डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जागतिकीकरण : परिणाम आणि पर्याय - गार्गी अजून जिवंत आहे - गांधी : परंपरा आणि परिवर्तन

हे सर्व लेख सामान्य वाचकांसाठी लिहिलेले आहेत. जागतिकीकरणाचा फटका आज एखाद्या दुर्गम पाड्यात राहणाऱ्या आदिवासीला किंवा खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळ्यालाही बसतो आहे. अशा वेगवेगळ्या जनसमूहांचे प्रश्न या पुस्तकात मांडलेले आहेत. दहा वर्षांपूर्वी जागतिकीकरणाचे समर्थन करणाऱ्यांत अनेक बुद्धिवंत, संपादक-कम-विचारवंत होते. आज त्यांनाही जागतिकीकरणाचा खरा चेहरा कळू लागला आहे. जागतिकीकरणाबद्दल खऱ्या अर्थाने प्रशिक्षण करणारे हे पुस्तक आहे.

जागतिकीकरण - परिणाम आणि पर्याय

1991 पासून नवीन आर्थिक धोरण देशाने स्वीकारले. या आर्थिक धोरणाचे परिणाम आता जास्त जास्त स्पष्ट होऊ लागले आहेत. मध्यम वर्गातील लाखो लोक आज सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसले आहेत; आणि गरीब वर्गाची परिस्थिती तर अत्यंत हलाखीची झाली आहे. मात्र त्याचवेळी हे नवीन आर्थिक धोरण आहे तरी काय, आणि त्याच्याशी माझा संबंध नेमका कुठे आणि कसा येतो हे सामान्य माणसाला कळेनासे झाले आहे.

गजानन खातू यांनी या धोरणाचे विपरित परिणाम कसेकसे होत आहेत, हे तपशीलवारपणाने दाखवून दिले आहे. जागतिकीकरणाची वस्तुस्थिती, जागतिकीकरणाचे बळी आणि जागतिकीकरणाचे पर्याय असे या पुस्तकाचे तीन भाग पाडलेले आहेत. अगदी पहिल्या प्रकरणात लोकांचा गोंधळ कोणता होतो, यावर खातूंनी नेमके बोट ठेवले आहे. ते म्हणतात, 'या गोंधळाचे एक प्रमुख कारण म्हणजे अर्थव्यवहारातील कालबाह्य रचनेतील बदल, तंत्रज्ञानातील बदल, संगणक क्रांती आणि जागतिकीकरण या चार वेगवेगळ्या बाबींची आपण सरमिसळ करतो. त्यांच्यात परस्परसंबंध आहे. पण अनेकदा जागतिकीकरणाबद्दल बोलताना आपण अन्य तीन बाबींमधील कशावर तरी बोलत असतो. दुसऱ्या प्रकरणात 'जागतिकीकरण म्हणजे काय?', याची माहिती देताना ट्रिम्स, ट्रिप्स, गॅटस्, मार्ड या करारांची चर्चा केली आहे. आपल्या देशातील उच्च जीवनमान टिकविणे आणि बेकारी नष्ट करणे या दोन गोष्टींसाठी अतिप्रगत राष्ट्रांना नव्या बाजारपेठा हव्या होत्या. त्या बाजारपेठांमध्ये ओतण्यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त भांडवल होते. यातून ‘गॅट' कराराचा उगम झाला. यातूनच गव्हा-तांदळाचे पीठ, किसलेले खोबरे, दूध, बटाटा वेफर्स, खारवलेले बोंबील, मीठ अशा अनेक पदार्थांची मुक्त आयात सुरू होणार आहे. त्यातून लक्षावधी कुटुंबे बेकार होतील. ही नुसती झलक आहे, शेतीमालाच्या एकूण 34 गोष्टींना आता मुक्त आयातीची परवानगी आहे.

‘जागतिकीकरणाचे बळी’ हा या पुस्तकात दुसरा विभाग आहे. ज्या जनसमूहांना जागतिकीकरणाचा फटका बसला आहे, त्यांचे प्रश्न इथे मांडलेले आहेत. आज कोळी समाजासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. कोळंबी प्रकल्प, सीआरझेड कायद्यातील बदल, खोल समुद्रातील मासेमारी, माशांच्या आयातीला परवानगी, सागरी मार्ग, वाढवण बंदर-विरोध, दाभोळखाडी- बचाव, गोराई-एस्सेल वर्ल्ड विरोध, अशा अनेक प्रश्नांवर कोळी समाजाचे आंदोलन चालू आहे.

शेतकऱ्यांची स्थितीही अशीच भयानक आहे. डंकेल प्रस्तावामार्फत पेटंटचा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे अधिक उत्पादन देणारी नवीन बियाणी त्या त्या कंपनीमार्फतच शेतकऱ्यांना मिळतील. यातून शेतीचं आणि देशाचे परावलंबन वाढेल. आता शेती उत्पादनावरील अनुदानात कपात होईल. सार्वजनिक वितरणव्यवस्था मोडीत काढली जाईल.

वीजनिर्मिती क्षेत्रातली लूटमार सर्वांना एन्रॉनमुळे परिचित आहे. ती येथे तपशीलवार मांडण्यात आली आहे. एन्रॉन कंपनीने स्वतःच आपण 300 कोटींच्या प्रकल्पातील 10 टक्के रक्कम जनसंपर्कासाठी खर्च केल्याचे सांगितले आहे. हे 300 कोटी रुपये नक्की कुणाला मिळाले, कोण प्याद्याचा फर्जी झाला, कोण सेनापती सम्राट झाला, हे लोकांना कळलेच पाहिजे.

कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये आरोग्यसेवा येते. पण जागतिकीकरणाच्या फर्मानाप्रमाणे हळूहळू आरोग्यसेवेवरचा खर्च कमी कमी केला जाणार. औषधांच्या किमतीवरचे नियंत्रण जाणार. सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण होणार. जागतिकीकरणामुळे बळी जाणाऱ्यांमध्ये आरोग्यसेवासुद्धा आहे.

रेशनिंगव्यवस्था सरकारने हळूहळू मोडीत काढली आहे. त्याचे परिणाम अनेकपदरी आहेत. गरिबांना या व्यवस्थेमुळे हक्काने स्वस्त दरात धान्य मिळत होते. युद्ध, दुष्काळ, पूर या आपत्तींच्या वेळी सरकारकडे स्वतःची अशी ही वितरणव्यवस्था होती. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे रेशनिंगव्यवस्थेमुळे सरकार धान्याला हमी भाव देऊ शकत होते. आजच धान्याचे प्रचंड साठे पडून आहेत. रेशनिंग व्यवस्था मोडीत काढणे हे किती बिनडोकपणाचे आहे हे या लेखावरून कळते.

जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली लघुउद्योगांचा कसा चेंदामेंदा आहे, याची आकडेवारीच एका लेखात दाखवली आहे. जागतिकीकरणाचा आणखी एक मोठा बळी आहे पर्यावरण. कारण जागतिकीकरणाचे उद्दिष्ट जास्त आणि जास्त नफा एवढेच आहे. त्यासाठी अधिकाधिक उपभोगाची हाव मुद्दाम निर्माण करण्यात येते. आज देशातील जंगले, नद्या, समुद्र सर्व काही तात्पुरत्या नफ्यासाठी प्रदूषित किंवा कायमचे नष्ट करून टाकण्यात येत आहेत.

खासगी उद्योग म्हणजे कार्यक्षमता, आधुनिकता वगैरे वगैरे सर्व काही सबकुछ (टकाटक आणि चकाचक); पण सार्वजनिक बँकांना ज्यांनी लुबाडले आहे ते हेच ते खासगी उद्योजक. या बँकांच्या तेरा हजार सातशे चाळीस कोटी रुपये थकित कर्जापैकी फक्त 171 कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी परत केलेले नाहीत; तर 550 खासगी उद्योगांनी 13,569 कोटी रुपयांची परतफेड केलेली नाही. या उद्योगांचे डायरेक्टर्स फार प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि काही काही प्रसिद्ध व्यक्ती अनेक कंपन्यांचे डायरेक्टर्स आहेत. पण शासन त्यांना काही करणार आहे का? ‘अनुभव टीकवुड प्लँटेशन' हे त्याचे ताजे उदाहरण, (टीव्हीवरच्या जाहिरातीत तो एक म्हातारा नाचायचा ते आठवते?) त्यानंतरचे उदाहरण म्हणजे एन्रॉन!

उरलेले लेख, म्हणजे 'मध्यम वर्गाला झालंय तरी काय?' ‘गुंतवणुकीवरील व्याजदरात घट', 'कामाच्या हक्कांवर गदा’ आणि 'मुंबईतील गिरणी कामगारांना शेवटचा सलाम', हेही अतिशय वाचनीय आहेत.

पुस्तकातील शेवटचा भाग ‘जागतिकीकरणाचे पर्याय' हा आहे. यात पैसा अडवा-पैसा वाढवा', 'परिसर उत्पादन आणि शेती', 'सहकारी अर्थव्यवस्था', ‘स्थानीय पराभूत सोयींचा विकास' हे लेख आहेत. स्थानिक लोकांनी स्थानिक उत्पादने वापरावीत आणि हे जेवढ्या प्रमाणात होईल तेवढे त्या परिसराचे उत्पन्न वाढेल. तसेच ज्वारी बाजरीचे उत्पादन वाढवावे. त्याला पाणी कमी लागते. त्याचा उत्पादनखर्च कमी असतो आणि स्थानिक लोकांची गरज ते भागवू शकते. आणखी एक उपाय म्हणजे सहकारी संस्था काढून भांडवल संचय करणे आणि त्यातून स्थानीय पायाभूत सोयींचा विकास साधणे, असे उपाय लेखक सुचवतो. पर्यायी रणनीतीची मांडणी हे या पुस्तकाचे मोठे वैशिष्ट्य आहे.

हे सर्व लेख सामान्य वाचकांसाठी लिहिलेले आहेत. जागतिकीकरणाचा फटका आज एखाद्या दुर्गम पाड्यात राहणाऱ्या आदिवासीला किंवा खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळ्यालाही बसतो आहे. अशा वेगवेगळ्या जनसमूहांचे प्रश्न या पुस्तकात मांडलेले आहेत. दहा वर्षांपूर्वी जागतिकीकरणाचे समर्थन करणाऱ्यांत अनेक बुद्धिवंत, संपादक-कम-विचारवंत होते. आज त्यांनाही जागतिकीकरणाचा खरा चेहरा कळू लागला आहे. जागतिकीकरणाबद्दल खऱ्या अर्थाने प्रशिक्षण करणारे हे पुस्तक आहे.

जागतिकीकरण - परिणाम आणि पर्याय
लेखक : गजानन खातू
किंमत : 100 रुपये 

----

गार्गी अजून जिवंत आहे… 

हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नाही. अगदी कितीही जवळचं माणूस निधन पावले तरी स्त्रिया प्रेतयात्रेमध्ये सामील होऊन स्मशानात जात नाहीत. स्त्रिया घरातच थांबतात. प्रेतावरील संस्कार पुरुष मंडळी करतात. अगदी शहरामध्ये, इतकंच काय तर विद्युत दाहिनीमध्ये प्रेत जाळणारी, आधुनिक विचारांच्या घरातील माणसंही हाच धार्मिक संस्कार पाळतात. त्यांच्याही घरातील पुरुष माणसंच शववाहिनीतून विद्युत्दाहिनीत जाऊन प्रेत जाळतात, इतका हा संस्कार दृढ आहे. अशावेळी उत्तर प्रदेशात, गंगेच्या किनाऱ्यावर एक स्त्री स्वतःचा स्मशान घाट बांधते आणि प्रेतावरच्या अंत्यसंस्कारांचं काम करते हे विलक्षण आहे. मंगला आठलेकरांच्या 'गार्गी अजून जिवंत आहे...' या पुस्तकात या विलक्षण बाईचा परिचय करून देण्यात आलेला आहे.

या विलक्षण बाईचं नाव गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी. तिचा जन्म साधारण 1914४-15 च्या सुमाराचा. सातव्या वर्षी तिचं लग्न झालं. दहाव्या वर्षी तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याच वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षापासून वडिलांचं स्मशानपौरोहित्याचं काम दारागंज घाटावर गुलाबने सुरू केलं. आजही ते काम ती करत आहे. त्याला आज जवळजवळ पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली. म्हणजे पाऊणशे वर्ष हिंदूधर्मातल्या सडक्या, कुजक्या, अतार्किक चालीरितींची चिता गुलाबबाईने धडधडत ठेवली आहे. 'स्त्रीने स्मशानपौरोहित्य का करू नये?' असा प्रश्न तिने त्यावेळच्या पंडयांना केला. आजही जेव्हा स्त्रिया स्मशानपीरोहित्य करत नाहीत, इतकंच काय पण स्मशानातही जात नाहीत, त्या अर्थी आजही तो प्रश्न तसाच अनुत्तरित आहे.

गुलाबबाई जन्माला आली, त्या काळी तिच्या गावात मुलींना जन्म झाल्याबरोबर मारून टाकत. बाळंतपण करणारी सुईणच हे काम करी. त्यासाठी तिला अधिक बिदागी मिळे. मुलगी जन्माला आली की तिला मडक्यात घालायची आणि मडकं वरून मातीनं लिंपून नंतर फडक्यानं घट्ट बांधून टाकायचं. काही क्षणांच्या अवधीत ती मुलगी मरून जात असे. गुलाबबाईने या घटना स्वतः पाहिलेल्या आहेत. पण गुलाबबाईला तिच्या आईवडिलांनी जिवंत ठेवलं. अगदी तिसऱ्या-चौथ् वर्षापासून गुलाब शरीराने चांगलीच आडदांड होती. दंडबैठका, सूर्यनमस्कार, सकाळी पळायला जाणं असे व्यायाम करून तिने शरीराला कणखर बनवलं होतं. मुलगी म्हणून जन्माला आले. तरी जगताना 'मुलगा' म्हणून जगायचं अशी तिथी ईर्ष्या होती. सातव्या वर्षी तिचं लग्न झालं. पण तिला न्हाणं येईपर्यंत आणखी तीन वर्ष तिने माहेरी काढली. ती वडिलांची लाडकी असल्यामुळे त्यांच्याबरोबर ती रोज दारागंज घाटावर जात असे आणि त्यांचं काम म्हणजे स्मशानपौरोहित्याचं काम मनापासून पाहात असे. घरी आले की बडिलांकडून आणि त्यांच्या मित्रांकडून मंत्रविधी शिकून घेत असे. दहाव्या वर्षी तिची रवानगी सासरी झाली. नवरा काही कमवत नव्हता. सासू छळणारी होती. मात्र गुलाब कोणाशी भांडततंडत न बसता खोलीचे दार बंद करून भरपूर व्यायाम करीत असे. सासरी आल्यानंतर वर्षभरातच म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांतच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ती माहेरी आली. मरण्यापूर्वी तिच्या वडिलांनी 'गुलाबच आपल्यावर अंत्यसंस्कार करील, आपल्याला अग्नी देईल' अशी इच्छा बोलून ठेवली होती. त्याप्रमाणे गुलाबने आपल्या आयुष्यातील पहिला अंत्यसंस्कार केला. घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे आता तिच्या माहेरच्या माणसांचे हाल कुत्रा खाईना. वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आपणही वडिलांचंच हे काम पुढे चालवायचं असा तिचा निश्चय झाला होता. माहेरच्या हालाच्या कथा ऐकून तिने आपला निश्चय सासऱ्यांना सांगितला. सासरा समजूतदार होता, पण त्यालाही हा मोठा धक्का होता पण वडिलांच्या मृत्यूनंतर आठदहा महिन्यांनी गुलाबला परवानगी मिळाली.

जेव्हा गुलाब दारागंज घाटावर गेली आणि तिचा निश्चय बाकीच्या पंड्यांना कळला तेव्हा तिला ते टोचून टोचून बोलले. पण त्याच दिवशी तिला एक प्रेत अंत्यसंस्कारासाठी मिळालं. ती तिची पहिली कमाई! पण त्या दिवसापासून तिचं सासरच्या घरी जेवणं बंद करण्यात आलं. त्या 'मष्ण्या' हातांनी स्वयंपाक करून तिला घर बाटवायला परवानगी नव्हती. दुसऱ्या दिवसापासून गुलाब स्मशानातच अन्न शिजवून खाऊ लागली. ती अगदी गेल्या काही वर्षापर्यंत. नंतर पुढे पंडयांनी गुलाब वर दोन-तीन मारेकरी घातले. पण गुलाबने आपल्या हातांतील लाठी फिरवीत त्यांनाच चोप दिला. आणि दारागंज घाटावर आता आपण राहणारच हे सिद्ध केलं. नंतर मात्र पंडयांनी यजमानांनाच घाबरावयाला सुरवात केली, मग तिने तो घाट सोडला आणि रसुलाबाई घाटावर ती स्मशानपौरोहित्य करू लागली ते आजपर्यंत. आपल्या कष्टाच्या कमाईतील साडेनऊ लाख रुपये खर्च करून तिने घाट व्यवस्थितपणे बांधून काढला. गुलाबबाईची ही चरितकहाणी मंगला आठलेकरांनी रसाळपणे सांगितली आहे. वेद, उपनिषदे आणि मनुस्मृती यांतील श्लोक उद्धृत करून त्यांनी या कर्त्या सुधारकाच्या जीवनचरित्राला एक भव्य आणि ऐतिहासिक परिमाण दिले आहे. अत्यंत रूढिग्रस्त, जुनाट, गरीब घरातील गुलाब स्वकर्तृत्वाने आज हजारो जणांची प्रेमळ अम्मा कशी बनली, ही कहाणी अत्यंत रोमांचकारी आहे. स्वतः मंगला आठलेकर यांनी गुलाबबाईला कसं शोधून काढलं ही उपकहाणीसुद्धा मनोरंजक आहे. एका वेगळ्या जातीचे हे पुस्तक घरोघरी वाचले जावं आणि त्यातून मराठी स्त्रियांना स्फूर्ती मिळावी.

गार्गी अजून जिवंत आहे… 
लेखिका : मंगला आठलेकर

राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत: 70 रुपये.

----

गांधी : परंपरा आणि परिवर्तन

भारतीय अस्मितेचा म्हणजेच भारतीयत्वाच्या आशयाचा प्रश्न आज पुन्हा एकदा सामोरा आला आहे. एका बाजूला उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण यांच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृती आपल्या जीवनामध्ये घुसते आहे; तर दुसरीकडे अत्यंत उग्र, कट्टर, असहिष्णु आणि आक्रमक असा नवपुनरुज्जीवनवाद आहे. अशा वेळी गांधीजींचे विचारच आपणाला मार्गदर्शक ठरतील अशी लेखकाची भूमिका आहे.

गांधीजींनी 'हिंद स्वराज्य' ही पुस्तिका लिहिली, त्याला जवळपास शंभर वर्षे झाली. या पुस्तिकेत त्यांनी पाश्चात्य संस्कृतीची चिकित्सा करून तिच्यातील उणिवा, दोष आणि ‘सैतानी' अंश परखडपणे जगाच्या वेशीवर टांगला. ही चिकित्सा त्यांनी सनातन भारतीय संस्कृतीमधील चिरंतन अशा मानवी मूल्यांच्या कसोटीवर केली. आजही त्यांची ही दृष्टी आपणाला मार्गदर्शक ठरू शकेल. कारण आज जगभर बाजारू, नकली, निसर्गाला गिळून टाकणारी, तथाकथित पाश्चात्य संस्कृती (खरे तर अमेरिकन संस्कृती) धिंगाणा घालत आहे आणि त्यामुळे भयभीत होऊन धार्मिक पुनरुज्जीवनवाद डोके वर काढीत आहे.

लेखकाच्या मते, सामान्यपणे मोठाल्या शहरांतून राहणाऱ्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय जनमानसावर प्रभाव गाजवणाच्या तथाकथित पुरोगामी विचारवंतांनी सर्वधर्म समानत्वाच्या संकल्पनेचा तुच्छतेने धिक्कार केला आणि सर्व प्रकारची धार्मिक भावना प्रतिगामी आणि प्रतिक्रियावादी म्हणून हिणकस आणि तुच्छ ठरवली. समूह मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास या अनिष्ट धोरणाचे दूरगामी असे वाईट परिणाम झाले. ही जी पोकळी निर्माण झाली ती संकुचित आणि आक्रमक अशा धर्मवाद्यांनी भरून काढली. आजच्या पाश्चात्य, यंत्रप्रधान, वैज्ञानिक, अशा संस्कृतीचा सर्वांत मोठा बळी पर्यावरण आहे. 'इकॉलॉजिस्ट' या विख्यात मासिकाच्या जानेवारी 1972च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या 'ब्ल्यू प्रिंट फॉर सर्व्हायव्हल' या शीर्षकाच्या प्रदीर्घ लेखाने पर्यावरणाच्या संकटाचे भयंकर आणि सर्वभक्षक असे स्वरूप सर्वप्रथम जगासमोर मांडले. यातूनच पुढे क्लब ऑफ रोमने प्रकाशित केलेल्या 'लिमिट्स टू ग्रोथ' या प्रसिद्ध अहवालाची निर्मिती झाली. या 'ब्ल्यू प्रिंट' निबंधात अगदी प्रारंभीच दोन अत्यंत मूलभूत मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे. एक तर आजच्या आर्थिक उत्पादनाच्या क्षेत्रातील ज्या प्रवृत्ती आहेत त्या जर अशाच यापुढेही चालू राहिल्या तर सद्यशतकाच्या अखेरीस म्हणा किंवा फार तर आपल्या मुलांच्या हयातीत म्हणा, अशी परिस्थिती उभी राहील की सगळ्या समाजव्यवस्थेचा अंत झालेला असेल; आणि या सृष्टीतील जीवनरक्षणाचे काम करणाऱ्या सर्व व्यवस्था अनिवार्यपणे कायमच्या नष्ट झालेल्या असतील! दुसरा मुद्दा असा, की आजच्या पर्यावरणाच्या संकटाचा जो भस्मासूर आपल्यासमोर उभा ठाकला आहे तो मुळात आजच्या औद्योगिक उत्पादनाच्या बुडाशी जी विशिष्ट जीवनदृष्टी आहे, तिचाच अटळ परिपाक आहे. त्यामुळे जोपर्यंत या जीवनदृष्टीचा त्याग करून त्या जागी एक सर्वस्वी नवीन जीवनदृष्टी आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार. अॅन्ड्य्रु मॅकलॅफालिन याने आपल्या ‘रिगार्डिंग नेचर’ नावाच्या ग्रंथात हीच भूमिका मांडली आहे. "आजच्या पर्यावरणाच्या संकटाचे प्राथमिक कारण म्हणजे आजची औद्योगिक समाजरचना होय', असे तो म्हणतो.

अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गोर यांनी त्यांच्या 'अर्थ इन दि बॅलन्स' या पुस्तकात अशी भूमिका मांडली आहे की आजची संस्कृती म्हणजे निसर्गात रुतून असलेल्या मानवी समाजाच्या मुळांपासून उत्तरोत्तर दूरदूर जाणाऱ्या प्रवासाची हकीकत आहे. विख्यात विचारवंत आणि लेखक फ्रिजॉक काप्रा यांच्या मतेही पर्यावरणाची समस्या म्हणजे एका विशिष्ट जीवनदृष्टीचे संकट (क्रायसिस ऑफ पर्सेप्शन) आहे. विख्यात नॉर्वेजियन तत्त्वचिंतक आर्न नेस याने सखोल पर्यावरणवादाची (डीप इकॉलॉजी) भूमिका सर्वप्रथम अत्यंत तर्कशुद्धपणे समोर आणली. हे सगळे विश्व वेगवेगळ्या, विभक्त अशा वस्तूंचे बनलेले नसून मुळात परस्परावलंबी, परस्पर-निगडित अशा घटितांची ती वीण आहे. या रचनेत माणसाला कुठलेही खास अथवा अनन्य असे स्थान नाही. इतर निसर्गासारखाच तो एक. नेसला माणसाकडून जे पर्यावरणीय भान अपेक्षित आहे ते म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक जाणीव आहे. संपूर्ण विश्वाविषयी एक आत्मीयतेचा भाव मनात उदित होणे हीच व्यापक अर्थाने 'धार्मिक' जाणीव आहे. थिओडर रोझॅक या प्रसिद्ध अमेरिकन विचारवंताने या निसर्गविचाराला 'पर्सनहूड ऑफ नेचर’ म्हटले आहे. तो म्हणतो, 'दि नीड्स ऑफ दि प्लॅनेट आर दि नीड्स ऑफ दि पर्सन... दि राइटस् ऑफ दि पर्सन आर दि राइट्स ऑफ दि प्लॅनेट.' मात्र ‘भारतात विश्वात सर्वत्र एकच चैतन्यतत्त्वाचा वास आहे' ही भूमिका फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे.

गांधींनी या परंपरेला आपल्या खास शैलीचे वळण दिले. नवी व्रते जोडली. जुन्यांमध्ये नवा, सामाजिक क्रांतीला प्रेरक असा आशय ओतला. त्यातून नवी नीतिप्रधान आर्थिक दृष्टी दिली आणि व्यक्ती आणि विश्व यांत मैत्रीयुक्त सहजीवन निर्माण करणारी जीवनशैली विकसित केली. गांधींच्या व्रतविचारांतील हे आशयधन मर्म आर्न नेस याने मार्मिकपणे अधोरेखित केले आहे. त्याने भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील 'सर्वत्र समदृष्टी ठेवणारा योगमुक्त झालेला आत्मा, सर्व भूतमात्रांत स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये सर्व भूतमात्र पाहतो.' हा श्लोक उद्धृत करून त्यावरील शंकराचार्यांच्या भाष्याचा हवालाही दिला आहे.

एकूणच या पुस्तकात गांधीवादाची आधुनिक विचारवंतांच्या भूमिकांमधून चिकित्सक पाहणी केलेली आहे. गांधीवादामधील सत्य, शिव आणि सुंदर त्यामुळे झळाळून उठले आहे. गांधीवाद्यांनी आणि विशेषतः गांधीविरोधकांनी हे पुस्तक मुद्दाम वाचावे.

गांधी : परंपरा आणि परिवर्तन
लेखक : सु. श्री. पांढरीपांडे

परंधाम प्रकाशन
किंमत : 10 रुपये 

Tags: अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थकारण शेतकरी शेती डंकेल अर्थकारण जागतिकीकरण साहित्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके