डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेक्सपिअरच्या काही शतके आधी महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी अमृताते पैजा जिंकणारी अक्षरे मेळविली ती नेवासे इथे. ती अजरामर झाली. 452 वर्षांपूर्वी इंलंडमध्ये एव्हन नदीच्या काठी जन्मलेल्या शेक्सपिअरने थेम्स नदीच्या काठच्या लंडनमध्ये अशीच अमृताते पैजा जिंकणारी अक्षरे मेळविली आणि त्याचीच चारशेवी स्मृतियात्रा या वर्षी सुरू झाली. हा लेख त्या यात्रेचा एक भाग.

शेक्सपिअरच्या निधनास चारशे वर्षे पूर्ण झाल्याने अनेक देशांत त्याची पुण्यतिथी साजरी झाली. काही देशांत ती वर्षभरही साजरी होणार आहे. इंग्लंडमध्ये ती एव्हन नदीकाठावरच्या शेक्सपिअरच्या स्ट्रॅट्‌फर्ड या गावात मोठ्या उत्साहाने साजरी झाली. दि. 23 एप्रिलला जे समारंभ झाले, त्यातील एक खास ठरला. तो असा होता की, अनेक नामवंत नट आणि नट्या शेक्सपिअरच्या नाटकातील ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज दि क्वेश्चन’ हे हॅम्लेटच्या अजरामर स्वगताचे फक्त पहिलेच वाक्य साभिनय बोलून दाखवायचे. या कार्यक्रमास ब्रिटनचा युवराज चार्ल्स हजर होता. वेगवेगळे नट व नट्या ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज दि क्वेश्चन’ हे वाक्य म्हणून दाखवत असताना चार्ल्स स्टेजवर आला. त्याने संचालकांना विचारले की, त्याने भाग घेतला  तर चालेल का? सर्वजण त्याच्याकडे व एकमेकांकडे आश्चर्याने बघत असताना त्याने ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज दि क्वेश्चन’ हे वाक्य साभिनय म्हणून प्रेक्षकांकडून कडाडून टाळ्या मिळविल्या. तो चांगला तयारी करून आला होता, हे दिसले. तेव्हा इंग्लंडचा राजपुत्र थोडा वेळ डेन्मार्कचा राजपुत्र झाला.

23 एप्रिलला शेक्सपिअरच्या समाधीवर फुलांचा डोंगरच उभा झाला. अखेरच्या समारंभात समाधीवर चर्चच्या धर्मगुरूतर्फे एका साध्या पण लोकप्रिय फुलांचा गुच्छ वाहण्यात आला, कोणत्या तरी अवाढव्य वृक्षाची फांदी वगैरे निवडली नाही. शेक्सपिअरला आवडली असती, अशीच ती पुष्पमाला होती. तो धर्मगुरू म्हणाला की- शेक्सपिअरमुळे स्ट्रॅट्‌फर्डला जागतिक महत्त्व आले, नाही तर हे गाव एक कंटाळवाणे कारखानदारीचे ठिकाण झाले असते. या समारंभाच्या वेळी शेक्सपिअरच्या सर्व सदतीस नाटकांवर आधारित छोटे चित्रपटही दाखवण्यात आले.

स्ट्रॅट्‌फर्डमध्ये शेक्सपिअर जेव्हा शाळेत शिकत होता, तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर लॅटिन इत्यादी शिकवत. त्या शाळेत त्याच वर्गात बसून त्या वेळी कसे वातावरण होते, ते आता लोकांना बघता येईल. एक लाख लोक ह्याचा फायदा घेतील, अशी अपेक्षा आहे. शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथी वर्षाच्या निमित्ताने ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी जानेवारीमध्ये पार्लमेंटमधील पंतप्रधानांच्या प्रश्नोत्तरांच्या तासात उत्तर दिले. एका प्रश्नाला उत्तर देताना कॅमेरॉन यांनी शेक्सपिअरच्या आठ-नऊ नाटकांच्या नावांचाच उपयोग करून उत्तराची खुबीदारपणे गुंफण केली व सभागृहाचे वातावरणच बदलून टाकले.

शेक्सपिअर इंग्लंडचा खरा, पण आपल्या नाटकांमुळे तो जगाचाच नागरिक केव्हाच होऊन बसला. यांत रशियाचा खास उल्लेख करावा लागेल. जर्मनी, अमेरिका इत्यादी देशांतील शेक्सपिअरचे स्थान मोठे आहे. पण रशियात त्याला काही शतके भावनात्मक स्थान आहे. यामुळे चारशेव्या पुण्यतिथीनिमित्त रशियात वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. दि. 23 एप्रिलला स्ट्रॅटफर्डमध्ये झालेला संपूर्ण कार्यक्रम मॉस्कोच्या प्रागा या सिनेमागृहात व सेंट पिटस्‌बर्गमधील सिनेमागृहांत थेट प्रक्षेपित करण्यात आला. नंतरच्या सोमवारी रशियातील प्रत्येक शाळेत शेक्सपिअरसंबंधी एक धडा शिकवला गेला. रशियात अठ्ठावीस भाषा प्रचारात असून त्या सर्व भाषांत शेक्सपिअरची नाटके रूपांतरित केलेली आहेत. मॉस्कोच्या विमानतळावर शेक्सपिअरविषयी भव्य प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम रशिया व ब्रिटिश कौन्सिलतर्फे होत आहेत व होणार आहेत. यातील आणखी एक म्हणजे, प्रत्येक डब्यात शेक्सपिअरच्या नाटकांतील प्रवेशांची चित्रे व वाक्‌प्रचार लिहिलेली खास ‘शेक्सपिअर आगगाडी’, हा अभिनव उपक्रम आहे.

रशिया हा अनेक दशके संगीत, चित्रकला, नाट्यकला, शिल्पकला आणि चित्रपट अशा विविध कलांत उच्च स्थानावर आहे. तेव्हा सध्याच्या शेक्सपिअरच्या पुण्यतिथीनिमित्ताच्या कार्यक्रमात रशियात विविध कार्यक्रमांची बरसात होणार, यात नवल नाही. सप्टेंबरमध्ये मॉस्कोत शेक्सपिअरच्या साहित्यासंबंधी तीन दिवसीय चर्चासत्र जाहीर झाले आहे. अशा चर्चासत्रांचे आयोजन तिथे मागील पन्नास वर्षे होत आले आहे. इ.स. 1600 ते 1610 या सुमारास ‘शॅन्डोज पोट्रेट्‌स’ म्हणून शेक्सपिअरची जी चित्रे गाजली, त्यांचेही प्रदर्शन भरले आहे. मॉस्कोच्या प्रख्यात बोल्शाय नाट्यगृहात मध्यभागी शेक्सपिअरचे भव्य चित्र आहे. शेक्सपिअर व इतर साहित्य-कलादींच्या आड रशिया व ब्रिटन यांचे राजकीय मतभेद आले नाहीत. यामुळे ब्रिटन व रशिया यांच्यात शेक्सपिअरच्या पुण्यतिथीबाबत जे सहकार्य चालू आहे, त्याबद्दल आश्चर्य नाही.

तसे पाहिले तर शेक्सपिअर हा त्याच्या देशाबाहेर कधी गेला नव्हता. पण लंडनमध्ये अनेक परकी लोकांची आवक-जावक फार पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे शेक्सपिअरने काही रशियन लोक व व्यापारी पाहिले असतील, काही त्याच्या सहवासातही आले असतील. त्यामुळे ‘ट्‌वेल्थ नाइट’ व ‘लव्हज्‌ लेबर लॉस्ट’ या त्याच्या दोन नाटकांत रशियनांचा उल्लेख आहे. त्यातच जानेवारी 1601 मध्ये रशियन झार बोरिस गोडुनॉव्हने खास दूत म्हणून पाठवलेल्या ग्रेगरी मिकुलिन या राजदूतास पहिल्या एलिझाबेथ राणीने मेजवानी दिली, तेव्हा शेक्सपिअरचे ट्‌वेल्थ नाइट हे नाटक दाखवले गेले. शेक्सपिअर तेव्हा आमंत्रित होता की नाही याचा उल्लेख नाही.

रशियन झार बोरिस गोडुनॉव्ह 1605 मध्ये वारला. ‘विंटर्स टेल’ हे नाटक बाहेर आले 1610-11 मध्ये. त्याची नायिका सिसिलियाची राणी हरमिओन हिच्यावर व्यभिचाराचा खोटा आरोप येतो. त्यासाठी खटला होतो. ती  न्यायाधीशास सांगते की, ‘रशियाचा सम्राट हा तिचा पिता होता. तो जिवंत असता तर आपल्या मुलीवर झालेली फिर्याद त्याला पाहायला लागली असती.’ असे हे शेक्सपिअरच्या नाटकात आलेले रशियाचे उल्लेख. 

पुढच्या काही काळातील रशिया व शेक्सपिअर यांच्या संगतवार उल्लेखांसाठी अलेक्झान्डर परफेनॉव आणि जोसेफ प्राइस या दोघांनी संपादित केलेले ‘रशियन एसेज ऑन शेक्सपिअर ॲन्ड हिज कन्टेम्पररीज’ हे पुस्तक उपयोगी पडते. या लेखसंग्रहातील युरी लेव्हिन यांचा लेख अभ्यासपूर्ण असून ते प्रारंभीच म्हणतात की, रशियन साहित्यात शेक्सपिअरचा पहिला उल्लेख 1748 मध्ये आला. अलेक्झान्डर सुमरॉकॉव्ह ह्या कवीने काव्यासंबंधी लिहिलेल्या ‘एपिसल ऑन पोएट्री’ पुस्तकात शेक्सपिअरचा हा उल्लेख येतो. त्यात त्याने ‘शेक्सपिअरला अभिजात काव्याची माहिती नव्हती,’ अशी टीका केली होती. पण तसे पाहिले तर सतरा वर्षे आधी एका परकी प्रकाशनात आलेल्या भाषांतरित लेखात ‘हॅम्लेटीय’ व ‘ऑथेल्लोनियन’ असे उल्लेख आले होते.

हॅम्लेटचे रशियन भाषेतील रूपांतर 1748 मध्ये आले. मग रशियाची सम्राज्ञी कॅथरिन दि ग्रेट हिने ‘दि मेरी वाइव्हज ऑफ विंडसर’ या शेक्सपिअरच्या नाटकाचे रशियनमध्ये स्वैर भाषांतर केले. कॅथरिन ही अलेक्झांडर दि ग्रेट याच्याप्रमाणे कॅथरिन दि ग्रेट म्हणून ओळखली गेली. ती मूळची जर्मन. तिचे रशियन राजपुत्राबरोबर लग्न झाले. ते पहिल्यापासूनच फसले. तिचा पती कमालीचा व्यसनी व बदफैली होता. मग तिचीही अनेक प्रेमप्रकरणे झाली आणि तिने नवऱ्याच्या खुनाचा यशस्वी कट शिजवला. कॅथरिन कारभारात निष्णात होती आणि साहित्य-संगीतात रमणारी होती. ती फ्रेंच भाषा व साहित्य यात रमत असे. इतकेच नव्हे तर व्हॉल्टेअर, दिदरो आदींना ती सन्मानपूर्वक आमंत्रित करत असे. फ्रेंच ज्ञानकोशकार दिदरोचा ग्रंथसंग्रह तिने विकत घेतला होता. युरोपात ज्यास अभिजात वाङ्‌मयाचे युग म्हणतात, ते संपून सौंदर्यवादी साहित्याचे युग आले होते.

लेव्हिन यांनी इंग्लंड, फ्रान्स इत्यादी देशांतल्या साहित्यातील बदलत्या प्रवाहांचा ऊहापोह करून रशियन साहित्यावर शेक्सपिअरचा प्रभाव कसा वाढत गेला, हे स्पष्ट केले आहे. स्वातंत्र्यवाद, मानवतावाद इत्यादी विचारप्रवाह युरोपातून रशियात गेले. याच वेळी 19 व्या शतकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दशकात पुष्किन हा नवा तारा उदयाला येऊन तो रशियनांचा आवडता होऊन बसला. तो कवी, कथाकार व नाटककार होता. त्याच्या पत्रांचा संग्रह पाहिला तर रशियन साहित्याबरोबर युरोपीय साहित्य आणि विचार यांचा त्याने किती अभ्यास केला होता याची कल्पना येते. पुष्किन तर शेक्सपिअरचा भक्तच झाला.

शेक्सपिअरची नाट्यसरणी आपण अवलंबिली पाहिजे, असे पुष्किनचे मत होते. त्याच्यापासून रशियन रंगभूमीला शेक्सपिअरचे वळण लागले. त्याचबरोबर पुष्किनने आणखी एका विचारप्रवाहाचा उल्लेख केला आहे, तो नेपोलियनला प्रतिकार करण्यात भाग घेणाऱ्या रशियन लष्करी व मुलकी अधिकाऱ्यांमुळे. त्यांचा झारशाहीला विरोध होता, त्यांना स्वातंत्र्य हवे होते. यामुळे विचारस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. या अधिकाऱ्यांचा उठाव डिसेंबरमध्ये झाल्यामुळे ‘डिसेंबरवादी’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. या ‘डिसेंबरवाद्यां’चा विचार आपण शेक्सपिअरच्या दृष्टीतून करावा, असे पुष्किनचे म्हणणे असे. नाटककारापाशी शेक्सपिअरप्रमाणे काय हवे, असे विचारून पुष्किन सांगतो- तत्त्वज्ञान, इतिहासाची दृष्टी, पूर्वग्रहदूषित वृत्तीचा अभाव, यमनियमांचा त्याग करण्याची वृत्ती आणि वास्तववादी पात्रांचे रेखाटन इत्यादी. कोणत्याही रंगभूमीस शेक्सपिअरच्या वळणाचे नाटक योग्य, असे पुष्किन मानत असे.

शेक्सपिअरच्या प्रभावामुळे पुष्किनने स्वत:च्या गाजलेल्या ‘बोरिस गोडुनॉव्ह’ या नाटकाचे कथानक मॉस्कोऐवजी पोलंडच्या सीमेनजीक घडल्याचे चित्रण केले. तसेच राजा व प्रजा या दोहोंत त्याने प्रजेला प्राधान्य दिले. यामुळे कथानकाला व्यापकता आली. 1837 मध्ये हॅम्लेटचे रशियनमध्ये भाषांतर झाल्यापासून रशियन रंगभूमीवर शेक्सपिअरचे स्थान पक्के झाले. असेही म्हणता येईल की, रशियनांच्या मानसिकतेचा तो एक भाग बनला. हॅम्लेटपासून शेक्सपिअरची पात्रे जिवंत आहेत, त्यांचे बोलणेही जिवंत आहे, अशी रशियनांची दृढ भावना होऊन बसली. तसेच शेक्सपिअरच्या नाटकांत जो शोकदायी सूर आहे, तो प्रागतिक रशियनांच्या काळजात रुजला आणि रशियनांच्या वैचारिकतेचा एक भागच झाला. हर्झन, बेलिन्स्की, तुर्गेनेव्ह यांच्या पिढीला मानसिक विश्वात मुक्त विहार करणे यामुळे सुलभ झाले.

पाव्हेल आनेनकॉव्ह या लेखकाने लिहिले आहे की, रशियनांच्या पिढीला आपण बुद्धिवान मनुष्यप्राणी आहोत आणि ऐतिहासिक प्रक्रिया व मानवाच्या अंत:करणाची प्रक्रिया जाणू शकतो अशी जाणीव शेक्सपिअरने निर्माण करून दिली. हे केव्हा, तर जेव्हा सामाजिक एकात्मता अजिबात नव्हती आणि नागरी जीवनाबाबत काहीही बोलण्याचा अधिकार नव्हता, तेव्हा. ‘माझा विल, सर्वश्रेष्ठ विल’ असा शेक्सपिअरचा उल्लेख पुष्किनचा कवी मित्र कायुखेलबेकर करत असे. बेलिन्स्की या नामवंत समीक्षकाने 1840 मध्ये बॉटकिन या मित्रास लिहिले होते की, विचार केल्याशिवाय माणूस एक पाऊलही टाकू शकत नाही. म्हणून आपल्या समाधानासाठी आपण असे म्हणू शकतो की- माणूस म्हणून हॅम्लेट दुर्बळ असेल, पण ऑथेल्लोपेक्षा आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. जे स्वत:च दुर्बल आणि कनिष्ठ असतील, तेच त्याला दुर्बल मानतील. त्याच्या गुणवत्तेचे   वैभव ज्यांना दिसते, ते मात्र तसे मानणार नाहीत.

शेक्सपिअरच्या नाटकांची रशियन रूपांतरे 1748 पासून प्रकाशित होऊ लागली. यासंबंधात हेही लक्षात येईल की, एकाच नाटकाची रूपांतरे निरनिराळे रशियन लेखक करत गेले आणि आजतागायत ही परंपरा चालू आहे. लेखक म्हणून पुष्किनचा अवतार ‘किंग लिअर’ या नाटकाच्या रूपांतरामुळे झाला. रशियातील शेक्सपिअर-संप्रदाय पुष्किनने सुरू केला, असे म्हणण्यास हरकत नाही. पुष्किन विशिष्ट भावनात्मक नात्याने शेक्सपिअरशी बांधला गेला होता. तो साहित्यातून जागतिक दृष्टिकोनापर्यंत उत्क्रांत होत गेला. त्याने लिहिले की, आपला ‘पिता शेक्सपिअर’ याच्यापासून आपण प्रेरणा घेऊन बोरिस गुडनॉव्ह ही शोकांतिका लिहिली. अँजेलो हे त्याचे दीर्घ काव्यही असेच तयार झाले.

रशियात शेक्सपिअरची तीनशेवी जयंती 1864 मध्ये साजरी झाली. त्या वेळी तुर्गेनेव्हने जाहीर केले की, ‘आम्ही रशियन शेक्सपिअरचे स्मरण करतो आणि ते करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण शेक्सपिअर हे आमच्या दृष्टीने फक्त एक प्रसिद्ध व बुद्धिमान नाव नाही की, ज्याला आम्ही दुरून कधी तरी आदरांजली वाहावी; तो आमचा वारसा आहे, आमचे रक्त-मांस आहे’

निकोलाय लेस्कॉव्ह हा 1831 मध्ये जन्मला. तो चांगला व्युत्पन्न होता. त्याच्या ग्रंथसंग्रहात शेक्सपिअरच्या समग्र नाट्यकृतींचे चार खंड होते. त्या संग्रहात 70 ठिकाणी टिपणे लिहिली आहेत. त्याच्या या संग्रहाची बरीच माहिती निबंधरूपाने उपलब्ध आहे. शेक्सपिअरच्या साहित्यात जसा उच्च पातळीचा आध्यात्मिक दर्जा होता, तसा रशियन समाजात तेव्हा नव्हता, असे त्याचे म्हणणे होते.

चायकॉव्हस्की हा एकोणिसाव्या शतकातील जगद्‌विख्यात रशियन संगीतकार होता. संगीत आणि रशियन व फ्रेंच साहित्य यांत तो रमलेला असे. शेक्सपिअरच्या नाट्यकृतींना संगीतरूप देण्यात त्याने नेहमीच उत्साह दाखवला. त्याच्या काळामध्ये ज्या नाटककारांची नाटके रशियन रंगभूमीवर येत, त्यांत शेक्सपिअरची सर्वांत जास्त असत. प्लेन्टॉव्ह या समीक्षकाने 1830 मध्ये त्याच्या ग्रंथात मॅकबेथवर लिहिताना विचारले की- इतर लेखक वाचण्याची गरज काय? शेक्सपिअरमध्ये सर्व जण येतात. पॉव्हेल मोचालॉव्ह या श्रेष्ठ नटाने शेक्सपिअरचे नाटक 1837 मध्ये रशियन रंगभूमीवर आणल्यापासून रशियन रंगभूमीवर शेक्सपिअर आला तो आजतागायत. चायकॉव्हस्की रशियात असताना नेहमीच नाटके बघत असे. युरोप व अमेरिकेत त्याचे वास्तव्य अनेकदा असे.

 तेव्हाही तेथील नाटके पाहण्यात त्याने खंड पाडला नाही. या प्रवासात शेक्सपिअरचा नाट्यसंग्रह बरोबर नाही, असे त्याच्याबाबतीत कधी होत नसे. या संगीतकारास  शेक्सपिअरच्या नाटकांवर आधारलेल्या संगीतिका लिहिण्याची स्फूर्ती होणे स्वाभाविक होते. रोमिओ ॲन्ड जुलिएट, हॅम्लेट, टेम्पेस्ट या नाटकांवरील त्याच्या संगीतिका अजरामर होऊन बसल्या. रोमिओ ॲन्ड ज्युलिएट या संगीतिकेचे स्वरूप त्याने दोन वेळा बदलले. त्याच्या त्या तिसऱ्या रूपाने तर संगीतनाटकाचे प्रेमी बेहोष होत असल्याचे अनेकांनी लिहून ठेवले आहे. चायकॉव्हस्की हा शेक्सपिअरचा इतका भक्त होता की, शेक्सपिअरला त्याने रशियाऐवजी इंग्लंडमध्ये जन्मला तरी माफ केले होते. तो डिकन्सच्या कादंबऱ्यांवरही असाच निहायत खूष असे.

व्हेन्गेरॉव्ह याने काही विद्वान, अभ्यासू, समीक्षक यांचे एक मंडळ जमवून 1902-04 या काळात शेक्सपिअरच्या समग्र साहित्याचे पाच खंड प्रसिद्ध केले. विसाव्या शतकात ॲलेक्झान्डर ब्लॉकच्या कवितांवर शेक्सपिअरचा प्रभाव होता. हॅम्लेटवरून प्रेरणा घेऊन त्याने सर्व काव्यरचना केली होती. हॅम्लेटचे ऑफेलियाबद्दलचे प्रेमगीत, जीवनात घेण्याचे निर्णय, कर्तव्य, सूड अशा विषयांवरील ब्लॉकचे काव्य याच सूत्रावर आधारित होते. व्यक्तित्व आणि इतिहास याचे कोणते दर्शन शेक्सपिअरच्या नाटकांतून होते? कर्तव्य, जीवनात अनेकदा निवड करण्याचे प्रसंग येतात त्यासंबंधात शेक्सपिअर कसा उपयोगी पडतो, याची चर्चा ब्लॉक करतो. विसाव्या शतकात रशियात क्रांती व यादवी झाली. शेक्सपिअरच्या लिखाणापासून काय धडे मिळतात, यासंबंधी त्या काळात ब्लॉक भाषणे देत होता. तो म्हणतो की, शेक्सपिअर आपल्याला माणुसकीचे धडे देतो.

ॲनातोली लुनाचारस्की हा सोव्हिएत युनियनमधील साहित्यविषयक सर्वांत उच्च पदावरचा विद्वान. त्याने 1903 मध्येच हॅम्लेटवर दीर्घ निबंध लिहिला होता. या विहंगमावलोकनावरून रशियातील शेक्सपिअरचा प्रभाव आणि त्यासंबंधीचा खोलवरचा अभ्यास याची कल्पना येऊ शकेल. ऑस्कर कार्तोशिन्सकी याने ‘दि रशियन रिव्ह्यू’च्या एप्रिल 1916 च्या अंकात ‘रशियातील शेक्सपिअर’ असा लेख लिहिला आहे. तो लिहितो की, ‘युरोपात काहीसे गंभीरपणे तर काहीसे विनोदाने म्हटले जाते की, जर्मनीने इंग्लंडला शेक्सपिअर शोधून दिला. यात काही तथ्य आहे. कारण जर्मनीत शेक्सपिअरचा अभ्यास जितक्या उत्साहाने आणि सखोलपणे झाला, तितका इतर कोणत्याच देशात झाला नाही. तसेच जर्मनीत शेक्सपिअरभक्त सर्व देशभर विखुरलेले आहेत तितके दुसऱ्या देशांत दिसणार नाहीत. जर्मनीतील लहान शहरांतसुद्धा हेच दिसून येईल. असेही म्हणता येईल की, जर्मनीने शेक्सपिअरचा जणू कब्जाच घेतला आहे.’ हा लेख 1916 चा म्हणजे शेक्सपिअरच्या तीनशेव्या पुण्यतिथीनिमित्त लिहिला आहे.

पहिले महायुद्ध चालू झाल्यावर आपल्या राष्ट्रीय संस्कृतीत कोणतेही परकी घटक येता कामा नयेत, असा कटाक्ष जर्मनीत होता. पण याला अपवाद एक, तो म्हणजे शेक्सपिअर. त्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत शेक्सपिअरची नाटके होत. जर्मन वर्तमानपत्रांनी यावर असे भाष्य केले आहे की, शेक्सपिअर जितका इंग्लिश लेखक आहे तितकाच जर्मन आहे. अगदी कमी शिकलेली रशियन व्यक्ती असेल, तरी तिला शेक्सपिअर माहीत नाही असे होत नाही. शिवाय हे प्रेम शेक्सपिअरच्या नाटकांच्या केवळ वाचनापुरते मर्यादित नाही, तर नाटकांचे प्रेक्षक म्हणूनही ते प्रेम दिसून येते. तसेच कमी-अधिक नावाजलेला कोणताही रशियन नट शेक्सपिअरच्या कोणत्या ना कोणत्या नाटकात आला नाही, असे झाले नाही.

अठराव्या शतकाच्या अखेरच्या दशकाच्या जवळपास शेक्सपिअर रशियाच्या रंगभूमीवर आला. ‘ज्युलियस सीझर’ हे नाटक रूपांतरित स्वरूपात 1787 मध्ये रशियामध्ये आले. ते रूपांतर केले होते कारमाझिन याने. तेव्हा अधूनमधून ही भाषांतरित नाटके प्रसिद्ध होत असली, तरी एकोणिसाव्या शतकात मात्र ती नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या समग्र आवृत्त्या एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकापासून रशियात निघू लागल्या.

बेलिन्स्कीने लिहिले : ‘केवळ शेक्सपिअर हाच दैवी आणि महान. पृथ्वी, नरक आणि स्वर्ग यांची जाण केवळ त्यालाच होती. निसर्गाच्या या राजाने सत्‌ आणि असत्‌ यांच्यावर समानतेने पुष्पे वाहिली. या जगताच्या नाडीची जाणीव त्याला झाली होती. त्याचे प्रत्येक नाटक म्हणजे या जगाची छोटी आवृत्ती असते. तो परिपूर्ण विश्लेषक होता. माणसाच्या नैतिक विश्वाच्या समस्येची उकल तो करत होता.’’

रशियात जे कोणी शेक्सपिअरबद्दल लिहीत आले, त्यांचे असे मत होते की, शेक्सपिअरच्या लिखाणातील सौंदर्य आणि वैभव हे बेलिन्स्कीने जाणले होते. हॅम्लेट या नाटकाने  रशियनांचे प्रेम आकर्षित करून घेतले. विचारांच्या विश्वात रंगण्याचा त्याचा स्वभाव इत्यादी विशेष हे रशियनांचेही स्वभावविशेष आहेत. हॅम्लेटमधील अनेक वाक्ये रशियनांच्या नेहमीच्या संभाषणात येत असल्याचा उल्लेख आहे. याखेरीज ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘रोमिओ ॲन्ड जुलिएट’ ही आणखी काही लोकप्रिय नाटके. अठराव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून वरील नाटकांशिवाय ‘मॅकबेथ’, ‘विन्टर्स टेल’, ‘मच ॲडो अबाऊट नथिंग’ ही नाटके रशियाच्या रंगभूमीवर येऊन लोकप्रिय होत गेली.

मॉस्कोत 1902 च्या आसपास ‘शेक्सपिअर मंडळ’ जन्माला आले. मॉस्को विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांतून ते पुढे आले. मग प्राध्यापक, नामवंत लेखक, नट आदी त्या मंडळाचे सभासद झाले. या मंडळाच्या आठवणींचे ‘रिकलेक्शन्स’ हे पुस्तक ए.व्हॅन किस्टर्न याने लिहिले. त्याच्या प्रस्तावनेत लेखकाने अशी खंत व्यक्त केली होती की, शेक्सपिअर मंडळ स्थापन झाले, पण रस्त्यांत बॉम्ब उडतच होते. त्या अशांततेच्या वातावरणामुळे शेक्सपिअरचा अभ्यास मागे पडला, असे आठवणी लिहिणाऱ्यास वाटले असावे. पण तसे झाले नाही. कार्तोशिन्सकी म्हणतो की- त्या उलथापालथीच्या काळात भावना उचंबळून येत असतील, पण त्याचा शेक्सपिअरच्या नाटकांवर अनिष्ट परिणाम झाला नाही; कारण रशियनांचा स्वभाव भावनाशील असल्यामुळे भावना उचंबळून येण्यात काही वेगळे नव्हते. शेक्सपिअरचा रशियनांच्या विवेकबुद्धीत प्रवेश झाला, कारण जे काही सुंदर असेल ते रशियनांना मनापासून आवडते.

अर्थात याला अपवाद टॉलस्टॉयचा. त्याला शेक्सपिअरचा पंथ वाढावा, हेच पसंत नव्हते. कारण त्याच्या मते ‘शेक्सपिअरच्या नाटकास धर्माचा पाया नाही; आणि ज्यास असा पाया नाही, ते त्याज्य.’ टॉलस्टॉयशी तेव्हा दुसरे कोणी सहमत नव्हते. पेट्रोग्राडमधील सोकोलावस्की ह्या शेक्सपिअरविषयक तज्ज्ञाने कार्तोशिन्सकी यांस सांगितले की, ‘माणूस चुका करत असतो आणि टॉलस्टॉय हा माणूस असल्यामुळे त्याच्या मताकडे दुर्लक्ष करावे. टॉलस्टॉयने शेक्सपिअरसंबंधीचे विरुद्ध मत किती आदरयुक्त सावधानतेने दिले आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.’ टॉलस्टॉयचे हे मत शेक्सपिअरची नाटके वरवर वाचून बनले नव्हते. तो ती नाटके वारंवार वाचत असे. इतकेच नव्हे, तर अंतकाळ जवळ आला असता ‘आपण शेक्सपिअरवर अन्याय करतो आहे काय?’ असा प्रश्न त्याला पडल्यामुळे त्याने त्याचे समग्र साहित्य वाचले. पण त्यानंतरही धार्मिक आधाराच्या अभावामुळे आपण  शेक्सपिअरच्या साहित्यासंबंधी जे मत देत आलो, तेच बरोबर असल्याचा टॉलस्टॉयचा निर्णय झाला.

हॅम्लेट हे अनेक रशियनांनी सर्वश्रेष्ठ नाटक ठरवले. यात पुष्किनही होता. पण ऑथेल्लो हेही त्याचे आवडते नाटक होते. शोकान्त नाटकाचा हीरो असे त्याने ऑथेल्लोचे वर्णन केले आहे. ऑथेल्लोबद्दलच्या या आपुलकीस एक वैयक्तिक कारण होते. पुष्किनचा आजोबा अब्राम पेट्रोविच गॅनिबाल यासही असूयेची बाधा होत असे. स्वत: पुष्किन हाही असूयेने केव्हा केव्हा संतप्त होई. पुष्किनच्या रक्तात मूरचे आफ्रिकन रक्त होते. त्याचे केस आफ्रिकन माणसाप्रमाणे दाट काळे व कुरळे होते. तथापि, ऑथेल्लो या व्यक्तिरेखेत पुष्किन इतका गुंतलेला होता ते केवळ व्यक्तिगत कारणासाठी नव्हे, तर रशियन व जागतिक वाङ्‌मयाच्या आवडीमुळे. शेक्सपिअरच्या साहित्यात इंग्लिश लोकांचा राष्ट्रीय स्वभाव उत्तम प्रकारे प्रकट झाला, असे त्याला वाटत होते. तो ऑथेल्लोबद्दल लिहितो की, तो स्वभावत:च असूयाग्रस्त नाही; उलट तो दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा आहे. ऑथेल्लो, शायलॉक, फॉलस्टाफ इत्यादी पात्रांसंबंधीची पुष्किनची मते त्याने स्वत:च्या ‘सोव्हरमेनिक’ या वाङ्‌मय व राजकारणविषयक त्रैमासिकात आधीच लिहिली होती. ऑथेल्लो व डेस्डेमोना यांच्यातल्या प्रेमासंबंधी पुष्किनने लिहिले आहे. पुष्किनने ऑथेल्लो या मूरच्या व्यक्तित्वाचे अगदी खोलात जाऊन विश्लेषण केले असून, त्याने तो आवडेल असा रंगवला आहे.

डोस्टोव्हस्की हा टॉलस्टॉयपेक्षा वयाने लहान. टॉलस्टॉय शेक्सपिअरच्या नाटकांचा टीकाकार, तर डोस्टोव्हस्की भक्त. रशियन स्टडिज इन लिटरेचरमध्ये केरन स्टेपानियन यांनी त्यावर लिहिले आहे. ‘डीमन्स’ या कादंबरीमध्ये डोस्टोव्हस्कीने म्हटले आहे की, शेक्सपिअर हा परमेश्वराने पाठवलेला प्रेषित आहे. डोस्टोव्हस्की अगदी तरुण असताना शेक्सपिअरचे साहित्य वाचू लागला. हॅम्लेटचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. हॅम्लेटला उद्देशून तो लिहितो, ‘‘तुझी ती वादळी वाक्ये आठवली की, आत्माच खचून जातो आणि त्यामुळे ती समजणे कठीण होते.’’ ‘ब्रदर्स कारमाझाव्ह’ ही कादंबरी आणि रायटर्स डायरी वाचल्यावर डोस्टोव्हस्कीच्या सर्व आत्मिक यात्रेत हॅम्लेट हा सहप्रवासी होता, हे जाणवते. डोस्टोव्हस्की तरुणपणी  मॉस्कोच्या कारावासात बंदिस्त होता, तेव्हा शेक्सपिअरची नाटके वाचत असे. पुढे ‘क्राइम ॲन्ड पनिशमेंट’ ही कादंबरी लिहून लागल्यापासून शेक्सपिअर व सरव्हान्टे हे त्याला मानवी भवितव्याचे भविष्यवेत्ते वाटू लागले.

विसावे शतक उजाडले. त्याच्या प्रारंभीच्या दोन दशकांत राजकीय उलथापालथी होत होत्या. सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. आपली आर्थिक व लष्करी ताकद नीटपणे न तपासता झार महायुद्धात पडला आणि नुसताच पराभूत झाला नाही, तर राजेपद अन्‌ आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव गमावून बसला. तिथे 1917 मध्ये कम्युनिस्ट राजवट आली आणि ती 1991 मध्ये संपली.

कम्युनिस्ट राजवट आल्यावर ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’, अशी हाक देण्याचे काहींना सुचले असले तरी शेक्सपिअरची नाटके रशियन रंगभूमीवर नुसती टिकलीच नाहीत, तर ती अधिक प्रमाणात आणि देशाच्या अधिक भागांत होऊ लागली. आज शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथीनिमित्त जसे भरघोस कार्यक्रम होत आहेत, तसे कम्युनिस्ट राजवट आल्यावरही झाले. त्याचे कारण काय? एक तर रशियन लोकांचे शेक्सपिअरवरील अतुलनीय प्रेम. त्याला जोड मिळून ते अधिकच दृढ झाले ते नव्याने रशियात आलेल्या कम्युनिस्ट राजवटीचे वैचारिक दैवत असलेल्या कार्ल मार्क्समुळे. मार्क्स आणि त्याचा निकटचा मित्र व वैचारिक सहकारी एन्गल्स हे दोघेही शेक्सपिअरच्या नाटकांचे अतिशय चाहते होते. मार्क्स हा लहानपणापासूनच ज्ञानपिपासू होता. तेव्हापासून शेक्सपिअरची वाक्येच्या वाक्ये त्याला पाठ होती. पुढे तो लिहू लागल्यावर शेक्सपिअरची आणि इतरांची वाक्ये योग्य तऱ्हेने वापरून आपले लिखाण आकर्षक करत असे.

मार्क्सचा जावई पॉल लाफार्ज याने लिहिले आहे की, ‘मार्क्सच्या सर्व कुटुंबातच शेक्सपिअर हा एक पंथच होऊन बसला होता. त्याच्या तिन्ही मुलींना शेक्सपिअरची वाक्येच्या वाक्ये पाठ असत. मार्क्सच्या मनात 1848 नंतर आले की, आपले इंग्लिशचे ज्ञान परिपूर्ण करावे. यासाठी त्याने शेक्सपिअरच्या मूळ साहित्यातील अनेक शब्दांची  वर्गवारी केली.’ मार्क्स रविवारी आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन हेम्पस्टेड हीथ या टेकडीच्या भागात फिरायला जात असे. तेव्हा आपल्या मित्राबरोबर तो शेक्सपिअर, डान्टे व गटे यांच्या साहित्यातील उतारेच्या उतारे म्हणून त्यांवर चर्चा करत असे. आपली सर्व मुले सतत शेक्सपिअर वाचतात, असे त्याने एन्गल्सला अतिशय अभिमानाने सांगितले होते.

मार्क्स अनेकदा साल्व्हिनी आणि अर्विंग या नटांची नाटके पाही. पुढ़े त्याची मुलगी एलेनॉर ही नाटकात काम करू लागली आणि दुसरी जेनी हिलाही नटी व्हायचे होते. मार्क्सचे कुटुंबीय नेहमी साहित्याच्या वातावरणात राहत. अर्थकारणावरील लिखाणासाठी मार्क्सला ललित साहित्यातील वचने अनेकदा उपयोगी पडत. तसेच कुटुंबीयांत हास्यविनोद चालू असल्यास त्यास अधिक खुमारी आणण्यासाठीही अशाच अवतरणांचा उपयोग होत असे. मार्क्सची मुलगी एलेनॉर हिने लिहिले आहे की, त्यांच्या घरात शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह बायबलप्रमाणे होता. ती सहा वर्षांची असताना तिला शेक्सपिअरच्या नाटकांतील अनेक वाक्ये तोंडपाठ होती. अर्थात, त्यांचा अर्थ तिला कळत नसणार. पण वडिलांमुळे ती वाक्ये सतत कानांवर पडल्यामुळे लहानपणीच पाठ होणे शक्य होते.

रशियात कम्युनिस्ट राजवट स्थापन झाल्यावर साहित्य इत्यादीसंबंधात मार्क्स व एन्गल्स यांचा आधार मार्क्सवादी घेत असत. मार्क्सने असे लिहिले होते की, सर्व जर्मन सुखान्तिका एकत्र केल्या तरी त्यांच्यापेक्षा ‘दि मेरी वाइव्ज ऑफ विंडसर’च्या पहिल्या अंकातील जिवंतपणा मनावर अधिक ठसतो. त्याने असेही म्हटले की, शेक्सपिअरच्या ‘टिमॉन’ने पैशाची निर्भर्त्सना केली तितकी कोणीच करू शकला नाही. एन्गल्सने लिहिले होते की- सामाजिक विघटनेची पार्श्वभूमी, साहसवाद आणि सरंजामशाही यांचे शेक्सपिअरने जिवंत दर्शन घडवले.

शेक्सपिअरच्या काळासबंधी एन्गल्सने म्हटले आहे की- आम्ही शेक्सपिअरच्या स्वतंत्र, उच्च वातावरणात राहत होतो. तो काळ महान व्यक्तींची अपेक्षा करत असे आणि तशा व्यक्ती लाभतही होत्या. लेनिन परागंदा म्हणून इंग्लंड, स्वित्झर्लंड इत्यादी देशांत अनेक वर्षे राहिला होता. यामुळे त्याच्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव होता. क्रांतीच्या वेळी रशियात आल्यानंतर त्याने स्पष्टच सांगून टाकले की, रशियात आमूलाग्र बदल आवश्यक आहे. पश्चिमेकडील ज्ञान- विज्ञानाचा आपण स्वीकार केल्याशिवाय चालणार नाही. आपल्याला नवी श्रमजीवी संस्कृती निर्माण करायची आहे. या नव्या संस्कृतीतही शेक्सपिअरने स्थान मिळवले.

कम्युनिस्ट रशियात प्रारंभीच्या काळामध्ये ट्रॉट्‌स्कीला महत्त्वाचे स्थान होते. तो लष्कराचा प्रमुख होता. त्याला दोन-तीन भाषा येत आणि त्याची लेखनशैली व वक्तृत्व प्रभावी होते. त्याचा पुतळा करण्यासाठी श्रीमती क्लेअर शेरिडन ही शिल्पकार भेटत असे. एका भेटीत ट्रॉट्‌स्की तिला म्हणाला की, इंग्लंडने शेक्सपिअरला जन्म दिलेला असल्यामुळे आपले अस्तित्व न्याय्य असल्याचे इंग्लंडने सिद्ध केले आहे. लिटरेचर ॲन्ड रेव्होल्यूशन या विषयावरील भाषणात ट्रॉट्‌स्की म्हणतो की- धर्म, मानवी संबंध यांत उगवत्या मध्यमवर्गीय समाजामुळे कमालीचे स्थित्यंतर झाले. सुधारणावादामुळे व्यक्तिवाद वाढत गेला. शेक्सपिअर हा त्याच परिवर्तनवादामुळे प्रभावित झाला होता. यामुळे त्याच्या शोकान्तिका एकेका व्यक्तीच्या आहेत. त्याच्या नाटकात व्यक्तीच्या भावना टोक गाठतात आणि त्या व्यक्तीच्याही आवाक्यापलीकडे जातात. पण शेक्सपिअरची कला ही अधिक प्रमाणात मानवी आहे. म्हणून परमेश्वर आज्ञा देतो आणि माणूस ती मानतो, असे काही त्याच्या नाटकात होत नाही. केन्द्रस्थानी माणूस असतो आणि म्हणून कलाही असते.

दुसऱ्या एका भाषणात ट्रॉट्‌स्की म्हणतो की- ‘ॲरिस्टॉटल, शेक्सपिअर, डार्विन, बेथोवन, गटे, एडिसन, मार्क्स, लेनिन अशा व्यक्ती निर्माण झाल्या, ही मानवी समाजास अभिमानाचीच बाब आहे.’ ट्रॉट्‌स्कीचा वैचारिक अनुयायी आयझॅक डॉयचर हा शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह पलंगाशेजारच्या छोट्या टेबलावर ठेवत असे आणि झोपण्यापूर्वी अनेकदा शेक्सपिअरच्या नाटकांतला काही ना काही भाग वाचत असे. गॉर्की हा शेक्सपिअरच्या नाटकांचा चहाता होता. त्याच्या सर्वोत्तम नाटकांचे वाचन वारंवार करण्याचे आवाहन तो करत असे. कॅमेनिव्ह हा लेनिनच्या जवळच्या वर्तुळातला होता. त्याने लोकांना आवाहन केले होते की, शेक्सपिअरच्या साहित्यातील वैभव आणि मानवतावाद यांचा आस्वाद घ्यावा. नंतर निरनिराळ्या मार्क्सवादी लेखकांच्या मतावर आधारित असे स्वरूप शेक्सपिअरच्या  नाटकांना दिले गेले. हॅम्लेट 1932 मध्ये इरॅसमससारखा दिसेल असा रंगवला जाऊ लागला. इतकेच नव्हे तर हॅम्लेट नाटकासंबंधी इरॅसमसचे काही भाष्यही ऐकवले जात असे.

सोव्हिएत काळात अनेक नवोदित लेखक व कवी शेक्सपिअरच्या नाटकांचे रशियनमध्ये रूपांतर करू लागले. पास्तरनाकने ‘हॅम्लेट’, ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’, ‘किंग लिअर’ या नाटकांचे रूपांतर 1940 मध्ये केले होते. त्याच्या भाषांतराचे वैशिष्ट्य हे होते की, ते आधुनिक रशियनमध्ये होते. ते नियमांनी बद्ध नसून मोकळे होते. मार्शक याचे शेक्सपिअरच्या कवितांचे भाषांतरही असेच आधुनिक रशियनमध्ये आहे. ॲना आखमातोवा ही रशियाची नामवंत कवयित्री. स्टालिनच्या कारकिर्दीत तिचा छळ झाला. तिने लिहिले होते की, या पृथ्वीतलावर राहायचे आणि शेक्सपिअरची नाटके मुळातून वाचायची नाहीत, हा मूर्खपणा आहे.

लुनाचार्स्की याने शेक्सपिअरसंबंधी विविध लेख लिहिले. रशियाच्या ज्ञानकोशातही त्याने शेक्सपिअर याच विषयावर लिहिले. शेक्सपिअरच्या वेळच्या इंग्लंडमधील समाजरचनेचा आढावा त्याने घेतला. इंग्लंडमध्ये शेक्सपिअरच्या काळात राष्ट्रीय उत्थापन होऊन व्यक्तीला पूर्णतेने जीवनविकास करणे शक्य झाले, असा लुनाचार्स्कीचा निष्कर्ष होता. मॉस्कोत 1934 मध्ये सोव्हिएत युनियनमधील लेखकांची पहिली मोठी परिषद भरली होती. तीत शेक्सपिअरचे भव्य चित्र होते. मॅक्झिम गॉर्की याने आपल्या भाषणात तरुण लेखकांनी शेक्सपिअरचा आदर्श आपल्यापुढे ठेवावा, असे आवाहन केले. या परिषदेत लेखकांनी समाजवादी वास्तववादाचा अंगीकार करण्याचाही ठराव झाला. नंतरच्या काळात दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून पाश्चात्त्य देश व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले असले तरी सांस्कृतिक बाबतीत शेक्सपिअर आणि रशियाची परंपरा यांच्या संगमास विरोध होत नव्हता. रशियाच्या प्रभावाखालील देशांना त्यांच्या परंपरेप्रमाणे शेक्सपिअरची नाटके रंगभूमीवर आणण्याची मोकळीक होती. तसेच रशियात ऐक्यभाव वाढीला लागावा म्हणून शेक्सपिअरची सर्व नाटके तेथील अठ्ठावीस भाषांत भाषांतरित करण्याचा कार्यक्रम अमलात आला. शेक्सपिअरच्या सर्वच नाटकांचे प्रयोग रशियन प्रेक्षकांना आवडतात. त्यांतले काही अधिक लोकप्रिय आहेत.

यांत काहीसे आश्चर्याचे म्हणजे ‘टेमिंग ऑफ दि श्रू’ (त्राटिका). त्या नाटकातील नायक व नायिका यांच्यात सतत भांडणतंटा चाललेला असतो. या नाटकाला कम्युनिस्ट रशियात क्रांतीनंतर नवे आर्थिक धोरण स्वीकारले गेल्यावर वेगळे स्वरूप देण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्याप्रमाणे नाटक अधिक खेळकर झाले. नंतर स्टालिनच्या राजवटीत ‘टेमिंग ऑफ दि श्रू’ व ‘मच ॲडो अबाउट नथिंग’ या नाटकांना वर्गयुद्धाचे स्वरूप आले.

पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनांप्रमाणेच शुद्धीकरणाची व्यापक मोहीम चालू होती. त्या काळात नाटकाची तऱ्हेवाईक नायिका काहीशी निवळत गेलेली दाखवली जाऊ लागली. नंतर 1937 मध्ये अलेक्सी पापॉव्ह याने त्यात बदल केला. त्यात समाजवादी वास्तववादाला प्राधान्य मिळाले. मग 1940 मध्ये या नाटकातील नायक-नायिका हे दोघे वाद घालत असले तरी अखेरीस ते मानव असून प्रेमाने बांधलेले आहेत, हेच दाखवण्यात आले. बदल कोणतेही होवोत, ते नाटक सर्व स्थित्यंतरांतून जाऊन ही लोकप्रियता टिकवून राहिले.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर 1947 मध्ये ब्रिटिश परराष्ट्रमंत्री बेव्हिन हा रशियन परराष्ट्रमंत्री मोलोटॉव्हबरोबर मॉस्कोतील बोल्शॉय नाट्यगृहात ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’चा प्रयोग पाहायला गेला होता. तेव्हा मोलोटॉव्ह

बेव्हिनला म्हणाला की, त्याला शेक्सपिअर इंग्रजीतून वाचण्याची सवय नाही. तेव्हा बेव्हिनने मोलोटॉव्हला शेक्सपिअरच्या नाटकांचे पुस्तक देण्याचे वचन दिले. मग थोड्याच दिवसांत बेव्हिनकडून मोलोटॉव्हला शेक्सपिअरच्या सर्व साहित्याचा उत्तमपैकी चामड्याचे वेष्टन केलेला खंड भेट म्हणून मिळाला. पुढे शेक्सपिअरचा चारशेवा वाढदिवस 1964 मध्ये साजरा झाला तेव्हा ‘प्रावदा’ने अग्रलेखात लिहिले की, रशियाची समृद्ध परंपरा ही शेक्सपिअरच्या परंपरेशी निगडित झाली आहे. आमच्या दृष्टीने तो नेहमीच आमचा समकालीन आहे आणि न्याय्य भविष्य आणण्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे, त्यात तो सहभागी आहे. शेक्सपिअरचे शब्द हे आमच्या देशाच्या जीवनाचा भाग असून आम्ही जो नवा समाज उभा करतो आहोत, त्यास ते शब्द साह्यभूत होत असतात.

स्टालिन व त्याच्या राजकीय वारसांनी असंख्य लेखक, कवी, नट, दिग्दर्शक आदींवर व त्यांच्या कलाकृतींवर गदा आणली खरी, पण शेक्सपिअरचे स्थान अढळ राहिले. शेक्सपिअरची नाटके स्टालिन अनेकदा पाहत असे. पण हॅम्लेट मात्र अपवाद होते. हॅम्लेट हा त्याला कृती टाळणारा माणूस वाटत होता आणि कारण काहीही असो, त्या नाटकाची कथा क्रेमलिनमध्ये घडल्याचे त्याला वाटत असे. तरीही त्याने देशभर ते बंद केले नव्हते आणि मॉस्कोतही बंदीचा हुकूम त्याने काढला नाही, पण त्याच्या नाराजीची कल्पना आल्यावर लोकांनी मॉस्कोत ते बंद केले. (हॅम्लेटमध्ये मुडदे पडतातच; पण नाटक संपल्यावर आपलाही बळी जाऊ नये, असा विचार लोकांनी केला असावा.)

रशियात 1935-36 पासूनचा काही काळ हा असंख्य लोकांची धरपकड, खून, फाशी, हद्दपारी यात गेला. अशा त्या काळात जितकी विनोदी नाटके रंगभूमीवर आली तितकी ती इतर काळात आली नसतील. यात मोलिये या फ्रेंच नाटककाराप्रमाणे शेक्सपिअरचा समावेश होणे साहजिक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात राष्ट्रवादी रशियन नाटके व इतर साहित्य यांना मागणी होती. युद्ध संपल्यावर स्टालिनने पाश्चात्त्य जगाविषयी प्रेम बाळगणाऱ्यांवर गदा आणली. तेव्हा पास्तरनाकसारख्यांनी शेक्सपिअरच्या साहित्याच्या अनुवादावर भर दिला, कारण त्यावर बंदी नव्हती. त्या निर्बंधांच्या जाचात शेक्सपिअर व पुष्किन यांचा आश्रय घेतला जात होता. पास्तरनाक याने हॅम्लेटचे भाषांतर पूर्ण केल्यावर फिन्डबर्ग यांस लिहिले, ‘कोणतीही काटछाट न करता या नाटकाचे निम्मे लिखाण मोठ्याने वाचताना जो आनंद होतो, त्याला तोड नाही. त्या तीन तासांत उच्च अर्थाने मानवप्राणी म्हणून जगल्यासारखे वाटले. आपण अशा काही वातावरणात राहतो की, आपल्याला जगाच्या अतीत, निर्बंधरहित आणि उबदार असे काही तरी आपल्याभोवती आहे, असे वाटते.’

शेक्सपिअरची चारशेवी जन्मतिथी 1964 च्या एप्रिलमध्ये साजरी झाली. तो जयंतीचा समारंभ सर्व जगासाठी आहे, असे मानून रशियात अत्यंत वैभवात साजरा झाला. (रशियाच्या कॅलेन्डरमध्ये शेक्सपिअरच्या जयंतीची तारीख लाल रंगात असते. रशिया हे शेक्सपिअरला मिळालेले दुसरे निवासस्थान.) त्या भव्य समारंभाच्या वेळी रशियाचे तेव्हाचे प्रमुख क्रुश्चॉव व त्यांचे सर्व प्रमुख सहकारी हजर होते. पण मुख्य वक्ते होते नाणावलेले रशियन लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, गायक, गायिका, संगीतकार, चित्रकार, नर्तक व नर्तिका. त्या समारंभाचे स्मरण आजही करून त्यासंबंधी लिहिले जाते.

शेक्सपिअर हा रशियन आहे, ही रशियनांची भावना चारशेव्या जन्मतिथीच्या वेळीच निर्माण झाली असे नाही. त्या आधी पंचवीस वर्षे अगोदर म्हणजे 1939 मध्ये रशियातील शेक्सपिअरच्या नाटकांचा महत्त्वाचा दिग्दर्शक सर्गे रॅडलॉव्ह याने लिहिले होते की, ‘शेक्सपिअर हा रशियाचा मोठा मित्र आणि आमच्या नटांचा शिक्षक आहे. अजून 25 वर्षांनी शेक्सपिअरच्या चारशेव्या वाढदिवसाच्या वेळी पाश्चात्त्य जगातील भांबावलेले अभ्यासक शेक्सपिअरची जन्मभूमी बदलल्याचा दाखला देतील. इतकेच नव्हे, तर ‘इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांच्या देशांपेक्षा अनेकविध भाषा नांदत असलेले आपले सोविएत संघराज्य तो अधिक पसंत करतो.’असे संगतील.

 दुसरे महायुद्ध संपण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 1944 मध्ये अर्मेनियाची राजधानी असलेल्या येरेव्हनमध्ये शेक्सपिअरसंबंधी मोठा उत्सव साजरा झाला. गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या चौकात लोक अतिशय मन लावून शेक्सपिअरबद्दलची व्याख्याने ऐकत होते. समारंभास आलेला एक प्रेक्षक समारंभाहून परत जाण्यास निघाला, तेव्हा युद्धकालीन संचारबंदीची वेळ झालेली होती. यामुळे रात्रीच्या पोलिसाने त्याला हटकले. त्या प्रेक्षकाने आपण शेक्सपिअर उत्सवासाठी आल्याचे सांगून पास दाखवला. त्यावर शेक्सपिअरचे चित्र होते. ते पाहताच पोलिसाने सलाम केला व त्याला सांगितले की, त्याचे कागदपत्र बरोबर आहे, तो जाऊ शकतो.

पास्तरनाक हा गणवेषधारी लेखक होण्यास राजी झाला नाही. त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की, स्टालिनला पास्तरनाकसंबंधी ओलावा होता. एकदा शुद्धीकरणांसबंधीच्या यादीत पास्तरनाक असताना स्टालिनने त्याचे नाव रद्द केले. ‘ढगांत वावरणारा कवी’ असे त्याने त्याचे वर्णन केले होते. उलट स्टालिनच्या पंथासंबंधीची गुप्तता उघड करणाऱ्या क्रुश्चॉवची राजवट सुरू झाल्यावर पास्तरनाकच्या ‘डॉ.झिवागो’ या कादंबरीचे हस्तलिखित न वाचता बंदी येऊन नोबेल पारितोषिक घेण्यास मनाई झाली. सरकारी निर्बंधांमुळे स्वतंत्रपणे लिहिता येत नाही म्हणून पास्तरनाकने भाषांतराचे काम सरकारकडून घेऊन ते मनाप्रमाणे केले. नव्या कल्पना सुचत गेल्यामुळे त्याने हॅम्लेटची नऊ भाषांतरे केली.

ए.ए. सिमरनॉव्ह हा रशियन साहित्यातला दर्दी. भाषेचे शुद्धत्व राखण्यावर त्याचा कटाक्ष होता. त्याला पास्तरनाकच्या काव्यासंबंधी आदर असला तरी शेक्सपिअरच्या नाटकांची रूपांतरे करताना मूळ नाटकांबाबत पास्तरनाक गैरवाजवी प्रमाणात स्वातंत्र्य घेतो, अशी त्याची तक्रार होती. यासंबंधी त्याने कशी टीका केली, हे बोरिस कागानोव्हिच याने एका दीर्घ लेखात दाखवून दिले आहे.

अशी ही शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथीनिमित्तची स्मरणयात्रा. एका रशियन विद्वानाचा प्रश्न असा की, ‘शेक्सपिअरसारखा अलौकिक प्रतिभेचा नाटककार कुठल्या तरी खेड्यात कसा निर्माण होईल? कोठल्या तरी नगरवासीयाने हे अमोल साहित्य निर्माण केले असावे.’ हा अर्थात चाकोरीबद्ध विचार करण्याच्या पद्धतीचा परिणाम. शिवाय हा विद्वान हे विसरला की, शेक्सपिअर जन्मला स्ट्रॅट्‌फर्ड इथे, पण त्याचे सर्व लिखाण लंडनमध्ये झाले.

शेक्सपिअरच्या काही शतके आधी महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी अमृताते पैजा जिंकणारी अक्षरे मेळविली ती नेवासे इथे. ती अजरामर झाली. 452 वर्षांपूर्वी इंलंडमध्ये एव्हन नदीच्या काठी जन्मलेल्या शेक्सपिअरने थेम्स नदीच्या काठच्या लंडनमध्ये अशीच अमृताते पैजा जिंकणारी अक्षरे मेळविली आणि त्याचीच चारशेवी स्मृतियात्रा या वर्षी सुरू झाली. हा लेख त्या यात्रेचा एक भाग.

(विल्यम शेक्सपिअरची 400 वी जयंती 23 एप्रिल 2016 रोजी झाली, त्यानिमित्ताने हा लेख लिहिला आहे.)

Tags: गोविंद तळवलकर विल्यम शेक्सपिअर शेक्सपिअर साधना दिवाळी अंक govind talwalkar William Shakespeare shakespeare diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

22 जुलै 1925,डॊंबिवली- 22 मार्च, इ.स. 2017 ह्युस्टन,अमेरिका

इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक.

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके