डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आदिवासी शैलीत वस्तूच्या वास्तव रूपापेक्षा तिचे भावरूप वेगळे आणि महत्त्वाचे मानण्यात आले आहे. ही शैली मनस्वी व मुक्त असते. मूर्ती बनविणारा आदिवासी कलाकार कारागिरीचा गुलाम नसतो. त्याला भावते ते दाखविण्याची त्याची धडपड असते.

आदिवासींचा जीवनकलह अतिशय तीव्र आहे, आणि तरीही हे खडतर जीवन जगताना आदिवासींनी परिस्थितीशी सुसंवाद साधला आहे असे दिसते. जीवनाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशा वस्तू तयार करताना त्यांनी एक संस्कृती निर्माण केली आहे. त्यांच्या जीवनातील चैतन्याचे प्रतिबिंब या वस्तूंमध्ये पडलेले दिसून येते. आदिवासी कला असा स्वतंत्र कप्पा आदिवासी जीवनात नाही. दैनंदिन उपयोगासाठी त्यांनी बनवलेल्या अनेक वस्तूंपैकी कोणत्या वस्तूत किती कलाकुसर आहे हे निरखून त्यामागच्या कलाकाराचा शोध घ्यावा लागतो. साधेपणात सौन्दर्य आणि निर्मळपणा ही या कलेची वैशिष्ट्ये आहेत. आदिवासींची दृष्टी निष्पाप व प्रांजळ असते. निसर्गाच्या सानिध्यात वावरतांना निसर्गातील सुंदर आकार आणि आकृती त्यांना प्रेरणा देतात. परंतु वस्तू निर्माण करताना कलेच्या माध्यमाची त्यांना फारशी जाणीव नसते. उपयुक्त वस्तू करावयाची व ती शक्य तितकी सुंदर करायची हा आदिवासींचा सहज स्वभाव आहे. आदिवासी हस्तकला हे आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब आहे. याचबरोबर असेही आढळून येते की आदिवासींच्या पसंतीचे काही खास विषय असतात. रोजच्या वापरातील वस्तूंपेक्षा त्यांच्या आवडीची वाद्ये व काही सौंदर्यवर्धनाची साधने अधिक कलात्मक व आकर्षक असतात.

धार्मिक परंपरागत कल्पनांचा व श्रद्धांचा पगडा आदिवासींच्या मनावर असतो. ही श्रद्धा व्यक्त करताना आदिवासी कला कौशल्याच्या वस्तू करतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास मृताच्या स्मरणार्थ उभारावयाच्या गोंडांच्या ‘खंबा’चे देता येईल. यालाच काही भागात ‘शिणोली’, ‘उर्सकाल’, ‘मरसिंग मुंडा’ म्हणतात. एटापल्लीजवळच्या तोडता गावात तळ्याकाठी असे 3-4 ‘खंबे’ आहेत. त्यांवर विविध प्रकारची नक्षी आहे अंदाजे 8 फूट उंचीचे हे खांब. त्यावर साधारण 5 फुटांवर आडवे लाकूड बसविलेले असते. त्यावरही नक्षी कोरलेली असते. पाने, फुले, पशुपक्ष्यांबरोबरच कुलदैवते म्हणून सुसर, मगर, साप, कासव यांच्या आकृतीही कोरतात. त्यावर दोन्ही बाजूस लाकडी मोर आहेत.

या ‘शिणोली’त, लाकडावरील कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना दिसतो. मृताच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचे प्रतीक म्हणजे ही शिणोली. तिची उंची, नक्षी, आकार, त्यावरच अवलंबून असतात. पाळीव जनावरे म्हणजे संपत्तीचे साधन, म्हणून शिणोलीला गाईचे तोंड कोरलेले असते. कोरकू मृतात्म्याच्या स्मरणार्थ लाकडी खेळण्यासारखा ‘शिघोडा’ बनवितात. दोरीने तो नृत्यातून नाचवितात. त्याला ते ‘भुतडा’ समजतात.

मुखवटे, हे आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग! महाराष्ट्रात आदिवासी विविध उद्देशांनी मुखवटे वापरतात. ठाणे जिल्ह्यात पश्चिम घाटपट्टी ते डांग याभागात भवाडा नृत्यासाठी, वारली-कोकणा-भिल्ल जमाती मुखवटे वापरतात, तर धुळे, जळगाव जिल्ह्यांत लग्नसमारंभात व होळीच्या वेळी सोंगे काढतात. नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांत कोलाम लोक ‘दंडार’ नुत्यात एकच, ‘कोढाळ’ हा मुखवटा वापरतात.

महाराष्ट्रात आदिवासी कलाकारांमध्ये आजही मुखवटे करण्याची कला चांगली टिकून आहे. गुजरातेत डांग, बलसाडमध्ये वारली, कुकणा आदिवासी; नाशिकमधील पेठ, वणी येथील आदिवासी मुखवट घडवितात. त्यांना भरपूर मेहनतानाही मिळतो. 12-13 मुखवट्यासाठी 1000-1500 रु. मिळतात.

भवाडा, हा खास आदिवासी नृत्यप्रकार, प्रसंगी भाड्याचे मुखवटे आणून तो साजरा होतो. मुखवटा धारण केला की त्यांचे शरीर व मन स्फुरण पावतात व त्यांची नाट्यकला बहरून येते.

मुखवट्यांसाठी आदिवासी खूप परिश्रम घेतात. कोणताही साचा न वापरता ते मुखवटा केवळ हातावर घडवितात. चेहर्‍याची सुरेख ठेवण त्यातून दिसते. लाकडी मुखवटा बाकशीने, कुर्‍हाडीने तासून, कोरून ते करतात. यासाठी त्यांच्या नजरेसमोर शिल्पशास्त्रातील कोणतीही मूलतत्त्वे, सूचना नसतात, नमुना नसतो. मुखवटा करताना आपण एक जीवच घडवितो आहोत, अशी कारागिरांची धारणा असते. मुखवटे घडविणारा हा दैवी शक्तीचा माणूस मानण्यात येतो. त्याला मान असतो. हीच भावना धातूच्या मूर्ती घडविणाऱ्या वतनकाराची असते.

मुखवट्यांचा खरा उपयोग आता भवाड्याच्या मुक्त लोकनाट्यांसाठीच होतो. आता कारागिरांची उणीव जाणवू लागली आहे. मुखवटे झोपडीत ठेवीत असल्याने घर, पाऊस, यांमुळेही तो लवकर खराब होतो. रावणाचा मुखवटा आज 600 ते 700 रु. पर्यंत जातो. भवाडा आता आदिवासींना परवडेनासाच झाला आहे. एक गोष्ट विचार करण्याजोगी आहे, आफ्रिकन आदिवासींचे मुखवटे जगभरच्या प्रमुख संग्रहालयांमध्ये विराजमान झाले. ‘आद्य लोकनाट्य’ म्हणावे, अशा भवाड्यांचे मुखवटे मात्र महाराष्ट्रातूनच नामशेष होत आहेत.

लाकडावरील कोरीव काम 

दैनंदिन गरजांसाठी आदिवासी लाकूड वापरतात. शेतीची अवजारे, घरे, देवदेवतांच्या मूर्ती, मुखवटे, खाटली (बाजा), माळे, आयुधे, आदी लाकडाच्या वस्तू असतात. लाकडी अवजारे साधीच असतात, ठराविक हंगामापुरता त्यांचा उपयोग होतो. आदिवासी विभागात लाकूड सहज उपलब्ध होते, म्हणून टिकाऊपणाचा ते विचार करीत नाहीत. नांगराच्या मुठीला, दांड्याला पक्षी व प्राण्यांचे (मोर, बैल, घोडा प्रामुख्याने) आकार देतात. तपशील फार वेधक, आकर्षक कोरलेला दिसतो. काही आदिवासी घरांत दरवाजासमोरच्या लाकडावर गात्रनिदर्शक असे सांकेतिक चित्र कोरलेले असते. खांबावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षी असते. त्यात सूर्यदेव व चंद्रदेव यांच्या प्रतिमा प्रामुख्याने असतात. भिल्लांच्या घरात मध्यवर्ती खांबावर मोराचे चित्र असते. लाकडावरील कोरीव कामाचे उत्कृष्ट नमुने हलवा लोकांच्या घरात असतात. भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक गावी जुन्या घरांच्या लाकडावर हत्तींच्या झुंजी, घोडे-हत्तींच कळप, रथ, मिरवणूक, आदी कोरीव काम पाहायला मिळते. साकोली व गडचिरोली तहसीलमधील हलबांची घरे कोरीव लाकडाची बनविलेली असतात. कोरीव काम हेच त्यांच्या घरांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ते कौशल्यही आता कमी होत आहे. लाकडाच्या नैसर्गिक आकारात थोडा बदलकरून ते लाकूड आदिवासी विविध उपयोगांसाठी वापरतात. चुलबड गावी (वडगावजवळ), इंग्रजी ‘एल्’ आकाराची फांदी बैठकीसाठी वापरल्याचे दिसून येते. लाकडाचा असा कल्पक उपयोग केला जातो. गोंड दैगांच्या (पुजारी) हाती एक पूजेची काठी असते, तिला ते ‘माता’ म्हणतात. त्या काठीची मुठ कल्पकतेने तयार केलेली असते. अनेक आकार या कोरीव कामातून रूपाला येतात.

तंबाखूच्या डब्या, हे माडिया गोंड जमातीचे एक वैशिष्ट्य. लाकडातून कोरून, फळ्या जोडून, ते हा ‘पागागोट्टा’ किंवा ‘पोआ तिद्दाण्णा धोट्टा’ बनवितात. कठीण कवचाची फळे, टणक सालीच्या बिया, यांचाही यास उपयोग होतो. लाकडी, कोरीव डबीवर शिशाचा पातळ थर देतात. धातूच्या डबीवरही शिशाचा पातळ थर देतात. धातूच्या डब्याही ते बनवितात, त्यांवर करताकुसर करतात, लाकडाच्या पक्ष्यांच्या आकाराच्या डब्या करतात. झाडांचे आकार, झोपडीची चित्रे, नृत्ये रेषांची जाळी, यांचा कोरीव कामात वापर होतो. 

कोरकू लोकही डब्या करतात. कोरून केलेल्या ‘फणी’ला आदिवासींमध्ये एक विशेष महत्त्व आहे. माडिया गोंडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे युवागृह. ‘धोटुल’ ही झोपडी तरुण-तरुणींना नाच-गाण्यासाठी उपयोगात आणली जाते. जमातीचे रितीरिवाज त्यांना इथे शिकवितात. परंपरागत हत्यारांच्या उपयोगाचे, तसेच विविध नृत्यगाण्यांचे धडेही त्यांना येथेच देण्यात येतात. थोडक्यात, सांस्कृतिक जीवनाचे धडे देणारी ‘धोटुल’ ही एक शाळाच मानली जाते.

‘धोटुल’चा व त्यांच्या फण्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. धोटुलच्या प्रांगणात तरुण मुले-मुली समूहनृत्य करतात. ती एकमेकांच्या प्रेमात पडली, तर प्रेमाचे प्रतीक म्हणून अशा फण्या एकमेकांच्या केसात सर्वांसमक्ष घालण्याचा रिवाज आहे. त्यांना आपला जोडीदार निवडण्याची मुभा असते. त्यांचे विवाह सामाजिक रितीनुसार होतात. प्रगत समाजात ‘एंगेजमेंट’ची अंगठी घालतात, माडिया आदिवासी याच कामासाठी फणी वापरतो. लाकडाची, बांबूची किंवा काड्यांची फणी ते स्वतः बनवितात. फण्यांना असे सांस्कृतिक महत्त्व आहे. अशा नाजूक विषयाशी त्यासंबंधित असल्याने त्यांची बांधणी कलात्मक करण्याकडे माडिया तरुणांचा कल असतो. परधान व वैगा जमातीत ही फण्यांची संस्कृती आहे. पूर्वीच्या गोंडवन क्षेत्रात फण्यांचा वापर यासाठीच केला जातो.

आदिवासी जीवनात बांबूचे महत्त्व अधिक आहे, कारण त्याचे नैसर्गिक सान्निध्य आणि बांबूचे विविध उपयोग. टोपल्या विणण्याचे बांबूकाम हा ते सगळ्यात सोपा हस्तव्यवसाय समजतात. त्यामुळे ‘बाकेस्ट्री’ किंवा बांबूकाम हा आसाम, नागालँडमधील आदिवासींमध्ये मोठा प्रतिष्ठित उद्योग झाला आहे. बांबूपासून ते सजावटीच्या आणि भेटवस्तू बनवितात. खेळणी व घरगुती वापरातील वस्तूही करतात. चंद्रपूर, भंडारा, ठाणे, नांदेड या महाराष्ट्राच्या भागातील आदिवासी काही वस्तू बनवितात. टोपल्यांचा उपयोग त्यांना अनेक कारणांनी होतो. कामांची भिन्नता लक्षात घेऊन आदिवासी विविध प्रकारांच्या टोपल्या बनवितात व दैनंदिन कामांसाठी त्यांचा उपयोग करतात. अशा टोपल्यांना ते ‘शिकोशी’, ‘किकराही’, ‘डाली’, ‘छालगी’, ‘साकुरी’, ‘विय्या’ अशा नावांनी संबोधितात.

आदिवासींच्या एकूण आर्थिक जीवनात बांबूकाम हा व्यवसाय चांगला आधार देऊ शकेल. आदिवासींचे बांबूकामात नैपुण्य व कुशलता आहे. परंतु बाजारातील दिखाऊ वस्तू त्यांच्या कुशलतेला व नैपुण्याला मागे टाकत आहेत. त्यातून आदिवासींकडे जाहिरातकला नाही, त्यामुळे त्यांच्या पारंपारिक कलेचा र्‍हास होत आहे.

आदिवासींच्या शिल्पकृती 

खरे पाहू जाता आदिवासींच्या श्रद्धास्थान असलेल्या देवतांना आकार नाही. देवतांचे चिन्ह विशिष्ट आकाराचे वा घाटाचे दिसणारे दगड ते मांडतात. पण काही ठिकाणी या दगडांना आकार देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मूलतः निराकार असलेल्या श्रद्धास्थानांना आकारअंग देण्याचा प्रयत्न आदिवासी शिल्पी करताना आढळतात. आदिवासी शिल्पकलेत एकंदर शिल्पाकृतीतून जो भाव दाखवावयाचा असतो तो आकृतीच्या अंग-प्रत्यंगातून व्यक्त केलेला असतो. शिल्प जर शक्तिदेवतेचे असेल तर शिल्पाचा तपशीलही शक्तीचे प्रतीक दाखविलेला असतो. ‘कनसरी माता’ ही पिकाची देवता म्हणून तिच्या हातात कणसे दाखवावयाची, तसेच कान, गाल इत्यादी अवयवांना कणसाचाच आकार द्याववाचा म्हणजेच आदिवासी शैलीत वस्तूच्या वास्तव रूपापेक्षा तिचे भावरूप वेगळे आणि महत्त्वाचे मानण्यात आले आहे. ही शैली मनस्वी व मुक्त असते. मूर्ती बनविणारा आदिवासी कलाकार कारागिरीचा गुलाम नसतो. त्याला भावते ते दाखविण्याची त्याची धडपड असते.

आदिवासींच्या गरजा मर्यादित असतात. वस्तू उत्पादनाचा वेग गरजांशी संबंधित असतो, त्यामुळे वस्तूही मर्यादित संख्येने तयार होतात. वेळेचे बंधन पाळण्याची आदिवासींना सवय नाही, म्हणून तो मोठ्या प्रमाणावर वस्तू उत्पन्न करू शकला नाही. त्यासाठी आदिवासींच्या या हस्तोद्योगांस संरक्षण द्यायला हवे. ‘आदिवासी विकास महामंडळा’सारखी खेड्यापाड्यांपर्यंत पोचलेली निमसरकारी संस्था या क्षेत्रात महत्त्वाचे काम करू शकेल. उत्कृष्ट कारागिरांना पुढे आणणे, त्यांना आधुनिक तंत्रे, प्रक्रिया शिकविणे, बारकावे दाखवून देणे, यांची गरज आहे.

ग्रामीण कुटिरोद्योग मानल्या गेलेल्या या व्यवसायाला उद्योगरूपी यक्षिणीच्या कांडीचा कधीकाळी स्पर्श होईल आणि त्यामुळे आपल्याला समृद्धीचे दिवस येतील, असे स्वप्नही आदिवासी जनतेला पडले नव्हते! नाशिक जिल्ह्यातील ‘बोर्‍हे विभाग कामगार जंगल सहकारी संस्थे’ने ते प्रत्यक्षात आणून दाखविले आहे खरे! 
 

Tags: कुटिरोद्योग शिल्प माडिया आफ्रिका भवाडा कुकणा पेठ नाशिक वारली गुजरात कोढाळ दंडार जळगाव धुळे यवतमाळ नांदेड ठाणे महाराष्ट्र भुतडा शिघोडा शिणोली गोंड धार्मिक परंपरा हस्तकला आदिवासी Cottage Industry Sculpture Madiya Africa Bhawada Kukana Peth Nashik Warli Gujarat Kodhal Dandar Jalgaon Dhule Yavatmal Nanded Thane Maharashtra Bhutada Shighoda Shinoli Gond Religious Rituals Handcraft Adivasi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके