डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

असान्ज हा अराजकवादी असून सध्याची व्यवस्था त्याला नष्ट करायची आहे. त्याच्या आईने त्याला परंपरागत शिक्षण दिले नाही. अशा शिक्षणामुळे मुले परंपरागत विचार करतात व त्यांची स्वतंत्र वृत्ती संपुष्टात येते  असे तिचे मत असल्यामुळे असान्जला नेहमीचे शिक्षण मिळाले नाही. तो ज्या ब्रिटिश पत्रकाराच्या निवासस्थानात राहत आहे ते त्याचे वडिलार्जित आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था उखडण्याची क्रांती या प्रासादातून होणार असावी. ती केव्हा व्हायची ती होवो, पण आतापर्यंत प्रसिद्ध झालेली अमेरिकन परराष्ट्र खात्याची गुप्त कागदपत्रे वाचली तर त्यांत गौप्य कमी आणि त्याचा स्फोट वा स्फोटाचा आवाज मोठा असे म्हटले पाहिजे.

विकिलीक्सने प्रसारित केलेली कागदपत्रे काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यावर असांज हा कोणी नवा क्रांतिकारी पुढे आला असून त्याने नवी पत्रकारिता उदयाला आणली असे मत काहींनी व्यक्त केले. माहितीचा हक्क बजावला गेलाच पाहिजे असेही म्हटले जात होते. या हक्कावर गदा आली नाही, पण असांजच्या नव्या पत्रकारितेने निरपराध लोकांचे निष्कारण बळी जातील असा मजकूर प्रसिद्ध करण्याचा हक्क भोगायचा काय, हा प्रश्न आहे. त्याने उजेडात आणलेल्या सर्वच कागदपत्रांचे हे स्वरूप नाही, पण काहींचे आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची अडीच लाख गुप्त कागदपत्रे विकिलीक्सने उघडकीस आणून बरीच खळबळ उडवून दिली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘गार्डियन’, ‘ल माँद’, ‘दर स्पिगल’ अशा पत्रांतून ही कागदपत्रे प्रसिद्ध होत आली. इतका सर्व मजकूर प्रसिद्ध करणे या पत्रांना शक्य नसल्यामुळे संपादकीय हात फिरवून ती दररोज देण्याचे ठरले. या रीतीने परराष्ट्र खात्याची कागदपत्रे उजेडात आल्यावर सर्वांत अधिक गोंधळ अमेरिकन सरकारी गोटात उडाला. अध्यक्ष ओबामा आणि परराष्ट्रंत्री हिलरी क्लिंटन यांनी अनेक देशांची माफी मागितली. क्लिंटन यांनी तर काही देशांना भेट देऊन दिलगिरी व्यक्त केली. अमेरिका या रीतीने गोत्यात आल्यामुळे अनेकांना आनंद होणे साहजिक आहे, पण एकापाठोपाठ एका देशाच्या उच्चपदस्थांची खाजगीतील वक्तव्ये लोकांपुढे आल्यावर मात्र त्यांचा सूर बदलला. उदाहरणार्थ, राहुल गांधी यांनी लष्करी तोयबाच्या धोक्याप्रमाणे हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांचा देशाला धोका असल्याचे अमेरिकन राजदूतास सांगितल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता माजली आहे. प्रकाश करात हे त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे काँग्रेसवर सतत दडपण आणतात असा उल्लेख आल्यावर विकिलीक्स भारताच्या अंतर्गत बाबतींत हस्तक्षेप करत असल्याचे करात यांना समजले. यानंतर इतर काही राजकीय पक्षांबद्दल असाच गौप्यस्फोट झाल्यावर काय होते ते कळेलच.

ही कागदपत्रे प्रसिद्ध होऊ लागताच अमेरिकेतील काही राजकीय गोटांनी व भाष्यकारांनी अतिरेकी प्रतिक्रिया व्यक्त करून आपण किती अपरिपक्व आहोत हे आणखी एकदा दाखवून दिले. कोणी म्हणाले, विकिलीक्सचा प्रमुख ज्यूलियन असांज यास अमेरिकेत आणून त्यास सरकारी गुपिते फोडल्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा व्हावी. कोणी तर त्याला फाशी देण्याची मागणी केली. प्रत्यक्षात मात्र अमेरिकेचा उतावीळपणा विकिलीक्सच्या पथ्यावर पडला. दहा वर्षांपूर्वी न्यूयॉर्क व वॉशिंग्टन इथे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर नेमलेल्या चौकशी आयोगापुढे आलेल्या माहितीवरून असे दिसून आले की, अमेरिकेच्या ज्या सोळाएक गुप्तचर संघटना आहेत, त्यांत सहकार्य नाही. यामुळे त्या हल्ल्याची माहिती मिळूनही मुख्य यंत्रणेपर्यंत ती पोचवली गेली नव्हती. मग सरकारने गुप्त मानली जाणारी माहिती व्यापक प्रमाणावर प्रसारित करण्याचे ठरवले. यामुळे जवळपास तीस लाखांना विकिलीक्सने दिलेली कागदपत्रे अगोदर उपलब्ध होती. इतका खुला बाजार असल्यावर ही कागदपत्रे कोणाच्या हाती लागण्यास काही अडचण राहिली नाही. आता आवश्यक तितक्याच अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे मिळतील अशी व्यवस्था होत आहे. याच वेळेला असान्ज हा ऑस्ट्रेलियन नागरिक इंग्लंडध्ये राहत असताना त्याच्यावर खटला झाला. या खटल्याचा व सरकारी गुपितांचा काही संबंध नाही. स्वीडनमधील दोन तरुणींच्या बाबतीत गैरवर्तन केल्यासंबंधी तो आहे. त्याला जामीन मिळाला असून तो एका बड्या श्रीमंत पत्रकाराच्या प्रासादतुल्य निवासस्थानात राहत आहे.

असान्ज हा अराजकवादी असून सध्याची व्यवस्था त्याला नष्ट करायची आहे. त्याच्या आईने त्याला परंपरागत शिक्षण दिले नाही. अशा शिक्षणामुळे मुले परंपरागत विचार करतात व त्यांची स्वतंत्र वृत्ती संपुष्टात येते  असे तिचे मत असल्यामुळे असान्जला नेहमीचे शिक्षण मिळाले नाही. तो ज्या ब्रिटिश पत्रकाराच्या निवासस्थानात राहत आहे ते त्याचे वडिलार्जित आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था उखडण्याची क्रांती या प्रासादातून होणार असावी. ती केव्हा व्हायची ती होवो, पण आतापर्यंत प्रसिद्ध झालेली अमेरिकन परराष्ट्र खात्याची गुप्त कागदपत्रे वाचली तर त्यांत गौप्य कमी आणि त्याचा स्फोट वा स्फोटाचा आवाज मोठा असे म्हटले पाहिजे.

बहुतेक जाणकार लोकांना निरनिराळ्या देशांतील अधिकारपदस्थांची काही देशांच्या प्रमुखांबद्दल काय मते आहेत, याची कल्पना होती. सौदी अरेबियाच्या राजास इराणबद्दल काहीही प्रेम नाही आणि इराणकडे अण्वस्त्रे असता कामा नयेत असे त्याला वाटते हे काही गुपित नाही. मग गुपित काय? तर अमेरिकेने या विषारी सापाचे म्हणजे इराणचे मुंडके उडवावे हे सौदी राजाचे वक्तव्य. हे विकिलीक्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामुळे एक उघड झाले आहे की, इराणविरुद्ध आर्थिक दंडयोजना अमेरिकेने व इतर काही देशांनी केली असली तरी अरब देशांचे  राज्यकर्ते क्षुब्ध झालेले नाहीत आणि नेहमीप्रमाणेच ते स्वत:विरोधी उपाययोजना करण्यास तयार नसून त्यांना अमेरिका व पाश्चात्त्य देश यांनी या सापाचे मुंडके उडवावे असे वाटते. तसे ते उडवल्यावर त्यांच्याच देशात दहशतवाद्यांची संख्या वाढून ते पाश्चात्त्य देशांत दहशतवादी कारवाया करणार आणि सौदी अरेबिया मदरसांसाठी सढळ हाताने मदत करून या संस्थांतून दहशतवादी तयार होऊ देण्याची व्यवस्था करणार.

सौदी राजाला पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी हे अगदीच दुर्बळ आहेत असे वाटते यातही नवे असे काय आहे? याच रीतीने फ्रान्सचे अध्यक्ष, ब्रिटिश पंतप्रधान, यांच्याबद्दलचे अमेरिकन राजदूतांचे विचारही काही स्फोटक नाहीत. या दोघांना अमेरिकन राजदूतांनी दुर्बळ ठरवले आहे, पण अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत लोकांना अप्रिय वाटतील असे उपाय करण्याचे धैर्य या दोघांनीही दाखवले आहे, तर ओबामा अमेरिकेच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे वाढवून अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी तरतूद करत आहेत. मग दुर्बळ कोण? करझाई यांची राजवट कमालीची भ्रष्ट असून त्यांचा कारभार गलथान आहे, हे सर्वश्रुत आहे. यात गुप्त कागदपत्रांनी काय भर घातली? तर अफगाणिस्तानचा उपाध्यक्ष पाच कोटी वीस लाख डॉलर्स इतकी रक्कम घेऊन परदेशात जात होता या घटनेची. तसेच पाकिस्तानचे लष्कर आणि लष्करी गुप्त यंत्रणा ही भारतात दहशतवादी पाठवते आणि नागरी पुढाऱ्यांपेक्षा लष्करच वरचढ आहे, यासंबंधीचे आकलन या कागदपत्रांवरून होईपर्यंत सर्वजण अंधारात होते असे नव्हे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रसज्जतेची माहिती आताच बाहेर येत आहे असे नाही. लिबियाचा गडाफी कमालीचा लहरी आणि तऱ्हेवाईक आहे यावर प्रकाश टाकून काही नवीन हाती येत नाही. एक मादक युक्रेनी परिचारिका त्याला सतत बरोबर लागते, ही माहिती तुम्हा-आम्हांला मिळून करायचे काय?

सर्व देश गुप्त माहिती जमा करतात तशीच ती अमेरिका करते. प्रत्येक देशाला अशा यंत्रणेची आवश्यकता पूर्वापार वाटत आलेली आहे. ही माहिती जमा करून राजदूत व गुप्तचर यंत्रणा आपापल्या सरकारला ती पुरवतात. विकिलीक्सने उघड केलेल्या कागदपत्रांच्या मजकुरास ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मथळा दिला होता : ‘राजदूत की गुप्तहेर?’ सर्व देशांचे राजदूत व त्यांचे सहकारी सर्व गोटांतून सर्व प्रकारची माहिती गोळा करत आले आहेत, तेव्हा ते गुप्तहेर आहेत काय, हा प्रश्न निरर्थक आहे. अमेरिका अद्यापही शीतयुद्धाच्या वातावरणातून बाहेर आलेली नाही. म्हणून परदेशी सत्ताधाऱ्यांची मानसिक अवस्था कशी आहे; ते काही मानसोपचार करतात काय? याची माहिती घेण्याचा परिपाठ चालू आहे. तथापि परदेशी अधिकारपदस्थांची सही, क्रेडिट कार्डांचे नंबर इत्यादी जमवण्याची अमेरिकनांची खटपट हास्यास्पद कोटीला पोचली आहे आणि यूनोच्या प्रमुखावर नजर ठेवणे हा अतिरेक झाला. अर्थात परदेशी राजदूत व दूतावास यांच्यावर गुप्तचर यंत्रणेची नजर सर्वच देशांत असते. रशिया व अमेरिका यांनी शीतयुद्धाच्या काळात वा त्याआधी यासाठी खास प्रयत्न केले होते. यासंबंधी एक अनुभव नमूद करण्यासारखा आहे.

तीसएक वर्षांपूर्वी मी मॉस्कोला गेलो होतो. मुंबई व नंतर दिल्लीत अमेरिकन वकिलातीत वरिष्ठ पदावर माझ्या माहितीचे असलेले एक अधिकारी मॉस्कोच्या दूतावासात असल्याचे मला माहीत होते. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी त्यांच्या घरी नेले. तिथे आम्ही बोलत असताना फोनो लावला होता. त्यांना म्हटले, या फोनोमुळे उगाचच मोठ्याने बोलावे लागते. ते म्हणाले की या जागेत बोललेले नोंदण्याची यंत्रणा रशियन सरकारने केली असल्यामुळे फोनो लावला आहे. हेच अमेरिकन सरकारही रशियन व इतर राजदूतांच्या बाबत करत असणार यात काही शंका नाही. अशी ही कागदपत्रे वृत्तपत्रांनी प्रसिद्ध करावीत की नाही, यावरही बरीच चर्चा अमेरिकन व ब्रिटिश वृत्तपत्रांत झालेली वाचली. या प्रकारची माहिती हातात आल्यावर ती प्रसिद्ध करण्याचा मोह कोणत्याही संपादकास होणार. तेव्हा ही कागदपत्रे ज्या पत्रांनी प्रसिद्ध केली त्यांनी काही चूक केली नाही. मग प्रश्न राहतो तो आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका पोचेल असा मजकूर छापला गेला काय? ‘न्यूयार्क टाइम्स’च्या संपादकांनी पहिला हप्ता प्रसिद्ध करताना दिलेली माहिती या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहे.

त्यांनी लिहिले की, त्यांच्याकडे जेवढी कागदपत्रे आली ती वाचल्यावर काही धोकादायक ठरतील असे वाटल्यामुळे अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र खात्यातील संबंधित अधिकाऱ्यास ती दाखवण्यात आली आणि देशाच्या सुरक्षिततेला बाधा येईल, असे काही आहे काय, हे तपासण्यास सांगितले. या खात्याने काही मजकूर धोकादायक असल्याचे मत दिले. तेव्हा ‘टाइम्स’चे पत्रकार आणि परराष्ट्र खात्याचे अधिकारी यांनी एकत्रपणे तपासणी केली. ‘टाइम्स’च्या पत्रकारांनी काही बाबतींत खात्याचे मत मान्य केले तर काही बाबतींत केले नाही. यानंतर मजकूर प्रसिद्ध झाला. म्हणजे निव्वळ सनसनाटी म्हणून ही कागदपत्रे प्रसिद्ध केली गेली नाहीत. इतके करूनही संपादकीय गफलत झाली नाही काय? झाली, असे काहींनी उत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे असे की, या कागदपत्रांत पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण इत्यादी काही देशांत मानवी हक्क रक्षणाचे काम करणारे लोक आहेत, काही तालिबान इत्यादी दहशतवादी संघटनांची माहिती देणारे आहेत, त्यांपैकी काही ओळखले जातील असा मजकूर प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. काही अधिकारपदस्थांचे अधिकारपद जाण्याचीही शक्यता आहे.

लंडनच्या ‘संडे टाइम्स’ या पत्राचे नामवंत माजी संपादक हेरॉल्ड इव्हान्स यांनी इंग्लंडध्ये औषधामुंळे मुले जन्मत: अपंग, आंधळी आणि मतिमंद का होत होती, याचा शोध घेतला आणि त्यावर प्रकाश टाकणारी लेखमाला प्रसिद्ध केली. औषध कंपनीने खटला भरला, पण इव्हान्स जिंकले आणि औषधाचा दुष्परिणाम झालेल्यांच्या मातापित्यांना मोठी भरपाई मिळाली. म्हणजे त्या लेखमालेमागे लोकहिताची दृष्टी होती. तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने व्हिएतनाम युद्धासंबंधी लेखमाला प्रसिद्ध केली. व्हिएतनाम पेपर्स या नावाने ती गाजली. ती प्रसिद्ध करताना व्हिएतनाम युद्ध, अमेरिकन जनता व जग यांना खोटी माहिती देऊन कसे चालले होते हे उघड करण्याचा हेतू होता. विकिलीक्सने जो गौप्यस्फोट केला आहे त्यामागे कोणता हेतू आहे, हे असान्ज याने लिहिलेल्या काही लेखांवरून समजते. त्याने चार वर्षांपूर्वी लिहिलेल्या काही लेखांत म्हटले होते की, अमेरिका ही एक अधिकारशाहीवादी कटकारस्थानवादी शक्ती आहे. तेव्हा ही राजवट मूलत:च बदलली पाहिजे. ही राजवट जगभरची माहिती जमा करून तिच्या समान इतर राजवटींना पुरवते आणि मग कृती करते. यावर असान्जचा हेतू असा की, अमेरिकेसारख्या कटकास्थाने करणाऱ्या आणि तशाच इतर राजवटींना माहिती पुरवणाऱ्या देशाकडील गुप्त माहिती जगजाहीर केल्यास अमेरिकेला गुप्त माहिती मिळवणे कठीण होईल. तसेच असे अधिकाधिक गौप्यस्फोट केले तर अमेरिका गुप्त माहिती कमी प्रमाणात जमा करू लागेल. कालांतराने तिची सुरक्षा यंत्रणाच संकुचित होईल आणि जगात अधिक पारदर्शक समाज निर्माण करण्याचे आपले ध्येय साध्य होईल.

आता जी कागदपत्रे उघड झाली आहेत व आणखी होतील तेव्हा अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांतच नव्हे तर सर्व हुकूमशाही व दहशतवादी देशांत सामाजिक न्यायावर आधारित असा पारदर्शक समाज तयार होईल असे असान्ज यास वाटते. हे स्वप्नरंजन की वेडगळपणा? असान्ज याने प्रसारित केलेली कागदपत्रे वृत्तपत्रांनी संपादित करून प्रसिद्ध केली असली तरी असान्जच्या यंत्रणेने ती वेबसाइटवर दिली आहेत. त्यातील एकात अमेरिकेच्या तारायंत्रणेच्या भूमिगत तारा कोठे जातात याचा नकाशा असल्याचे वृत्त आहे. ते खरे असेल तर दहशतवाद्यांना वाट्टेल तितके निरपराध नागरिक मारण्याची आयतीच व्यवस्था होणार. अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा व्याप कमी करून तिला खच्ची करता येईल असे असान्ज यास वाटत असले तरी तिच्यावर व इतर विविध देशांवर या गौप्यस्फोटाचे काय परिणाम झाले? सर्वांचे एकमेकांशी होणारे व्यवहार पूर्ववत चालू आहेत. इराणविरुद्ध कोणते उपाय करायचे यापासून उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांचा बंदोबस्त कसा करायचा इथपर्यंत कुठल्याही हालचाली बंद झालेल्या नाहीत.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे स्तंभलेखक गॉर्डन क्रोव्हिट्‌झ यांनी लिहिलेल्या लेखात टेड कझिन्सकी याची माहिती दिली आहे. असान्जप्रमाणेच तोही अराजकवादी होता. मानवप्राणी यंत्रयुगामुळे आपल्या नैसर्गिक भावना विसरत चालला असल्यामुळे त्याला हे युग बदलायचे होते. त्याने वीस वर्षे टपालातून बाँब पाठवण्याचे सत्र चालवले. यात तिघे मरण पावले आणि तेवीस जखमी. त्याने यंत्रयुगाच्या निषेधार्थ पस्तीस हजार शब्दांचा प्रदीर्घ निबंध लिहिला होता, तो वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यास हे बाँबचे टपाल बंद करण्याची त्याची तयारी होती. म्हणजे हा व्यर्थ खटाटोप होता. गौप्यस्फोटामुळे अमेरिका खिळखिळी होऊ लागली काय? तसे काहीच दिसत नाही. उलट असान्जच्या यंत्रणेला काही प्रमाणात गळती लागली आहे. क्रोव्हिट्‌झ यांनी आणखी एका लेखात म्हटले आहे की, विकिलीक्स या यंत्रणेत काम करणाऱ्या काहींनी नवी यंत्रणा स्थापन केली आहे. त्यांचा प्रमुख आहे डॅनिअल डोमोस्चेट्‌ बर्ग. त्यांच्या नव्या यंत्रणेचे नाव आहे- ‘ओपनलीक्स’. डोमोस्चेट्‌ बर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे की, इराक युद्धासंबंधात चार लाख कागदपत्रे असान्ज प्रसिद्ध करायला निघाला होता. ते करताना ज्यांनी माहिती पुरवली होती त्यांची नावे गाळण्यास वा बदलण्यास त्याची तयारी नव्हती. यामुळे त्या माहिती देणाऱ्यांचे जीव धोक्यात येणार होते. म्हणून डोमोस्चेस्ट्‌ बर्ग व त्याच्या सहकाऱ्यांनी असान्जबरोबरचे संबंध तोडले.

त्यांची यंत्रणा राजकीय हेतूने प्रेरित नाही. असान्जने मात्र अमेरिका पांगळी करण्याचा हेतू बाळगला होता व आहे. डोमोस्चेट्‌ बर्ग व त्याचे सहकारी मिळतील ती कागदपत्रे संपादकीय संस्कार करून मग प्रसारित करणार आहेत. यामुळे राजकीय दडपणाचा प्रश्नच येणार नाही. विकिलीक्सने प्रसारित केलेली कागदपत्रे काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यावर असान्ज हा कोणी नवा क्रांतिकारी पुढे आला असून त्याने नवी पत्रकारिता उदयाला आणली असे मत काहींनी व्यक्त केले. माहितीचा हक्क बजावला गेलाच पाहिजे असेही म्हटले जात होते. या हक्कावर गदा आली नाही, पण असान्जच्या नव्या पत्रकारितेने निरपराध लोकांचे निष्कारण बळी जातील असा मजकूर प्रसिद्ध करण्याचा हक्क भोगायचा काय, हा प्रश्न आहे. त्याने उजेडात आणलेल्या सर्वच कागदपत्रांचे हे स्वरूप नाही, पण काहींचे आहे. शिवाय अराजकवादाचा अवलंब केलेल्यास प्रस्थापित सत्तेकडून पोलिससंरक्षण हवे असते हे विशेष. निरपराध लोक बळी गेले तरी चालतील, पण ते पाहण्यासाठी अराजकवादी सुरक्षित हवा असे हे क्रांतिकारी तत्त्वज्ञान आहे.

Tags: नवी पत्रकारिकता ज्यूलियन असांज विकिलीक्स गुप्त कागदपत्रे अमेरिका परराष्ट्र खाता गोविंद तळवलकर गौप्यापेक्षा स्फोटच मोठा परामर्श navi patrakarikta julian assange wikileaks gupt kagadpatre America parrashtra khata govind talwalkar gopyapeksha spotach mota Paramarsh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके