डिजिटल अर्काईव्ह

हमीद केवळ मुस्लिम समाजावर टीकास्त्र का सोडतात, असा प्रश्न त्यांचे अनेक धर्मबांधव विचारत असत; परंतु समाजपरिवर्तनाचे काम करणाऱ्या अनेक परिवर्तनवाद्यांनी पूर्वापार हेच केले आहे. ज्या समाजात आपण जन्मलो- वाढलो, त्याच्यासंबंधी लिहिणे ओघानेच येते. लोकहितवादी, आगरकर, कर्वे, महात्मा फुले आदी सर्वांचा हाच परिपाठ असल्याचे दिसेल. तेव्हा हमीद आपल्याच समाजाच्या उणिवा दाखवून हिंदूंचा अनुनय करतात, ही टीका व्यर्थ होती; कारण त्यांनी हिंदूंवरही अनेकदा टीका केली आहे. पुढे तर त्यांनी समाजवादी पक्षावरही टीका केलेली दिसेल.  

हमीद दलवाई जाऊन आता अडतीस वर्षे झाली, पण कोणत्या ना कोणत्या प्रसंगी वा निमित्ताने या काळात त्यांची अनेकदा आठवण येत राहिली. हमीद वाचकांच्या पुढे आले ते कथाकार म्हणून. साठ-बासष्टचा तो काळ होता. त्यांची ‘इंधन’ कादंबरी पासष्टमध्ये ‘मौज’ने प्रसिद्ध केली. ती चांगलीच गाजली. तिची लोकप्रियता दीर्घ काळ टिकल्यामुळे दोन वर्षांपूर्वी या कादंबरीची सातवी आवृत्ती निघाली. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ या दैनिकात हमीद यांना 1962 मध्ये घेतले होते. दैनिकात त्यांना दिवस व रात्रीच्या पाळ्या कराव्या लागत. पण नंतर अत्रे यांनी त्यांना मुक्त पत्रकार म्हणून वागवण्याचे ठरवले असावे. यामुळे ते अनेक दौरे करत. काश्मीरचाही दौरा झाला होता. हमीद यांच्या कथा निरनिराळ्या मासिकांत येत. त्यातील बहुतेक लिखाण माझ्या वाचनात येत असे. पण त्या काळात मी डोंबिवलीत राहत होतो. हमीद यांची फेरी दादर, गिरगाव भागात झाली, तरी मला तिकडे फेरफटका फारसा करता येत नव्हता. पण 1968 मध्ये मी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झाल्यावर पुढच्या वर्षी मुंबईत चर्चगेटला ब्रेबॉर्न स्टेडियमजवळ राहू लागलो. यामुळे भेटीगाठी वाढणे शक्य झाले आणि आमची मैत्री वाढली.

हमीद यांना मुस्लिम समाजात परिवर्तनाचे अवघड कार्य करायचे होते. नोकरी-धंदा करून ते शक्य नव्हते. प्रसिद्धीपासून सदैव अलिप्त राहून विविध कार्ये आणि कार्यकर्ते यांना सदैव मदत करणाऱ्या समाजवादी परिवारातील गोरेगावचे पी.बी.सामंत यांनी हमीद यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला होता. सामंत व हमीद यांच्या काही मित्रांनी मांडलेल्या योजनेमुळे हमीद यांना नोकरी करण्याचे कारण राहिले नाही. त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा या नोकरी करत राहिल्या. हमीद यांनी त्यांच्या चिपळूणजवळच्या गावात असतानाच राष्ट्रसेवा दल या समाजवादी नेतृत्वाखालील संघटनेत प्रवेश केला होता. त्यामुळे अच्युतराव पटवर्धन, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान, यदुनाथ थत्ते, भाई वैद्य, आदींच्या सहवासात हमीद येणे साहजिक होते. मुंबईत काम करू लागल्यावर त्यांच्याशी संबंध वाढत गेला आणि त्यांच्याकडून हमीद यांनी राजकीय धडे घेतले. ललित लेखन आणि पत्रकारिता करणारे हमीद, मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करून व काही सहविचारी जमवून अत्यंत कठीण आणि काही वेळा स्वत:च्या व आपल्या कुटुंबीयांच्या जीवास धोका आणणारे काम करू लागले. त्यांच्या लिखाणाचे कौतुक करणाऱ्या माझ्यासारख्यांना मग वेगळ्या हमीदचे दर्शन झाले. ललित लेखकाचे हे परिवर्तन मात्र आकस्मिक आणि केवळ भावनाशीलतेच्या आहारी जाऊन झाले नाही, हे त्यांच्याच काही कथा आणि ‘इंधन’ ही कादंबरी यांमुळे समजू शकेल.

‘लाट’ या कथासंग्रहातील पहिली कथा आहे, ‘छप्पर’. नंतर थोड्याच वर्षांत हमीद यांनी मुस्लिम समाजात परिवर्तनाचे कार्य सुरू केले, त्यासाठीची त्यांची मानसिक तयारी तेव्हा होत असल्याची साक्ष देणारी ही कथा आहे. कथेचा नायक आपले शिक्षण संपवून चार वर्षांनी घरी येतो; पण घरातल्या अंधाराने बेचैन होतो. घरात जातो तो आणखी काळोख्या खोलीत आपली बहीण तिच्या नवजात मुलीला घेऊन बाजेवर पडलेली कशीबशी दिसते. तिचा पांढराफटक पडलेला चेहरा त्याला धक्कादायक वाटतो. या मुलीला काही झाले नसल्याची आई-वडिलांची खात्री मुलाला पटत नाही. घरात वारा व उजेड पाहिजे म्हणून तो आग्रह धरतो आणि डॉक्टरला बोलावून आणतो. तपासणी झाल्यावर बहीण वाढत्या अवस्थेतील क्षयाने बेजार असल्याचे समजते. ती मुलगी थोड्याच दिवसांत मरण पावते. तिच्या शुश्रूषेमुळे, संसर्गाने लहान बहिणीचे आयुष्य संपते आणि तिच्यानंतर वडिलांचेही. हा मुलगा छप्पर बदलण्याचा आग्रह धरतो; तर ‘घर कसे जुने आहे, पूर्वजांनी आपल्याला हा ठेवा दिला असून तो किती मोलाचा आहे,’ याची कहाणी आई सांगते. हिंदू काय नि मुसलमान काय या समाजांच्या छपरांतच नव्हे, घरातही बदल व सुधारणा हवी; हमीद यांच्या या मागणीचा उगम अशा कथांत सापडू शकतो.

‘इंधन’ ही कादंबरी आजही ताजीतवानी वाटते. थकलेल्या शरीराला विश्रांती देण्यासाठी आपल्या कोकणातल्या खेडेगावात पंधरा वर्षांनी आलेला अशक्त नायक अपरिचित अशा वातावरणात येतो. नंतर हे आपले छोटे गाव कसे बदलले आहे, याची उदाहरणे एकामागोमाग त्याच्या पाहण्यात येऊ लागतात. पण त्याला खरा धक्का लहानपणी एकाच शाळेत शिकलेल्या सुमतीच्या जीवनकहाणीने बसतो. ती अविवाहित असते; एकाच घराच्या अर्ध्या भागात भिंत घालून वेगळा राहणारा भाऊ वेगळ्याच वृत्तीचा असतो. नायकाचा विवाहित भाऊ शिक्षक असताना या त्याच्या विद्यार्थिनीला बळजबरीने नादी लावतो आणि तिचे जीवन बरबाद होते. तीच हे सर्व त्याला कथन करते. कदाचित ती नायकाच्या प्रेमात पडली असावी. गावात इतरही अनेक बदल झालेले असतात. या बदलांबद्दल सुमती व नायक बोलतात, तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या नायकाला ती म्हणते, ‘आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तू तर पुढारी आहेस, परिवर्तनाच्या गोष्टी करतोस; पण गावात होत असलेले बदल तुला माहीत नाहीत आणि समजलेही नाहीत.’ इत्यादी बोलून तिने परिवर्तनाची हाक देणाऱ्यांना जमिनीवर येण्यास सांगितले आहे. परंतु, कितीही बदल झाले तरी कथानक पुढे गेल्यावर एका मूलभूत बाबतीत हवा तो बदल झालेला नाही, हे नायकास आणि सुमतीस पाहायला मिळते. ती बाब म्हणजे, हिंदू-मुसलमान यांच्यातील संबंध. फाळणीनंतर मुंबईपासून दूर असलेल्या गावात उलथापालथ झाली, पण वातावरण निवळले. यात काही काळ गेला. तथापि, नायक परत गावी आला तेव्हा टाळता येऊ शकणाऱ्या कारणावरून हिंदू-मुसलमानांत दंगल पेटली. मग बदल कसला? या स्थितीत सुमती मुंबईला जाण्याचे टाळत होती, ती मुंबईला रवाना होते आणि नायकही तोच मार्ग स्वीकारतो. काही प्रश्न वर्षानुवर्षे सुटतच नाहीत, असा हा कादंबरीचा शेवट आहे.

कादंबरी प्रसिद्ध झाली, तेव्हा हमीद यांच्या गावातही विरोधी वातावरण पसरले आणि महाराष्ट्रात ही कादंबरी चर्चेचा विषय होऊन बसली. हमीद याच विषयात अधिकाधिक मग्न होत गेले आणि त्यांनी या विषयाचा अभ्यास व त्याविषयीची चर्चा अनेक वर्तुळांत, तसेच अनेक गावांत जाऊन करण्याचा परिपाठ सुरू केला. हमीद यांनी आपल्या कार्यास एखादे स्वतंत्र व्यासपीठ असावे, असा निर्णय घेतला. तसा तो घेणे अनिवार्य होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी मंडळाच्या कामाला चालना देण्यास आरंभ केला, तो पुण्याला भाई वैद्य यांच्या घरी. हेही नमूद केले पाहिजे की, ‘साधना’ परिवार आणि समाजवादी व प्रजासमाजवादी हे हमीद यांना अनेक परीने मदत करत राहिले. परंतु हमीद यांनीच लिहिले आहे की, ‘या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या राजकारणाच्या मर्यादा होत्या. त्या लक्षात घेऊन स्वतंत्र संस्था स्थापन करणे आवश्यक होते.’ यामुळे ज्यांच्याकडून जे मिळेल ते साह्य घेऊन बाकीचे आपण पाहावे, असा हमीद यांनी निर्णय घेतला. नंतर प्रा.ए.बी. शहा, त्यांचे सहकारी व्ही.के. सिन्हा आणि दिलीप चित्रे हे कवी व लेखक यांनी हमीद यांना संस्थेच्या यंत्रणेचे साह्य देण्यास आरंभ केला. शहा यांची ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ आणि ते संपादित करत असलेले ‘क्वेस्ट’ मासिक यांचा हमीद यांना उपयोग होत होता. यामुळे महाराष्ट्राबाहेर प्रचार होण्याचा एक मार्ग मोकळा झाला. हमीद यांनी त्यांची संघटना उभी केली, त्या आधी थोडेच दिवस मी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झालो होतो. हमीद यांची भेट झाल्यावर मी हमीद यांना जेवढे साह्य देता येईल तितके देण्याचे ठरवले. गिरगावच्या बाजूस राहत असलेले माझे सहकारी दि.वि.गोखले यांची हमीद यांच्याशी चांगली ओळख होती. हमीद लेख देण्यासाठी किंवा इतर चर्चा करण्यासाठी कार्यालयात येत, तेव्हा गोखले हजर असत. 

हमीद यांचा मनमोकळेपणा आणि त्यांची बोलण्याची हौस व लकब यांमुळे आमच्या कार्यालयात त्यांना अनेक मित्र मिळाले होते. बोलता-बोलता एखादा विषय आमच्या मनात येई आणि हमीद त्याच्या अनेक बाजू लक्षात घेऊन लेख तयार करत. काही वेळा हमीदची व माझी अचानकपणे एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात भेट होई. मग तिथेच असलेल्या मोकळ्या जागेत दुर्गाबाई भागवत, नाना जोशी, जयंतराव जोगळेकर आणि इतर काही यांच्या अड्‌ड्यामध्ये गप्पांत आम्ही वेळ विसरून जात असू. यातूनही विषय मिळत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील हमीद यांचा एक लेख रा.स्व. संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी नियतकालिकाने भाषांतर करून प्रसिद्ध केला. त्यानंतर अलिगढ विद्यापीठातील एका चर्चासत्रासाठी आमंत्रित म्हणून हमीद, मे.पुं.रेगे आणि व्ही.के.सिन्हा गेले असता त्यांना ‘ऑर्गनायझर’मधील लेखावरून कसे अडचणीत पकडण्यात आले, याची हकिगत हमीद यांनी मला अलिगढ़हून आल्यावर सांगितली होती. ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ या त्यांच्या पुस्तकात ती आहे. अलिगढ विद्यापीठास हमीद अपरिचित नव्हते. ते पूर्वी अलिगढला काही वेळा गेले होते. पण या वेळेला काही विद्यार्थ्यांनी त्यांना ‘ऑर्गनायझर’मध्ये तो लेख का लिहिलात आणि त्या नियतकालिकात तुमचे अनेक लेख कसे आले, असा प्रश्न विचारून त्याचे समाधानकारक उत्तर मिळण्यासाठी आग्रह धरला. हमीद यांचा खुलासा होता की, तो लेख त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिला होता, त्यामुळे त्याचे हक्क त्या पत्राचे झाले. 

‘ऑर्गनायझर’ला लेख त्यांनी दिला नव्हता. इतरही लेख कधीही दिले नाहीत. एवढ्याने सर्व वाद थांबायला हवा, पण काही वेळाने त्याच विद्यार्थ्यांच्या गटाने ‘ऑर्गनायझर’मध्ये हमीद यांचे आणखी काही लेख असल्याची तक्रार करून खुलाशासाठी घेराव घालून हमीद यांना चर्चासत्रात भाग घेण्यास अडथळा आणण्याचा मनसुबा रचला. तेव्हा रेगे व सिन्हा यांना चर्चासत्रात भाग घेण्यासाठी मागे ठेवून हमीद यांना आपले हॉटेल गाठावे लागले. या प्रकारचे मुस्लिमविरोधी लेख लिहून हमीद हिंदूंचा पाठिंबा मिळवत असल्याची निराधार टीका सर्रास होत होती. हमीद यांचा असाच एक लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी छापला. तो रविवार होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच मोइनुद्दीन हॅरिस यांचा मला फोन आला. हमीद यांचा लेख आक्षेपार्ह असल्याचे सांगून आपण दुपारी भेटायला येतो, असे ते म्हणाले. हॅरिस समाजवादी पक्षाचे मुंबईतील नेते होते. महापालिकेतील त्यांचे काम चांगले असे. एक सौम्य वृत्तीचे व अभ्यासू नगरसेवक म्हणून मी त्यांना मानत होतो. त्यांचा लेख प्रसिद्ध करण्यास मला काही अडचण नव्हती. पण मी त्यांना सांगितले की, तुमच्या लेखाने दोन पक्ष पडणार आहेत. तुम्ही उत्तर पक्ष करणार असल्यामुळे हमीद यांना उत्तर देण्याचा हक्क आपोआपच पोचतो. हॅरिस यांना ते मान्य होते. त्याप्रमाणे हमीद यांनी सविस्तर उत्तर दिले. वाद तिथेच संपला. आजच्या काळात काय झाले असते, याची कल्पना करवत नाही. हमीद केवळ मुस्लिम समाजावर टीकास्त्र का सोडतात, असा प्रश्न त्यांचे अनेक धर्मबांधव विचारत असत; परंतु समाजपरिवर्तनाचे काम करणाऱ्या अनेक परिवर्तनवाद्यांनी पूर्वापार हेच केले आहे. ज्या समाजात आपण जन्मलो-वाढलो, त्याच्यासंबंधी लिहिणे ओघानेच येते. लोकहितवादी, आगरकर, कर्वे, महात्मा फुले आदी सर्वांचा हाच परिपाठ असल्याचे दिसेल. तेव्हा हमीद आपल्याच समाजाच्या उणिवा दाखवून हिंदूंचा अनुनय करतात, ही टीका व्यर्थ होती; कारण त्यांनी हिंदूंवरही अनेकदा टीका केली आहे. पुढे तर त्यांनी समाजवादी पक्षावरही टीका केलेली दिसेल. तेव्हा हिंदू अनुनयाची टीका किती चूक होती, हे स्पष्ट होईल.

मुस्लिम समाजाप्रमाणेच हिंदू समाजातही प्रतिगामी लोक सुधारणांना विरोध करत आले आहेत. उदाहरणार्थ- हिंदू कोडविषयीच्या विधेयकामुळे सरसंघचालक गोळवलकर तर रागावलेच, पण राष्ट्रपती असलेले डॉ.राजेन्द्र प्रसादही नाराज होऊन त्यांनी जितके अडथळे आणता येतील तितके आणले. यामुळे हिंदू कोड विधेयकाचा पहिला आराखडा काही बाबतींत थोडा सौम्य झाला. हिंदू लोकांची संमती असल्याशिवाय ते विधेयक आणता कामा नये, असा गोळवलकर, राजेन्द्र प्रसाद आदींचा पवित्रा होता; पण दुरुस्तीनंतर हिंदू कोड संमत झाले. त्यानंतर इतका काळ गेला. हिंदू समाजाचे त्यामुळे काय नुकसान झाले? हमीद यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ बळकट करण्यासाठी जोमाने काम करण्यास सुरुवात केली. अनेक मुस्लिम तरुण व स्त्रिया त्यांच्या कामात सहभागी होऊ लागल्या. मंडळाच्या विविध व वाढत्या कामाचे स्वरूप मेहरुन्निसा यांच्या आत्मचरित्रावरून लक्षात येईल. आपले काम आणि लेखन यांसंबंधी चर्चा करण्यास हमीद यांना माझ्या कार्यालयाचे व घराचे दरवाजे कायम खुले होते. घरी माझी पत्नी शकुंतला सर्वांचे जसे नेहमी स्वागत करीत असे, तसेच त्यांचे मोकळेपणाने स्वागत करत होती. ते पहिल्यांदा घरी येऊन गेल्यावर शकुंतला म्हणाली, ‘‘हे तर कोकणस्थ ब्राह्मणासारखे दिसतात. त्यांच्यासारखे घारे डोळे आणि काहीसे सानुनासिक उच्चार.’’

हमीद यांचा रोखठोकपणा आणि स्वत:च्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका असताना बोलण्या-लिहिण्यात काही बदल न करण्याची वृत्ती, यामुळे राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या व्यक्तींवर त्यांचा प्रभाव पडावा यात आश्चर्य नव्हते. हमीद यांनी एकदा सुलभ घटस्फोटाच्या (तलाक) प्रथेबद्दल मुस्लिम महिलांचा निषेधपर मोर्चा काढला होता. तसा मोर्चा निदान मुस्लिम समाजाच्या इतिहासातील पहिलाच असावा. त्यास मिळालेल्या प्रतिसादावरून मूळ मागणीची निकड प्रकर्षाने जाणवली. या मंडळाच्या वाढत्या व्यापामुळे संघटनात्मक, व्यावहारिक इत्यादी बाबींचा विचार करण्यासाठी हमीद बैठका घेत. अनेक बैठकांना आमंत्रण असल्यामुळे मी भाग घेत असे. पण संघटना, सभा इत्यादी मला न मानवणाऱ्या बाबी होत्या. वसंतराव नगरकर आणि ए.बी. शहा हे उत्साही व कार्यकुशल. यासाठीच्या काही बैठका आमच्या घरी घेण्यास मात्र मी तयार असे आणि तशा त्या होत. मुंबईत मंडळाने एक परिषद घेतली होती. माझी आठवण बरोबर असेल तर, वेस्ट एन्ड या चित्रपटगृहाच्या वर वा जवळ एका सभागृहात ती भरली असावी. अर्थात, ठिकाण महत्त्वाचे नाही. समारंभासाठी अध्यक्ष म्हणून आलेल्या व्यक्तीचे भाषण झाले, इतरांचीही झाली. सभेचे आयोजन, नियंत्रण इत्यादीत मुख्य सहभाग शहा व हमीद यांचा होता. माझ्या हे नजरेस आले की, हमीद हे परिषदेचे आकर्षण, केंद्रबिंदू; पण उत्सवमूर्ती असलेल्या, अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीस ते पूर्ण मान देऊन वावरत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळ महाराष्ट्रात स्थापन झाले. त्याचे संस्थापक हमीद हेही मराठी. पण ते कधी कोकण व मुंबई यातच फक्त फेऱ्या मारत राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या सर्व भागाचा त्यांनी परिचय करून घेतलाच; पण त्यांची दृष्टी व्यापक, देशव्यापी होती. यामुळे दक्षिणेच्या चारही राज्यांचा त्यांनी दौरा केला. गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पूर्वेस बंगाल व आसाम त्यांना अपरिचित नव्हते. 

या भेटीत अनेक तरुण मुस्लिमांशी चर्चा करण्यावर व मिळेल तितकी माहिती जमा करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ या त्यांच्या पुस्तकात हमीद यांच्या या चौफेर फिरण्याचा आणि दृष्टीचा पुरावा मिळेल. ती माहिती वाचल्यावर विविध भागांतल्या मुस्लिमांचे प्रश्न वेगवेगळे आहेत, हे लक्षात येऊन सरसकट एकच मत बनवणे आणि उपाय सुचवणे कसे चुकीचे आहे, हे समजते. हमीद यांचे ते पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाले. त्याचे हस्तलिखित मेहरुन्निसा यांना सापडल्यावर त्यांनी ते ग.प्र.प्रधान यांना दिले, तसेच भाई वैद्य यांना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि वैद्य यांनी ती लिहिली. पुस्तकाची पहिली आवृत्ती 2002 मध्ये तर दुसरी 2012 मध्ये निघाली. पुस्तक अपुरे राहिले, कारण हमीद यांचा शेवटचा वर्ष-दोन वर्षांचा काळ असाध्य रोगामुळे दुखण्यात गेला. मूत्राशयात बिघाड झाला होता. दुसरे मूत्राशय मिळाले आणि शस्त्रक्रियाही झाली. पण लवकरच पुन्हा बिघाड झाला. मग तीन-चार दिवसांनी डायलिसिसवर जावे लागे. जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार होत. कुरुविल्हा व कामत हे दोन्ही डॉक्टर अतिशय दक्ष होते. हॉस्पिटलपासून जवळ राहण्याची त्यांची सोय शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांच्यामुळे झाली. दोघांनी चांगली व्यवस्था केली होती. त्या काळात मी अनेकदा रामटेकच्या आवारातील त्या बंगलीत हमीद यांना भेटण्यासाठी जात असे. हमीद जेव्हा उपचार झाल्यावर परत येत, तेव्हा त्यांचा उत्साह बघून आनंद होई. एकदा तर दुसऱ्या महायुद्धाचा विषय त्यांनी काढला आणि पाऊणएक तास याच विषयावरचे संभाषण आमच्यात रंगले. पण ते संपल्यावर मी घरी जायला निघालो, तेव्हा वाईट वाटले. त्या दिवसांत हे वारंवार होत असे.

दलवाई यांच्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकास लिहिलेल्या भाई वैद्य यांच्या प्रस्तावनेत निरनिराळ्या देशांत उदारमतवाद कसा वाढत आहे याची माहिती दिली असून, अखेरीस काही व्यक्तींचा नामनिर्देश केला आहे. तसेच हमीद यांच्या लिखाणाचा सर्व संदर्भ नीट लक्षात घेऊन मुस्लिमांनी विश्व हिंदू परिषद ज्याप्रमाणे हिंदूंची मने भडकवीत आहे त्याप्रमाणे मुसलमानांच्या बाबतीत करू नये, असे आवाहन केले आहे. परंतु हमीद यांनी मात्र मुस्लिमांच्या वृत्तीचा व हिंदूंचा संबंध नसून तिचा स्वतंत्रपणे विचार केला पहिजे, असे म्हटले आहे. भाई वैद्य यांनी हमीद यांच्या कार्याचे यथायोग्य मूल्यमापन करून हिंदुत्वनिष्ठ संघटना कशा प्रकारे प्रचार करतात याचे विवेचनही केले आहे. हिंदू जातीयवादी संघटना वाढल्याबद्दलचा विषाद उचित आहे. त्याचबरोबर मुस्लिम जातीयवादी संघटनांचाही निषेध केला पाहिजे, असे हमीदच म्हणत असत. हिंदू समाजाच्या वर्तनाची प्रतिक्रिया मुस्लिम समाजात होते, असे हमीद यांनी म्हटलेले नाही. तेव्हा आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्या सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारला, तर बरे होईल. हमीद यांनी स्वतंत्र व्यासपीठ स्थापन केले. हमीद हे ललित लेखक होते, पण त्याबरोबर ते नुसत्या स्वप्नात वावरत नसत. कित्येक वेळा आपण असे पाहतो की, प्रबोधनाचे अवघड आणि धोक्याचे कार्य करणारे लोक, आपण यशाच्या जवळ आल्याचे मानून बोलत व लिहीत असतात. हमीद त्यांतले नव्हते. ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ या पुस्तकात त्यांनी प्रबोधनाच्या कार्याचा आढावा घेताना ‘आपण मुस्लिम समाजास नव्या जीवनसरणीकडे वळवू,’ अशी भाषा केली नाही. हे सावकाश होणारे काम आहे, असे ते म्हणत. त्यांचा भरवसा तरुण पिढीवर होता. तसेच त्या पिढीत तंत्रज्ञ निर्माण व्हावेत, लहानसहान तांत्रिक कामांचा प्रसार व्हावा, असे ते म्हणत.

लक्षात घेण्याची गोष्ट ही की, हिंदू व मुसलमान हे दोन धर्मपंथ नसून दोन राष्ट्रे आहेत, असे सर सय्यद अहमद नंतर म्हणू लागले असले; तरी त्यांनी महाविद्यालयाची स्थापना करताना विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या शिक्षणासच प्राधान्य दिले होते. हमीद यांचा भरही विज्ञान व तंत्रज्ञान यांवर होता. अशा या हमीद यांच्या आयुष्याची समाप्ती अल्प काळात व्हावी, ही मोठी दु:खद घटना होती. अनेक घटनांनी भरलेल्या हमीद यांच्या जीवनाच्या अखेरीनंतरही पेच निर्माण झाला होता. हमीद यांच्यावर अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करणार, हा तो प्रश्न. हमीद यांच्या गावचे पाच-पंचवीस लोक आले होते. हमीद यांचे शव गावाला नेऊन मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार करणार, असे ते म्हणत होते. तथापि, हमीद यांनी तीन छोटी पत्रे लिहिली होती. एकात त्यांनी ‘दफन करू नये,’ असे लिहून; ए.बी.शहा, वसंतराव नगरकर आणि गोविंद तळवलकर या तिघांनी मिळून अंत्यसंस्काराची व्यवस्था करावी, असे म्हटले होते. आम्ही हमीद यांच्या गावकऱ्यांना हे वाचण्यासच दिले. शहा आणि शरद पवार यांनी त्या गावकऱ्यांना सांगितले की, हमीद यांनी त्यांची शेवटची इच्छा छोट्या पत्रात स्पष्ट केली आहे. ती पुरी न झाल्यास आम्हाला वाईट वाटेल. मी चर्चगेट भागात जिथे राहत होतो, त्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला दलवाई याच नावाचे गृहस्थ राहत. ते विधान परिषदेचे काँग्रेसतर्फे निवडून गेलेले आमदार होते. आम्ही एकमेकांस ओळखत होतो, इतकेच. बोलणे-चालणे विशेष नव्हते. त्या दिवशी मात्र मी त्यांना थोडे बाजूला बोलावले आणि म्हटले की, हा वादाचा विषय न झालेला बरा. हमीद यांची अखेरची इच्छा तुम्हाला समजली आहे. आमचा कसलाच आग्रह नाही. तेव्हा हे लक्षात घ्याल, तर सर्वांत बरे. दोन-चार मिनिटांत ते त्यांच्याबरोबर आलेल्यांशी बोलले आणि सर्व जण कसलाही वाद न करता निघून गेले. सर्व संस्कार झाले आणि हमीदच्या आठवणी काढत मी व शकुंतला घरी परतलो.

सच्चा सत्यशोधक
श्री. हमीद दलवाई यांच्या मृत्यूने एक सच्चा सत्यशोधक आपण गमावला आहे. दलवाईंनी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा भेद कधीच मानला नाही, व्यवहारातही केला नाही. पण भारतातील मुस्लिम समाज अनेक कालबाह्य समजुतींनी, घातक रूढींनी ग्रस्त असल्यामुळे तो समाज इतरांच्या मागे राहिलाच आहे; पण मुसलमानांच्या प्रचंड संख्येमुळे राष्ट्रीय जीवनप्रवाहही थबकला आहे, अशी त्यांची धारणा होती व म्हणून त्यांनी मुस्लिम समाजसुधारणेच्या कार्याला वाहून घेतले. दलवाई हा अष्टपैलू मनुष्य होता. पत्रकारिता, लेखन, राजकारण आदी विषयांत आपणास उत्तम गती आहे हे त्यांनी सिद्ध केले होते, पण गेली काही वर्षे मुस्लिम समाजसुधारणेवाचून त्यांच्या डोक्यात अन्य विषय नव्हता, ओठांवर दुसरी भाषा नव्हती. मुसलमान समाजाचे अज्ञान नाहीसे झाले पाहिजे. मुस्लिम समाजातील बहुभार्या पद्धती नाहीशी व्हायची असेल, तर मुस्लिम स्त्रियांना गोषाबाहेर काढून त्यांच्यातच जागृती निर्माण केली पाहिजे, ही तळमळ त्यांना लागली होती. यासाठी त्यांचे सतत प्रचारदौरे चालू असत. जेथे जात तेथे मुस्लिम तरुणांच्या ते बैठकी घेत; महिलांना संघटित करीत, त्यांना परिषदा भरवून आवाज उठविण्याची प्रेरणा देत. हे करताना ना त्यांनी आपल्या संसाराकडे लक्ष दिले ना प्रकृतीकडे पाहिले. झपाटलेला कार्यकर्ता कसा असतो असे ते आजारी होण्यापूर्वी कोणी विचारले असते, तर हमीद दलवाईंकडे बोट दाखवावे लागले असते.

काही माणसे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, तर काही माणसांच्या कपाळी कष्ट व हालअपेष्टाच लिहिलेल्या असतात. दलवाई या दुसऱ्या वर्गातले. घरची गरिबी, त्यामुळे उच्च शिक्षणाकडे वळणे अशक्य झाले. फाळणीच्या गर्जना भारतात घुमत होत्या त्याचवेळी हमीद सेवादलात जाऊ लागले. त्यामुळे वडिलांचे त्यांच्याशी तंटे झाले; समाजही डोळे वटारून पाहू लागला. पण दलवाईंच्या निष्ठा कधी ढेपाळल्या नाहीत, गरिबीमुळे ते जसे खचले नाहीत, तसे या डरकावण्यांनीही ते हबकले नाहीत. याच काळात त्यांचा ध्येयवाद निश्चित झाला, नि त्याच अनुरोधाने त्यांची पावले पत्रव्यवसायाकडे वळली. मुस्लिम समाजाबद्दल क्रांतिकारक विचार मांडणारे त्यांचे लेख वृत्तपत्रांत येऊ लागले, नि साहजिकच सनातनी मुसलमान संतापले. पण ‘इंधन’ या आपल्या कादंबरीबद्दल दलवाईंना मुस्लिमेतर समाजाचाही रोष ओढवून घ्यावा लागला. वस्तुतः ‘इंधन’ ही एक दर्जेदार कादंबरी आहे. वाचक व टीकाकारांनी ती जशी गौरविली, तसाच शासनानेही तिला पुरस्कार दिला. पण काही हितसंबंधी मंडळींनी कोकणातल्या लोकांना भडकावले नि दलवाईंना निदर्शनांना तोंड द्यावे लागले. दलवाई मात्र अशा गोष्टी हसण्यावारी नेत. सत्य तेच बोलणार नि इष्ट तेच करणार हा त्यांचा सुधारकी बाणा होता. समाज सुधारकाला लोखंडाचे चणे पचवावे लागतात, हे त्यांना ठाऊक होते. लेखणीप्रमाणे दलवाईंची वाणीही बहारदार होती. मराठी, हिंदी व उर्दूवर  त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे भारतात कोठेही ते मुल्ला-मौलवींशी यशस्वी रीतीने दोन हात करीत. प्रसंग आला की अनेक माणसे लढतात, झुंज घेतात, पण दलवाईंना लढण्यात आनंद वाटे. लढण्याची त्यांना हौस होती.

दलवाईंचे नाव राहील ते मात्र त्यांनी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थेमुळे. समाजसुधारणा हा विषय भारतातील सर्वच समाजांना अप्रिय, मुस्लिम समाजात तो इतरांपेक्षा कितीतरी नावडता. पण हेच आव्हान मानून दलवाईंनी हा मार्ग पत्करला. पहिली काही वर्षे त्यांना मिळणारा प्रतिसाद इतका क्षीण असे की, कोणीही वैतागून हे कार्य सोडून द्यावे. पण दलवाईंच्या प्रेरणा पोलादी होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे खडतर जीवन त्यांच्यासमोर होते. दलवाई खचले नाहीत. थकले नाहीत. नव्या उत्साहाने ते कामाला लागत. दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली. पण तोपर्यंत त्यांच्या कार्याने चांगलेच बाळसे धरले होते. मुस्लिम महिला परिषदा मोठ्या गर्दीत झाल्या होत्या. अनेक मुस्लिम महिला आम्ही इतःपर अन्याय चालू देणार नाही, असे म्हणू लागल्या होत्या. बहुभार्या पद्धती कायद्याने बंद करता येईल काय, याचीही चर्चा सुरू झाली होती. अनेक मुस्लिम तरुण सत्यशोधक मंडळात आले होते. ही सारी दलवाईंच्याच तपस्येची फळे. 

आणीबाणीच्या काळात मुसलमान समाजातही प्रचंड मानसिक स्थित्यंतर घडले असून, तो राष्ट्रीय जीवनप्रवाहात आल्याचे दृश्य दिसते आहे. पण केवळ जनता पक्षाचे सरकार आल्याने जयप्रकाशांना अभिप्रेत असलेली संपूर्ण क्रांती होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या कालहत रूढी नि समजुतींचा संपूर्ण त्याग केल्याखेरीज मुसलमान समाजालाही विकासाच्या मार्गाने घोडदौड करता येणार नाही. हमीद दलवाईंची धडपड यासाठीच होती. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे ईप्सित तेच आहे. दलवाई गेले तरी त्यांचे कार्य चालू राहिले पाहिजे; किंबहुना त्याला अधिक गती आली पाहिजे. तीच दलवाईंना खरी श्रद्धांजली. आमच्या व्यक्तिगत दृष्टीने बोलायचे तर आमचा भाऊ गेल्याचे आम्हाला दुःख होते. हमीद न चुकता आठ-पंधरा दिवसांनी आमच्याकडे येत व जिवाभावाच्या गोष्टी बोलत. हमीद म्हणजे गोष्टीवेल्हाळ मनुष्य. पण त्यांच्या संभाषणात आकर्षकता असे, तसा जिव्हाळाही असे. यापुढे हमीद केव्हाही आमच्या घरी येणार नाहीत व आपले नवनवे अनुभव नि उत्साही योजना सांगणार नाहीत, हा विचारही आम्हाला बेचैन करतो. त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा या आपल्या पतीच्या कार्यात समरस झाल्या होत्या. त्यांनी दलवाईंची गेल्या दोन वर्षांत जी सेवा केली ती केवळ प्रशंसनीय म्हटली पाहिजे. त्यांचे सांत्वन करणे आमच्या शक्तीबाहेरचे आहे. दलवाई कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

 अग्रलेख : महाराष्ट्र टाइम्स - 4 मे 1977

Tags: गोविंद तळवलकर इंधन लाट सत्यशोधक हमीद दलवाई स्मरण वर्धापनदिन विशेषांक Govind Talwalkar Novels Stories Hamid Dalwai Satyashodhak Hamid Dalwai Smaran Anniversary special issue weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर ( 169 लेख )

1925 - 2017

लेखक, संपादक- लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी