हैदरचा हा कावेबाजपणा लोकांना माहीत असल्यामुळं लोक त्याच्याशी सावधगिरीनं वागत. पण साध्या-सरळ माणसांना त्याच्या स्वभावातली ‘ही’ वाकडी वळणं कळत नसत. त्यामुळं मरतिकाचे वेळी हैदर घरात गेला, याबद्दल त्या घरच्या माणसांना काही वाटलं नाही; पुढं नेहमी जात राहिला, तरीही काही वाटलं नाही. महिना झाला तेव्हा आखरी खरं झालं. शमसूच्या मरणाचा तो प्रसंग, शोक हळूहळू पुसट होत गेला. लोक आपल्या नित्य व्यवहारांत मश्गूल झाले. हैदर मात्र आपले उद्योग सांभाळून त्या घरी जात राहिला. पण मरीयम त्याच्या दृष्टीस पडेना. आणखीन एक महिना गेला आणि तिच्या आईनं तिला आपल्या घरी- माहेरी आणलं.
‘जंगबारवाला’ म्हणजे झांझीबारचा शमसू, तापा- धगानं ‘इन्तेकाल’ झाला; यापेक्षा त्याची तरणी, देखणी बीबी मरीयम रांडोक झाली, ही गोष्ट शिरळगावच्या संबंध इतिहासात अधिक शोककारक ठरली! शमसूला मूठमाती देऊन लोक परतले ते, घरोघर न जाता पुन्हा शमसूच्या घरी आले. ‘खतम’चा विधी झाल्यावर बाहेरच्या फलाटावर आतली रडारड ऐकत बसले. काही जण तर आतच गेले. तिथं वठणातल्या काळोखात रडत बसलेल्या बायकांच्या अंगावर धडाधड कोसळले. त्या काळोखात मरीयम कुठं दिसते का, ते डोळे फाडफाडून बघू लागले आणि ती तिथं न दिसतांच पुन्हा उठून बाहेर आले.
पण हैदर एवढ्यावरच थांबला नाही. तो आत जाताच रडारड सुरू झाली. त्याबरोबर तो हुंदके देऊ लागला आणि बायकांची रडारड संपून हुंदक्यांवर आलं, तेव्हा सरळ स्तब्ध बसला. मग मरीयम तिथं नाही, हे पाहाताच उठून तिच्या काळोख्या खोलीत गेला आणि तिथल्या वाटेवर बसला. खाटेच्या दुसऱ्या टोकाकडून मरीयमच्या हुंदक्यांचा आवाज त्याच्या कानी आला, तसा डोळे फाडफाडत तिच्याकडे पाहू लागला. पण त्या काळोखात ती त्याला दिसली नाही. मग आपल्या कल्पनेनं तिचं नाजुक-देखणं शरीर दु:खावेगानं कसं थरथरत असेल याचं चित्र त्यानं आपल्या मनाशी उभं केलं आणि त्या कल्पनेतच पुढं होऊन तिच्या पाठीवर हात फिरवीत तो म्हणाला, ‘‘बस आता, किती रडशील?’’ त्याला वाटलं, पुढं जावं आणि तिची समजूत घालावी. तिच्या पाठीवरून हात फिरवावा, तिच्या कोमल मुखावरून ओघळणारी आसवं पुसून काढावीत. तिच्या पण हे विचार त्याच्या मनातच राहिले. तसं करायचा धीर त्याला झाला नाही. तो उठला. नाक-डोळे पुसत बाहेर पडला; आपल्या घराकडे चालता झाला. त्याला तसा बाहेर पडताना पाहून तिथं बसलेल्या चार टवाळखोर पोरांतला एक जण डोळे मिचकावून हळूच म्हणाला, ‘‘ह्यो कोल्हो थतं कशाला गेलो होतो!’’ आणि त्याबरोबर त्या पोरांत विचित्र हास्य पिकले.
त्या मुलाचं म्हणणं खोटं नव्हतं. हैदर कुणाच्या भल्या- बुऱ्याला जरी कुणाच्या घरी गेला, तरी लोकांना त्यांत त्याच्या स्वार्थसाधूपणाची दुष्ट शंका येई. अख्ख्या गावात या त्याच्या स्वभावाचा लौकिक होता. सात-बाराच्या उताऱ्यांतल्या साऱ्या मेखा त्याला पुरत्या माहीत होत्या. त्याच्या जोरावर त्यानं आदल्या वर्षी खालाबीच्या घरातला जमिनीच्या वाटपाचा फसाद मिटवला होता. कुणाच्याही मध्यस्थीनं न मिटणारं भांडण थंडावलं, तेव्हा अख्खा गाव चकित झाला होता. पण काहीच दिवसांनी तलाठ्यानं खालाबीचा माळावरील सबंध सरवा जेव्हा शमशेरच्या नावावर चढवला, तेव्हा गाववाल्यांचे डोळे उघडले होते! गुदस्तां तर त्यानं कमालच केली! आवीज झाल्यावर दर वर्षीप्रमाणं गाववाल्यांची गुरं वरती माळावरच्या वाड्यात चरावयास गेली. पण हैदरनं अशी बातमी आणली की, हल्ली रात्रीचा माळावर वाघ फिरतो; काल रात्री मी डोळ्यांनी पाहिला! झालं! सगळ्यांनी आपापली गुरं खालती आणली. माळावर रात्रीचं कोणी फिरकेनासं झालं. काही दिवस गेले आणि लोकांच्या लक्षात आलं की, माळावरचं गवत आपली गुरं घालून कोणी तरी नासधूस करीत असलं पाहिजे. तलाश जारी झाला आणि त्यातून असं निष्पन्न झालं की, वाघ-बिघ ही सगळी हैदरची गप्प आहे. आपली गुरं लोकांच्या गवतात बिनधोक चरावीत, म्हणून योजलेली ही युक्ती आहे. हा कोल्हाच रात्री-बेरात्री आपली गुरं घालून सगळ्यांच्या गवताची धूळधाण उडवतो आहे!
हैदरचा हा कावेबाजपणा लोकांना माहीत असल्यामुळं लोक त्याच्याशी सावधगिरीनं वागत. पण साध्या-सरळ माणसांना त्याच्या स्वभावातली ‘ही’ वाकडी वळणं कळत नसत. त्यामुळं मरतिकाचे वेळी हैदर घरात गेला, याबद्दल त्या घरच्या माणसांना काही वाटलं नाही; पुढं नेहमी जात राहिला, तरीही काही वाटलं नाही. महिना झाला तेव्हा आखरी खरं झालं. शमसूच्या मरणाचा तो प्रसंग, शोक हळूहळू पुसट होत गेला. लोक आपल्या नित्य व्यवहारांत मश्गूल झाले. हैदर मात्र आपले उद्योग सांभाळून त्या घरी जात राहिला. पण मरीयम त्याच्या दृष्टीस पडेना. आणखीन एक महिना गेला आणि तिच्या आईनं तिला आपल्या घरी- माहेरी आणलं. पुन्हा त्या दिवशी रडारड झाली. तिथं पण ती प्रथमप्रथम आपल्या खोलीबाहेर पडत नसे. पण काही दिवस गेले आणि घरातल्या घरात ती वावरू लागली.
हैदरला ती माहेरी आल्याचं कळलं आणि तो तिच्या माहेरी येऊ लागला. तिला ऐकू जाईल इतक्या आवाजात घरातल्या माणसांशी बोलत बसू लागला. ती त्याच्या दृष्टीसही पडत नसे. पण ती घरात आहे आणि आपलं बोलणं ऐकत आहे, ही भावना त्याला सुखकारक वाटायची. पुढे त्याचं तेवढ्यावरच समाधान होईना. तो बेधडक तिच्या खोलीत घुसू लागला. पानदान मागूं लागला. तिलाही त्याच्याशी बोलणं भाग पडू लागलं. असं जेव्हा नेहमीच होऊ लागलं, तेव्हा तोही कुणी परका उरला नाही. घरातली माणसं बसलेली असली आणि तो आला, तर ती उठून जाईनाशी झाली. त्याच्या बोलण्यावर हसू लागली. तिचं हसणं-बोलणं त्याला घायाळ करी. तिच्या जवान देहाकडे तो टक लावून पाहत राही. कोल्ह्यासारखे त्याचे डोळे तिच्यावर खिळलेले असत. पण आपल्या बोलण्याची, सहवासाची त्या दुर्दैवी मुलीवर काय प्रतिक्रिया होते आहे, हे त्याला कळू शकत नसे. एक दिवस एकांत साधून काही बोलण्याचा त्यानं निश्चय केला आणि जेव्हा तसा एकांत त्याला मिळाला, तेव्हा वेड्यासारखा तो तिच्याकडे पाहतच राहिला. पण तरीही त्याचं जाणं-येणं, रोजचं टक लावून पाहणं हे चालूच राहिलं!
एक दिवस मधेच या त्याच्या कार्यक्रमात खंड पडला. जमिनीचा ताबा मिळावा म्हणून त्यानं आपल्या कुळवाडी कुळांवर दावे लावले होते. त्यांच्या तारखा लागल्या, म्हणून त्याला रत्नागिरीस जावं लागलं. पुन्हा परत यायला त्याला पंधरा दिवस लागणार होते. या अवधीतच एक नवाच माणूस मरीयमच्या घरी जाता- येताना दिसू लागला. तो तरणा, देखणा आणि धडधाकट होता. त्याचं बसणं-उठणं फार आदबशीर दिसायचं. खाली मान घालून बसण्याची त्याला सवय होती. आणि बोलायचं झालं, तर ‘होय’ किंवा ‘नाही’ यापलीकडे सहसा बोलत नसे. त्याला पहाताच मरीयमचे डोळे आनंदानं लकाकताना दिसायचे. ती येऊन दारात उभी राहायची आणि समोर कोणी नसलं की, तो मान वर करून तिच्याकडे पाहायचा अन् तिच्या डोळ्यांतल्या आर्त भावांत विरघळून जायचा. पंधरा दिवसांनी हैदर रत्नागिरीहून परतला, तेव्हा मरीयमचा निका त्या माणसाशी ठरल्याची बातमी त्याला कळली. सारं काही ठरून गेलं होतं. सगळ्या गावातही हे वृत्त ऐकून समाधान पसरलं. हैदरच्या तिथल्या जाण्या-येण्यामुळं जी अभद्र शंका आपल्याला येत होती, ती खोटी ठरली म्हणून बहुतेकांना समाधान वाटलं. पण मंगनी लवकर होईना.
ज्या दिवशी व्हायची असं कळलं, त्या दिवशीही झाली नाही. आणि अखेर सगाई फिस्कटली, असं एक दिवस लोकांनी ऐकलं. त्या माणसाकडूनच गावातल्या एकाला असं कळलं की, ‘‘मरीयमला दिवस गेले आहेत आणि ते पाप पचवण्यासाठी म्हणून ती माणसं निक्याची घाई करीत आहेत. असल्या चवचाल मुलीशी मी निका लावणार नाही!’’ लोकांना अर्थातच ते खरं वाटलं. पण काही जणांना यांत हैदरचं काही तरी कारस्थान असावं, असंही वाटलं. परंतु खरं-खोटं पडताळून पाहण्याची हिंमत कुणाला झाली नाही. काही दिवसांनीच दुसऱ्या एका मुलीशी त्या माणसाचा निका झाल्याचं लोकांनी ऐकलं. मरीयमलाही ते कळलं होतं आणि तिनं त्या दिवसापासून अंथरूण धरलं. काही दिवसांनी तिला ताप येऊ लागला. हे ऐकून गावात नव्या अफवा पुन्हा उठल्या. ती बीमार आहे, हे हैदरकडूनच लोकांना कळलं आणि तिच्या दुखण्याबद्दल निरनिराळे तर्कवितर्क सुरू झाले. ज्या लोकांची त्या घरी जाण्याची वहिवाट होती, ते जाऊन मरीयमच्या खोलीत डोकावले; पण त्यांना तिचं दर्शनही झालं नाही. मग एक दिवस हैदर तिला पाहण्यासाठी गेला. तिला दवा करण्यासाठी त्यानं तिच्या आईला कळकळीनं सांगितलं. दवा करण्याचा तिचाही इरादा होता, पण पैशांअभावी सारं घडलं होतं. तो बोजा आपल्या शिरावर घेण्याचं हैदरनं खुषीनं मान्य केलं आणि त्या दिवसापासून मरीयमला डॉक्टरचं औषध सुरू झालं.
महिन्यानं ती घरातल्या घरात फिरू लागली. तिला बराच आराम पडला. ती बरी आहे, हे अर्थात हैदरमुळेच लोकांना कळत होतं. हल्ली तर त्याचं जाणं-येणं फार वाढलं होतं. पण मरीयमची आई हल्ली दु:खी-कष्टी असे. मरीयमची सगाई मोडली, याबद्दल तिला खंत वाटत होती. गावात काय वाटेल ते बोललं जातं, हेही तिला कळलं होतं. त्यामुळे शक्य तितक्या लवकर मरीयमचा निका व्हावा, असं त्या माऊलीला वाटत होतं. हैदरनं ही संधी सोडली नाही. कोल्हासारखा तो एक दिवस त्या म्हातारीच्या कानाशी चांगला तासभर लागला होता. तिच्याशी हुज्जत घालीत होता! दुसऱ्याच दिवशी मरीयमचा हैदरशी निका ठरल्याची बातमी गावात पसरली. असं होणारच होतं, असं काहींनी बोलून दाखवलं. हैदरनं म्हातारीला बनवलं, असंही काही जण बोलले. हैदरच्या कानावर त्यातलं थोडं फार गेलं. पण त्यानं कुणाकडेही लक्ष दिलं नाही. काही दिवसांनी निका झाला, तेव्हा सगळे निक्याला हजर राहिले. हैदरची थट्टा करीत मिठ्ठा खाना खाऊन घरोघर परतले. निका लागल्यावर हैदर लगेच घरात गेला. आत जमलेल्या गावातल्या बायका हळूहळू पांगत होत्या. रीतीप्रमाणं शेज भरून झाली आणि खोलीत ती दोघं अन् मरीयमची धाकटी बहीण एवढीच राहिली. हैदरनं त्या मुलीला खोलीबाहेर जाण्यास सांगितलं आणि धाड्कन दार लावून घेतलं! कुतूहल म्हणून काही वेळ ती पोरगी दाराबाहेर उभी राहिली. तेव्हा तिला मरीयमचे हुंदके आणि विव्हळणं तेवढं ऐकू आलं. तशी ती जाऊन मुकाट्यानं पडवीत झोपली.
दोन दिवसांनी आपल्या घरी गेली आणि लगेच तिची आई हैदरच्या घरी आली. मुलीनं तिला असं सांगितलं की, मरीयमला निक्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना चक्कर आली, न्हाणीत ती कोसळली आणि तिला रक्ताची उलटी झाली. हे खरं की खोटं ते पाहायला, चौकशी करायला ती आली होती. पण मरीयमनं तिला काही सांगितलं नाही. ती मात्र खिन्न, उतरलेली दिसत होती, एवढंच! तिची आई तशीच परत आली. हैदरचा रुबाब या काही दिवसांत फारच वाढला. आधीच गावात त्याचे कुणाशी फारसे संबंध नव्हते, आता तर तो इतरांशी फटकूनच वागू लागला. काही दिवसांत पाणी भरण्यासाठी मोलकरणीचं काही काम नाही, असं म्हणून तिला त्यानं कामावरून सोडून दिलं आणि पाणी भरण्याचं काय मरीयमवर सोपविलं. शमसू मेल्यानंतर प्रथमच त्या दिवशी ती घराबाहेर पडली आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. गावातल्या चार बायका तिला तिथं भेटल्या, त्यांच्याशी ती चार शब्द बोलली आणि टवाळखोर पोरांच्या नजरा चुकवीत पाणी भरू लागली. जेमतेम पंधरा दिवस तिनं पाणी भरलं आणि मग जशी अचानक ती एक दिवस घराबाहेर दिसली, तशीच अचानक बंद झाली. विहिरीवर गेल्यावर चार लोकांशी बोलत बसतेस, त्यांच्याशी हसतेस, खिदळतेस- असा हैदरनं तिच्यावर आळ घेतला आणि तिला बडव-बडव बडवली. ती बाहेर पडायची बंद झाली!
दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा रत्नागिरीस जावं लागलं. तो परत आला, तेव्हा मरीयम झोपलेली होती. ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोहोचली. तो जवळ जाताच ती दचकून एकदम उठून उभी राहिली आणि एकदम तिचा तोल गेला. ती खाली कोसळली. पण हैदरनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तिला मनसोक्त शिव्या घालत त्यानं आपल्यापुरतं अन्न शिजवलं आणि ते खाऊन तो आपल्या कामाला गेला. पण काही दिवस गेले आणि मरीयमला पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्याचं तिच्या आईला कळलं. या वेळेस तिनं येऊन पुरतीच शहानिशा केली. मरीयमनेही सगळं कबूल केलं. रात्री हैदर बाहेरून आल्यावर तिनं मरीयमला दवा करण्यासाठी त्याला काकुळतीने सांगितलं. तो एकदम खेकसून म्हणाला, ‘‘काय होतंय तिला? सगलां ढोंग हय!’’ अखेरीस मोठ्या मिनतवारीनं त्यानं दुसऱ्या दिवशी अप्पा वैद्याला आणलं. त्यानं तिला तपासलं व पडून राहण्यास सांगितलं आणि चाटण व गोळ्या देऊन तो निघून गेला. पण हैदरनं निराळाच कांगावा करण्यास आता सुरुवात केली, ‘‘ही निजनार अनी मना रोटी कोन देणार?’’ असा आक्रस्ताळेपणा करण्यास त्यानं सुरुवात केली. तेव्हा म्हातारीने आपल्या मुलीला त्याच्याकडे पाठवलं.
मरीयमकडे तिनं पाहावं, हाही हेतू होताच. पण मरीयमचं पाहण्यास त्या मुलीला वेळ होत नसे. हैदरचं करण्यातच तिला जीव नकोसा होई. रोटी वेळेवर मिळत नाही म्हणून तो तिच्यावर डाफरू लागला. अगदी मरीयमला ऐकू जाईल अशा आवाजात ओरडू लागला. त्यामुळं ती पोरगी बिचारी कावून-करपून गेली. हे असं चाललं असलं तरी त्याचे इतर उद्योग बंद पडले नव्हते. ते चालूच होते. जमिनीचे दावे, गावच्या सोसायट्यांच्या पैशांचं लफडं, इत्यादी भानगडी तो करीतच होता. पण एक दिवस मरीयमचं दुखणं जास्त झालं. तेव्हा सगळा गाव हैदरच्या घरी लोटला. तिच्या कृश, फिकट देहाकडे पाहून माणसं तिच्या मरणाची चर्चा करू लागली. अजून किती दिवस जातील याचे तर्क सुरू झाले. पण फार दिवस गेले नाहीत. तिला एक दिवस दम लागला आणि पुन्हा माणसं गोळा झाली. आदल्या दिवशी तिला एकाएकी हुशारी वाटली होती. ती उठून बसली. सुजलेले पाय तिनं आपल्या हातांनी हलकेच दाबले आणि म्हावरं खायला मागितलं, असं रडत-रडत तिच्या बहिणीनं तिथं जमलेल्या माणसांना सांगितलं. मग तिची आईही कपाळ बडवून घेऊ लागली. हैदरनं निक्याच्या वेळी आपणास शंभर रुपये दिले, हे तिनं कबूल केलं.
आपल्यामुळे पोरगी मौताला लागली, असं ती म्हणू लागली आणि तरीही (स्वत:च्या आणि मरीयमच्या) नशिबाला ती बोल लावू लागली! पण हैदर कुठूनसा आला. तो आल्याबरोबर तिथली कुजबुज बंद पडली. गर्दी पांगली. गावातल्या बायका घरोघरी गेल्या. रात्र झाली तसा जेवून तो ओट्यावर जाऊन झोपला आणि मरीयमच्याजवळ तिची आई अन् बहीण रात्रभर जागत बसली होती. सकाळचे दहा वाजले आणि मरीयमच्या आईनं हंबरडा फोडला. बहिणीनं आर्त किंकाळी मारली. शेजारची माणसं धावली. एकच गलका झाला. गाव जमला. मरीयम ‘इंतेकाल’ झाली! हैदर आपल्या शेतावर तेव्हा बांध घालीत होता. त्याला कळलं तसा संथपणे तो घरी आला. बाहेर गावातली पुरुषमंडळी गोळा झाली होती. त्यांच्याकडे विचित्र दृष्टिक्षेप टाकून तो आत गेला. वळणात मरीयमची ‘मय्यत’ ठेवलेली होती. बाजूला बायका रडत होत्या. ऊर बडवून घेत होत्या. हंबरडे फोडीत होत्या. त्याचा दगडी चेहरा काही वेळाने आक्रसला आणि मोठमोठ्यानं तो रडू लागला; अगदी गळा काढून, हंबरडा फोडून रडू लागला. मूठमाती संध्याकाळी झाली. हैदर आणि इतर माणसं कबरस्तानातून परतली. ‘खतम’ झालं आणि बाकीची माणसं आपापल्या घरी गेली. मग हैदर घरात गेला आणि वठणात रडत बसलेल्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागला. तिथंच बाजूला मरीयमची धाकटी बहीण बसून रडत होती. तिच्याकडे त्याचं लक्ष वेधलं आणि सासूच्या गळ्याला लागून हमसाहुशी रडत असतानाच तो क्षणभर थांबून त्या कोवळ्या पोरीकडे पाहू लागला.
(वसुधा : दिवाळी 1962)
Tags: हमीद दलवाई कोल्हा आणि कोकरू कथा साहित्य sahitya Hamid Dalwai Kolha aani Kokaru katha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Pratap valvi- 16 Dec 2021
कल्हा आणि कोकरू या कथेत धूर्त कोल्हा.......... मटले आहे
save