज्या दुर्मतांनी, दुराग्रहांनी दुराचारांनी, महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारो वर्षे फडशा चालविला आहे, त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत उचित होय. या कामी तुमच्याकडून हलगर्जी झाल्यास या देशाला लवकरच जे दिवस येणार आहेत, त्यांचा नुसता विचार डोळ्यांपुढे आला तरी भय वाटल्यावाचून राहत नाही. 

इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्‌स वगैरे देशांतल्या सर्व वर्गांतील लोकांमधले व स्त्री-पुरुषांमधले संबंध कसे आहेत, हे नित्य नजरेपुढे येत असूनही जर तुम्ही आपले डोळे मिटाल आणि बालविवाहसारख्या अनेक व्याधी तुम्हांस अत्यंत पीडित असून, त्यांच्या प्रतिकारार्थ काहीच न कराल; तर तुमच्या संततीस तुमच्या मूर्खपणाबद्दल, आळसाबद्दल व अप्पलपोटेपणाबद्दल फारच त्रास सोसावा लागेल. तसे होऊ न देणे हे तुमचे कर्तव्य आहे व ते अल्पसायासाने कसे करता येईल हे सांगावे, एवढाच या लेखाचा उद्देश आहे.

- 2 –

आज जी सुधारलेली राष्ट्रे आहेत, त्यांपैकी प्रत्येकात विचार करणारे, उपभोग घेणारे व श्रम करणारे असे तीन ठळक वर्ग दृष्टीस पडत असून, ते उत्पन्न करणारी कारणे दिवसेंदिवस क्षीण होत आहेत. ती जसजसी अधिकाधिक क्षीण होत जातील तसतशी समाजस्थ असमता नाहीशी होऊन विचार, उपभोग व शरीरश्रम ह्या गोष्टी सर्वांस समप्रमाणाने कराव्या लागतील आणि तसे झाले म्हणजे समाजास खरी बळकटी व स्थिरता आली, उन्नतावस्था प्राप्त झाली असे म्हणता येईल, असे मागे सांगितले आहे. तसेच ही असमता दूर करण्याच्या खटपटीचा विशेष बोजा पहिल्या वर्गातील लोकांवर पडतो, हेही सांगितले आहे.

इंग्रजी शिक्षण मिळालेले बहुतेक सुशिक्षित लोक सामाजिक प्रश्नांविषयी विचार करू लागले आहेत आणि त्यांच्या विचारांचा परिणाम त्यांच्या आचरणावर उत्तरोत्तर होऊ लागेल, यात संशय नाही. पण अशा रीतीने जे वर्तनांतर होते, ते स्थायिक होण्याचा संभव असत नाही इतकेच नाही, तर कोणतीही गोष्ट चांगली आहे तेव्हा ती करणे जरूर आहे असे वाटून ती करू लागणे यात जे मनास शिक्षण मिळते, ते अप्रत्यक्ष रीतीने घडून येणाऱ्या वर्तनांतरापासून कधीच प्राप्त होत नाही. आसमंतातील वस्तुस्थितीच्या अधीन होऊन ती नेईल तिकडे जाणे यात कोणताही पुरुषार्थ नाही. ज्या ठिकाणी स्त्रीचा वाराही येण्याचा संभव नाही, अशा ठिकाणी ब्रह्मचर्य आचरल्याबद्दल फुशारकी मारण्यात काय हशील आहे? आपणावर अमुक प्रकारचे संकट येणार आहे असे कळून त्याच्या परिहारार्थ जाणूनबुजून उपाय योजणे, यातच मनुष्याचे मनुष्यपण आहे. लोकसंख्या वाढत जाऊन अन्नाची पंचाईत पडू लागली म्हणजे विवाहकाल सहजच लांबत जाईल, आपण होऊन तो लांबविण्याची गरज नाही. 

व्यापारधंदा, सरकारी नोकऱ्या, आगगाडीचा प्रवास इत्यादी कारणांनी जातिबंध आपल्या आपण शिथिल होऊ लागले आहेत, तेव्हा ते वाईट आहेत असे म्हणून एकमेकांस दुखविण्याची गरज नाही. सामान्य शिक्षणाचा व विशेषतः विज्ञानाचा जसजसा प्रसार होत जाईल तसतशा धर्मसंबंधी वेडेपणाच्या समजुती लयास जातील, सबब, त्यावर टीका करण्याची गरज नाही. कोणतीही सुधारणा करण्याविषयी लोकांच्या मनात दृढ इच्छा उद्भवल्याशिवाय, केवळ कायद्याच्या जुलमाने सुधारणा होऊ शकत नाही. ती इच्छा उद्भवली असता, कायदा करण्याची आवश्यकता राहत नाही, कारण मग ती लोकांचे लोकच करतात. पराधीनास बलहीनता येते व बलहीनांच्या कपाळी पराधीनता ब्रह्मदेवाने लिहिली आहे. सबब, हिंदुस्थानच्या लोकांनी राष्ट्रोन्नती करण्याचा प्रयत्न करणे शुद्ध वेडेपण होय. अशा रीतीने सामाजिक-राजकीय प्रश्नांविषयी विचार करणाऱ्या लोकांस विचारी म्हणावे किंवा नाही, याचा संशय आहे. हे असल्या विचारांनी मनुष्यात आणि इतर प्राण्यात काही अंतर नाही, असे दाखवू पाहतात! मागल्या पिढ्यांस आलेल्या संकटांची माहिती व त्यांच्या परिहारार्थ त्यांनी योजिलेल्या उपायांचे ज्ञान, त्यांच्या साह्याने म्हणजे पूर्व पिढ्यांच्या अनुभवाने भावी विपत्ती टाळण्याचा प्रयत्न मनुष्य करणार नाही, वस्तुस्थितीचा गुलाम होऊन ती वागवील तसे वागेल, तर प्राणिवर्गात त्यास प्राप्त झालेले श्रेष्ठत्व त्याच्याकडे कसे राहील, आणि सध्या जी सुखे उपभोगण्यास सापडत आहेत? तेवढ्यांचा तरी त्यास कायम उपभोग कसा लाभेल, हे सांगता येत नाही. तात्पर्य- अगदी शुष्क गोष्ट असली, तरी तिच्यासाठी बुद्धिपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. जे लोक असे करीत नाहीत, ते हळूहळू दैववादी बनून निरुद्योगी व निरुत्साह होत्साते क्षीण होत जातात आणि शेवटी समूळ नष्ट होतात. 

तस्मात्‌ सुशिक्षित बांधवहो, तुम्हास अशी प्रार्थना आहे की, वर जे म्हटले आहे ते तुम्हास मान्य असेल तर तुम्ही कालावर व वस्तुस्थितीवर अवलंबणे पुरे करून, ज्या सुधारणा तुम्हास अत्यंत आवश्यक वाटत आहेत त्या करण्याविषयी बुद्धिपूर्वक प्रयत्न करण्यास लागले पाहिजे. त्या आवश्यक सुधारणांपैकी काही अशा आहेत की, त्या वृद्ध लोकांच्या हातून होण्याचा संभव नाही. इतकेच नाही, तर त्यापैकी पुष्कळांस त्याची संमतीही मिळण्याची आशा नाही. उदाहरणार्थ- पुनर्विवाह व ऋतोत्तर कन्याप्रदान. तसेच, कित्येक तरुण सुशिक्षितांस या दोन गोष्टी व अशाच प्रकारच्या इतर गोष्टी कितीही चांगल्या वाटू लागल्या असल्या आणि त्यांची आवश्यकता भासू लागली असली, तरी त्या करण्यास प्रवृत्त होण्यास त्यांची छाती होणार नाही. सगळेच असे असतील असे आमचे म्हणणे नाही. एखाद्याचे धैर्य, निश्चय व कार्यनिष्ठा असामान्य असल्यास, तो लोकमताची किंवा अगदी जवळच्या आप्तांचीही पर्वा न करता आपल्या मनास जी गोष्ट प्रशस्त वाटली ती करण्यास प्रवृत्त होईल. पण असे लोक फार विरळा असतात. अशांची संख्या वाढेल तितकी वाढणे इष्ट आहे आणि तिच्या कमी-अधिक वाढीवर समाजाची सुधारणा शीघ्र होणे किंवा न होणे हे अवलंबून आहे. तथापि, सध्याचे जग सामान्य विचारांच्या, सामान्य धैर्याच्या व सामान्य समजुतीच्या लोकांचे झालेले आहे. वृद्ध तरुणांच्या आचार-विचारांत कालमानाने व शिक्षणभेदाने थोडाबहुत फरक होतो, पण त्यामुळे त्यात जमीन-अस्मानाचे अंतर पडत असे नाही. तसे होणे इष्टही नाही, कारण असे होऊ लागेल तर कोणत्याही घरा कोणाही सुखाचा लवलेश मिळेनासा होऊन साऱ्या समाजात अहोरात्र चलबिचल माजून राहील. कोणाचा धाक कोणावर चालणार नाही आणि सगळ्याच प्रकारच्या सुधारणांस प्रचंड व्यत्यय येईल. सुधारणा करण्याची इच्छा जशी तरुणास असते तशी वृद्धास असत नाही. समाजाच्या असलेल्या स्थितीचे संरक्षण करण्याविषयी वृद्ध लोक अत्यंत उत्कंठित असतात. त्याचे पाऊल पुढे पडावे, अशी तरुणास आकांक्षा असते. वृद्ध हे समाजनौकेचे भरताड होत, तर तरुण शिडे होत! पहिल्याशिवाय समाजात स्थिरता राहणार नाही, दुसऱ्याशिवाय त्याला गती येणार नाही; तेव्हा ज्यांच्या मनात समाजाचे कल्याण व्हावे असे असेल, ते या दोहोंची फारकत व्हावी असे कधीही चिंतणार नाहीत. दोहोंचाही उपयोग आहे व दोघांनाही आपापला कार्यभाग उरकण्याची मोकळीक पाहिजे. प्रत्येक गोष्टीत बाबाने बेट्याला आपले वळण गिरविण्यास लावणे हे जसे वाईट, तशी आपली प्रत्येक गोष्ट बाबा ऐकून घेत नाहीत म्हणून बेट्याला त्याचा विषाद येणे हेही वाईट. दोघांच्या संमतीने जेवढे चालेल तेवढे हवेच आहे. पण ज्या गोष्टीत दोघांचे ऐक्य होण्याचा संभव नसेल, त्या ज्याच्या त्यास आपल्या मनाप्रमाणे करावयास सापडल्या; तरच घरात व बाहेर शांतता-समाधान राहण्याचा संभव आहे. 

आज ज्यांचे अर्धे अधिक वय होऊन गेले आहे, वागण्याची पूर्व पद्धत ज्यांच्या अंगी खिळून जाऊन स्वभावतुल्य झाली आहे, अनेक वर्षांच्या विश्वासामुळे व तदनुसार आचरणामुळे ज्यांच्या धर्मविषयक व नीतिविषयक कल्पना वज्रलेप झाल्या आहेत, जुनाट झालेल्या झाडाप्रमाणे ज्यांची मने किंवा शरीरे वळण्याची आशा उरली नाही; अशांनी आम्ही ज्या गोष्टी पुढे सांगणार आहोत त्यात पडावे, अशी आमची इच्छा नाही आणि तुम्ही त्यात पडा, असे आम्ही त्यांस म्हणणारही नाही. जे आज अपत्यवंत आहेत, ते आपल्या अपत्यांची व्यवस्था कशीही लावोत- त्याबद्दल आम्ही कुरकुर करणार नाही. पण ज्यांच्यावर अद्यापि संसाराचा भार पडलेला नाही, ज्यांच्याकडे पितृत्वाचा अधिकार अद्यापि आलेला नाही, नवे ज्ञान संपादण्याचे व विचार कायम करण्याचे ज्यांचे वय अद्यापि गेले नाही, ज्यांच्या ईर्षेला पराभव ठाऊक नाही, ज्यांची हिंमत कशानेही खचलेली नाही- जगाच्या दुःखमय अनुभवामुळे ज्यांच्या अंतकरणात अनौदार्य, संशय, परदुःखपराङ्‌मुखता आणि परहितौदासीन्य यांचा प्रादुर्भाव झाला नाही, अशा विद्यालयीन व इतरस्थ तरुण सुशिक्षितांनी आम्ही जी कल्पना सुचवीत आहोत तिचा विचार करून ती अमलात आणण्याविषयी मंडळी स्थापावी, अशी आमची त्यांस प्रार्थना आहे.

आम्हामधील बालविवाहाची चाल इतर सर्व वाईट चालींपेक्षा आम्हास विशेष विघातक होत आहे, हे अलीकडे सर्व समंजस लोकांस कबूल झाले असून, ती बंद व्हावी अशी इच्छा बरीच पसरली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. पण ती बंद करण्याचा उपाय मात्र आमच्याकडून झाला नाही तो करण्याचे काम अनपत्यवान तरुण सुशिक्षित लोक जोपर्यंत आपल्या अंगावर घेणार नाहीत, तोपर्यंत त्याची योजना मनापासून कोणीही करणार नाही, असे आम्हास वाटते. ही गोष्ट तरुणांनी मनावर घेतली असता आजपासून पंचवीस वर्षांच्या आत हा रोग येथे कधी होता किंवा नव्हता, अशा रीतीने त्याची त्यास वाट लावता येईल. तेव्हा असा हा रामबाण असावा तरी काय, हे जाणण्याची वाचकांस मोठी उत्कंठा झाली असेल यात संशय नाही; पण स्थलसंकोचामुळे ती आज पुरविता येत नाही, हे पाहून फार दिलगिरी वाटते. तथापि, ज्यांनी इतके दिवस दम काढला, त्यांना आणखी आठ दिवस तो सहज काढता येईल, असे समजून फार खेद न करता सध्या रजा घेतो.

- 3 –

तरुण सुशिक्षितांनी जो विषय आपल्या हाती घ्यावा म्हणून आज आम्ही प्रत्यक्षपणे सुचविणार आहोत, त्याची गेल्या दोन लेखांत जितकी प्रस्तावना करावयाला पाहिजे होती तितकी केली आहे. आज आम्हास ज्या सुधारणा करणे आवश्यक आहे त्यांपैकी बहुतेक जुन्या पिढीच्या लोकांकडून होण्यासारख्या का नाहीत याचे दिग्दर्शन मागे केले आहे, ते वाचकांच्या स्मरणात असेलच. या घटकेस हिंदुस्थानात नव्या व जुन्या कल्पनांचा ज्या प्रकारचा झगडा सुरू आहे, तसा येथे पूर्वी कधीही झाला नसेल. आजपर्यंत हिंदुस्थानावर ज्यांनी स्वाऱ्या केल्या किंवा येथे आपली राज्ये स्थापिली, त्यांच्या आणि आम्हा एतद्देशीय हिंदूंच्या राजकीय व सामाजिक विचारांत विशेष अंतर नसल्यामुळे हिंदूंनी आपल्याला जिंकणारांपासून अवश्य शिकले पाहिजे असे विशेष काही नव्हते. किंबहुना, हिंदू लोकांपाशीच आपल्या परकी राज्यकर्त्यांस शिकविण्यासारख्या काही गोष्टी होत्या. यामुळे आजपर्यंत ज्यांनी हिंदुस्थानास जिंकून त्यात आपली सत्ता स्थापिली, त्यांनी हिंदूंचा शारीरिक किंवा बाह्य पराभव केला इतकेच म्हटले पाहिजे. पण इंग्रजांनी आम्हावर जे राज्य स्थापिले आहे, त्याची गोष्ट अगदी निराळी आहे. या राज्यामुळे आमच्या स्थितीत पराकाष्ठेचा बदल होत आहे. प्रथम-प्रथम या स्थित्यंतराचे स्वरूप आमच्या लक्षात बरोबर आले नाही. पण अलीकडे पाच-पंचवीस वर्षांत पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून जेवढे म्हणून त्याच्या पाशात सापडले आहेत, त्यांची स्थिती विलक्षण होऊन गेली आहे आणि उत्तरोत्तर या शिक्षणाचा परिणाम बहुतेकांवर होणार, हे स्पष्ट दिसत आहे. पुष्कळांचे असे म्हणणे आहे की, पाश्चिमात्य शिक्षण फार थोड्यांस प्राप्त झाले असल्यामुळे, त्याने हिंदू लोकांच्या स्थितीत विशेष फेरफार झाला आहे, असे म्हणता येणार नाही.

पण आमच्या मते, असे समजणाऱ्यांची चूक आहे. केवळ शाळांच्या द्वारे पाश्चिमात्य विचारांचा प्रसार होऊन त्यामुळे आमचे जे स्थित्यंतर होत आहे तेवढ्याचाच विचार केला तर- ते विशेष विस्तृत नाही, हे कबूल करावे लागेल. पण शाळांशिवाय ज्या दुसऱ्या अनेक द्वारांनी हिंदू समाजातील प्रत्येक वर्गातल्या लोकांवर परिणाम घडत आहेत, त्यांचा नीट विचार केला तर असे दिसून येईल की- ज्याच्या आचारात व विचारात पाश्चिमात्य कल्पनांनी थोडाबहुत तरी फेरफार झाला नाही, असा एक वर्गही नाही. शाळा खात्याशिवाय इतर खात्यांचा संबंध प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गातील वयात आलेल्या मनुष्यांशी येऊन पोचत आहे आणि तदनुषंगाने त्यास आपल्या वागणुकीत प्रतिदिवशी कमी-अधिक फेरफार करावा लागत आहे. मोजणी खाते, जमीनजमाबंदी खाते, न्याय खाते, पब्लिक वर्क्स खाते, वैद्यक खाते, लष्करी खाते, सॅनिटरी खाते, अबकारी खाते इत्यादिकांनी आमच्या इकडील शेतकऱ्यांवर, कारागिरांवर, व्यापाऱ्यांवर, सावकारांवर, वाण्याउदम्यांवर व सामान्य मजुरांवर केवढे परिणाम घडत आहेत! 

या खात्यांशी लोकांचा जो व्यवहार होतो, तो सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच व्हावा लागतो. त्यामुळे त्या नियमांचे वळण त्यास नकळत लागत चालले आहे आणि ते नकळत लागत आहे म्हणून मुळीच लागत नाही असे म्हणणे बरोबर नाही. याशिवाय तारायंत्र, आगगाडी, पोस्टखाते, सेव्हिंग्ज बँक्स, पोस्टल बँक्स, वगैरे ज्या गोष्टी सरकारने किंवा खासगी मंडळ्यांनी व्यापाऱ्यांच्या सोईसाठी व इतर सोईसाठी स्थापिल्या आहेत; त्यांचा लोकांच्या धर्मविचारावर, नीतिविचारावर व नित्याचरणावर केवढा परिणाम होत आहे याचा जो लक्षपूर्वक विचार करील त्याला- आणखी शे-पन्नास वर्षे असाच क्रम चालला तर हिंदुस्थानच्या पहिल्या स्थितीचा मागमूस नाहीसा होण्याइतके त्याचे स्थित्यंतर होणार आहे, असे कबूल करावे लागेल. तात्पर्य काय की- जिकडे पाहावे तिकडे पाश्चिमात्य कल्पनांनी व आचारांनी आम्हास वेढल्यासारखे झाले आहे आणि त्यांच्या पेचातून आम्हास निसटून जाता येईल, असे वाटत नाही. पण निसटून जाण्याचा प्रयत्न करण्याची काय गरज आहे? ज्या युरोपीय कल्पनांचा प्रघात इकडे पडत आहे, त्यांपैकी जेवढ्या अहितकारक असतील तेवढ्या वर्ज्य करून बाकीच्यांचा अंगीकार करण्यास काय हरकत आहे? दुसऱ्या विषयाविषयी लिहीत असता असे दाखविले आहे की- युरोपात आज जी सुधारणा दृष्टीस पडत आहे, ती मागील अनेक सुधारणांचे सार आहे आणि ज्या राष्ट्रांस जीवनार्थकलहात टिकावयाचे असेल, त्यांना त्या सुधारणेचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे खरे असेल, तर ती सुधारणा आपल्या घरी चालून आली असून आपण तिचा निषेध करणे, म्हणजे आपल्या हाताने जाणूनबुजून आपले नुकसान करून घेण्यासारखे होय. निदान आमची तरी अशी समजूत आहे की- इंग्रजांच्या राज्यामुळे ज्या गोष्टी येथे प्रस्थापित झाल्या आहेत व होऊ पाहात आहेत, त्यांपैकी बहुतेक स्वीकरणीय व अनुकरणीय आहेत. सबब, त्यांचा येथे जो आपोआप प्रसार होत आहे त्यास विरुद्ध जाणे हे तर इष्ट नाहीच; पण ज्यांना त्यांचे चांगुलपण समजण्यासारखे शिक्षण मिळाले आहे, त्यांनी बुद्धिपुरस्सर त्यांचा स्वीकार व प्रसार केला पाहिजे. असे केले तरच त्या लवकर मूळ धरतील आणि त्यांच्या फलाचा लाभ थोड्या वर्षांत आम्हास होऊ लागून जीवनार्थकलहात हार न जाण्याची आशा आम्हास करता येऊ लागेल. हे बुद्धिपुरःस्सर सुधारणा करण्याचे काम तरुण सुशिक्षितांशिवाय इतरांच्याने होण्यासारखे नाही, म्हणून इतका वेळ त्यांची विनवणी चालविली आहे.

तरूण सुशिक्षित मित्रहो, ‘शरीर धड तर मन धड’  (A sound mind in a sound body) अशी जी इंग्रजी भाषेत सुप्रसिद्ध म्हण आहे, ती तुम्हा सर्वांच्या ऐकण्यात आलीच असेल. ज्याप्रमाणे जोरदार वृक्ष निपजण्यास मूळ अंकुर जोरदार पाहिजे; त्याप्रमाणे देशात सुदृढ़ स्त्री-पुरुष निपजण्यास सुदृढ मुले होण्यास वैद्यक शास्त्रात जो खऱ्या विवाहाचा काल सांगितला, त्याचे कोणाकडूनही उल्लंघन होता कामा नये. या कालाचे उल्लंघन आम्हाकडून अनेक वर्षे होत असल्यामुळे आमची प्रजा क्षीण, अल्पायुषी, श्रम करण्यास नादान, उत्साहशून्य व भेकड अशी होत आहे. आमच्या शरीरसामर्थ्याचा लोप होत असल्यामुळे आमचे मानसिक सामर्थ्यही नाहीसे होत आहे. याशिवाय बालविवाहापासून आम्हावर जी इतर अरिष्टे गुदरत आहेत, त्यांचा येथे अगदी अल्प उल्लेख करण्यासही जागा नाही. बालविवाह बंद झाल्यास, आज प्रत्येक घरी ज्या एक-दोन हतभाग्य बालविधवा दृष्टीस पडतात, त्या दृष्टीस पडेनाशा होतील. पुरुषांच्या अंगी अधिक पौरुष दृष्टीस पडू लागेल, तरुणांस अधिक उद्योग करण्याची हिंमत येईल आणि धाडसाची कामे अंगावर घेण्याची छाती होऊ लागेल. ज्याला त्याला आपापल्या मनाप्रमाणे आपली बायको पसंत करण्याची सवड मिळू लागल्यामुळे स्त्री-पुरुषांच्या सुखाची वृद्धी होऊन संसारयात्रा अधिक रमणीय होईल. विवाहापूर्वी मुलींस ज्ञान संपादण्यास अधिक फुरसत मिळाल्यामुळे पुढे त्यांच्याकडून अपत्यसंवर्धनाचे व प्रपंच चालविण्याचे काम चांगल्या रीतीने होऊ लागेल. पण हे सर्व होण्यास बालविवाहाची चाल बंद झाली पाहिजे. ती बंद होणे किंवा न होणे सर्वथैव तुमच्याहाती आहे.

या कामासाठी सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी, अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील- त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे-मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही, अशा शपथा घ्याव्यात. जर अशा मंडळींस खरोखरीच काही सुधारणा व्हावी अशी उत्कट इच्छा असेल, तर मुलीचे लग्न बारा वर्षे झाल्यावर व मुलाचे लग्न अठरा वर्षे झाल्यावर करावयाचे, असा निर्बंध कायद्याने करून घेतला पाहिजे. जो अशा मंडळीचा सभासद झाला, त्याने तीत नवे तरुण आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. असा क्रम काही वर्षे चालला, तर बालविवाह निषेधक मंडळीच्या सभासदांची संख्या दोन हजारांवर सहज जाईल आणि इतकी मंडळी सामान्य उद्देशाने एका कामाशी निगडित झाली म्हणजे तिला दुसऱ्या सुधारणाही झपाट्याने करता येतील.

 प्रत्येक सभासदाने वर्षाची रुपया- दीड रुपया वर्गणी देण्यास तयार झाले पाहिजे. या वर्गणीपासून जो फंड उभारला जाईल, त्याच्या मदतीने अनेक आवश्यक व उपयुक्त गोष्टी करता येतील. अलीकडे पाच-चार ठिकाणी अशा प्रकारच्या मंडळ्या स्थापित झाल्या आहेत. अशा प्रकारची मंडळी स्थापावयाची झाली म्हणजे काय काय करावे लागते, अशाविषयी राजे सर टी.माधवरावांसारख्यांनी पुष्कळ शोध करून टिप्पणी प्रसिद्ध केली आहेत. तेव्हा अशा मंडळांचे नियम वगैरे कसे असावेत, याविषयी येथे विशेष लिहिण्याची गरज नाही. अगोदर अशी मंडळी स्थापण्याविषयी व कायदेशीर बंधने करून घेण्याविषयी काहींचा निर्धार झाला पाहिजे. तो एकदा झाला, म्हणजे पुढचा मार्ग सोपा आहे. 

आम्हास अशी आशा आहे की, कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी हे काम आपल्या हाती घेतल्यास त्यास ताबडतोब यश येणार आहे. ज्यांच्या अंगी विचारशक्ती आणि उत्साह यांचा संगम झालेला असतो, त्यांना कोणतीही सुधारणा करण्यास अवघड जात नाही. सबब, येथील डेक्कन कॉलेजातील, फर्ग्युसन कॉलेजातील, सायन्स कॉलेजातील व त्याप्रमाणेच मुंबई येथील एल्फिन्स्टन, फ्री चर्च वगैरे सर्व कॉलेजांतील सुशिक्षित, सुजाण, सुविचार व प्रौढ विद्यार्थ्यांस आमची अशी विनंती आहे की- त्यांनी या स्वहितकर व राष्ट्रहितकर कार्यात पुढारीपण घ्यावे. पुढील देशस्थिती त्यांच्या हाती आहे. वरील विद्यालय सध्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कामास आरंभ केल्यास, त्यांच्या पाठीमागून त्यांच्या जागी येणारे विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतील; एवढेच नाही, तर कॉलेजातील विद्यार्थी अशा कामात पडल्यास त्याचा परिणाम शाळांतील प्रौढ मुलांवरही होऊ लागेल. या रीतीने धाग्याशी धागा लागून अल्पकाळात सुंदर सुधारणापट तयार होईल आणि ज्यांना तो वापरण्यास सापडेल, त्यांची अनेक प्रकारची आपदा नाहीशी होईल, इतकेच नाही, तर त्यास अननुभूतपूर्व अशा अनेक संसारसुखांचा उपभोग मिळू लागेल.
 

Tags: GopalGaneshAgarkar गोपाळ आगरकर gopalagarkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोपाळ गणेश आगरकर

महाराष्ट्रातील समाजसुधारक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके