डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाकिस्तान व चीन यांनी स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे भारतविरोधी जितक्या कारवाया करता येतील तितक्या करण्याचा पणच केलेला दिसतो. याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान व चीन यांच्याशी सख्य करण्यासाठी भारत सरकारने अधिक जोमाने प्रयत्न करावे अशी मागणी आपली काही इंग्रजी पत्रे करतात तेव्हा त्यांचा काय हेतू असावा, असा प्रश्न पडतो. वास्तविक पक्षीय राजकारण संरक्षणाच्या बाबतीत तरी दूर ठेवून पाकिस्तानचा दहशतवादी आणि चीनचा आक्रमक पवित्रा यांची गंभीर दखल घ्यायला हवी. मार्क्सवादी कम्युनिस्ट चीनविरोधी भूमिका घेण्याबाबत खळखळ करील. पण भाजप व इतर पक्षांना तसे करण्याचे काही कारण नाही.

अमेरिकन व ब्रिटिश वृत्तपत्रे आणि टी.व्ही वाहिन्या भारतात सामील झालेल्या काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा न चुकता करतात. सी.एन.एन. ही वाहिनी तर भारताच्या नकाशात काश्मीर दाखवत नाही, तर ते अलग ठेवते. पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा उल्लेख हीच माध्यमे ‘आझाद काश्मीर’ असा करतात. अर्थात, काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे याचा विचारच केला जात नाही.

तथापि अमेरिकन व ब्रिटिश वाहिन्यांखेरीज इतर वाहिन्या पाहायला मिळू शकतात. अशा एका वाहिनीवर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकमत व्यक्त झाल्याचे दिसले आणि त्याचबरोबर त्या भागांपैकी काही भाग कसा चीनव्याप्त आहे आणि चीनच्या या आक्रमणाचा स्थानिक लोक कसा निषेध करतात हेही पाहायला आणि ऐकायला मिळाले. पाकिस्तानने आपला प्रदेश पूर्णत: अंकित केला असून बहुतेक सरकारी कर्मचारीही पाकिस्तानी आहेत, याबद्दल निषेध करणाऱ्या लोकांचा मोर्चाही पाहायला मिळाला.

काश्मीरला पूर्णत: स्वातंत्र्य द्यावे आणि भारतीय लष्कराने अत्याचार चालवले असल्यामुळे चौकशी करावी अशी मागणी करून अरुंधती रॉय यांच्यासारख्यांनी बरेच रान उठवले आहे. या वक्तव्यामुळे आपल्याला अटक होणार अशी आवई श्रीमती रॉय यांनी उठवली, पण भारत सरकारने तसे काही न केल्यामुळे त्यांची व त्यांच्या पाठीराख्यांची अडचण झाली. अरुंधती रॉय, पंकज मिश्रा इत्यादी लोक काश्मीर म्हणजे भारतात सामील झालेला प्रदेश इतकेच मानतात असे त्यांच्या लिखाणावरून व वक्तव्यावरून दिसून येते. परंतु त्या पलीकडेही काश्मीर आहे आणि तिथेही लोकशाही व लोककल्याण यांचे राज्य आहे अशी यांची समजूत असेल तर ते चूक आहे.

अमेरिकन व ब्रिटिश मुत्सद्दी भारताने काश्मीरसंबंधी तडजोड करावी म्हणजे आपल्याकडील काश्मीर पाकिस्तानला द्यावे असा तगादा अर्धशतकाहून अधिक काळ लावीत आले आहेत. पण पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लोकांचे काय म्हणणे आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी काळजी केली नाही. अरुंधती रॉय, पंकज मिश्रा इत्यादी लोक अमेरिका व ब्रिटन यांच्याच धोरणाची कास धरत आहेत. साहजिकच त्यांना या देशात बरीच प्रसिद्धी मिळते व वावही मिळतो. या पाकव्याप्त काश्मीरसंबंधी पत्रकार बी.जी.व्हर्गीस यांनी काही वर्षांपूर्वी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये काही लेख लिहिले होते, पण त्यावेळी त्यांची दखल इंग्रजी वृत्तपत्रांनी घेतली नव्हती. मी त्या लेखांची तेव्हाच माहिती करून देणारा लेख लिहिला होता.

रॉय व मिश्रा अशांच्यापेक्षा सेलिंग हॅरिसन हे आशिया, भारत-पाकिस्तान व अफगाणिस्तान इत्यादी देशांचा दीर्घकाळ अभ्यास केलेले पत्रकार व ग्रंथकार काय म्हणतात हे अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे. मी ज्या वेळी एका वाहिनीवर पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनने व्यापल्याचे वृत्त ऐकले तेव्हा सेलिंग हॅरिसन यांनी 26 ऑगस्ट 2010 रोजीच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेला लेख आठवला. हॅरिसन यांनी लिहिले आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा गिलगिट ते बाल्टिस्तान हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून तो पाकिस्तानने चीनकडे सोपवला आहे. भारताकडील काश्मीरमध्ये पत्रकारांना संचारस्वातंत्र्य आहे, पण उत्तरेकडील गिलगिटपासून दक्षिणेकडील ‘आझाद काश्मीर’पर्यंतच्या प्रदेशात कोणाही पत्रकारास जाता येत नाही. या प्रदेशातील लोकांत असंतोष असून ते उठाव करत असतात. त्यातच याच भागात चीनचे सात ते अकरा हजार सैनिक तळ ठोकून आहेत. चीनपासून  आखातापर्यंत रस्ते व रेल्वे या दोन्ही मार्गांनी दळणवळण सुलभ करण्याची चीनची योजना अंमलात येत आहे.

आज पूर्व भागाकडून आखातापर्यंत माल पाठवायला चीनला पंचवीस दिवस लागतात. पण गिलगिटमधून रस्ता व रेल्वे हे मार्ग तयार झाले की अठ्ठेचाळीस तास लागतील. ग्वादर, पसनी आणि ओरमारा इथे चिनी नौदलाचे तळ आहेत. तसेच चीन आणखी दोन प्रकल्प राबवत आहे. काराकोरमचा हमरस्ता चीनने बांधलाच आहे. हा रस्ता वाढवून चीनच्या सिकिंयांग या प्रांताची पाकिस्तानशी सांगड घालून दिली जाईल. इतरही चिनी सैन्याच्या तुकड्या याच भागात हमरस्ते, धरणे इत्यादी बांधून देत आहेत. तेथील गुप्त ठेवलेल्या भागात पंचवीस बोगदे चीनने बांधले असून त्या भागात पाकिस्तानी नागरिकांनाही प्रवेश करण्यास मज्जाव आहे. इराणपासून चीनपर्यंत तेलाचे नळ नेण्यासाठी हे बोगदे आवश्यक असले तरी या बोगद्यांचा उपयोग क्षेपणास्त्रांचा साठा करण्यासाठीही होऊ शकतो. हे बोगदे बांधण्याचे काम संपल्यावर चिनी लष्करी पथके स्वदेशी परत गेली. परंतु आता ती परत आली असून कायमस्वरूपाची निवासस्थाने बांधली आहेत.

हॅरिसन यांनी अशीही माहिती दिली आहे की, या आझाद काश्मीर भागात शिया मुस्लिम राहतात. त्यांच्यावर पाकिस्तानी सुन्नी सैनिक वाटेल तसा अत्याचार करत आले आहेत. गिलगिट व बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानच्या लष्कराच्या अंमलाखाली आहे. आझाद काश्मीर कितपत आझाद आहे? हॅरिसन सांगतात की, या राज्याकडे असलेल्या 56 विषयांपैकी चारच स्थानिक लोकांनी निवडलेल्या विधिमंडळाकडे असून बाकीचे काश्मीर मंडळाकडे आहेत व हे मंडळ पाकिस्तानच्या अध्यक्षाने निवडलेले आहे.

या तथाकथित आझाद काश्मीरची झलक मी प्रत्यक्षात पाहिली होती. इंदरकुमार गुजराल, निखिल चक्रवर्ती आणि मी असे तिघेजण इस्लामाबादला एका परिसंवादासाठी गेलो असता रावळपिंडीच्या जवळ एका मोठ्या छावणीत आम्हांला नेण्यात आले. या छावणीला तारांचे कुंपण होते. तिथे एका निवासस्थानात आझाद काश्मीरचे अध्यक्ष रहात असल्याचे आम्हांला सांगण्यात आले. त्यांच्याशी आमची अर्धाएक तास भेट झाली. या नाममात्र अध्यक्षांच्या बोलण्यात काही तथ्य नव्हते. दोन्ही काश्मीर एक करून त्यांचे भवितव्य त्यांचे त्यांनी ठरवावे इत्यादी पोपटपंची त्यांनी ऐकवली. आझाद काश्मीरचा हा अध्यक्ष रावळपिंडीजवळ कशासाठी राहतो हे मात्र स्पष्ट झाले नाही.

सेलिंग हॅरिसन यांनी हा लेख लिहून अमेरिकन सरकारला धोक्याचा इशारा दिला आहे. तसा तो भारतालाही आहे. चीनने भारताभोवती खंदक खोदण्याचे धोरण पद्धतशीरपणे अंमलात आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पाकिस्तानमध्ये लष्करी तळ ठोकण्यात आले असून काही प्रदेश त्याने वर दाखवल्याप्रमाणे व्यापला आहे. श्रीलंकेतही त्याने बस्तान बसवले असून ब्रह्मदेशात त्यांची मोठी गुंतवणूक आहे आणि अरुणाचल प्रदेशावर त्याचा डोळा असल्यामुळे त्याच्या जवळच्या प्रदेशापर्यंत वाहतूक सुलभ करण्याच्या दिशेने हालचाली चालल्या आहेत.

हॅरिसन यांनी गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशात चीनच्या लष्कराच्या काही तुकड्याच वावरत असतात याची माहिती दिली आहे. तिला पूरक असा लेख बी.रामन या चेन्नई येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टॉपिकल स्टडीज’ या संस्थेचे संचालक व ‘चेन्नई सेंटर फॉर चायना स्टडीज’चे ज्येष्ठ अधिकारी यांनी सप्टेंबरमध्ये प्रसारित केला होता. ते केंद्रात कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करून निवृत्त झाले आहेत. ‘आऊटलुक’ या साप्ताहिकात त्यांचे लेख नियमितपणे येतात.

रामन यांनी लिहिले आहे की, सेलिंग हॅरिसन यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. परंतु गिलगिट-बाल्टिस्तान भागातील चीनच्या लष्करी हालचालींची माहिती भारत सरकारला नवी नाही. चीनच्या या हालचाली भारताविरुद्ध युद्ध करायचे झाल्यास शस्त्रसामग्री व लष्कर यांच्या वाहतुकीस सुलभ होण्यासाठी चालू आहेत हे भारत सरकारला माहीत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अति उंचावरून गुप्तपणे छायाचित्रे घेऊन ती भारतालाही पुरवली होती. 6 व 7 ऑगस्ट 2001 रोजी ‘वॉशिंग्टन टाइम्स’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वार्तापत्रात म्हटले होते की, 2000 सालच्या नोव्हेंबरपासून चीनने पाकिस्तानकडे बारा वेळा क्षेपणास्त्रांचे सुटे भाग मालमोटारींतून धाडले. अमेरिकन विमानांनी त्यांची छायाचित्रे घेतली होती. 1 मे 2001 रोजी हे सर्व पाकिस्तानच्या डोंगराळ सीमेपाशी आले. पाकिस्तानच्या शाहीन-1 या क्षेपणास्त्रांसाठी हे सुटे भाग हवे होते. ती 465 मैल जाऊ शकतात तर शाहीन-2 ही क्षेपणास्त्रे 1240 मैलांपर्यंत जातात.

‘वॉशिंग्टन टाइम्स’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर तेव्हाचे पाकिस्तानचे सरसेनापती परवेझ मुशर्रफ ऑगस्टमध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या भेटीवर गेले. या संबंधात रामन यांनी सप्टेंबर 2001 मध्ये लेख लिहून जाहीर केले की, क्षेपणास्त्रांचे हे सुटे भाग मालवाहू मोटारींनी काराकोरम हमरस्त्यांनी आले. समुद्रमार्गे हा माल पाठवल्यास अमेरिकन उपग्रह टिपण्याचा धोका होता. म्हणून पाकिस्तानने हा काराकोरमचा मार्ग सुचवला होता. इतकेच नव्हे उत्तर कोरियात तो पाठवून तिथून तो काराकोरम मार्गाने आणण्याची कल्पना पाकिस्तानची होती. हे सर्व अमेरिकनांना समजू नये म्हणून पाकिस्तानने बरीच खबरदारी घेतली खरी, पण ती वाया गेली. पाकिस्तानला वाटते होते की, मालमोटारींची वाहतूक अमेरिकनांना समजली तरी क्षेपणास्त्रांचे सुटे भाग कॅमेरे टिपणार नाहीत. तोही समज खोटा ठरला.

रामन लिहितात की, काराकोरमचा हमरस्ता बांधण्याच्या वेळेपासून चिनी इंजिनियर्स त्या भागात आहेत आणि ते व इतर मानवी साहाय्याचे काम करणारे यांच्या संरक्षणासाठी चिनी सैनिकही आहेत, पण उत्तर कोरियाचे किती इंजिनियर्स पाकव्याप्त काश्मीरमध्ये काम करतात याची आकडेवारी मिळू शकली नाही. मोठ्या उंचीवरच्या प्रदेशात बांधकाम करण्याचा उत्तर कोरियन इंजिनियर्सना विशेष अनुभव आहे.

श्री.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा गिलगिट- बाल्टिस्तान भागातील या सर्व हालचालींची बरीच माहिती 1998 ते 2004 या काळात आली होती आणि चिनी सैन्याचे अस्तित्व वाढल्याचे अंधारात राहिले नव्हते. पण या माहितीचा जितका प्रसार सरकारने करायला हवा होता तसा व तितका तो तेव्हा केला नाही, अशी टीका रामन यांनी केली आहे. आताच्या सरकारनेही या संबंधात काही सुधारणा करू नये हे आश्चर्यकारक म्हटले पाहिजे.

या संबंधातील आणखी एक माहिती अशीच उद्वेगजनक आहे. ती आहे भारत व चीन यांच्यातील सीमेचा व्याप किती याबद्दल. ती सीमा चार हजारापेक्षा जास्त किलोमीटर असली तरी चीन ती दोन हजार किलोमीटर असल्याचे म्हणत आहे. पण आपल्या चीनमधील राजदूताने ती जवळजवळ साडेतीन हजार किलोमीटर असल्याचे सांगून आपली सुमारे पाचशे किलोमीटर सीमा कमी केली. म्हणजे चिनी युद्धाच्या वेळचा सीमेजवळचा गोंधळ आजही चालू आहे. आपल्या संरक्षण व परराष्ट्र खात्याने आपली सीमा किती आहे यात एकवाक्यता राखणे आवश्यक आहे.

तसेच सेलिंग हॅरिसन यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या काही इंग्रजी पत्रांनी बातमी प्रसिद्ध केली आणि तपास करून मग कृती केली जाईल असे मोघम उत्तर परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने दिले. पण हॅरिसन यांचा लेख येईपर्यंत सरकार गप्प का होते? सरकारकडे अगोदर माहिती आली नसेल तर का आली नाही? आणि आली असल्यास सरकारने तिचा प्रसार करण्यासाठी काय केले? हे दोन प्रश्न अनुत्तरितच राहतात. पाकिस्तान व चीन यांनी स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे भारतविरोधी जितक्या कारवाया करता येतील तितक्या करण्याचा पणच केलेला दिसतो. याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान व चीन यांच्याशी सख्य करण्यासाठी भारत सरकारने अधिक जोमाने प्रयत्न करावे अशी मागणी आपली काही इंग्रजी पत्रे करतात तेव्हा त्यांचा काय हेतू असावा, असा प्रश्न पडतो.

वास्तविक पक्षीय राजकारण संरक्षणाच्या बाबतीत तरी दूर ठेवून पाकिस्तानचा दहशतवादी आणि चीनचा आक्रमक पवित्रा यांची गंभीर दखल घ्यायला हवी. मार्क्सवादी कम्युनिस्ट चीनविरोधी भूमिका घेण्याबाबत खळखळ करील. पण भाजप व इतर पक्षांना तसे करण्याचे काही कारण नाही. चिंतेची बाब अशी की याच काळात अनेक राज्यांतील मंत्रिमंडळे गलथानपणे चालू आहेत. अशा राज्यांतील काही पक्षांच्या नेत्यांची बाष्कळपणाच्या बाबतीत चढाओढ लागली आहे. केंद्र सरकार भ्रष्टाचार आणि ढिसाळपणा यांमुळे अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग हे निष्कलंक चारित्र्य व वर्तनाचे आहेत यासंबंधी त्यांचे शत्रूही संशय घेत नाहीत, पण त्यांच्याच काळात फार मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

तसेच मनमोहनसिंग हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आपल्या आर्थिक व्यवहारातील कोंडी फोडली, पण आता चलनवाढ आणि टंचाई व महागाई यांमुळे आतापर्यंत झालेल्या सुधारणा मातीला मिळण्याची भीती आहे. देशाची ही स्थिती आणि सीमेवरचे दोन देश आक्रमक वृत्तीचे, तिकडे नेपाळमधील आणि भारतातील माओवादी यांना चीन कितपत मदत करतो आणि त्या दोघांत सहकार्य आहे की नाही आणि असल्यास ते कितपत दृढ आहे, हे स्पष्ट झालेले नाही. यात आता पाकव्याप्त काश्मीरचा काही प्रदेश चीनने व्यापल्यामुळे रात्र वैऱ्याची आहे. 

Tags: गोविंद तळवलकर सेलिंग हॅरिसन आझाद काश्मीर चीन व्याप्त काश्मीर काश्मीर भारत पाक govind talwalkar Selig  Harrison azad kashmir forign relation kashmir china pakistan india weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

22 जुलै 1925,डॊंबिवली- 22 मार्च, इ.स. 2017 ह्युस्टन,अमेरिका

इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक.

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके