डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रा. रमेश शिपूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या वतीने, निपाणी (जि. बेळगाव) येथे गेल्या दहा वर्षांपासून समाजमनाला भिडणाऱ्या एखाद्या विषयावर दरवर्षी एक व्याख्यान आयोजित केले जाते. या वर्षी, 1 जून 2010 रोजी ‘समाजाचे मन आणि मनातला समाज’ या विषयावर, मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले संपूर्ण भाषण प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक  

शिपूरकर कुटुंबीय, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!

‘डोक्यावरचे केस पांढरे व्हायला लागल्याशिवाय कुणालाही वक्ता म्हणून बोलवायचे नाही’ असा आपल्याकडे अलिखित नियम आहे! त्या नियमाला अपवाद करून आपण माझ्यासारख्या तरुण वक्त्याला भाषणासाठी बोलावले आहे, ते देखील वैचारिक मांडणी करायला, याबद्दल मी सुरुवातीलाच आपले आभार मानतो. प्रा. रमेश शिपूरकर व माझी प्रत्यक्ष भेट होण्याचा प्रसंग जरी आला नसला तरी माझे वडील नरेंद्र दाभोलकर यांचा आणि त्यांचा जवळचा स्नेह होता. आपल्याकडे माणसांना शिक्के मारून कुठल्या तरी कंपूमध्ये टाकण्याची पद्धत आहे. त्यानुसार प्रा. शिपूरकर समाजवादी होते. बाबांच्या बोलण्यातून त्यांचे जे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते त्यानुसार मला असे वाटते की प्रा. शिपूरकर ‘पोथीनिष्ठ समाजवादी’ नव्हते. समाजवादाच्या चौकटीच्या अलीकडे-पलीकडे देखील जे मानवी जीवन आहे त्याविषयी त्यांना आस्था होती. त्यामुळेच आज मी आपल्याशी ज्या विषयावर संवाद साधणार आहे त्याबद्दल त्यांना अगत्य वाटले असते असा विश्वास वाटतो.

‘समाजाचे मन आणि मनातील समाज’ ह्या विषयावर मी आज आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. ‘मन’ ह्या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून आपण हा संवाद पुढे नेणार आहोत. गेल्या दहापंधरा वर्षांत आपल्या सर्वांचे दैनंदिन आयुष्य अत्यंत धकाधकीचे झाले आहे. ‘टेन्शन’, ‘स्ट्रेस’, ‘ताणतणाव’ हे परवलीचे शब्द झाले आहेत. त्याला अनेक कारणे सांगता येतील. पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा वाढलेला वेग, अनेक उपलब्ध संधींमधून योग्य संधी निवडण्याचे दडपण आणि त्याचबरोबर टोकाची स्पर्धा ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे एक तणावाची आणि गोंधळाची स्थिती आपल्या सर्वांच्याच अनुभवाला येते आहे.

आपले मन अस्वस्थ आहे. सामाजिक पातळीवर देखील कमीअधिक फरकाने हेच वास्तव आहे. सर्व समाज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत घुसळून निघतो आहे. मोबाईल, इंटरनेट आणि केबलच्या वाढत्या प्रभावाने आपल्या आयुष्याला प्रचंड वेग आलेला आहे. भ्रष्टाचार आणि हिंसाचार ह्या दोन सार्वजनिक रोगांचा वेगाने होणारा फैलाव, तसेच धार्मिक आणि प्रांतिक अस्मिता प्रखर होण्यासाठी काम करणाऱ्यांचे सार्वजनिक जीवनात वाढणारे प्रस्थ हे देखील आजच्या समाजजीवनाचे महत्त्वाचे संदर्भ आहेत. आणि या सगळ्याच्या पलीकडे लोकशाही समाजातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट असलेल्या लोकप्रतिनिधींची ढासळलेली नीतीमत्ता, त्यांचे भ्रष्ट होणे आणि समाजाप्रती काहीही उत्तरदायित्व न मानता केवळ स्वत:च्या स्वार्थाच्या प्रेरणेने होणारी वर्तणूक या सर्व गोष्टींमुळे आपले समाजमन अस्वस्थ आहे. त्यामुळे एका बाजूला व्यक्तिगत पातळीवर अस्वस्थ असलेले आपले ‘स्वत:चे मन’ आणि दुसऱ्या बाजूला अस्वस्थ असलेले ‘समाजमन’ ह्यांच्या अस्वस्थतेचा आधुनिक मानसशास्त्राच्या मदतीने अन्वय लावण्याचा हा प्रयत्न आहे.

केवळ अर्थ लावण्यापाशी न थांबता, त्या अर्थाधून ह्या परिस्थितीला बदलण्यासाठीच्या काही विचार आणि कृतिकार्यक्रमाचा शोध घेता येतो का, हे देखील ह्या संवादाचे एक प्रयोजन आहे. हे सर्व आपण ज्या मानवी मनाच्या माध्यमातून करणार आहोत ते ‘मन’ म्हणजे नक्की काय चीज आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ या! मानवी इतिहासातील अनेक शतके मानवी मनाचा अभ्यास हा साहित्यिकांचा आणि तत्त्ववेत्यांचा प्रांत मानला जात होता. गेल्या दोन-पाच दशकांध्ये मात्र मनाचा अभ्यास विज्ञानाच्या प्रांतामध्ये आला आहे. मराठीतील मान्यवर कवी सुधीर मोघेंच्या प्रसिद्ध ओळी आहेत - ‘मन मनास उमगत नाही. आधार कसा शोधावा? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा?’ मनाला कवी धुक्याची उपमा देतात आणि नुसते धुके नाही तर स्वप्नातील धुके म्हणजे पकडीत यायला आणखीनच अवघड! असे असताना आपण मात्र त्या मनाच्या आकलनातून स्वत:च्या अंतरंगाचा आणि आपल्या बाह्यपरिस्थितीचा अर्थ  लावू बघतो आहोत!

आज आपल्याला ही किमया साध्य होऊ शकते ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही दशकांध्ये विज्ञानाच्या साहाय्याने मानवी मनाचे आपल्याला बऱ्यापैकी आकलन झाले आहे. त्यामुळे समाजाच्या मनाकडे जायच्या आधी आपण जरा स्वत:च्या मनामध्ये डोकावून बघू या आणि त्यामध्ये डोकावून बघण्यासाठी, माणसाचे मन शरीरात नक्की कुठे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. मी तुम्हांला जर म्हणालो की, मानवी मनाचे चित्र काढा बघू, तर माझी खात्री आहे तुच्यातील 50 टक्के लोक हृदयाचे चित्र काढतील. कुणी म्हणतील ती अमूर्त संकल्पना आहे, म्हणून त्याचे चित्रच काढता येणार नाही. आणि 10 ते 20 टक्के लोक मेंदूचे चित्र काढतील.

विज्ञानाने हे आता निर्विवादपणे सिद्ध केले आहे की, माणसाचे मन हे त्याच्या मेंदूत असते. मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्या रचनेचे कार्य आहे. मेंदूत असलेल्या असंख्य चेतापेशींमधील संदेशवहनाद्वारे आपले मन साकारत असते. तर मनाचा शोध घेत आपण मेंदूपर्यंत आलो. माणसाचा मेंदू हे एक अजब रसायन आहे, भूतलावरील इतर सर्व प्राण्यांपासून माणसाचे जे वेगळेपण आहे ते ह्या मेंदूमुळे! मानवी संस्कृतीचा इतिहास उण्यापुऱ्या दहा हजार वर्षांचा आहे. त्याच्या आधी कित्येक शतके ह्या पृथ्वीतलावर अनेक प्राणी निवास करीत आहेत. छोट्या मधमाशीपासुन अजस्र हत्तीपर्यंत अनेक उदाहरणे घेता येतील. या प्राण्यांनी स्वत:चे आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलन करून आपल्या समूहाचा विकास केला असे आपण ऐकले आहे का हो? उदा. अलीकडच्या मधमाशा एक लाख वर्षांपूर्वीच्या मधमाशांपेक्षा कमी वेळेत आणि अधिक मध तयार करतात असे काही घडलेले नाही, किंवा मधमाशांची एक क्षमाशील उपजाती निर्माण झाली आहे, जी त्यांना इतर कुणी त्रास दिल्यास पहिल्यांदा क्षमा करते आणि परत त्रास दिल्यासच चावते असे देखील घडलेले नाही. परंतु माणसाच्या बाबतीत मात्र हे झालेले आहे.

आधी जंगलात गुहेत राहणारा माणूस आज चंद्रावर वसाहत करण्याची स्वप्ने पाहतो आहे. सुरुवातीला आगीला घाबरणारा माणूस आज त्या आगीचा वापर स्वत:च्या गरजेनुसार करतो आहे. माणसाने स्वत:मध्ये प्रगती घडवून आणल्याची, बाह्य परिस्थितीवर स्वत:चे स्वामित्व प्रस्थापित केल्याची एक ना अनेक उदाहरणे सांगता येतील. हे फक्त त्याच्या बाह्य परिस्थितीविषयीच नाही तर अंतरंगाविषयी देखील खरे आहे. ‘स्वार्थ आणि स्वहित’ही आपली आदिम प्रेरणा असली तरी मानवी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या कुटुंबीयांसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी, देशासाठी हसत हसत मरण स्वीकारणाऱ्या अनेक ‘भगतसिंगां’ची उदाहरणे आहेत आणि न्यायाच्या व नीतीच्या आग्रहापुढे स्वत:च्या आयुष्याचे मोलही थोडे वाटणारे ‘सॉक्रीटस’ देखील अनेक आहेत.

जाणीवपूर्वक स्वत:च्या अंतरंगाचा विकास करणे, स्वत:च्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणे ह्या अक्षावर देखील मानव प्राण्याने मोठ्या प्रमाणात उन्नती केली आहे. ह्या बाह्य प्रगतीचे आणि आंतरिक उन्नतीचे सर्वांत महत्त्वाचे अधिष्ठान आपला मेंदू आहे. त्यापेक्षा ठोस सांगायचे झाले तर ज्याला शरीर विज्ञानाच्या भाषेत निओ कॉरटेक्स (Neo Cortex) म्हणतात, तो विचारांचा मेंदू माणसांत आहे. इतर प्राण्यांध्ये देखील मेंदू आहे पण तो फक्त भावनांचा आहे, त्याला लिंबिक कॉरटेक्स (Limbic Cortex) म्हणतात. माणसामध्ये ह्या भावनांच्या मेंदूवर विचारांचा मेंदू उत्क्रांत झाला आहे आणि ह्या निओ कॉरटेक्सने आपल्याला विचार- विवेकाची सर्वांत महत्त्वाची क्षमता दिली आहे. त्या क्षमतेच्या माध्यमातून आपण प्राप्त परिस्थितीचे निरीक्षण करू शकतो, तिचे आकलन करण्यासाठी काही सिद्धांत मांडू शकतो, ते सिद्धांत तपासून पाहू शकतो.

आपल्या मनातला अथवा मेंदूतला हा ‘विचार विवेकच’ आपल्याला योग्य-अयोग्यचे भान देतो. आपल्याकडून चूक झाल्यास अपराधीपणाची बोच देतो. स्वत: पलीकडे समाजाच्या अस्तित्वाची जाणीव देतो आणि समाजाच्या प्रश्नांविषयी सजग देखील करतो. म्हणजे मानवी मनाचा शोध घेता घेता मेंदूच्या वाटेने आपण स्वत:च्या विचार-विवेकाकडे आलो आहोत, जो खरे तर स्वत:च्या आणि समाजमनातील अस्वस्थता समजून घेण्यास आणि ती हाताळण्यासाठी आपला सर्वांत जवळचा मित्र आहे. आता विचारविवेकाच्या साह्याने हे करायचे ठरवले तर मनातील सर्व भावनांचे सपाटीकरण करायचे का, असा पुढचा प्रश्न येतो. त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.

आपल्या मनात जशा राग, मद, मोह, मत्सर अशा नकारार्थी भावना असतात; तशाच प्रेम, सहकार्य, दया, आस्था अशा होकारार्थी भावनाही असतात. त्यामुळे नकारार्थी भावनांना विचारांची वेसण घालतानाच होकारार्थी भावनांची वृद्धी करण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील महत्त्वाचे ठरते. व्यक्तीच्या मनाचा शोध घेत घेत आपण बरेच खोल पाण्यात उतरलो. आता जरा समाजमनाचा वेध घेऊ यात. घाबरू नका! मी तुम्हांला समाजमनाचे चित्र काढायला सांगणार नाही. कारण ते नक्की कुठे असते ते मला देखील सांगता येणार नाही. परंतु तर्काच्या साहाय्याने त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. एवढेच नव्हे तर त्या समाजमनाचा प्रभाव आपल्याला अर्थकारणापासून-राजकारणापर्यंत सर्वत्र जाणवतो. काही उदाहरणे पाहू या.

ह्या देशामधील समाजमनाला पंधरा वर्षांपूर्वी एकदा असे वाटले की उत्तर प्रदेशमधल्या एका ठराविक जागी रामाचे मंदिर बांधणे हा ह्या देशासमोरचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर देशाच्या राजकारणाने कूस बदलली आणि भाजप सत्तेवर आला. दुसरे उदाहरण बघू - मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. इथल्या समाजमनाला वाटले की, हा आपल्या देशाच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. लोक रस्त्यावर उतरले, समाजमनाची अस्वस्थता राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. पण दुसऱ्या बाजूला, गेल्या तीन महिन्यांमध्ये माओवाद्यांनी शेकडो जवान आणि सामान्य नागरिक मारले. समाजमन म्हणावे तितके हलले नाही. त्यांना तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेवरचा हल्ला वाटला नाही. पुढे बघू या, ह्या देशामधील वेगवेगळ्या प्रांतांधील शेतकऱ्यांना थोड्याअधिक काळाच्या फरकाने असे वाटले की, आपला कोणी वाली नाही, आपल्याला काही आधार नाही, जगण्यापेक्षा मरणे बरे. आणि आपल्या देशात लाखभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तेच शाळकरी मुलांबद्दल देखील कमीअधिक फरकाने होताना आपण पाहतो आहोत.

जरा मागे जाऊन स्वातंत्र्यपूर्व काळात डोकावून बघितले तर असे दिसेल की, ह्या देशातील एका पिढीला असे वाटले की, स्वत:च्या वैयक्तिक आणि कौटुंबिक सुखाच्या  पलीकडे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे आहे. आणि मग ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, ती राज्यसत्ता उलथून गेली. आज आमच्या पिढीला असे वाटते की फक्त ‘आपण आणि आपले’ ह्या पलीकडे कशाला बघायचे? तर आमचे समाजकारण आणि राजकारण गढूळ झाले आहे. व्यक्तीच्या मनाचा तळ काढणे आपल्याला जरा तरी जमले. साहित्यिक आणि तत्त्वज्ञांच्या प्रांतातून आपण ते विज्ञानाच्या प्रांतात आणले, पण ह्या समाजमनाचा तळ काढणे आपण फक्त द्रष्ट्या नेत्यांवर अवलंबून ठेवले आहे. आणि सांप्रत काळी असे कोणी द्रष्टे नेते आसमंतात नसल्याने आपल्या भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या हातांत दिले आहे.

आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक गोष्टी घडवण्याचे अथवा बिघडवण्याचे सामर्थ्य या समाजमनामध्ये आहे. म्हणून त्याविषयी आपण जरा समजून घेतले पाहिजे. दुर्दैवाने मानवी मनाच्या अभ्यासातून त्याच्याविषयी आज जशी स्पष्टता येऊ लागली आहे, तितकी स्पष्टता समाजमनाच्या बाबतीत नाही. पण माझा असा अंदाज आहे की एका बाजूला व्यक्तीचे मानसशास्त्र, दुसऱ्या बाजूला मेंदूचे विज्ञान आणि तिसऱ्या बाजूला समाजशास्त्र ह्यांमध्ये सध्या होणाऱ्या संशोधनामुळे समाजमन देखील येत्या पन्नास-शंभर वर्षांमध्ये शास्त्राच्या आवाक्यात येऊ शकेल. परंतु तोपर्यंत समाजमन कसे निर्णय घेते? कुठल्या निर्णयावर ते कृती करते? सामूहिक हित/अहित ते कसे ठरवते? हे समजण्यासाठी आपण मानवी मनाच्या अभ्यासात जे शिकलो त्याचा वापर करून पाहू.

जसा मानवामध्ये नकारार्थी भावनांना प्राधान्य असलेला एक प्रांत असतो तसाच तो समाजमनामध्ये देखील असतो. ‘भारतामध्ये हिंदू धर्माची गळचेपी होत आहे!’ ‘महाराष्ट्रात मराठी माणूस राहिलाच कुठे? त्याची सर्व कामे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी पळवली!’ अशा स्वरूपाच्या भावनिक आवाहनांना समाज मनाचा हा भाग प्रतिसाद देत असतो. ह्याच्याशी खेळ खेळण्याच्या कलेमध्ये बऱ्याच राज्यकर्त्यांनी तज्ज्ञता मिळवलेली आहे. समाजमनातील ह्या भागाला कसे चुचकारायचे आणि लोकांना रस्त्यावर कसे उतरवायचे ह्याचे चांगले कौशल्य ह्या राज्यकर्त्यांना अवगत असते. समाजातील विध्वंसकतेला खतपाणी घालणारा हा भाग समाजमनामधील आहे. दुसरा भाग, स्वाभाविकपणे ‘सकारात्मक भावनांचा’ असतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्याला ह्या समाजमनाचा अनुभव येतो. कुठे भूकंप झाला, त्सुनामी झाली की जगाच्या कानाकोपऱ्यातून मदत येते. समाजमनाच्या विधायकतेचा आविष्कार होतो. 

समाजमनामध्ये स्वत:चा म्हणून एक विवेकदेखील असतो. समाजमनामधला हा विवेक ह्या देशाच्या राजकारणाचे संपूर्ण धार्मिकीकरण होऊ देत नाही. राज्यामध्ये प्रांतिक शक्तींना विरोध करतो. ‘राळेगणसिद्धी’ किंवा ‘हिवरे बाजार’ यांसारखी आदर्श गावे निर्माण करण्याचे शहाणपण दाखवतो. त्याच समाजमनातील विवेकाची कास धरून साताऱ्यासारख्या जिल्ह्यातील गावेच्या गावे ‘निर्मल’ होतात. असे असले तरी हा समाजमनातील विवेक त्याच्या असण्यापेक्षा नसण्याने जाणवण्याचे सध्याचे दिवस आहेत. समाजमनामधील हा विवेक जागवायचा कसा? आणि त्याही पुढे जाऊन कृतिशील करायचा कसा? असे यक्ष प्रश्न आज आपल्यापुढे उभे आहेत. सकारात्मक भावना आणि विचार-विवेकाच्या अभावाने ग्रस्त पडिक मने हा आपल्या देशामधला अत्यंत मोठा प्रश्न आहे.

आपल्याला जर समाजमन विवेकी करायचे असेल तर त्याला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींविषयी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मानसशास्त्रात ‘इमोशनल इन्टेलिजन्स’ आणि ‘सोशल इंटेलिजन्स’ या क्रांतिकारी संकल्पना मांडणारा डॅनियल गोलमन या प्रवृत्तींना ‘डार्क ट्रायड’ (Dark Triad) असे म्हणतो. त्यातल्या पहिल्या प्रवृत्तीला मानसशास्त्राच्या परिभाषेत नार्सिसिझम (Narcissism) म्हणजेच टोकाचा स्वयंकेंद्रितपणा असे म्हणतात. अशा व्यक्तींचा अमर्याद पैसा, सत्ता, प्रतिष्ठा आणि त्यामधून स्वत:ला मिळणारे मोठेपण हा एकमेव अजेंडा असतो. स्वत:च्या पलीकडे समाजच काय पण स्वत:चे कुटुंबीय देखील अशा व्यक्तींना दुय्यम वाटतात. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये नार्सिससची कथा आहे. ह्या नार्सिससने तळ्यातील पाण्यामध्ये एकदा स्वत:चे प्रतिबिंब पाहिले व त्या प्रतिबिंबाच्या तो इतका प्रेमात पडला की तहानभूक हरपून तो केवळ स्वत:चे प्रतिबिंबच निरखत बसला आणि त्यामध्येच त्याचा अंत झाला. उदाहरणामधून जर ही प्रवृत्ती आपल्याला समजून घ्यायची असेल तर देशाच्या पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आपल्या काही राष्ट्रीय नेत्यांची नावे नजरेसमोर आणा. स्वत:पलीकडे फारसे काही न दिसणाऱ्या अनेकांची तिथे मांदियाळी दिसून येईल.

दुसऱ्या प्रवृत्तीला मानसशास्त्राच्या परिभाषेत समाजविघातक व्यक्तिमत्त्व (Antisocial Personality) असे म्हणतात. अगदी लहानपणापासूनच ह्या प्रवृत्तीच्या लोकांचा समाजाचे नियम मोडण्याकडे कल असतो. शाळेतून पळून जाण्यापासून ते रस्त्यावरचा सिग्नल तोडण्यापर्यंत आणि छोट्या-मोठ्या मारामारीपासून ते खून दरोड्यापर्यंत अनेक गोष्टी ह्या प्रवृत्तीची माणसे करीत असतात. पण गमतीचा भाग असा की जसा ह्या व्यक्तींमध्ये समाजाच्या हित- अहीताचा फारसा विचार केला जात नाही, तसाच स्वत:च्या स्वार्थाचा देखील व्यवस्थित विचार त्यांच्याकडून केला जात नाही. त्यामुळे बहुतांश वेळा ह्या समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्ती चुकीच्या गोष्टी करतात आणि पकडल्या देखील जातात. ह्या ‘डार्क ट्रायड’मधील सर्वांत धोकादायक प्रवृत्तीला ‘Machiavallenism’ असे म्हणतात, त्याला मराठी प्रतिशब्द मला माहीत नाही.

समाजविघातक प्रवृत्ती आणि चातुर्य ह्यांचे अत्यंत धोकादायक मिश्रण ह्या व्यक्तिमत्त्वामध्ये असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, आपल्या महाराष्ट्राच्या ‘जाणत्या राजा’चे देता येईल. सर्व काही करूनसवरून ते कायमच नामानिराळे राहतात. समाजमन विवेकी बनवण्यासाठी सगळ्यांत मोठा धोका ह्या प्रवृत्तीचा असतो. आता ह्या तीन प्रवृत्तींच्या मनामध्ये विवेक घालायला निसर्ग विसरला की ह्या लोकांनी स्वत:च त्यांच्या मनामधील विवेकाची बोच मारून टाकली, हा एक मोठाच प्रश्न आहे. पण ह्या तिन्ही प्रवृत्ती जेव्हा समाजात हातमिळवणी करतात तेव्हा काय घडू शकते ह्याचे अगदी चांगले उदाहरण म्हणजे आपल्या देशातील आजचे राजकारण होय.

समाजसत्तावाद असो वा भांडवलशाही, याच तीन प्रवृत्तींची माणसे तिच्या ऱ्हासाला कारणीभूत होतात. समाजसत्तावादात ती स्टॅलिनशाहीच्या नावाखाली येतात, तर  भांडवलशाहीत ते जागतिक मंदी आणून दाखवतात. या तीन स्वरूपाच्या व्यक्तींशी लढण्याची रणनीती हे मानवी संस्कृतीसमोरचे एक जबरदस्त आव्हान आहे आणि आपण जेव्हा ह्या प्रवृत्तींचे स्वत:च्या मनामधील अस्तित्व देखील मान्य करतो, तेव्हा हे आव्हान आणखीनच अवघड होते. मानवी मनापासून सुरू केलेली ही शोधयात्रा समाजमनाचा वेध घेत आपण समाजमनातील अपप्रवृत्तींपर्यंत आणली. जर आपले वास्तव हे असे आहे तर व्यक्तिगत आणि समाजाच्या पातळीवर ते बदलण्यासाठी आपण काय करू शकतो हा पुढचा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकतो.

मला याची नम्र जाणीव आहे की, ह्या परिस्थितीला सर्वंकष उत्तर देऊ शकेल अशी मांडणी करण्याइतकी पक्वता माझ्या आकलनाला नाही; तरी स्वत:च्या मनाला आणि समाजमनाला विवेकी बनवण्यासाठीची एक त्रिसूत्री तुच्यासमोर विचारार्थ ठेवतो. ती त्रिसूत्री अशी आहे - 1) विवेकी व्यक्तिमत्त्व, 2) समाजाभिमुख कर्तृत्व, 3) जागरूक नागरिकत्व. विवेकी व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, ते जरा समजावून घेऊ या. विवेकी व्यक्तिमत्त्वामधील पहिला भाग आहे नकारार्थी भावनांवर विचार-विवेकाच्या ‘रिमोट कंट्रोल’ने ताबा ठेवणे. ह्यालाच ‘विवेकनिष्ठ विचार पद्धती’ असे म्हणतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यात संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरलेल्या ताणतणावांचे नियोजन करण्यासाठी तर हे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर आपले स्वत:चे आयुष्य अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी देखील ते महत्त्वाचे आहे.

सध्याच्या काळामध्ये आपल्या समाजाची वाटचाल मात्र अगदी उलट्या दिशेने चालू आहे. वाढते ताणतणाव हाताळण्यासाठी स्वत:च्या विचारविवेकाची कास धरण्यापेक्षा कुठल्यातरी आध्यात्मिक बाबा-बुवाला शरण जाणे लोकांना सोपे वाटत आहे. धर्माच्या आणि जातीच्या संघटना त्यांना जवळच्या वाटत आहेत. हे घडणे म्हणजे स्वत:च्या भावनांचा रिमोट त्या आध्यात्मिक बाबा- बुवांच्या अथवा धार्मिक किंवा जातीच्या पुढाऱ्यांकडे देणे आहे. हा रिमोट कंट्रोल जर आपल्याला स्वत:च्या हातामध्ये ठेवायचा असेल तर आपल्याला विवेकनिष्ठ विचाराची ABC समजून घ्यावी लागेल. आपली अशी धारणा असते की, आपल्या मनाला आलेली अस्वस्थता म्हणजे ‘C’ (Consequence) ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेुळे म्हणजेच ‘A’(Activating event) मुळे आहे. पण प्रत्यक्षात ह्या A आणि C च्या मध्ये एक ‘B’ (Belief) असतो. म्हणजे त्या परिस्थितीविषयी आपण केलेला विचार.

जरा उदाहरणाच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.परीक्षेत नापास होण्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या करणे असा प्रसंग घेऊ. आपण असे म्हणतो की अमूक एका परीक्षेत नापास झाल्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. जर परीक्षेत नापास होणे ‘A’ (Activating event) मुळे मुलाची आत्महत्या हा परिणाम ‘C’ (Consequence) घडणार असेल तर नापास होणाऱ्या प्रत्येक मुलाने आत्महत्या केली पाहिजे. पण तसे घडताना दिसत नाही आणि तिथेच तर परिस्थितीविषयी ती व्यक्ती काय विचार करते त्याचा म्हणजे ‘B’ (Belief) चा संबंध येतो. ज्याच्या मनामध्ये नापास होणे म्हणजे सर्वस्व गमावणे असा विचार (B) असेल ती व्यक्ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेईल. पण ज्याच्या मनामध्ये आलेले अपयश ही एक नवीन संधी आहे असा विचार येईल तो जोमाने पुन्हा प्रयत्नांना लागेल. सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या मनामधील हा (Belief) आपण आपल्या विचार विवेकाच्या माध्यमातून तपासून बघू शकतो आणि बदलू देखील शकतो.

आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम म्हणून आपल्या मनात उफाळून येणारे (Automatic belief) प्रतिक्षिप्त भाव आपण जेव्हा तपासून बघू लागतो आणि त्यांची जबाबदारी स्वतःकडे घेऊन मार्गक्रमण करायचे ठरवतो तेव्हा विवेकी व्यक्तिमत्त्वाच्या दिशेने आपले पहिले पाऊल पडते. विवेकी व्यक्तिमत्त्व विकासामधील दुसरा महत्त्वाचा भाग आहे आपल्या मनातील सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निगराणी करण्याचा. त्यामुळे जीवनाला एक भावनिक ओलावा प्राप्त होतो. मुदीता, क्षमा, करुणा, अनसूया, प्रेम, आस्था ह्या त्या सकारात्मक भावना आहेत. मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणे. सर्वसामान्य माणसांइतकीच समाज परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनादेखील ह्या गुणाची फार आवश्यकता आहे. कारण त्यावरूनच ह्या चळवळी एकमेकांना सहकार्य करतात की एकमेकांचे पाय ओढतात हे ठरते.

ह्या प्रत्येकाच्या खोलात मी जाणार नाही, अन्यथा कुठल्यातरी आध्यात्मिक गुरूच्या प्रवचनाला आल्यासारखे तुम्हांला वाटेल. पण एवढेच सांगू इच्छितो की मानवी समूहामध्ये घडून येणारे कुठलेही परिवर्तन ह्या भावनांच्या पाठिंब्याशिवाय घडून येणार नाही आणि समजा घडून आलेच तरी ते टिकू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण बोललेच पाहिजे. आणि विवेकी व्यक्तिमत्त्वामधील शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे उपअंग आहे ‘सातत्याचे’. हे तुम्हांला कदाचित हास्यास्पद वाटेल, पण जर आपण संपूर्ण उत्क्रांतीचा पट पाहिला तर आपल्या असे लक्षात येईल की कुठलाही ठोस बदल व्यक्तींच्या किंवा समाजाच्या पातळीवर दिसून येण्यासाठी अनेक दशकांचा किंवा काही वेळा शतकांचा देखील कालावधी लागू शकतो. आणि आपली आयुष्ये तर एवढी-एवढीच असतात. त्यामध्येच जे काही असतील ते सर्व बदल आपल्याला घडलेले बघायचे असतात. परंतु हे उत्क्रांतीला मान्य नाही. त्यामुळेच ठरलेल्या दिशेने प्रवास करीत राहण्याचे सातत्य हे विवेकाचे उपअंग आहे असे मला वाटते.

विवेकी व्यक्तिमत्त्वाविषयी समजून घेतल्यावर आता समाजाभिमुख कर्तृत्व म्हणजे काय ते जरा समजून घेऊ या! आपल्या समाजमनाची अशी एक धारणा आहे की सामाजिक काम करणे म्हणजे टोकाचा त्याग आणि आहुती देणे होय. थोड्या लोकांच्या असीम त्यागापेक्षा अनेक लोकांच्या थोड्या थोड्या त्यागावर समाजाभिमुख कर्तृत्वाची संकल्पना उभारली आहे. ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक श्री. भानू काळे यांनी सांगितलेली एक आठवण ह्या संदर्भात तुम्हांला सांगावीशी वाटते. ते सांगतात, 1980च्या आसपास ‘माणूस’ किंवा ‘सत्यकथा’ अशा स्वरूपाच्या त्या काळातील एका प्रमुख नियतकालिकामध्ये एक पत्र आले होते. ‘आनंदवन’जवळ राहणाऱ्या  एका पोस्टमनच्या मुलाचे ते पत्र होते. त्या पत्रात लिहिले होते की ‘‘माझ्या वडिलांचे नुकतेच निधन झाले, पण त्यांच्या कार्याची कोणीही दखल घेतली नाही, माझ्या मते त्यांचे काम हे आनंदवनचे कर्मयोगी बाबा आमटे ह्यांच्या एवढेच महत्त्वाचे आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे आणि आपुलकीने लोकांना पत्रे वाटली. आपल्या कामात कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. घरात सण समारंभ अथवा आमची आजारपणे असतानादेखील कामात खंड पडणार नाही हे पाहिले. त्यामुळे समाजाने त्यांच्यादेखील कामाची दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे.’’

खरे म्हटले तर किती रास्त अपेक्षा आहे. पण अशा माणसांचे आपण समाज म्हणून सहसा कौतुक करत नाही. समाजामध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या चांगल्या कामांचे कौतुक करणारी संस्कृती आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला कर्तृत्व गाजवायचे असते. आपले कर्तृत्व समाजाला पुढे घेऊन जाते की मागे, ह्या विचाराने समाजातील अधिकांत अधिक लोकांना छळणे आवश्यक आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या क्षेत्रात आपण जर समाजाचा विचार करू लागलो तर अनेक छोटे-छोटे संघर्षाचे आणि त्यागाचे प्रसंग आपल्या आयुष्यात येतील आणि ह्या संघर्षामधून आणि त्यागामधूनच आपल्या देशामध्ये समाजाभिमुख कर्तृत्वाची संस्कृती रुजायला मदत होईल.

त्रिसूत्रीमधील सर्वांत महत्त्वाचा भाग ‘सुजाण नागरिकत्व’. स्वतःच्या मनातील विचार-विवेकाचे प्रतिबिंब समाजमनामध्ये पाडण्यासाठी लोकशाही हे अत्यंत अर्थपूर्ण माध्यम आज आपल्याला उपलब्ध आहे. सुजाण नागरिकत्वाची संकल्पना त्या माध्यमाचा प्रभावी आणि योग्य वापर करण्याशी संबंधित आहे. ‘लोकशाहीला पर्याय हा केवळ अधिक चांगली लोकशाही एवढाच असू शकतो’, अशा आशयाचे एक प्रसिद्ध विधान आहे. सुजाण नागरिकत्वाच्या माध्यमातून आपण सातत्याने अधिक चांगली लोकशाही घडवण्यासाठी कटिबद्ध राहू शकतो. मी तुम्हांला काही प्रश्न विचारतो, त्यावरून आपण ह्या देशाचे सुजाण नागरिक आहोत का, ह्याचा तुम्हांला अंदाज घेता येऊ शकेल.

ह्या प्रश्नांची तुच्या स्वतःच्या मनाशीच प्रामाणिक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. 1) आपण अठरा वर्षाचे झाल्यापासून आपल्या समाजात घडलेल्या ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या किती निवडणुकांध्ये न चुकता मतदान केले ? 2) आपल्या वॉर्डचा नगरसेवक किंवा गावचा सरपंच अथवा आपल्या आमदाराला आत्तापर्यंत आपण किती वेळा सामाजिक प्रश्नाविषयी भेटलो अथवा पत्र लिहिले ? 3) आपल्या भागामध्ये लोकशाहीदिन कुठे आणि कधी साजरा होतो, आपल्याला माहिती आहे का ? 4) माहितीच्या अधिकाराचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी वापर केला आहे का ? प्रश्नांची यादी कितीही वाढवता येईल. परंतु, ह्या प्रश्नांची तुम्ही मनोन खरी उत्तरे दिलीत तर आपल्या लोकशाहीची आजची जी स्थिती आहे ती का आहे याचे उत्तर आपल्याला आपोआपच मिळून जाईल.

राज्यकर्ते हे आपले पगारी नोकर आहेत आणि शक्य तितक्या व्यासपीठावरून त्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांचे समाजाप्रती उत्तरदायित्व निर्माण करणे हे सुजाण नागरिक म्हणून आपले अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे. ज्या देशामधील 40 ते 50 टक्के लोक मतदान करीत नाहीत आणि 60 ते 70 टक्के लोक ग्रामसभांना फिरकत नाहीत, तेथील लोकशाही प्रगल्भ होऊ शकणार नाही, हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. खरे तर ह्या त्रिसूत्रीमधील प्रत्येक सूत्र हा एका भाषणाचा विषय आहे. परंतु, उपलब्ध मर्यादित वेळेचा विचार करता विवेकी व्यक्तिमत्त्वापासून ते सुजाण नागरिकत्वापर्यंत जाण्यापर्यंतच्या सहा पायऱ्या तुम्हाला सांगतो आणि थांबतो. पहिली पायरी आहे विचार : तिच्याविषयी आपण सविस्तर बोललो आहोत. भावनेच्या आहारी न जाता स्वतःच्या विचार विवेकाचा वापर करणे हे त्यामागचे सूत्र आहे. तर लोक हो, विचार करा ! दुसरी पायरी आहे उच्चार : आपल्यातले अनेक जण वेगवेगळा आणि प्रगत विचार करू शकतात, पण तो विचार ते स्वतःजवळच ठेवतात. आणि IPL मध्ये सर्वाधिक धावा कुणी काढल्या किंवा सानिया मिर्झाचे लग्न झाले की नाही याविषयी आपण बोलत बसतो.

आपण केलेल्या चांगल्या विचारांचा उच्चार करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते केवळ स्वत:पुरतेच मर्यादित राहतात. त्यामुळे स्वत:च्या विचारांचा निर्भयपणे उच्चार करा. तिसरी पायरी आहे आचार : जर आपल्या विचार आणि उच्चारांप्रमाणे आपण आचार केला नाही तर ते दांभिकपणाचे हाईल व नुसत्या विचारांचे वजन कमी होईल, त्यामुळे आचार ही तिसरी पायरी आहे. चौथी पायरी आहे प्रचार : परिवर्तनाचा विचार हा सुरुवातीच्या काळात कायमच अल्पमतात असतो, त्यामुळे त्याचा प्रचार करणे महत्त्वाचे ठरते. परंतु, अनेक वेळा नुसता प्रचार उपयोगी पडत नाही, त्या प्रचाराच्या मागे पाचवी पायरी म्हणजे संघटन उभे करावे लागते. आपल्या समविचारी लोकांना एकत्र करून त्या विचाराचा प्रचार करणारे व्यासपीठ असल्याशिवाय समाजामध्ये तो विचार प्रभावी ठरणे अवघड जाते. आणि सहावी पायरी आहे संघर्षाची : कुठलाही बदल काहीतरी किंमत दिल्याशिवाय होत नाही. आणि सध्याच्या काळात आपल्यापैकी फारच थोड्याजणांची काहीतरी किंमत देण्याची तयारी असते.

संघर्ष ही बदलासाठीची सर्वांत महत्त्वाची पायरी आहे व त्यामध्ये मागच्या पायऱ्यांच्या तुलनेने सर्वांत अधिक किंमत द्यावी लागते. त्यामुळे आपल्यातील सगळ्याच जणांना संघर्षाच्या पायरीपर्यंत येता येणार नाही, म्हणून आधीच्या पायऱ्या चढायच्याच नाहीत हे देखील योग्य नाही. ह्या पैकी ज्या पायरीवर आपण आज उभे आहात त्याच्या पुढच्या पायरीवर जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. ते करण्याचे बळ तुमचा सर्वांचा विवेक तुम्हाला देवो (ज्यामुळे आपल्या सर्वांचे मन आणि समाजमन देखील उजळून निघेल) अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.

धन्यवाद!

Tags: समाजाचे मन आणि मनातला समाज समाजवादी पोथीनिष्ठ समाजवादी Limbic Cortex लिंबिक कॉरटेक्स Neo Cortex निओ कॉरटेक्स समाजमन सोशल इंटेलिजन्स इमोशनल इन्टेलिजन्स हमीद दाभोलकर जागरूक नागरिकत्व समाजाभिमुख कर्तृत्व विवेकी व्यक्तिमत्त्व Machiavallenism Antisocial Personality समाजविघातक व्यक्तिमत्त्व ग्रीक मायथॉलॉजी Narcissism नार्सिसिझम Dark Triad डार्क ट्रायड डॅनियल गोलमन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दाभोलकर,  सातारा
hamid.dabholkar@gmail.com

मनोविकारतज्ज्ञ असलेले हमीद दाभोलकर हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व साधना साप्ताहिक यांच्याशी निगडित आहेत.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके