डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

त्या बैठकीनंतर मनात आलेले काही विचार ...

सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये प्रत्येक तरुणाला स्वत:च्या कुटुंबाचा भार स्वत:च्या खांद्यावर वाहावा लागतो. अशा वेळी असीम त्यागाची भाषा व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता बनण्याचे पूर्वीच्या जमान्यातील ‘मॉडेल’ बदलण्याची वेळ आली आहे का, हे पण तपासून बघितले पाहिजे. ठराविक लोकांच्या अमर्याद त्यागापेक्षा अनेक जणांच्या थोड्या-थोड्या त्यागावर निर्माण झालेले सामाजिक कामाचे मॉडेल, आजच्या तरुणाईला जवळचे वाटण्याची अधिक शक्यता आहे.

मागच्या महिन्यात सातारा जिल्ह्यातील परिवर्तनवादी लोकांची एक बैठक झाली. मी स्वत: हजेरी लावलेली अशा स्वरूपाची ही तिसरी/चौथी बैठक असेल. मला कळायला लागले तेव्हापासून दर सहा महिन्यांतून अथवा वर्षातून अशी एखादी तरी बैठक महाराष्ट्रात कुठे ना कुठे होतच असते. ‘बहुतांश बैठकींमध्ये तेच तेच चेहरे आणि तेच तेच विषय’ अशी या बैठकींविषयी माझ्या मनात प्रतिमा निर्माण झाली आहे. साताऱ्यामधील ही बैठकदेखील त्याला अपवाद नव्हती.

तरुण वर्ग कोणत्याही परिवर्तनवादी चळवळीचा कणा समजला जातो. या वर्गाचे प्रतिनिधी म्हणावेत असे आम्ही दोन-चारच तरुण ह्या बैठकीला हजर होतो. अशा बैठकीतून बाहेर पडताना मानसिकता कशी भारावलेली आणि जोशपूर्ण पाहिजे; पण खरे सांगायचे तर त्या बैठकीतून बाहेर पडताना माझे मन एका कंटाळवाण्या भावनेने भरलेले होते. मी विचार करू लागलो, ‘माझी कौटुंबिक पार्श्वभूमी समाजपरिवर्तनाच्या चळवळीशी निगडित असताना आणि मला स्वत:ला अशा कामाशी जोडून घेण्याची प्रामाणिक इच्छा असताना, हे असे का व्हावे?’ माझ्या मनात बैठकीतून बाहेर पडताना असाही एक विचार चमकून गेला, की ‘मलाच जर हे कंटाळवाणे वाटत असेल तर इतर तरुणाईचे काय?’ मग मला जाणवले, ‘समाजपरिवर्तनाच्या चळवळींकडून आजच्या तरुणाईबद्दलच्या आकलनात काहीतरी मोठी गल्लत होते आहे.’

आजचा तरुणवर्ग नक्की कसा आहे आणि आपल्या आजुबाजूच्या समाजवास्तवाकडे तो कोणत्या नजरेने बघतो, हे अधिक सजगपणे समजून घेणे, सर्वच परिवर्तनवादी चळवळींच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्या अंगाने चर्चेला तोंड फुटावे म्हणून काही मुद्दे मांडणे हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

आजच्या तरुणाईचा खरा प्रतिनिधी कोण, हे ठरवणे नक्कीच सोपे नाही. बाईकवरून फिरणारा, मॉल्समध्ये खरेदी करणारा, मल्टिप्लेसमध्ये सिनेमा बघणारा आणि परदेशी नोकरीची संधी शोधणारा शहरी तरुण?... की ज्याची पहिली पिढी कॉलेजची पायरी चढते आहे, शिकून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याचे ज्याचे स्वप्न आहे; पण स्वत:च्या गावाशी असलेली त्याची नाळ अजून तुटलेली नाही, असा ग्रामीण-निमशहरी तरुण? राजकीय पुढाऱ्यांच्या पुढेमागे करणारा,रस्त्यावर राडे करायला उतरणारा आणि कशाशीही बांधिलकी न मानणारा तरुणवर्ग?... की टोकाच्या प्रांतिक अथवा धार्मिक आयडेंटिटीपासून जो दूर आहे, स्वत:चे स्थिरस्थावर आयुष्म ज्याला हवे आहे; पण तरीदेखील ज्याला प्रामाणिकपणे स्वत:पलीकडे बघण्याची इच्छा आहे असा तरुण? ह्यांतील एकच समूह आजच्या तरुणाईचा प्रतिनिधी म्हणून सांगणे अवघड आहे आणि अयोग्यदेखील.

असे असले, तरी आजच्या तरुणाईची स्वत:ची काही लक्षणे निश्चितच आहेत आणि त्यातील पहिले आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यांना पडलेले सुखी मध्यमवर्गीय आयुष्याचे स्वप्न! भले, मग तो तरुण शहरी असो अथवा ग्रामीण, त्याच्या एक गोष्ट पक्की लक्षात आली आहे, की ‘आपण जर पुरेसे कष्ट केले आणि आपल्या बुद्धीला थोडाफार ताण दिला, तर आपण निश्चितच ह्या देशातील सुखी मध्यमवर्गात जाऊ शकतो.  ह्यासाठी कोणतीही व्यवस्था बदलायची गरज नाही. फक्त येनकेनप्रकारेण आपण स्वत: तिथे पोहोचले म्हणजे झाले.’ त्यामुळेच ‘जग बदल घालूनी घाव’ किंवा ‘आता उठवू सारे रान’ ह्याची त्याला गरज नाही. वर्गसंघर्षाची आणि वर्णसंघर्षाची भाषा त्याच्यापासून कोसो दूर आहे. हे योग्य की अयोग्य, ते जरा बाजूला ठेवू; पण ज्या विचारांना धरून ह्या समाजातील एक पिढी समाजपरिवर्तनाच्या चळवळीत उतरली, तो विचार, ती भाषा आजच्या तरुणाईची नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे!

आजच्या तरुणाईचे दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ती ‘प्रॅक्टिकल’ आहे. तत्त्वसैद्धांतिक गप्पांपेक्षा त्यांचे व्यवहारातील वर्तनाकडे जास्त लक्ष आहे. त्यामुळे तात्कालिक प्रश्न प्रभावीपणे सोडविण्याची क्षमता असलेला बराक ओबामा, अथवा तसे स्वप्न दाखविणारा राज ठाकरे त्यांना जवळचा वाटतो.

‘आक्रमकता’ हा तारुण्याचा स्थायीभाव आहे. त्यामुळे ‘आजचा तरुण आक्रमक आहे’, ह्यामध्ये फारसे काही नवल नाही. त्याच्या आक्रमकतेला विधायक वळण देणारे अवकाशच.

उपलब्ध नसल्याने, तो स्वाभाविकपणे प्रांतीयतेकडे आणि धार्मिकतेकडे वळताना दिसत आहे.

आजच्या तरुणाईचे थोडेसे वेगळे, तरी देखील अत्यंत महत्त्वाचे लक्षण म्हणजे ‘आधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे प्रचंड आकर्षण’. इंटरनेट, मोबाईल, चॅटिंग, ब्लॉग हे सगळे त्मांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. तंत्रज्ञानाचे अमर्याद फायदे ते उपभोगत आहेत; त्यामुळे तंत्रज्ञानाला विरोध करणारी भाषा त्यांना आपली वाटत नाही.

आजच्या तरुणाईची भाषा समजण्यासाठी आमच्या काळाचा संदर्भ देखील समजून घेणे आवश्यक आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात जन्मलेले आम्ही सगळे तरुण, जागतिक रंगमंचावरील अत्यंत वेगवान घटनाक्रमांचे साक्षीदार आहोत. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्रांतीने संपूर्ण जगाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. गेली अनेक शतके ज्या गोष्टी मानवाला अशक्य वाटत होत्या, त्या आता कॉम्प्युटरच्या एका क्लिकमध्ये होऊ लागल्या आहेत. जगभरात झपाट्याने घडून आलेल्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेने सर्व आसमंत व्यापून टाकलेला आहे. मानवाच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरू शकणारा मूलतत्ववाद आणि दहशतवाद यांचा वाढता प्रभाव, ग्लोबल वॉर्मिंगसारख्या नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार यांचा एक मोठा संदर्भ आमच्या कालखंडाला आहे. एखाद्या संपूर्ण पिढीवर गारुड टाकणाऱ्या प्रभावशाली सामाजिक नेतृत्वाचा अभाव, हा देखील आमच्या कालखंडाचा एक महत्त्वाचा संदर्भ! भारताच्याच काय पण जगाच्या रंगमंचावरदेखील ज्याच्यामागे ध्येयधुंद होऊन जावे, असे नेतृत्व गेल्या दोन-तीन दशकांत झालेले नाही. एका बाजूला अतिशय झपाट्याने बदल घडून येणारा आणि आकलनास अवघड असा कालखंड आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याला दिशादर्शक ठरणाऱ्या तत्त्वप्रणाली व नेतृत्वाचा अभाव, अशी कोंडी आजच्या तरुणपिढीची आहे.

समाजपरिवर्तनाच्या ज्या चळवळी आम्ही बघितल्या, अथवा ज्यांच्याविषयी वाचले/ऐकले, त्यांचा एक मोठा नकारार्थी ठसा आमच्या मनावर आहे.  25 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांना हे विधान अधिक लागू आहे. नीतीच्या आणि न्यायाच्या प्रश्नावर चळवळ करणारे डावे पक्ष, प्रत्यक्षात मात्र वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी भांडताना आणि असंख्य वेळा फुटताना आम्ही पाहिले. बहुजनांच्या सामाजिक न्यायासाठी उभी राहिलेली आंदोलने भ्रष्ट होताना आम्ही पाहिली. रिपब्लिकन पक्षाचे हास्यास्पद होणे देखील आम्ही पाहिले. कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी चालविल्या गेलेल्या चळवळी आणि त्यांचे नेते कसे भ्रष्ट आणि संदर्भहीन झाले, ते देखील आम्ही पाहिले. मग समाजपरिवर्तनाच्या चळवळींपासून आजचा तरुण अलिप्त रहात असेल तर त्याला निष्क्रियता म्हणावी की व्यावहारिक शहाणपण, ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सोपे नाही!

समाजपरिवर्तनाच्या चळवळींनी कार्यकर्त्याकडून कायमच असीम त्यागाची मागणी केली. एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये घरातील एका मुलाने समाजकार्याला वाहून घेणे शक्य होते. कुटुंबातील इतर सदस्य त्याच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडू शकत होते. सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये प्रत्येक तरुणाला स्वत:च्या कुटुंबाचा भार स्वत:च्या खांद्यावर वाहावा लागतो. अशा वेळी असीम त्यागाची भाषा व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता बनण्याचे पूर्वीच्या जमान्यातील ‘मॉडेल’ बदलण्याची वेळ आली आहे का, हे पण तपासून बघितले पाहिजे. ठराविक लोकांच्या अमर्याद त्यागापेक्षा अनेक जणांच्या थोड्या-थोड्या त्यागावर निर्माण झालेले सामाजिक कामाचे मॉडेल, आजच्या तरुणाईला जवळचे वाटण्याची अधिक शक्यता आहे.

वरील पार्श्वभूमीवर आजच्या तरुणाईचे सुप्तावस्थेत असणे, हे सकारात्मक पद्धतीने देखील बघता येऊ शकते. समाजपरिवर्तनाच्या तत्त्वज्ञानामध्ये आणि काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदलाची आत्यंतिक गरज असलेला हा कालखंड आहे. समाजाला नवी दिशा देणाऱ्या सर्जक अशा नवचिंतनाची आज गरज आहे. अशा वेळी तरुणाईच्या वर्तनापेक्षा तारुण्याच्या अर्थावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर पालकांपासून म्हणजेच सामाजिक पातळीवर आपल्या पूर्वसुरींपासून स्वत:चे वेगळेपण प्रस्थापित करणे, हाच तारुण्याचा सगळ्यांत महत्त्वाचा अर्थ! ह्या पातळीवर कोणत्याही पिढीतील तरुणाई एकमेकांपासून वेगळी असूच शकत नाही.

तारुण्याच्या ह्या अर्थावर आपण विश्वास ठेवला, तर प्रश्न तुलनेने सोपे होतील. आजच्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीला स्वत:ची भूमिका जरा बदलावी लागेल. तरुणांशी संवाद करण्यासाठी त्यांना पुढाकार घ्यावा लागेल, आणि मोठ्या मनाने आजच्या तरुणाईचे भावविश्व समजून घ्यावे लागेल. त्यांना स्वत:चे नवचिंतन करण्यासाठीचे अवकाश उपलब्ध करून देणे, हे समाजपरिवर्तनाच्या चळवळींसमोरचे मोठे आव्हान आहे. असीम त्याग न करता सुद्धा चळवळींशी तरुणाईला जोडून घेता येईल अशा जागादेखील निर्माण कराव्या लागतील, आणि ह्या सगळ्याला वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात नैतिकतेने वागण्याच्या निर्धाराची जोड द्यावी लागेल. हे सगळे करण्यात आपण कमी पडलो, तर नक्कीच आजचा तरुण एकतर आक्रमक धर्मवाद/जातवाद/प्रांतवादाचा समर्थक बनेल; किंवास्वयंमग्नतेच्या वाटेने चालू लागेल; आणि आपण मात्र समाजपरिवर्तनाची चळवळ प्रभावहीन का होत आहे, ह्या विषयी निरस बैठका परत परत घेत राहू.

(कराड येथून एम.बी.बी.एस. आणि पुणे येथून एम.डी. (सायकियॅट्रिस्ट)झालेला हमीद दाभोलकर सातारा येथे ‘मानसोपचारतज्ज्ञ’ म्हणून काम करीत आहे आणि ‘विवेकवाहिनी’ या तरुणांच्या संघटनेतही कार्यरत आहे.)

Tags: मानसोपचारतज्ज्ञ कार्यकर्ता विवेकवाहिनी anarchy corruption दिशाहीन तरूणाई. No Leader विस्कटलेल्या चळवळी गोंधळलेली पिढी समाजनेतृत्वाचा अभाव तरूणाई समाजपरिवर्तन हमीद दाभोलकर Change in society Vivekvahini meeting confusion Younge generation youngster change in Society psychiatrist Hamid dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दाभोलकर,  सातारा
hamid.dabholkar@gmail.com

मनोविकारतज्ज्ञ असलेले हमीद दाभोलकर हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व साधना साप्ताहिक यांच्याशी निगडित आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके