डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची नव्वदावी साजरी झाली, त्या वेळी अनेक माहितीपट तयार झाले. परंतु सोव्हिएत युनियन समाप्त झाल्याचा उल्लेख टाळण्यात आला.  फायनन्शिअल टाईम्सचे अर्थतज्ज्ञ मार्टिन वुल्फ यांचा जागतिकीकरणासंबंधीचा ग्रंथ निघाला व त्याची आवृत्ती चीनमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या, तेव्हा ‘सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही’ या उल्लेखास चिनी प्रकाशकाने आक्षेप घेतला. ‘त्या काळातील रशियाचे नेते’ असा उल्लेख हवा, असा त्याचा आग्रह होता. सत्तापिपासूंच्या यादीत हिटलर, लेनिन, स्टालिन व माओ यांचा उल्लेख असताना लेनिन व माओ यांची नावे गाळण्यास सांगण्यात आले.

अमेरिकेचे निवृत्त उपाध्यक्ष डिक चेनी यांनी आत्मचरित्रात चिनी प्रशासना-बद्दलचा एक अनुभव नमूद केला आहे. तो त्या देशाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वगामित्वावर प्रकाश पाडतो.  चेनी यांनी लिहिले आहे की, तेव्हा चीनचे पक्षाध्यक्ष असलेले व नंतर राष्ट्राध्यक्ष झालेले हु जिंताओ अमेरिकेत आले होते. त्यांना चेनी यांनी दुपारचे भोजन दिले. अध्यक्ष जॉर्ज बुश यांना चीनच्या अध्यक्षांना एक गुप्त संदेश पाठवायचा होता व तो चेनी यांनी हु यांना सांगावा, अशी बुश यांची सूचना होती.

भोजन संपल्यावर हु यांना चेनी वरच्या मजल्यावरील आपल्या वाचनाच्या खोलीत घेऊन गेले. तेथे दोघांतच भेट व्हायची होती. पण चेनी व हु हे आपल्या खुर्च्यांवर बसले नाही तोच खोलीचे दरवाजे उघडले गेले आणि रक्षक अडवत असताना एक चिनी गृहस्थ आत शिरला. तो होता चिनी कम्युनिस्ट पक्षाचा एक वरिष्ठ अधिकारी- ली झाओझिंग. तो चिनी अध्यक्ष जियान झमिन यांच्या मर्जीतील होता. त्याने एक खुर्ची ओढली आणि चेनी व हु यांच्यामध्ये त्याने आसन ठोकले. त्या भेटीत काय होते ते बीजिंगला कळवणे हा त्याचा हेतू होता. यामुळे गुप्त संदेश देणे अशक्य झाले. मग जी बोलणी झाली त्या वेळी हु पढवल्याप्रमाणे उत्तरे देत होते. 

दोन वर्षांनी, म्हणजे 2004 साली चेनी यांनी चीनला भेट दिली, तेव्हा हु जिंताओ चीनचे अध्यक्ष झाले होते. चेनी व त्यांची भेट झाली. त्यांच्यातील चर्चेची समाप्ती झाल्यावर केवळ हु यांनाच भेटून एक गुप्त संदेश देण्याचे बुश यांनी चेनी यांना सांगितले होते. या वेळी दोघांचीच बोलणी झाल्याने चेनी यांना समाधान वाटले. बोलणी झाल्यावर चेनी बाहेर आल्याबरोबर चेनी यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्ही दोघे काय बोलत होतात, तुमचा गुप्त संदेश काय होता हे बाहेर सर्व स्पष्टपणे ऐकू येत होते. 

या रितीने अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनाही स्वतंत्रपणे वाटाघाटी करू न देण्याची व्यवस्था चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. मग इतर अधिकारी व नागरिक यांची काय स्थिती हे पाहण्यासाठी एक पुस्तक उपयुक्त आहे. त्याचे लेखक आहेत रिचर्ड मॅग्रेगर. (The Party: The Secret World of China's Communist Rulers, Harper Collins) फायनान्शिअल टाइम्सचे प्रतिनिधी म्हणून मॅग्रेगर चीनमध्ये काही वर्षे वावरले. त्यांनी चिनी भाषेचा अभ्यास केला होता आणि चीनसंबंधी अनेक वार्तापत्रे त्यांनी लिहिली. त्यांची बदली झाल्यानंतरही ते मधूनमधून चीनचा दौरा करत असतात. 

चीनमधील वास्तव्यात व नंतर मॅग्रेगर यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, चीनने पाश्चात्त्य धर्तीची अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर काही अमेरिकन, तसेच पाश्चात्त्य देशांतील अर्थतज्ज्ञांना सल्लामसलतीसाठी आमंत्रण दिले जात होते. पण 2008 सालापासून या सर्व देशांची अर्थव्यवस्था अडचणीत सापडल्यावर त्यांच्या तज्ज्ञांकडून ऐकण्यासारखे काही राहिले नाही, हे चीनने स्पष्ट केले.  मग मॅग्रेगर सांगतात की, 2008 सालच्या उन्हाळ्यात बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत चीनचा उपपंतप्रधान व अर्थमंत्री क्युशान याचा सूर बदलेला आढळला. तुम्ही कोणते धोरण अंमलात आणता ते समजले, आमचे धोरण वेगळे आहे, हे त्याने अशा सुरात सांगितले की, चीनचाच मार्ग बरोबर आहे असा त्याचा अर्थ होता. हा क्युशान कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचा सभासद होता. त्यामुळे त्याच्या वक्तव्याला मोठा आधार होता. 

चीनचे सरकार नव्हे तर कम्युनिस्ट पक्ष हाच निर्णय घेतो आणि मंत्र्यांना व सरकारी अधिकाऱ्यांना पक्षाच्या हुकमतीत राहावे लागते. हा पक्ष जाहीररीत्या मार्क्सवादी सूक्ते बोलत असला, तरी त्याच्या नियंत्रणाखाली कमालीची निर्घृण अशी खाजगी अर्थव्यवस्था काम करत असते. पक्ष नेहमी समतेची भाषा करतो, पण आशियातील इतर देशांत जितकी विषमता आहे तितकीच चीनमध्ये आहे. कम्युनिस्ट पक्षाचे नियंत्रण तीन मुख्य यंत्रणांवर आहे. सर्व भरती पक्ष करतो, प्रचाराची साधने त्यांच्या हाती आहेत आणि लाल लष्कर त्याच्याच हुकमतीखाली आहे. यामुळे पक्ष सर्वगामी होतो. 

बीजिंगमधील एका प्राध्यापकाने म्हटले आहे की, पक्ष हा परमेश्वराप्रमाणे सर्वव्यापी, पण कोणालाच न दिसणारा आहे. राज्ययंत्रणेच्या प्रमुखपदी नऊ जण आहेत. त्यांची मुदत निश्चित आहे आणि बढती केव्हा हेही ठरलेले आहे. त्या सर्वांचे वेष सारखेच असतात आणि अधिकारावर असेपर्यंत प्रत्येकास केस काळे ठेवण्यासाठी जरूर ती खबरदारी नियमितपणे घ्यावी लागते. 

निरनिराळ्या पदांवर नेमणुका मतदानाने होत नाहीत. त्या आधी कोणाची भाषणे होत नाहीत. पक्षाची समिती ही सर्व निवड करते. पक्षाच्या अत्यंत सुरक्षित कार्यालयात संबंधितांना बोलावले जाते आणि निर्णय सांगितला जातो. अपवादात्मक परिस्थितीत चढलेले आवाज ऐकू येतात आणि भ्रष्टाचाराचा आरोप सांगितला गेला की इमारतीच्या बाहेर काढले जाते. मग स्थानबद्धता वा फाशी या शिक्षा अमलात येतात. 

भरभराटीला आलेला खाजगी उद्योग चालवणाऱ्या पण पक्षाच्या सदस्या असलेल्या एका महिलेचा अनुभव मॅग्रेगर यांनी सांगितला आहे. तिचे नाव चेन एलिअन. तिला मोटारींची बरीच हौस होती. तेव्हा ती त्या धंद्यात शिरली आणि आता तिच्या उद्योगाचा व्याप परदेशांतही पसरला आहे. ती नेहमी मर्सिडीजमधून फिरते आणि काही वेळा रोल्स रॉइसमधून. मॅग्रेगर यांनी कम्युनिस्ट पक्षाचा विषय काढताच तिचा सूर बदलला. ती आदरयुक्त भाषेत बोलत होती. पढवल्याप्रमाणे तिची उत्तरे होती.

डेंग यांनी आर्थिक क्षेत्रातील निर्बंध दूर करत असतानाच राजकीय क्षेत्रात पक्षाचे वर्चस्व वाढवण्याचे धोरण पक्षास शिकवले. आर्थिक क्षेत्रातील निर्बंध सैल होत गेले आणि सरकारी उद्योग झपाट्याने खाजगी मालकीचे होत गेले. सरकारी उद्योगातील पाच कोटी कामगारांना काढून टाकण्यात येऊन, आणखी 1 कोटी 80 लक्ष कामगार रेंगाळत चाललेल्या कारखान्यांत होते त्यांची इतरत्र बदली झाली. दक्षिण चीनमध्ये खाजगी उत्पादक अब्जावधीचा माल वॉलमार्टसारख्या परकी कंपन्यांना विकून श्रीमंत झाल्याचे डेंग यांनी पाहिले होते. यात अधिक भर पडावी म्हणून त्या भागात आणखी खाद्यउत्पादक केन्द्रे स्थापन करून त्यांनी निर्यातीसाठीच उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले. नंतर 97 सालात आग्नेय आशियात असलेल्या मंदीची झळ चिनी उद्योगांना लागली आणि त्यांना मिळालेले कर्ज फेडणे अशक्य होत गेले. 

याचा फायदा घेऊन चीनच्या सरकारने बँकांवर आपली पकड अधिक पक्की केली. बँकांच्या आधुनिकीकरणासाठी काही अब्ज डॉलर्सइतकी रक्कम गुंतवली गेली आणि अनेकांच्या नोकरीवर गदा आली. पण नंतर चीनची आर्थिक स्थिती अनेक पटीने सुधारली.  पक्षाच्या नियंत्रणाचा या कामी उपयोग झाला. चीनची आर्थिक प्रगती 1997 नंतरच्या दशकात फार मोठ्या प्रमाणावर झाली, तरी चिनी लोकांची आवक तितक्या प्रमाणात वाढली नाही. 

त्या काळात चीन ज्या कोणत्या देशांत तेल मिळेल त्याच्याशी करार करत राहिला व आजही त्यात खंड नाही. तोच जिथे तेलाच्या खाणी चालवायला मिळतील तिथे त्यांत गुंतवणूक केली जात होती. पण अशा खाणींतील तेल चीनचे उत्पादक स्वदेशातच आणीत होते असे नाही. उलट जे कोणी तेलाला अधिक भाव देतील त्यांना ते विकण्यात येत होते.

एका प्राध्यापकाने मॅग्रेगर यांच्याशी बोलताना सांगितले की, या तेलकंपन्यांवर कम्युनिस्ट पक्षाचे नियंत्रण असले तरी त्या म्हणजे अतिशय प्रभावी हितसंबंध होऊन बसले असून, चीनच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांचा पगडा आहे.  जगभर 2008 व 09 साली आर्थिक मंदीची लाट आली. तेव्हा चीनमधील बँका, त्यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा आणि केन्द्रीय बँक यांनी सावधगिरीचे धोरण अवलंबिले. पण कम्युनिस्ट पक्षाने या परिस्थितीचे अवलोकन करून बँकांना पैशाचा ओघ सुरू करायला लावले. त्यांनी जवळजवळ पन्नास टक्के अधिक कर्ज दिले. याच काळात वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमे यांच्यावरील पक्षाचे बंधन वाढले. अर्थव्यव्यवहार झपाट्याने वाढत असताना पक्षनेत्यांना सतत भीती वाटत होती, ती विविध कंपन्या व संस्था यांतील अधिकारी व इतर यांच्या समाजवाद व कम्युनिस्ट पक्ष यांच्यावरील निष्ठेची. यामुळे मधूनमधून काही उपाय केले जातात. 

पैसा वाढत गेल्यावर आणखी एक बदल झाला. तो म्हणजे लाच देण्याघेण्यातील वाढ. यातून पक्षाचे अधिकारीही सुटले नाहीत. पक्षाने आपले नियंत्रण वाढवून विद्यापीठांतील नेमणुका अधिकच नियंत्रित करण्याचे तंत्र अवलंबिले. पक्षाचे नियंत्रण वाढत गेल्यावर कोणत्याही कंपनीच्या संचालक मंडळासही फारसे स्वातंत्र्य राहिले नाही. सर्व मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकीच्या आधी पक्षाच्या संबंधितांची बैठक कंपन्यांतच घेण्याचा प्रघात रूढ झाला. 

कारखानदारी वाढवण्याच्या मोहिमेचा अतिरेक इतका झाला आहे की, झिआंग या नदीच्या आसपास अनेक कारखान्यांची मालिका गुंफली गेल्यामुळे त्या नदीचे पाणी कमालीचे दूषित झाले तरी कोणी काही करू शकत नाही. या कारखान्यांतील नेमणुका स्थानिक पक्षाच्या चिटणीसाने केल्या आहेत. त्या भागातील लोक चेष्टेने म्हणतात की त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यास चहा दिला तर तो पीत नाही, कारण त्याला वासच सहन होत नाही. पक्षातील अधिकारपदस्थांच्या व इतरांच्या भ्रष्टाचाराला काही मर्यादा राहिलेली नाही. पक्षाच्या स्थानिक चिटणीसाचे स्थान हे सर्वांत महत्त्वाचे असते, कारण त्याच्या संमतीशिवाय पान हलत नाही. मग अनेक धनाढ्य होत जातात. तुम्ही भ्रष्ट असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असा समज सर्व देशभर रूढ आहे.  ‘डिरेक्टर ऑफ द बीजिंग रिप्रझेन्टेटिव्ह ऑफिस’ या नावाची कादंबरी याच विषयावर असून ती कमालीची लोकप्रिय झाली.

वँग झिआओफांग हा 1990 च्या दशकात शेनयांग या कारखानदारीच्या केन्द्राच्या शहरात उपमहापौर होता. त्याने अनेक लक्ष डॉलर्स इतकी लाच घेतली. तोच आपल्या हाताखालच्या लोकांकडून भेटवस्तू व ठोक रकमा स्वीकारत होता.  शांघायजवळच्या पोर्तुगीजांच्या मालकीच्या बेटावर जुगारीचा मोठा अड्डा होता. तिथे हा उपमहापौर जात असे. त्याने काही दिवसांत चार कोटी इतकी रक्कम बुडवली होती. नंतर 2001 साली त्याला गोळी घालून ठार करण्यात आले. नोकऱ्या देण्यासाठी लाच घेणे हे सर्रास चालत आले. शांघायची भरभराट वेगाने झाली आणि त्यातील भ्रष्टाचार शिगेला पोचला, तेव्हा हु जिंताओ यांनी खास मोहीम काढून अपराधींविरुद्ध उपाय योजले. 

शांघायमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरही काही कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. शुद्धिकरणाच्या मोहिमेत काही जण बळी गेले. या शांघायची भरभराट इतकी झाली की, अगोदरच्या तीस वर्षांत राजधानी बीजिंगने या शहरासाठी जितकी रक्कम दिली होती, त्याच्या अनेक पटीने शांघायने राजधानीस परत केली. 

साहजिकच पक्षातही शांघायचे अधिकारी व पक्षनेते यांचे वजन वाढले. इतकेच नव्हे तर शांघायच्या प्रसारमाध्यमांनाही इतर शहरांतील माध्यमांपेक्षा अधिक सवलत मिळते. तथापि शांघायच्या सत्ताधाऱ्यांना बांधकाम उद्योगातील एका बलाढ्य गृहस्थाने कसे चांगलेच गोत्यात आणले त्याची मॅग्रेगर यांनी दिलेली माहिती लक्षात घेणे आवश्यक आहे. झाऊ झेंगी हा बांधकाम व इतर उद्योग करून अब्जाधीश झाला होता. पण त्याने प्रस्थापित यंत्रणेलाच धक्का दिल्यामुळे ती त्याच्यावर उलटली आणि तो राजकीयदृष्ट्याही लक्ष्य बनला. त्याच्यासंबंधी बीजिंगमध्ये बातम्या येऊ लागल्या तेव्हा शांघायच्या पक्षाविरुद्ध आलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी त्या लक्षपूर्वक ऐकल्या. 

झाऊ हा सामान्य कुटुंबातून वर आला होता. सरकारी उद्योग अंशत: खाजगी मालकीचे होऊ लागले तेव्हा त्याने अगोदरच ते खरेदी करण्याचे तंत्र अवलंबिले. त्यांच्या व्यवहारात झालेल्या फायद्यातून शांघायमध्ये जमीन खरेदी करण्यास त्याने सुरुवात केली. त्याचा उद्योग वाढत गेल्यावर त्याने शांघाय व हाँगकाँगमध्ये अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या. या रितीने चीनमधील सातव्या क्रमांकाचा धनिक अशी त्याची गणना होऊ लागली. झाऊला अटक झाली त्याच्या आठवडाभर आधी तो ब्रिटिश राजदूताने दिलेल्या मेजवानीस हजर होता. 

तो म्हणाला की त्याच्यासारख्या नवश्रीमंतांना प्रारंभीच्या काळात चांगली अभिरुची निर्माण करण्यास कठीण गेले. त्याने त्या काळात स्नानगृहास सोन्याने मढवले. पुढे त्याने वागण्यात बदल केला व फक्त चांगल्या दर्जाच्या वस्तू घेण्यास सुरुवात केली. आपल्या मुलाला इंग्लंडमधल्या कोणत्या शाळेत ठेवले ते त्याला आठवत नव्हते. त्याने मुलाला फोन करून शाळेचे नाव विचारले. तीच शाळा आपण निवडली कारण ती सर्वांत महागडी होती, असेही तो म्हणाला.

झाऊ याने एका जमिनीचा सौदा करताना आसपासच्या इमारतींची डागडुजी करण्याचा करार केला होता. पण तो पाळला जाण्याची लक्षणे दिसली नाहीत, तेव्हा रहिवाशांनी उठाव केला. या प्रकरणाचा तपशील देण्याचे कारण नाही. ते झाऊच्या अंगावर शेकले आणि त्याच्या इतर उद्योगांची चौकशी होऊन त्यास अटक झाली व नंतर दोन वर्षांची शिक्षा भोगून आल्यावर त्याचा पूर्वीचा उद्योग जोमाने सुरू झाला. शांघायमध्ये प्रचंड खर्चिक बांधकामांना काही मर्यादा राहिली नव्हती आणि झाऊसारख्यांची यामुळे चंगळ होती. तथापि 2004 साली आर्थिक अडचणीमुळे सरकारला काही बंधने घालणे भाग पडले. यामुळे सुलभ कर्ज मिळणे अवघड झाले. या स्थितीत शांघायच्या खर्चिक योजनांबद्दल तक्रारींना कमतरता राहिली नाही. झाऊ यात सापडणे अनिवार्य होते. पण शांघायचा पक्षप्रमुख चेन हा सर्वाच्या मुळाशी होता. त्याला अठरा वर्षांची शिक्षा झाली. या साऱ्या प्रकरणासंबंधी एक पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात बीजिंगमधील एका सरकारी अधिकाऱ्याने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेवर बंधन घालणे आवश्यक असल्याचे मत दिले आहे. 

त्याला ही मोहीम थांबायला हवी असल्याचे कारण असे की, तिच्यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकारपदस्थांची नाचक्की होते व त्यामुळे पक्षाची पक्कड ढिली होण्याचा धोका असतो. त्याने म्हटले की, भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे आजकाल बराच गडगडाट होतो व पाऊसही पडतो. पण हा वादळी पाऊस संपुष्टात आल्यावर मग मात्र मधूनमधून गडगडाट होतो, पण पाऊस विशेष पडत नाही आणि नंतर तर गडगडाटही होत नाही.

भ्रष्टाचार प्रतिबंधाचे काम पूर्णतेस जाणे शक्य नाही, कारण भ्रष्टाचारात गुंतलेले लोक थोडे नाहीत, असे या अधिकाऱ्याचे मत आहे. तो विचारतो की, या प्रकारच्या मोहिमा काढून आपण आपल्याला सत्तेवरून खाली आणणार काय? हे चालू शकणार नाही आणि म्हणून ही मोहीम थांबलीच पाहिजे, अशी या अधिकाऱ्यांची मागणी होती.  कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्चपदी हु जिंताओ आहेत. तेच देशाचे अध्यक्ष व सरसेनापती आहेत. पण पक्ष-चिटणीस हे पद देशाचे अध्यक्षपद व लकर-प्रमुख या दोन्ही पदांपेक्षा वरचे आहे. हु हे पक्षात खालपासून वर चढत आले. आपल्या सर्वोच्च पदाच्या काळात त्यांनी स्वत:ची प्रतिमा सम्राटाप्रमाणे बनवली आहे. 

वरिष्ठ पदाधिकारी चिनी लोकांत फारसे मिसळत नसल्यामुळे नऊ प्रमुखांपैकी फार थोड्यांना त्यांचे दर्शन झाले आहे.  नऊ प्रमुखांपैकी चौथ्या क्रमांकावर आलेला जिआ क्विंगलिन हा चांगला धिप्पाड, उंच व गलेलठ्ठ आहे. तो ज्या प्रांताच्या प्रमुखपदावरून पहिल्या नऊ अधिकारपदस्थांत दाखल झाला, त्या प्रांतात 6 अब्ज डॉलर्सचा घोटाळा झाला होता. यासाठी काहींना कडक शिक्षा झाल्या, पण हा व त्याची पत्नी यांना बाधा झाली नाही. 

चीनमधील पन्नास कंपन्या या सर्वांत मोठ्या असल्या आणि त्यांच्या कार्यालयांतील टेबलावर अनेक फोन आले, तरी त्यातला लाल रंगाचा फोन सर्वांत प्रमुख मानला जातो. असा फोन असणे म्हणजे उपमंत्र्याच्या दर्जाचे स्थान मिळण्यासारखे असते. त्यामुळे लाल फोन हे मानाचे चिन्ह समजले जाते. एका बँकेच्या प्रमुखाने मॅग्रेगर यांना सांगितले की, तो फोन वाजला की, तो ताबडतोब उचलून बोलणे हे योग्य. एका उपमंत्र्याने मात्र असे सांगितले की, लाल फोनवर अनेकदा आपल्या मुलास वा इतर नातेवाईकांना  नोकरी देण्याची विनंती होते. मग परीक्षेला बसण्याची तयारी हवी, असे आपण उत्तर देतो. ती परीक्षा बरीच अवघड असते. 

पक्षाच्या केन्द्रीय समितीत पूर्ण व अर्धवेळचे मिळून 370 सभासद आहेत. ती समिती पॉलिट ब्युरोचे सभासद निवडते.  सरकार अनेक घोषणा रोज करत असले तरी पॉलिट ब्युरो व त्यातही त्याची अंतर्गत समिती देशाच्या सर्व मुख्य प्रश्नांसंबंधी धोरण ठरवते. यात आर्थिक व परराष्ट्रविषयक प्रश्न येतात; अनेकविध नेमणुका, सर्व सार्वजनिक उद्योग यांचे नियंत्रणही येते. 

रूपर्ट मरडॉक नव्वदीच्या दशकात बीजिंगमध्ये गेले असता मॅग्रेगर यांना म्हणाले की, त्यांना एकही चिनी कम्युनिस्ट भेटला नाही. पण मॅग्रेगर यांच्या मते हे शक्य नाही. ते लिहितात की, अगदी छोट्या पदावरील साधा अधिकारीही कम्युनिस्ट किंवा पक्षाचा सभासद असतो. जर कोणाला एखाद्या उद्योगात व तेही प्रसारमाध्यमांत गुंतवणूक करायची असेल, तर चीनमधील कम्युनिस्ट अधिकाऱ्यांची पदोपदी गाठ घेतल्याशिवाय पान हलत नाही. नंतर अनेकदा प्रयत्न करून 2002 साली मरडॉक यांना डिंग गुआंगेन यांची भेट मिळाली. गुआंगेन हे पक्षात तेव्हा आठव्या क्रमांकावर होते. ही भेट झाल्यानंतर चीनमध्ये प्रसारमाध्यमांत शिरकाव करण्यासाठी मरडॉक यांना डिंग यांच्या मुलाला कंपनीत अधिकारपद देऊन एक कंपनी स्थापन केली; परंतु 2009 उजाडले तरी पुढे काहीच निष्पन्न झाले नव्हते.

चिनी कम्युनिस्ट पक्ष सर्वगामी असला तरी तो उघडपणे कोणाला जाणवत नाही. त्याच्या अनेक समित्या आहेत आणि त्यांचे कार्यही उघड्यावर चालत नाही. पक्ष मंत्रिमंडळास धोरण घालून देतो आणि मंत्र्यांना ते धोरण अमलात आणायचे असते.  चीनचा जागतिक व्यापार-उद्योग वाढत गेल्यावर आंतरराष्ट्रीय कायदे-तज्ज्ञांचे महत्त्व वाढले. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात या तज्ज्ञांना सुलभपणे प्रवेश मिळतो.  न्यायाधीश पक्षाशी एकनिष्ठ असले पाहिजेत हा दंडक आहे. पक्षनिष्ठेस प्राधान्य देऊनच सर्व कायदे केले जातात. चीनचे सर्वोच्च न्यायाधीश वँग हे या परंपरेचे पालन करण्यात वाकबगार आहेत. ते कायद्याचे विद्यार्थी कधीही नव्हते. मध्य अन्हुइ या प्रांतात ते पोलीस होते. त्यांची सर्वोच्च न्यायाधीशपदावर 2008 साली नेमणूक झाली. 

वँग यांची राजकीय निष्ठा वादातीत आहे आणि याच जोरावर त्यांना हे उच्च पद मिळाले. राजकीय निष्ठेसंबंधातील संशयामुळे अनेकांना आपली पदे सोडावी लागतात. चीनने आर्थिक विकासाचा मार्ग स्वीकारला आणि तीस वर्षांच्या कालावधीत मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे काम त्याने अंगावर घेतले. देशाची आर्थिक व्यवस्था दर आठ वर्षांनी दुपटीने वाढेल, असे धोरण अमलात आणले. यामुळे लाखो लोकांचे स्थलांतर निकडीचे ठरले. यामुळे ग्रामीण भागातून लोकाचे लोंढे शहरात आले. त्यांची व्यवस्था करण्यासाठी बांधकाम रस्ते इत्यादी आले. वाहने बेसुमार वाढली. तथापि यामुळे एकविसाव्या शतकात चीनमध्ये अनेक प्रकारचा अंतर्विरोध वाढत गेला आहे. 

लेनिनच्या तत्त्वाप्रमाणे कम्युनिस्ट पक्ष समाजाच्या अंतरंगात शिरला पाहिजे. पण अर्थव्यवहार इतका व्यापक व गुंतागुंतीचा झाला आहे की, समाज पक्षात शिरत आहे; कारण समाजाच्या मागण्या व आकांक्षा वाढत जात आहेत. यास तोंड देणे पक्षास सोपे जात नाही. चिनी समाज श्रीमंत होत असताना त्यातील विषमता वाढत गेली आहे. इतकी विषमता अमेरिका व इंग्लंडमध्ये नाही. अमेरिका वगळल्यास चीनमध्ये जितके अब्जाधीश आहेत, तितके जगातल्या कोणत्याही देशात नाहीत. 

2001 सालात चीन श्रीमंत होत असताना खालच्या पातळीवरच्या दहा टक्के लोकांची स्थिती अधिक खालावली. उलट वरच्या दहा टक्के लोकांची मिळकत वर्षाला सोळा टक्क्यांनी वाढत होती. एकंदर परिस्थिती बदलत गेली त्या प्रमाणात पक्षासही बदल करणे भाग पडले. पक्षाचा राजकीय पाया ग्रामीण भागातील शेतकरी व गरीब समाज होता. पण त्याच लोकांना धनिकांबरोबर जमवून घेण्यास पक्ष प्रवृत्त करत असतो. बाजारास प्राधान्य देणारी व्यवस्था स्वीकारल्यावर नव्या सुशिक्षित आणि संपन्न तरुण वर्गाशी जमवून घेणे अनिवार्य झाले. 

लोकांना हे समजावून देण्याचे काम पक्ष करत असतो. पक्षात 1978 पर्यंत शेतकरी व कामगार यांचे प्राबल्य होते. आता विद्यार्थी आणि धनिक यांना सामावून घेण्यात येते. त्यांचे पक्षसदस्यांतील प्रमाण 255 टक्क्यांनी वाढले आहे.  विद्यार्थी व उद्योजक पक्षाचे सभासद होतात, कारण त्यामुळे पक्षनेत्यांशी संपर्क वाढून पुढचा मार्ग सुकर होतो. 1989 मध्ये तियानमेन चौकात निदर्शकांच्या विरुद्ध पाशवी बळाचा वापर करावा लागला होता. पक्षाचे 4 कोटी 80 लक्ष सभासद होते व त्यातल्या दहा टक्के सभासदांची तपासणी करण्यात आली. तसेच सरकार, प्रसारमाध्यमे इत्यादींतही अशीच तपासणी झाली. त्यामुळे देशात बरीच अस्वस्थता निर्माण झाली. 1991 मध्ये काही अधिकारी, पत्रकार व प्राध्यापक यांची बैठक होऊन तीत एक जाहीरनामा काढण्यात आला होता. चीनच्या मध्यवर्ती बॅन्केचा उपगव्हर्नर चेन युआन या बैठकीत होता असे म्हणतात.

सोव्हिएत युनियनमधील कम्युनिस्ट राजवट घसरू लागली होती. तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केवळ लष्करावर नियंत्रण पुरेसे नाही तर सर्व आर्थिक व्यवहारही पक्षाच्या नियंत्रणाखाली आणला पाहिजे असा निर्णय घेतला. पण एवढ्याने भागणार नाही हे युआनने ओळखले होते. पक्षाने आपली वैचारिक बैठकच बदलण्याची आवश्यकता त्यास वाटू लागली.  युआन 80 च्या दशकाच्या मध्यावर वॉशिंग्टनला आला होता. टॉ रॉबिनन या राज्यशास्त्रज्ञाने त्यास जेवण दिले, तेव्हा टॉने युआन यास सांगितले की तुम्ही नवे आर्थिक धोरण स्वीकारले आहे. मुक्त अर्थकारण आणि त्याच वेळी कम्युनिस्ट विचारसरणी व पक्षाचे नियंत्रण यात काही सुसंगती नाही. यावर युआन म्हणाला,   ‘हे पहा, आम्ही म्हणजे कम्युनिस्ट पक्ष आहोत आणि कम्युनिझम म्हणजे काय, हे आम्हीच ठरवणार.’

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या धोरणात बदल केला. सार्वजनिक क्षेत्राची प्रगती मंदावली होती तेव्हा पक्षाने नवा मार्ग स्वीकारला. त्याने सरकारी यंत्रणेची साफसफाई केली आणि सार्वजनिक उद्योगांचीही केली. यातून जे वाचले त्यांना प्रोत्साहन दिले. उद्योगक्षेत्र अधिकाधिक अद्ययावत करण्याच्या दिशेने पावले टाकली. यामुळे पक्षही बळकट करता येईल असे धोरण आखले.

डेंग यांच्यानंतर जिआंग हा पक्षाचा सरचिटणीस नेमला गेला. तो लाल लष्कराचाही प्रमुख झाला. नंतर हु जिंताओ हा अधिकारपदावर आला. पण लष्करावर विसंबून राहणे त्याला अवघड वाटत आले तरी त्याने लष्करावरील खर्च सतत वाढवत नेला. मग पहिल्या काही वर्षांत सरकार व लष्कर यांनी चढाईचे धोरण अवलंबिले. यामुळे तैवानवर तोफा डागल्या जात. परंतु नंतर लष्कर अधिकाधिक समर्थ करत असताना अमेरिका व पाश्चात्त्य देश यांच्याशी दोन हात करण्याचे धोरण अमलात आणायचे नाही असे ठरवण्यात आले. लष्कर समर्थ करायचे तर ते आधुनिक करणे अनिवार्य होते. हे होत गेले त्याबरोबर लष्कर स्वयंपूर्ण होऊ लागले. यामुळे पक्षाची लष्करावर कितपत हुकमत राहणार असा प्रश्न पक्षनेतृत्वास सतावत असतो. 

सैनिक त्यांच्या सेवाकाळात बांधकाम व इतर तांत्रिक कौशल्य यात पारंगत होत गेले होते. ते निवृत्त झाल्यावर त्यांना चीनच्या सरकारने व पक्षाने देशाच्या दूरच्या भागांत औद्योगिक वसाहती वसवण्याच्या कामात गुंतवले. काही जणांना कायद्याचे शिक्षण देण्यात आले, तर काहींना व्यापाराचे.
पक्षाच्या पॉलिट ब्युरोत एक काळ लष्करी अधिकाऱ्यांचे प्राबल्य होते. आता केवळ दोघेच लष्करी गणवेष घातलेले आहेत. पक्षाचे तैवानविषयक धोरण बदलल्यावर लोकांची ये-जा सुरू झाली. 

ऐंशीच्या दशकातच शांघाय व इतर भागात हजारो तैवानी, कामाला येऊ लागले आणि हजारो तैवानी चीनमध्ये कंपन्या स्थापन करून उद्योग-व्यापार करू लागले. चीनची आर्थिक प्रगती होत गेली त्याबरोबर तैवान सामील करून घेण्याची भाषा मागे पडली. बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सामन्यांना प्रारंभ होण्याच्या आठवडाभर आधी सर्वांत मोठ्या प्रमाणावर दूधपुरवठा करणाऱ्या सान्तु डेअरीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या डेअरीचे दूध दूषित असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. पण त्या दुर्लक्षित राहिल्या. 

ऑलिम्पिक सामन्याच्या वेळी येणाऱ्या असंख्य लोकांना तसे दूध दिल्यास देशाची अब्रूच जाणार होती. म्हणून ही बैठक बोलावली गेली व अधिकाऱ्यांना दूषित दुधासंबंधी भक्कम पुरावाच देण्यात आला. रात्रभर बैठक चालली. शेवटी सान्तुच्या प्रमुख श्रीमती तिआन यांनी निर्णय दिला की, दुधाच्या ज्या पावडरीचा वापर केला जातो, ती पावडर बंद करून वेगळी वापरावी आणि झालेल्या प्रकाराबद्दल कसलीही वाच्यता करू नये. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्या आणि सप्टेंबरमध्ये दूषित पावडरीचे प्रकरण आणि अनेक चिनी मुलांच्या आजाराच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या, तेव्हा एकच कल्लोळ झाला. हे स्पष्ट झाले की, 2 लाख 90 हजार मुलांना या दूषित दुधाची बाधा झाली होती. 

चीनमध्ये एकाच मुलाला जन्म देण्याचा सरकारी हुकूम आल्यामुळे यांतील बरीच एकुलती एक मुले होती. अशा बहुतेकांना मूत्रपिंडाच्या रोगाने जन्मभर त्रस्त राहावे लागेल.  पुढच्याच वर्षी झँग बाओक्विंग या प्रशिक्षण मंत्र्याने तक्रार केली की, गरीब मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा स्पष्ट हुकूम काढला असला, तरी अनेक विभागांत तो अमलात येत नाही.  स्थानिक अधिकारी बीजिंगमधून निघालेल्या हुकमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. या अधिकाऱ्यांना स्वतंत्र प्रसारमाध्यमे व लोक यांना तोंड देण्याचा प्रसंग येत नसल्यामुळे ते मोकाट सुटले आहेत, अशी अनेक जण तक्रार करत आले आहेत. 

सान्तु ही डेअरी ज्या भागात आहे तेथील सरकारी अधिकाऱ्यांनी दूषित दुधाच्या संबंधात बीजिंगला काही कळवलेच नव्हते. या अधिकाऱ्यांचा बेबंदपणा महसूल वाढवण्याचा बाबतीत अधिकच प्रकट होतो. हुबेइ या प्रांताचे 2009 मधील या संबंधातील उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्या प्रांतास आर्थिक अडचणीमुळे आपल्या योजना पुऱ्या करणे कठीण जाऊ लागले. तेव्हा या प्रांताच्या एका विभागाच्या अधिकाऱ्याने असा हुकूम जारी केला की, वर्षात सिगारेटची 23 हजार पाकिटे उपयोगात आणलीच पाहिजेत. याबद्दल बराच गदारोळ उठला आणि मग तो हुकूम मागे घेणे भाग पडले. उद्योजक आपल्या उद्योगात जसजसे यशस्वी होत जातात, तसा त्यांचा पक्षनेत्यांशी संबंध वाढत जातो. पक्ष व ते एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येत जातात. तो ते यावेत याच उद्देशाने 2002 साली उद्योजकांना पक्षाची दारे मोकळी करण्यात आली. 

वँग शि हा उद्योजक हा एक काळ राजकीय संघर्षात गुंतला होता. आपल्यावरील हा डाग सरकारी दप्तरातूनच काढून टाकण्याचे त्याने प्रयत्न केले. इतरांनीही हाच मार्ग स्वीकारला होता. वँग हा चीनमधील बांधकाम उद्योगक्षेत्रातील एक प्रस्थ आहे. त्याचा गुन्हा काय होता? तर तिआनन मेन चौकात निदर्शने झाली, त्यांत तो सामील झाला होता.त्याला एक वर्षाची शिक्षाही झाली. पण नंतर त्याने पापक्षालन करायचे ठरवले. ‘टाई’ व ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांना मुलाखती देऊन त्याने आपण चूक केली अशी कबुली दिली. तो तेव्हा उद्योजक झाला होता.

2008 साली ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एक चिनी धनिक म्हणून त्याची मुलाखत छापली, तेव्हा मात्र त्या मोर्चात आपण सामील झालोच नव्हतो असे त्याने सांगितले.  पक्ष व उद्योग यांच्यात प्रारंभीच्या काळात काही वेळा तणावाचे संबंध असत. ज्या कंपन्या आपला माल लोकांना सरळच विकतात त्यांनी आपले व्यवहार आपल्या कार्यालयात गुप्तपणे न करता उघडपणे करावे, असा आदेश यामुळे निघाला. 

सरकारी फतव्याने  उद्योगधंद्यांत कामगार संघटना स्थापन झाल्या. म्हणजे त्या सरकारी संघटनाच होत्या व आहेत. पक्षाकडे त्यांचे नेतृत्व आहे. पण सरकार आणि पक्ष एकच आहे. उद्योगधंद्यांत या रितीने पक्षाचा प्रवेश झाल्यावर नेमणुका व निवृत्तीनंतरची सोय या दोन्ही दृष्टीने पक्षाचा फायदा झाला.  बीजिंगमध्ये पक्षासाठी एक प्रचंड मोठी शिक्षणसंस्था आहे. ती पक्षाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी असून तीत 2800 पूर्णवेळचे शिक्षक आहेत. काही जणांच्या बाबतीत अत्यंत गंभीर व कठीण असा अभ्यासक्रम असतो. यात पक्षाने त्या त्या वेळेला जी प्रचारमोहीम काढली असेल तिची परिपूर्ण माहिती देणे हा एक विषय असतो. उद्योधंद्यात नव्याने उतरलेल्यांतील काहींनाही या संस्थेकडून काही काळासाठी आमंत्रण मिळते. 

अभ्यासक्रमाच्या शेवटी पक्षाधिकारी व हे उद्योजक यांच्या मेजवान्या झडतात आणि दोघांना एकमेकाच्या कामांची व जबाबदाऱ्यांची माहिती होते. म्हणून एका उद्योजकाने म्हटले की, या अधिकाऱ्यांवर किती मोठी जबाबदारी असते त्याची कल्पना यामुळे आली. माओच्या वेळी 1958 ते 61 या तीन वर्षांत चीनमध्ये नेमके किती लोक मरण पावले याचा सारा तपशील यांग जिशेंग याने वीस वर्षे खपून जमा केला आणि एक अवाढव्य ग्रंथ लिहिला. त्याने साडेतीन ते चार कोटी लोक उपासमारीने मरण पावल्याचे दाखवून दिले आहे. हा ग्रंथ 2008 साली प्रकाशित झाला. 

उल्लेखनीय गोष्ट ही की, यांग हा सरकारी वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून काम करत होता. त्या काळात त्याने माहिती गोळा केली व जपून ठेवली. बातम्या पुरवण्याचे काम करत असताना त्या संस्थेच्या पत्रकारांना पक्षाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती द्यावी लागत असे. यांग याने ती पक्षाधिकाऱ्यांना देतानाच आपल्यापाशीही प्रती ठेवल्या. 

1989 मध्ये झालेल्या दडपशाहीमुळे भ्रमनिरास झालेल्या यांग याने चीनच्या पक्षावर सूड काढण्याचा निर्धार केला. तो वरिष्ठ पदावर असल्यामुळे त्याला पक्षाच्या गुप्त कागदपत्रांच्या दफ्तरखान्यात प्रवेश होता. त्याने याचा भरपूर उपयोग करून घेतला. माओने सामुदायिक शेतीचे धोरण अवलंबिले होते. त्यातून अनेक वसाहती तयार झाल्या. त्यांच्या प्रगतीचे अहवाल तयार केले जात. ते कसे खोटे होते, याचे पुरावे या दफ्तरखान्यात मिळाले. 

यांग अद्यापही वृत्तसंस्थेत काम करतो. अर्थात त्याचा हा ग्रंथ - टुम्बटोन - हा चीनमध्ये उपलब्ध नाही. यांगचे नावही त्यावर नाही. हा ग्रंथ कालांतराने रसातळाला जाईल, असे कम्युनिस्ट पक्षाचे अधिकारी मानतात. तसे पाहिले तर स्वत:च्या आधुनिक इतिहासातील काही कालखंड विसरून जाण्याचे सरकार व पक्ष यांचे धोरण आहे. 

शांघायमध्ये एक आधुनिक वस्तुसंग्रहालय आहे. परकी सत्तेच्या जोखडातून चीन कसा मुक्त झाला याची चित्रे या संग्रहालयात आहेत. पण 1949 साली कम्युनिस्ट क्रांती होऊन, आजतागायत त्याच पक्षाचे राज्य असताना, जवळजवळ चाळीस वर्षांत चीनमध्ये काहीच झाले नाही असे मानून त्यानंतरच्या घडामोडींचे चित्रण मात्र आहे. हे धोरण केवळ चीनसंबंधीच मर्यादित नाही; सोव्हिएत युनियनसंबंधी तसेच आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची नव्वदावी साजरी झाली, त्या वेळी अनेक माहितीपट तयार झाले. परंतु सोव्हिएत युनियन समाप्त झाल्याचा उल्लेख टाळण्यात आला. फायनन्शिअल टाईम्सचे अर्थतज्ज्ञ मार्टिन वुल्फ यांचा जागतिकीकरणासंबंधीचा ग्रंथ निघाला व त्याची आवृत्ती चीनमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या, तेव्हा ‘सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही’ या उल्लेखास चिनी प्रकाशकाने आक्षेप घेतला. ‘त्या काळातील रशियाचे नेते’ असा उल्लेख हवा, असा त्याचा आग्रह होता. 

सत्तापिपासूंच्या यादीत हिटलर, लेनिन, स्टालिन व माओ यांचा उल्लेख असताना लेनिन व माओ यांची नावे गाळण्यास सांगण्यात आले. मॅग्रेगर यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे चित्र असे रंगवले आहे. त्या पक्षाच्या अधिकाऱ्यांकडे अफाट सत्ता आहे आणि त्यांची व अधिकारपदस्थांची मुले, नातेवाईक यांनी गडगंज संपत्ती मिळवली असून कमालीच्या विलासात ते राहात असतात. अर्थात माओ स्वत: किती वैभवशाली प्रासादांतून राहत होता हे लपून राहिलेले नाही. या स्थितीत आजच्या चीनसंबंधी उगाच स्वप्नरंजन करणे व्यर्थ आहे. त्याचे यश कम्युनिस्ट पक्षाच्या एकछत्री नियंत्रणाखालील भांडवलशाहीचे आहे; कम्युनिस्ट विचारसरणीचे नाही. 

Tags: माओ लेनिन भांडवलशाही कम्युनिस्ट पक्ष चीन Mao Lenin Capitalism Communist Party China weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

22 जुलै 1925,डॊंबिवली- 22 मार्च, इ.स. 2017 ह्युस्टन,अमेरिका

इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक.

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके