डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'लढा व्यक्तीविरुद्ध नव्हे, सहकारातील अपप्रवृत्तीविरुद्ध'

'या लोकशाही तत्त्वाच्या मूल्यांसाठी अनेकांनी त्यागमय कृतीने कार्य केले, त्या लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी सहकार चळवळीच्या माध्यमातून कार्य होणे, ही एक काळाची गरज आहे आणि त्यासाठी श्री. प्रभुदेसाई हे एकटे कार्य करू शकणार नाहीत तर त्यांच्यासारखी अनेक माणसे आज निर्माण होण्याची गरज आहे' असे विचारही तात्यासाहेब सुळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. 'स्वच्छ आर्थिक व्यवहार हाच सार्वजनिक संस्थेच्या प्रगल्भतेचा कणा आहे. प्रभुदेसाई यांनी कार्य केलेल्या प्रत्येक संस्थेत त्यांनी आर्थिक व्यवहाराचा आदर्श निर्माण केला, हेच त्यांच्या जीवनाच्या यशस्वीतेचे गमक आहे.

'माझा सत्कार म्हणजे माझ्या सामाजिक सेवेची पोचपावती असे मी मानत नाही तर नव्या परिस्थितीत सामाजिक सेवा तत्त्वशीलतेने व निष्ठेने करण्यासाठी आव्हानात्मक आग्रह आहे, असे मी मानतो. असे भावपूर्ण उद्गार सहकारमहर्षी श्री. क.र प्रभुदेसाई यांनी सहकार क्षेत्रांतील मान्यवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काढले. 

वसंत सहकारी बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील सहकार पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल दादर भागातील प्रमुख सहकारी संस्थातर्फे प्रभुदेसाई यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

'सहकार चळवळीला विकृत स्वरूप लागत चालल्याबद्दलच्या घटना पाहता मनात द्वेष व चीड निर्माण होते' असे प्रतिपादन करून सहकार चळवळीतील भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे प्रणेते श्री प्रभुदेसाई म्हणाले की, 'आजवर समाजसेवा करणाऱ्या धुरिणांनी आपल्या सामाजिक, राजकीय, सहकारी चळवळींचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस मानला व त्यांच्यासाठी त्यांनी निस्सीम त्यागाने आणि सचोटीने, निरपेक्ष बुद्धीने समाजकारण केले. त्या त्यागाला पायदळी तुडवू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींच्या विरोधात आपला लढा असून कोणाही व्यक्तीविरुद्ध द्वेष म्हणून माझा लढा नाही.

'सहकारातील पैसा हा सामान्यांच्या उद्धारासाठी असावा.' असे मत व्यक्त करून प्रभुदेसाई म्हणाले, 'सार्वजनिक पैशांचा जेव्हा गैरउपयोग केला जातो आणि सार्वजनिक पैशांपासून सामान्य माणूस ज्या वेळी वंचित होतो, त्या वेळी अशा प्रकारच्या गैर प्रकारांविरुद्ध कडवटपणे बोलावेच लागते आणि अशा तर्हेच्या कडवट बोलण्याबद्दल कोणाचेही दुमत असता कामा नये; एवढेच नव्हे, तर त्यासाठी कोणालाही वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. मी ज्या वेळी भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवितो, त्या वेळी मला कोणतीही एक व्यक्ती अभिप्रेत नसते तर माझी तळमळ त्या त्या संस्थेच्या राजकीय सामाजिक भरभराटीसाठी आणि भल्यासाठीच असते. म्हणूनच त्याविरुद्ध आवाज उठविताना मला माझा राग, माझी चीड, माझा शीघ्रकोप आवरता येत नाही.' 

अध्यक्ष स्थानावरून प्रभुदेसाई यांच्याबद्दल अभिमानाने, गौरवास्पद बोलताना श्री. तात्यासाहेब सुळे म्हणाले की, 'सत्शील, प्रामाणिकपणा, सचोटी या निकषांवर आमची समाजसेवा तोलली जात नसून एखाद्या व्यक्तीजवळ तिने 'जमविलेल्या पैशांच्या' तुलनेवर तिची समाजसेवा तोलली जाते, ही एक दुर्दैवाची बाब आहे. अशा काळात प्रभुदेसाई यांच्यासारखी करारी परखड विचारांची व्यक्ती आजच्या कामगार व सहकार चळवळींवर आपला वचक ठेवून आहे, ही एक सौभाग्याची बाब आहे.

'या लोकशाही तत्त्वाच्या मूल्यांसाठी अनेकांनी त्यागमय कृतीने कार्य केले, त्या लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी सहकार चळवळीच्या माध्यमातून कार्य होणे, ही एक काळाची गरज आहे आणि त्यासाठी श्री. प्रभुदेसाई हे एकटे कार्य करू शकणार नाहीत तर त्यांच्यासारखी अनेक माणसे आज निर्माण होण्याची गरज आहे' असे विचारही तात्यासाहेब सुळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. श्री. प्रभाकर शिंदे यांनी 'सहकार चळवळीत कार्य करणाऱ्या नेत्यांमध्ये अग्रणी असलेल्या प्रभुदेसाई यांची पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकार पुरस्कारासाठी झालेली निवड ही एकमुखी शिफारस होती, अशी माहिती दिली.

माजी महापौर श्री. राजाभाऊ चिंबुलकर यांनी प्रभुदेसाई यांनी सहकार व कामगार चळवळींसाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन म्हटले की, 'स्वच्छ आर्थिक व्यवहार हाच सार्वजनिक संस्थेच्या प्रगल्भतेचा कणा आहे. प्रभुदेसाई यांनी कार्य केलेल्या प्रत्येक संस्थेत त्यांनी आर्थिक व्यवहाराचा आदर्श निर्माण केला, हेच त्यांच्या जीवनाच्या यशस्वीतेचे गमक आहे. श्री. प्रकाश मोहाडीकर यांनी वयाची 75 वर्षे झाली म्हणून कुष्ठरोग निवारण समितीचे धुरिणत्व सोडले व त्या कामी प्रभुदेसाई यांना शांतिवनात आणले. त्यांची कार्यतत्परता, निष्ठापूर्वक सेवा, वेळेवर शिस्तपूर्ण काम करण्याची पद्धत पाहून आणि सभेचे वृत्तांत व हिशेब याबाबत दक्षता समजून आल्यावर आम्हांला एक चांगला सहकारी मिळाला, असे समाधान श्री. राम मोहाडीकर यांनी व्यक्त केले या समारंभास मुंबईतील सहकार क्षेत्रातल्या अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

Tags: पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील सहकार पुरस्कार क.र प्रभुदेसाई Vasnatdada patil sahakar purskar K. R. Prabhudesai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके