डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पाकिस्तानात काय चालले आहे, हे माहीत करून घेण्यास या पत्राचा विशेष उपयोग होतो. विविध विषयांचे जाणकार हे त्याचे लेखक व स्तंभलेखक आहेत. आयेशा सिद्दिकी या लष्करविषयक लिखाण करतात. त्यांचे ‘पाकिस्तान इन्कॉर्पोरेशन’ हे पुस्तक पाकिस्तानी लष्कराने आर्थिक क्षेत्रावरही कसा कब्जा बसवला आहे याची माहिती देणारे आहे. इरफान हुसेन हे इंग्लंडमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांची भाषा प्रासादिक आणि विषय विविध असतात. राजकारणापासून खेळांपर्यंत ते लिहीत असतात. विशेष म्हणजे पाकिस्तानी राजकारणी कसे लोकशाही संकेतांची पायमल्ली करतात हे ते दाखवून देत असतात.

नामवंत ब्रिटिश लष्करतज्ज्ञ लिडेल हार्ट यांचे ‘अदर साइड ऑफ द हिल’ या नावाचे पुस्तक आहे. त्यांचे म्हणणे असे की, प्रत्येक देशाने आपल्या शेजारच्या व आसपासच्या देशांची चांगली माहिती करून घेतली पाहिजे आणि सावध राहिले पाहिजे.

या बाबतीत त्यांनी फ्रान्सचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की, पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्सने जर्मनीच्या सीमेवर एक तटबंदी उभी केली. मॅजिनॉट लाईन म्हणून ती ओळखली जाते. या तटबंदीमुळे फ्रेंच जर्मनीबद्दल बेफिकीर राहिले. पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटलरने या तटबंदीला वळसा घालून हल्ला केला.

आपल्यालाही पाकिस्तानसंबंधी जितकी माहिती मिळवता येईल तितकी मिळवणे हिताचे आहे. यासाठी वृत्तपत्रे हे एक महत्त्वाचे साधन आहे. यात ‘डॉन’ या दैनिकाचा क्रम वरचा लागेल. या दैनिकाचे संस्थापक पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जीना हे होते.

दैनिक म्हणून ‘डॉन’चे आगमन होण्यापूर्वी ते साप्ताहिक होते. पण जीना यांना मुस्लिम हितासाठी खंबीरपणे प्रचार करणारे इंग्रजी दैनिक हवे, अशा सूचना 1937 सालापासून होत होत्या. अखेरीस 1940 मध्ये पाकिस्तानची मागणी करणारा ठराव मुस्लिम लीगने लाहोरच्या अधिवेशनात संमत केला तेव्हा जीनांनाही दैनिकाची निकड जाणवू लागली.

त्याप्रमाणे दिल्लीत 26 ऑक्टोबर 1941 रोजी ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकाचा अवतार झाला. ‘डॉन’चे पहिले संपादक होते पोथान जोसेफ. ते त्या काळातील एक प्रसिद्ध पत्रकार होते आणि संपादक या नात्याने त्यांनी मान्यता मिळवली होती. आयुष्यात त्यांनी अनेक वृत्तपत्रांत कधी सहसंपादक तर कधी संपादक या नात्याने काम केले.

हॉर्निन हे ‘बाँबे क्रॉनिकल’चे संपादक असताना पोथान जोसेफ सहसंपादक होते. ‘ओव्हर द कप ऑफ टी’ हे त्यांचे सदर अतिशय लोकप्रिय झाले होते आणि जोसेफ यांनी वृत्तपत्रे बदलली तेव्हा हे सदरही आपल्याबरोबर फिरवले. याखेरीज त्यांचे अनेक अग्रलेख व लेख गाजले.

ते ‘क्रॉनिकल’मध्ये असताना जीना त्या कंपनीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या या पत्रावर बरीच बारीक नजर ठेवली होती. यामुळे पोथान जोसेफ यांचे संपादनकौशल्य त्यांनी अनुभवले होते. जोसेफ यांच्या या कौशल्याची पावती महात्मा गांधी, पंडित नेहरू व राजाजी यांनी दिली होती.

गांधींनी ‘यंग इंडिया’ सुरू करताना सय्यद अब्दुल्ला ब्रेलव्ही, महादेवभाई देसाई आणि पोथान जोसेफ यांना सल्लामसलतीसाठी बोलावले होते. नेहरूंनी आपल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’साठी जोसेफ यांना बोलावले होते, पण जोसेफ यांची आर्थिक गरज व नेहरू देऊ करत असलेली रक्कम यांची सांगड बसणे शक्य नव्हते.

जोसेफ यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ इत्यादी पत्रांच्या संपादकपदावर काही वर्षे घालवली होती. दोन्ही बाबतींत त्यांना वाईट अनुभव येऊन जावे लागले. टी.जे.एस.जॉर्ज यांनी जोसेफ यांचे चरित्र लिहिले असून जोसेफ यांच्या वृत्तपत्रीय जीवनाची माहिती दिली आहे.

महात्मा गांधींचा खून झाला तेव्हा जोसेफ मुंबईत ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक होते. जॉर्ज सांगतात की, गांधींच्या खुनाचा जोसेफ यांच्या मनावर जबर परिणाम झाला, पण आपल्या भावना आवरून त्यांनी अर्ध्या तासात उत्तम अग्रलेख लिहिला. तो जॉर्ज यांच्या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे.

यापूर्वी ते ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मद्रास आवृत्तीचे संपादक म्हणून काम करीत असताना मतभेद होऊन त्यांनी निवृत्ती पत्करली होती. अशा वेळी कलकत्ता इथे ‘स्टार ऑफ इंडिया’ या नावाचे सायंदैनिक निघत होते. त्याचे मालक इस्पहानी यांनी जोसेफ यांना संपादक म्हणून आमंत्रण दिले. इस्पहानी यांचे घराणे ढाक्याचे. ते उद्योगपती होते.

जीनांनी दिल्लीत इंग्रजी दैनिक सुरू करण्याचे ठरवल्यावर त्यांना जोसेफ यांची आठवण झाली. हे दैनिक सुरू करण्याचे ठरवल्यावर जीनांनी त्यांच्या स्वभावानुसार सर्व तयारी पूर्ण केली होती. कागद, छपाई, संपादक व जुळारी यांच्यापासून वृत्तपत्र विक्रेत्यांचे कमिशन इत्यादी सर्व बाबतींच्या खर्चाचा हिशेब मांडून त्यांनी इस्पहानींना दिला होता. जीना-इस्पहानी पत्रव्यवहारात तो दिला आहे.

जोसेफ हे केरळचे. ते सीरियन ख्रिश्चन महाविद्यालयातून इंग्रजी व संस्कृत घेऊन पदवीधर झाले होते. त्यांची स्मरणशक्ती, पाठांतर व भाषाप्रभुत्व वाखाणण्यासारखे होते. राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते, पण मुस्लिम व इतर अल्पसंख्य यांना वाजवी संरक्षण हवे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे जीना यांच्या भूमिकेत काही तथ्य असल्याची त्यांची भावना होती.

त्यातच आपण प्रचारक नसून वकील आहोत असे ते म्हणत असल्यामुळे, ‘डॉन’चे संपादकपद त्यांनी स्वीकारले. जीना, लियाकत अली आणि इस्पहानी यांच्याशी त्यांचा संबंध असे. या तिघांनीही आपल्यावर दडपण आणले नाही, असा निर्वाळा जोसेफ यांनी दिला होता.

काही वेळा आपला अग्रलेख ते यांपैकी कोणाला तरी दाखवत, पण कधी बदल केला गेला नाही. तथापि पोथान जोसेफ यांची समजूत होती की, पाकिस्तानची मागणी अधिकाधिक हक्क मिळवण्यासाठी जीनांनी पुढे केली आहे. तसे नसून देशाची फाळणी होणार हे स्पष्ट झाले तेव्हा पाकिस्तानच्या बाजूने तर्कशास्त्र किती ताणायचे याच्या आपल्या मर्यादा संपल्या आहेत, असे सांगून जोसेफ यांनी जीनांचा निरोप घेतला आणि जीनांनीही जोसेफ यांच्या भावनेचा आदर ठेवला.

जोसेफ यांना ‘डॉन’मधील अखेरच्या दिवसांत आपण एकाकी आहोत असे वाटले. कारण त्यांचे सहकारी पाकिस्तानच्या भावनेने पेटले होते. जातीयवादास ऊत आला होता आणि संयम, तर्कशास्त्र इत्यादींना रजा मिळाली होती. या सर्वांचे प्रतिनिधी होते अल्ताफ हुसेन.

त्यांनी ‘पाकिस्तान’ हे एक ध्येय बाळगले होते आणि हिंदू, काँग्रेस व महात्मा गांधी यांच्या द्वेषाने ते पछाडले होते. त्यांची संपादकपदी नेमणूक झाल्यावर ‘डॉन’चे स्वरूप बदलले. एक प्रचारपत्र आणि मुस्लिम लीगचे मुखपत्र म्हणून ते ओळखले जाऊ लागले. तेव्हाच्या भावनाप्रधान वातावरणात या पत्राचा खप मोठ्या प्रमाणात वाढून मुस्लिम समाजाने ते डोक्यावर घेतले.

जीनांच्या बुद्धिवादाचे पर्व या काळापासून संपले. त्यांच्या तर्कशुद्धतेचे गोडवे गाऊन महात्मा गांधींवर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या जसवंत सिंग यांनी पाकिस्तानच्या प्रचारासाठी जीना कोणत्या थरापर्यंत गेले होते आणि मुल्ला-मौलवींनाही हाताशी धरून त्यांनी पाकिस्तानचा प्रचार केला हे लक्षात घेतले नाही.

पाकिस्तानची स्थापना होण्याच्या आधी काही दिवस अल्ताफ हुसेन कराचीला गेले. पाकिस्तानची राजधानी कराचीत होती आणि ‘डॉन’ही तिथून निघणे क्रमप्राप्त होते. लीगचे मुखपत्र आणि जीना संस्थापक यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीनंतरच्या पहिल्या काळात ‘डॉन’चा बराच दबदबा होता. परंतु हे फार काळ टिकले नाही. जीनांचे निधन झाले. नंतर लियाकत अलींचा खून झाला आणि पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली.

मुस्लिम लीगमध्ये एके काळी ध्येयवादी लोकांचा भरणा होता, पण सत्ता आल्यावर संधिसाधूंचा बुजबुजाट झाला असल्याची खंत व्यक्त करण्याची पाळी हुसेन यांच्यावर आली. जीनांना लोकशाही राजवट हवी होती आणि घटना तयार करून तिच्या आधारे राज्यव्यवस्था आणायची होती, असे डॉनने राज्यकर्त्यांना अनेकदा बजावले. पण ते व्यर्थ ठरले.

मग ‘डॉन’ हे सरकारचे मुखपत्र न राहता ते विरोधी विचारांचे पत्र बनले. यामुळे राज्यकर्ते बिथरले. याच अवस्थेत प्रथम इस्कंदर मिर्झा यांनी लोकनियुक्त सरकार दुर्बळ बनवले, हुसेन यांनी यासाठी मिर्झा यांच्यावर तोफा डागल्या. तथापि जनरल अयुब खान यांनी मिर्झा यांना पदच्युत करून इंग्लंडला धाडले आणि ते स्वत: देशाचे प्रमुख बनले. त्यांनी लष्करी कायदा जारी केला. अयुब यांनी मुस्लिम लीगला नामोहरम केले आणि नंतर त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत जीनांच्या बहिणीचा पराभव केला.

अल्ताफ हुसेन व ‘डॉन’ यांचा बंदोबस्त कसा करावा हा अयुब व त्यांचे सहकारी यांच्यापुढे प्रश्न होता. मग अल्ताफ गोहर या आपल्या प्रशासनातील प्रसिद्धीप्रमुखास संपादकदावर बसवून ‘डॉन’चा ताबा घेण्याचे विचार अयुब करत होते. आणि त्याचबरोबर अल्ताफ यांनी आपल्या मंत्रिमंडळात यावे असे प्रयत्न करत होते. आपले पत्र सरकारी गोठ्यात बांधले जाण्यापेक्षा आपण मंत्री व्हावे म्हणजे ‘डॉन’चे प्रकाशक हरून कुटुंब यास मर्जीप्रमाणे संपादक नेमता येईल असे हुसेन यांनी ठरवले आणि हरून कुटुंबाच्या संमतीने हुसेन मंत्री झाले.

हुमैरा खान यांनी ‘डॉन’च्या विविध संपादकांच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेऊन त्या पत्राचा इतिहास सांगणारे पुस्तक लिहिले आहे. हा इतिहास ‘डॉन’ला व इतर पाकिस्तानी पत्रांना किती दीर्घ काळ लष्करशहा आणि हुकूमशाही वृत्तीचे पंतप्रधान यांच्या जाचक राजवटीला तोंड द्यावे लागले त्याची कहाणी सांगणारा आहे.

अयुब खान यांच्या राजवटीत वृत्तपत्रांवर नियंत्रणे आणणारा कायदा आला. नंतर लष्करशहांच्या राजवटींप्रमाणेच झुल्फिकार अली भुत्तो, नवाब शरीफ आणि बेनझीर भुत्तो यांनीही वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचेच धोरण अवलंबिले.

हुमैरा खान यांनी त्यांच्या पुस्तकात ‘डॉन’च्या संपादकांनी व मालकांनी या काळात कोणत्या प्रकारे आपले वृत्तपत्र चालवले आणि ही नियंत्रणे सैल झाल्यावर त्याची कशी अनेक अंगांनी भरभराट झाली हे दाखवून दिले आहे. साहजिकच ‘डॉन’ला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधात वस्तुनिष्ठ लिखाण करणे अशक्य होते.

खान यांच्या इतिहासावरून हे दिसून येईल की, पूर्व बंगालमध्ये याह्या खान याच्या अधिकाऱ्यांनी व लष्कराने अत्याचार केले, याची काही माहिती पश्चिम पाकिस्तानच्या लोकांना मिळत नव्हती. इतकेच नव्हे तर पूर्व बंगाल बंड करून उठला असून तो अलग होण्याचा धोका असल्याचेही समजत नव्हते.

पूर्व बंगालमध्ये भारतीय सैन्य घुसले असल्याची बातमी मात्र प्रसिद्ध करण्यात आली. पण ते का आले याबद्दल गुप्तता पाळलेली होती. अखेरीस पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला व त्यास शरणागती पत्करावी लागल्याची बातमी आल्यावर पाकिस्तानी जनतेला धक्का बसला.

खान यांनी दाखवून दिले आहे की, याह्या खान जाऊन भुत्तो आल्यामुळे फरक पडला नाही. त्यांची राजवट आडदांडपणा करण्यात लष्करशहांच्या मागे नव्हती. यामुळे ‘डॉन’चे व त्यांचे वैर राहिले. जाहिराती याअगोदरच बंद झाल्या होत्या आणि खाजगी कंपन्यांवरही दडपण आणून त्यांना जाहिराती देण्यापासून परावृत्त करण्यात येत होते.  भुत्तो यांनी हेच धोरण पुढे चालवले. त्या वेळी अल्ताफ गोहर हे सरकारी सेवेतून बाहेर पडून संपादक झाले होते. भुत्तो व त्यांचे वैमनस्य असल्यामुळे एका रात्री गोहर यांना पोलिसांनी पकडून नेले.

झिया यांनी कळस गाठला. त्यांच्या काळात दहशतवादी मातले. त्यांनी ‘डॉन’च्या कार्यालयात दोन वेळा बाँबस्फोट घडवून आणले. खान यांनी दिलेल्या सर्व तपशिलांत जाता येणार नाही; पण त्यांनी अहमद अली खान यांच्या कामगिरीबद्दल जे लिहिले आहे ते थोडक्यात नमूद केले पाहिजे.

अहमद अली खान हे खानसाहेब या नावाने ओळखले जात. ‘डॉन’शी त्यांचा संबंध ते वृत्तपत्र दिल्लीत सुरू झाले तेव्हापासून वार्ताहर, स्तंभलेखक इत्यादी नात्यांनी होता. 1973 मध्ये ते ‘डॉन’चे संपादक झाले आणि 24 वर्षे ते संपादक होते. त्यांनाही राज्यकर्त्यांच्या जाचाचा त्रास झाला. पण खानसाहेब यांनी कौशल्याने मार्ग काढला. त्यांनी सामाजिक विषयांना प्राधान्य दिले. कला, साहित्य यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. आपले पत्र जगवणे हे सर्वांत महत्त्वाचे होते.

यात यश आल्यावर खानसाहेब व ‘डॉन’चे प्रकाशक हरून कुटुंब यांनी आपल्या पत्राच्या छपाईपासून प्रत्येक बाबतीत सुधारणा करण्याचे धोरण अवलंबिले. खानसाहेब यांच्या वेळीच ‘डॉन’ची प्रथम लाहोर व नंतर इस्लामाबाद येथे आवृत्ती निघू लागली. देशात व परदेशात वार्ताहर नेमले गेले.

मग साप्ताहिक आवृत्ती वाढत गेली. इतकेच नव्हे तर अर्थ, साहित्य, कला, महिला इत्यादी पुरवण्यांची जोड मिळाली. ‘डॉन’तर्फे विविध मासिके व साप्ताहिके प्रसिद्ध होत असतात. आज ते एक संपन्न व वजनदार दैनिक म्हणून मानले जाते. त्याचे विद्यमान संपादक अब्बास नासिर हे आहेत.

भारतासंबंधी दर वेळी वस्तुनिष्ठ भूमिका घेतली जातेच असे नव्हे. पाकिस्तानात काय चालले आहे हे माहीत करून घेण्यास या पत्राचा विशेष उपयोग होतो. विविध विषयांचे जाणकार हे त्याचे लेखक व स्तंभलेखक आहेत. आयेशा सिद्दिकी या लष्करविषयक लिखाण करतात. त्यांचे ‘पाकिस्तान इन्कॉर्पोरेशन’ हे पुस्तक पाकिस्तानी लष्कराने आर्थिक क्षेत्रावरही कसा कब्जा बसवला आहे याची माहिती देणारे आहे.

इरफान हुसेन हे इंग्लंडमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांची भाषा प्रासादिक आणि विषय विविध असतात. राजकारणापासून खेळांपर्यंत ते लिहीत असतात. विशेष म्हणजे पाकिस्तानी राजकारणी कसे लोकशाही संकेतांची पायमल्ली करतात हे ते दाखवून देत असतात. आपल्या देशवासीयांना आत्मपरीक्षणास हुसेन प्रवृत्त करत असतात.

मध्यंतरी अमेरिकेने पाकिस्तानला पुरेसे आर्थिक साहाय्य दिले नाही, म्हणून पाकिस्तानात बरीच टीका होत होती. पण हुसेन यांनी आकडेवारीसह दाखवून दिले की, अमेरिकेने मार्शल योजनेखाली जर्मनीला जितके साहाय्य दिले त्यापेक्षा जास्त पाकिस्तानला दिले आहे.

तसेच दिलेल्या मदतीचा हिशेब मागण्याची व्यवस्था अमेरिकेने केली तेव्हा टीका झाली, मोर्चे निघाले. त्या वेळी हुसेन यांनी लिहिले की पाकिस्तानी लष्करास हे बंधन नको असल्यामुळे नवाज शरीफ यांच्यासारखे राजकारणी या मोर्चाच्या मागे आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक कर्ज देते तेव्हा त्याचा विनियोग कसा झाला याचा हिशेब द्यावा लागतो. तेव्हा असे मोर्चे का निघत नाहीत?

कडवे धर्मनिष्ठ हेही हुसेन यांच्या टीकेचा विषय होत असतात. एका अमेरिकनाने बेनझीर भुत्तो यांच्यावर अनुबोधपट काढला आहे. तो कसा एकांगी व बेनझीर यांची प्रसंशा करणारा आहे हे हुसेन यांनी दाखवून दिले आहे.

अर्देशीर कावसजी हे पारशी गृहस्थ कायदा, घटना इत्यादींसंबंधात लिहीत. यापूर्वी भंडारा हे दुसरे पारशी नियमित लिहीत असत. त्यांची व माझी गाठ काही वर्षांपूर्वी इस्लामाबाद इथे त्यांच्या निवासस्थानी पडली होती. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची आवड होती आणि अनेक ध्वनिमुद्रिकांचा संग्रह त्यांनी केला होता. त्यांच्या लिखाणास विनोदाची झालर होती. ते कारखानदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले.

‘डॉन’मधील एक लेख आठवतो. तो होता अडाणी धर्मगुरूंबद्दल. त्यात म्हटले होते की, पाकिस्तानच्या अनेक मशिदींतील धर्मप्रचारक अडाणी आहेत. त्यांना नीट कुराणपठण करता येत नाही. अनेकजण व्याजबट्‌ट्याचा व्यवहार करतात. दुकान वगैरे चालवतात.

भल्या पहाटे बांग देऊन कुराणपठण करण्याचा प्रघात असला तरी अनेक धर्मगुरू पहाटे उठण्यास तयार नसतात. म्हणून त्यांनी एक युक्ती लढवली आहे. त्यांनी कुराणपठणाची ध्वनिफीत- टेप तयार केली आहे. ती पहाटे वाजवली जाते.

‘डॉन’चे पहिले संपादक पोथान जोसेफ यांनी जीनांच्या निधनानंतर लिहिले होते की, विघटनात्मक प्रवृत्ती पाकिस्तानचे विघटन करतील की नाही, हे सांगता येत नाही; पण पाकिस्तानला बांधून ठेवणारा एकमेव दुवा जीनांच्या मृत्यूने हरपला.

ते खरेच आहे आणि आजही या विघटनात्मक शक्ती प्रबळ आहेत. ‘डॉन’ त्यांच्याविरुद्ध इशारा देत असतो. तसेच लष्कर व राजकारणी यांनी दहशतवादी शक्ती कशा वाढवल्या हेही तो सांगत असतो. काश्मीरसंबंधी त्यांचे धोरण पाकिस्तानी राज्यकर्ते व भाष्यकार यांच्यापेक्षा वेगळे नाही. पण भारतात दहशतवादी पाठवून गोंधळ उडवण्याचा मात्र तो निषेध करत असतो.

‘डॉन’ आता अद्ययावत झाला आहे. त्याची प्रगती अनेक रीतींनी झाली असून तो भक्कम आर्थिक पायावर उभा आहे. एका जुन्या पाकिस्तानी पत्रकारास मात्र, ‘डॉन’ संपन्न झाला असला तरी त्यामागे पहिल्या काळात जी भावनेची धग होती ती जाणवत नाही, अशी खंत आहे.

दुसरे म्हणजे त्यात पूर्वी दिसत नसत अशा चुका दिसतात. दुसऱ्या एकास पोथान जोसेफ यांचे निधन झाल्यावर ‘डॉन’ने ज्या प्रकारे त्यांच्या निधनाची बातमी दिली त्यामुळे धक्का बसला. ज्या पत्रकाराने ही बातमी दिली, त्याला आपल्या पत्राच्या पहिल्या संपादकाची काही माहिती नव्हती.

तसेच ‘डॉन’ या मुस्लिम पत्राचा संपादक मुस्लिमच असणार अशी त्याची खात्री असल्यामुळे पोथान जोसेफ हे केरळमध्ये जन्मलेले असले तरी या पत्रकाराने त्यांना मरणोत्तर वायव्य सरहद्द प्रांताचे रहिवासी बनवून पोथान यांचे नामांतर पठाण असे केले. पण ‘डॉन’ याच पत्राचा हा अनुभव नाही. आपल्याकडेही अशी उदाहरणे कमी नाहीत.

(‘वैचारिक व्यासपीठ’ ही लेखमाला या लेखाबरोबरच समाप्त होत आहे. या लेखमालेत इंग्रजीतील एकूण दहा नियतकालिकांची ओळख करून देण्यात आली- संपादक)

Tags: द डॉन गोविंद तळवलकर अब्बास नासिर अहमद अली खान पोथान जोसेफ महंमद अली जीना दैनिक Abbas Nasir टॅग- ‘डॉन’ Ahmed Ali Khan Pothan Joseph Mohammad Ali Gina Daily ‘Dawn’ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके