मुस्लिम लीगच्या डायरेक्ट ॲक्शनच्या दिवशी भाषण करायला म्हणून कोल्हापूरहून खानसाहेब नावाचे कोणी वक्ते येणार होते. आमच्याच घरी ते उतरणार होते. मोठ्या इतमामाचा हा पाहुणा असल्याचे बाबांना समजले होते. तेव्हा त्यांच्या इतमामाला साजेशी त्यांची बडदास्त झाली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. खानसाहेब यायच्या दिवशी सकाळपासूनच बाबांची सारखी धावपळ चालली होती. कोल्हापूरहून ते सभेला परस्पर जाणार होते आणि तिथून आमच्या घरी येणार होते. दुपार झाल्यावर सभेला जायची घाई बाबांना लागली होती, म्हणून घरची सगळी व्यवस्था पाहण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली आणि मला तंबी दिली, ‘‘पाहुणे आल्यावर त्यांच्याजवळ उगाच बाता करू नकोस. तुझ्यापेक्षा त्यांना जास्त समजते. मधेच का राजकारणावर बोललास, तर कानफट फोडून टाकीन.’’
मुस्लिम लीगच्या डायरेक्ट ॲक्शनच्या दिवशी भाषण करायला म्हणून कोल्हापूरहून खानसाहेब नावाचे कोणी वक्ते येणार होते. आमच्याच घरी ते उतरणार होते. मोठ्या इतमामाचा हा पाहुणा असल्याचे बाबांना समजले होते. तेव्हा त्यांच्या इतमामाला साजेशी त्यांची बडदास्त झाली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. खानसाहेब यायच्या दिवशी सकाळपासूनच बाबांची सारखी धावपळ चालली होती. कोल्हापूरहून ते सभेला परस्पर जाणार होते आणि तिथून आमच्या घरी येणार होते. दुपार झाल्यावर सभेला जायची घाई बाबांना लागली होती, म्हणून घरची सगळी व्यवस्था पाहण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली आणि मला तंबी दिली, ‘‘पाहुणे आल्यावर त्यांच्याजवळ उगाच बाता करू नकोस. तुझ्यापेक्षा त्यांना जास्त समजते. मधेच का राजकारणावर बोललास, तर कानफट फोडून टाकीन.’’
ते गेले आणि दोनच तासांनी खानसाहेबांना घेऊन आले. खानसाहेब हाडापेरांनी चांगले दणकट गृहस्थ होते. घरात शिरताच त्यांनी डोक्यावरची जीना कॅप काढून हातात घेतली आणि त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या जागेवर ते जाऊन बसले. मग त्यांना बघण्यासाठी गावातल्या जमलेल्या लोकांनी त्यांना सलाम केला. त्यांच्यापैकीच एक जण लगबगीने पुढे जाऊन त्यांना वारा घालू लागला. बाबांनी आपला फेटा सावकाश काढला आणि ते त्यांच्या शेजारी बसले. तेवढ्यात त्यांची नजर वर भिंतीवर टांगलेल्या जीनांच्या फोटोकडे गेली आणि ते म्हणाले, ‘‘तुमाला माजा फोटू दाखवतो.’’ खुंटीला टांगलेल्या शेरवानीच्या खिशातून त्यांनी एक घडी केलेला कागद बाहेर काढला आणि ते सगळ्यांना म्हणाले, ‘‘आव, देखो.’’ जमलेल्या लोकांनी लगेच खानसाहेबांच्या भोवताली घोळका केला. खानसाहेब त्यांना समजावून सांगू लागले, ‘‘ह्या बाजूने बघा. ये क्या है? ये दिखता है?’’ चित्र बघून एकेक जण बाजूला झाला. खानसाहेबांनी सगळ्यांना विचारले, ‘‘आपने देखा? आपने देखा?’’ आणि त्यांची नजर मी उभा होतो तिकडे गेली. ते एकदम कावरेबावरे झाले. बाबांना त्यांनी विचारले, ‘‘ये कौन है जी?’’
‘‘मेरा बेटा.’’
‘‘काय? म्हणता काय! उमरखानसाहेब? तुमच्या मुलाच्या डोक्यावर गांधी टोपी? मला वाटले, हा तुमच्या घरातला कोणी कुणबी गडी आहे की काय?’’ बाबांनी आपली नाखुशी व्यक्त करण्यापलीकडे काही उत्तर दिले नाही. खानसाहेबांनी मला विचारले, ‘‘माझ्या लेक्चरला आला होतात?’’
मी म्हणालो, ‘‘नाही.’’
ते यावर नुसते हसले. बाबा म्हणाले, ‘‘खानसाहेबांचा लेक्चर तू ऐकायला होवा होतास. असलां भासण आपून कैक दिस ऐकलां नव्हतां.’’ मी काही न बोलता ऐकत होतो. शिवाय मधे न बोलण्याची सक्त ताकीद दिली होतीच. यामुळेही माझा नाइलाज झाला. त्यांनीही काही वेळाने आपले बोलणे आवरले. बाबांच्या हातात तेवढ्यात कोणी तरी वर्तमानपत्र आणून दिले आणि त्यांत दोघांनीही डोके खुपसले.
दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते आमच्या घरी होते. या अवधीत अनेकदा प्रसंग येऊनही मी त्यांच्याजवळ गेलो नाही. दुसऱ्या दिवशी निघून जाताना ते विलक्षण खुशीत होते. जाता-जाता मात्र त्यांनी मला चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘अरे, मुसलमानांची पोरं तुम्ही! ह्या म्हारा-पोरांच्या टोप्या घालता, हे बरें काय? आणि हे बघा शेखहमीद, जरा मुसलमानी बी पढत जा.’’ इतके बोलून जाताना, कोल्हापूरला त्यांच्या घरी एकदा केव्हा तरी येण्याचे त्यांनी मला आणि बाबांना आग्रहाचे निमंत्रणही दिले. वर्षभराने मला कोल्हापूरला जाण्याचा योग आला. अच्युत म्हणून माझा एक मित्र तिथे राहत होता. तो पुष्कळ दिवस मला बोलवत होता आणि मला जायला जमत नव्हते. अखेरीस एकदा मी जायचे नक्की केले. मी जायचे ठरवताच बाबांना साहजिक खानसाहेबांची आठवण आली. मला त्यांनी खानसाहेबांना भेटायला सांगितले. शक्य तर मी त्यांच्या घरी उतरावे, असाही त्यांनी मला आग्रह केला. अर्थातच, मी गेल्यावर त्यांच्याकडे उतरलो नाही. अच्युत स्टेशनवर न्यायला आला होता. त्याच्याबरोबर मी त्याच्या घरी गेलो. चार-पाच दिवस त्याच्याबरोबर मजेत काढले आणि यायच्या आदल्या दिवशी खानसाहेबांना भेटायला गेलो. याच वेळी खानसाहेबांविषयी मला थोडीफार माहिती कळली. ते पूर्वी कुठे तरी चांगल्या नोकरीत होते. ऐन तारुण्यात त्यांची पत्नी वारली, तेव्हा त्यांना एक छोटी मुलगी होती. खानसाहेबांनी मग दुसरे लग्न केले नाही. मुलीचा त्यांना विलक्षण लळा लागला. सेवानिवृत्तीनंतर कोल्हापूरला घर बांधून ते स्थायिक झाले.
मधला राजकारणाचा काळ सोडला, तर पूर्वी त्यांचे आयुष्य संथ गतीने गेले होते; आणि आताही तशाच संथ, एकाकीवृत्तीने ते राहत होते. मी गेलो तेव्हा ते आणि त्यांची मुलगी बाहेरच्या प्रशस्त खोलीत बसली होती. त्यांची मुलगी तरुण होती, दिसायलाही नीटनेटकी होती. तिचा चेहरा गोल-गोल होता आणि डोळे सुंदर विलक्षण सुंदर होते. मी जवळ जाताच ती चट्कन उठून जायला निघाली. परंतु खानसाहेबांनी मला पाहताच तिला थांबवले आणि माझ्याशी तिची ओळख करून दिली. तिने किंचित हसून मान खाली घातली. ‘‘जाव, जल्दी चाय का इन्तजाम करो’’ असे सांगून त्यांनी तिला आत पिटाळले आणि ते माझ्याशी बोलू लागले. बोलता-बोलता त्यांनी मला विचारले, ‘‘हां, मग काय म्हणतेय तुमची कांगरेज?’’ त्यांच्याशी राजकारणावर बोलायला मी बिलकुल नाखूष होतो. संभाषण वाढू न देण्याच्या इराद्याने मी इतकेच म्हणालो, ‘‘काय म्हणणार?’’ इतक्यात त्यांची मुलगी चहाचे साहित्य घेऊन आली आणि आमचे संभाषण अनायसे बंद पडले. ती चहा तयार करण्यात दंग झाली आणि खानसाहेब तिच्याकडे विलक्षण प्रेमाने बघत मला सांगू लागले, ‘‘मेहरू बंबईच्या अंजुन इस्लाम साळेत शिकलेली हाय. मुसलमानी मी तिला घरात बराबर शिकवलेली हाय. कुरानची मानी तिच्या तोंडपाढ आहे. बेटी, पावन्यांना एक आयत पढून दाखव.’’
त्यांची मुलगी एकदम लाजली. तिला हसू आले आणि हातातली चहाची किटली खाली ठेवून तिने दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले. खानसाहेबांनी तिला आग्रह केला नाही. चहा घेऊन होताच मी उठून जायला निघालो, परंतु खानसाहेबांना बरेच दिवस राजकारणावर बोलायला कोणी मिळाले नव्हतेसे दिसले. ‘‘अरे, ठहरो. इतने जल्दी कहाँ चले?’’ असे म्हणून त्यांनी मला थांबवले. सहज विचारायचे म्हणून मी विचारले, ‘‘खानसाहेब, तुम्ही पाकिस्तानात बरे नाही गेलात?’’ त्यांना इतकेच बस होते. त्यांनी मला विचारले, ‘‘का? आमचा इथे काही हक्क नाही काय?’’
‘‘आहे ना. नाही कोण म्हणतंय?’’ त्यांच्याशी वाद घालायला मला काही जमेना. ‘‘तुम्हाला काही माहीत आहे साहेब?’’ ते म्हणू लागले. ‘‘ह्या साल्यांच्या बापजाद्यांनी कधी राज्य केले आहे? राज्य करावे ते मुसलमानांनी आणि या गाढवांनी मुकाट्याने जिझिया कर भरावा.’’
‘‘ही फार जुनी गोष्ट झाली खानसाहेब. ते दिवस गेले आता.’’
‘‘कसले गेले? कुराने-पाकमध्ये काय लिहिले आहे, दुनियेच्या आखिरीला तमाम दुनियेत मुसुलमानी होईल. काफिरांचे नामोनिशाण उरणार नाही. पण तुम्ही मुसुलमानी पढली असेल तेव्हा ना.’’
मी मुकाट्याने गप्प बसून त्यांचे बोलणे ऐकू लागलो. त्यांची मुलगी स्वस्थ बसली होती आणि तितक्याच स्वस्थपणे ऐकत होती. मी तिच्याकडे पाहताच ती हसली. बापाचे बोलणे तिला ऐकून-ऐकून पाठ झाले असावे. अखेरीस कंटाळून मी जायला निघालो. एक जांभई दिली आणि म्हणालो, ‘‘बाबांनी तुम्हाला सलाम सांगितला आहे.’’
‘‘वालेकुम सलाम. उमरखान सायबांना आमचा सलाम बोला.’’ मी उठलो आणि त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी कोल्हापूर सोडले. मध्यंतरी तीन वर्षे निघून गेली. चिपळूण सोडून मी मुंबईला आलो आणि नोकरीसाठी बेकार अवस्थेत वणवण फिरत होतो. असाच एक दिवस रस्त्याने चाललो असताना एक सुंदर पॅकार्ड गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. आत खानसाहेब बसले होते. त्यांनी मला हाक मारली, ‘‘शेख हमीद.’’ माझ्या फाटक्या-तुटक्या वेशांत त्यांच्याजवळ जायची मला लाज वाटू लागली, परंतु त्यांना चुकवणे शक्य नव्हते. मी जवळ गेलो. माझ्या चेहऱ्यावर नजर फिरवीत ते जोरात ओरडले, ‘‘वा शेख हमीद! दाढीबिढी बढाया है? तुम्हाला मुसुलमानी समजायला लागलीसे दिसते.’’
कसली कर्माची मुसुलमानी! मी नुसता हसलो.
त्यांनी विचारले, ‘‘काही काम हाय का?’’
‘‘नाही.’’
‘‘मग चला आमच्याबरोबर.’’
मी आत जाऊन बसलो आणि मोटार तिथून निघून महंमद अली रोडवरच्या एका आलिशान इमारतीपाशी येऊन थांबली. तिथे पोहोचेपर्यंत खानसाहेबांनी माझी व बाबांची चौकशी केली आणि स्वत:विषयी पुष्कळसे सांगितले. मुलीचे लग्न करण्याचे त्यांनी ठरवले होते. तिला एका श्रीमंताची मंगनी आली होती. पाकिस्तानात कराचीला त्याचा मोठा व्यापार होता. मधून-मधून तो चार-आठ दिवसांनी मुंबईस येत असे. असाच तो आला असताना खानसाहेबांनी मुंबईत येऊन सगाई नक्की केली होती. लग्न मात्र नवऱ्यामुलाच्या सवडीनुसार सावकाश कराचीला होणार होते. खानसाहेबांचा भावी जावई त्या इमारतीत राहत होता. माझी त्यांनी त्याच्याशी ओळख करून दिली. मग चहाची लगबग केली. लग्नाचे सामान दाखवले. साड्यांचे आणि दागिन्यांचे ढीगच्या ढीग मी पाहिले. आनंदाने ते बराच वेळ माझ्याशी बोलत होते. परंतु जराशा वेळानं दु:खी-कष्टी झाले. गहिवरलेल्या स्वरात ते म्हणाले, ‘‘वीस वरसें मी देखभाल केली; आता बेटी परक्यांच्या घरी जायाची.’’
लगेच त्यांनी आपले डोळे पुसले. मग ते हसत मला म्हणाले, ‘‘मी बी तिच्याबराबर कराचीला जाणार.’’ ‘‘तुम्हीही जाणार?’’ मी आश्चर्याने विचारले. ‘‘हो. ती गेल्यावर मी इथे कशाला ऱ्हावू? माजी बेटी माज्या नजरेत होवी शेख हमीद.’’ आणि मग काही वेळ थांबून त्यांनी उद्गार काढले, ‘‘आणि तुच्या गवरमेंटने आम्हांला ऱ्हावू देलं पायजे ना.’’ मुलीसाठी इथून जात असल्याचं सांगत असतानाच, इथं राहू न दिल्याचा कांगावा करण्याची त्यांची रीत पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या आवाजातली मघाची कोलता आता संपली होती. नेहमीच्या धारदार आवाजाने ते बोलू लागले होते.
‘‘तुमचा हा नहेरू पाकिस्तानच्या सीमेवर फौजा नेऊन ठेवतो कशाला? हां?’’
‘‘पाकिस्तान कटकटी करते म्हणून!’’
‘‘मग करणारच! ते काय तुमच्यासारखे डरपोक हायत? तुमच्या फौजा तिथं काय करणार? एक मुसुलमान दहा हिंदूंना भारी हाय. तुम्ही काय रडणार, मुसुलमानी फौजे पुढे? तुम्हाला बलुची रेजिमेंटस् म्हायती आहेत? बलुची रेजिमेंटस् ऐशी लढते, नुसती कत्तल करत सुटते.’’
बोलण्याच्या आवेशात ते मुलीचे लग्न विसरले आणि एका जिहादची त्यांनी गर्जना केली. पानिपतच्या एका नव्या युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. बलुची आणि पठाण सैन्यांच्या तुकड्यांच्या तुकड्या खानसाहेबांच्या आधिपत्याखाली दुआबातल्या विस्तीर्ण भूप्रदेशात गोळा झाल्या. समोरच काफिरांचे सैन्य उभे होते. दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या आणि अल्पावधीत काफिरांचे सैन्य पळ काढू लागले. त्याबरोबर मुसलमानांनी काफिरांची भयानक कत्तल करायला सुरुवात केली. त्यांची मुंडकीच्या मुंडकी मुसलमानांनी उडवली आणि त्याची रास पानिपतच्या मैदानावर रचून ठेवली. नंग्या तलवारी घेतलेल्या मुसलमानांनी मग काफिरांचा राक्षसी संहार केला. त्यांच्या बायका-पोरांना पळवले आणि बाटवून मुसलमान केले. जगाच्या अंतापर्यंत अवघ्या भूतलावर इस्लामचे अधिराज्य करण्याच्या कुराणातल्या वचनांची नांदी म्हटली गेली. कत्तलीचे एक महापर्व संपवून खानसाहेब बोलायचे थांबले, तरी त्यांच्या डोळ्यांत नुसत्या ठिणग्या उसळत होत्या. चिपळूणला डायरेक्ट ॲक्शनच्या सभेत त्यांनी कसे भाषण केले असेल, याची मला या वेळी पुरती कल्पना आली.
‘‘तुम्हाला वायट वाटले असेल?’’ हसून त्यांनी प्रश्न केला. मी काही उत्तर न देता उठून उभा राहिलो. ‘‘निघालात?’’
‘‘होय. लांब जायचे आहे.’’
‘‘अच्छा. खुदा हाफिज. बुढ्ढ्याची कवा याद करा.’’
‘‘जरूर!’’ मी म्हणालो आणि त्यांच्या हाताला हात लावून तिथून बाहेर पडलो.
यानंतर सहाच महिन्यांनी एका नोकरीच्या मुलाखतीसाठी मला कोल्हापूरला जावे लागले. मुलाखत आटोपून मी अच्युतला भेटायला गेलो आणि त्याने सांगितलेली हकिगत ऐकून थक्क झालो. खानसाहेब मुंबईस आले असताना, त्यांची मुलगी शेजारच्या एका हिंदू तरुणाचा हात धरून घरातून पळून गेली. जाताना बापाने तिच्यासाठी ठेवलेले पंधरा-वीस हजार रुपयांचे दागिन्यांचे डबोलेही ती घेऊन गेली. खानसाहेबांनी तिचा शोध लावण्याची पराकाष्ठा केली, परंतु तिचा पत्ताच लागला नव्हता.
अच्युतने सांगितलेली ही सगळी कथा मी सुन्न मनाने ऐकली. मग त्याला विचारले, ‘‘म्हातारा इथेच आहे का?’’
‘‘असावा.’’
‘‘करतो काय? मनातल्या मनात आता तो बहुधा काफिरांची मुंडकी उडवीत सुटला असेल.’’
‘‘कोणास ठाऊक! पूर्वी रस्त्याने गेलो असताना निदान बाहेर मुलीबरोबर बसलेला तरी दिसायचा. पण पोरगी पळाल्यापासून मी त्याला पाहिलेला नाही.’’
हे ऐकून खानसाहेबांना भेटावे, असे मला वाटू लागले. त्याच दिवशी संध्याकाळी मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या घरापाशी जाताच बिघडलेल्या मामल्याची मला एकदम कल्पना आली. घराभोवतालच्या बागेत गवताचे नुसते रान माजले होते. बागेतल्या वेली घराच्या भिंतीवर चढल्या होत्या. व्हरांड्यात किती तरी धूळ साचली होती. आढ्याला कोळिष्टके लागली होती आणि तिथल्याच मोठ्या घड्याळात कधी तरी कायमचे बारा वाजून राहिले होते. मला पाहताच एक छोकरा समोर आला. खानसाहेब आत असल्याचे त्याने सांगितले. माझे नाव-गाव विचारून तो आत वळला, पाठोपाठ मीही आत गेलो.
ते आपल्या खोलीत पलंगावर झोपले होते. त्या मुलाने सांगितले, ‘‘सेठ, ये कोई आये है।’’ त्यांनी वळून माझ्याकडे पाहिले. म्हातारा एकाएकी विलक्षण खंगून गेला होता. त्यांचे डोळे आणि गालफडे खोल गेली होती. मोठ्या मुश्किलीने ते उठून बसले आणि हाताने मला बसायची खूण करून ते म्हणाले, ‘‘तुम्हाला कुठं समजलं? माझी बेटी.’’
‘‘इथंच मी माझ्या काही कामासाठी आलो होतो.’’
‘‘माजी बेटी एका काफिराचा हात धरून घरातून गेली शेख हमीद. तिला दिलेली सगळी तालीम पाण्यात गेली. माज्या नावाला बट्टा लावला तिने. मी गाफील ऱ्हायलो सायेब. मी इकडे रात्रीचा बेहोश निजत होतो आणि माझी बेटी तिकडे आपल्या खोलीत रातभर त्या काफिराच्या मिठीत लोळत पडली होती.’’
खानसाहेबांचा हताश स्वर आपली केविलवाणी कथा मला सांगू लागला आणि कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्ध पाहणाऱ्या संजयच्या दिव्य दृष्टीने पानिपतच्या मुसलमानांवर उलटलेल्या संग्रामाचे दुसरे पर्व मी पाहू लागलो. विजयोन्मादाने बेहोश झालेल्या मुसलमानांच्या सैन्यावर काफिरांच्या पळणाऱ्या सैन्याने उलटून हल्ला केला आणि त्यांची दाणादाण उडवून दिली. रात्रीच्या बेसावध वेळी पिछाडीला असलेल्या मुसलमानांच्या जनानखान्यापर्यंत काफिरांच्या फौजा पोचल्या आणि सूडाने पेटलेल्या अश्वत्थाम्याप्रमाणे त्यांनी मुसलमानांची कोवळी पोरे ठार करून बायकांना पळवून नेले. काफिरांच्या निवडक घोडेस्वारांनी खानसाहेबांच्या तंबूला गराडा घातला. त्यांच्या प्रतिकाराला सज्ज झालेल्या खानसाहेबांवर एक जबरदस्त वार करून, एका काफिराने त्यांच्या छोकरीला घोड्यावर घातली आणि तो क्षणार्धात दिसेनासा झाला. वाराने बेशुद्ध झालेले खानसाहेब शुद्धीवर आले, तेव्हा युद्धाचा सगळा रंग पालटून गेला होता. काफिरांनी मुसलमानांचा भयंकर संहार केला होता. जखमी आणि मृत सैनिकांचा रणांगणावर खच पडला होता. काळोखातून विव्हळणाऱ्या सैनिकांना तुडवीत खानसाहेब मुलीचा शोध करत सैरावैरा धावू लागले.
बोलता-बोलता ते थांबले. केविलवाण्या दृष्टीने माझ्याकडे पाहू लागले आणि मग वात्सल्याचे कढ त्यांना अनावर झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ते दाटलेल्या कंठाने पुन्हा बोलू लागले, ‘‘ती गेली आणि या घराची रोशनी गेली शेख हमीद. मी कुनासाठी जगू आता? माजी बेटी आता कुठं असंल? काय करत असंल? घरात पाण्याची बादली तिनं कवा उचलली नाही. मार्किटातनं भाजीची पिशवी तिनं कवा बी आनली नाय. माजा सोनां ती! माझ्या कलीजाचा टुकरा.’’ काही वेळ ते स्तब्ध बसले. त्यांनी डोळे पुसले आणि पुन्हा बोलू लागले, ‘‘मी आता छाप्यांत देनार हाय शेख हमीद. बेटी, तू कुठं लपून दिस काढू नको. मला तोंड दाखव. बापाला तोंड दाखव. मी तुला माफ केलंय. त्यालाबी हवा तर घेवन ये. माझी काय हरकत नाय.’’ आपली नजर त्यांनी दुसरीकडे वळवली आणि ते उद्गारले, ‘‘इष्कात पडलेला माणूस हवा ते करायला तयार होयल. बाईच्या नादी लागलेला बाप्या सांगाल ते कबूल करंल. ती दोघं आली तर मी त्याला मुसुलमान होयाला सांगीन. त्याला खुदाचा बंदा करून सोडीन. मग तर झालं?’’ आणि अनावर वात्सल्याने ते लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडू लागले.
(‘पुरुषार्थ’ दिवाळी अंक : 1954)
Tags: हमीद दलवाई धर्म कथा religion marriage Hamid Dalwai Darm katha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या