डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एके काळी ‘मनोहर’ हे साप्ताहिक महाराष्ट्रातील विचारी व चळवळ्या तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय होते, त्या साप्ताहिकाच्या 26 ऑगस्ट 1973 च्या अंकात प्रसिद्ध झालेली पण गेली 43 वर्षे कुठेही उपलब्ध नसलेली ही मुलाखत मेहरुन्निसा दलवाई यांच्या संग्रहातून अलीकडेच आमच्या हाती आली, या मुलाखतीतूनही हमीदभाईच्या निर्भय व तर्कशुद्ध विचारांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते

  दलवालईंंनी लिहिलेल्या एकूण 25 लघुकथा ‘लाट’ व ‘जमीला जावद’ या दोन पुस्तकांत संग्रहित केलेल्या आहेत. त्यातून सर्वसामान्य मुस्लिम माणूस, मुस्लिम समाज, संस्कृती आणि परंपरा यांचे स्तिमित करणारे दर्शन घडते. याशिवाय ‘इंधन’ ही त्यांची कादंबरी मराठीतील एक माइलस्टोन मानली जाते. ‘इस्लामचे भारतीय चित्र’, ‘राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान’, आणि ‘भारतातील मुस्लिम राजकारण’ या तीन पुस्तकांत दलवाईंंचे वैचारिक लेखन संग्रहित करण्यात आले आहे. त्यातून अखिल भारतीय स्तरावरील मुस्लिम समाज, त्यातील स्थित्यंतरे आणि जागतिक स्तरावरील इस्लामचे राजकारण यांची चिकित्सा केलेली आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंंच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातून परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा जोरदार पुरस्कार केलेला आहे.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या 800 पानी ग्रंथात 19 व्यक्तींचा समावेश केला आहे. त्या एकोणीस आधुनिक भारताच्या निर्मात्यांपैकी एक आहेत हमीद दलवाई. ज्यांच्या विचारांचे प्रतिबिंब भारताच्या संविधानात आहे आणि ज्यांचे विचार आजच्या भारताला आधुनिक करण्यासाठी उपयुक्त आहेत, अशा व्यक्तींमध्ये दलवाईंंची गणना गुहा यांनी केलेली आहे. हमीद

दलवाई यांनी केलेले सर्व लेखन मुस्लिम समाजाच्या सुधारणेसाठी, उत्थापनासाठी केलेले आहे. वय वर्ष 20 ते 45 अशी एकूण 25 वर्षे त्यांनी ललित व वैचारिक लेखनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुस्लिम समाजसुधारणेच्या क्षेत्रात पायाभरणी करून ठेवलेली आहे. त्याशिवाय शेवटची 20 वर्षे म्हणजे वय वर्षे 25 ते 45 या काळात त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमधून मुस्लिम समाजाचे आणि त्यातही प्रामुख्याने मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी परिषदा, बैठका, भाषणे, परिसंवाद यांचे आयोजन केले होते.

आज भारतात आणि जागतिक स्तरावरही धर्मांध शक्तीचे प्राबल्य वाढताना दिसते आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा आग्रह धरणाऱ्या शक्ती निष्प्रभ होत आहेत. म्हणून दलवाईंंना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार मिळण्याला विशेष अर्थ आहे. या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट 1973च्या ‘मनोहर’ साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली ही मुलाखत पुनर्मुद्रित करीत आहोत.

प्रकाश भागवत (यवतमाळ) : जातीय दंगलींना मुख्यत: कोण जबाबदार आहे?

दलवाई - जातीय दंगलींना बरेचदा मुसलमान आणि अनेकदा हिंदू जबाबदार असतात.

मेधा गोळवलकर (दादर) : आपल्या विचारसरणीत आणि भारतीय जनसंघाच्या ध्येयधारणात काय मतभेद आहेत?

दलवाई - मला गोहत्याबंदी साफ अमान्य आहे. व्यक्तीच्या समानतेवर नवी समाजरचना अस्तित्वात यावी असे मला वाटते. अलीगड व बनारस या विद्यापीठांच्या नावातून अनुक्रमे मुस्लिम व हिंदू हे शब्द गाळण्यात यावे व ती राष्ट्रीय विद्यापीठे म्हणून घोषित करावीत असेही माझे मत आहे. स्त्रियांना पुरुषांइतकेच समान अधिकार असावेत म्हणून मी समान नागरी कायद्याचा गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सर्वांनीच कुटुंबनियोजन करावे इतकेच नव्हे तर, ते सर्वांना सक्तीचे व्हावे असे माझे मत आहे. थोडक्यात या देशाचे शासकीय निर्णय कुठल्याही धर्मसमुदायाला काय प्रिय किंवा अप्रिय आहे किंवा काय मंजूर किंवा नामंजूर आहे, यावरून न ठरवता, या देशातील कोट्यवधी जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीकरता काय आवश्यक आहे याचा विचार करून ठरविले जावे असे मला वाटते. जनसंघाचे यासंबंधी कोणते धोरण आहे हे आपल्याला त्या पक्षाच्या ध्येयधोरणविषयक सिद्धांतात सापडू शकेल. मेधाबाई, आमच्यातील मतभेद हुडकून काढणे आपल्याला वरील उत्तरावरून सोपे जाईल, अशी मी आशा बाळगतो.

अशोक परब (जोगेश्वरी) : आंतरजातीय विवाहाबद्दल आपले प्रामाणिक मत काय?

दलवाई - आंतरजातीय विवाह ज्यांना करायचे असतील त्यांना अनिर्बंधपणे करता आले पाहिजेत असे माझे मत आहे. विवाह ही व्यक्तिगत बाब आहे, त्यात इतरांनी लुडबूड करू नये असे मी मानतो. मी मांडीत असलेली सर्वच मते प्रामाणिक असल्यामुळे माझे हे मत प्रामाणिक आहे, हे लिहायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

रमेश उदारे (मुंबई) : ‘जो मूर्तिपूजक त्याचा समूळ नाश करा’ असं विधान कुराणात आहे का?

दलवाई - आपण म्हणता तसे विधान नाही. मात्र मूर्तिपूजकावर, त्यांना अवमानीत करण्यासाठी कर लावावा असे एक विधान आहे. यातूनच ‘जिझिया’कराचा जन्म झाला आहे. वास्तविक कुराणामध्ये काय लिहिले आहे, यापेक्षा आपण आत्ता मानवी संबंध कोणत्या पातळीवर ठेवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची सामाजिक समतेचा पुरस्कार करणारी विधाने सर्वच धर्मशास्त्रात आढळतील. मनुस्मृतीनेदेखील स्त्रियांना आणि कनिष्ठ वर्गीयांना समान स्थान दिलेले नाही. आता भारतीय समाज मनुस्मृती अथवा कुराणचे आदेश यावर आधारलेला राहणार नाही. भारतीय समाज जडणघडण सर्व व्यक्तीच्या समानतेवर आधारलेली असेल, हे हिंदू आणि मुसलमान या दोहोंनी ओळखणे आवश्यक आहे.

अ. रा. कस्तुरे (गुलटेकडी) : भारताबाहेर मुस्लिम आणि मुस्लिमेतरांचे संबंध कसे काय आहेत?

दलवाई - काही ठिकाणी चांगले आहेत. काही ठिकाणी वाईट आहेत. उदा. इंडोनेशियात ख्रिश्चन, बौद्ध व हिंदू अल्पसंख्यांक आहेत, पण तेथे धार्मिक तणाव नाहीत. मलेशिया, तुर्कस्तान, लेबेनान, ट्युनिशिया इत्यादी देशांत बिगरमुस्लिम अल्पसंख्याक राहतात आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. काही अरब देशांतून ज्यू आणि ख्रिश्चन यांची हकालपट्टी झालेली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू व शीख उरलेले नाहीत. बांगलादेशामध्ये आता हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षितता लाभलेली आहे असे हे चित्र आहे.

महादेव कोकाटे, चंद्रकांत धर्माधिकारी (अंधेरी) : जातीयवादी मुसलमानांची संख्या वाढताच भारतात पुन्हा नव्या ‘पाक’ची मागणी होण्याची शक्यता आहे, असं आपल्याला नाही का वाटतं?

दलवाई - जातीयवादी मुसलमान कोणती मागणी करतील यासंबंधी आपण फारशी चिंता बाळगण्याचे कारण नाही. ते ‘भेंडीबाजारात पाकिस्तान हवे’ असेसुद्धा सांगतील. त्यांनी अशी मागणी केल्यामुळे तसे काही आता घडण्याची शक्यता आहे असे समजणे बरोबर ठरणार नाही. एक तर आता वेगळे राष्ट्र द्यायला परकीय सत्ता अस्तित्वात नाही आणि मुस्लिम बहुसंख्यांकाचे राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक एवढे मोठे प्रदेश अस्तित्वात नाहीत.

महंमद समी कॉन्ट्रॅक्टर (औरंगाबाद) : आपण स्वत:ला मुसलमान समजता का? असल्यास नमाज, रोजा, कुराण आणि आखीरत याबद्दल आपली धारणा काय आहे?

दलवाई - मी नमाज पडत नाही, उपवास करीत नाही. कारण हे ईश्वरनिर्मित नसून महंमदनिर्मित आहे असे मी मानतो. यामुळे आखीरतवर माझा विश्वास नाही, हे ओघानेच आले. आणि तरीही मी मुसलमान आहे, कारण मी मुस्लिम समाजात जन्माला आलो आहे. नेहरू निरीश्वरवादी होते आणि तरीही ज्या अर्थाने हिंदू होते, त्या अर्थाने मी मुसलमान आहे. कारण मुस्लिम अथवा हिंदू असणे याची केवळ पोथीबद्ध व्याख्या मी मान्य करीत नाही. ती अधिक व्यापक आहे असे मी मानतो.

बाळ जांभेकर (वसई): तुमचे राजकीय गुरु कोण? तसेच बाळ ठाकऱ्यांप्रमाणे तुमच्याबरोबर शरीररक्षक असतात काय?

दलवाई - माझा राजकीय गुरु मीच. शरीररक्षक ठेवायला पैसा कुठे आहे?

गुलाम अहमद (औरंगाबाद) : महाराष्ट्रातील दहा टक्केच मुस्लिम मराठी भाषा समजतात. तरी तुम्ही तुमचं कार्य मराठीतून का करता?

दलवाई - महाराष्ट्रातील नव्वद टक्के मुसलमान मराठी समजतात. फक्त शहरी विभागातील दहा टक्के मुसलमान मोडकेतोडके उर्दू जाणतात. हे उर्दूदेखील ‘धावत धावत म्हावर लानेको गया’’ किंवा ‘‘झाडावरनं पडल्याबरोबर पाव फुट्या’ अशा पद्धतीचे उर्दू बोलतात. हे उर्दू ऐकून लखनौच्या उर्दू भाषिकाला चक्क मूर्च्छाच येत असेल! गुलाम अहमदभाई, आमचे कार्य आम्ही मराठीत का करतो, हे आता आपल्या लक्षात आले ना?

सुधीरकुमार आचार्य (कल्याण) : समाजसुधारणेच्या कार्यक्रमात आपणास आपल्या कुटुंबीयांचे साह्य कितपत मिळते?

दलवाई - अनेक प्रकारे मिळते. कुटुंबीय म्हणजे कोण, हे आपण स्पष्ट केलेले नाही. माझी पत्नी नोकरी करून द्रव्यार्जन करते आणि पर्यायाने माझ्यावरील कौटुंबिक जबाबदारीचा भार कमी करते, हेही मोठेच साह्य आहे असे मी मानतो.

स्वामीप्रसाद पंडित (पिंपरी) : सर्जनशील लेखक राजकारणात पडल्यास त्याला ते कितपत साधेल? आपण एक समर्थ ललित लेखक आहात, सध्या ललित लेखन सोडले का?

दलवाई - राजकारण मला कितपत साधले आहे यावरून आपणच आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधणे योग्य ठरेल. ललित लेखनाला पुरेशी मनाची उसंत मिळत नाही. त्याची खंतही वाटते. खंत वाटणे ही बाब कदाचित मी पुन्हा ललित लेखन करू शकेन असा दिलासा आपल्याला द्यायला तूर्त पुरेशी आहे.

मीनाक्षी ताटके (पुणे) : आपली स्वत:ची धर्माबद्दलची मते जी काही आहेत, ती घरातील सर्व मंडळींना विशेषत: आई, वडील, पत्नी, मुले यांना पटतात का?

दलवाई - पटतातच असे नव्हे, पटावीत असा माझा आग्रहही नसतो. त्यांचा दृष्टिकोन त्यांनी माझ्यावर लादू नये. प्रत्येकाला धार्मिक मतस्वातंत्र्य असावे, असे मी मानतो. या दृष्टीने आम्ही आमच्या घरात लोकशाही स्वातंत्र्य अंमलात आणले असून, शांततामय सहजीवनाचे युग सुरू केले आहे. आपण हा प्रयोग करून पहायला काही हरकत नाही.

शेख सिराज अहमद (समशेरपूर) : महाराष्ट्रातील बहुसंख्य मुस्लिम समाज ग्रामीण भागात राहात असताना, सत्यशोधक समाज शहरी भागात का?

दलवाई - कुठलीही चळवळ प्रथम शहरात सुरू होते. मागाहून ती ग्रामीण भागात पसरते. आमची चळवळ आता सुरू झाली आहे. ती वाढेल तशी ग्रामीण भागात पसरेल. सध्या ती शहरातच का, याचे उत्तर आपल्याला सापडले ना?

संजीव पोहेकर (बुलढाणा) : जर तुम्हाला ‘ब्लॅक डिसेंबरने’ खुनाची धमकी दिली तर तुम्ही काय कराल?

दलवाई- तुम्हाला मदतीला बोलावेन!

अरुण चव्हाण (सातारा): हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आज भारतात मुसलमान सर्वसाधारणपणे सुखाने कालक्रमणा करीत असताना, मुसलमान समाज आपल्यात एकरूप का होऊ शकत नाही?

दलवाई- या प्रश्नाचे समग्र उत्तर द्यायला एक प्रबंधच लिहावा लागेल. मुस्लिम समाजातील विभक्तवादी चळवळी त्या समाजाला एकरूप होऊन देत नाहीत, हे आपल्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर होऊ शकेल. पण हिंदूंना आधुनिक बनवूनच मुस्लिम समाजातील विभक्ततावाद मोडावा लागेल.

सुधाकर जोशी (जामनेर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय आहे काय?

दलवाई - राष्ट्रीय स्वयंसेक संघ जातीय आहे, असा त्यांच्या प्रवक्त्यांचाच दावा आहे. संघाच्या नेत्यांची भाषणे, त्यांचे लिखाण आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका यावरून आपल्याला याची प्रचिती येईल.

विश्वास डिग्गीकर (उमरगा) : राजकारणातील चांगली माणसे आर्थिक दृष्ट्या भक्कम असलेली क्वचितच आढळतात, म्हणून विचारतो आपल्या उपजीविकेची साधने कोणती?

दलवाई - मला सी.आय.ए. (अमेरिकन गुप्तहेर संघटना), के.जी.बी. (रशियन गुप्तहेर संघटना), ख्रिश्चन धर्मोपदेशक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीच्या व्यक्ती व संघटना यांच्याकडून पैसा पुरविण्यात येतो, असे मुस्लिम जातीयवाद्यांचे म्हणणे आहे. तर मी पाकिस्तानाचा छुपा हस्तक असून, याह्याखान व सध्या झुल्फिकार अली भुट्टो मला पैसा पुरवतात, असे काही निवडक हिंदुत्ववादी आपसात कुजबुजत असतात.

वस्तुस्थिती अशी आहे की, मी ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’चा पूर्णवेळ कार्यकर्ता असून, सोसायटीकडून उपजीविकेला आवश्यक तेवढे मानधन घेतो. तसेच माझी पत्नी नोकरी करते व मुंबईच्या उपनगरात एका चाळीवजा डबल रूममध्ये मी राहतो. देणग्या मिळवून तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मरणिकाद्वारा जाहिराती मिळवून आम्ही सोसायटीला आर्थिक साहाय्य मिळवतो.

विश्वासराव, आपला माझ्यावर विश्वास असेल असे समजून माझ्या उपजीविकेविषयी आपले मत बनविणे, मी आपल्या सदसद्‌विवेकबुद्धीवर सोपवतो.

व्यंकटेश लिगदे (मुंबई) : सर्वांसाठी समान नागरी कायदा इंदिरा सरकार का लागू करत नाही? ‘एकगठ्ठा’ मतासाठी मुसलमानांच्या ‘शारियत’मध्ये बदल करणार नाही असे काँग्रेसवाले म्हणतात, ते खरं आहे काय?

दलवाई - आपण एकूण दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न तुम्ही इंदिरा गांधींना विचारणे बरे! ‘एक गठ्ठा’ मतासंबंधीचे आपले मत खरे आहे, परंतु काँग्रेसचे नेते ‘आम्ही मुस्लिम कायद्यात सध्या बदल करणार नाही’ असे म्हणत असतात. यातील ‘मुस्लिम कायद्यात’ आणि ‘सध्या’ हे काँग्रेसजनांचे दोन शब्दप्रयोग फार महत्त्वाचे आहेत. भारतात मुसलमानांना ‘मुस्लिम कायदा’ अस्तित्वात आहे, ‘शरियत’ नव्हे. शरियत सौदी अरेबिया वगळता इतर कुठेच अस्तित्वात नाही. आणि ‘सध्या कायदा करणार नाही’ याचा अर्थ, वेळ येताच करू असा मी तरी घेतो.

दिलीपकुमार पाटणेकर (चिपळूण) : हमीदभाई, मुस्लिम लीग ही मुसलमानांना शाप आहे की वरदान?

दलवाई - शाप! केवळ मुसलमानांनाच नव्हे तर हिंदूंना, तसेच आपल्या देशालाही तो शापच आहे असे मी समजतो.

सुबोध वि. थरवळ (खेड, रत्नागिरी) : इस्लाम हा जास्तीत जास्त लोकशाहीवादी आणि समताप्रधान धर्म आहे. आपले मत काय?

दलवाई - कुठलाच धर्म लोकशाहीवादी तसेच समतावादी नाही. इस्लामही ह्याला अपवाद नाही. धर्म आध्यात्मिक पायावर समाजाची उधारणी करीत असतात. ते मध्ययुगीन आहेत आणि लोकशाही, स्वातंत्र्य, समानता या आधुनिक कल्पना आहेत. धर्माच्या पायावर आता सुसंस्कृत समाजव्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही, हे आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजे.

दिगंबर पाठक (अमरावती) : आपण नेहमी हिंदू- मुसलमान ऐक्याबद्दल लिहिता-बोलता, परंतु आजचा सुशिक्षित मुसलमान समाजसुद्धा भारताबद्दल आपुलकी जिव्हाळा, दाखवावयास तयार नाही, हे बऱ्याच घटनांनी दाखवून दिलेले आहे. यावर आपले मत काय?

दलवाई - मी काय मत सांगणार? भारतीय सुशिक्षित मुसलमान समाज भारताबद्दल जिव्हाळा दाखवत नाही, असे मीच अनेक उदाहरणे देऊन म्हटले आहे. आणि माझ्या या मताबद्दल माझे मत काय, असा प्रश्न आपण मला विचारता! इतका विनोदी प्रश्न विचारल्याबद्दल आपल्याला ‘मनोहर’चे (ललित पद्धतीचे) ‘नोबेल’ पारितोषिक दिले पाहिजे, असे माझे मत आहे.

क्षमा तावडे (मुंबई) : मुसलमान लोक कुटुंब नियोजनाला विरोध करतात, हा देशद्रोह नाही का?

दलवाई - कुटुंबनियोजनाला सनातनी मुसलमान, कॅथॅलिक समाज, जनसंघाचे काही काही नेते, राष्ट्रीय स्वयंसेक संघ, पुरीचे शंकराचार्य आणि आचार्य विनोबा भावे इतक्यांचा विरोध आहे. ही सर्व मंडळी राष्ट्रद्रोही आहेत, असे आपल्याला सुचवायचे आहे काय? वस्तुत: या देशाच्या कोट्यवधी जनतेच्या आर्थिक उन्नतीकरता जी राष्ट्रीय धोरणे आपण आखली आहेत. ती सर्वांनी अंमलात आणली पाहिजेत असे माझे मत आहे. कुटुंबनियोजन हे त्यातील एक धोरण आहे. ते सर्वांना सक्तीचे केले पाहिजे असे मी मानतो. त्याचबरोबर ज्या देशात भाकड गुरांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची संख्या पद्धतशीरपणे तेहतीस टक्के कमी करण्याची जरूरी आहे, असे देशातील बहुसंख्याक शेती- अर्थतज्ज्ञ सांगत असताना गोहत्याबंदीचा पुरस्कार करणे हेही देशाच्या प्रगतीत खीळ घालणारे आहे, असे आपल्याला नाही का वाटत?

विनोद वि. तंब्रे (नाशिक) : बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते?

दलवाई - बांगलादेश नुकताच स्वतंत्र झाला आहे आणि मुक्तिलढ्याच्या काळात तेथे प्रचंड विध्वंस होऊन चुकला आहे. यामुळेच तेथे सध्याचे अस्थिर वातावरण दिसते आहे. आर्थिक पुनर्रचनेचा वेग वाढला की, तेथे हळूहळू राजकीय स्थैर्य प्राप्त होईल. आणि भारताशी त्याचे संबंध चांगले राहतील असेही मला वाटते.

श्यामकांत कुलकर्णी (मालेगाव) : आपणास हिंदू होणे आवडेल काय?

दलवाई - या आधी श्री.महंमद समी कॉन्ट्रॅक्टर यांनी विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेल्या उत्तराकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. मी जन्माने मुसलमान आहे आणि संस्कृतीने हिंदू आहे. त्यामुळे मी हिंदू अथवा मुसलमान न राहता, चांगला माणूस बनावे या माझ्या आंतरिक इच्छेकडे एक पाऊल तरी प्रगती केली आहे असे मला वाटते. कारण धर्म ही बाब आता रूढ अर्थाने कालबाह्य झाली आहे, असे मी समजतो. श्यामकांतराव, याकरता तूर्त मला माणूस म्हणूनच राहू द्या! उगाच हिंदू-मुस्लिमात माझी ओढाताण करू नका!

सुलभा बाकरे (अमरावती) : आपल्या कार्यात आपल्याला पदोपदी अपेक्षाभंग, अपमान, निराशा पदरी येत असेल. अशावेळी माणसाला आपलं मन हलकं करायला, कुणाचा तरी आधार, सहानुभूती हवी असते, तर असे आपले आधारस्थान कोणते?

दलवाई- मी या दृष्टीने खरोखरच कधी विचार केला नव्हता. आपली कल्पना चांगली आहे. मी तिच्यावर विचार करतो आहे.

रवींद्र अफझुलपूरकर (सोलापूर) : केवळ ब्राह्मण, पारशी यांसारख्या अल्पसंख्य जाती सोडून इतर ‘अल्प(?)संख्य’ जातींबद्दल सरकारने जे धोरण अवलंबिले आहे, ते मुसलमानधार्जिणेच आहे. निधर्मी नव्हे, खरे की नाही?

दलवाई - मुसलमानांकडे ‘गठ्ठा’ मते आहेत म्हणून सत्ताधारी पक्ष त्यांना सांभाळून घेते असे आपल्या प्रश्नांचे योग्य उत्तर ठरेल.

अनिल चनाखेकर : बुद्धिवादी मुसलमान मध्यमवर्गीयांअभावी मुस्लिम समाजात वैचारिक क्रांती होणे अशक्यप्राय आहे. हा समाज निर्माण करण्यात आपण कशा दृष्टीने प्रयत्नशील आहात?

दलवाई - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य हा अशा प्रकारचे वैचारिक नेतृत्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.

गणेश परशुराम बावकर (दोनिवडे) : मुल्ला- मौलवींना व धर्मांध मुस्लिम समाजाला उघडउघड सामोरे जाऊन नवीन मते प्रतिपादन करताना आपल्याला जीवाची भीती वाटत नाही?

दलवाई - भीती वाटली असती तर मी हे काम केले असते असे आपल्याला वाटते काय?

(सत्यशोधक विचार आणि त्याप्रमाणे कृती या दोहोंचा वारसा मागे ठेवून गेलेल्या हमीद दलवाई यांच्या मृत्यूला येत्या 3 मे रोजी 40 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून ही मुलाखत पुनर्मुद्रित केली आहे.)

Tags: मुस्लिम सत्यशोधक मंडळ गोहत्याबंदी मनोहर मुलाखत हमीद दलवाई साधना दिवाळी अंक interview muslim satyashodhak mandal gohatyabandi manohar mulakhat hameed dalwai diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दलवाई


वैचारिक लेखक, कथाकार, संस्थापक-मुस्लिम सत्यशोधक समाज. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके