डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे सारे प्रकरण लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. दहावीस जणांवर खटले आहेत. काही जणांवर ब्रिटिश पार्लंमेंटला खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल कारवाई होऊ घातली आहे, ज्यांचे फोन व इंटरनेटवरील संदेश चोरण्यात आले अशा काहींना भरपाई दिली गेली. पण अद्याप असे अकराशे लोक तरी आहेत. त्यांनाही भरपाई द्यावी लागेल. अमेरिका, रशिया, तुर्कस्तान अशा काही देशांतील मरडॉक यांच्या कंपन्यांची चौकशी चालू आहे. न्यूयॉर्कमधील शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित अशा वाहिनीसाठी मरडॉक यांच्या कंपनीने गुंतवणूक केली असली तरी तिला परवाना नुकताच नाकारला गेला. वासे फिरू लागल्यामुळे एकंदर एक अब्ज डॉलर्सचा फटका बसेल असे सांगितले जाते. पण इलाज नाही. इतक्या वर्षांचे गैरव्यवहार अंगाशी येत आहेत.  

वृत्तसंस्था, वृत्तपत्रे, आकाशवाणी, टीव्ही तसेच वृत्तपत्रांच्या व टीव्हीच्या कंपन्यांचे मालक हे बातम्या प्रसारित करण्याच्या उद्योगातील प्रमुख घटक. तथापि आजकाल जे बातमी प्रसारित करणार त्यांतलेच काही बातमीत झळकू लागले आहेत. रशिया, चीन, अनेक हुकूमशाही देश व पाकिस्तान इत्यादीत सरकार पत्रव्यवसायिक व टीव्ही वाहिन्यात काम करणारांवर दडपशाही करत असल्यामुळे यास बळी पडणारे पत्रकार बातमीत येतात. पण पत्रकार व त्यांचे मालक हे विविध कारणांमुळे आजकाल प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत.  गेल्या काही दिवसांत जे पुन्हा प्रकाशात झळकले त्यांत रूपर्ट मरडॉक व त्यांचा मुलगा जेम्स यांचा क्रम वरचा लागेल. मरडॉक हे निर्बंध झुगारून व्यवसाय करत आले आहेत. सनसनाटी पत्रे ही त्यांच्या वृत्तीला पोषक असतात. पण त्यांना प्रतिष्ठाही हवी असते. यामुळे त्यांनी बराच खर्च करून ‘लंडन टाइम्स’ आणि अमेरिकेत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ही दैनिके घेतली. टाइम्स समूह घेतल्यामुळे ‘संडे टाइम्स’, ‘टाइम्स एज्युकेशन सप्लिमेंट’, ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ याही त्यांच्याकडे आल्या. या ब्रिटिश व अमेरिकन प्रकाशनामुळे त्यांनी प्रतिष्ठा काही प्रमाणात मिळवली असेल, पण त्यांचा मूळ पिंड लंडन व न्यूयॉर्कमधील सनसनाटी पत्रांतच दिसून येतो. 

लंडनमध्ये ‘न्यूज ऑफ दि वर्ल्ड’ आणि ‘सन’ या प्रकाशनांत मरडॉक पिता-पुत्र अधिक गुंतले होते. त्या दोन पत्रांनी व न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेमुळे त्यांच्यावर गंडांतर आले आहे, ते येणे आवश्यक होते. गेल्या वर्षापासून ही पत्रे व वृत्तसंस्था गाजत आहेत ते त्यांनी मोठे विक्रम केले म्हणून नव्हे तर त्यांनी गुंडगिरीचा पत्रव्यवसाय केला म्हणून. ‘न्यूज ऑफ दि वर्ल्ड’ या पत्रातले निरनिराळ्या वेळचे काही संपादक, वार्ताहर, व्यवस्थापक असे अनेकजण लोकांचे टेलिफोन, इंटरनेटवरील त्यांना येणारे व त्यांच्याकडून जाणारे संदेश इत्यादी चोरून ऐकण्याच्या व हस्तगत करण्याच्या उद्योगात होते. लंडनच्या पोलीस यंत्रणेतही त्यांनी हस्तक तयार केले. यामुळे सनसनाटी बातम्या देता येत होत्या आणि काही जणांना बदनामीचा इशारा देऊन शरण आणता येत होते. याचा कळस गाठला गेला तो एका मुलीच्या अपहरणाच्या प्रकरणामुळे. तेराएक वर्षांच्या या मुलीचे अपहरण झाले होते. तिचा टेलिफोनच्या वार्ताहराने शोध लावला आणि ती मुलगी बळी पडली असता तिच्या आईवडिलांचा ती जिवंत असल्याचा ग्रह करून देण्याच्या दृष्टीने बातम्या देण्याचा सपाटा लावला, पण ती मरण पावली असल्याचे उघड झाले आणि त्या बातमीची व बातमी देणारांची चौकशी करणे भाग पडले. 

यामुळे गौप्यस्फोट करणारांचा गौप्यस्फोट होऊ लागला. ‘न्यूज इंटरनॅशनल’, ‘न्यूज कॉर्पोरेशन’ त्यांची इतर पत्रे या सर्वांतील विविध थरांवरील लोकांच्यासंबंधी बातम्या येऊ लागल्या. या लोकांनी पोलीस यंत्रणा पोखरल्याचे दिसलेच आणि यामुळे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी मरडॉक यांच्या कंपनीतील अधिकारपदस्थांकडून पैसे, प्रवास इत्यादी लाभ लुटत असल्याचे बाहेर आले. तथापि मरडॉक, त्यांचे उच्चपदस्थ अधिकारी यांनी मजूर व हुजूर या ब्रिटनच्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या मुख्य नेत्यांपासून अनेकांवर मोहिनी टाकल्याची उदाहरणे जगजाहीर होऊ लागली. विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमरन आणि मजूर पक्षाचे अकरा वर्षे पंतप्रधान असलेले टोनी ब्लेअर हे मरडॉक यांच्या मोहजालात कसे व किती सापडले होते याच्या सुरस कहाण्या आल्या व त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले. पार्लमेंटमध्ये गदारोळ झाला. दोन्ही पक्षांचे माजी व आजी पंतप्रधानच नव्हे तर इतरही अनेक लोकप्रतिनिधी व मंत्री मरडॉक मोहजालात होते. सध्याच्या संयुक्त मंत्रिमंडळातील लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते व उपपंतप्रधान निक क्लेग हेही निर्लेप नसल्याचे दिसून आले. साहजिकच पार्लमेंटची चौकशी समिती स्थापन झाली आणि न्यायालयीन चौकशी चालू आहे. पोलीस तपासामुळे त्या चौकशीचा अहवालही येईल.

पहिला अहवाल आला आहे तो पार्लमेंटचा. रूपर्ट मरडॉक हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपनीच्या प्रमुखपदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्वाळा या अहवालाने दिला आहे. त्या समितीत पार्लमेंटमधील सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते. मजूर पक्ष विरोधी होताच पण लिबरल डेमॉक्रॅटिक पक्ष हा मंत्रिमंडळात असूनही त्याने मरडॉक यांच्या विरुद्ध मत दिले. यामुळे समितीचा अहवाल हा बहुमताचा झाला, हुजूर पक्षाच्या सभासदांना मरडॉक यांची काम करण्याची पद्धती मान्य नसली तरी त्यांना अपात्र ठरवण्यास त्यांची तयारीही नव्हती. गेल्या वर्षी पार्लेंटच्या समितीपुढे मरडॉक पितापुत्रांची अनेक तासांची साक्ष झाली ती मी पूर्ण एकली होती. साक्ष देताना रूपर्ट मरडॉक आपण त्या गावचे नसल्याचे अनेकदा दाखवत तर त्यांचे चिरंजीव जेम्स हे आपल्यापुढे पुरेशी व खरी माहिती आली नाही; आपल्या निरनिराळ्या दुय्यमांनी माहितीच दिली नाही आणि कंपनीचा कारभार अत्यंत चोख ठेवण्याचे आमचे धोरण आहे हेच पालुपद लावत होते. उत्तर मुद्दामच लांबलचक द्यायचे आणि सतत पुनरुक्ती करायची हे त्यांचे तंत्र होते. वॅटसन या मजूर पक्षाच्या सभासदास मरडॉक यांच्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या काही पत्रकारांचा फटका बसला होता. त्यांनी रागावून जेम्स मरडॉक यांस सरळच विचारले की, गुन्हेगार टोळीच्या साम्राज्याचे प्रमुख म्हणून आपण काम करत आहोत याची तुम्हाला कधी जाणीव झाली होती काय?

पार्लमेंटरी समितीपुढे मरडॉक पिता-पुत्रांनी कंपनीच्या कारभारातील गोंधळ आपल्याला माहीत नव्हता असे सांगताना वाटेल तितक्या खोट्या गोष्टी सांगितल्या. नंतर लॉर्ड जस्टिस लेव्हिसन या न्यायमूर्तीच्या न्यायासनापुढे साक्ष देताना या दोघांचा  हाच पवित्रा होता. यावर गार्डियनने अग्रलेखातच दोघांना प्रश्न विचारले? गार्डियनने काही वर्षे या प्रकरणाचा छडा लावण्यावर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा त्याने स्वत:च्या वृत्तपत्रात तसेच न्यूयॉर्क टाइम्समध्ये मरडॉक यांच्या कंपनीने कोणत्या वर्षांत भरपाई म्हणून कोणाला किती रकमा दिल्या याचा पाढाच वाचला आणि विचारले की हे सर्व प्रसिद्ध झाले पण मरडॉक पिता-पुत्र अज्ञानात कसे राहिले? 

अशा या मरडॉक यांच्या कंपनीला हुजूर व मजूर या दोन्ही पक्षांनी डोक्यावर का घेतले? हे मार्गारेट थॅचर यांच्यापासून चालू झाले. थॅचर यांच्याआधी इंग्लंडमध्ये अनेक कामगार पुढाऱ्यांनी सर्व क्षेत्रांतील उद्योग सतत बंद करण्याचे सत्र चालवले होते. थॅचर यांनी अनेक कायदे केले आणि हे सत्र बंद करण्याचा निर्धार दाखवला. मरडॉक यांनी टाइम्स कंपनी घेतली होती. तिथे वर्षभर संप चालला होता. तेव्हा मरडॉक यांनी लंडनच्या मुख्य भागापासून काहीसे दूर असलेले ठिकाण निवडले. अगदी गुप्तपणे अत्यंत आधुनिक अशी यंत्रसामग्री आणून नवे मुद्रणालय उभे केले. याची कोणालाही दाद लावून दिली नाही. मग एक दिवस ‘टाइम्स’ व ‘संडे टाइम्स’ व इतर प्रकाशने प्रसिद्ध करून सर्वांनाच धक्का दिला. पोलीस यंत्रणेच्या म्हणजे सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते.  तेव्हापासून मरडॉक हुजूर पक्षीय नेतृत्वाच्या गळ्यातले ताईत झाले. थॅचर त्यांना ब्रिटिश पंतप्रधानासाठी असलेल्या चेकरस येथील विश्रामस्थानी नाताळात आमंत्रण देत असत. तथापि नंतरचे हुजूर पक्षाचे व ब्लेअर हे मजूर पक्षीय पंतप्रधान मरडॉक यांच्या पूर्णपणे आहारी गेले तशा थॅचर गेल्या नव्हत्या.

आता बरीच माहिती बाहेर आल्यामुळे समजते की, जॉन मेजर हे पंतप्रधान असताना मरडॉकच नव्हे तर त्यांचे काही संपादक मेजर व त्यांचे सहकारी यांच्याशी अगदी खालच्या पातळीवरील भाषा वापरीत. एकदा मेजर यांच्या सरकारने कोणत्या तरी उपाययोजनेुळे लोकक्षोभ माजेल असे पाऊल टाकल्यावर सार्वजनिक प्रतिक्रिया काय, असे टेलिफोनवरून विचारले तेव्हा संपादकाने उत्तर दिले तुम्ही सर्व घाण करून ठेवली असून माझ्याजवळच्या डबड्यात ती साचली आहे. मला ती उपसावी लागेल. हे असले बोलणे, तेही पंतप्रधानाशी. टोनी ब्लेअर नाताळात मरडॉक यांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियास गेले होते. नंतर ते मरडॉक यांच्या मुलीचे मानलेले वडील झाले.

न्यायमूर्ती लेव्हिसन यांचा निवाडा प्रसिद्ध होणार आहे. पण सरकारी वकिलाने अतिशय सूक्ष्म रीतीने या प्रकरणाचा अभ्यास करून प्रश्न विचारले आहेत. यामुळे मरडॉक यांची अब्रू चव्हाट्यावर आली. पार्लमेंटरी समितीने मरडॉक यांना अपात्र ठरवल्यानंतर लेव्हिसन यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यास मरडॉक यांच्या ब्रिटनमधील पत्रव्यवसायाचे भवितव्य संकटात येईल. तथापि हा केवळ त्यांच्या पत्रव्यवसायाचा प्रश्न नाही. त्यांनी बीस्कायबी या उपग्रहाचा उपयोग करून चालणाऱ्या टी.व्ही. कंपनीतील गुंतवणूक वाढवून तिचा संपूर्ण ताबा मिळवण्याचे प्रयत्न चालवले असून त्याचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मरडॉक यांना या कंपनीत अधिक गुंतवणूक करून सर्व कंपनी त्यांच्या मालकीची करून द्यायची की नाही, यासंबंधी निर्णय घेण्याचे काम कॅमेरन यांनी सांस्कृतिक व क्रीडा इत्यादी खात्याचे मंत्री जेरेमी हंट यांच्याकडे सोपवले आहे. त्यांची मरडॅाक यांच्याशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. 

लेव्हिसन समितीने 24 एप्रिल रोजी मरडॉक यांच्या कंपनीतील संबंधित अधिकारी व हंट हे परवान्याचे प्रकरण हाताळणारे मंत्री यांचे सल्लागार यांच्यातील पत्रव्यवहार प्रसिद्ध केला आहे. सध्या होणारा विरोध बाजूला करून परवाना कसा देता येईल हे मरडॉक यांच्या अधिकाऱ्याने सुचवले असता हंट यांच्या सल्लागाराने कोणती अनुकूलता दर्शवणारी भाषा वापरली हे या पत्रव्यवहारावरून दिसून येते. पण याचमुळे कॅमेरन आणि हंट यांच्यावरच निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवून चालणार नाही हे उघड झाले आहे. यामुळे टीव्हीचा संपूर्ण ताबा मरडॉक यांच्या कंपनीकडे देणे पंतप्रधानांना सहज शक्य नाही. ही वाहिनी पैशाच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे. तिने 2011 साली 1 अब्ज 70 लाख डॉलर्स इतका नफा मिळवला. हे चाळीस टक्के भागीदारीवर. मरडॉक यांनी उरलेल्या साठ टक्के भाग भागभांडवलासाठी द्यावी लागणारी रक्कम आपल्यापाशी ठेवली आहे, पण अशी संपूर्ण मालकी मिळणे आता सुलभ नाही आणि मिळताही कामा नये.

बीस्कायबी या कंपनीच्या भागधारकांत आता मरडॉक यांच्याविरुद्ध वातावरण तयार झाले आहे. यामुळे भागधारकांनी निवडलेल्या संचालक मंडळाने जेम्स मरडॉक यांना मुख्याधिकारी हे पद सोडायला लावले. तसेच कंपनीच्या कायदेशीर रचनेची तपासणी होत असून साडेबारा टक्के गुंतवणूक असताना 39 टक्के मते देण्याचा अधिकार मरडॉक यांच्याकडे कसा, असा प्रश्न विचारला गेला आहे. हे सारे प्रकरण लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. दहा-वीस जणांवर खटले आहेत. काही जणांवर ब्रिटिश पार्लमेंटला खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याबद्दल कारवाई होऊ घातली आहे, ज्यांचे फोन व इंटरनेटवरील संदेश चोरण्यात आले अशा काहींना भरपाई दिली गेली. पण अद्याप असे अकराशे लोक तरी आहेत. त्यांनाही भरपाई द्यावी लागेल. अमेरिका, रशिया, तुर्कस्तान अशा काही देशांतील मरडॉक यांच्या कंपन्यांची चौकशी चालू आहे. न्यूयॉर्कमधील शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित अशा वाहिनीसाठी मरडॉक यांच्या कंपनीने गुंतवणूक केली असली तरी तिला परवाना नुकताच नाकारला  गेला. वासे फिरू लागल्यामुळे एकंदर एक अब्ज डॉलर्सचा फटका बसेल असे सांगितले जाते. पण इलाज नाही. इतक्या वर्षांचे गैरव्यवहार अंगाशी येत आहेत. 

पैसे द्या व प्रसिध्दी मिळवा 

बातमी देणारांचीच बातमी येण्याचा प्रकार चीनमध्ये घडला आहे. त्यासंबंधीचे बातमीपत्र नुकतेच आले ते न्यूयॉर्क टाइम्समध्ये. त्यावरून असे दिसते की, चिनी सरकार राजकीय बातम्या व लेख यांच्या प्रसिद्धीस किती अडथळे आणते व निर्बंध घालते हे सर्वांना माहीत झाले असले तरी न्यूयॉर्क टाइम्सने पैसे मोजा व प्रसिद्धी मिळवा या तंत्राची दिलेली माहिती अज्ञात होती. अमेरिकेतल्या एस्क्वायर या मासिकाच्या चिनी आवृत्तीने व्यक्ती वा कंपनी यांची प्रशंसापर माहिती देणारा मजकूर पैशाच्या मोबदल्यात छापण्याचे तंत्र अवलंबिले आहे. पानभर मजकुरास वीस हजार डॉलर्स लागतात. 

तथापि अमेरिकी प्रकाशनाच्या चिनी आवृत्तीपुरतेच पैसे मोजा व प्रसिद्धी मिळवा हे धोरण मर्यादित नाही. चिनी प्रकाशने यास अपवाद नाहीत. इतकेच नव्हे तर चीनमधील सरकारी मालकीचे उद्योग यात सामील आहेत. तुमच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मुलाखत चिनी सरकारी वाहिनीवरून दाखवायची असेल तर तासाला चार हजार डॉलर द्यावे लागतात. या प्रकारे पैसे घेऊन प्रसिद्धी करण्यास कायद्याने बंदी घातली असली तरी ती दुर्लक्षित केली जाते. अनेक कंपन्यांनी प्रक्षेपणासाठीचा आपला दर सांगणारी कार्डेच तयार केली आहेत. चिनी वार्ताहर काही परदेशी कंपन्यांच्या अधिकारपदस्थांच्या मनमोकळ्या मुलाखती घेतात, पण वाहिन्यांच्या कंपन्यांचे व्यवसायविभाग यातून पैसे मिळवण्याचे काम करतात. 

ऑगिलव्ही अँन्ड मेथर ही प्रसिद्धी व जाहिरात कंपनी आहे. पैशाच्या बदल्यात प्रसिद्धी मिळवण्याचे तंत्र वापरू नका असे सांगण्याचे काम आपली कंपनी करते असे ही कंपनी म्हणते. तथापि काही कंपन्या हे तंत्र नियमितपणे वापरतात. एका अमेरिकन कंपनीच्या हिशेब तपासणी विभागाची प्रमुख चिनी आहे. आपले नाव न देण्याच्या अटीवर तिने सांगितले की, तुमच्या कंपनीला चांगल्या गणल्या जाणाऱ्या प्रकाशनात प्रसिद्धी हवी असेल तर वाटेल तितके मार्ग मोकळे आहेत. चिनी एस्क्वायरने पानासाठी दहा हजार डॉलरप्रमाणे अनेक पानांचा मजकूर छापला आहे व यात खंड नाही. पण इतर एका प्रकाशनाचे उदाहरण नमूद करणे आवश्यक आहे. ते म्हणजे 21 सेंच्युरी बिझिनेस हेराल्ड. ते व्यापार उद्योगास वाहिलेले पत्र आहे. या पत्रात एका फ्रेंच कंपनीला प्रसिद्धी हवी होती. तिच्या व्यवस्थापकाने विचारणा केली तेव्हा कंपनीने स्वत: नव्हे तर तिची प्रसिद्धी करणाऱ्या पत्राच्या नऊ जणांना विमानाने चीनमधील कंपनीच्या द्राक्षांच्या मळ्यांत नेले आणि राहण्याजेवणाचा सारा खर्च केला.

न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीपत्रात म्हटले आहे की, प्रसिद्धी संबंधीच्या नियमांना अनेक प्रकाशन कंपन्या मुरड घालतात. यात जपान, फिलिपिन्स, युरोप व अमेरिका यांतील काही कंपन्या आहेत. अर्थात चीनमध्ये हे जितके सर्रास आहे तितके इतरत्र नाही. जगात आजकाल इतका पैसा खेळत आहे की, अनेक लोक व कंपन्या त्याच्या मोहात सापडतात असा निष्कर्ष बातमीपत्राच्या लेखकाने काढला आहे. चीनमध्ये राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली आहे. वृत्तपत्रे, वाहिन्या यांचाही अपवाद नाही. तथापि अर्थव्यवहार करणाऱ्या कंपन्या खुल्या व्यापाराचे नियम स्वीकारतात आणि त्यामुळे त्या चांगला नफा मिळवतात. वृत्तपत्रीय क्षेत्राबाबत हेच तंत्र आता अवलंबण्यात येत आहे. 

‘दि फायनान्शिअल टाइम्स’ या पत्राने असे वृत्त दिले आहे की, ‘दि पीपल्स डेली’ या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राने आता त्याची वेबसाइट सुरू केली आहे. हे पत्र 1948 मध्ये सुरू झाले. त्याने वेबसाइट सुरू करून जवळजवळ दोन कोटी डॉलर्स भागभांडवल म्हणून उभारले. न्यूयॉर्क टाइम्सने स्वत:च्या वेबसाईटसाठी जमवलेली रक्कम यापेक्षा कमी होती. याचप्रमाणे इतरही वाहिन्या व वृत्तपत्रांच्या वा प्रकाशनांच्या वेबसाईटसाठी भांडवल जमा केले जाणार आहे. हे वेगळेच पाऊल पडले आहे, ते टाकताना पीपल्स डेलीने म्हटले आहे की, त्यास व्यापक क्षेत्रात शिरायचे असून अनेक उपक्रम हाती घ्यायचे असल्यामुळे आर्थिक बळ वाढवणे आवश्यक आहे. चीनमध्ये काही जण फेसबुकसारख्या माध्यमाचा अवलंब करून जे लिखाण प्रसृत करतात त्यातले बरेचसे सरकारविरोधी असते. सध्या बो या अधिकारपदस्थाच्या विरुध्द माहितीचा पूर चालू आहे. तो सरकारच्या प्रोत्साहनाने चालला आहे. त्यामुळे चीनमध्ये प्रसारमाध्यमे स्वतंत्र झाली असे मानण्याचे कारण नाही. फायनान्शिअल टाइम्सच्या वार्तापत्राने म्हटले आहे की, अमेरिकेत फॉक्स न्यूज ही वाहिनी ज्याप्रमाणे रिपब्लिकन वा आर्थिकदृष्ट्या परंपरावाद्यांच्या हातातील बाहुली आहे तशी वाहिनी चीनमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रबळ राहील असे धोरण आहे. या वेबसाइटचे भागभांडवल कोणी खरेदी केले आणि वेबसाइटच्या कारभारात या भागधारकांना कितपत सहभागी होता येते व मतस्वातंत्र्य राहते हे पाहावे लागेल. तेव्हा ‘पीपल्स डेली’ने न्यूयॉर्क टाइम्सपेक्षा भांडवल अधिक उभे केले म्हणून ते पत्र व त्याचा हा विभाग पक्षाच्या नियंत्रणातून मुक्त झाला असे म्हणता येणार नाही. 

Tags: उत्तम नफा. खुला व्यापार पैशाचा मोबदला पैशाने जाहिरात भागभांडवल २ कोटी वेबसाईट संकेतस्थळ न्यूयॉर्क टाईम्स पीपल्स डेली चीन हुजूर पक्ष प्रश्नांचा भडिमार वृत्तपत्र गार्डियन संसदेत साक्ष लूट धमकावणे फोन रेकॉर्ड न्यूज इंटरनॅशनल सन न्यूज ऑफ वर्ल्ड लंडन जेम्स मर्डोक कायदेशीर कारवाई बडी आसामी माध्यम दिशाभूल चुकीची माहिती पार्लमेंट लंडन टाईम्स रूपर्ट मर्डोक परामर्श बातमी देणाराची बातमी गोविंद तळवळकर Asquire Paid Advertisment Capital 2 crore Website Newyork Times Peoples’Daily China Conservative Party Gardian Newspaper Hearing Threatening Phone Tapping News International Sun News of the World London James Murdock Law Action False Information Media Giant Parliament Misleading London Times Rupert Murdock Paramarsh Batmi denarachi batmi Govind Talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके