डिजिटल अर्काईव्ह

भारतीय मुसलमानांतील नवे प्रवाह

या बदलाचे स्वरूप विविध आहे. एक तर गेल्या बावीस वर्षांत मुस्लिम समाजाची एक नवी पिढी उदयाला आली आहे. त्या समाजात शिक्षण वाढते आहे. स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिकू लागल्या आहेत. संयुक्त मतदार संघामुळे मुस्लिम उमेदवाराला हिंदूक मतयाचनेकरता का होईना जावे लागत आहे. (हे हिन्दूबाबतही घटत आहे.) नोकऱ्यांत पात्रता आवश्यक ठरली आहे. त्यामुळे पात्रता कमावण्याचा प्रयत्न होत आहे. मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातून मुस्लिम तरुणांचे स्वखुशीने पाकिस्तानात स्थलांतर झाल्यामुळे काही नवे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. उदा. आंतर जातीय व आन्तर धार्मिक लग्ने करण्याकडे मुस्लिम मुलीचा कल दिसून आला आहे.

भारतीय मुस्लिम समाजाविषयी अद्यापही नीटशी कल्पना नसलेला फार मोठा वर्ग भारतात अस्तित्वात आहे. हिन्दू-मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात मुस्लिम जनमानस नीट समजावून घेण्याचा प्रयत्न अद्यापदेखील होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

दोन विचारप्रवाह

साधारणतः मुस्लिम समाजाविषयी दोन विचारप्रवाह हिन्दू समाजात अस्तित्वात आहेत. मुस्लिम समाजाचे मनोगत हिन्दू-विरोधी आहे, असे एक वर्ग मानतो. असे मानणे हे केवळ वस्तुस्थितीचे यथार्थ स्वरूप दर्शवणे, एवढ्यापुरते मर्यादित असते तर ते समजण्यासारखे आहे; तथापि असे मानताना हा वर्ग असेही मानतो की, मुस्लिम समाजातील प्रतिगामी चळवळी जणू त्या समाजाचा बायॉलॉजिकल फॅक्टर आहे.

एकदा ही भूमिका घेतल्यानंतर मुस्लिम समाजाविषयी निरपेक्ष दृष्टी बाळगणे कुणालाही शक्य नाही. समाजगटांचे वर्तन अनेकदा अनेक ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक आणि इतर अनेक प्रवाहांनी बंदिस्त असते. हे प्रवाह सामाजिक स्थित्यंतराच्या प्रक्रियेने बदलत असतात. सामाजिक बदलाची ही प्रक्रिया निर्माण करण्याखेरीज कुठल्याही समाजाचे मनोगत बदलत नाही. एकदा समाजाचे मनोगत निसर्गतःच ठरते अशी चुकीची आणि अडाणी भूमिका घेतल्यानंतर सामाजिक बदलाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणे, तिचे महत्त्व कमी लेखणे, किंवा अशा प्रक्रियेचे अस्तित्व नाकारणे हेच पर्याय या मंडळींच्या समोर उभे राहतात. भारतातील हिंदुत्ववाद्यांनी ही चूक सतत केली आहे. त्यातल्या त्यात सावरकर मुस्लिम समाजाच्या चळवळीबाबत ऐतिहासिक दृष्टी बाळगताना दिसतात. दुर्दैवाने त्यांनी ह्या प्रश्नाला पर्याय म्हणून तशाच प्रकारच्या हिंदू चळवळीचे नेतृत्व केले, आणि म्हणून हिंदू विचारांतून मुस्लिम जातीयवादाचा पाडाव होऊ शकलेला नाही; आणि त्या समाजातील सामाजिक बदलाच्या प्रक्रियेला हातभार देखील लागलेला नाही.

भारतातील दुसरा वर्ग सेक्युलरवाद्यांचा आहे. मुस्लिम समाजाच्या प्रतिगामी चळवळीचे अस्तित्वच हा वर्ग सतत नाकारत आलेला आहे. या वर्गाने ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून मुस्लिम जनमानस समजून घेतलेले नाही. अनेकदा राजकारणाच्या सोयी साठी केलेली विधाने आणि घेतलेल्या भूमिका यांचा मुस्लिम समाजाच्या अंतरंगाची काही संबंध नाही. तथापि सेक्युलरवाद्यांनी, राजकारणातील उद्गार मुस्लिम समाजाच्या मनोवृत्ती प्रकट करणाऱ्या आहेत अशी सोईस्कर समजूत करून घेतलेली आहे. मुस्लिम समाजात बदल होण्याच्या दृष्टीने हा सेक्युलर वर्ग आपल्या चुकीच्या भूमिकेमुळे अडथळा होऊन बसलेला आहे. याकरता, त्या समाजाचे अंतरंग नीट समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. त्याखेरीज या प्रश्नाला योग्य वळण लावण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला धोरणातील समतोल येणार नाही.

स्वातंत्र्योत्तर मुस्लिम समाज

फाळणीनंतर जाता भारतात सहा कोटी मुसलमान राहिले आहेत. या समाजात धर्मश्रद्धा अजूनही बळकट आहेत. आणि धर्मान्ध संघटनांचे आजदेखील पूर्वीइतकेच प्राबल्य आहे. देशाच्या राजकारणात सध्या जी ध्रुवीकरणाची प्रक्रिया चालू आहे तिचे पडसाद मुस्लिम राजकारणातही उमटत आहेत. मुस्लिम राजकीय संघटना बळकट करण्याचा प्रयत्न देशव्यापी पातळीवर चालू आहे, आणि मुस्लिम समाजातील आजच्या सर्वच राजकीय आणि धार्मिक संघटना कमालीच्या जातीयवादी आहेत.

प्रथमच अल्पसंख्याक

मुस्लिम समाजाचे हे चित्र नवे नाही; परंपरागतच आहे. परंतु या चित्रावरून मुस्लिम समाजाचे समग्र दर्शन होऊ शकणार नाही. 1947 पासून प्रथमच मुस्लिम समाज एक अल्पसंख्याक समाज म्हणून मानला जाऊ लागला. स्वातंत्र्यापूर्वीदेखील तो अल्पसंख्याकच होता. परंतु परकीय सत्तेने दिलेल्या सवलतीमुळे आपल्या अल्पसंख्याक स्थानाची फारशी जाणीव त्याला निर्माण होत नव्हती. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सत्ता स्वकीयांच्या हाती नव्हती. 1947 नंतर प्रथमच हिंदू बहुसंख्याकांशी अल्पसंख्याक या नात्याने आपले संबंध ठेवले पाहिजेत ही जाणीव त्या समाजात निर्माण झाली. मुस्लिम धार्मिक आणि जातीय चळवळी हे या वस्तुस्थितीला सामोरे न जाण्याच्या प्रवृत्तीचे निदर्शक मानले पाहिजे. तथापि अपरिहार्यपणे ही वस्तुस्थिती मनाने जरी मुस्लिम समाजाने मान्य केली नसली तरी प्रत्यक्षात त्याला ती मान्य केल्याखेरीज गत्यंतर नव्हते व नाही. याचे काही आघात त्या समाजावर झाले व होत आहेत. येथे या ऐतिहासिक बदलाच्या पार्श्वभूम वर मुस्लिम समाजातील होत असलेले बदल समजावून घेतले पाहिजेत.

नव्या पिढीतील बदल

या बदलाचे स्वरूप विविध आहे. एक तर गेल्या बावीस वर्षांत मुस्लिम समाजाची एक नवी पिढी उदयाला आली आहे. त्या समाजात शिक्षण वाढते आहे. स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिकू लागल्या आहेत. संयुक्त मतदार संघामुळे मुस्लिम उमेदवाराला हिंदूक मतयाचनेकरता का होईना जावे लागत आहे. (हे हिन्दूबाबतही घटत आहे.) नोकऱ्यांत पात्रता आवश्यक ठरली आहे. त्यामुळे पात्रता कमावण्याचा प्रयत्न होत आहे. मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातून मुस्लिम तरुणांचे स्वखुशीने पाकिस्तानात स्थलांतर झाल्यामुळे काही नवे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. उदा. आंतर जातीय व आन्तर धार्मिक लग्ने करण्याकडे मुस्लिम मुलीचा कल दिसून आला आहे.

साहित्यातील प्रवाह

या साऱ्यांचे त्या समाजावर हळूहळू परिणाम घडून येत आहेत. उत्तर प्रदेशात हिंदी शिकलेली मुसलमानांची एक नवी पिढी उदयाला आली आहे. हिन्दीतून मुस्लिम लेखकांची नावे आता दिसू लागली आहेत. हे लेखक वापरत असलेली प्रतीके आणि भाषा वेगळी आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हिन्दी साहित्यात क्वचितच कुणी मुस्लिम लिहीत असे. या पार्श्वभूमीवर वरील वस्तुस्थितीची दखल घेतली तर मुस्लिम समाजातील बदलाची कल्पना यायला हरकत नाही.

आत्मपरीक्षण

हे बदलाचे प्रवाह लिखाणातूनदेखील दिसू लागले आहेत. अजून पर्यंत आत्मटीकेचा या समाजात अभाव होता. आपल्या जातीय वादाला विरोध करण्याची भूमिका घेणारे देखील आत्मटीका शक्यतो टाळण्याचाच प्रयत्न करत; परंतु आता आपले दोष काही मंडळी दाखवू लागली आहेत.

धार्मिक पण उदारमतवादी

सध्या तरी या बदलाचे तीन-चार प्रवाह अस्तित्वात आहेत. हे सर्वच प्रवाह बदलला पाहिजे असे मानतात; तथापि त्यांच्या भूमिका आणि अभिव्यक्ती वेगवेगळया आहेत. एक वर्ग पूर्वीप्रमाणेच इस्लाम परिपूर्ण आहे अशी भूमिका घेतो. इस्लामच्या परंपरेत, इतिहासात आणि धर्मशास्त्रात काही दोष आहेत हे मान्य करीत नाहीत. तथापि असे म्हणत असतानादेखील उदारमतवादाचा प्रसार करतो. ही भूमिका धर्माची टीका टाळून मुस्लिम समाजाला नवे वळण देण्याची आहे हे स्पष्ट आहे. या भूमिकेतून समाजबदलाचे प्रयत्न यशस्वी होतीलच असे नव्हे. तथापि ही मंडळी अप्रामाणिक आहेत अथवा जातीयवादी आहेत असे मानण्याचे कारण नाही.

चिकित्सा टाळून धर्मसुधारणा

दुसरा वर्ग असे मानतो की, धर्माची टीका करून मुसलमान समाजाला वळण लावता येणार नाही. उलट त्याला बदलायचे असेल तर त्याच्या धर्मश्रद्धांनाच आवाहन केले पाहिजे. उदाहरणच द्यायचे तर मुस्लिम समाजाला कॉमन सिव्हिल कोडकरता तयार करायचे असल्यास कॉमन कोट म्हणजेच परिपूर्ण अवस्थेतील शरियतचा कायदा आहे असे हा वर्ग प्रतिपादन करतो. येथे ही गोष्ट लक्षात ठेवणे जरूर आहे की, धर्मचिकित्सेचा सबंध इस्लामी परंपरेत अभाव आहे; आणि चिकित्सा टाळून धर्मश्रद्धा बदलण्याचा प्रयत्न इस्लामी जगतात चाललेला आहे. भारतातील हा वर्ग अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच भाग आहे. इजिप्तमधील एक प्रसिद्ध मुस्लिम धर्मसुधारक 'अबदू' यांनी 'इस्लामच्या तलवारीनेच मी इस्लामचे शिरकाण करू इच्छितो.' असे या प्रक्रियेचे वर्णन केले होते. इजिप्तमधाल नासेर किंवा पाकिस्तानातील अयुबखान यांचे प्रयत्न याच प्रवाहात मोडतात.

परंपरागत विचार-आचरण आधुनिक

इस्लाममधील चिकित्सेच्या अभावाची काही कारणे समजावून घेतली पाहिजेत. मुस्लिम समाज अधार्मिक आचरणाची फारशी दखल घेत नाही. तथापि वैचारिक बदलाला मात्र तीव्र विरोध करतो. थोडक्यात असे म्हणता येईल की, परंपरागत विचार बाळगणारा आणि आचरणात पुढे जाऊ शकणारा असा हा समाज आहे. यामुळे सुधारकांनादेखील परंपरागत विचारांची चाकोरी न मोडता सुधारणेचे प्रयत्न करावे लागतात. हा जो पेचप्रसंग (डायलेमा) आहे. त्यातून इस्लामने अद्याप मार्ग काढलेला नाही. इस्लामच्या मोनोलेथिक स्वरूपाशी त्याचा संबंध आहे. एक प्रकारे इस्लाममधील खऱ्याखुऱ्या प्रबोधनाच्या उणीवेचे हे निदर्शक आहे. त्यामुळे भारतातील अशाच प्रकारच्या, धर्मश्रद्धांना धक्का न लावता समाजाला बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुस्लिम वर्गाच्या अडचणीही आपण समजून घेतल्या पाहिजेत.

निरपेक्ष दृष्टीतून टीका

याहीपुढे जाऊन स्पष्ट शब्दांत मुस्लिम समाजाची टीका करणारा एक छोटा वर्गही अस्तित्वात आहे. हा वर्ग धर्मावर टीका करणार नाही. तथापि आपल्या समाजातील जातीयवादाचे अस्तित्व मान्य करतो. मुस्लिम इतिहासातील अत्याचारांची कबुली देतो, आणि इस्लामने आधुनिकतेशी जुळते घेतले पाहिजे असा आग्रह धरतो. श्री. महम्मद यासीन किंवा ए. ए. रिझवी या इतिहासकारांनी इस्लामी इतिहासाच्या केलेल्या समीक्षा त्यांच्या निरपेक्ष ऐतिहासिक दृष्टीची साक्ष देतात. अलीकडच्या काळात दिल्लीचे श्री. मुशीर हसन किंवा औरंगाबादचे श्री. मोईन शाकीर यांनी मुस्लिम समाज आणि राजकारण यांच्यावर कठोर टीका करणारे लिखाण केले आहे. हा टीका करणारा प्रवाह वाढत आहे हे देशातील प्रमुख इंग्रजी नियतकालिके नजरेखाली घातले असता लक्षात येते. अनेक मुसलमान स्त्रिया उदारमतवादी दृष्टिकोणातून लिहू लागल्या आहेत; आणि सामाजिक बदलाचा आग्रह धरत आहेत. मद्रासच्या श्रीमती सुलेमान, मुंबईच्या ॲड. आमीता नकवी, श्रीमती सुवेदा बीबीजी, लईक फत्तेहअली, अलीगडच्या नजमा अन्सारी ही त्यांतील काही नावे होत. अखिल भारतीय महिला परिषदेतदेखील मुस्लिम स्त्रिया अधिक प्रमाणात भाग घेत आहेत, आणि आपल्या हक्काच्या चळवळी करू लागल्या आहेत.

इस्लाम राजकारण नको

आणखी एक छोटा वर्ग इस्लामच्या धर्मश्रद्धांची चिकित्सा करू लागला आहे. इतस्ततः विखुरलेल्या या व्यक्तींना वर्ग म्हणून संबोधणे आज कदाचित बरोबर ठरणार नाही. इस्लामचे स्वरूप ईश्वरपूजे पुरते मर्यादित असले पाहिजे, इस्लामला एका राजकीय ध्येयप्रणालीचे स्वरूप असता कामा नये, असा आग्रह ही मंडळी धरताना दिसतात. इस्लामच्या टीकेबाबत नेमके उदाहरणच द्यायचे तर इस्लामचे 80% सामाजिक कायदे कालबाह्य झाले आहेत, असे भारतातील एक आधुनिक मुस्लिम विचारवंत श्री ए. ए. ए. फैजी यांनी आपल्या "Modern Approach to Islam " या पुस्तकात म्हटले आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, धर्मशास्त्राबाबत अतिशय आधुनिक आणि पुरोगामी भूमिका धारण करणाऱ्या फँशनी मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक अलगतेचा पुरस्कार केला आहे. यामुळे मुस्लिम समाजाला आधुनिक वळण देण्याच्या फैझीच्या कार्याला गौणत्व प्राप्त झाले आहे.

इतिहासातून अलगता

सांस्कृतिक अलगपणाची ही जाणीव इतिहासातून निर्माण झाली आहे; धर्माशी तिचा प्रत्यक्ष संबंध नाही. भारताच्या गतेतिहासावरील आपणा सर्वांच्याच श्रद्धा परस्पर भिन्न असल्याचा हा परिणाम आहे. तथापि स्वातंत्र्यापासून एक समान इतिहास घडत आहे, आणि त्याचे आघात मुस्लिम समाजावर देखील होणे अपरिहार्य आहे. काही महिन्यांपूर्वी भारताचे माजी चीफ ऑफ प्रोटोकल, श्री. एम. आर. ए. बेग यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला होता; आणि इंडोनेशियातील मुसलमानांप्रमाणेच भारतीय मुसलमानांनी देखील प्राचीन संस्कृती आपली मानली पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. इतिहासातून निर्माण झालेल्या सांस्कृतिक अलगतेच्या भावना आता टाकून दिल्या पाहिजेत, याची जाणीव त्या समाजात होत असल्याचे या लेखावरून सूचित होते.

भारतात अभूतपूर्व प्रयोग

मुस्लिम समाजात हळूहळू उदयाला येणाऱ्या या नव्या प्रवाहांचे स्वरूप समजून घेताना भारतीय इस्लामचे एक गाढे अभ्यासक श्री. कॅन्टवेल स्मिथ यांनी आपल्या "Islam in Modern History" या पुस्तकात केलेल्या भविष्याची आठवण येते. ते म्हणतात, "जागतिक इस्लाममधील एक अभूतपूर्व प्रयोग प्रथमच भारतात होत आहे. मुस्लिम समाज जेथे अल्पसंख्याक होता किंवा आहे तेथे एक तर तो सत्ताधीश राहिला आहे किंवा बहुसंख्याकांचा अंकित बनला आहे. तथापि लोकशाहीच्या चौकटीत मूलभूत स्वातंत्र्य उपभोगीत, समानतेच्या नात्याने, भारतात मुस्लिम समाज इतरांबरोबर वावरत आहे. इस्लामच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व आणि नवी ऐतिहासिक घटना आहे. तिचे इतिहासात दूरगामी परिणाम संभवतात. कदाचित इस्लामचे सर्वांत उदारमतवादी आणि पुरोगामी स्वरूप या विशिष्ट परिस्थितीमुळे भारतातच उदयाला येऊ शकेल. श्री. स्मिथ यांची ही भविष्यवाणी खरी ठरेल किंवा नाही हे पन्नास वर्षांनी इतिहास ठरवणार आहे. मात्र आज तरी काही नव्या बदलाची चिन्हे त्या समाजात प्रकट झाली आहेत. हे प्रवाह अधिक बळकट करण्याची जबाबदारी या देशाचे भले चितणाऱ्या सर्वांची आहे.

Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 ए. ए. रिझवी अल्पसंख्यांक हमीद दलवाई इस्लाम कॅन्टवेल स्मिथ हिंदू मुंबई मुस्लिम Dasyamukti Special Issue 1970 A. A. Rizvi Minorities Hamid Dalwai Islam Cantwell Smith Hindus Mumbai Muslims weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हमीद दलवाई ( 34 लेख )


वैचारिक लेखक, कथाकार, संस्थापक - मुस्लिम सत्यशोधक मंडळ. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके