डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

संतांच्याही खऱ्या विचारांचा शोध घ्या

संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे किती लोक समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध पेटून उठतात? दुःख, दारिद्र्य, ढोंगबाजी, अंधश्रद्धांचे उच्चाटन आणि मातेसमान ममता, हे सद्गुण गाडगे बाबांनंतर कुण्या संतांच्या पुरस्कर्त्याकडे आहेत?

10 फेब्रुवारी 96 च्या ‘साधना’ अंकातील ‘साहित्य आणि सामाजिक जाणीव’ हा अग्रलेख मनापासून आवडला. आपल्याच मनातील हे विचार प्रगट झाले आहेत असे वाटले. असे विचार कधी तरी वाचावयास मिळतात. या लेखात प्रकट झालेले पारंपरिक मत हे संस्कार, कोंदटलेले, खोटे असले तरी अनेक क्लुप्त्यांनी खोट्याचे समर्थन करणारे किंवा निकडीच्या प्रश्नाला बगल देऊन तिसऱ्याच कसल्या तरी गोष्टीचा गाजावाजा करायचा असा काहीसा रिवाज करणारे आहे. पण संबंधित अग्रलेखात मराठी साहित्याबाबत जे मत प्रगट झाले आहे ते खऱ्या जाणिवेचे स्वतंत्र मानवी मत वाटते. समाज जळत असताना ज्यांच्या जाणिवा करमणूक करण्यात, विषयांतर करून तिसरेच विषय उकरून काढण्यात, कलात्मकता शोधण्यात वा सध्याच्या काळी ज्याचा समाजाला काही उपयोग नाही अशा बाबींचे गोडवे गाण्यात गुंतून पडलेल्या आहेत, त्या त्यांनाच लखलाभ होवोत! 

आपण संत साहित्याबाबत- ‘संत साहित्याच्या समर्थकांनी समाजजीवन मंगल व पवित्र व्हावे. ही भूमिका मांडणारे व्यासपीठ निर्माण केले पाहिजे, तसे न केल्यास समाजातील परंपरावादी प्रवृत्तीनाच संत साहित्यामुळे बळ मिळेल आणि अध्यात्माच्या नावाखाली सामाजिक अन्यायाकडे डोळेझाक केली जाईल.’ हे लिहिलेले योग्यच आहे पण जाणकार वाचक व कार्यकर्ते यांच्यासाठी थोडे विस्ताराने लिहावयास हवे होते. 

संतांवर आणि संत साहित्यावर पहिला राग व्यक्त केला तो महात्मा फुल्यांनी. संत साहित्यामुळे समाजाचा तोटा कसा झाला आहे हे त्यांचे मत बरोबर ठरविताना पां. वा. गाडगीळ यांनी लिहिले आहे, ‘साधुसंतांनी चातुर्वण्याचे वेदग्रंथातले काल्पनिक वेष्टन प्रचारात आणून त्याला अच्छेदपणे जुंपलेले ब्राह्मण वर्चस्व कार्यवाहीत आणले. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यांनी ब्राह्मणांच्या दुष्कर्माचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य दाखविले नाही. सबब त्या सर्व दुष्कर्मास कर्ममार्ग व नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे दोन भेद करून, पोकळ प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीला, अज्ञानी शुद्रास लुटून खाऊ दिले याबद्दल जोतिरावांनी खेद व्यक्त केला आहे. 

याचबाबतीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिले आहे... त्याबद्दल फुले यांचे म्हणणे असे की, ‘भागवत धर्म व त्याचा पुरस्कार करणारे संतकवी यांनीसुद्धा अप्रत्यक्षपणे ब्राह्मण धर्माच्याच बंधनांना सबळ केले. कारण त्यामुळे कर्मविपाकाचा म्हणजे दैववादाचा सिद्धांत लोकांच्या मनावर पक्का ठसविला. भगवद्गीता व भागवत यांत ब्राह्मण धर्माचे जातिभेद, पुनर्जन्म, कर्मविपाक इत्यादी सिद्धांत सांगितले असल्यामुळे त्याचाच पगडा लोकांच्या मनावर बसला. त्यामुळे लोक हतबुद्ध, कर्तृत्वशून्य व दास्यप्रिय राहिले. कारण भागवत धर्माने ‘ठेवले अनंते तैसेचि रहावे’ असा नेभळेपणाचा उपदेश केला असल्यामुळे लोक वेदपरंपरागत समाजरचनेचे गुलाम राहिले. फुले यांचे हे म्हणजे कटु असले तरी सत्य आहे.

‘संत साहित्याचा मानवी मनावर सुसंस्कार घडतो. अंत:सामर्थ्यासाठी संतांची शिकवण आवश्यक आहे. अंतःसामर्थ्यामुळे व्यक्तिजीवन उदात्त पातळीवर जाते.’  असा सूर या साहित्याबाबत संमेलनात निघाला, असे आपण लिहिले आहे. त्याला जर खरे मानायचे असेल तर कीर्तन ऐकणारे लोक सोडाच पण कीर्तन सांगणारे, संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे किती लोक समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध पेटून उठतात? 

दुःख, दारिद्र्य, ढोंगबाजी, अंधश्रद्धांचे उच्चाटन आणि मातेसमान ममता, हे सद्गुण गाडगे बाबांनंतर कुण्या संतांच्या पुरस्कर्त्याकडे आहेत? यापेक्षा विधायक कार्य करणारे कार्यकर्ते बरे! ते लोकांच्या सुखदुःखांत सहभागी होतात व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आध्यात्मामुळे पोटाचा प्रश्न मिटत नाही, अंधश्रद्धा व जातीयवाद जात नाही, अन्यायाचे निवारण होत नाही, दुर्बलांना सबळ करता येत नाही, देशासाठी काही हातभार लावता येत नाही. 

मग जे प्रत्यक्षात काही आणता येत नाही त्याचा काय उपयोग? त्या अध्यात्माच्या अडचणीत मला शिरायचे नाही. पण संत साहित्याच्या समर्थकांनी समाजजीवन मंगल व पवित्र व्हावे आणि त्यासाठी सामाजिक विषमता नष्ट व्हावी ही भूमिका मांडणारे व्यासपीठ निर्माण केले पाहिजे. तसे न केल्यास समाजातील परंपरावादी प्रवृत्तींनाच संतसाहित्यामुळे बळ मिळेल आणि आध्यात्माच्या नावाखाली सामाजिक अन्यायाकडे डोळेझाक केली जाईल या आपल्या मताच्या पुष्टीसाठी काही अवतरणे देतो. 

‘संतांचे विचार’ म्हणून संतसमर्थकांकडून जे विचार लोकांच्या गळी उतरविण्यात येतात, ते संतांचे सुरुवातींचे वद्धावस्थेतील विचार आहेत. संतांचे खरे विचार

‘पाषाणाचा देवो पाषाणाचा भक्तु। पोहती मृगजळ डोई हो’ ‘देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी। नीज देव नेणशी मुळी कोण.’  ‘देवा नाही रूप देवा नाही नाव । देवा नाही गाव कोठे कांही’ ‘ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा। अखंडित सेवा करा त्याची।’

संत ज्ञानदेव

‘भजन चालले उफराटे। कवण जाणे खरे खोटे। जवळी आसता देवो । भक्ता उपाला संदेहो । सचेतन तुळशी तोडा । वाहती अचेतन दगडा। वेले केली ताडातोडी । लिंगा लाखोली खोकडी। मुख बांधोनी बोकड मारा। म्हणती सोमयाग करा।’

संत एकनाथ

‘देवा नाही रूप देवा नाही नाम । देव हा निष्काम सर्वां ठाई मागे पुढे देव रिता नाही ठाव । हृदयीच भेटे देही देव, चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहीच भेटला देव आम्हां.’

संत चोखोबा

‘आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा’

संत तुकाराम

‘दुनिया कितनी बावरी जो पत्थर पूज जाय। घरकी चकिया (जाते) कोई न पूजे जिसका पीसा खाय॥

संत कबीर

‘देवे निर्मियली क्षती । तिचे पाठी पाषाण होती। तयासी देव म्हणती विवेकहीन’॥

संत रामदास

विस्तार भयास्तव एवढेच.

मुळात वारकरी संप्रदायाचे असणारे प्राचीन वाङ्मय आणि संत साहित्याचे गाढे व्यासंगी पंडित का. शि. संकाये, ज्यांनी संत साहित्याच्या शब्दाशब्दाचा अभ्यास आणि त्यावर आयुष्यभर चिंतन केले आहे, ते या विषयी लिहितात, ‘संतांच्या जीवनात चार अवस्था दिसून येतात- 1 वद्धावस्था, 2 साधकावस्था, 3 ज्ञानावस्था आणि 4. ज्ञानातीत अवस्था. वद्दावस्था म्हणजे अज्ञान. साधकावस्था म्हणजे अंधश्रद्धा, ज्ञानावस्था म्हणजे अंधश्रद्धेतील सर्व आचार-विचार-उपासना प्रकार समाजघातकी आहेत असे समजणे आणि ज्ञानातीत अवस्था म्हणजे योग्य अयोग्य यांचा विचार करून आलेला त्यांचा स्वतःचा अनुभव होय. 

मागील तिन्ही अवस्थांतील आचार-विचार-उपासना वगैरे सर्व घातकी असून त्यांत कसलीही फलप्राप्ती होत नाही, याबद्दल त्यांचा स्वतःचा दृढ विश्वास- त्या विश्वासातून आपल्या व समाजाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी त्यांचे स्वानुभवी विचार त्यांनी आपल्या अभंग वाङ्मयात स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडलेले आहेत. 

विस्तार भयास्तव मी अगदी थोडेच विचार मांडले आहेत. त्याचे कारण संतांचे हे मानवकल्याणकारी महान विचार बाजूला सारून कीर्तनकार-प्रवचनकार- प्रचारक मंडळी प्रचार व प्रसार करतात जे विचार संतांच्या अंधश्रद्ध अवस्थेतील आहेत ते विचार खुद्द संतांनीच आपल्या ज्ञानातीत अवस्थेत स्पष्ट नाकारले आहेत. (पण प्रचारकांमुळे) समाज अंधश्रद्धेच्या महाभयंकर खड्ड्यात बुडत आहे म्हणून संतांचे समाज कल्याणकारी विचार मी मांडले आहेत.

ज्ञानेश्वराने लिहिलेली गीतेवरील टीका ‘ज्ञानेश्वरी’ संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रिय झाली आहे. आज वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीला प्रथम स्थान आहे. पण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वराचे स्वतंत्र (स्वतःचे) मत नाही ते गीतेचे मत आहे. खरा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत नाही, अमृतानुभव व चांगदेव पासष्टीत आहे. पण या ज्ञानेश्वराच्या स्वतंत्र मताच्या दोन्ही ग्रंथांकडे विशेष कोणी लक्ष देत नाही. जो तो ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर पाहतो, हे एक ज्ञानेश्वरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. सांप्रदायिक व विद्वान मंडळींनी सर्वच संतांच्या अद्वैतवादाला बाजूला सारले आहे, त्याप्रमाणेच अमृतानुभव व चांगदेव पासष्टीला बाजूला सारून त्या मंडळींनी ज्ञानेश्वरालाच बाजूला सारले आहे असे मला वाटते.

आळंदीच्या मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावर बराच गाजावाजा झालेला असला तरी संतसाहित्य समाज, आणि त्याचे प्रचारक याचे स्वरूप वरीलप्रमाणे आहे. यात ज्यांना सत्य बाबी समाजापासून लपवून ठेवायच्या आहेत, त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे गैर आहे. ज्यांना सत्याची चाड़ आणि असत्याची चीड आहे त्यांनी तरी ‘तुका म्हणे सत्य सांगो। येवोत रागे येतील ते।’ या तुकारामाच्या उक्तीप्रमाणे मते मांडली पाहिजेत.

Tags: साहित्यसंमेलन  आळंदी एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथ संस्कृती Santsahitya Eknath Tukaram Dnyaneshwar Religious text Culture weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके