डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा

यादव यांनी माफी मागितली व महाराजांच्या मूर्तीपुढे दंडवत घातले तरीही वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांचे समाधान झाले नाही. यामुळे तुकोबांची शिकवण हे विसरले असे दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणणारे तुकोबा होते, पण या वारकऱ्यांच्या नेत्यांना यादव निंदक वाटतात. ते माफी मागत असले तरी त्यांना  क्षमा करावीशी वाटू नमे, हे तुकोबांच्या शिकवणुकीशी कितपत सुसंगत आहे? ‘अहंकारचा वारा न लागो माझ्या विष्णुदासां’ असेही भागवतधर्मीय म्हणत असतात. वारकऱ्यांच्या नेत्यांच्या वर्तनामुळे त्याग, अध्यात्म साधन, वैराग्य याचाही अहंकार असू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे,  त्याचा प्रत्यय आला.

महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा झाला असून त्याचे कवित्व किती दिवस चालते ते यापुढे कळेल. ते अर्थात संमेलनाच्या प्रारंभापासूनच सुरू झाले. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी एकापेक्षा एक विक्रम करण्याचा पण केला असावा. गेल्यावर्षीच्या संमेलनात त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला नाही तर एक रिकामा तांब्या आणला’ असे विनाकारण वक्तव्य करून वाद निर्माण केला होता.

मंगल कलश आपण आणला असा दावा यशवंतरावांनी केला नव्हता. महाराष्ट्राची संपूर्ण मागणी मान्य  झाली नाही. मुख्यत: सीमाभाग महाराष्ट्रात आला नाही, याची खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती, असे असले तरी ‘तो मंगल कलश नसून रिकामा तांब्या होता’ असे म्हणण्यात काही स्वारस्य नव्हते. आपल्याला मोठे घर बांधण्याची इर्षा असते, पण पैशाची अडचण वा इतर कारणांस्तव ते जमत नाही. मग अपेक्षेपेक्षा थोडे कमी आकाराचे घर बांधले जाते. परंतु म्हणून आपण त्यास गोठा म्हणत नाही, तर घरच मानतो व कधीतरी ते वाढवण्याचे ठरवतो. ठाले-पाटील यांना ही समज नसल्यामुळे त्यांनी वादग्रस्त विधान केले व मग माफी मागितली.

साहित्य संमेलनाच्या स्थळाची चर्चा सुरू झाल्यावर अमेरिकेतून आमंत्रण आले; ते ठाले-पाटील व महामंडळ यांनी स्वीकारले. त्यावर टीकेचे मोहोळ उठले. तेव्हा माघार न घेता ठाले-पाटील यांनी अमेरिकेतलेच संमेलन अधिकृत असेल असे जाहीर केले. म्हणून काही प्रकाशकांनी पुढाकार घेऊन रत्नागिरीत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला व त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. तरीही काही दिवस कोणते संमेलन अधिकृत हा वाद चालू राहिला. महामंडळाचे अध्यक्ष आपला हट्ट सोडत नव्हते. अखेरीस अमेरिकेतील संमेलन अधिकृत नव्हे, असे त्यांना व महामंडळाला मान्य करावे लागले.

राज्य सरकार या असल्या सोहळ्याला अनुदान देऊन श्रेय घेण्यास तयारच असल्यामुळे त्याने अमेरिकेतील मेळाव्यास पंचवीस लाख रुपये दिले. त्या संमेलनात गंगाधर पानतावणे यांचे अध्यक्षीय भाषण झाले तरी त्याची फारशी दखल घेतली गेल्याची दिसले नाही. अध्यक्षीय भाषणाची ही परवड आता नित्याची होऊन  बसली आहे. चित्रपट व नाटकातील कलावंत किंवा कोणी अधिकारपदस्थ यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्याचा प्रघातरूढ झाल्यामुळे अध्यक्ष अधिकच उपेक्षित झाला. संमेलनाचे संयोजक तरी काय करणार? संमेलनाचा खर्च जर कोटीच्या घरात जात असेल तर राजकारणी, साखर कारखानदार इत्यादींची मदत घेणे भागच असते.

साहित्यिकांच्या आकांक्षांपुढे आकाश ठेंगणे असले तरी पैशाचे सोंग करणे शक्य नसते. तेव्हा सरकार, साखर कारखानदार, शिक्षणसम्राट इत्यादींचे साहाय्य घेतल्याशिवाय संमेलन होऊ शकत नाही. या स्थितीत ज्याचा दाम त्याचे काम, हा न्याय लागू होऊन अध्यक्ष वळचणीत पडतो. गेल्या वेळेला राष्ट्रपतींना उद्‌घाटनासाठी बोलावले होते. त्यांच्यासाठीची सुरक्षाव्यवस्था आणि दूरचित्रवाणीने दिलेल्या ठरावीक वेळेत  अध्यक्षीय भाषण पाच मिनिटांत संपवण्याचा बूट निघाला. पण नंतर राष्ट्रपती वगैरे निघून गेल्यावर सबंध अध्यक्षीय भाषण वाचून दाखवण्याची सवलत देण्यात आली. साहित्य महामंडळाच्या नियमाप्रमाणे संमेलनाच्या तीन दिवसांत अध्यक्षाला काही काम असते, नंतर त्याला काही स्थान नाही. पण आजकाल ज्या रीतीने कामकाज होते, त्यामुळे संमेलनाच्या काळातच अध्यक्ष असूननसून सारखाच झाला आहे.

या स्थितीत यंदा महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षाविनाच झाले हे तर तर्कसंगत म्हणावे लागेल. तसे ते झाल्यामुळे ठाले-पाटील व महामंडळ यांनी इतिहास निर्माण केला. ठाले-पाटील यांनी आपल्या भाषणात पुन्हा काही टोलेबाजी केली आणि निषेधाची प्रतिक्रिया उठली. अध्यक्षाविना संमेलन करण्याची वेळ आली ती नियोजित अध्यक्ष आनंद यादव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून. पण कोणत्याही संस्थेत नियोजित अध्यक्षाने माघार घेतली किंवा त्यास ती घ्यावी लागली तर निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते पडलेल्या उमेदवाराची निवड होते. हा न्याय लागू करून शंकर सारडा यांना  अध्यक्षपद देणे क्रमप्राप्त होते. पण महामंडळाने हे न करता, विनाअध्यक्ष संमेलन भरवण्याचे ठरवून औचित्य विचारास रजा दिली.

महाबळेश्वरला जे झाले, तसेच त्यापूर्वी जे घडले त्यासाठी एकट्या ठाले-पाटील यांना जबाबदार धरून चालणार नाही. महामंडळही तितकेच दोषी आहे. यामुळे प्रा. हातकणंगलेकर यांचा अवमान झाला, त्यांची  उपेक्षा झाली यात महामंडळही दोषी होते. संमेलनाच्या स्मरणपत्रिकेत मावळत्या व नियोजित अध्यक्षांचे छायाचित्र नाही; अध्यक्षांच्या छापील भाषणाच्याप्रती वाटल्या नाहीत, हेही एका व्यक्तीमुळे होऊ शकले नाही. महामंडळाची ती सामुदायिक जबाबदारी आहे. ती अमान्य करून ठाले-पाटीलयांच्या पुढे आपले काही चालले नाही असे सांगण्यात आले तर ही सबब होईल, खरा खुलासा नव्हे! थोडक्यात, म्हणजे ठाले-पाटील यांना  जसे मिरवायचे होते आणि अधिकाराचे प्रदर्शन करायचे होते तसेच ते महामंडळासही करायचे होते. खरे म्हणजे महामंडळ ते काय आणि त्याचे अधिकार म्हणजे तरी काय; पण जे काही असतील ते गाजवण्याचा सोस यांना सोडवत नाही; हे खरे.

हा सारा प्रकार झाला तो आनंद यादव यांच्या कादंबरीमुळे निर्माण केल्या गेलेल्या वादळाने. ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकाराम महाराजांची बदनामी करण्यात आल्याची टीका वारकरी मंडळींनी केली. आपण ही कादंबरी भरपूर ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करुन लिहिल्याचा दावा यादव यांनी केला आहे. ‘साधना’ साप्ताहिकाने यासंबंधात लिहिलेल्या संपादकीयामुळे हे समजले. मी ही कादंबरी वाचलेली नाही, पण एका मित्राने ती वाचून कळवले की, वारकरी मंडळींनी जितका गदरोळ उठवला तसा तो उठवण्याजोगे कादंबरीत काही नाही. आनंद यादव यांनी ‘कादंबरी न वाचता तिच्यावर टीका होते’ अशी तक्रार केली होती. ती खरीही असेल, कारण दंगल करण्याइतके एखादे पुस्तक वादग्रस्त ठरवणाऱ्यांपैकी अनेकांनी ते वाचलेले नसल्याचे अनेकदा आढळले आहे.

आपले संशोधन पक्के असल्याची यादव यांची खात्री होती, तर त्यांनी वारकऱ्यांच्या दडपणाला दाद द्यायची नव्हती. यामुळे महाबळेश्वरच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे राहिले नसते. किंवा वारकऱ्यांच्या  म्होरक्यांनी धमकावल्याप्रमाणे संमेलनात अभंगाचे पारायण करून ते होऊ दिले नसते. तसे झाले असते तर हे म्होरके कोणच्या थरापर्यंत जाऊ शकतात हे जगाला दिसले असते. इथे हे स्पष्ट केले पाहिजे की, वारकऱ्यांच्या पिढ्यान्‌पिढ्या आहेत व सामान्य वारकरी हे भाविक आहेत. यादव-प्रकरणाशी सामान्य  वारकऱ्यांचा काही संबंध नाही. तथापि आता त्यांच्या पुढाऱ्यांना नेतेबाजी करण्याची हौस आली असल्यामुळे हा गोंधळ झाला.

यादव यांनी प्रथम आपली कादंबरी रद्द केली आणि माफी मागितली. इतकेच नव्हे तर देहूला जाऊन त्यांनी  तुकाराम महाराजांची वारकऱ्यांचीही क्षमा याचना केली. तरी वारकऱ्यांच्या म्होरक्यांनी आपला हट्ट सोडला नाही आणि यादव अध्यक्ष असतील तर संमेलन होऊ न देण्याचा निर्धार जाहीर केला. मग यादव यांनी  अध्यक्ष पद न स्वीकारण्याचे ठरवून महामंडळास तसे लेखी कळवले.

या रीतीने यादव यांना कादंबरी रद्द करावी लागली आणि अध्यक्षपदही गेले. असे असता त्यांनी अध्यक्षपदाचे आकर्षण सोडून देऊन माघार घेतली नसती, तर काय बिघडणार होते? साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व आनंद यादव यांचे गणित जमू नये, असा योग दिसतो. गेल्याखेपेस त्यांच्या बाबतीत असाच गोंधळ उडवण्यात आला आणि त्यांची बाजू बरोबर असूनही अध्यक्षपद गेले. आता वारकरी आडवे आले. हा खेळखंडोबाकरून वर महामंडळाने लेखक व प्रकाशक यांना विवेकपूर्ण वर्तन करण्याबद्दल प्रवचन द्यावे हा तर निलाजरेपणा झाला.

यादव यांनी माफी मागितली व महाराजांच्या मूर्तीपुढे दंडवत घातले तरीही वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांचे  समाधान झाले नाही. यामुळे तुकोबांची शिकवण हे विसरले असे दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणणारे तुकोबा होते, पण या वारकऱ्यांच्या नेत्यांना यादव निंदक वाटतात. ते माफी मागत असले तरी त्यांना क्षमा करावीशी वाटू नये, हे तुकोबांच्या शिकवणुकीशी कितपत सुसंगत आहे? ‘अहंकारचा वारा न लागो माझ्या विष्णुदासां’ असेही भागवतधर्मीय म्हणत असतात. वारकऱ्यांच्या नेत्यांच्या वर्तनामुळे त्याग, अध्यात्म साधन, वैराग्य याचाही अहंकार असू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे, त्याचा प्रत्यय आला. ‘मार्तंड जे तापहीन’ असा काही यांचा अनुभव यादव यांना आला नाही, तर हे‘तापहीन मार्तंड’ नसून ‘दुर्वासाचे अवतार’ आहेत हे उघड झाले.

या वारकऱ्यांच्या नेत्यांना काही ठरावीक बाबतीतच अन्यायाबद्दल चीड येते की काय, असा प्रश्न पडतो. कारण तुकोबांच्या गाथेत त्यांच्या काही नातेवाईकांनी कशी घुसखोरी केली याची उदाहरणे चिकित्सक अभ्यासक कै.प्रा.म.वा.धोंड यांनी दिली होती. तुकोबांच्या भावाने स्वत:चे अभंगही घुसवले. तसेच ज्ञानेश्वरांनी तुकोबांच्या पत्नीच्या पोटीजन्म घेतला आणि याची जाणीव झाल्यावर तुकोबांनी अज्ञातवास स्वीकारला, असल्या भाकडकथाही प्रसारीत झाल्या. धोंड यांनी दोनवर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातील लेखातच हे दाखवून दिले होते. वास्तविक हाही तुकाराम महाराजांचा अवमानच होता. पण वारकरी नेत्यांना या थोतांडाचे काही वाटले नाही.

तुकोबांची निंदा यादव यांनी केली व अन्याय केला असे यांना वाटते. त्यांचा हा समज प्रामाणिक असू शकतो, पण शेकडो, हजारो वर्षे अनन्वित अन्याय सहन करणाऱ्या दलितांना मंदिर प्रवेशही नाकारला जात होता, तेव्हा यांच्यापैकी कोण पुढे सरसावले? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सानेगुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्यामुळे खुले झाले. तेव्हा कोणी वारकरी अग्रभागी नव्हते.

पुण्यातील पर्वती मंदिर असेच खुले व्हावे म्हणून सत्याग्रह झाला. त्यात काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, एस.एम.जोशी इत्यादींनी भाग घेतला होता, कोणा वारकऱ्यांनी नव्हे. नाशिकच्या काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह झाला, कारण त्याआधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी झालेली तडजोड सनातन्यांनी धुडकावली आणि म्हणून सत्याग्रह झाला. तेव्हा नाशिक भागातले जे कोणी वारकरी होते त्यांनी झालेली तडजोड अंमलात आणण्याचा आग्रह धरल्याचे नमूद नाही.

दुसरे असे की, आजकाल कोणाच्या भावना कशामुळे दुखावतील याचा नेम राहिलेला नाही. एकेक गट कोणते ना कोणते कारण सांगून भावना दुखावल्याची ओरड करतो आणि शांततेला धोका निर्माण करतो. त्या मानाने पूर्वीचे लोक बरेच उदार म्हटले पाहिजेत. इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठी भाषा मुमुर्षू झाल्याचा व तिला भवितव्य नसल्याचा अभिप्राय दिला होता. तेव्हा मराठीचा अपमान केला म्हणून राजवाडे यांचे डोके ठेचायची भाषा कोणी केली नाही. पण मराठीच्या अभिमानाचे आजकाल सार्वजनिक प्रदर्शन करणारां प्रमाणे ते मराठी-इंग्रजी धेडगुजरी स्वरूपात वापरत नव्हते. शिवाय त्यांनी कटाक्षाने सर्व लिखाण मराठीत केले.

राजवाड्यांना भागवत धर्माचा तिटकारा होता. त्यांनी संताळे, टाळकुटे अशा शब्दांत त्यांची संभावना केली होती. तेव्हा कोणी वारकरी त्यांच्या मार्गात धरणे धरून बसले नव्हते. राजवाडे तसेच वासुदेवशास्त्री खरे यांनी 1857चा उठाव का फसला याची मीमांसा करताना उठावाच्या नेत्यांवर टीका केली होती. तेव्हाही या दोघांच्या मागे कोणाचा ससेमिरा लागला नाही.

युक्तिवादपूर्वक खंडन करण्याची प्रथा अनेकजण पाळत होते. यामुळे भालाकार भोपटकर यांच्या अर्वाच्य लिखाणाचा व भाषणांचा परामर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोखठोक शब्दांत, पण पुराव्यासहित युक्तिवाद करून घेताना दिसत होते. लोकमान्य टिळकांनी गीतेचा लावलेला अर्थ आद्य शंकराचार्यांच्या मताशी जुळणारा नव्हता, म्हणून सनतानी विचारांच्या लोकांचा व त्यांचा मतभेद झाला, पण म्हणून लोकमान्यांना वाळीत टाकले गेले नाही. तसेच वेद अपौरुषेय नाहीत, असे लोकमान्यांनी स्पष्ट म्हटले तेव्हा कोणी वेदोनारायण चवताळले नाहीत आणि ‘केसरी’ छापू देणार नाही अशा धमक्याही दिल्या नाहीत.

आता आनंद यादव यांच्या कादंबरीवरून वादळ उठले आणि त्यातच त्यांच्याच ज्ञानेश्वरासंबंधीच्या कादंबरीवरून नवा वाद होऊ घातला आहे. यादव यांना साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणे अशक्य झाल्यामुळे काहींनी टीका करावी हे साहजिक होते, हे करताना त्यांनी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आग्रही भाषा करणारे या वेळी गप्प का बसले’, असा प्रश्न विचारला आहे. या स्वातंत्र्याची गळचेपी झाल्यास यापुढे या आग्रही लेखकांचा कोणी भरवसा धरू नये असाही इशारा काहींनी दिला आहे.

या संबंधात स्वत: यादव यांनी किती वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला असा प्रश्न विचारला जाईल. अनेक वेळा असे झालेले दिसेल की, ज्यांनी या प्रकारे पूर्वी निषेध केला त्यांनी ही निवडक वेळीच तो केला. पण हा भाग सोडला तरी यादव यांना वारकऱ्यांनी जी वागणूक दिली ती निषेधार्हच होती. पण असहिष्णुता वाढल्याबद्दल हळहळ व उद्वेग व्यक्त करणारांनी आत्मपरीक्षण केले तर बरे होईल.

सध्या मराठी वृत्तपत्र इंटरनेटवर पाहावे तर उद्धव व राज ठाकरे यांच्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे आल्याशिवाय दिवस जात नाही. त्यांची सभा असेल तर तिची आगाऊ प्रसिद्धी होते, सभेला किती गर्दी होणार हेही सांगितले जाते. सभा झाली की तिचा रसभरीत वृत्तान्त येतो आणि मग प्रतिक्रिया. तोपर्यंत दुसऱ्या सभेची वेळ येते. मध्यंतरीच्या काळात यांची वक्तव्ये व पत्रके आहेतच. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू वा सुभाषबाबू यांना ही अशी प्रसिद्धी मिळत नव्हती. बरे, सर्व भाषणांचा व वक्तव्यांचा  सूर एकच, उसाचे भाव का वाढवले पाहिजेत हे न सांगता ते वाढवा नाहीतर मंत्र्यांच्यापाठी सडकून काढल्या जातील, असा इशारा दिला की उसाच्या भावाचा प्रश्न हातावेगळा झाला. यांना बदडा, त्यांना आडवे करा, असे आदेश सोडले जातात. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झोपडपण्याची भाषा केली तर कौतुकमिश्रित भाषेत बातम्या दिल्या जातात. यापूर्वी सेनेने अनेक नाटके, चित्रपट यांच्यावर बंदी घातली होती. ते सहिष्णुता वाढवणारे होते व आहे काय ?

या प्रकारचे वातावरण तयार झाले असता, वारकरी नेत्यांनी त्याच मार्गाचा अवलंब केला तर नवल नाही. नाहीतरी ते असे काय स्वर्गातून पडले आहेत? या वातावरणास सरकार आळा घालण्याची सुतराम शक्यता नाही. मराठी लोकांची मते गमावण्याची वेळ येईल ही त्यांना धास्ती. हे अगदी थेट वसंतराव नाईकांच्या काळापासून चालू असून आजकाल ते उघडपणे चालू दिले जाते. यामुळे राज ठाकरे एकाएकी उत्तर भारतीयां विरुद्ध उठल्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे दुजोरा देत होते. असे असताना महाबळेश्वरला असहिष्णुतेच्या वातावरणास पायबंद घालण्यासाठी साहित्यिकांनी पुढे यावे असे आवाहन एका मंत्र्याने करावे हा शहाजोगपणा झाला. यांच्या सरकारने काही करू नये आणि साहित्यिकांनी मात्र ओरड करीत राहावे, ही श्रमविभागणी गैर आहे.

आता वारकरी नेते हे धारकरी होऊ पाहात आहेत. कारण त्यांना ही गेल्या दोन-चार वर्षांत अवाजवी प्रसिद्धी मिळू लागली. आषाढी एकादशीची यात्रा किती काळ भरत आली याची गणना करणे कठीण. पण गेल्या दोन-तीन वर्षांतच दिंड्या निघाल्यापासून प्रत्येक मुक्कामाच्या वेळच्या छायाचित्रांसह बातम्या दिल्या जातात. सध्या याबाबत स्पर्धाच लागलेली आहे. यात धार्मिकता किती आणि धंदेवाईक दृष्टी किती? शिवाय बुवा, महाराज यांचे प्रस्थही वाढले आहे. यामुळे या सर्वांना बळप्राप्त होऊन त्यांचे बाहू स्फुरू लागले तर आश्चर्य नाही. याचा दणका यादव यांना मिळाला.

याचे पर्यवसान कशात होणार हे सांगता येत नाही. धर्मप्रेमाचे रूपांतर धर्मपिसाटपणात केव्हाही होऊ शकते. कर्नाटकात याचे प्रत्यंतर दिसले. मध्यंतरी ‘रामसेना’ या संघटनेने सार्वजनिक मद्यालयात जाऊन महिला मद्यप्राशन करतात म्हणून मारझोड केली व ते मद्यालय बंद केले. कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. त्याने सारवासारव करण्यापलीकडे काही केले नाही. आता ताजी बातमी अशी की, दक्षिण कर्नाटकात हेमंत हेगडे या चित्रपट-निर्मात्याने चार्ली चॅप्लीनचा साठएक फुटाचा पुतळा करण्याचा बेत केला होता, पण हिंदू जागरण वैदिक या संघटनेच्या पन्नास एक कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या देऊन चॅप्लीनचा पुतळा न उभारण्यास बजावले. या पुतळ्यास विरोध का? तर चॅप्लीन ख्रिश्चन होता म्हणून.

चॅप्लीन हा एक अलौकिक प्रतिभावंत कलावंत म्हणून जगभर मान्यता पावला. लंडनला जाणाऱ्यांपैकी कोणी जर मला काय पाहावे म्हणून विचारले तर जी काही ठिकाणे मी सांगतो, त्यांत लेस्टर स्क्वेअर या ज्या भागात चित्रपट व नाट्यगृहे आहेत तिथेच स्वीस सेंटर या नावाचे कॉफीपानगृह होते. आता नाही. पण त्याच्या समोरच चॅप्लीनचा छान पुतळा आहे, तो पाहण्यास विसरू नका म्हणून मी सांगतो. महात्मा गांधी लंडनला गोलमेज परिषदेसाठी गेले होते, तेव्हा त्यांची व चॅप्लीनची भेट झाली. गांधींनी त्याचा एकही चित्रपट पाहिला नव्हता, पण त्याचे नाव ते ऐकून होते. दोघांची मोकळेपणाने चर्चा झाली.

चॅप्लीनच्या कलेची मोहिनी वेगळीच आहे. असे अलौकिक प्रतिभावंत देश, धर्म, जात, भाषा यांच्या  पलीकडचे असतात. ते साऱ्या जगाचे असतात व सारे जग त्यांचे असते. याचे भान नसल्यामुळे अमेरिकेत मॅकार्थीने चॅप्लीनला कम्युनिस्ट असा शिक्का मारून हद्दपार केले. हे हिंदूजागरण वैदिकवाले त्याचे भाऊ दिसतात. मग अफगाणिस्तानातल्या बामियन बुद्धमूर्ती नष्ट करणाऱ्या तालिबानींना बोलण्याचा काय अधिकार? या हिंदू जागरण वैदिकवाल्यांची व बुद्धमूर्ती नष्ट करणाऱ्या तालिबान्यांची वृत्ती सारखीच आहे. हे सर्व मन:स्वास्थ्य बिघडवणारे असून हे कोठवर जाणार असा प्रश्न पडतो.

Tags: Bhalakar Bhopatkar Aanand Yadav’s apologize Warkari Sampraday Novel Sant Sury Tukaram Aanand Yadav Sahitya Mahamandal Govind Talwalkar Mahabaleshwar Sahity Sanmelan Gangadhar pantanavane Vasudev shastri khare Online Marathi news paper Film maker Hemant Hegade statue of Charli Hindu Jagaran Vaidik London Mahatma Gandhi meeting with Charlin Sane Guruji Deportation Express Freedom Moribund Ratnagiri Sanmelan Slander Dehu Rebellion in 1857 Krantak Drink Ramsena Community Koutikrao Thalepatil On the point of death fast unto death gossip idle talk living incognito historical evidence Pilgrim Resignation of the President Bhagwat Dharm Keshavarav Jedhe Itihasachary Rajwade S.M. Joshi kakasaheb Gadgil Parvati Mandir Dnyaneshwar Novel Durvasache Avatar Martand je Taphin Vitthal Mandir M.V. Dhond Pandharpur Kalaram Mnadir Nashik Without president Sahitya sanmelan Shankar Sarada Telivision Sugar manufacturer Presidential address United Maharashtra mangal kalash a fiasco of Sahitya sanmmelan Emloyed Chairman a bungle a muddle a mess gracious inquiry Careful consideration Sadhana Magzine Sadhana Sadhana Saptahik शिक्षण सम्राट साखर कारखानदार मंगलकलश तालिबानी बामियन बुद्धमूर्ती मॅकार्थी लंडन महात्मा गांधी चार्ली चॅप्लीन भेट हिंदू जागरण वैदिक चार्ली चॅप्लीन पुतळा चित्रपट-निर्माता हेमंत हेगडे कर्नाटक मद्यप्राशन रामसेना संघटना इंटरनेट मराठी वृत्तपत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्ञानेश्वर भालाकार भोपटकर 1857चा उठाव वासुदेवशास्त्री खरे भागवत धर्म इतिहासाचार्य राजवाडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाशिक काळाराम मंदिर एस.एम.जोशी केशवराव जेधे काकासाहेब गाडगीळ पुण्यातील पर्वती मंदिर सानेगुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर कै.प्रा.म.वा.धोंड दुर्वासाचे अवतार मार्तंड जे तापहीन साहित्य महामंडळ तुकाराम महाराज देहू वारकऱ्यांचीही क्षमा याचना ऐतिहासिक पुरावे वारकरी तुकाराम महाराजांची बदनामी संतसूर्य तुकाराम कादंबरी आनंद यादव संमेलन स्मरणपत्रिका औचित्य विचार शंकर सारडा अध्यक्षपदाचा राजीनामा नियोजित अध्यक्ष आनंद यादव अध्यक्षाविना साहित्य संमेलन दूरचित्रवाणी गंगाधर पानतावणे अध्यक्षीय भाषण गंगाधर पानतावणे अमेरिकेतील मेळावा रत्नागिरीत संमेलन अमेरिकेतले संमेलन कौतिकराव ठाले-पाटील महाबळेश्वर साहित्य संमेलन गोविंद तळवलकर साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा परामर्ष साधना मासिक साधना साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके