डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपलं मूल यात नाही ना? - प्रश्न आणि प्रश्न - जागतिकीकरण आणि भारत

नव्याने प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी पुस्तकांचा रसीला परिचय करून देणारे हे नवे सदर महिन्यातून एकदा प्रकाशित होईल.

घरात लहान बाळाचे आगमन ही गोष्ट फार आनंदाची, कृतार्थतेची, साफल्याची असते, पण त्याचबरोबर ती गोष्ट एका फार मोठ्या जबाबदारीची, कर्तव्याची, अशीसुद्धा असते. कारण त्या चिमुकल्या बाळाचे रूपांतर पालकांना आणि समाजाला एका सुजाण, समंजस, संवेदनशील, शहाण्या माणसात करायचे असते. जेव्हा हे मूल मोठे होईल तेव्हा त्याचे व्यक्तिमत्त्व काय असेल हे सांगणे फार कठीण असते. कारण प्रत्येक मूल जन्माच्यावेळी आपल्याबरोबर एक जनुकीय नकाशा घेऊन आलेले असते. आणि याचबरोबर त्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडून, घराकडून, शाळेकडून आणि एकूण समाजाकडून असंख्य अनुभव मिळत जातात. जनुकीय नकाशा आणि हे अनुभव यांच्या संयोगातून मुलाचे व्यक्तिमत्त्व बनत जाते. हे व्यक्तिमत्त्व सुंदर, सृजनशील आणि संवेदनशील असावे, अशी साऱ्यांची धडपड असते. पण कधीकधी या धडपडीची दिशा चुकते आणि मग हसरे, आनंदी, खेळकर मूल मनोविकारांची शिकार बनते. डॉ.मनोज भाटवडेकरांचं 'आपलं मूल यात नाही ना?' हे पुस्तक अशा मनोविकारग्रस्तांच्या तीसेक केसेस सादर करते.

हे पुस्तक वाचताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की यात बहुतांशी केसेसमध्ये पालक समस्याग्रस्त आहेत. (त्यात शिक्षकही आहेत) आणि त्यांच्या समस्येचा बळी झाली आहेत ती त्यांची मुलं. प्रेम, शिस्त आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टींमधून मुलाच्या मनाचा विकास होत असतो. पण अतिरिक्त हाल, अतिरिक्त शिस्त, अतिरिक्त चिंता, अतिरिक्त महत्त्वाकांक्षा, अतिरिक्त भीती हे दुर्गुण पालकांमध्ये असतील तर त्याचे दुष्परिणाम मुलावर कसे होतात ते हे पुस्तक वाचताना पानोपानी आढळून येते. शिवाय नवरा-बायकोमध्ये प्रेम, सुसंवाद नसणं, घरामध्ये दारूसारखं व्यसन असणं अशा घटनांमुळे मुलाचं व्यक्तिमत्त्व उद्ध्वस्त होऊ शकतं. आणखी काही भयानक घटना डॉक्टरांनी इथे मांडल्या आहेत. त्या म्हणजे मुलांवरचे लैंगिक अत्याचार, तसेच मुलांमधील डावरेपणा, आकडी येणे, हिस्टेरिया, तोतरेपणा, मतिमंदपणा, वाचन लेखन अक्षमता अशा मुलांमधील जैविक समस्यांबद्दलच्या केसेसही मांडल्या आहेत.

या पुस्तकाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व गोष्टी त्यांनी केसेसच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. त्यामुळे त्या मनोरंजक आणि जास्त उद्बोधक झाल्या आहेत. दुसरं म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यामुळे या सर्व मनोविकारग्रस्त मुलांना फायदा झालेला आहे. त्यामुळे मुलांमधील मनोविकार ही दडवून ठेवण्यासारखी गोष्ट नसून डॉक्टरकडे जाऊन इलाज करून घेण्याची गोष्ट आहे, हा दिलासा या पुस्तकातून मिळतो. अंगारे-धुपारे, देव देवस्की, अर्धवट उपचार यातून उलट मुलाचं नुकसान होतं हे समजून येतं.

या पुस्तकाचा दुसरा भाग ‘बालक- पालक मार्गदर्शन-एक ओळख’ हा आहे. मुलांच्या मानसिक समस्यांचे निदान, त्यांचे उपचार अशा केंद्रात कशा पद्धतीने होतात त्याची ओळख या भागातून वाचकांना होईल. डॉ.भाटवडेकर हे स्वतः लोकमान्य सेवासंघ, विलेपार्ले येथील अशा केंद्रात गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. या पुस्तकाच्या शेवटी मुलांच्या वेगवेगळ्या मानसिक समस्यांची यादी दिली आहे. ज्याचं शास्त्रीय पद्धतीने निदान आणि त्यांवरील उपचार करणं शक्य आहे.

डॉ. मनोज भाटवडेकर यांचं हे दुसरं पुस्तक. 'आपली मुलं आणि आपण' हे पहिलं पुस्तक. अशी पुस्तकं पालकांना विशेषतः संभ्रमित पालकांना एक दिशा दाखवू शकतील, म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी अशी पुस्तकं वाचणं हे फार गरजेचं आहे.

आपले मूल यात नाही ना? 
लेखक : डॉ. मनोज भाटवडेकर 
अक्षर प्रकाशन

----

प्रश्न आणि प्रश्न…

अनिल अवचट हे नाव मराठी वाचकांना आता चांगलेच परिचयाचे झाले आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून या आपल्या समाजात अस्तित्वात असणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत ते सातत्याने लिहीत आहेत. 'प्रश्न आणि प्रश्न' हे त्यांचे नवे पुस्तक. यात आठ लेख आहेत. 'कचरायात्रा' या एक्काण्णव सालच्या लेखापासून ते 1999 पर्यंतच्या लेखांचे हे संकलन आहे.

अवचटांची एक स्वतःची अशी शैली आहे. ज्या प्रश्नाबाबत ते लिहितात त्या प्रश्नाचा अनेक अंगांनी ते वेध घेतात. त्या त्या क्षेत्रातील माणसांशी बोलतात. सामान्य माणसाला कुठल्याही प्रश्नाबाबत एक ढोबळ माहिती असते. अगदी चाणाक्ष गणल्या गेलेल्या माणसालासुद्धा थोडीशी आकडेवारी माहीत असते. पण त्या आकडेवारी पलीकडे किती मोठे वास्तव आहे आणि बऱ्याचदा हे वास्तव या तथाकथित आकडेवारीला कसं छेद देतं, हे या लेखांतून समजून येतं. उदा. यातील पहिलाच लेख 'पाणी आणि जमीन' घ्या. महाराष्ट्रात पाऊस कमी कमी होतोय हे आपले निरीक्षण असतं. पिण्याच्या पाण्यावरून या शतकात युद्ध होतील, हेसुद्धा आपण कुठेतरी वाचलेलं असतं! ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ही सरकारी घोषणा आपल्या परिचयाची असते. पण अवचट आपणाला या प्रश्नाच्या अनेक बाजू दाखवून देतात. या क्षेत्रातील अनेक माणसांना भेटवतात. अवचटांच्या लेखामुळे या प्रश्नाची एक समृद्ध आणि सखोल जाण आपणाला येते. शिवाय धोंडेसर आणि टाकळकर यांनी विकसित केलेली अत्यंत कमी खर्चाची डोंगराला समान रेषेत चर खोदून पाणी अडवण्याची पद्धत किती उपयुक्त आहे हे समजून येते. (आणि आपण शेकडो अब्ज रुपयांची धरणं बांधतो म्हणजे काय करतो हेही लक्षात येते.)

या पुस्तकातील इतर लेखांबाबतसुद्धा हेच म्हणता येईल. 'पठार आणि खाणी' या लेखात बाचुळकर सरांनी 'इंडाल' या कंपनीविरुद्ध केलेल्या लढ्याची गोष्ट आहे. पठारावर काहीही उगवत नाही हा मुद्दा घेऊन कोल्हापूरनजीकच्या टेकड्यांवर ‘इंडाल’ने बॉक्साईटसाठी खाणी खोदल्या होत्या, तर बाचुरकर सरांचे म्हणणे असे की, पठारावर अनेक वनस्पती सापडतात आणि त्या जर नष्ट झाल्या तर प्राण्यांची अन्नसाखळी सरते. ह्या एका साध्या माणसाने चार मित्रांच्या सहकार्याने हा विषय लावून धरला आहे.

पंचगंगा हा लेख कोल्हापुरातल्या ‘पंचगंगा’ नदीतल्या प्रदूषणाबद्दल आहे. आपण भारतीय लोक आपल्या पर्यावरणाबद्दल इतके निष्काळजी आहोत की या लेखातील तपशील थोड्याफार फरकाने भारतातील मोठ्या शहराजवळून वाहणाऱ्या कोणत्याही नदीस लागू पडतील.

‘मच्छिमार आणि समुद्र’ हा कोकणातील मासेमारीबद्दलचा प्रदीर्घ लेख आहे. अगदी छोट्या होड्यांपासून मोठमोठे ट्रॉलर घेऊन मच्छिमारी करणारे अनेक लोक या लेखात भेटतात. त्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यांचे हितसंबंध एकमेकांविरुद्ध आहेत. शिवाय ‘जागतिकीकरण’ या गोंडस नावाखाली येणारा शार्क मासाही इथे भेटतो.

पुणे शहर वेगाने वाढतंय आणि तसाच तिथला कचराही. या कचरा समस्येचं तपशीलवार स्वरूप ‘कचरायात्रा’ मध्ये दिसतं.

'तेंदू पानांचा प्रश्न' मध्ये तेंदू तोडणाच्या गरीब समूहांविषयी माहिती मिळते तर ‘बस्तरचे अरण्यरुदन’ मध्ये बस्तर या एकेकाळी गर्द जंगलाने भरलेल्या प्रदेशाचं कसं झपाट्याने भकासीकरण होत चाललंय हे मांडलं जातं.

शेवटचा लेख आहे बलुतेदारी. आपण समजतो की आज बलुतेदारी ही प्रथा पूर्णपणे संपून गेलीय. पण अवचट दाखवून देतात की अजूनही खेड्यात बलुतेदारी आहे आणि वास्तवाचे भीषण चटके त्या बलुतेदारांना बसत आहेत.

अनिल अवचटांच्या लेखनाचं सर्वात मोठं वैशिष्टय म्हणजे त्यांनी घेतलेली सांस्कृतिक आणि सामाजिक जागल्याची भूमिका. ज्या मध्यमवर्गाला उद्देशून हे लिखाण केलेलं आहे तो मध्यम वर्ग सुखवादी आणि आत्ममश्गुल असतो. त्यातील बहुसंख्य माणसे असंवेदनाशील असतात. जी संवेदनशील असतात ती किशोरी-गंगूबाई-भीमसेन-जसराज यांचं शास्त्रीय संगीत ऐकणं, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणं, सह्याद्री-हिमालयात ट्रेकिंग करणे आणि मिहान कुंदेरा-गॅब्रिएल गार्सियो मार्खेज (हे नाव घेतानासुद्धा किती ग्रेट वाटतं नै...) वाचणं यात आपण आपल्या संवेदनशीलतेची उच्चतम पायरी गाठली असं मानतात. या वर्गाला खडबडून जागं करण्याचे काम अवचट सतत करत आहेत (कारण संवेदनशीलतेचा दावा करायचा तर ह्या वास्तवाला नाकारता येत नाही.) आणखी एक मुद्दा. हा लेखसंग्रह वाचताना एक जाणीव अशी होते की अनेक छोटी-मोठी चक्रं गरागरा फिरताहेत आणि एकमेकाला खरवडून काढताहेत. अर्थात सगळ्यांत मोठं चक्र सगळ्यांत लहान चक्राला जास्तीत जास्त खरवडून काढतंय.

शेवटी महात्मा गांधींच्या वचनाची आठवण होते- 'ही पृथ्वी एवढी विपुल आहे की ती प्रत्येकाची ‘नीड’ (गरज) भागवू शकेल पण प्रत्येकाची ‘ग्रीड’ (हावरेपणा- चंगळ) भागवू शकणार नाही!

'प्रश्न आणि प्रश्न' : अनिल अवचट,
मौज प्रकाशन गृह, मुंबई.
पाने 226.

----

जागतिकीकरण आणि भारत

1999 साली केंद्रामध्ये नरसिंह राव यांचे काँग्रेस सरकार आले. या सरकारचे अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या नावांनी हे नवे आर्थिक धोरण ओळखले जाते. त्यापूर्वीचे पंडित नेहरूंचे आर्थिक नियोजनाचे धोरण सोडून देण्यात आले. वस्तू आणि भांडवल यांच्या आयातीस मुक्त वाव, शासकीय उद्योगांचे खासगीकरण आणि मुक्त बाजारपेठ ही या नव्या धोरणाची मुक्त तत्त्वे होती.

त्या वेळी समाजातील उच्चभ्रू वर्गाकडून आणि वर्तमानपत्रीय विचारवंतांकडून या धोरणाची फार मोठी तारीफ करण्यात आली होती. पण या धोरणाची विषारी फळे आज सर्व मध्यमवर्ग आणि कष्टकरी वर्गाला चाखायला लागत आहेत. या धोरणाची सांगोपांग चिकित्सा करणारं हे पुस्तक आहे. एकूण नऊ प्रकरणांतून या नव्या आर्थिक धोरणांचं भयावह चित्र त्यांनी उभं केले आहे. 'विसाव्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था' या पहिल्या प्रकरणात या आर्थिक धोरणाची पार्श्वभूमी सांगितली आहे. 'बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय उद्योग' या प्रकरणात भारत कोणत्या परिस्थितीत जागतिक बँकेला शरण गेला, याचा ऊहापोह केला आहे. 'कष्टकरी वर्गाची परिस्थिती' या प्रकरणात या नव्या आर्थिक धोरणामुळे शहरी कामगार, स्त्रिया, आदिवासी, शेतकरी, दलित कामगार या सर्व ‘नाही रे’ वर्गाला कसा फटका बसणार आहे, त्यांना अधिकाधिक दारिद्र्याकडे कसे ढकलले जाणार आहे. तसेच पर्यावरणाचा नाश, हाही या धोरणाचाच कसा परिणाम आहे हे सविस्तर दाखवले आहे.

‘जागतिक व्यापारसंघटना आणि अविकसित राष्ट्रे’ आणि ‘जागतिक वित्तीय बाजारपेठ’ ही प्रकरणे या धोरणाची व्यापारी आणि वित्तीय बाजू समजून सांगतात, या नव्या धोरणाचे आपल्या टीव्ही, वर्तमानपत्रे यांवर झालेले परिणाम आपण दररोज अनुभवत असतोच. जाहिरातींचा भडिमार, सस्ती करमणूक, हिंसाचार आणि लैंगिकता हे आजच्या प्रसारमाध्यमांचे स्वरूप आहे. मात्र या सुट्या सुट्या चित्रांमागे एक सर्वंकष अशी यंत्रणा आहे हे आपणाला 'प्रसारमाध्यमांचे जागतिकीकरण आणि त्यांचे सामाजिक परिणाम' या प्रकरणातून कळते.

शासकीय उद्योगांचे खासगीकरण हा या धोरणाचा महत्त्वाचा पैलू आहे. जितक्या जास्त उद्योगधंद्यांवर शासनाची मालकी असते, तितके ते शासन जास्त शक्तिमान असते आणि तितक्या प्रमाणात ते बहुराष्ट्रीय कंपन्यांना रोखू शकते. खासगीकरणाने शासनाचे पंख कापून त्याला दुर्बळ बनवले जाते. मग बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपले हातपाय पसरायला सोपे जाते. मग त्यातूनच सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढत जाते. गरिबांच्या गरिबीत आणखी भर पडते आणि पर्यावरणाचा विनाश होतो. या षडयंत्राचे धागेदोरे 'जागतिकीकरण आणि शासन या प्रकरणात नीट उकललेले आहेत. 'अमेरिकेचा साम्राज्यवाद' हे या पुस्तकातील महत्त्वाचे प्रकरण आहे. आज जगावर अमेरिकेची आर्थिक आणि सांस्कृतिक सत्ता आहे. बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या या अमेरिकन आहेत. त्यांनी भारतातील अनेक कंपन्या भारतीय भांडवल वापरूनच गिळंकृत केल्या आहेत. अमेरिकेने 'न्याय्य युद्ध आणि हस्तक्षेप' करून आपल्या फायद्याच्या धोरणाविरुद्ध जाणाऱ्या चिनी, कोलंबिया, क्यूबा, इराक तसेच इटाली आणि इंग्लंड या राष्ट्रांना कसे गप्प केले याचा वृत्तांत या प्रकरणात येतो; आणि जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट्राचा आणि आपल्याकडील काही बुद्धिवंतांना आणि उच्चभ्रू लोकांना पृथ्वीवरील नंदनवन वाटणाच्या देशाचा हिडीस चेहरा पुढे येतो.

शेवटच्या प्रकरणात जागतिकीकरणास कुठे कुठे आणि कसा विरोध होता हे सांगितले आहे. जागतिकीकरणाच्या जात्यात आज सर्व जग भरडले जात आहे. त्याचे भयानक दुष्परिणाम आपण सारेजण भोगत आहोत. अशावेळी अत्यंत सुबोध भाषेत, साधार आकडेवारीनिशी मांडलेल्या या पुस्तकाचे मोल फार मोठे आहे. या जागतिकीरणाला सर्वांनी विरोध करणे आवश्यक आहे. या विरोधाची सर्वस्पर्शी आणि सखोल मनोभूमिका तयार करणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे.

‘जागतिकीकरण आणि भारत'
लेखिका : नलिनी पंडित
लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई.
किंमत 120 रुपये, पाने  137.

Tags: ‘जागतिकीकरण आणि भारत’- लेखिका नलिनी पंडित लोकवांङ्मय प्रकाशन गोपाळ आजगावकर Gopal Aajgaonkar Lokwangmay Publication ‘Globlaization & India’- writer- Nalini Pandit Mouj Pablication Anil Avchat- Prashna aani Prashna मौज प्रकाशन गृह अनिल अवचट- प्रश्न आणि प्रश्न आरोग्य साहित्य नवे पुस्तक अक्षर प्रकाशन डॉ. मनोज भाटवडेकर- ‘आपलं मूल यात नाही ना?’ गोपाळ आजगावकर Dr. Manoj Bhatvadekar- ‘Aapla mul yat nahi na?’ Akshar publication Gopal Ajgaonkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके