डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, आंतरराष्ट्रीय राजकारण निराळ्या पद्धतीने चालवण्याची आवश्यकता वाटू लागलेल्या अमेरिका व इंग्लंडमधील विचारी लोकांनी न्यूयॉर्क येथे स्थापन केलेल्या‘कौन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या संस्थेच्या वतीने 1922 पासून ‘फॉरिन अफेअर्स’ हे द्वैमासिक चालवले जाते. अनेकविध देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री यांचे लेख यातून प्रसिद्ध होतात. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमध्ये समझोता व्हावा, यासाठी ‘फॉरिन अफेअर्स’ ने 45वर्षांत 248 लेख प्रसिद्ध केले. आज त्याचा खप दोन लाख असून,रशियन, स्पॅनिश व जपानी भाषेत त्याच्या आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत.

पहिल्या महायुद्धानंतर पॅरिस येथील शांतता परिषदेत इंग्लंड व फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी जर्मनीला शासन करण्यासाठी कडक धोरण स्वीकारले होते. नंतर राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्सची)स्थापना झाली. त्याचा डळमळता पाया पाहून अमेरिका व इंग्लंडमधल्या अनेक विचारी लोकांना आंतरराष्ट्रीय राजकारण निराळ्या पद्धतीने चालवण्याची आवश्यकता वाटू लागली. यासंबंधी चर्चा, संशोधन इत्यादी होण्यासाठी एखादी संस्था असावी असे वाटून,न्यूयॉर्कमध्ये 1921 मध्ये ‘कौन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. वर्षभरानंतर, म्हणजे 1922 मध्ये या संस्थेतर्फे ‘फॉरिन अफेअर्स’ या नावाचे द्वैमासिक प्रसिद्ध होऊ लागले.

संस्थेचा व द्वैमासिकाचा व्याप वाढत जाऊन वॉशिंग्टनमध्ये कौन्सिलची शाखा स्थापन झाली. ‘फॉरिन अफेअर्स’चा खप आता दोन लाख आहे. याखेरीज या द्वैमासिकाच्या रशियन, स्पॅनिश व जपानी भाषांत आवृत्त्या प्रसिद्ध होतात. या आंतरराष्ट्रीय आवृत्यांत त्या त्या देशांतल्या तज्ज्ञांचे लिखाण येते आणि मूळ अमेरिकन आवृत्तीतील काही लेख भाषांतरित स्वरूपात दिले जातात. ‘फॉरिन अफेअर्स’ आणि कौन्सिलच्या स्वतंत्र वेबसाईट आहेत.

‘फॉरिन अफेअर्स’ने प्रथमपासून कौन्सिल प्रमाणेच कोणत्याही विषयासंबंधी कोणतीही भूमिका न घेण्याचे धोरण अवलंबले आहे. कौन्सिल अनेक संशोधक, अभ्यासक इत्यादींना त्यांची मते मुक्तपणे व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळवून देत असले, तरी ते स्वत: विशिष्ट भूमिका घेत नाही; त्याचप्रमाणे द्वैमासिकही घेत नाही. दोन्हींचे कार्य एकमेकांस पूरक असते. यामुळे कौन्सिल व ‘फॉरिन अफेअर्स’ यांचा एकत्र विचार करावा लागतो.

कौन्सिलची स्थापना झाली तेव्हा 75 सभासद होते. आता ही संख्या 4300 आहे. सभासद विविध विचारांचे असावेत आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा सर्वांगीण विचार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असा हेतू बाळगण्यात आला. सरकार व समाज यांच्यात आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी जागृती करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पुढे जी पिढी वावरेल तिची बौद्धिक तयारी करण्यास साहाय्य देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. ‘फॉरिन अफेअर्स’ हे द्वैमासिक याच उद्दिष्टाची पूर्ती करण्याचे एक साधन आहे.

कौन्सिलतर्फे शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि काही अभ्यासकांची ठराविक काळासाठी तर काहींची दीर्घ काळासाठी नेमणूक होत असते. अल्पकालासाठी अभ्यासवर्ग तसेच परिसंवाद आयोजित करण्यात येतात. तसेच वर्षातून काही परिषदा घेण्यात येतात. यात होणाऱ्या कामकाजाचे वृत्त वेबसाईटवर मिळू शकते. विविध देशांचे नेते, संशोधक इत्यादी अमेरिकेत येतात, तेव्हा त्यांची व्याख्याने वा मुलाखतीचे कार्यक्रम होतात. कौन्सिलची स्थापना झाल्यानंतर 1922 साली तेव्हाचे फ्रेंच पंतप्रधान जॉर्ज लेमेन्सॉ हे न्यूयॉर्कला आले असता त्यांनी कौन्सिलच्या व्यासपीठाची निवड आपल्या महत्त्वाच्या भाषणासाठी केली होती.

कौन्सिल व ‘फॉरिन अफेअर्स’ अमेरिकन सरकारशी सहकार्य करीत असले, तरी सरकारची पाठराखण करण्याचे त्याचे धोरण नाही. उलट अनेक वेळा सरकारने ‘फॉरिन अफेअर्स’मधील काही लेख वा कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिका, यांचा धोरण ठरवताना उपयोग केलेला दिसेल. ‘फॉरिन अफेअर्स’चे प्रकाशन 1922 साली सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या सर्व परराष्ट्रमंत्र्यांचे लेख दिले आहेत. तसेच अनेकविध देशांचे अध्यक्ष व पंतप्रधानांचे लेखही द्वैमासिकत आले आहेत.भारताचे उदाहरण घेतले तर पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचे लेख आठवतात.

‘फॉरिन अफेअर्स’ प्रकाशित करण्याचा निर्णय झाल्यावर हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आर्चिबॉल्ड कुलिज यांची निवड करण्यात आली. त्यांनी रशिया व पूर्व युरोपचा तसेच एकंदर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा खोलात जाऊन अभ्यास केला होता व त्याविषयीचा त्यांचा अभ्यास सर्वमान्य झाला होता. कुलिज यांनी कौन्सिलचे आमंत्रण स्वीकारताना ‘आपण हार्वर्डमधील आपले काम बंद करणार नाही’ हे स्पष्ट करून द्वैमासिकचे बाकी सर्व काम करणारा कार्यकारी संपादक शोधण्याची सूचना केली. त्याप्रमाणे हॅमिल्टन फिश आर्मस्ट्राँग यांची निवड झाली. ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक होते. आर्मस्ट्राँग हे 1928 साली कुलिज यांच्या निधनानंतर संपादकपदावर आले, ते पद त्यांच्याकडे 1972 पर्यत होते. म्हणजे द्वैमासिकशी ते कार्याकारी व नंतर संपादक या नात्याने पन्नासएक वर्षे निगडित होते. ‘फॉरिन अफेअर्स’चा पाया त्यांनी घातला.

कुलिज यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात रशियात युद्धाची झळ लागलेल्यांना मदत देण्याचे काम करून अनेक ओळखी करून घेतल्या होत्या. त्यांनी द्वैमासिकाच्या पहिल्या वर्षातील एका अंकात सोव्हिएत युनियनसंबंधी टोपणनावाने लेख लिहिला आणि कार्ल रॅडेक या लेनिनच्या निकटच्या सहकाऱ्यास तो धाडला. रॅडेक याने तो वाचून त्याच्या मोकळ्या जागेत आपली मते नोंदवली. इतकेच नव्हे तर,लेनिननेही लेख वाचताना त्याच्या सवयीप्रमाणे अनेक भागांवर खुणा केल्या आणि आपली मते नोंदवली. ही प्रत कुलिज यांच्याकडे पाठवण्यात आली. कौन्सिलच्या कार्यालयात ती प्रत जपून ठेवलेली आहे. गोर्बाचेव्ह 1989 मध्ये अमेरिकेत आले तेव्हा त्यांना ही प्रत दाखवली असता, त्यांनी रॅडेकचा अभिप्राय पाहताच ‘रॅडेक हा देशद्रोही होता’ असा शेरा मारला. म्हणजे इतके सर्व रामायण होऊनही गोर्बाचेव्ह यांच्यावरचा स्टालिनचा संस्कार पूर्णत: पुसला गेलेला नव्हता. रॅडेक हा स्टालिनच्या असंख्य बळींपैकी एक होता.

पुढील काळात अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध चालू राहिले होते. त्यावेळी दोन महासत्तांत समझोता व्हावा या हेतूने आर्मस्ट्राँग यांनी 45 वर्षांमध्ये 248 लेख द्वैमासिकात प्रसिद्ध केले. अर्थात यात रशियन राज्यपद्धती व परराष्ट्र धोरण यांची समीक्षा करणारे लेखही येतात. रशियन क्रांतीनंतर स्थापन झालेल्या बोल्शेव्हिक सरकारला अमेरिकेने पहिली काही वर्षे मान्यता दिली नव्हती. कुलिज आणि आर्मस्ट्राँग यांच्या मते हे चुकीचे धोरण होते, पण अधिकृतपणे द्वैमासिकाने आपले मत न देण्याची भूमिका घेतल्यामुळे या दोघांनी जाहीर वाद घातला नाही. दोघेही वास्तववादी असल्यामुळे सोव्हिएत सरकारला मान्यता देणे त्यांना आवश्यक वाटत होते, असे मत मॅक्जॉर्ज बंडी यांनी एका भाषणात व्यक्त केले होते. ते नंतरच्या काळात ‘फॉरिन अफेअर्स’चे संपादक होते.

‘फॉरिन अफेअर्स’मध्ये ग्रंथपरीक्षणास महत्त्वाचे स्थान देण्याचे ठरवून कुलिज यांनी विल्यम लॅन्गर या हार्वर्डच्या प्राध्यापकाची निवड केली. लॅन्गर यांनी दीर्घकाळ एकट्याने परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आणि तेव्हापासून ग्रंथपरीक्षण हे ‘फॉरिन अफेअर्स’चे एक खास वैशिष्ट्य होऊन बसले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही, की द्वैमासिकच्या पहिल्या काही वर्षांतच वंशवादाचा प्रश्न हाताळण्यात आला होता. डब्ल्यू. दुबोई या आफ्रिकन-अमेरिकन विचारवंताने लिहिलेले त्यावरील लेख बरेच गाजले. त्या लेखातील काही निष्कर्ष वाचून कुलिज अस्वस्थ झाले होते. या प्रश्नाप्रमाणेच वसाहतवाद आणि महिलामुक्ती हे प्रश्न हाताळणारे लिखाण ‘फॉरिन अफेअर्स’ने प्रसिद्ध केले होते.

अमेरिकेने जागतिक प्रश्नांबाबत जागृत राहावे म्हणून हे द्वैमासिक व कौन्सिल प्रयत्नशील असले, तरी पहिल्या महायुद्धापूर्वी व नंतरही तटस्थतेच्या धोरणाचा विलक्षण प्रभाव अमेरिकेतील जनमानसावर व सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर होता. जर्मनीत हिटलरचा उदय होत असताना आर्मस्ट्राँग यांनी 1933 साली हिटलरची मुलाखत घेतली. हिटलरची मुलाखत म्हणजे एक लांबलचक व्याख्यान होते. स्वदेशी परतल्यावर आर्मस्ट्रॉग यांनी एक छोटे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले होते.

हिटलरने आक्रमण केल्यावर ब्रिटन व फ्रान्स यांनी प्रतिकाराचा पवित्रा घेतला.  तथापि, फ्रान्स लवकरच शरण गेला. इतके होत असतानाही अमेरिकन लोकप्रतिनिधी तटस्थतेचा आग्रह सोडत नव्हते. रूझवेल्ट यांनी काही मार्ग काढून, ब्रिटनला मर्यादित मदत सुरू केली आणि पर्ल हार्बरवर हल्ला झाल्यानंतर मात्र अमेरिका युद्धात उतरली. रूझवेल्ट यांच्या धोरणास ‘फॉरिन अफेअर्स’चा मिळत असलेला पाठिंबा महत्त्वाचा होता.

युद्धानंतर सोव्हिएत युनियनच्या विरोधी धोरण अमेरिकेने स्वीकारले नव्हते, पण स्टालिन बदलण्यास राजी नव्हता. त्याने आक्रमक धोरण स्वीकारले. तेव्हा पश्चिम युरोप वाचवण्यासाठी जी मार्शल मदत योजना अमेरिकेने जाहीर केली तिची वैचारिक पार्श्वभूमी ‘फॉरिन अफेअर्स’ने तयार केली होती. स्टालिनच्या दुराग्रही धोरणामुळे बर्लिनची कोंडी करण्यात आली. तिचा बिमोड करण्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांनी यश मिळवले. या अनुभवामुळे रशियाच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करण्याची निकड भासू लागली. त्यासाठी मॉस्कोतील अमेरिकन वकिलास अहवाल देण्याची सूचना करण्यात आली, तेव्हा राजदूत हजर नसल्यामुळे दूतावासातील दुय्यम प्रमुख जॉर्ज केनान यांनी ही जबाबदारी पार पाडली.

केनान हे रशियन भाषा, इतिहास, व समाज यांचे तज्ज्ञ होते. त्यांनी पाच हजार शब्दांचा अहवाल पाठवला. तो अधिक वाढवण्यास त्यांना सांगण्यात आले, तसा वाढवला गेला. याचा प्रसार अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या अनेक विभागांत करण्यात आला आणि ‘फॉरिन अफेअर्स’मध्ये तो संक्षिप्त स्वरूपात देण्यास परराष्ट्र मंत्र्यांनी परवानगी दिली. केनान यांनी तो अहवाल ‘एस’ या टोपण नावाने प्रसिद्धीस दिला. ‘फॉरिन अफेअर्स’च्या इतिहासात व नंतर इतकी चर्चा जगभर झालेला दुसरा लेख झाला नाही.

केनान यांनी सोव्हिएत युनियनचे धोरण आक्रमक का आहे, याची मीमांसा करून त्यास पायबंद घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. शीतयुद्धाच्या सर्व काळात अमेरिकेच्या धोरणाचा पाया घालण्याचे काम या लेखामुळे झाल्याचे मानले जाते. तथापि, केनान यांनी याच लेखात असेही प्रतिपादन केले होते, की केवळ शस्त्रबळावर रशियास प्रतिकार करण्याचे धोरण यशस्वी होणार नाही. या बळाबरोबरच अमेरिका व दोस्त राष्ट्रे यांनी आपल्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक धोरणातही बदल करायला हवा. या दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष झाले. केनान यांच्या भूमिकेस आक्षेप घेणारेही अनेक जण होते.

स्टालिनचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांनी आमूलाग्र बदल केला नाही. अण्वस्त्रांचा प्रश्न या काळात उग्र होऊ लागला असता त्याविषयी चर्चा करणारे अनेक लेख ‘फॉरिन अफेअर्स’ मध्ये आले. तसेच पूर्व युरोपवर पकड ठेवण्याच्या भूमिकेमुळे रशियन नेते जे धोरण अमलात आणीत होते, त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंबंधात द्वैमासिकाने अनेक लेख प्रसिद्ध केले.

इराणच्या शहाने तेलाच्या किंमती वाढवण्याचा पवित्रा घेऊन पाश्चात्त्य राष्ट्रांना धक्का दिला. त्या काळात ‘फॉरिन अफेअर्स’ने या तेलाच्या प्रश्नासंबंधी अनेक तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध केले होते. हा प्रश्न नंतर आणि आजही उग्र स्वरूपाचाच आहे. द्वैमासिक वेळोवेळी त्याची दखल घेत आले आहे. अमेरिकेने कम्युनिस्ट चीनवर बहिष्कार टाकला होता. निक्सन अध्यक्ष झाल्यावर त्यांनी चीनशी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्यांनी ‘फॉरिन अफेअर्स’मध्ये लिहिलेल्या लेखांत या दोन देशांतील संबंधात सुधारणा होण्याचा उल्लेख केला होता, हे खरे; पण चीनचा विविध अंगांनी अभ्यास करण्याचा निर्णय कौन्सिलने साठच्या दशकात घेतला होता. त्याप्रमाणे रॉबर्ट ब्लम यांची नेमणूक झाली. ते सरकारी नोकरीच्या निमित्ताने चीनविषयक अभ्यास करीत होते. त्यांनी काही सहायक मदतीला घेतले. त्याआधी कौन्सिलनेच्या संबंधात काही ग्रंथ प्रसिद्ध केले होते आणि अखेरचा ग्रंथ तयार होत असताना ब्लम यांचे निधन झाल्यामुळे बार्नेट यांनी तो पुरा केला. म्हणजे निक्सन यांच्याकडे नव्हे तर कौन्सिलकडे चीनसंबंधीचे धोरण बदलण्याचे श्रेय जाते.

नंतरच्या काळात सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात लष्कर धाडल्यावर प्रथम कार्टर आणि नंतर रेगन यांनी रशियनांविरुद्ध लढणाऱ्या मुजाहिदांना पाकिस्तानतर्फे मदत देण्यास आरंभ केला. या वेळीही ‘फॉरिन अफेअर्स’मधील अनेक लेख विवेचक होते आणि सावधगिरीचा इशारा देत होते.

सोव्हिएत युनियनची समाप्ती व नंतरचा काळ हा या द्वैमासिकची कसोटी पाहणारा होता. या कसोटीला ते चांगल्यापैकी उतरले. याआधी चीनमध्ये नव्या आर्थिक धोरणाचा अवलंब करण्याच्या दिशेने पावले टाकली गेली. त्याचे परिणाम दिसू लागले. या पाठोपाठ काही वर्षांनी भारतानेही अनेक निर्बंध सैल करण्याचे व काही रद्द करण्याचे धोरण स्वीकारले. यामुळे आशियाचा आर्थिक नकाशा बदलत आहे आणि त्याची दखल घेणारे लेख ‘फॉरिन अफेअर्स’मध्ये येत असतात.

जॉर्ज बुश यांच्या राजवटीत ‘अल कायदा’ ही दहशतवादी संघटना पुढे आली आणि तिने न्यूयॉर्क व वॉशिंग्टनवर हवाई हल्ला केला. तेव्हा अफगाणिस्तानातील ‘अल कायदा’स पायबंद घालण्यासाठी कारवाई झाली; पण हे कार्य अर्धवट सोडून इराकविरुद्ध चढाई करण्यात आली. तेव्हापासून इस्लामी दहशतवाद हा जागतिक प्रश्न होऊन बसला. ‘फॉरिन अफेअर्स’ने या संबंधात अनेक उल्लेखनीय लेख प्रसिद्ध केले आहेत.

या दहशतवादाचा सॅम्युअल हटिंग्टन यांनी वेगळा विचार केला होता. त्यांनी ‘फॉरिन अफेअर्स’मध्ये लिहिलेल्या लेखाने- ‘क्लँश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ (सांस्कृतिक संघर्ष)- खळबळ उडाली आणि जगभर त्याची चर्चा होत राहिली. एडवर्ड सईद यांनी हटिंग्टन यांच्या विवेचनाविषयी आक्षेप घेतले. त्यांचे असे म्हणणे होते, की मुस्लिम व ख्रिश्चन या दोन्ही संस्कृती एकसंध नाहीत. देशागणिक या दोन्ही धर्मांचे लोक वेगवेगळ्या रीतीने वागताना व विचार करताना दिसतील.

नुकत्याच संपलेल्या 2009 या वर्षात ‘फॉरिन अफेअर्स’ने प्रसिद्ध केलेल्या काही महत्त्वाच्या लेखांची नोंद करणे उचित होईल. दहशतवादी जे अनेक उपाय योजीत असतात, त्यात संगणकावर हल्ला करून ती यंत्रणाच नष्ट करणे हा एक आहे. याचे गांभीर्य व व्याप्ती विशद करणारा एक लेख सर्वच देशांना विचार करायला लावणारा होता. यावर्षात डॉलर ढासळत गेला. अमेरिका जर आपला अर्थसंकल्प शिलकी करण्याचे आणि परकी कर्जाचा डोंगर कमी करण्याचे व्यापक प्रयत्न करणार नसेल, तर अधिकच कठीण परिस्थिती कशी निर्माण होईल, हे एका लेखात दाखवून दिले होते. आग्नेय आशियाकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा देणारा, नव्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांचा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्यात अफगाणिस्तानच्या प्रश्नाची चर्चा करणारा किम बार्कर यांचा लेख उल्लेखनीय आहे.  अफगाणिस्तानचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत असून तसा का होत आहे, याची मीमांसा या लेखात आहे. त्यातील एक अफगाणिस्तानमधील भ्रष्टाचारासंबंधीही आहे. अध्यक्ष कारवाई यासंबंधात काही करू शकत नाहीत, कारण त्यांनी प्रशासनाचे स्वरूपच भ्रष्टाचाराला पोषक करून ठेवले आहे, याचे अनेक पुरावे या लेखात दिले आहेत.

अफगाणिस्तानचा जवळपास 80 टक्के प्रदेश तालिबानच्या ताब्यात असून तिथे वेगळीच राज्यव्यवस्था आहे. अध्यक्ष कारझाई यांची जी काही सत्ता आहे ती मुख्यत: काबूलमध्ये आहे. म्हणजे सर्व देशाचे ते अध्यक्ष नसून काबूलचे महापौर आहेत. त्यांना पाठीशी घातल्याखेरीज अमेरिकेचे चालणार नाही. कारझाई याचा भरपूर फायदा उठवत असून अफगाणिस्तानमधील भ्रष्टाचारात त्यांचे नातेवाईकच सामील आहेत. याची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी प्रसिद्ध झाली आहेत.

बार्कर यांनी अफगाणिस्तानमधील भ्रष्टाचाराचे तीन वर्ग केले आहेत. एक चिल्लर, दुसरा बराच मोठा आणि तिसरा वर्ग अमेरिका अफगाणिस्तानात कंत्राटी पद्धतीने जी कामे देते, त्यातून निर्माण होणारा. या तिसऱ्या प्रकारामुळे अमेरिका जी मदत देते त्यामधील अगदीच थोडी लोकांच्या उपयोगी पडते.

अमली पदार्थांच्या व्यवहारात कमाई करणाऱ्यांपैकी काही जणांवर खटला होऊन शिक्षा झाली असता कारझाई यांनी त्यांना माफी दिली आणि अमेरिकनांना हात चोळीत बसावे लागले. अफगाणिस्तानच्या 34 पैकी 33 प्रांतात तालिबानने स्वत:ची भ्रष्टाचारविरोधी न्यायालये स्थापन केली असून ती झटपट निकाल देतात. कारझाई यांच्या प्रशासनातच भ्रष्टाचार बोकाळला असल्यामुळे या प्रकारची न्यायालये वा चौकशी समित्या या केवळ नावापुरत्या आहेत.

पहिली भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा 2008 साली रद्द झाली. तिचा प्रमुखच भ्रष्टाचारी निघाला. प्रमुख सरकारी वकील यात मागे नव्हता. कारझाई यांनी बहुतेक बड्या सामंतांना आश्रय देऊन कारभार चालवला असल्यामुळे परकी मदत आणि अंमली पदार्थांचा व्यापार यांतून कोट्यवधी डॉलर्स मिळवले जातात आणि लोक मात्र कंगाल झाले आहेत.

Tags: ४५ वर्ष २४८ लेख. जपानी भाषा आवृत्त्या स्पॅनिश रशियन   १९२२ आंतरराष्ट्रीय मासिक महायुद्ध ते तालिबान लेख मासिक जागतिक राजकीय घडामोडी द्वैमासिक फॉरिन अफेअर्स जागतिक राजकीय परिस्थिती गोविंद तळवळकर   Global political Scenario International Magazine Fortnightly Magazine Articles International Politics Magazine Foreign Affairs Global Politics Govind Talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके