डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाश्चात्य देश असोत वा चीन,  जपान इत्यादी पौर्वात्त्य देश  असोत,  तिथेही धरणे व इतर काही सार्वजनिक बांधकामांना  विरोध होतो;  पण नदी ही  परमेश्वराची देणगी असून ती दैवी  असल्याच्या कारणास्तव तिचा  धरणासाठी उपयोग करण्यास  विरोध केवळ भारतात होतो.  स्वामी चिदानंद सरस्वती यांनी तर  पवित्र गंगा नदीवरील धरणाचे संकट रावणासारखे राक्षसी  असल्याचे भाष्य केले. आपली कौटुंबिक व्यवस्था,  नीती आणि  स्त्रियांची नीती या सर्वांना हे  संकट असल्याचा त्यांचा इशारा असे. रा. स्व. संघ, विश्वहिंदु  परिषद आणि इतर हिंदुत्वनिष्ठ  संघटना या विरोधी मोहिमेत उतरल्या होत्या

पर्यावरण,  ग्रामसुधारणा इत्यादी क्षेत्रांत विधायक कामे करणाऱ्या संघटना  आजकाल भारतात बऱ्याच आहेत. अनेकांना देशीच नव्हे तर परदेशी व्यक्ती व संघटना  आर्थिक व तांत्रिक मदत देत असतात. अनेकांना भारत सरकारच्या विविध योजनांचा  आर्थिक लाभ होतो. काही संघटनांच्या या प्रकारच्या व्यवहारांची तपासणी होईल तर  बरे असेही वाटावे अशी स्थिती आहे. काही संघटना व व्यक्ती काही विशिष्ट राजकीय  हेतू मनाशी धरून तो तडीला नेण्यासाठी योजना राबवत असतात किंवा विशिष्ट प्रकारची समाजव्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश बाळगून काम करतात. यांत काही डाव्या तर  काही उजव्या विचारसरणीचे प्रचारक असतात.  मुकुल शर्मा यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘ग्रीन ॲन्ड सॅफ्रन’  हे पुस्तक काही  विकासयोजनांच्या मागील वैचारिक प्रेरणा उजव्या हिंदुत्वनिष्ठेची कशी आहे याची चर्चा  करणारे आहे. (ग्रीन ॲन्ड सॅफ्रन, प्रकाशक- परमनंट ब्लॅक, किं. 795 रु.). शर्मा हे ‘नवभारत टाइम्स’मध्ये पत्रकार होते. नंतर ते पर्यावरण या विषयाचा अभ्यास करू  लागले. यामुळे त्यांचा भारत,  इंग्लंड व जर्मनी इत्यादी देशांतील अनेक संस्था,  विद्यापीठे,  वृत्तपत्रे यांच्याशी संबंध आला.  ‘ग्रीन ॲन्ड सॅफ्रन’  या पुस्तकात ओरिसा, उत्तर-प्रदेश,  महाराष्ट्र इत्यादी राज्यांतील  काही विकास योजनांचे विश्लेषण आहे.

सनातनी विचारसरणीवर आधारलेला समाज  निर्माण करण्याच्या दृष्टीने धरणे,  ग्रामविकास इत्यादी कामांची रचना आणि  अंलबजावणी कशी चालते हे दाखवून दिले आहे. त्या योजनांचे चालक कोणते  विचार प्रसारित करतात हे प्रत्यक्ष मुलाखती,  वृत्तपत्रीय लेख व बातम्या इत्यादीच्या  साहाय्याने स्पष्ट केले आहे. बिहारमधील बागमती नदीच्या काठावर ‘माता कोसीचा मेळा’  या नावाची एक जत्रा  दरवर्षी भरत असते. ती प्राचीन काळापासून भरत आलेली नाही. 1990 सालापासून  कोसीची पूजा सुरू झाली आणि 1995 साली जत्रेला आरंभ झाला. सोनमानकी व  जवळपासच्या खेड्यांत ही जत्रा भरते. तिचा उलेख एखाद्या धार्मिक पुस्तकात नाही.  तिचे जनकत्व उमेश गुप्ता या नावाच्या लोकसेवकाकडे जाते.  उत्तर भारतात अशा काही मोठ्या नद्या आहेत की,  त्यांचे प्रवाह बदलतात आणि मग  हजारो लोकांचे नुकसान होते. बदलत्या नदीप्रवाहाच्या या संकटावर इंजिनियरिंग वा  तत्सम शास्त्रांच्या आधाराने सरकार उपाय करत आले आहे. पण शास्त्रापेक्षा पूजा,  यज्ञ,  जत्रा यांच्यायोगे ही आपत्ती संपुष्टात येईल असा विेशास व भ्र जपण्यात काहींचे हितसंबंध गुंतले आहेत.  नदीचा प्रवाह भारतातच बदलतो असे नाही. जगभर हे होते. पुढारलेल्या जगाने त्यासाठी शास्त्रीय उपाय योजण्याचा मार्ग पत्करला. भारतात सरकार त्या मार्गाने जात  असले तरी समाजसेवेच्या नावाखाली अंधश्रध्दा जपण्याचा पंथ बोकाळला आहे. आपल्या सर्व नद्यांचे प्रवाह बदलण्यावर उपाय झाले नाहीत; पण ते होऊ शकतात.  

विज्ञानाकडे पाठ फिरवून धार्मिकता  वाढवणारांनी इतर काही नद्यांप्रमाणे कोसी  नदीचा उपयोग केला आहे.   सोनमानकी हे गाव कोसी व बागमती या  दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. बहुसंख्य लोकांपाशी जमीन नाही आणि अनेकांकडे  अगदी कमी आहे. या भागात तांदूळ,  मका,  भाजीपाला असे पीक येते. बहुसंख्य लोकांना मोलमजुरी करावी लागते. वीज,  आरोग्यसेवा  व शाळा यांचा मागमूस नाही. पूरप्रतिबंधक  उपाययोजना नसल्यामुळे लोकांचे जीवन  अनिश्चित असते. कोसीची पूजा करण्याचा  सोहळा हा नव्याने सुरू झाला आणि सामान्य  लोक त्यामुळे भारावून गेले. वार्षिक पूजा  झाली की,  नदीत बोकडाला बुडवले जाते  आणि तो मेलेला बोकड दलितांना दिला जातो. उमेश गुप्ता,  पप्पू आणि राजीव सिंग या तिघांपाशी जमीन आहे,  मालमत्ता आहे आणि दर वर्षी वीस-तीस हजार रुपये खर्च करून ते  कोसी पूजेचा सोहळा साजरा करतात. त्यांनी यामुळे परिसरातले  आपले बस्तान बळकट केले आहे. पोस्टास्तरही त्यांच्या घरी  टपाल जमवून त्याचे वाटप करतो आणि मनिऑर्डरीचे पैसे वाटताना  त्याचा हप्ता असतो. बाहेरगावी जाऊन मोलमजुरी करणारांनी घरी  पाठवलेल्या या मनिऑर्डरी असतात.

रा. स्व. संघ,  विश्व हिंदु परिषद आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी  आपल्या पर्यावरणापासून ग्रामीण विकासापर्यंतच्या कार्याचा  वैचारिक आधार सनातन धर्म हाच केला आहे. त्याचे विवेचन शर्मा  यांनी एका स्वतंत्र प्रकरणात केले आहे. सामाजिक कार्याच्या  निमित्ताने हे लोक आपल्या वर्णाश्रमाचे समर्थन कसे करतात याची  उदाहरणेही शर्मा यांनी दिली आहेत.  शर्मा यांनी असेही म्हटले आहे की,  हजारे यांनी राळेगणसिध्दी  या त्यांच्या गावातील ग्रामविकासाच्या कामाचे अधिष्ठान लष्करी परंपरा हे असल्याचे सांगून हिंदुत्वनिष्ठ विचारांचा प्रसार केला.  मुकुल शर्मा यांनी हजारे यांच्या गावास काही वेळा भेटी दिल्या.  तसेच तेथील विकासकार्याची जातीने पाहणी केली. जे काही विकासकार्य झाले आहे ते नाकारले नाही;  पण त्याचबरोबर हजारे  यांचे हुकूमशाही वर्तन व वृत्ती यांची उदाहरणेही शर्मा यांनी नमूद  केली आहेत. त्यांतील काही म्हणजे: दारू पिणाऱ्यास खांबाला  बांधून पट्‌ट्याने मारण्याची शिक्षा, तसेच  भक्तिगीतांशिवाय इतर  गाण्यांना बंदी. देवळात गेल्यावर आम्ही हजारे यांना प्रथम नमस्कार  करतो आणि मग देवाच्या मूर्तीला,  असे गावकऱ्यांपैकी काहींनी  शर्मा यांना सांगितले. हजारे यांचा सर्वाधिकार पूर्णत:  स्वीकारल्यामुळे गावकऱ्यांची ही मानसिक शरणागतीच आहे. या  अवस्थेत माणूस जे काही सांगितले जाईल ते  निमूटपणे स्वीकारतो आणि त्यामुळे  आपल्यावर काही लादले नसून आपल्याच विचारपध्दतीतून ते तयार झाल्याची समजूत होते. इतकेच नव्हे तर कोणाकडून  स्वीकारण्याचा प्रश्नच नसून ती आपलीच  मते असल्याची भावना तयार होते.  मनाच्या या अवस्थेुळे मतभेदास स्थान राहत नाही आणि आपोआपच  लष्करी पद्धतीची शिस्त येते. यामुळे  व्यक्तीचा केवळ अधिकारच नव्हे,  तर अधिकारशाहीसुध्दा स्वीकारली जाते.

अशा  अधिकारशाहीचा स्वीकार विद्यमान  कार्यपध्दतीचा पाया भरभक्कम करते. राळेगणसिद्धीच्या कार्यपद्धतीचा हाच पाया  असल्यामुळे तिला धोका नाही. तथापि या निमित्ताने शर्मा यांनी एकदम सर्व मराठी समाज आणि  संयुक्त महाराष्ट्राची मागणी व आंदोलन इत्यादीसंबंधात स्वत:ची जी  काही मते मांडली आहेत व इतर काही ग्रंथांतील विवेचन दिले  आहे,  त्याचा पाया मात्र ठिसूळ आहे. दीपंकर गुप्ता यांनी संयुक्त  महाराष्ट्राचे आंदोलन व शिवसेना यांच्यासंबंधात जे काही विचार  प्रगट केले आहेत त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.  गुप्ता यांनी म्हटले आहे की,  मराठी समाज हा स्वत:स काहीतरी  वेगळा व अलग मानतो. आपली संस्कृती वेगळी आणि श्रेष्ठ असल्याचा त्याचा दावा आहे. एक काळ मराठी साम्राज्य होते.  महाराष्ट्रात भाषा,  धर्म,  संस्कृती सर्वांचे स्वरूप सारखेच असून ते साम्राज्य वाढले. तो हिंदुपदपादशाहीचा अखेरचा किल्ला बनला.  नंतर इंग्रजी राजवटीत प्रथम गोखले आणि त्यांच्या नंतर लोकमान्य  टिळक यांनी आपल्या त्या हिंदुपदपादशाहीच्या काळातील  संस्कृतीच्या जोरावर आधुनिक भारताच्या राजकीय व राष्ट्रीय  जीवनात वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न केले. टिळकांनी गणपती व  शिवजयंती महोत्सव यांचे पुनरुज्जीवन केले. त्यांना महाराष्ट्राचे  स्वतंत्र राज्य स्थापन करायचे होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने याच  भावना उद्दीपित केल्या. यामुळे महाराष्ट्रात प्रादेशिक भावनात्मकता  वाढवण्यात आली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर याच  पोर्शभूीवर शिवसेनेची स्थापना झाली.  दीपंकर गुप्ता यांच्या विवेचनाचे हे स्वरूप शर्मा यांनी नमूद करून  त्यास संमती दिली आहे.  पण केवळ महाराष्ट्रातच प्रादेशिक अहंकार आहे,  हा समज चुकीचा आहे. तामिळनाडू,  केरळ,  आंध्र व कर्नाटक ही दाक्षिणात्य  राज्ये,  तसेच बंगाल,  आसाम,  पंजाब,  गुजरात, राजस्थान इत्यादी  राज्ये यापासून थोडीही अलिप्त नाहीत.

फाळणीच्या वेळी पूर्व व  पश्चिम बंगाल यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची योजना व मागणी होती. तामिळनाडूत हिंदी भाषेच्या विरोधासाठी स्वतंत्र होण्याची  भाषा झाली होती. तामिळनाडू व श्रीलंकेचा तामिळी भाग एक  करण्याची योजना भाषिक व प्रादेशिक अहंकाराची होती.  पंजाबमध्ये शीख अतिरेक्यांनी शिखिस्तानचा प्रचार केला आणि हिंसाचारही केला. महाराष्ट्राने राज्य मागितले,  पण फुटून जाण्याची  भाषा कधीही केली नाही.  महाराष्ट्रात गणपती व शिवाजी यांचे उत्सव होत असतात.  बंगालमध्ये दुर्गापूजा अतिशय जोरदारपणे होते. तेव्हा गणपती  उत्सव आक्षेपार्ह,  तर दुर्गापूजा का नाही?  शिवजयंती उत्सव हा लोकांत महाराष्ट्राचा अभिमान निर्माण करण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी सुरू झाला. त्या वेळी राष्ट्रविषयक भावना  निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम व योजना राष्ट्रीय पातळीवर   काम करणारांनी सुरू केल्या. त्यात शिवाजी उत्सव हा एक होता.  गोखल्यांनी 1907 साली विभक्त मतदारसंघास मान्यता दिली  होती,  तर लोकमान्यांनी लखनौ करार करून मुस्लिमांना 33 टक्के मतांचा अधिकार देण्याची योजना मान्य केली होती. या दोघांनाही  काँग्रेसमध्ये व बाहेर विरोध झाला. तेव्हा त्यांच्यावर हिंदुत्वनिष्ठ व  महाराष्ट्राभिमानी इत्यादी शिक्के मारणे गैर आहे. त्यांचा लढा सर्व  हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी होता.  संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी शिवाजी महाराजांचा  जयघोष झालाही असेल,  पण त्यावर ते आंदोलन अधिष्ठित नव्हते.  भाषावार पुनर्रचना मंडळ आणि त्या निमित्ताने काही सरकारी  वर्तुळांतून जी वक्तव्ये झाली त्यामुळे मराठी जनतेच्या स्वाभिमानास  डंख लागला. गुप्ता व शर्मा यांनी याची दखल घेतलेली नाही. हे जे  घडले त्यामुळे महाराष्ट्राचा प्रश्न चिघळला.

संयुक्त महाराष्ट्र समिती ही प्रादेशिक अहंकाराने प्रेरित होती असा निष्कर्ष शर्मा काढत  आहेत. पण त्या समितीचे दोन मुख्य नेते होते,  ते म्हणजे  एस. एम. जोशी व भाई डांगे. शिवाय अनेक काँग्रेस पुढारीसुध्दा ही  मागणी करणारांत होते. तसेच शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते.  यांपैकी कोणीही धार्मिक राजकारण करत नव्हते आणि संकुचित  अर्थाने प्रादेशिक वृत्तीचे नव्हते.  गेल्या काही वर्षांत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर  प्रादेशिकता वाढली आहे. या स्थितीत शिवसेनेची वाढ  महाराष्ट्रीयांच्या प्रादेशिक अहंकारामुळे  झाली हे उथळ विवेचन  झाले. संघटित राजकीय पक्ष आणि शेतकरी व कामकरी संघटनांची  पीछेहाट हे सेनेच्या वाढीस कारण होते व आहे.  शर्मा यांच्या पुस्तकातील महाराष्ट्राबद्दलचा हा भाग बिनबुडाचा  असून तो वगळला तर समाजसेवा व पर्यावरणाच्या क्षेत्रांतील  कामामागे जे धर्मकारण चालते त्याचा परामर्श विचारांस चालना  देणारा आहे यात शंका नाही. शर्मा यांनी हजारे यांच्या प्रतिगामी सामाजिक विचार व आचारांची नोंद आपल्या लेखात पूर्वीच केली  होती. या पुस्तकात तो भाग आहे. आश्चर्याची गोष्ट ही की,  हजारे  यांच्या कार्यात सामील होणारांतल्या अनेकांचा धार्मिक  राजकारणाशी संबंध नव्हता,  तसेच लष्कराचे प्राधान्य मान्य  करणारेही ते नव्हते. पण हजारे यांच्या विचारांना व वर्तनाला यांनी  विरोध केला नाही व जाहीर टीकाही केली नाही.  ग्रामपंचायती,  जिल्हा परिषदा इत्यादी संस्था निवडणुकीच्या  योगे निवडल्या जातात. या संस्था निवडणुकीच्या माध्यमांनी  लोकप्रतिनिधींच्या हाती न देता आपल्या हाती ठेवण्याचे यशस्वी  प्रयत्न ग्रामस्वराज्याची भाषा करून हजारे यांनी केले. ग्रामपंचायतीची निवडणूक न होऊ देता ती नेण्याची मोकळीक  हजारे यांना वीस वर्षांहून अधिक काळ बिनबोभाट भोगता आली,  हे महाराष्ट्रास लाजिरवाणे आहे. हजारे यांच्या गावातील पंचायतीत  निवडणूक होऊ लागल्यास काही वर्षेच झाली आहेत. आधुनिक  खते इत्यादी वापरण्यासही हजारेशाहीत मनाई आहे. सरकार हे सर्व  चालू देते. हजारे यांच्या कार्यात सहभागी होणारांनी यावर मौन  पाळले.

हजारेशाहीत आजही दलितांना दडपण्याची पूर्वीची पद्धती अवलंबिण्यात येते. दलित नेत्यांनी याची दखल आजवर घेतली  नाही.  मुकुल शर्मा यांनी हजारे यांच्याप्रमाणे सुंदरलाल बहुगुणा  यांचेही खरे स्वरूप पुराव्यानिशी उघड केले आहे. उत्तरप्रदेशातील आणि उत्तरांचलातील सुंदरलाल बहुगुणा तेहरी धरणास प्रतिबंध  कोणत्या विचारसरणीच्या अधिष्ठानावर करतात,  हे शर्मा यांनी स्पष्ट  केले आहे. तेहरी धरणाच्या बांधकामाचा तांत्रिक इतिहास शर्मा  यांनी दिला आहे. अत्यंत उंच डोंगरावर पाणी अडवून धरण  बांधल्यामुळे कोणते फायदे होतात याची कल्पना येते. या धरणास  धोका संभवतो तो भूकंपाचा,  याचीही माहिती दिली आहे. तेहरी  धरणाची योजना ठरल्यापासून या धोक्याचा शास्त्रीय दृष्टीतून विचार  झालेला आहे.  गेल्या काही वर्षांत आणखी शास्त्रीय माहिती लोकांपुढे आली  आहे. तीवरून असे दिसते की,  या धरणासाठी जो खर्च झाला त्या  मानाने ते फार दीर्घ काळ टिकणार नाही. या संबंधात शास्त्रज्ञांत एकमत नाही. पण धरणाला विरोध करणारांतील प्रमुख आणि  आंदोलक म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. त्यांचा आक्षेप आहे तो  मुख्यत: धार्मिक पायावर. धरण झाल्यास गंगा व इतर नद्या यांचे  पावित्र्य भंग होईल,  यामुळे धरण होता कामा नये असे बहुगुणा  सांगत आले. यासाठी त्यांनी जंगलतोडीला विरोध केला. यामुळे पर्यावरणवाले त्यांना पठिंबा देऊ लागले. पण धरणे वा इतर  सार्वजनिक कामांसाठी जंगले तोडली जातात, तशीच ती  वाढवताही येतात.  पाश्चात्त्य देश असोत वा चीन,  जपान इत्यादी पौर्वात्त्य देश  असोत,  तिथेही धरणे व इतर काही सार्वजनिक बांधकामांना विरोध  होतो; पण नदी ही परमेश्वराची देणगी असून ती दैवी असल्याच्या  कारणास्तव तिचा धरणासाठी उपयोग करण्यास विरोध केवळ  भारतात होतो.

स्वामी चिदानंद सरस्वती यांनी तर पवित्र गंगा  नदीवरील धरणाचे संकट रावणासारखे राक्षसी असल्याचे भाष्य  केले. आपली कौटुंबिक व्यवस्था,  नीती आणि स्त्रियांची नीती या  सर्वांना हे संकट असल्याचा त्यांचा इशारा असे. रा. स्व. संघ,  विेशहिंदु परिषद आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना या विरोधी मोहिमेत  उतरल्या होत्या.  यात अर्थातच सुंदरलाल बुहगुणा यांच्या उपोषणांची भर पडली.  त्यांनी 1992 पासून दर दोन-तीन वर्षांनी उपोषणाचे हप्ते पाळले.  दहावीस किंवा पंचवीस दिवसांचीही उपोषणे झाली. आपल्याकडे  उपोषणाचा नैतिक दहशतवाद हे एक लोकप्रिय हत्यार होऊन बसले  असून,  हजारे यांच्याप्रमाणे सुंदरलालही  उपोषणवीर आहेत.  या उलट शास्त्रीय आधारावर धरण धोकादायक आणि अल्पजीवी ठरवणारेही काही आहेत. त्यांना त्याच शास्त्रीय रीतीने  उत्तर द्यावे. पण धार्मिक पायावर विरोध कधीही खपवून घेऊ नये. तेहरी धरणासही या कारणास्तव विरोध होत राहिला. या धरणाचा  शर्मा यांनी इतिहास दिला आहे त्यावरून असे दिसून येईल की,  नरसिंह राव पंतप्रधान असताना हा विरोध चालू होता. तरीही त्यांनी  तो दुर्लक्षित केला व अर्धवट राहिलेले काम सुरू केले.

नंतर  वादामुळे आर्थिक पुरवठा आटला तेव्हा गोर्बाचॉव यांनी रशियाने  मान्य केलेल्या मदतीच्या न वापरलेल्या निधीची रक्कम सोव्हिएत  युनियनच्या अखेरच्या पर्वातही मोकळी केल्यामुळे तेहरी धरणाचे बांधकाम सुरू  झाले.  उत्तरप्रदेशामधील आणखी एक धार्मिक पायावर विरोध वाढवून  घेणारा प्रकल्प म्हणजे वृन्दावन सुरक्षित वनाचा. मथुरेनजीक  वृन्दावन असून ते श्रीकृष्णाचे असल्याचे पौराणिक काळापासून  मानले जाते. तिथे वृक्षराजी असून प्राचीन काळात ऋषिमुनी  ध्यानधारणेसाठी बसत अशी समजूत आहे. त्या वृक्षराजीतील  अनेक गुहा जतन करणे धार्मिकदृष्ट्या आवश्यक असल्याचा विचार बळावला. या वृक्षराजीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘जागतिक वृन्दावन जतन व संवर्धन प्रकल्पा’ची योजना स्वीकारण्यात आली.  यामुळे आर्थिक निधी स्थापन करणे शक्य झाले. तथापि  वृन्दावनचा संबंध आल्याबरोबर त्यास धार्मिक स्वरूप आले. शर्मा  यांनी त्यांच्या पुस्तकात या प्रकल्पाची ऐतिहासिक व तांत्रिक  माहिती दिली आहे. वृन्दावन हे गाव गेल्या अनेक वर्षांत वाढत  गेले. मग त्यास इतर गावेही येऊन मिळून आता या परिसराची  लोकसंख्या अनेक लाखांची झाली.  अगोदरच उत्तरेतील धार्मिक स्थळे स्वच्छतेबद्दल काळजी न  घेणारी.

विनोबांनी लिहिले होते की उत्तरेत भोजन आणि दक्षिणेत  भजन असा प्रत्यय केव्हाही येऊ शकतो. वृन्दावनची कशी  दुरवस्था आहे हे शर्मा यांनी तपशिलात दिले आहे. मलमूत्र  विसर्जनाच्या संबंधात तो गाव बेफिकीर असल्यामुळे रोगराई  नित्याची आहे. लोक कसे काय पाणी पितात ते त्यांचे त्यांना  माहीत. गावाच्या या दुर्दशेची माहिती वाचत असतानाही  आपल्याला बसणारा मानसिक धक्का लवकर आवरला जात नाही.  सर्व नदीचे गटार झाले असून नगरपालिकेने पिण्यास व वापरण्यास  ते पाणी धोकायदायक ठरवले आहे.  शर्मा यांनी लेखात आर्थिक व सामाजिक अवस्थेचेही वर्णन  केले आहे. सामान्य लोकांचे हलाखीचे जीवन असून काही थोडे  लोक मातब्बर आहेत. जमीन हडप करणे आणि गेल्या काही वर्षांपासून इमारती बांधून पैसा मिळवणे हा मोठा उद्योग होऊन  बसला आहे. बांधलेल्या इमारतींत राहणाऱ्या लोकांचे जीवन कसे  धोकादायक असते हे शर्मा यांनी दिलेल्या उदारणांवरून समजते.  वृन्दावन हे श्रीकृष्णमय आहे. देवळे आणि मूर्ती यांची गणती करणे  सोपे नाही. यामुळे या देवळांच्या नावाखाली अनेकांनी जमिनी  लाटल्या आहेत. रस्ते,  पाणीपुरवठ्याचे मार्ग अडवले गेले तरी  कोणाला शासन होत नाही.

जातिव्यवस्था टिकवून धरण्याबाबत मात्र  गावचे धुरीण कुचराई करत नाहीत. साफसफाई करणारा समाज  वाल्मीकी म्हणून ओळखला जातो. तो व इतर काही समाज पददलित  आहेत आणि समाजबाह्यही आहेत. शर्मा यांनी नावनिशीवार एका  वाल्मीकीचा अनुभव नमूद केला आहे. त्याने सांगितले की,  रोज संध्याकाळी तो घरी आला की, स्नान करतो आणि स्वच्छ पोषाख  करतो. मग त्याला कृष्णाचे भजन ऐकावेसे वाटते,  पण त्याला देवळात  मज्जाव आहे. बाहेर बसून भजन,  कीर्तन ऐकायचे असेल तर ऐकता येते. हे हिंदू समाजास लाजिरवाणे आहे.  धार्मिक पायावर समाजाची उभारणी करण्यास काही प्रवृत्ती केवळ भारतातच पुढे आलेल्या नाहीत. जर्मनीत जर्मन वंशाचे श्रेष्ठत्व लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक जण संघटित झाले  आहेत. आश्चर्याची गोष्ट ही की पर्यावरणाच्या रक्षणाचे आंदोलन  करणाऱ्या हरित आंदोलनाचे (ग्रीन मूव्हमेंट) मूळ या वंशवादात  आहे. यासंबंधी शर्मा यांनी दिलेली माहिती उल्लेखनीय आहे.

जर्मनीतील फासिस्ट आंदोलनात ज्या वंशवादी प्रवृत्ती होत्या त्याही  वातावरणशुध्दीचा आग्रह धरत होत्या.  हरित आंदोलनांत अनेक प्रवाह आले. त्यात कट्टर उजवे आहेत तसेच डावे. यातील डावे हे साम्यवादी भाषा करत असले तरी  त्यांचा पिंड फासिस्ट आहे. उजवे तर उघडच फासिस्ट आहेत. शर्मा यांनी कागदपत्रांच्या आधारे हे दाखवून दिले आहे. इंग्लंडध्ये  ब्रिटिश राष्ट्रवादी पक्ष हा फासिस्ट आहे. त्याचा प्रभाव फार नाही.  शर्मा यांनी हिंदू व युरोपातील ख्रिस्ती समाजांतील वंशवादी  प्रवृत्तींची माहिती दिली तशी त्यांनी मुस्लिम व बौद्ध समाजांतील  अशा प्रवृत्तींची दखल घेऊन आपले विवेचन समतोल व सर्वंकष  करणे जरूर आहे.

Tags: सुंदरलाल बहुगुणा अंदश्रध्दा आण्णा हजारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सनातनी पर्यावरण गोविंद तळवलकर Sundarlal bahuguna Aanna hajare Rashtriy swaynsewk sangh Sanatani paryavran Govind talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके