डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एच. वाय. शारदाप्रसाद यांचे दोन लेख

इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सर्व म्हणजे 16 वर्षांच्या काळात त्यांचे ‘माध्यम सल्लागार’ राहिलेले एच. वाय. शारदाप्रसाद यांचे ‘The Book I Won’t Be Writing’ हे पुस्तक रेखीव लेखनाचा आणि तटस्थ दृष्टिकोनाचा उत्तम नमुना आहे. त्यातील Was the Emergency Unavoidable आणि J.P. हे दोन लेख अनुवाद करून देत आहोत. पहिला लेख त्यांनी आणीबाणीला 20 वर्षे झाली तेव्हा (4 जुलै, 1995) लिहिला होता, तर दुसरा लेख जयप्रकाशांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले तेव्हा (21 ऑक्टोबर, 2001) लिहिला होता. - संपादक

आणीबाणी अपरिहार्य होती काय?

आणीबाणीविषयी वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करता येणे अवघड आहे. त्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांच्या तीव्र भावना समजून घेता येतात आणि (माझ्यासारखे) जे कोणी दुसऱ्या बाजूला होते, त्यांनासुद्धा त्या कालखंडाविषयी तीव्रतेने काही तरी वाटत असते. पण ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या काळात सरकारी आदेशांची अंमलबजावणी केली, ते आता असा दावा करीत आहेत की, ‘‘आणीबाणीच्या काळात जे काही अनिष्ट घडत होते, त्यात आमचा सहभाग नव्हता; उलट त्या निर्णयांच्या विरोधात आतून लढणारे ‘अनसंग हीरो’ आहोत.’’ अनेक पत्रकार आज असे सांगत आहेत की, ‘त्या वेळी आम्ही सिंहासारखे वागलो’; पण प्रत्यक्षात त्या वेळी त्यांनी मेंढीचे कातडे पांघरले होते.

त्या काळात सर्वाधिक धक्कादायक वर्तन विद्यापीठांमधील बुध्दिवंतांचे होते, जे नेहमी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतात. जून 1975 मधील त्या उन्हाळ्याच्या दिवसांत संपूर्ण देश थरारून गेला होता, हे मला चांगले आठवतेय. 25 जूनच्या त्या मध्यरात्री जे थोडे अधिकारी ‘1, अकबर रोड’ बंगल्यातील त्या खोलीत उपस्थित होते, त्यांपैकी मी एक होतो. त्या दिवशी मध्यरात्रीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आणीबाणी पुकारण्यासाठी काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाला मंजुरी दिली होती. त्या ऐतिहासिक घटनेला 20 वर्षे झाली आहेत आणि आता बिगरकाँग्रेसी नेत्यांचे ओजस्वी वक्तृत्व फुलून आले आहे, वृत्तपत्रांचेही रकाने त्याविषयीच्या बातम्यांनी ओसंडून वाहत आहेत. या दिवसाला कोणी वुडन ज्युबिली किंवा काऊंटर ज्युबिली म्हटले, तर हरकत घेण्याचे कारण नाही; पण मुळात ज्युबिली हा ज्यू लोकांचा उत्सव आहे- इजिप्शियन लोकांशी झालेल्या स्पर्धेत जय मिळाल्यानंतर साजरा करण्याचा उत्सव! अणकुचीदार शिंगे असलेले प्राणी (मेंढ्या) उधळून देणे आणि गुलामांना मोकळे सोडणे, अशा प्रकारचा तो उत्सव होता. गेल्या महिन्यात भारतात जे काही साजरे झाले तो उत्सव मुक्ततेचा नव्हता, तर कैद होण्याची आठवण जागवणारा होता.

ही काऊंटर-ज्युबिली ज्या पद्धतीने साजरी झाली ते पाहता, देशातील फार मोठ्या समूहाला 1942 च्या ‘चले  जाव’ चळवळीसारखाच हा दिवस वाटत होता. त्यांच्या दृष्टीने 1975 च्या आणीबाणी काळात ज्यांना तुरुंगात टाकले गेले, त्यांचे स्थान 1942 ला ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांच्यासारखेच आहे. त्या वेळी ‘करा किंवा मरा’ म्हणणाऱ्या महात्मा गांधीचे जे स्थान होते, ते स्थान या वेळी जयप्रकाश नारायण यांचे होते. आणि 1942 मध्ये ब्रिटिशांनी ज्या प्रकारचा हिंसाचार केला, त्याच प्रकारे 1975 मध्ये इंदिरा गांधींचे वर्तन होते. तर, अशी ही आणीबाणी का लागू केली गेली? आणीबाणीच्या टीकाकारांच्या मतानुसार, सत्तेची अनिवार तहान आणि राजकीय, नैतिक व कायदेशीर लढाई हरल्यानंतरही पंतप्रधानपदाला चिकटून राहण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दृष्टीने, न्यायमूर्ती जे.एम.एल.सिन्हा यांनी इंदिरा गांधींचा निवडणुकीतील विजय अवैध ठरवला, तेव्हाच इंदिरा गांधींनी सत्तेवर राहण्याचा हक्क गमावलेला होता. तेव्हा अनेकांनी असाही प्रश्न उपस्थित केला होता की, इंदिराजींच्या निवडणुकीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्याचा राजीनामा दोन दिवस उशिरा स्वीकारला गेला, या तांत्रिक चुकीला भ्रष्टाचार म्हणणे योग्य आहे काय? पण तरीही, पंतप्रधानांची निवडणूक अवैध ठरवली जाणे हे प्रकरण गंभीर होते, हे खरे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

राजकीय अंकगणित साधे-सरळ नसते. मी हे कबूल करतो की, त्या वेळी चालू असलेल्या ‘सत्याग्रहाला’ केंद्र सरकारकडे काहीही उत्तर नव्हते आणि म्हणून आणीबाणी लादण्याचा निर्णय झाला. सर्वच सरकारे सारखीच वागतात, जर त्यांना आव्हान दिले गेले तर; मग ते सत्ताधारी परकीय असोत वा मतदान पत्रिकांद्वारे निवडून आलेले स्वकीयांचे सरकार असो! बळाचा वापर करणे हे त्यांचे सत्याग्रहाला उत्तर असते आणि बळाचा वापर करण्यासाठी कायद्यामध्ये व घटनेमध्ये तरतुदी असतातच असतात.

जयप्रकाश नारायण यांनी जनतेला असहकाराचे आवाहन केले, तेव्हा निर्माण झालेले आव्हान मोडून काढण्यासाठी सरकारच्या साह्याला भारतीय राज्यघटनेतील 352 वे कलम होतेच. आणि इंदिरा गांधींना असे वाटत होते की, राज्यव्यवस्थेचे संरक्षण करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. इंदिरा गांधी सत्याग्रह आंदोलनाशी अपरिचित नव्हत्या. उलट, सत्याग्रहाच्या ताकदीला त्या खूपच चांगल्या प्रकारे ओळखून होत्या. काही महिने आधीच मोरारजी देसाई यांनी गुजरातमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले होते, तेव्हा ‘कोणत्याही प्रकारे तडजोड घडवून आणा’, असे सांगून उमाशंकर दीक्षित यांना मोरारजींच्या भेटीला धाडले होते. पण जयप्रकाशांनी  निर्माण केलेले आव्हान खूपच गंभीर होते, ते आंदोलन तत्काळ इलाज करण्याची मागणी करणारे होते आणि त्यातच भर पडली ती, जिथे दहा युनिट बळ वापरायचे तिथे शंभरांचा वापर करण्याच्या इंदिरा गांधींच्या सवयीची. त्याचा परिणाम आणीबाणीचा निर्णय घेण्यात झाला.

पण घटनात्मक तरतुदी आणि कायदे यांच्याविषयीचे इंदिरा गांधींचे ज्ञान अधिक चांगले असते, तर कदाचित त्यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतलाही नसता. या अशा अभावग्रस्ततेमुळे इंदिरा गांधींना सल्लागारांवर व कायदेतज्ज्ञावर अधिक अवलंबून राहावे लागले आणि त्या लोकांनी जरा अधिकची काळजी घेण्याची गरज पटवून देऊन, आणीबाणीचा निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. राजकीय सल्लागार आणि आरोग्याची काळजी घेणारा सर्जन यांच्यात एक महत्त्वाचा फरक असतो. डॉक्टरने चुकीचे निदान केले, तर झालेल्या नुकसानीचे खापर त्याच्याच माथी फोडले जाते. पण जेव्हा राजकीय सल्लागाराकडून चुकीचा सल्ला दिला जातो आणि तो सल्ला स्वीकाराला जातो, तेव्हा झालेले नुकसान राजकीय नेत्याच्याच नावावर नोंदवले जाते. त्याची शिक्षा सल्लागाराला नाही, तर राजकीय नेत्यालाच भोगावी लागते. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा निर्णय जितका अचानक आणि अनपेक्षित होता; तितकाच, किंबहुना अधिक अनपेक्षित व नाट्यपूर्ण निर्णय होता आणीबाणी उठवण्याचा. इंदिरा गांधींनी स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी आणीबाणी लादली, असे ठाम मत राजकीय पंडितांचे आहे.

पण, त्यांपैकी अनेक जण असे म्हणतात की, आणीबाणी उठवण्यामागेही तीच प्रेरणा होती (म्हणजे पुन्हा सत्तेवर येण्याची); तेव्हा तो युक्तिवाद फारसा पटत नाही. असे असू शकते का, की- आणीबाणीमुळे अपेक्षित परिणाम साधला गेलेला नाही, ज्या भूमिकेत वावरावे लागत आहे ते अस्वस्थ करणारे आहे, आणि राजकीय अनिश्चितता संपुष्टात आणावी अशी नैतिक भावना जागृत झाली; म्हणून आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला? पण या विस्मयचकित करणाऱ्या प्रश्नावर प्रकाश पडू शकेल, अशी रोजनिशी इंदिरा गांधींनी ठेवलेली नाही. राजकीय भाष्यकार असे म्हणतात की, ‘नव्याने निवडणुका घेतल्या तर आपण प्रचंड बहुमताने विजयी होऊ, असा आत्मविश्वास इंदिरा गांधींना वाटत होता.’ पण त्यांच्या जवळच्या लोकांना असे वाटते की, इंदिरा गांधींना तशी खात्री नव्हती. आपण निवडणुकीत पराभूत होणार, याचा अंदाज त्यांना आला होता; विशेषत: निवडणूक प्रचाराने जोर पकडला तेव्हा. पण अशीही एक शक्यता आहे की, आणीबाणी लादण्याच्या चुकीच्या निर्णयाचे प्रायश्चित्त म्हणून आणीबाणी उठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल. आणि विचित्र योग असा आला की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी विरोधकांना ज्या प्रकारची वागणूक दिली, तशीच वागणूक नंतर जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींना दिली. त्यामुळे ‘बरोबरी झाली’ असे लोकांना वाटले आणि म्हणून जनता सरकारच्या पतनानंतर लोकांनी पुन्हा इंदिरा गांधींना निवडून दिले. एक गोष्ट मात्र इंदिरा गांधींनी साध्य केली; ती म्हणजे, भविष्यकाळात कोणताही पंतप्रधान आणीबाणी लागू करण्याची हिंमत करणार नाही.    

 -------------

जे. पी. : राष्ट्राची सदसद्‌विवेकबुद्धी

जॉर्ज बुश आणि ओसामा बिन लादेन यांच्याविषयी भरभरून लिहिण्यात गुंतून पडलेल्या वृत्तपत्रांनी गेल्या आठवड्यातील एका घटनेकडे दुर्लक्ष केले. पुढील वर्षभर चालणाऱ्या जयप्रकाश नारायण जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ करणारा तो समारंभ होता. बनारस येथे आयोजित केलेल्या त्या समारंभाला पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर या तिघांची प्रमुख उपस्थिती होती. केवळ दोन-तीन वृत्तपत्रांनी त्याची बातमी दिली. कदाचित दूरचित्रवाहिन्यांवर त्याबाबत दाखवले-सांगितले गेले असेल; पण मी ज्या वाहिन्या पाहिल्या, त्यांवर तरी तसे काही दाखवले गेले नाही. 11 ऑक्टोबर, 1902 रोजी जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला; त्यामुळे त्यांची जन्मशताब्दी प्रत्यक्षात पुढच्या वर्षी आहे. पण आपल्या देशात अशी प्रथाच पडून गेली आहे की, 99 व्या जन्मदिवसाला 100 वा जन्मदिवस मानले जाते. (क्रिकेटमध्येही असे झाले तर बरे होईल, अशी इच्छा अनेक फलंदाजांच्या मनात असेल.) पण, ते असो. झालेल्या चुकीची दुरुस्ती करून घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या हाताशी भरपूर वेळ आहे आणि मला खात्री आहे की, सर्व संपादक तसे करतील. सरकारने स्थापन केलेल्या नॅशनल कमिटीने पुढील वर्षासाठी काय नियोजन केले आहे, ते आपल्याला अद्याप माहीत नाही; पण पुढच्या ऑक्टोबर महिन्याची वाट आपण पाहू शकतो, त्या वेळी वृत्तपत्रांतून जयप्रकाशांविषयी व त्यांच्या कार्याविषयी अनेक लेख प्रसिद्ध होण्याची!

‘सिलेक्टेड वर्क्स ऑफ जयप्रकाश नारायण’ या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत त्या खंडाचे संपादक प्रा.विमल प्रसाद म्हणतात- भारताच्या सार्वजनिक जीवनात जयप्रकाशांचे स्थान केवळ जवाहरलाल नेहरूंच्यानंतर आहे. म्हणजे, या शतकातील महान भारतीय नेत्यांमध्ये जयप्रकाशांचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. सरदार पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस या तिघांचे कट्टर अनुयायी वगळता बहुतांश लोक वरील दाव्याशी सहमती दाखवतील. पण एक गोष्ट विशेष नोंदवण्यासारखी आहे की, या भारतभूमीतील तीन सर्वश्रेष्ठ व्यक्तींपैकी एकानेच केवळ सत्तेचे पद सांभाळले आहे; अन्य देशांत असे क्वचितच आढळते. आपला इतिहास पाहिला तर असे दिसते की, राजापेक्षा ऋषींना आणि सम्राटापेक्षा संन्याशाला अधिक मान मिळत आला आहे. वसाहतवादाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी जनतेचे नेतृत्व करून, स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर सर्वोच्च पद नाकारणारा गांधी हा कदाचित जगातला एकमेव नेता असावा. आणि जयप्रकाशांनीही आपल्या मोठ्या गुरुबंधूचा नाही, तर गुरूंचा मार्ग अनुसरला. हे सर्वपरिचित आहे की, जवाहरलाल नेहरूंनी स्वत:चे हात बळकट करण्यासाठी जयप्रकाशांना एकदा नाही तर अनेक वेळा मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते आणि प्रत्येक वेळी जयप्रकाशांनी नकार दिला होता. त्या वेळी फार मोठ्या प्रमाणात असेही मानले जात होते की, जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर जयप्रकाशांकडे पंतप्रधानपद जाईल. जयप्रकाशांमध्ये ती क्षमता होती, यात शंकाच नाही. त्यामुळे जयप्रकाशांच्या सततच्या नकारामुळे काँग्रेसमधील डाव्या विचाराच्या प्रवाहाची निराशा झाली होती.

त्या प्रवाहाला जयप्रकाशांनी वाऱ्यावर सोडले, अशीही भावना व्यक्त झाली होती. उजव्या प्रवाहाचे नेते आणि कम्युनिस्टांचे लोकही हेटाळणीच्या सुरात असे म्हणत असत की- जयप्रकाश हे बोलणारे नेते आहेत, करून दाखवणारे नाहीत! पण जयप्रकाशांसाठी राजकारणाचा अर्थ वेगळा होता. राजकारणाकडे ते सत्ता मिळवण्याचे आणि चालवण्याचे साधन म्हणून पाहत नव्हते; तर जनतेच्या भल्यासाठी व शोषितांना मुक्त करण्यासाठी वापरण्याचे हत्यार म्हणून ते राजकारणाकडे पाहत होते. जर तुम्ही सरकारमध्ये सहभागी असाल, तर काही चुकीचे निर्णय झाले तरी त्यांचे समर्थन करणे तुम्हाला भाग पडते आणि सत्ता राबविणाऱ्यांना तसे वर्तन स्वाभाविक वाटते. पण तुम्ही सत्तेबाहेर असाल तर सत्ताधाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत, चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आवाज उठवू शकता, असा जयप्रकाशांचा विचार होता.  आणि म्हणूनच दरम्यानच्या काळात ते राष्ट्राची सदसद्‌विवेकबुद्धी जागृत ठेवणारे नेते बनले; देशाचा प्रमुख रखवालदार नव्हे! लोकांना असे मनापासून वाटत असे की, सरकारवर जेपी टीका करताहेत ती सत्तेवर येण्यासाठी नव्हे; तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी- ‘‘माणसाचे स्वातंत्र्य- सर्वत्र आणि सर्व प्रकारचे, सर्वांपासूनचे. मानवी मनाचे स्वातंत्र्य, आत्म्याचे स्वातंत्र्य.’’ हे शब्द जयप्रकाशांचेच आहेत.

जयप्रकाशांनी देशाची विवेकबुद्धी जागृत ठेवली; पण त्यांच्या सभोवताली ज्या प्रकारची माणसे होती, त्याबद्दल मात्र नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. जयप्रकाश स्वत:च्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाशी पूर्णत: प्रामाणिक राहिले; पण त्यांनी आपला अजेंडा, दृष्टिकोन आणि प्राधान्यक्रम (जरा जास्तच) सातत्याने बदलले. अर्थात, ते बदल त्यांनी कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थासाठी केले नाहीत. ते अमेरिकेत सात वर्षे इतका दीर्घकाळ विद्यार्थी म्हणून राहिले; तेव्हा त्यांनी कम्युनिझमची दीक्षा घेतली. (जयप्रकाश हे भारतातील अशा थोड्या नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला नव्हे तर अमेरिकेला जाणे पसंत केले. तेथील ओहिओ विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात एम.ए. केले होते.) पण भारतात परतल्यानंतर काहीच महिन्यांनंतर त्यांना कम्युनिझमबद्दल असमाधान वाटू लागले; विशेषत: ‘मॉस्को’कडून आदेश मिळवणाऱ्या भारतातील कम्युनिस्टांच्याविषयी त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली. आणि मग काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना करून एक दबावगट म्हणून काम करताना जयप्रकाशांनी काँग्रेसमधील उजव्या प्रवाहाच्या विरोधात नेहरूंच्या समर्थनाची भूमिका स्वीकारली. अर्थात, तेव्हाही वर्गसंघर्षाचा सिद्धांत आणि उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची ठेवण्याची गरज, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. एवढेच नाही तर, या दोनही बाबी शास्त्रीय आहेत, असा त्यांचा दावा होता. पण त्यानंतर थोड्याच काळाने त्यांनी वर्गसंघर्षाच्या भूमिकेचा त्याग केला, संपत्तीचे विश्वस्त ही संकल्पना स्वीकारली आणि विनोबा भावे व त्यांची भूदान चळवळ यासाठी स्वत:ला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्यांनी राजकारणातून पूर्णत: निवृत्त झाल्याची घोषणा केली, पण 1970 नंतर त्यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला आणि आधी गुजरात सरकार व नंतर केंद्र सरकार उखडून टाकण्यासाठी राजकारणात पुन:प्रवेश केला.

त्यांची ही कृती इंदिरा गांधींना आणीबाणीच्या निर्णयाकडे जाण्यास भाग पाडणारी ठरली. इंदिरा गांधींचा 1977 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर जयप्रकाशांचा नैतिक अधिकार व त्यांचे सामर्थ्य यामुळेच केवळ अनेक विरोधी पक्षांना आपापले स्वतंत्र अस्तित्व सोडून ‘जनता पार्टी’ या बॅनरखाली एकत्र येणे भाग पडले. पण विचित्र योग असा की, सांप्रदायिक राजकारणाबद्दल ज्या माणसाच्या मनात सखोल तिडीक होती, तोच माणूस जनसंघाला पवित्र करून घेण्यास व सत्तेत वाटा मिळवून देण्यास कारणीभूत ठरला. ज्यांना 1977 च्या निवडणुकीत जयप्रकाशांमुळे फायदा झाला; त्यांना नंतर त्यांची गरज राहिली नाही, उपयोगिता वाटली नाही. त्यांनी ‘लोकनायक’ (ते खरोखर होतेच) हे संबोधन वापरून जयप्रकाशांना महान ठरवले आणि बाजूला ठेवून दिले. मग नव्या सत्ताधाऱ्यांशी सल्लामसलत करण्याऐवजी जयप्रकाशांचा बहुतांश वेळ ‘डायलिसिस’ मशिनवरच जाऊ लागला. अर्थातच, नवे सत्ताधारी त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हते. जयप्रकाशांना मृत्यूचे आमंत्रण येण्यापूर्वीच जनता पक्षाची वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले; पण त्याच इंदिरा गांधींच्या हातून जनता पार्टीचा पराभव झालेला पाहण्यासाठी ते जिवंत राहिले नाहीत.

 

 

 

 

दोनेक वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने म.गांधी यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, गांधीजींचे संपूर्ण आयुष्य हे अखेर अपयशीच म्हणावे लागेल. होय, अखंड भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींना अपयश आले आणि जीनांचे आयुष्य मात्र यशस्वी ठरले आहे, कारण पाकिस्तान मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. पण कोणत्याही प्रकारच्या अपयशामुळे गांधीजींच्या शिकवणुकीचे महत्त्व नष्ट होऊ शकणार नाही. कारण क्रुसावर चढवल्या गेलेल्या ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे महत्त्व नष्ट झालेले नाही. आणि कोणत्याही चांगल्या माणसाचे आयुष्य अपयशीच असते, कारण या पृथ्वीतलावर इतकी चांगली माणसे येऊन गेली तरी सैतानी प्रवृत्ती नष्ट झालेली नाही. जयप्रकाश नारायण हेही त्यांचे ध्येय गाठण्यात अयशस्वी ठरले असतील; पण कमालीचा आर्जवी चेहरा, आश्वासक आवाज, दृष्टीची विशालता व अनुकंपा आणि भ्रष्टाचार, गैरमार्ग, स्वार्थ यांपासून संपूर्ण स्वातंत्र्य या सर्वांच्या मिश्रणातून जो प्रसिद्ध ‘जे.पी.करिश्मा’ आकाराला आला होता, तो बराच काळ प्रेरणा देत राहील.

(अनुवाद: विनोद शिरसाठ)  

Tags: विनोद_शिरसाठ एच_वाय_शारदाप्रसाद जयप्रकाश_नारायण इंदिरा_गांधी 40 वर्षांनी आणीबाणी पाहताना भारतीय लोकशाही आणीबाणी साधना_लेख Vinod_Shirsath HY_Sharadaprasad Jayprakash_Narayan Indira_Gandhi democracy Indian politics the_emergency Sadhana_article weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

एच. वाय. शारदाप्रसाद

माध्यम सल्लागार - इंदिरा गांधी 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके