डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अतिथी संपादकाचे मनोगत (प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्त)

‘शाळाभेट’ या पुस्तकानंतर आणखी शाळांना भेटी द्याव्यात, त्यांच्याविषयी लिहावे म्हणून आग्रह होऊ लागला. पण ‘मी लिहिण्यापेक्षा, शिक्षकांनी स्वत: केलेल्या कामाविषयी स्वत:च लिहावे; लिहिणारे तयार व्हावेत’, असे मला वाटत होते. चांगले लिहिण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा- (कोल्हापूर) यांच्या सहकार्याने विद्यार्थी व शिक्षकांसाठी दोन दिवसांची लेखन कार्यशाळा घेतली. चांगले काम करणारे शिक्षक व शाळा निवडल्या. त्यांच्या यशाचा प्रवास लिहायला सांगितले. ‘आम्हाला काम करायला सांगा; लिहायचं जमणार नाही-’ असा सूर जवळजवळ सर्वांचा होता. परंतु ‘शिक्षकांनीच लिहिलं पाहिजे,’ याविषयी मी आग्रही आहे.

मराठीमध्ये शिक्षणविषयक पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. टीचर, प्रिय बाई, दिवास्वप्न, समरहिल, तोतोचान ही वाचकांनी भरभरून पसंती दिलेली पुस्तके आहेत. शिक्षणविषयक पुस्तकांची यादी आपण पाहिली, तर यामध्ये अनुवादित पुस्तके जास्त आहेत. मराठी माणसांनी मराठी भाषेत लिहिलेली पुस्तके त्या मानाने कमी आहेत. जी काही आहेत, ती वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलेली नाहीत. रमेश पानसे, रेणू दांडेकर, लीला पाटील, सुचिता पडळकर, हेमंत लागवणकर यांचे याबाबतीत मोठे योगदान आहे.

मराठीतील बरीचशी पुस्तके प्रकल्प, उपक्रम, प्रयोग यांची माहिती देणारी आहेत. शिक्षणाची, शाळेच्या संघर्षाची, त्यातून मिळालेल्या यशाची माहिती देणारी पुस्तके अपवादानेच आहेत. जी काही पुस्तके आहेत ती खासगी शाळा, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांच्या कामांविषयी आहेत. सरकारी शाळांमध्येही प्रकल्प, उपक्रम, प्रयोग करणारे शिक्षक होते आणि आहेत. सरकारी शाळांचं व शिक्षणाचं नकारात्मक चित्रण करणारी पुस्तके अधिक आहेत. सकारात्मक चित्रण करणारी प्रतिभा भराडे यांच्या ‘कवाडे उघडताच’ यासारखी पुस्तके अपवादाने दिसतात.

मला असं वाटतं की- आमच्या शेतकऱ्याला पिकवायचं कळतं (नाइलाजाने), विकायचं मात्र कळत नाही; तसंच सरकारी शाळांतील शिक्षकांना काम करायचं कळतं, परंतु ते कष्टपूर्वक लिहून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायचं मात्र कळत नाही. किंवा हे आपण करायला पाहिजे, हेसुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. लक्षात आलं, तरी आपल्याला  लिहिता येईल हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झालेला नाही. काही शिक्षक चांगले लिहू शकतात, लिहीत आहेत; परंतु ते लिखाण वर्तमानपत्रांच्या आखून दिलेल्या छोट्या जागेत बसेल इतके असते. शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती एवढेच त्याचे स्वरूप असते. त्याचा अवकाश खूप लहान असतो.

‘सर्व शिक्षा अभियान’चे तत्कालीन प्रकल्प संचालक नंदकुमार यांना मी ‘शाळाभेट’ या साधनामधून येणाऱ्या लेखमालेविषयी बोललो होतो. महाराष्ट्रातील शाळांच्या कामावरील लेख आहेत असे म्हणालो; तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘तुम्ही तुमच्या तालुक्यातील शाळांविषयी का लिहीत नाही?’’ त्याचा छुपा अर्थ असाही होता की, ‘तुमच्या तालुक्यात चांगल्या शाळा नाहीत काय?’ मी माझ्या तालुक्यातील शाळांविषयी लिहिलं नाही; याचे एक कारण या मर्यादित प्रदेशातील शाळा झाल्या असत्या, दुसरे कारण मी माझ्याच शाळांकडे तटस्थपणे पाहू शकेन याची मला खात्री नव्हती आणि तिसरे व अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे आत्मस्तुतीचा दोष येण्याची शक्यता त्या वेळी मला वाटत होती.

‘शाळाभेट’ या पुस्तकानंतर मात्र आणखी शाळांना भेटी द्याव्यात, त्यांच्याविषयी लिहावे म्हणून आग्रह होऊ लागला. पण ‘मी लिहिण्यापेक्षा, शिक्षकांनी स्वत: केलेल्या कामाविषयी स्वत:च लिहावं; लिहिणारे तयार व्हावेत’, असे मला वाटत होते. चांगलं लिहिण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा- (कोल्हापूर) यांच्या सहकार्याने विद्यार्थी व शिक्षकांसाठी दोन दिवसांची लेखन कार्यशाळा घेतली. चांगलं काम करणारे शिक्षक व शाळा निवडल्या. त्यांच्या यशाचा प्रवास लिहायला सांगितले. ‘आम्हाला काम करायला सांगा; लिहायचं जमणार नाही-’ असा सूर जवळजवळ सर्वांचा होता. ‘परंतु शिक्षकांनीच लिहिलं पाहिजे,’ याविषयी मी आग्रही आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे या शासनाच्या संस्थेकडून ‘जीवन शिक्षण’ हे शिक्षणविषयक उत्तम मासिक प्रकाशित होते. या संस्थेनेही शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा घेतली. सरकारी शाळांचा चेहरा-मोहरा बदलत आहे, हे दाखविण्यासाठी लिहित्या हातांची आवश्यकता आहे.

गोरगरिबांना, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना- प्रत्येकाला वाटते की, माझ्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. सरकारी शाळा हा सामान्यांचा आधार आहे. खासगी शाळा, इंग्रजी माध्यमांची भुरळ, भपकेबाजपणाचा भूलभुलैया, पेशाची आवड नसणारे शिक्षक अशा अनेक अडचणी या शाळांपुढे आहेत. शासनाचा पगार घेऊन मुलांना पाटीवर शिकविण्याचे सोडून नुसत्या पाट्या टाकणाऱ्यांचीही कमतरता नाही. अशा अशिक्षकांमुळे काम करणाऱ्यांचे काम झाकोळले जाते. काम करणाऱ्यांपेक्षा काम न करणाऱ्यांची जास्त प्रसिद्धी होते. जे काम करू इच्छितात, ते दबून काम करतात. काम करतानाची जिद्द, चिकाटी, संघर्ष, कल्पकता, यश यांचे चित्रण काम करणाऱ्यांनी केले; तर दबून काम करणारे मोकळेपणाने काम करतील, त्यांना उभारी येईल याची मला खात्री वाटते.

या अंकात दोन शाळांच्या दोन शिक्षकांनी लिहिलेले लेख प्रसिद्ध होत आहेत. असे लेख यापुढेही यथावकाश साप्ताहिक साधनामधून प्रकाशित होतील. खरे तर एकेका शिक्षकांच्या शाळेचे एक-एक पुस्तक व्हायला पाहिजे, एवढा आशय व सामग्री त्यांच्याकडे असते; लिहिण्याच्या कलेच्या अभावामुळे हे होत नाही. पण थोडेसे कष्ट, सराव, चर्चा या गोष्टी केल्या तर ही गोष्ट अवघड नाही. प्राथमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांनी महाराष्ट्राला मोठे साहित्यिक दिले आहेत. आजही बरेच साहित्यिक शिक्षक आहेत. त्यांची लेखणी अशा लेखनाकडे वळायला हवी. नव्याने लिहिणाऱ्या शिक्षकांनी दैनंदिनी-लेखनापासून सुरुवात करायला हरकत नाही. आपण केलेले छोटे-छोटे उपक्रम, प्रकल्प, प्रयोग यांचे महत्त्व खूप मोठे आहे याची खबरबात प्रत्यक्ष काम करणाऱ्याला नसण्याची शक्यता आहे. पण आपल्या या कामाला छोटे न समजता, न संकोचता कामाचा इतिहास आणि लेखाजोखा शिक्षकांनी मांडावा यासाठी फार मोठ्या प्रतिभेची आवश्यकता नसते. आपणच आपले विश्लेषण आणि विच्छेदन करायचे. या बाबी मी माझ्या शिक्षकांशी चर्चा करताना बोलत होतो. प्रतिभेपेक्षा कष्ट आणि चिकाटी महत्त्वाची आहे, हे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवत होतो. कामाइतकेच लिहिण्याचे कष्टही माझ्या या नव्या लेखक मित्रांनी घेतले आहेत. त्यांचे लेखन साधना वाचकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे.

महाराष्ट्रातील शिक्षकांनी आपले अनुभव दीर्घ स्वरूपात लिहावेत, त्यांची पुस्तके प्रकाशित व्हावीत, इतकेच नव्हे, तर ती इतर भाषांमध्ये अनुवादित व्हावीत, अशी मी आशा करतो.

Tags: नामदेव माळी अतिथी संपादकीय सर्व शिक्षा अभियान हेमंत लागवणकर सुचिता पडळकर लीला पाटील रेणू दांडेकर रमेश पानसे तोतोचान समरहिल दिवास्वप्न प्रिय बाई टीचर Sarv Shiksha Abhiyan Hemnt Lagwankar Suchita Padalkar Lila Patil Renu Dandekar Ramesh Panse Totochaan Sumerhill Diwaswapn Priy Bai Teacher Namdev Mali Atithi Samapdakiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके