डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वसंत बापट आणि आकाशवाणीचा स्नेह

वसंत बापटांना प्रथम पाहिले ते शाळेत असताना औरंगाबादच्या विक्रम स्टेडियमवरील एका भव्य कार्यक्रमात. 1972/73 च्या सुमारास. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख देणारा हा कार्यक्रम बापट यांच्या उत्कृष्ट संयोजन आणि संचालनामुळे लक्षात राहिला. पुढे बापटांच्या व्यक्तिमत्त्वात- त्यांच्या चालण्या बोलण्यात काही जादू, काही करिष्मा आहे, हे लक्षात आले. पुढे आकाशवाणीमध्ये आल्यावर त्यांच्या जवळ जाण्याची अनेकदा संधी मिळाली. 

मी रत्नागिरी आणि औरंगाबाद केंद्रात त्यांना आवर्जून आग्रहपूर्वक स्टुडिओत घेऊन आलो, तेव्हा त्यांचा मिश्किल स्वभाव लपून राहिला नाही. रंगीबेरंगी शर्ट, सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेले बापट कवी संमेलनात सर्वाधिक टाळ्या घेताना अजूनही डोळ्यासमोर आहेत.

‘अमेरिके-अमेरिके दार उघड,

दार उघड, बया दार उघड’ सारखी कविता असो किंवा त्यांचा हुकूमाचा पत्ता

‘आता जायाचयं की कवा तरी पटदिशी’ ही कविता असो, बापट यांची फेक, लय, प्रस्तुती रसिकांना टाळ्या धरायला लावायची.

‘जीवन रसानं ओतप्रोत माणूस’ असे बापटांचे इंप्रेशन मनावर कायम झाले.

आकाशवाणीच्या वतीने रत्नागिरीत एक भव्य मराठी कविसंमेलन घ्यावं अशी इच्छा होती. अरुणा ढेरे, वसंत बापट, नारायण सुर्वे, मंगेश पाडगांवकर सर्वजण एवढा प्रवास करून रत्नागिरीत आले. सोबत फ. मुं. शिंदे, श्री.दि. इनामदार, पुरुषोत्तम पाटील अशी कवी मंडळी होती. डॉ.करंदीकर, मंदाकिनी गोडसे या कार्यक्रमातील स्थानिक कवींनाही आवर्जून बोलावले होते. त्यांना बापटांनी फार छान ‘कान’ दिला, कौतुक केले. म्हणूनच त्यांच्या मनाचा उमदेपणा लक्षात राहिला. त्या दिवशी रत्नागिरीचे खातू नाट्य मंदिर खचाखच भरले होते आणि कोकणवासीय चोखंदळ रसिकांनी अक्षरश: टाळ्यांचा ठेका धरला होता.

संमेलनात तिथल्या तिथे मानधनाचा धनादेश देण्याची त्यावेळी प्रतिष्ठित पद्धत होती. एखादा जबाबदार अधिकारी त्या औपचारिकता पूर्ण करत असे. चेक घेतल्यावर बापटांनी मला जवळ बोलावले. आयोजनाचे कौतुक केले. मात्र पुण्या-मुंबईच्या कवीच्या मानधनामध्ये तफावत का? अशी नाराजी माझ्याकडे व्यक्त केली. पाडगांवकरांच्या अतिरिक्त मानधनाचा मुद्दा त्यांच्या लक्षात आला होता. हा भेदभाव बरोबर नाही, अशी त्यांनी हसत हसत कोपरखळी मारली. त्यांना फरकामागील भूमिका समजावली. ती त्यांना पटली नाही (मुंबईहून आलेल्यांना रेल्वेचे वातानुकुलित भाडे आणि पुण्याकरता ट्रॅव्हल्सचे भाडे, यामुळे तो स्वाभाविक फरक होता). पुढे त्यांनी एक पानभर पत्र पाठवून आपली खंत मांडली. तो त्यांच्या रोखठोक शैलीचा भाग होता. ते त्यांच्या मताशी ठाम होते.

त्यानंतर दोनच वर्षांत त्यांना औरंगाबादच्या स्टुडिओत आणण्याचा योग आला. ‘मी आणि माझी कविता’ हा विषय येऊन जवळपास तासभर ते बोलत होते. मध्ये मध्ये कविता वाचत होते. मुद्दामच आम्ही पाच-सात जण समोर बसून दाद देत होतो. त्यामुळे ते अधिक खुलून गेले. स्टुडिओत नकळत घडलेली ती अनोखी मैफल आजही आठवते. आकाशवाणीवर एक विस्तारलेलं माध्यम म्हणून त्यांचं प्रेम होतं. त्यात एक डोळसपणा होता, कारण एरवी काव्य रसास्वादाचे महाराष्ट्रभर दौरे काढणाऱ्या कवी-त्रयींनी ती दूरवर पोचवणाऱ्या आकाशवाणीची उपयुक्तता सकारात्मकपणे ओळखली होती.

औरंगाबादच्या रेकॉर्डिंगसमयी त्यांचे ‘वय’ लक्षात येत होते. त्यामुळे त्यांनी ‘आता जायचंच की कवा तरी पटदिशी’ ही कविता सुरू करताच मन जरा विषण्ण झालं.

माझ्या पिढीवर प्रथम करंदीकर, पाडगांवकर, बापट  या त्रयींचा तर पुढे ग्रेस, अरुणाताई, नारायण सुर्वे,  सुरेश भट  या कवींचा खोल पगडा आहे. जीवन जाणीवा या सर्वांनी समृद्ध केल्या. जगण्यात भाव भरला हे निश्चित.

इतरांच्या मानाने बापटांचा चतुरस्रपणाही ठळकपणे डोळ्यात भरला. उत्तम संपादक, चोखंदळ वक्ता,  प्रभावी सुत्रधार, गीतकार, चळवळ्या मिश्किल कलाकार असे विविध पैलू त्यांनी साकार करून दाखवले. म्हणूनच क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावर ओघवत्या भाषणाइतकेच दुसरीकडे ‘अजून त्या झुडुपाच्या मागे, सदाफुली ग  हसते आहे.’ इतकं नाजूक सुकुमार गाणे ते लिहू शकले असावेत.

बापटांइतका चतुरस्र लेखक-कलाकार आकाशवाणीला मोठ्या भाग्याने आणि मुश्किलीने प्राप्त होत असतो.  ज्याला हे माध्यम, या माध्यमाच्या गरजा, इथल्या बोलीभाषेच्या, लिखाणाच्या गरजा नीटपणे कळलेल्या असतात. म्हणूनच मी पुण्याला 2017 मध्ये रूजू झाल्यावर इथल्या ध्वनिसंग्रहावर नजर टाकताच बापट यांचं बऱ्यापैकी ध्वनीमुद्रण इथं झालेलं, आणि सांभाळलेला दिसलं. ‘सृजन रंग’ मालिकेत त्यांचे प्रदीर्घ मनोगत आहे. भावगीतं, देशभक्ती गीतं आहेत. शिरुभाऊ लिमये, अप्पासाहेब पंत यांच्या सोबतच्या गप्पा आहेत. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन यांच्याविषयीची भाषणे आहेत. परिसंवाद आहेत. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यातलं निवडक यू-ट्यूबवर टाकण्याचाही मानस आहे.

आकाशवाणीसाठी अन्य सादरीकरण शैलीही (फॉर्मेट्‌स) बापटांनी हाताळल्या. अक्षरवेल (साहित्य), ऑगस्ट क्रांतीचा सुवर्णमहोत्सव या विषयांवर रुपकं लिहून दिली. सुमारे 40 ते 45 वर्षे ते आकाशवाणीसाठी लिहीत राहिले. सहभागी होत राहिले. 26 सप्टेंबर 1997 ला आकाशवाणीला लिहिलेल्या एका पत्रात त्यांचा कृतज्ञभाव जाणवतो. ‘आकाशवाणीने मला नेहमीच सादर सप्रेम सहभागी करून घेतले आहे’ असे त्यांचे शब्द आहेत.

माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणेच पुण्या-मुंबईचे माझे काही वरिष्ठ सहकारी त्यांचा आवर्जून उल्लेख करतात की, स्वत:चा ‘आब’ राखूनही बापट यांची ‘पेशकारी’ रंग भरणारी असायची. टाळ्या घेण्याचीही त्यांची आगळी वेगळी लकब असायची. स्टुडिओत एकहाती रेकॉर्डिंग व्हायचं. संमेलनात किंवा मैफलीत शांताबार्इंसोबत ‘लावणी’वरून मिश्किल टीका-टिपण्णी व्हायची. त्यांचा लावणी सादर करतानाचा इरसालपणा रसिकांना आवडायचा. दुर्मिळ ‘रसिक’ सादरकर्ता म्हणून ते त्यामुळेच लक्षात राहायचे.

वाचकांचा विश्वास बसणार नाही, पण बापट यांच्यात दडलेल्या कॉपीरायटरने पुणे, सांगली, सोलापूर केंद्रांसाठी प्रभावी जाहिराती लिहिल्या. त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मुद्याचे, नेमकेपणाने लिहिण्यात त्यांचा हातखंडा जाहिरातींच्या लेखनातही परावर्तीत झाला. बापट एखाद्या कलाकाराला शोभेल अशा रीतिने स्वत:च्या आकंठ प्रेमात होते, हे निश्चित. त्यांचे भावविश्व त्यांनीच लिहिल्याप्रमाणे ‘गगन सदन तेजोमय’ होते.

इतका रसिक आणि खरा समाजवादी विरळाच म्हणायचा की!

Tags: vasant bapat akashvani gopal avati जन्मशताब्दी विशेषांक वसंत बापट आकाशवाणी गोपाळ आवटी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोपाळ अवटी
autee.gopal@gmail.com

स्टेशन डायरेक्टर आकाशवाणी, पुणे


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके