आईने मान डोलावली. मग वडील बोलायचे बंद झाले. त्यांचे बोलणे चालू असताना सुरैयाआपा आतल्या खोलीतच होती, परंतु मधल्या दरवाजातून ती मला दिसत होती. आपले लक्ष त्या संभाषणाकडे नसल्याचे ती भासवत होती, परंतु मधेच एकदा तिने वर पाहिले आणि मला पाहिले. मला पाहताच पुन्हा तिने मान खाली घातली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तीन-चार माणसे आमच्याकडे आली. सुरैयाआपा आतच बसली होती. नवी सलवार-खमीज नेसली होती. आईने तिला पावडर लावायला सांगितले होते. सुरैयाआपाने आयुष्यात प्रथमच पावडर लावली असावी. ती आरशात बघून पावडर लावीत असताना वडील आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. सुरैयाआपाचे पावडर लावणे संपल्यावर ते जणू काही स्वत:शीच पुटपुटले, ‘‘पावडर काय कू लगाती है? जादा शोक अच्छा नही।’’ त्यांचे बोलणे आत आईला किंवा सुरैयाआपाला ऐकू गेले नाही. ते लोक आले, तेव्हा वडील उठून उभे राहिले. ते बाहेर त्यांना सामोरे गेले. एकूण तीन-चार माणसे आली होती.
सुरैयाआपा माझी थोरली बहीण. ओबडधोबड दिसणारी आणि निबरट चेहऱ्याची. तिचे वरचे दोन दात उगाचच बाहेर येऊन इतरांना भेडसावीत असल्यासारखे वाटायचे. ती त्यामुळे सहसा जोरजोराने हसायची नाही. हसली की ते दात सुळ्यासारखे पुढे यायचे आणि ती अधिकच विद्रूप दिसायची. दोन-तीनदा आईने दटावले आणि एकदा बाबांनी डोळे वटारले, तेव्हा सुरैयाआपाची हसायची सवय नाहीशी झाली. प्रथम-प्रथम तिला हसू आले की ती हसत सुटायची आणि मधेच तिला बाबांच्या दटावण्याची आठवण आली की, तिचे हसू थबकून राहायचे. पुढे काही दिवस हसताना तोंडावर हात घ्यायची तिला सवय लागली; परंतु सुळ्यासारख्या पुढे आलेल्या दातांच्या विद्रूपतेची जाणीव तिच्या मनात अशी खोलवर रुजून राहिली की, अखेर तिचे हसणे बंद पडले. हसू आले तरी ती ते आतल्या आत दाबू लागली. पुढे तिला त्याचीच सवय झाली. सदान्कदा ती गंभीर राहू लागली. हसण्याचा तिला सरावच राहिला नाही.
सुरैयाआपा काही दिवस शाळेत जात असे. ती तीन इयत्ता माझ्या पुढे होती. मी पहिलीत जाऊ लागलो, तेव्हा ती तिसरीत होती. पहिल्या दिवशी तिच्याबरोबर मी शाळेत पाऊल टाकले. त्या दिवशी घरी परतल्यानंतर वडिलांनी माझ्याऐवजी तिलाच विचारले, ‘‘क्यों? क्या कहती है करम्मा की पढाई?’’ ती फारशी कुणाशी बोलत नसे. शाळेतदेखील कुणात मिसळत नसे. मला जाताना तेवढी बरोबर घेऊन जाई. येताना मी एकटाच परत येई. कारण ती कधी परते, हे मला कळत नसे. मी येईपर्यंत ती एकटी पाटी-पेन्सील घेऊन ‘अलीफ बे’ करत बसलेली असे. आई तिला तरतीब शिकवीत असे. तेवढ्या लहान वयातही ती नमाज पढायला, वजू करायला शिकली होती. तिच्या गंभीर वागण्याने मला तिची भीतीच वाटत असे. तिच्याशी बोलायलाही मी धजावत नसे. एकदा. एकदाच मी तिची खोड काढली होती. तिच्या ‘अलीफ बे’ लिहिलेल्या पाटीवर पाणी शिंपडले होते. मी पाणी शिंपडले, तेव्हा ती जोराने किंचाळली आणि तिचे ते दोन दात सुळ्यांसारखे बाहेर डोकावले. मी तिला वेडावू लागलो. म्हणालो, ‘‘तेरे वो दात देख भायेर आये है।’’
माझे शब्द कानी पडताच तिचा चेहरा आक्रसला. तिने ओठ घट्ट मिटून घेतले. तेवढ्यात आईने कानोसा घेतला. ‘‘बडी भयनकी मजाक करत्या काय रे?’’ तिने मला दरडावून विचारले. माझे तिने मनगट धरले आणि एक मुस्कटात मारली. मी कळवळलो, परंतु तिने माझा हात सोडला नाही. माझा हात पिरगाळीत ती विचारू लागली, ‘‘फिर करेगा मजाक उसका? करेगा ऐसी शरारत?’’ वेदना असह्य झाल्या तसा मी ओरडलो, ‘‘नहीं नहीं अब नै करूंगा कब्बी नै करूंगा.’’ आणि मग आईने माझा हात सोडला. आई बाजूला झाली आणि मी हात झटकीत एका कोपऱ्यात बसलो. सुरैयाआपा माझ्या मदतीला धावून येईल, असे मला वाटत होते. मला वाटले ती आईला आवरील, आईच्या तावडीतून माझी सुटका करील; परंतु तिने ढुंकूनही माझ्याकडे लक्ष दिले नाही. मी मनातल्या मनात खट्टू झालो. तिच्याविषयी माझ्या मनात निष्कारण अढी निर्माण झाली. पण ती फार वेळ टिकली नाही. रात्री वडील घरी आल्यानंतर मी तिची थट्टा केल्याचं तिनं सांगितले.
मला वाटले, वडील रागावतील; पण ते रागावले नाहीत. फक्त म्हणाले, ‘‘बडे भयनकी ऐसी थट्टा करने की क्या रे? उसके दात भायेर है और तेरे पूरे अंदर गयेसे है क्या?’’ मग त्यांनी माझ्या अंगावर हात फिरवीत म्हटलं, ‘‘सुरैयाआपा की आज से मजाक नै करना. हां.’’ ते हे बोलत असताना सुरैयाआपा गालातल्या गालात हसत असल्याचे माझ्या लक्षात आले. तिला कैक दिवसांनी मी हसताना पाहत होतो. दुसऱ्या दिवशी सारा प्रकार विसरून आम्ही बरोबर शाळेत गेलो. दोन-तीन वर्षांनी वडिलांनी सुरैयाआपाला शाळेतून काढले. एक दिवस ते माझ्या आईला म्हणाले, ‘‘कल से सुरैयाआपा को इसकूल मे भेजना नाही.’’
आईला काही कळेना. तिने विचारले, ‘‘लेकिन क्यूं?’’
‘‘क्या करना है ज्यादा पढके?’’
‘‘लेकिन पढती है अभी पढने दो।’’
‘‘पढके नोकऱ्या करना है क्या? वो क्या बम्मन की छोकरी है? वैसे ही भायेर घुमने वाली है?’’
आईला युक्तिवाद करता आला नाही; परंतु तिच्या मनात सुरैयाआपाला अधिक शिकवायचे होते, हे तिच्या चेहऱ्याकडे पाहताना कळून येत होते. ती पुन्हा म्हणाली, ‘‘इतना बरस पुरा करने दो.’’
‘‘काय कू?’’ वडिलांनी तिला विचारले. ‘बरस पुरा करके विलायत जानेवाली है क्या? कुछ जरूरत नहीं. कल से बेटा घर में रहेना हो.’’ सुरैयाआपा नुसती ‘जी हाँ’ म्हणून पुटपुटली. तिने ओठ घट्ट मिटून घेतले. काही वेळ जागच्या जागी उभी राहून ती पायाच्या अंगठ्याने खालची जमीन उकरीत राहिली. मग तिचे तिलाच काय वाटले, कुणास ठाऊक ती तिथून बाजूला झाली. वडिलांना तिने जेवण आणून ठेवले. मग स्वयंपाकघरात जाऊन आईला मदत करू लागली. दुसऱ्या दिवसापासून सुरैयाआपाचा दिनक्रम बदलला. ती दिवसभर घरातच वावरू लागली. आईला कामात मदत करू लागली. कुठे बाहेर जायचेच झाले, तर आईबरोबरच बाहेर पडू लागली. काही काळ तिचे ‘अलीफ बे’ चालू होते. आई तिला गुसुल कसा घ्यावा, वजू कशी करावी, हे शिकवीत राहिली आणि त्याला वडिलांनी विरोध केला नाही. मग ते संपले आणि सुरैयाआपाला काहीच करायचे नाही. काही दिवस एकट्याने शाळेत जायला मला चमत्कारिक वाटले; परंतु पुढे मी इतर मुलांत मिसळून गेलो आणि सुरैयाआपा शाळेत येत नसल्याची आठवणदेखील विसरून गेलो. चौथी-पाचवीत असेपर्यंत वडील माझा अभ्यास घ्यायला तिला सांगत. नेहमी संध्याकाळी घरी आले की तिला विचारीत, ‘‘करम्या की पढाई देखी क्या रे बेटा?’’ सुरैयाआपा मान डोलवी. बोलत अशी नसेच. माझ्याकडून मात्र शाळेतून परतल्यानंतर कसून अभ्यास करून घेई. मी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच मला गोंजारून सांगे, ‘‘ऐसा मत कर करीम, बाबाजान मुझे पूछेंगें तो क्या जवाब दूँ?’’ हे म्हणत असताना ती असा केविलवाणा चेहरा करी की, मी अभ्यास न केल्याबद्दल तिलाच वडिलांचा मार खावा लागणार की काय, असे मला वाटू लागे आणि मी निमूटपणे अभ्यास करी. परंतु मी सहावीत गेलो आणि सुरैयाआपाचे ज्ञान माझा अभ्यास घेण्याकरता अपुरे पडू लागले. तीच आपणहून कंटाळून एक दिवस मला म्हणाली, ‘‘अब मैं नै पढाई लूँगी तेरी।’’ मी मनात म्हटलं, बरेच झाले, कटकट मिटली.
त्या दिवसापासून सुरैयाआपा माझा अभ्यास घेईनाशी झाली. वडिलांनीही तिला माझ्या अभ्यासाविषयी विचारणे सोडून दिले. ती जवळजवळ दिवसभर आईला कामात मदत करू लागली. हळूहळू ती एकटी घराबाहेर जाईनाशी झाली. एकदा आईनेच तिला वाण्याकडे पाठवले असता, वडील तिच्यावर गुरगुरले, ‘‘काय कू भेजती है उसकू भायेर? लडकी जानती हुवी। अभी संभालके ऱ्हयना चाहिये।’’ तसे सुरैयाआपाचे वय फारसे नव्हते. सोळावे किंवा सतरावे असेल, परंतु वडिलांना एव्हानापासून तिच्या लग्नाची घाई लागली होती. अधून-मधून ते आईजवळ सुरैयाआपाच्या लग्नाचा विषय काढत. सुरैयाआपा अशा वेळी आतल्या खोलीत शांतपणे काम करीत राही. जणू बाहेरचे बोलणे आपल्याला ऐकू येत नाही, अशा रीतीने ती वावरत असे. बाहेर काही काम लागले-निघाले तरी येत नसे. तो विषय संपला की, मगच बाहेर येई. आईला मात्र सुरैयाआपाच्या लग्नाची विशेषशी काळजी वाटत नव्हती. ‘‘वखतपर होता है। उस खुदायात् अल्लाकूंच उसकी फिकीर उसके किस्मत में जो मरद लिखा होगा वो उसको मिलेगाच। तुमने और हमने कितनी कालजी करना?’’ आईच्या या युक्तिवादापुढे वडिलांचे काही चालत नसे. ते निरुत्तर होत. परंतु सुरैयाआपाचे लग्न करण्याचा त्यांनी जणू ध्यासच घेतला होता. एक दिवस सुरैयाआपाला पाहण्यासाठी काही माणसे येणार असल्याचे त्यांनी आईला सांगितले. आईने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मग ती चौकशी करू लागली, ‘‘कहाँ का है लडका?’’
‘‘यहांच का’’
‘‘नाम क्या उसका?’’
‘‘शेख महंद’’
‘‘नाम तो पुरानाच है।’’
‘‘हमकू नाम से मतलब क्या? लडका अच्छा होना चाहिये।’’
‘‘वो कैसा है?’’
‘‘अच्छा सुना है। फॅक्टरी में काम करता है। देड सौ रुपया कमाता है।’’
‘‘पढाई कितनी हुई है?’’
‘‘ज्यादा नही।’’
आई हिरमुसली झाली, परंतु काही म्हणाली नाही. वडील म्हणाले, ‘‘कल दुपेर से आयेंगें। कुछ मीठा खाने कू करना।’’
आईने मान डोलावली. मग वडील बोलायचे बंद झाले. त्यांचे बोलणे चालू असताना सुरैयाआपा आतल्या खोलीतच होती, परंतु मधल्या दरवाजातून ती मला दिसत होती. आपले लक्ष त्या संभाषणाकडे नसल्याचे ती भासवत होती, परंतु मधेच एकदा तिने वर पाहिले आणि मला पाहिले. मला पाहताच पुन्हा तिने मान खाली घातली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तीन-चार माणसे आमच्याकडे आली. सुरैयाआपा आतच बसली होती. नवी सलवार-खमीज नेसली होती. आईने तिला पावडर लावायला सांगितले होते. सुरैयाआपाने आयुष्यात प्रथमच पावडर लावली असावी. ती आरशात बघून पावडर लावीत असताना वडील आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. सुरैयाआपाचे पावडर लावणे संपल्यावर ते जणू काही स्वत:शीच पुटपुटले, ‘‘पावडर काय कू लगाती है? जादा शोक अच्छा नही।’’ त्यांचे बोलणे आत आईला किंवा सुरैयाआपाला ऐकू गेले नाही. ते लोक आले, तेव्हा वडील उठून उभे राहिले. ते बाहेर त्यांना सामोरे गेले. एकूण तीन-चार माणसे आली होती. त्यातील दोन स्त्रिया होत्या. त्या काळ्या बुरख्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या कोण आहेत, हे मला कळलेच नाही. परंतु त्या आतल्या खोलीत गेल्या, तेव्हा त्यांनी बुरखे काढले. त्यातील एक त्या मुलाची आई व दुसरी बहीण होती, हे आईने मागाहून मला सांगितले. ते दोन पुरुष बाहेरच्या खोलीत बसले. त्यातील एक नवरामुलगा होता व दुसरे त्याचे वडील होते. वडिलांबरोबर ते गप्पा करू लागले. मग थोड्या वेळाने मिठ्ठा खाना आला. तो खाऊन पाहुणेंडळी निघून गेली.
त्यांनी जाताना निश्चित काहीच सांगितले नाही. मग वडील त्यांच्या घरी खेटे घालू लागले. एक दिवस आईने विचारले, ‘‘उन लोगों ने क्या जवाब दिया?’’
‘‘अभी तक नक्की इचार हुवा नही उनका।’’
‘‘फिर तुम काय कू खेटे मारते हो? बम्मन लोगों जैसा। लडके के पिछे लगना अपना रवैय्या है क्या?’’ वडील काहीच म्हणाले नाहीत. ते पुन्हा त्या लोकांकडे गेले की नाहीत, ते कळले नाही. त्यांच्यापैकी कुणी पुन्हा आमच्या घरी आले नाही आणि तो विषय तिथेच संपला. आपाजानच्या लग्नाचा विषय पुन्हा म्हणून घरात कुणी काढला नाही. शाळेला सुट्टी लागली, तेव्हा मीही दिवसभर घरी राहू लागलो. आपाजान आता माझ्यापाशीही फारशी बोलेनाशी झाली. दिवसभर ती आईबरोबर घरकाम करण्यात गढलेली असे. तिला एकदा मी खेळायला बोलावले तर, आई चिडून माझ्यावर खेकसली. ‘‘वो अब छोटी है क्या तेरे साथ खेलने के लिए?’’ आणि त्यानंतर मी पुन्हा तिला माझ्याबरोबर खेळायला येण्याचा आग्रह केला नाही.
दिवसभर घरात बसून राहायचा मला कंटाला येऊ लागला. मी शेजारच्या न्हाव्याच्या दुकानात जाऊन बसू लागलो. तिथल्या सदाशिव न्हाव्याची आणि माझी ओळख होती. रस्त्याने शाळेला जाताना तो नेहमी हाक मारून मला विचारायचा, ‘क्यों मिट्टू, चला इस्कूल कू?’ सुटी झाल्यानंतर एक दिवस त्याच्या दुकानासमोर मी उभा असताना मला त्याने आत बोलावले. प्रथमच तेव्हा मी ते सलून पाहिले. त्याचा शेठ एका बाजूला बसला होता. दुकानात गिऱ्हाइके नव्हती. सदाशिव काही वेळ माझ्याशी बोलत बसला. काही वेळाने एक गिऱ्हाईक आले, तेव्हा तो उठला आणि त्याची दाढी करू लागला. त्या दिवसापासून मी सदाशिवकडे रोज जाऊ लागलो. तासन्तास त्याच्या सलूनमध्ये जाऊन बसू लागलो. तो काम नसले की, माझ्याबरोबर बोलत बसे. गिऱ्हाईक आले की, कामाला लागे. एकीकडे त्याच्या हातातील वस्तरा चालत राहायचा व दुसरीकडे तो माझ्याशी बोलायचा. त्याची नजर घारीसारखी हातातल्या वस्तऱ्याच्या हालचालीवर रोखलेली असायची. त्याच्या हालचाली समोरच्या आरशात न्याहाळायला मला गंमत वाटायची. मी सदाशिवकडे जाऊन बसत असल्याचा आईला हळूहळू सुगावा लागला. प्रथम ती माझ्यावर रागावली. ‘‘किधर किधर शोधना तुझ कू? वहां हजाम के पास क्या काम रहता तेरा?’’
मी म्हणालो, ‘‘काम काय का? मजे से बैठता।’’
‘‘मजे से बैठता? मजे से क्या बैठना है? तुझे हजामगिरी सिखना है क्या?’’
आईच्या त्या बोलण्याचे आपाजानला हसू आले. ती खुद्कन हसली आणि तिचे ते दात मला भेडवीत बाहेर प्रकट झाले. मी संतापून तिला म्हणालो, ‘‘गप बैठेगी क्या? तुझ को काय कू हसू आता है?’’ एरवी माझ्या बोलण्याने ती हिरमुसली झाली असती. परंतु त्या दिवशी कशी कुणास ठाऊक, चिडली नाही. हसतच राहिली. मी काही न बोलता स्वत:शीच जळफळलो. मग तीच हसायची थांबली. माझ्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, ‘‘कितना बिगडता है मेरा भैय्या! अरे मैने मजाक की.’’ तिचा ‘मजाक’ समजून घेण्याच्या मी मन:स्थितीत नव्हतो. मी तिचा हात झिडकारून लावला. तेव्हापासून तिने सलूनमध्ये गेल्याबद्दल माझी थट्टा केली नाही. एकदा तर मी सलूनमध्ये बसलो असताना ती मला बोलवायला आली. सदाशिवची आणि सगळ्यांचीच मग ओळख झाली. तो कधी आमच्या खोलीत येई, मला बोलावून नेई. एकदा त्याने मला एका हॉटेलात जेवायला नेले. ‘‘तुमको क्या होना? बिर्यानी?’’ त्याने मला विचारले. त्याच्या वागण्याने मी तर दडपूनच गेलो होतो. मला ‘नाही’ किंवा ‘होय’ बोलायचेही भान राहिले नाही. त्या दिवशी प्रथमच मी हॉटेलात जेवण कले.
घरी आल्यानंतर आईने जेवायचा आग्रह केला. तेव्हा मी भूक नसल्याचे तिला सांगितले, पण तिला ते पटेना. अखेर मला खरे सांगावे लागले. मला वाटले, ती रागावेल; परंतु ती फारसे काही बोलली नाही. आपाजानने मात्र विचारले, ‘‘इतना क्या खिलाया रे उसने?’’
मी म्हणालो, ‘‘बिर्यानी!’’
आपाजान गालातल्या गालात हसली. दात दिसू नयेत म्हणून तिने तोंडावर हात नेला. मग ती म्हणाली, ‘‘अच्छा, उसका भाकसूड निकालता है!’’
काही दिवसांनी माझी शाळा सुरू झाली आणि सदाशिवकडे माझे जाणे कमी झाले. शाळेत जाता-येतानाच मी सलूनमध्ये डोकावू लागलो. येताना सलूनपाशी रेंगाळू लागलो. कधी कधी आपाजान सलूनसमोर माझी वाट बघत उभी राहू लागली. तिथे उभी असली की, ती मला म्हणायची, ‘‘कितना देर किया रे?’’ सलूनच्या दारात उभा असलेला सदाशिव अशा वेळी मला म्हणायचा, ‘‘लल्लूभाई, जल्दी घर जा। तुम्हारी आपाजान इंतेजार कर रही है।’’ आपाजान माझा हात पकडायची. हळुवारपणे दाबायची. मला घरी घेऊन जायची. एक दिवस संध्याकाळची आपाजान घरातून एकाएकी नाहीशी झाली. ती कुठे गेली आहे, हे आधी कुणाला कळलेच नाही. मी शाळेतून परतलो, तेव्हा ती सदाशिवच्या सलूनपाशी उभी नव्हती. समोर सदाशिवही उभा नव्हता. त्यामुळे मी तिथे न थांबता थेट घरीच आलो. घरी येताच आईने विचारले, ‘‘सुरैयाआपा नही आयी?’’ ‘‘नही।’’
तिने माझ्याकडे वळून पाहिले. ‘‘सुरैय्या बाहर खडी नही थी?’’ तिने पुन्हा विचारले.
‘‘नही!’’
‘‘पोरटी फिर गई कहां?’’ आई स्वत:शीच पुटपुटली आणि मग कामाच्या गडबडीत ती आपाजानला विसरून गेली. मलाही तिची आठवण राहिली नाही. अंधार पडला. खूप रात्र झाली आणि आई एकाएकी भानावर आल्यासारखी भयभीत सुरात मला म्हणाली, ‘‘कहाँ रे गई तेरी आपाजान? इतना देर कहाँ जानेवाली नही वो। मुझे तो डर लगता है।’’ मग मलाही काळजी वाटू लागली. आपाजान कुठे गेली असेल? मला काहीच तर्क करता येईना. तेवढ्यात वडील आले. त्यांना आईने आपाजानविषयी सांगितले. ते काहीसे गंभीर झाले. मग उठून तिच्या शोधाला बाहेर गेले. सुमारे तासाभराने ते परतले, तेव्हा अधिकच गंभीर दिसत होते. आपाजानचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. त्यांनी शेजारी सर्वत्र चौकशी केली होती. पोलिसांनादेखील आपाजान नाहीशी झाल्याची वार्ता कळवली होती. ते घरी आले आणि भिंतीला टेकून खिन्नपणे जमिनीवर बसले. आई ओक्साबोक्शी रडू लागली. आईला रडताना पाहून मलाही रडू कोसळले. रडता-रडता मी कधी झोपी गेलो, मला कळले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि वडिलांशी हळू आवाजात काही तरी बोलू लागले. बराच वेळ त्यांचे बोलणे चालले होते. वडिलांचा चेहरा मात्र संतप्त होता होता. एकदा ते मधेच म्हणाले, ‘‘तुम्हारी कसम, मैं उसको कतल कर डालूंगा।’’
त्या गृहस्थाने वडिलांचा हात धरला. वडिलांना विनवणीच्या सुरात म्हणाला, ‘‘ऐसा कुछ करना नही खानसाब, दिमाग काबू में रखना। अपनी किस्मत बुरी समझना।’’ वडील काहीच म्हणाले नाहीत. तो गृहस्थ निघून गेला तरी ते एकटेच हताशपणे बसून राहिले. आम्हाला काहीच अर्थबोध झाला नाही. अखेर आईने पुढे येऊन विचारले, ‘‘कमरुद्दीन ने क्या बताया?’’
‘‘उसने सुरैया को देखा।’’
‘‘कहाँ?’’
‘‘मालाड में।’’
‘‘वहाँ कैसे गयी?’’
काही वेळ वडिलांनी उत्तर दिले नाही. मग ते म्हणाले, ‘‘उसके साथ सदाशिव था।’’
आणि मग माझ्या लक्षात आले. सदाशिव मला कालपासून दिसलाच नव्हता. त्याला आम्ही विसरूनच गेलो होतो. त्याच्याविषयीचा विचारच आमच्या कुणाच्या मनाला शिवला नव्हता. आपाजानने सदाशिवबरोबर असे पळून का जावे, याचा मी विचार करू लागलो. ‘‘मिला वो भी हजाम मिला! हंऽऽ’’ आई हाताची बोटं कडाकडा मोडीत किंचाळली. ‘‘दीन इस्लाम सब भूल गयी कैसी?’’ वडील काही वेळ शांत होते. मग एकदम उसळून म्हणाले, ‘‘बस करो. अब इस घर में उस का नाम मत लेना। मेरे लिए पोरटी मर गयी जहन्नम में गयी!’’ आणि ते उठले आणि पायांत बूट घालून तरातरा चालू लागले. कामाला निघून गेले. ते जाताच मी बसलो होतो तेथे आई आली. ‘‘उस हरामजाद्यासे तू दोस्ती किया ना?’’ माझ्या पाठीत धपाटा देत ती किंचाळली. ‘‘तुझको बोली थी, हजाम से दोस्ती मत कर. सारा सत्यानास किया मेरे बेटी काऽ’’ असे म्हणत ती मला धपाटे देत राहिली. त्या माराने मी कळवळून गडबडा लोळू लागलो. तशी कंटाळल्यासारखी ती मारायची थांबली. माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून आत निघून गेली. मी तसाच जमिनीवर पडून राहिलो. आपाजानने सदाशिवबरोबर जाण्यात माझे चुकले तरी काय, याचा मी विचार करू लागलो.
त्यानंतर काही दिवस तिने मला शाळेत पाठवले नाही. घरातून बाहेरच जाऊ दिले नाही आणि जेव्हा वडिलांनी मला शाळेबाबत हटकले, तेव्हा ती आतून धावत आली आणि माझ्यावर खेकसत म्हणाली, ‘‘कल से जाना बे. लेकिन सुरैया का किसी से जिकर नही करना, नै तो फिर मैं हूँ और तुम.’’ आईने असा धाक घातल्यानंतर आपाजानबद्दल कुणाशी काही बोलायला मी धजावलोच नाही. मला तिच्याबद्दल कुणी विचारलेही नाही. परंतु रस्त्याने येता-जाताना त्या सलूनपाशी मी आलो की, सलूनचे इतर न्हावी माझ्याकडे पाहून मिस्किलपणे हसत आहेत, असे मला वाटायचे आणि मी खाली मान घालून तिथून पुढे सटकायचो. पुढे-पुढे मला त्यांच्या हसण्याची भीती वाटेनाशी झाली. पूर्वीसारखा न अवघडता त्यांच्यासमोरून जाऊ लागलो. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर कंटाळा आला की पुन्हा त्या सलूनच्या समोर येऊन उभा राहू लागलो. त्यांच्याशी बोलत बसू लागलो. त्यांनी माझ्याशी आपाजानचा विषय कधी काढला नाही आणि घरातही तिच्याबद्दल कुणीच काही बोलेनासे झाले. जणू आपाजान आमच्या घरात पूर्वी वावरतच नसल्याच्या जाणिवेने घरात आम्ही सारे वागू लागलो. कुणीच तिची आठवण काढीनासे झाले.
असे वर्ष सरले आणि रमजानची ईद आली. मी आणि वडील पहाटे नमाजला गेलो. नमाज आटोपताच वडील मला म्हणाले, ‘‘ए घर में जा। मैं सगे सोयरों को मिलके आता.’’ मी घरी यायला उत्सुकच होतो. आईने शिरखुरमा केला होता. तो कधी खाईन, असे मला झाले होते. मी घराकडे पळत निघालो. आणि सलूनपाशी सदाशिव उभा असलेला मला दिसला. मी दचकलो. माझे पाय आपोआप थबकले. मला पाहताच तो पुढे आला. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ‘‘तुम्हारी आपा आयी है।’’ ‘‘कुठे?’’ ‘‘घर गयी है। ईद है ना। माँ से मिलने आयी है।’’
‘‘मग मी जातो घरी’’
‘‘हां हां’’ त्याने माझ्या हातात बळेच पाच रुपयांची नोट कोंबली. ‘‘ये मेरी तरफ से ईदी’’ तो म्हणाला. सदाशिवच्या आग्रहामुळे मला काही बोलताच आले नाही. मी ती नोट निमूटपणे इजारीच्या खिशात कोंबली आणि घराकडे धावत सुटलो. आपाजान तेव्हाच घराकडे पोहोचली होती. तिने मला पाहिले नाही. तिने बंद दरवाजा ठोठावला आणि क्षणार्धात आई दरवाजा उघडून बाहेर आली. समोर आपाजानला पाहताच ती काही क्षण भांबावली. मग एकाएकी तिचा चेहरा कठोर बनला.
‘‘काय कू आयी है?’’
‘‘मिलने…तुम को मिलने माँ’’
‘‘चले जाव यहाँ से। इधर आना नही। इस घर में कभी कदम रखना नही।’’
‘‘माँ’’
‘‘तुम चली जाव यहाँ से। तेरे बाप ने अगर देखा तो कसम से तुम्हे कतल कर डालेगा । यहाँ से चली जा।’’
आपाजान काही क्षण दरवाजातच घुटमळत उभी राहिली आणि अखेर मागे वळली. तेव्हाच तिचे लक्ष माझ्याकडे वेधले. तिचे डोळे पाण्याने तरारले होते. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला, मग ती पुटपुटली, ‘‘तू भी मेरे ऊपर गुस्सा किया है क्या रे?’’ आई अद्याप दरवाजातच उभी होती. आपाजानने माझ्या खांद्यावर हात ठेवताच ती चवताळून बाहेर आली आणि मला ओढत आत घेऊन गेली. आपाजान कधी निघून गेली, ते मी मग पाहिलेच नाही. थोड्या वेळाने वडील आले. आईने आम्हाला शिरखुरमा आणून दिला. वडील सावकाश शिरखुरमा खाऊ लागले, परंतु मला सारखी आपाजानची आठवण येऊ लागली शिरखुरमा खाताना मला एकदम रडूच कोसळले
(मराठवाडा : दिवाळी 1965)
Tags: हमीद दलवाई आमच्या घरची गोष्ट कथा साहित्य Hamid Dalwai marriage Aamchya gharchi gost katha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या