डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रूसोला फ्रेंच क्रांतीचा एक प्रवर्तक मानतात. पण या क्रांतीचे जे नेते होते त्यांचा असा सद्‌भाव नव्हता आणि सहकारी पुढाऱ्यांचाही गळा घोटण्याची शर्यत लागली होती, रूसोला हे मान्य नव्हते.

रूसोने 1762 मध्ये ‘दि सोशल कॉन्ट्रॅक्ट’ या नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो सर्वत्र गाजला. ब्रिटिश विचारवंत जी.डी.एच. कोल यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर 1782 मध्ये प्रसिद्ध केले. नंतरच्या काळात त्याचे अनेकांनी नव्याने भाषांतर केले. त्या पुस्तकावर असंख्य भाष्ये ग्रंथ व निबंधरूपाने प्रसिद्ध झाली व अद्यापही होत आहेत.

कोल यांच्या भाषांतरित पुस्तकांची आवृत्ती अमेरिकेतील कनॉफ या प्रकाशनसंस्थेने 1973 मध्ये पुन्हा प्रसिध्द केली. तिच्या प्रस्तावनेत ॲलन रायन यांनी म्हटले आहे की, ‘प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथासारखी लोकप्रियता रूसोच्या या ग्रंथास मिळाली.’

रायन यांनी अशीही पुस्ती जोडली की, प्लेटोच्या पुस्तकाप्रमाणेच यांतही अनेक परस्परविसंगत विधाने आहेत.

या वर्षाच्या आरंभीच्या महिन्यात चार्ल्स डिकन्सची द्विजन्मशताब्दी होती तर 28 जूनपासून फ्रेंच विचारवंत झान झाक रूसो याच्या जन्मास तीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जगातल्या अनेक देशांत अनेक कार्यक्रम पार पडले आणि वर्षभर त्यांची रेलचेल आहे. मी अमेरिकेत क्लीव्हलॅन्ड शहरात राहतो. तिथे रॉकफेलर पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात एका नुकतेच डान्टे या इटालियन महाzzकवीच्या पुतळ्याचे उद्‌घाटन झाले. त्याचा जन्म 13 व्या शतकातला व निधन 14 व्या शतकातले. या रीतीने हे अर्धे वर्ष जुन्या काळातील अभिजात वाङ्‌मय निर्माण करणाऱ्यांची स्मृती जागृत करण्यात गेले.

रूसो हा फ्रेंच खरा पण त्याचा जन्म जिनिव्हाचा. नंतरही त्याचा बराच काळ स्वित्झर्लंडमध्ये व त्यातही जिनिव्हात गेला, यामुळे जिनिव्हाचा नागरिक अशी त्याची ओळख (सिटिझन ऑफ जिनिव्हा) केली जात असे. या नावाने त्याने पुस्तकही लिहिले होते. आता वर्षभर अनेक देश विविध कार्यक्रम करणार आहेत, त्यांतल्या काहींनी जानेवारीपासूनच प्रारंभ केला तर जून 28 पासून दुसऱ्या काहींनी. यात अमेरिकेपासून जपान व रशियापर्यंतच्या देशांचा समावेश होतो. यांतल्या अनेकांनी विद्यापीठे व तत्सम संस्था यांच्यातर्फे राष्ट्रीय व आंतरराट्रीय पातळीवरचे परिसंवाद आखले आहेत.

जपानच्या कार्यक्रमाच्या संचालकांना रूसोचे विचार व बौध्द विचार यांत साम्य आढळते आणि त्या दृष्टीने चर्चा इत्यादी होणार आहेत. रूसोची सर्व पुस्तके जपानी भाषेत भाषांतरित झाली असून त्यांचा अभ्यास करून काहींनी प्रबंध लिहिले व पीएच.डी. मिळवली. अनेक वृत्तपत्रांनी खास पुरवण्या काढल्या. काही पुस्तके निघाली असून आणखी काही निघायची आहेत.

समग्र रूसो वाङ्‌मय 15 हजार पृष्ठांचे असून ही आवृत्तीही निघाली आहे. रूसोच्या कादंबऱ्यांवर आधारित कार्यक्रम झाले व होतील. अनेक ठिकाणी त्याच्या संगीतिकांचे प्रयोग झाले आहेत. चित्रपट दाखवले गेले व यापुढेही दाखवले जातील. स्विस सरकारने बरेच कार्यक्रम आखले आहेत. शिवाय त्याने एक 48 पानांचे सचित्र पुस्तक प्रसिध्द केले आहे. रूसोच्या प्रत्यक्ष जीवनात काही काळ स्विस सरकार व धर्मगुरू यांचा जाच झाला, त्याची भरपाई आता होत आहे.

फ्रेंच क्रांतीला प्रेरक होईल असे विचार प्रगट करणारांत तिघांना अग्रस्थान दिले जाते. त्यात व्हॉल्टेअर, रूसो व दिदरो यांचा समावेश होतो. ही त्रिमूर्ती असल्याचे सांगितले जाते. तिघांचे आयुष्य सारखेच गेले नाही. फ्रान्समध्ये वैचारिक क्रांतीला प्रेरणा देण्यास फ्रेंच ज्ञानकोष कारणीभूत ठरला. त्याचा संपादक होता दिदरो. तो व व्हॉल्टेअर आणि रूसो या तिघांनाही तुरुंगवास घडत होता.

त्यात व्हॉल्टेअर व रूसो हे कारावास टाळण्यासाठी काही काळ इंग्लंडमध्ये राहिले. पुढे व्हॉल्टेअरला फ्रान्समधील कारावास नको होता म्हणून तो स्वित्झर्लंडमध्ये काही काळ राहत होता, तर रूसो जिनिव्हात जन्मला तरी त्याला हद्दपारी भोगावी लागून फ्रान्सचा आश्रय घ्यावा लागला. रशियाची राणी कॅथरिन दिदरोच्या लिखाणावर खूष होती, तिने त्याला सेंट पीटर्सबर्गमध्ये काही महिने ठेवून घेतले होते. त्याच्या निधनानंतर त्याचा ग्रंथसंग्रह तिने खरेदी केला. अशा या तिघांतला कोण अधिक विक्षिप्त हे ठरवणे कठीण आहे.

रूसोचा बाप उत्तम घड्याळजी होता, त्यात त्याला चांगली कमाई होत असे. रूसोचा बाप व आई हे दोघे एकाच शाळेत शिकत होते, त्यांचे प्रेम लहान वयात जमले व नंतर विवाह झाला. त्यांना दोन मुलगे झाले. रूसो दुसऱ्या नंबरचा. त्याच्या जन्मानंतर आठ-दहा दिवसांतच त्याची आई वारली आणि आपण यास कारणीभूत झालो याची खंत तो जन्मभर करत असे. रूसोच्या बापाचे पहिल्या मुलापेक्षा या दुसऱ्यावर अधिक प्रेम होते. यामुळे तरुणपणी पहिला घरातून निघून गेला तो कायमचा.

रूसोने आत्मचरित्रात (‘दि कन्फेशन’) लहानपणच्या अनेक आठवणी दिल्या आहेत. आत्मचरित्र वाङ्‌मयात त्याचे खास स्थान आहे, कारण आपले जीवन व मानसिक स्थिती यांची कहाणी इतक्या स्पष्टपणे क्वचितच लिहिली गेली. महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात सर्व जीवनपट मांडला व ‘सत्याचे प्रयोग’ हे नाव सार्थ केले. पण त्यापेक्षा अधिक स्पष्ट आत्मचरित्र रूसोचे आहे. त्यात रूसोने भ्रंमतीत व्यतीत केलेल्या जीवनाची कहाणी आहे. त्या निमित्ताने फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली इत्यादींच्या सृष्टिसौंदर्याचे सुरेख रेखाटन चित्तवेधक भाषेत व शैलीत आहे.

रूसोचा बराच काळ धकाधकीत गेला. त्याच्या आईच्या निधनानंतर मावशा इत्यादींनी त्यांचा सांभाळ केला, पण मग बापाने त्याला स्वत:बरोबर ठेवले. चार-सहा इयत्ता शिक्षण झाले असेल, पण बापानेच त्याला लहानपणापासून अनेक विषयांवरची पुस्तके वाचायला दिली आणि त्यावर दोघे मनातले विचार बोलून दाखवत. रूसोला घड्याळे तयार करण्याबरोबर इतरही कामे जमू लागली. तो पितळ्याच्या व इतर पत्र्यांवर उत्तम नक्षीकाम करत असे आणि पैसे मिळवत असे.

त्याच्या पित्यास जिनिव्हाचे आपण खरे नागरिक आहोत असे वाटत असे. स्वित्झर्लंडमध्ये नागरिकास मान दिला जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ते खरे नव्हते. अधिकार, पैसा व मान मिळत असे तो सर्व दोन-अडीचशे धनिक कुटुंबांना. ज्येष्ठ रूसो विधिमंडळात आपल्याला प्रवेश मिळेल म्हणून वाट पाहत होता, पण तसे झाले नाही, ते या काही कुटुंबांच्या प्रभुत्वामुळे. तेव्हा तो जिनेव्हा सोडून फ्रान्सला गेला. पण रूसोला काम असल्यामुळे तो जिनेव्हातच राहिला.

रूसोने त्याच्या एकाकी जीवनातील अनेक अनुभव वर्णन केले आहेत. त्याला कायम एकाकीपणाची बोचक जाणीव संत्रस्त करत असे. शेवटच्या काही काळात त्याने आपल्या मनातले अनेक विचार नोंदण्यास आरंभ केला होता. या आत्मकथनाच्या प्रारंभीच तो म्हणतो की, ‘आपण जे लिहीत आहोत ते केवळ आपल्यासाठी. जे ज्ञान मिळवले असेल ते स्वत:च्या प्रयत्नांनी.’ मग तो लिहितो, ‘या पुढचे माझे जीवन हे एकाकीच असेल. पण मला माझ्यातच खरा दिलासा, विसावा मिळतो. तेव्हा माझाच विचार करणे आवश्यक आहे. या मन:स्थितीत मी आता आत्मपरीक्षण करण्यास निघालो आहे. तेव्हा माझ्याच जीवनाचा आढावा घेऊन झाल्यावर मी तो वाचकांच्या पुढे ठेवीन’.

तो आढावा पुरा होण्यापूर्वी 2 जुलै 1778 रोजी त्याचे निधन झाले. तथापि त्याने आपल्या आत्मचरित्रात लहानपणीचे सोबती, त्यांचे कुटुंबीय आणि एकंदर समाजाचे अनुभव नमूद केले. त्यावरून तेव्हाच्या समाजजीवनाची ओळख होते. पुढच्या काळात त्याचा आवडता सिद्धान्त होता की, लहानपणापासूनच मुलांत जे गुण असतात त्यांवर बंधने घालू नयेत. यामुळे मुलांचे गुण वाढतात आणि मुख्य म्हणजे ती त्यांच्या पायावर उभी राहतात. ती हरहुन्नरी झाली पाहिजेत.

रूसोला मिळणारे काम नियमित नव्हते. त्यामुळे उपासमारही होत असे. त्याला उपजत संगीताची आवड होती. ती वाढवावी, संगीतविषयक लिखाण करावे असे त्याला वाटत होते. त्याने त्या क्षेत्रात प्रवेशही केला. पण ग्रंथलेखन केले ते त्याचा पहिला निबंध गाजल्यावर. काम मिळवून उपजीविकेचा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात असताना त्याची भ्रंमती होत होती.

त्या काळातच कोणा एका स्त्रीला चर्चकडून चांगला आश्रय मिळाला असून तिच्या शिफारसीमुळे आपल्यालाही काही बरे दिवस येतील असा विचार करून रूसोने तिचा पत्ता काढला. तिनेही शिफारस केली. मग निदान तीन-चार वर्षे चर्चच्या आश्रयाने राहता येऊ लागले. त्यासाठी रूसोने कॅथलिक पंथाची दीक्षाही घेतली व धर्मतत्त्वांचा अभ्यास केला.

रूसोच्या जीवनास खरी सुरुवात झाली ती 1740 च्या दशकात. त्याने याच काळात अनेक संगीतिका लिहिल्या. यातच त्याचे जीवन व्यतीत होणार असे दिसत होते. पण 1749 मध्ये तो त्याचा तेव्हा कारावासात असलेला मित्र दिदरो यास भेटायला जात असताना त्याला एका वृत्तपत्रात जाहिरात दिसली. ‘विज्ञान व कला या क्षेत्रांतल्या प्रगतीमुळे आपले नैतिक बळ वाढले काय?’ या विषयावर निबंध मागवण्यात आल्याचे जाहिरातीत म्हटले होते व निबंधासाठी पारितोषिकही होते. मग रूसोचे विचारचक्र सुरू झाले. त्याने आपली मानसिक अवस्था कशी होती याचे वर्णन, काही वर्षांनंतर सरकारी नियंत्रक अधिकाऱ्यास धाडलेल्या पत्रात नमूद केली.

तो लिहितो, ‘आपण संस्कृती म्हणून जी समजतो तिने आपल्याला कसे भ्रष्ट केले हे माझ्या डोळ्यापुढे आले. तो अनुभव वर्णन करता येणार नाही असा आहे. लिहिणार काय, संभ्रमात सापडलो. मी कमालीचा धुंद झालो. मला धाप लागली आणि माझी छाती भरून आली. मला चालता व श्वास घेता येत नव्हते. मग एका झाडाखालीच अर्धा तास मी बसून राहिलो. उठलो तेव्हा लक्षात आले की, माझ्या कोटाची पुढील बाजू अश्रूंनी ओलीचिंब झाली होती, पण मी अश्रू केव्हा ढाळले हे माझे मलाच माहीत नव्हते’. रूसोच्या भावनाप्रधानतेचे हे उदाहरण होते. त्याने निबंधात लिहिले की, माणूस हा जन्मत: निर्व्याज असतो. पण नंतर समाजात निर्माण झालेल्या संस्था, चालीरीती, आणि ज्ञानसंपादनासाठी आलेली साधने इत्यादींमुळे तो नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होतो. तो जे ज्ञानविज्ञान मिळवतो त्यामुळे लोकांच्या सुखासाठी प्रयत्न करण्याची आस शिल्लक न राहता तो स्पर्धा करण्याच्या मागे लागतो. आपण वर चढून दुसऱ्यांना खाली दडपण्याचा हव्यास सुटतो. या निबंधास बक्षीस मिळाले.

तेव्हापासून रूसो विचारांना चालना देणारे लिखाण करू लागला आणि संगीतशास्त्रज्ञाऐवजी विचारवंत म्हणून त्याची ख्याती होऊ लागली. या निबंधामुळे रूसो प्रसिध्दी व मान्यता मिळवू शकला, पण तो टीकेचाही धनी झाला. त्याने घेतलेली भूमिका तेव्हाच्या प्रबोधनाच्या परंपरेविरुद्ध होती. तेव्हापर्यंतचे ज्ञानविज्ञानच याला नको काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्याचबरोबर असाही प्रश्न विचारला गेला की, तेव्हाचे ज्ञान व विज्ञान नको असेल तर फ्रान्समध्ये ज्या सोयी व सुविधा निर्माण झाल्या होत्या त्यांच्यावर निर्बंध आणायचे काय? आणि कसे?

रूसोचे उत्तर होते की, तसे निर्बंध घालता येणार नाहीत हे आपल्याला मान्य आहे. रोगी मरण पावल्यावर डॉक्टरला बोलावण्यात अर्थ नसतो, असे त्याने उत्तर दिले. पण या अशा सुविधांपेक्षा लोकांचे नैतिक सामर्थ्य वाढवण्यावर आपला कटाक्ष असून लोकांचे जीवन साधे असावे यासाठी आपण आग्रही आहोत असा खुलासा त्याने केला. तेव्हा विज्ञान व ज्ञान यांवर हल्ला नसून माणूस चांगला, गुणी व्हावा यावर आपला कटाक्ष असल्याचे त्याने म्हटले.

तो म्हणतो की, ‘ज्ञानाचा उपयोग चांगुलपणा येण्यासाठी करायचा की, ज्ञानी म्हणून ओळखले जाण्यासाठी, याचा विचार करायला पाहिजे.’ पण रूसो सद्‌गुणी होण्यासंबंधी चर्चा करत होता, त्याला काही धार्मिक आचार-विचार, धार्मिक पंथ यांचा प्रसार करायचा नव्हता.

ब्रोनोवस्की व मईलिश या दोन विचावंतांनी मिळून ‘दि वेस्टर्न इंटलेक्चुअल ट्रॅडिशन’ या नावाचे पुस्तक लिहिले असून रूसोसंबंधी एक प्रकरणच दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सत्य, असत्य, सद्‌गुण इत्यादींची चर्चा रूसो धर्मातीत वृत्तीने करतो, हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्याने हा विषय धार्मिकतेच्या चौकटीच्या बाहेर नेला.

या दोघांच्या या म्हणण्यास दुजोरा द्यायचा तर रूसोच्याच जीवनातील एका घटनेचा उल्लेख केला पाहिजे. तो अगदी तरुण असताना त्याने चर्चचा आश्रय घेतला होता, तेव्हा त्याने कॅथलिक पंथाची दीक्षा घेतली. पण नंतर तो पंथ त्याने सोडला. तसेच त्याची भावना अशी होती की, येशूच्या वेळचा ख्रिस्ती धर्म आदर्श, नंतर तो भ्रष्ट झाला. धर्मपीठांवर तर त्याचा रागच होता. यामुळे त्याची चर्चा धर्मातीत होणे स्वाभाविकच होते.

त्याने 1775 मध्ये दुसरा निबंध लिहिला, त्यात विषमतेचे मूळ कशात आहे, याची चर्चा होती. त्यात त्याने एकंदर समाजच बदलण्याचा पाया कोणता याविषयी मतप्रदर्शन केले. आणि भर दिला तो नागरिकांना समान पातळीवर राहता येईल, असे धोरण अवलंबिण्यावर.

अशा प्रकारे जीवन जगणारांनी एकत्र येऊन सर्वसंमतीने निर्णय घेणारी यंत्रणा निर्माण करावी. तीच सर्वोच्च  (सॉव्हरिन) मानावी. कोणी व्यक्ती त्याला अभिप्रेत नव्हती. विचारविनिमय, संमती आणि सौहार्द यांना तो सर्वांत अधिक महत्त्व देतो. जुनी व्यवस्था त्यास त्याज्य होती. तिची जागा नव्या व्यवस्थेने घ्यावी. तीत लोकशाही पद्धतीने काम चालवण्यास महत्त्व दिले होते. वडिलार्जित संपत्ती व अधिकार यांना तो निरोप देऊ पाहतो.

राज्यसंस्था ही लोकहितासाठीच असली पाहिजे व लोकांच्या संमतीने चालली पाहिजे हे त्याचे सूत्र फ्रेंच क्रांतीचा मूलाधार असल्याचे मानले जाते. रूसोचे म्हणणे असे होते की, जनावरांना वाचा नसते. म्हणजे ती विचार करू शकत नाहीत. रूसोच्या दृष्टीने हे एका अर्थी बरे नाही, पण दुसऱ्या अर्थाने बरे. कारण वाचा नाही व विचार करण्याची शक्ती नाही, यामुळे जनावरांना पुढचा विचार करता येत नाही व त्यामुळे चिंता करून दु:खी होण्याचेही टळते.

त्याचे असेही मत होते की, माणूस स्वत:बद्दल प्रेम बाळगतो आणि इतरांशी संबंध येऊन त्यांच्यासंबंधी स्नेहभावना वाढवतो. पण आपण वरचढ व्हावे व इतरांना दडपावे या वृत्तीमुळे संघर्ष निर्माण होतो. यातून केवळ समाज बदलण्याची आकांक्षा रूसो बाळगत नव्हता तर माणूसच बदलण्याची आस त्याला होती हे दिसते.

रूसोला फ्रेंच क्रांतीचा एक प्रवर्तक मानतात. पण या क्रांतीचे जे नेते होते त्यांचा असा सद्‌भाव नव्हता आणि सहकारी पुढाऱ्यांचाही गळा घोटण्याची शर्यत लागली होती, रूसोला हे मान्य नव्हते.

रूसोने 1762 मध्ये ‘दि सोशल कॉन्ट्रॅक्ट’ या नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो सर्वत्र गाजला. ब्रिटिश विचारवंत जी.डी.एच. कोल यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर 1782 मध्ये प्रसिद्ध केले. नंतरच्या काळात त्याचे अनेकांनी नव्याने भाषांतर केले. त्या पुस्तकावर असंख्य भाष्ये ग्रंथ व निबंधरूपाने प्रसिद्ध झाली व अद्यापही होत आहेत.

कोल यांच्या भाषांतरित पुस्तकांची आवृत्ती अमेरिकेतील कनॉफ या प्रकाशनसंस्थेने 1973 मध्ये पुन्हा प्रसिध्द केली. तिच्या प्रस्तावनेत ॲलन रायन यांनी म्हटले आहे की, ‘प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथासारखी लोकप्रियता रूसोच्या या ग्रंथास मिळाली.’

रायन यांनी अशीही पुस्ती जोडली की, प्लेटोच्या पुस्तकाप्रमाणेच यांतही अनेक परस्परविसंगत विधाने आहेत. ती पाहण्यापूर्वी रूसो याच्या ‘दि सोशल कॉन्ट्रॅक्ट’ या ग्रंथातील मुख्य विचारांची थोडक्यात माहिती देणे युक्त होईल. रूसो याने या ग्रंथात सरकार वा राज्यशासन यांचे स्थान व कार्य काय, याची चर्चा केली आहे.

तो म्हणतो की, राज्य करणारे बहुत काळ समाजाच्या हितासाठी नव्हे तर स्वत:च्या स्वार्थासाठी कारभार करत असतात. यामुळे सरकारच्या कामाचा तपशीलवार, खोलात जाऊन आढावा घेणे आवश्यक आहे. लोकांचा निर्णय हा सर्वांत महत्त्वाचा मानून तो सरकारने मान्य केला पाहिजे. अर्थात देशपरत्वे परिस्थिती भिन्न असते आणि तिला धरून सरकारच्या स्वरूपात बदल करणे भाग असते. त्याने या निमित्ताने रोमन प्रजासत्ताकाचा बऱ्याच तपशिलात जाऊन परामर्श घेतला आहे. ते प्रजासत्ताक त्यास आदर्श वाटत होते.

याच संदर्भात त्याने सामाजिक धर्म कोणता याचा ऊहापोह केला आहे. सर्वसंमतीने जे कायदे होतील त्यांना काही दैवी मान्यता व प्रतिष्ठा आहे असे मानले पाहिजे व ते अंमलात आणले पाहिजेत.

सर्व समाजाचे कल्याण हे ध्येय स्वीकारून त्याप्रमाणे राज्यशकट चालावा. सर्व लोक समान पातळीवरील मानून त्यांनी सर्वसंमतीने कायदे व राज्य करणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. या प्रकारचा समाज तयार करून त्याच्या कायद्यांचे राज्य चालवणे हे त्याचे सूत्र होते. अर्थात असा समाज होता अशी रूसोची धारणा होती आणि तसा समाज निर्माण व्हावा ही आकांक्षा होती. यामुळे आजही अनेक जण रूसोचे स्वप्न आदर्श मानतात.

या प्रकारच्या आदर्शवत समाजाची चर्चा करण्यास रूसोला मोकळेपण आले तरी त्यानुसार एखाद्या देशाची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली गेली. कॉर्सिका या देशात बंड झाले आणि रूसोला त्या देशाची घटना 1764 मध्ये लिहून देण्याची संधी मिळाली. नंतर 1769-70 मध्ये पोलंडची घटना त्याने लिहिली. तेव्हा रशियाचे पोलंडवर वर्चस्व होते. त्यास विरोध करून नव्या घटनेनुसार राज्याची स्थापना करण्याच्या ईर्ष्येतून पोलिस लोकांच्या प्रतिनिधींने हे काम रूसो याच्यावर सोपवले होते. परंतु, हे काम त्याच्या हयातीत पुरे झाले नाही.

तरीही यासंबंधी त्याने एक दीर्घ निबंध मात्र लिहिला. आपल्या तात्विक सूत्रांना अनुसरून त्याने लिहिलेल्या या निबंधात काही व्यावहारिक सूचना असल्याचा हवाला काही समीक्षकांनी दिला आहे.

अत्यंत प्राचीन काळात नव्या ज्ञानाची चाहूलही लागली नव्हती आणि त्या ज्ञानातून नव्या व्यवस्था, संस्था तयार झाल्या नव्हत्या. तो समाज रूसो आदर्श मानत होता. तसा तो परत येणार नाही, पण त्यासाठी स्वत:च्या वेळच्या समाजास मान्यता देण्याची त्याची तयारी नव्हती. केव्हा तरी काही माणसांनी जमीन घेतली व तिचा कसण्यासाठी व इतर काही कामे करण्यासाठी वापर सुरू केला. पण माणसांची संख्या वाढली आणि मग दुसऱ्याची जमीन घेण्याचा कल चढला. मालमत्तेचा उगम असा झाला अशी रूसोची मीमांसा आहे.

ती वादाकरिता खरी मानली तरी नव्या जगाचे प्रश्न त्यामुळे सुटत नाहीत आणि जुने जग पुन्हा अवतरू शकत नाही. पण रूसो आपल्याच स्वप्नात धुंद असल्यामुळे तो तेव्हाच्या काळातील सुखसोयी, चांगला पोषाख, औषधोपचार टाळण्याच्या प्रयत्नात असे. त्याच्या विचारातील गफलती व आचारातील विसंगती अनेकांनी तेव्हा व नंतर दाखवल्या आहेत. ‘दि सोशल कॉन्ट्रॅक्ट’ या ग्रंथाचे पहिलेच वाक्य हे सुभाषिताचा दर्जा मिळवणारे झाले. ते म्हणजे, माणूस जन्मत: स्वतंत्र असला तरी तो सर्वत्र बंधनात आहे. सार्वजनिक भाषण वा परिसंवाद वा लेखात या वाक्याचा उल्लेख टाळ्या मिळवणारा असला तरी रूसोचे ते वाक्यच वास्तवास धरून नाही.

माणूस जन्मत:च स्वतंत्र असतो म्हणजे काय व कसा? कारण मूल जन्मल्यावर त्याला बोलता येत नाही आणि ते पूर्णत:  आईवडील वा जे कोणी पालक असतील त्यांच्यावर अवलंबून असते. म्हणजे जन्मत: स्वतंत्र मानणेच मुळात चूक. तसेच माणसे अनेकदा त्यांना हवा तो उद्योग करतात, त्यात आनंद घेतात. कलावंत, संशोधक, स्वत: शोध लावून उद्योग करणारे हे एक प्रकारे इतरांपेक्षा स्वतंत्र असतात. या रीतीने रूसोच्या गाजलेल्या ग्रंथाचे पहिले वाक्य वास्तवाशी फारकत घेतलेले आहे.

अग्नीचा उपयोग चांगल्या रीतीने करता येतो आणि वाईट रीतीनेही होतो. पण वाईट रीतीने होतो म्हणून अशा शोधांच्या नादात पडू नये आणि यासाठी आधुनिक ज्ञानाच्या मागे लागू नये, हा विचार नुसताच मागासलेला नाही, तर माणसाच्या कल्याणावरही निखारे ठेवणारा आहे. या ज्ञानविज्ञानातून अनेक शोध लागले, अनेक दु:साध्य रोगांवर उपचार होऊ लागले. दुर्घट अशा ठिकाणी पोचण्याची सोय झाली.

रूसोचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो सर्व माणसे समान आहेत, त्यांना समानतेने वागवले पाहिजे आणि या सर्वांनी संमतीने तयार केलेली व शोषणरहित सामाजिक व आर्थिक व्यवस्था सर्वत्र असावी. त्याच्या काळातला हा विचार महत्त्वाचा, दूरदर्शी होता. पण ती व्यवस्था स्वप्नातल्या प्राचीन काळात होती असे मानून विद्यमान काळाकडे पाठ फिरवण्यात काही अर्थ नाही.

चुकीच्या गृहीत कृत्यामुळे रूसोने शिक्षणापासून इतर अनेक विषयांसंबंधी विचित्र मते मांडली. ‘एमिल’ ही त्याची कादंबरी शैक्षणिक प्रश्नांची चर्चा करते. ती करताना माणूस जन्मत: सुजन आला तरी नंतरचे शिक्षण, अनेकविध संस्था, राज्यकारभार इत्यादींमुळे त्याच्यात दुष्टपणा येतो हे रूसोचे मुख्य सूत्र या कादंबरीत आहे.

एमिल या अशा संकटातून वाचतो, कारण तो जे नैसर्गिक त्याचाच स्वीकार करतो म्हणून. हे न मानल्यामुळे लोक अनेक रीतीने भ्रष्ट होतात हे रूसोने दाखवले आहे. नव्या शिक्षणामुळे माणूस जीवनात उद्‌भवणाऱ्या प्रश्नांना व संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकेल, ही समजूत रूसोला चुकीची वाटत होती.

उलट या शिक्षणामुळे तो दुर्बल होतो असे त्याचे म्हणणे. याचे टोक गाठून त्याने नंतर असेही म्हटले की, जंगलात राहणारे व जंगली म्हणून हिणवले जाणारे लोक अधिक समर्थ व शहाणेही असतात. ती जंगलची राहणी त्याला हवीशी वाटत होती. पण त्याला अनेक विचार सुचत होते तथापि त्याच्या आवडत्या जंगली लोकांनी लिहिण्याची व छापण्याची कला शोधून काढली नाही. तेव्हा तो आपल्या कल्पना लोकांपुढे कशा मांडणार होता?

लहान मुलांचा छळ करू नये, पण त्यांचे फार लाडही करू नयेत, कारण त्यामुळे त्यांच्या अपेक्षा भरमसाठ वाढतात, असाही इशारा या कादंबरीत आहे. मुलांना शितबद्ध रीतीने वाढवावे म्हणजे पुढील जीवनात काही माघार घेण्याचे प्रसंग आल्यास त्यांना तोंड देण्याची मनाची तयारी होऊ शकेल, असे रूसोचे मत होते.

या रीतीने वाढवलेला एमिल मोठा झाला की, आपल्या भोवतीच्या जगावर हुकूमत गाजवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार नाही, असा रूसोचा उपदेश होता. त्याने स्वत: मात्र याप्रमाणे आपल्या मुलांना वागवले नाही.

रूसो हा तरुणपणापासूनच स्री-सहवास व स्त्रीसंग याबाबत कोणतीही बंधने बाळगत नसे. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या आणि त्याच्या आत्मचरित्राची अनेक पाने यासाठीच खर्च झाली आहेत.

यातच एक घरगुती काम, धुलाईचे काम करणारी त्याला भेटली. अनेक वर्षे ती दोघे एकत्र राहत. त्यांना पाच मुले झाली. पण रूसोने सगळ्यांनाच सरकारी अनाथाश्रमात ठेवले व त्यांची कधी चौकशी केली नाही. म्हणजे इतरांनी एमिलप्रमाणे मुले वाढवायची व रूसोने स्वैराचारात जराही खंड पडू द्यायचा नाही.

त्याची दुसरी एक कादंबरी, ‘ज्युली’, ही चोरट्या प्रेम-प्रकरणासंबंधीच आहे. ‘एमिल’ या कादंबरीत धर्म, धर्मपीठे, त्यांची शिक्षणपद्धती व महाविद्यालये या सर्वांवर रूसोने सपाटून टीका केली. यामुळे ख्रिस्ती धर्मपीठांचे नियंते संतप्त झाले. स्वित्झर्लंडमध्ये याचे रूपांतर बहिष्कारात झाले.

त्या काळात त्याने, आपण धार्मिक बाबतीत जे लिहिले त्याचे समर्थन करणारे निबंध लिहिले, पत्रे पाठवली. या त्याच्या कादंबऱ्यांत स्त्रियांना गौण स्थान आहे. त्यांचे काम घरात राहणे आणि नवरा वा प्रियकर यांना खूष ठेवणे हेच असल्याचे त्याचे मत होते.

जी नवी सामाजिक व राजकीय व्यवस्था तो करू पाहत होता, त्यात स्त्रियांनी सहभागी होऊन राजकीय जबाबदाऱ्या पाळायच्या की नाही? अधिकारपदे मिळवायची की नाही? रूसोचे उत्तर नकारार्थी होते. तिने आपले मत द्यायचे वा बदल घडवून आणायचे तर ते त्याच्यातर्फे (म्हणजे नवऱ्यामार्फत) असे रूसोचे म्हणणे होते. पण ज्या वनवासी जीवनाची तो प्रशंसा करत होता त्यातील स्त्रिया कित्येक वर्षांपासून वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात बंधनापलीकडे होत्या.

रूसोचे जीवन व त्याचे ललित वाङ्‌मय हे स्वप्नरंजनात्मक आहे आणि या प्रकारच्या वाङ्‌मयाचा तो एक धुरीण मानला गेला. त्याच्या काळापेक्षा तो दुसऱ्याच काळात व जगात वावरत होता. हे जग स्वप्नरंजनात्मकतेचे होते. या वाङ्‌यप्रकाराची फोड जे.बी.प्रिस्टली यांनी केली आहे. त्यांनी अनेक कादंबऱ्या व नाटके लिहिली आणि लेख, निबंध इत्यादीही. ते सर्व संग्रहित झाले आहे. ‘लिटरेचर ॲन्ड वेस्टर्न मॅन’ हा त्यांचा लेखसंग्रह लक्षणीय असून रूसोसंबंधी एक लेख त्यात आहे.

स्वप्नरंजनात्मक वाङ्‌मय व त्याचे निर्माते हे वास्तवापासून दूर तसेच काहीसे वेडे असल्याचे मानले जात होते. शेली, कीटस्‌ इत्यादी त्या पंथाचे होते. रूसो अर्थातच त्यांच्या कितीतरी आधीचा. प्रिस्टली यांच्या विवेचनाचा सारांश असा की, बुद्धिवादाचा प्रभाव एक काळ होता तर स्वप्नरंजनात्मक वाङ्‌मयाचा दुसऱ्या काळात. या दोन्ही काळांतले लेखक व राजकारणी हेही त्या काळाचे प्रतिनिधित्व करत होते.

स्वप्नरंजनात्मक वाङ्‌मय निर्माण करणारा रूसोसारखा लेखक कधीही समाजात सुखाने वावरत नसे. एकाकी राहूनच तो स्वत:चा शोध घेत होता. स्वप्नरंजनात्मक लिहिणारांचा वास्तवाशी  संबंध न राहून ते काहीसे वा पूर्ण वेडे होत. त्या काळातील समाजाचे वर्णन न करता स्वप्नरंजनात्मक लिहिणारे अगदी छोट्या पण महत्त्वाच्या समाजाचे चित्रण करत होते.

प्रिस्टली यांनी जे म्हटले त्यानुसार रूसोच्या लिखाणाचा व वृत्तीचा मागोवा घेतला तर असे दिसेल की, स्वत:मध्ये तो इतका गुरफटला होता की, त्यामुळे तो संशयीही बनत गेला. दिदरो त्याचा मित्र, पण तो आपल्या वाईटावर असल्याच्या समजुतीने तो पछाडला होता. तसेच ह्यू ह्या ब्रिटिश तत्त्वज्ञाचे रूसोशी मतभेद असले तरी त्याचा तो पुरस्कार करत असे. तथापि इंग्लंडमध्ये काही महिने राहत असताना तो आपल्याविरुद्ध वातावरण तयार करत असल्याची रूसोने उगाचच समजूत करून घेतली होती. त्याचे शेवटचे दिवस उगाचच दु:खात आणि कुढण्यात गेले.

टॉलस्टॉय हा सर्वसंगपरित्याग करण्याचा विचार करत होता त्या दिवसांत वा त्याच्या आधी, आपल्या गरजा एकदम कमी करण्याचे त्याने ठरवले. तसेच तो शेतावरील कामगारांच्या मुलांना शिकवत असला तरी ज्या प्रकारचे शिक्षण दिले जात होते त्याच्या विरुद्ध त्याची मते बनली होती.

आपापल्या गरजा आपण स्वत: मेहनत करून पुऱ्या करून भागवाव्या असे त्याचे मत झाले होते. आधुनिक शास्त्र त्याला विनाशकारक वाटू लागले होते. या संबंधात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती ही की, आधुनिक ज्ञान, शोध यांना विरोध करणाऱ्या टॉलस्टॉयचा आगगाड्यांनाही विरोध हवा. पण देशात व परदेशात असताना आगगाडीचा त्याने उपयोग केला. इतकेच काय तर घरसंसार सोडून तो निघून गेला तेव्हा तो व त्याची मुलगी यांनी आश्रय घेतला तो एका रेल्वेस्टेशनचा.

गटे हाही स्वप्नरंजनात्मक वाङ्‌मय निर्माण करणारा होता. पण रूसोप्रमाणे त्याची मते नव्हती. तो रूसोसारख्यांची गणना जवळपास वेड्यांत करत असे. सर्व समाज, माणसाचे जीवन आमूलाग्र बदलण्याची त्याची आकांक्षा नव्हती, आपण ते करू असा त्याचा दावाही नव्हता. याच संदर्भात व्हॉलटेअर व रूसो यांच्यातील संबंधाची माहिती करून घेणे युक्त होईल. दोघेही एकमेकांस मानीत, पण अनेक बाबतींत वैचारिकदृष्ट्या ते कधीही एका पातळीवर नव्हते. या दृष्टीने दोघांनी एकमेकांस लिहिलेली पत्रे पाहण्यासारखी आहेत.

व्हॉल्टेअरचे एक पत्र 30 ऑगस्ट 1755 रोजी स्वित्झर्लंडमधून धाडलेले आहे तर रूसोचे पत्र 18 ऑगस्ट 1756 चे फ्रान्समधून पाठवलेले आहे. व्हॉल्टेअर लिहितो, ‘मानव प्राण्यांवर टीका करणारे तुमचे पुस्तक मिळाले. तुमच्या पुस्तकामुळे लोकांना बरे वाटेल, पण तुम्ही त्यांना सुधारू शकणार नाही. आपणा सर्व जनावरांमध्ये तुमच्याप्रमाणे कोणी आपल्या बुद्धीचा व्यय केला असेल असे वाटत नाही. तुमचे पुस्तक वाचताना चार पायावर (म्हणजे दोन हात व दोन पाय) चालण्याचा मोह होतो. पण साठ वर्षांहून अधिक काळ मी माझी ती सवय घालवली आहे. तिचे पुनरुज्जीवन करणे मला दुर्दैवाने शक्य नाही. याचे एक कारण म्हणजे माझे आजारपण. यामुळे युरोपातील एका निष्णात डॉक्टरच्या जवळपास राहतो. त्याऐवजी मिसुरीतील जंगलवासीयांना अधिक यश येईल, असे मला वाटत नाही.

याचे एक कारण म्हणजे तिकडेही युध्दाची झळ लागली असून आपल्याप्रमाणे तेही दुष्ट बनले आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कला व विज्ञान या क्षेत्रांतील लोक बराच छळ करतात. गॅलिलिओ होताता सत्तर वर्षांचा, पण त्याला कारावासात राहावे लागले. कारण काय, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे त्याने निरीक्षण केले. पण सर्वांत लांच्छनापद गोष्ट ही की, त्याला त्याची मते मागे घेणे भाग पाडले गेले. तिकडे फ्रान्समध्ये ज्ञानकोषाचे काम सुरू होताच कोषकार नास्तिक ठरवले गेले’... व्हॉल्टेअरने यासंबंधात आपली बदनामी करणारे बरेच लिखाण प्रसिद्ध झाल्याची आठवण करून दिली.

नंतर त्याच उपहागर्भ सुरात त्याने स्वत:वरील टीकेची अनेक उदाहरणे दिली. शेवटी त्याने रूसो यास स्वित्झर्लंडमध्ये आपल्या घरी विश्रांतीसाठी बोलावले. हवा चांगली आहे आणि आपण माझ्या गाईचे दूध पिऊ व गप्पागोष्टी करू असे म्हटले. रूसो याने उत्तरादाखल लिहिले की, तुम्ही पाठवलेली कविता वाचली. लिस्बनमध्ये भूकंप झाला होता आणि व्हॉल्टेअरने रूसोला खिजवण्यासाठी तत्कालीन कवी इत्यादींना त्या दुर्दैवासाठी दोष दिला.

याबद्दल रूसोने म्हटले की, पोपच्या कवितेमुळे बरे वाटले तर तुमच्या कवितेमुळे ते वाढले. तुमची कविता सांगते की अधिक दु:ख सहन करा. जर परमेश्वराने हे दिले असेल तर तो सर्वांत समर्थ असताना हे झाले म्हणजे तो यापलीकडे काही करू शकला नाही, म्हणून. रूसोने मग सांगितले की, तो जेव्हा लोकांच्या दु:खाचे वर्णन करतो तेव्हा ते स्वत:च यास कसे जबाबदार आहेत हे दाखवायचे असते. मग त्याने माद्रिदच्या मोठ्या लोकवस्तीला दोष दिला व मोठी शहरे नकोत, छोट्या वस्त्या हव्या या मताचा पुनरुच्चार केला.

आपल्या प्रकृतीच्या बाबतींत त्याने लिहिले की, लवकर मरण येणे हे काही वाईट नसते. मग त्याने जीवनाविषयीचे नेहमीचे मत मांडले आणि मानवाने आपले दु:ख कसे वाढवले हे लिहिले. अखेरीस आपण स्वित्झर्लंडला येऊ शकत नाही, आणि आलो, तर गाईचे दूध नको. काही भाजीपाला, वनस्पती हवी, असे लिहून पत्र संपवले. समानता आणि लोकांना अधिकार सर्वात मोठा असल्याचे ठामपणे सांगून रूसो याने नवयुगाचा पुरस्कार केला खरा, पण बाकी बहुतेक बाबतीत कमालीचा प्रतिगामीपणा दाखवला.

त्रिजन्मशताब्दी साजरी करायची ती त्याने मानवी हक्काची जाणीव तीनशे वर्षांपूर्वी करून दिली त्याबद्दल.

Tags: मानवी हक्क नवयुग रूसो लोकांना अधिकार समानता human rights New Age Russo rights of the people equality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

22 जुलै 1925,डॊंबिवली- 22 मार्च, इ.स. 2017 ह्युस्टन,अमेरिका

इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक.

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके